समीक्षेसारखे काहीतरी

हिंदी चित्रपटांकरिता हे साल माझ्या दृष्टीने दुष्काळीच म्हणायला हवे. मी यंदा मोजून तीनच हिंदी चित्रपट पाहिले. त्यांपैकी पहिले दोन तर मला माईलस्टोनच वाटतात. ते तीन पिच्चर अनुक्रमे असे : ऑंखो देखी, क्वीन आणि मेरी कोम.

मराठी आणि बंगाली चित्रपटांविषयी मला जितका जिव्हाळा आहे तितका बॉलीवूडी चित्रपटांविषयी नाही. (दाक्षिणात्य चित्रपटांविषयी तर अजिबातच नाही.) त्यामुळे मी, काटेकोर पूर्वसमीक्षणाखालून गेलेलेच हिंदी चित्रपट पाहतो. ह्या पूर्वसमीक्षणांचेही माझे काही आडाखे आहेत. मराठी समीक्षकांनी लिहिलेली मुख्य धारेतल्या हिंदी चित्रपटांची समीक्षणे मी सहसा वाचायची टाळतो. समांतर, मल्टीप्लेक्सी धारेतल्या चित्रपटांसाठीदेखील एक-दोन सोर्स वगळता हा नियम लागू आहे. कोणत्याही भारतीय चित्रपटाचे IMDB रेटिंग मी पाहत नाही. ते फसवे असू शकते. तिसरे एक, “चाच्यांच्या बेटावरचे” काही महत्त्वाचे अपलोडर्स हिंदी चित्रपट अपलोड करतात तेव्हा तो पाहणे मी इष्ट समजतो. हिंदी चित्रपट पाहण्याआधी त्या चित्रपटाबद्दल माझ्या मनी कुतूहल तयार होणे मला तीव्र गरजेचे वाटते. आणि हे कुतूहल प्रामुख्याने माझ्या संदिग्ध अवस्थेत चांगले समीक्षण(च) आणि 'दिग्दर्शकाचे आधीचे काम' अशा गोष्टींनीच निर्माण होते. कोणतेही हीरो, हिरवीण, संगीतकार, डीओपी मजलेखी नगण्य आहेत. या अशा चाळण्यांतून गेलेला हिंदी चित्रपट मग मी चवीने पाहतो आणि सहसा तो मला आवडतो.

विशाल भारद्वाजचे आधीचे काम मला फारसे आवडले नव्हते, तरीही मी हैदर पाहायचे ठरविले होते (काही समीक्षणे!).पण, एकदोन समीक्षणांनी हैदर तीव्र नापसंत केला होता. साहजिकच माझ्या मनात क्लिमिष तयार झाले. मग त्या ’द्विधा’ अवस्थेत मी दोन पॉजिटिव्ह आणि दोन निगेटिव्ह समीक्षणे समोर ठेवली, आणि विशाल भारद्वाजच्या या दिग्दर्शकी धाडसाचे प्रमुख मुद्दे तपासले. चित्रपट स्वत: पाहून तो चांगला-वाईट ठरवावा असल्या भंपक मताचा मी नाही. निगेटिव्ह समीक्षणांत हैदरमधल्या मसाल्याबद्दल नाक मुरडले होते आणि चित्रपट कितपत प्रामाणिक मानावा यावर प्रश्न होते. हैदरमधली तथाकथिक द्विधावस्था बेगडी कशी यावरही खल होता. आणि तो सोदारहण होता. केवळ ”वेगळे (खरे) काश्मीर पाहा" हा मुद्दा मला पटवण्यात यशस्वी ठरलेल्या पॉजिटिव्ह समीक्षणांवर डाव लावावा हे काही पचेना. आणि मी हैदरला क्यूमधून काढून टाकले.

आता मूळ विषयावर - म्हणजे ’आंखो देखी’वर!

’आंखो देखी’वर आर्ट पिच्चरचा शिक्का ऑलरेडीच बसला होता आणि त्या खुद्द त्या चित्रपटास व्यावसायिक यशाची चतकोरसुद्धा हमी नसावी. क्वीन मात्र मल्टीप्लेक्सी प्रेक्षकांनी उचलून घेतला आणि त्याने बऱ्यापैकी कमाई केलीय. मेरी कोम कुठल्याच लेवलवर मला आवडला नाही. मी तो पिटात बसून चकण्यासहित पाहिला आहे, त्यामुळे (अंतिम राष्ट्रगीताला वेवस्थित फाट्यावर मारत) तो यथातथाच गंभीर घेतला गेला आहे.

हिंदी चित्रपट ही भाषिक कॅटेगरी आहे, तरीही ती 'बॉलीवूड'ला पर्याय म्हणून सर्रास वापरली जाते. बॉलीवूडमध्ये मुंबईत दोन पिढ्या जन्म काढलेले उत्तर भारतीय मेट्रो हिंदीग्रुप्स आहेत, ते सहसा हिंदी पट्यात उमलणारी, फुलणारी कथानके सक्षमरीत्या उभी करू शकत नाहीत असे एक निरीक्षण आहे. मात्र सध्या पहिल्या पिढीतले काही लोक ज्यांची बालपणे हिंदी पट्ट्यात गेलेली आहेत, ते लोक हे धाडस आवर्जून करताना दिसतात. विशाल भारद्वाज, गेला बाजार अनुराग कश्यप आणि त्याने मोठी केलेली मंडळी, आणि त्या आधीपासून स्ट्रगलत असलेली विनय पाठक, रजत कपूर आदि मंडळींची नावे लगेच सुचतील. दिल्लीच्या कलाप्रभावात मोठी झालेली, एनेसडी, जामिया इस्लामियात वाढलेली, तिथल्या मातीतली कथानके, संगीत, वापरू इच्छिणारी आणि तशी कलात्मक निष्ठा आणि क्षमता असणारी ही मंडळी.

मला उत्तर भारतीय वातावरण म्हणून कृतक पंजाबी घरकुळ दाखवणाऱ्या सर्व कलावंतांचा तीव्र तिटकारा आहे. उत्तर भारत म्हणजे लाल किल्ला, अमृतसर, भटिंडा आणि वाघा बॉर्डर नव्हे; की राजस्थान म्हणजे अजमेर, जयपूरचे किल्ले नव्हेत. (महाराष्ट्रातला एकही किल्ला (इन्क्लुडिंग देवगिरी) मी आजवर एकाही हिंदी चित्रपटात पाहिला नाही. असोच!) दे दणादण लस्सी पिणारी आणि छोले खाणारी, तंदूरी तंगड्या बडवत एक तंगडी वर करून सहकुटुंब भांगडा करणारी विशालकाय पंजाबी कुटुंबे आणि त्यांची त्रिकाल बारमाही हिरवीगार शेते पाहून लई वैताग आलाय.

दिल्लीचे जनमानसात आकर्षण आहे. गेली काही शतके दक्षिण आशियातले एक प्रमुख सत्ताकेंद्र राहिल्याने या शहराने संपन्नतेचे चढउतार पाहिले आहेत. कलाप्रकार म्हणजे बदलांचे, सांस्कृतिक मोडतोडींचे स्रोत असतात. ते अशा प्रचंड उलाढालींच्या शहराच्या सावलीत पोसले जातात. सामान्यांना अशा अजस्र शहरांचे जितके आकर्षण असते, त्याहून थोडे जास्तच कलाकारांना असते. दिल्ली, त्यातही पुरानी दिल्ली, हा कलावंतांचा लाडका विषय आहे. रंग दे बसंती ते खोसला का घोसला अशा अनेक चित्रपटांतून दिल्लीचे आकर्षक चित्रण झाले आहे. देल्ही ६, देल्ही बेली, या चित्रपटांत पुरानी दिल्ली दिसली आहे. या चित्रपटांच्या रांगेत ’आंखो देखी’ जातोच, पण अभिनिवेशी न होता. पुरानी-दिल्लीदर्शन हा काही त्या चित्रपटाचा युएसपी नव्हे.

दिल्लीचे अस्सल चित्रण ही काय इतकी महत्त्वाची गोष्ट आहे, की त्यासाठी चित्रपट पाहावा? याला एकांगी उत्तर ’नाही’ असे आहे. अस्सलता केवळ वास्तव दृश्ये दाखवण्याने सिद्ध होत नाही. मी वरच्या परिच्छेदात पार शहराच्या सांस्कृतिक चलनवलनापासून ते कलावंताच्या आकर्षणापर्यंत जाऊन आलो. याचे काहीएक कारण आहे. कलाकार, जो आपली कलाकृती एका सच्चेपणाने तयार करत असतो, त्याला वास्तवाचा, कलाकृतीतल्या त्याच्या चित्रणाचा आव आणता येत नाही. कलावंताच्या अनुभवात ज्या गोष्टी कोरलेल्या असतात, त्या तो जितक्या परिणामकारक वापरू शकतो, तितके कलाकृतीला अस्सलत्व येते. कारण त्या अनुभवांचा अर्क, त्यातले अनेक बारीक ताणतणाव त्या कलाकृतीत उतरलेले असतात. त्यात एक हाडामांसांचे, सोपे नसलेले, अडीअडचणींचे, एकमेकांत मिसळलेले, उभ्या-आडव्या धाग्यांचे, आपल्या परिचयाचे असे गुंतागुंतीचे अवघड जग असते. आपल्याप्रमाणेच मनात अढी धरून बसणारी, उलटसुलट निर्णय घेणारी, चित्रविचित्र वागणारी, मातीचे पाय असणारी माणसे असतात. आपल्या भोवतीचाच पसारा त्या कलाकृतीत मांडला गेलेला असतो.

तरीही सवाल उठतोच. मग ही कलाकृती वेगळी कशी. ती फक्त एक आरसा आहे म्हणून आपण तिचा आस्वाद घ्यायचा?
इथे असे विचारता येईल, की केवळ आपल्या शहरासारखेच गल्लीबोळ असलेले शहर मी का पाहायचे? माझ्या आसपास असणारी माणसेच मी पडद्यावर का पाहायची? माझ्या आसपासच्या जगण्यातली गुंतागुंत सरेना आणि पडद्यावरल्या त्या गुंतवळीत मी का गुंतावे?

माझ्या मते, ’आंखो देखी’सारखे चित्रपट न पाहिले जाण्यातले हे बेसिक प्रश्न आहेत. आता पुन्हा वरचाच धागा मी इथे कंटीन्यू करतो. केवळ वास्तव दाखवले म्हणजे कलाकृती ग्रेट नसते. केवळ एक साधे कुटुंब दाखवले म्हणून तो चित्रपट भारी असे नव्हे. रजत कपूरचे अनुभवविश्व एका साध्या कथानकात गुंफून कलाकृतीचा आभास तयार होत नाही, नव्हे तसे कोणीच करू शकत नाही. पण ते केवळ अनुभवविश्व नसते. त्यावर त्याचे एक गंभीर भाष्य असते. त्याच्या अनुभवातले बारकावे कथानकात गुंफताना त्या कथेला तो कल्पक आणि रोचक तर करतोच, पण संबंध कथेद्वारे त्याला दाखवायच्या असलेल्या तत्त्वांचा पाठलाग करत असतो.

मुलीचे प्रेमप्रकऱण उघडकीस आल्यावर अंतर्मुख झालेला एक मिश्कील म्हातारा एक घोषणा करतो, त्याची ही कथा. "मला ह्या डोळ्यांना जे दिसेल तेच मी सत्य म्हणणार. बाकी सब झूट असेल किंवा नसेल, मला फरक पडत नाही. माझ्या प्रत्यक्ष अनुभवाला जे येईल, तेच मी खरे मानणार.” अशी त्याची घोषणा. मग त्याच्या उरल्या आयुष्यात काय गमती घडतात हे पाहण्यात आपण दंग होतो.

दिल्लीकरांच्या हिंदीच्या वळणांसोबत, गल्लीबोळातल्या कोपऱ्यांबरोबर कथेतही मग अनेक वळणे येत जातात. मागच्या थंडीत सुरू झालेली गोष्ट वर्षभरातल्या अनेक गुंत्यांनी सजत जाते. मुलीच्या- कॉलेजयुवतीच्या प्रकरणाने सुरुवात झालेल्या या प्रवासाचा रोख कधी रंजक-विनोदी, तर कधी अंतर्मुख होत जातो. हे प्रकरण काही चवीपुरते-फोडणीपुरते घातलेले नाही. साध्या आयुष्यात जितक्या अडचणी असतात तितक्या सगळ्या इथे आहेत. म्हातारा ह्या विचित्र निर्णयापायी नोकरी सोडतो, मौनव्रताचादेखील प्रयोग करतो. मोठ्या आवाजात सतत किरकिर करत असलेली म्हाताऱ्याची टिपिकल संसारग्रस्त प्रपंचशरण श्रद्धाळू बायको, पोटापुरती नोकरी करत असणारा आणि बायकोसह, नववी-दहावीला असणाऱ्या मुलासह एकत्र कुटुंबातच राहत असलेला म्हाताऱ्याचा लहान भाऊ, ऐतखाऊ असणारा, कामधाम न करता जुगाराच्या नादाला लागलेला म्हाताऱ्याचा मुलगा, आणि म्हाताऱ्याच्या विचित्र निर्णयामुळे त्याच्याकडे आकर्षित झालेली, हळूहळू भक्तपणापर्यंत सरकत जाणारी काही रिकामचोट मंडळी, नातलग, शाळामास्तर अशी म्हाताऱ्याच्या आजूबाजूची जंत्री!

या अनुभवानंतर म्हाताऱ्याला नवी दृष्टीच मिळाल्यागत होते. लहान पोराचे कुतूहल त्याच्या अंगी येते. स्वत:च्या अनुभवावर जग पारखून घेण्यात काय मजा आहे हे त्याला कळू लागते. त्याला मुक्तीचं फार दुर्मीळ सुख मिळते. लहानसहान गोष्टींमध्ये किती मोठा आनंद आपण शोधू शकतो, नव्याने अनुभवण्याच्या असंख्य शक्यता आपल्या आसपास कधीपासूनच्या आहेत आणि आपले तिकडे लक्षही नसावे ही जाणीव त्याला होते.

आपणही ही साधी साधी सत्ये कितीदा नजरअंदाज करतो आणि आपल्याला सांगितल्या गेलेल्या गोष्टी आंधळेपणानं स्वीकारतो हा आपला म्हाताऱ्याबरोबरचा आंतरिक प्रवास.

म्हाताऱ्याच्या अशा निर्णयाच्या अंमलबजावणीत विघ्ने येतातच, त्यातला निव्वळ फोलपणा दाखवणारे प्रसंगही येतात. सत्य अनेकदा किती आभासी असते, आणि सगळीच सत्ये काही भोगता येत नाहीत हे म्हाताऱ्याबरोबर आपल्याही कळू लागते. विरोधाभासांनी भरलेले आयुष्य त्याला जाणवू लागते. त्याचा स्वत:च्या तत्त्वज्ञानांकडे असा प्रवास होताना तोही स्वत: या विरोधाभासांना अपवाद नाही हेही आपल्याला कळते. एकत्र कुंटुंबातल्या (सख्ख्या) भावांत जे ताण उत्पन्न होतात ते म्हातारा आणि त्याचा लहान भाऊ यांच्यातही उत्पन्न होतात. प्रेमावर दुराव्याची छाया धरणाऱ्या निखळ मानवी भावनिक अढ्यांचे चित्र आपण पाहतो. हे तर त्रिकाल चालत आलेले सत्य. तेही भोगावे लागते, आणि ते भोगताना त्याची जाणीवही होत नाही. मानवी प्रेमामध्ये अशा सत्यांशांवर पडदा टाकायची किमया असतेच हेही कळते.

म्हाताऱ्याची संवेदनशीलता आणि त्याचा सत्यशोधनाचा अनुभव नशा लावणारा आहे. त्यात आयुष्यातले साधे आनंद गवसतात, निखळ मानवी सत्ये पचवण्याची ताकद येते; तशी आयुष्य पणाला लावायची झिंगही येते. हा अनुभवांचा प्रवास आयुष्य नावाच्या दोरीवर चालत असतो. ती दोरी शाश्वत, खंबीर नसतेच! (काय दवणीय वाक्य आहे हे!) हे अध्यात्माचे स्तर असतात. आणि हा आत आत खोल जाणारा प्रवास असतो. त्याला आकलनाची कसोटी लागते, नवे काही अनुभवण्याची झिंग लागते. व्यवधाने, बंधने तोडावीशी वाटतात. शरीराचेही, अस्तित्वाचेही जाच होतात. हे एका परीने भारतीय दर्शनाचे सार आहे. प्रपंच वर्सेस झिंग. (’ऐसी’वरती कुठेतरी म्हाताऱ्याची तुलना जंतूंनी तुकारामाशी केलेली आहे). आत्मा गवसण्याची झिंग. मुक्ततेची झिंग. कलाकृतीत, निर्मितीत झोकून देण्याची झिंग. तोडमोडीची, नवे मांडायची झिंग. ही झिंग नॉर्मल, चौकटीतल्या आयुष्याशी पंगा घेते. हा या चित्रपटाचा एक गाभा माझ्यापुरता समजून घेता आला म्हणून मला ’आंखो देखी’ अस्सल वाटला.

दिल्लीच्या अजस्र पसाऱ्यात घडलेले हे जिवंत, सुरस आणि अंतर्मुख नाट्य.

आणि एक महत्त्वाचे : हॉस्टेलमध्ये बेशुमार ऐकवला गेल्याने कैलाश खेर माझ्या डोक्यात गेला आहे. ’आंखो देखी’च्या संगीतकारांचे अभिन्ंदन यासाठी, की त्यांनी कैलाश खेरबद्दलचा माझा हा अनाठायी (आपल्या विरोधी पक्षनेत्यांच्या भाषेत बिनबुडाचा) पूर्वग्रह दूर होण्यास मदत केली. आणि ’आयी बहार’, ’आज लागी लागी’ ही अत्यंत मोहक गाणी मला ऐकायला मिळाली!

आणि दुसरे महत्त्वाचे : दिल्लीच्या ह्या चित्रणाचा हा आढावा. उत्तरेत इतकी समृद्ध सांस्कृतिक विविधता असूनही, हिंदी चित्रपटांचे अगणित चाहते असूनही बॉलीवूडचा हिंदी चित्रपट ठरावीक साच्यांच्या बाहेर गेलेला नाही. त्याच त्याच क्लिशेड गोष्टी दाखवण्यात समाधान मानतो आहे, याचा राग आहे. त्यात शहरांचे चित्रण हा एक भाग. मुंबई म्हटली की दादर व्हीटी स्टेशन दाखवायलाच पाहिजे का? दिल्ली म्हटली की लाल किल्ला आलाच पाहिजे का?. हिंदी चित्रपटांच्या बाबतीत या दशकाने काही प्रमाणात या बेगडी कृतकपणाला भोके पाडायची कामे केलेली आहेत. अशी कामे केलेले खूपसे चित्रपट अजूनही टुरिस्टी पवित्र्यातून बाहेर येत नाही आहेत ही एक तक्रार. पण ’पानसिंग तोमार’, ’वासेपूर’चे भाग, ’आंखो देखी’ यांसारख्या उदाहरणांवरून असे वाटते की येत्या वर्षांत त्या भोकांत सुरुंग भरले जातील. हे एक आशादायी चित्र आहे, देखेंगे आगे आगे क्या होता हय!

आणि तिसरे महत्त्वाचे : लेख वाचून महत्त्वाच्या सूचना केल्याबद्दल, अक्षरां-वाक्यांमधले बारीकसारीक घोळ दूर करून तो अधिक वाचनीय केल्याबद्दल मिस. मार्मिक यांचे खूप खूप आभार!

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (5 votes)

प्रतिक्रिया

जोडाक्षरं नीट दिसत नाहीयेत या फॉण्टमध्ये. निदान माझ्या संगणकावर तरी. आता दिसतंय. पण फॉण्ट सर्वसाधारण झाला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

प्रचंड आवडलं लिहिलेलं. आणि पटलही. मेरी कोम वगळून बाकीचे दोन्ही चित्रपट आवडलेले आहेत.

म्हाताऱ्याची संवेदनशीलता आणि त्याचा सत्यशोधनाचा अनुभव नशा लावणारा आहे. त्यात आयुष्यातले साधे आनंद गवसतात, निखळ मानवी सत्ये पचवण्याची ताकद येते; तशी आयुष्य पणाला लावायची झिंगही येते. हा अनुभवांचा प्रवास आयुष्य नावाच्या दोरीवर चालत असतो. ती दोरी शाश्वत, खंबीर नसतेच! (काय दवणीय वाक्य आहे हे!) हे अध्यात्माचे स्तर असतात. आणि हा आत आत खोल जाणारा प्रवास असतो. त्याला आकलनाची कसोटी लागते, नवे काही अनुभवण्याची झिंग लागते. व्यवधाने, बंधने तोडावीशी वाटतात. शरीराचेही, अस्तित्वाचेही जाच होतात. हे एका परीने भारतीय दर्शनाचे सार आहे. प्रपंच वर्सेस झिंग. (’ऐसी’वरती कुठेतरी म्हाताऱ्याची तुलना जंतूंनी तुकारामाशी केलेली आहे). आत्मा गवसण्याची झिंग. मुक्ततेची झिंग. कलाकृतीत, निर्मितीत झोकून देण्याची झिंग. तोडमोडीची, नवे मांडायची झिंग. ही झिंग नॉर्मल, चौकटीतल्या आयुष्याशी पंगा घेते. हा या चित्रपटाचा एक गाभा माझ्यापुरता समजून घेता आला म्हणून मला ’आंखो देखी’ अस्सल वाटला.

पूर्ण सहमत!!!

रजत कपूर आणि त्याचा कंपू हे लोक फार गाजावाजा न करता भारी सिनेमे बवतात. आंखो देखी, मिक्स डबल, भेजा फ्राय हे सुंदर पिक्चर दिलेत त्याच्या कंपूनी.
कश्यप , विशाल भारद्वाज, रजत कपूर, दिबाकर बॅनर्जी यांचे चित्रपट लय आवडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

>>आंखो देखी, मिक्स डबल, भेजा फ्राय<<
ह्यात मिथ्याचा पण समावेश करावासा वाटतो. (फारसा गाजावाजा न होण्याच्या काळात) तो (शोकांत) चित्रपट खूप वेगळा वाटलेला. रजत कपूरचा ग्रुप भारी आहे. रणवीर शौरी, पाठक, गुल पनाग यांच्या कडून चांगली कामे करून घेतली त्याने. आंखो देखी मधला संजय मिश्रा पाहा. काय युटिलाईज केलाय लाजवाब. (गोलमाल सारख्या चित्रपटांत त्यांना कोपर्‍यातल्या शक्ती-कपूरी बकवास भूमिका करताना पाहताना वाईट वाटते. ते करेनात का, पण त्यांना कुणीतरी दुसरीकडे सार्थक करायला हवं.) एरव्ही चित्रपटसृष्टी उत्तम नटांना पार कुजवतेच.
>>दिबाकर बॅनर्जी<<
हा माणूस कहर आहे. त्याच्या "ब्योमकेश बक्शी"चा ट्रेलर पाहून उत्सुकता लई वाढलीय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याच्या "ब्योमकेश बक्शी"चा ट्रेलर पाहून उत्सुकता लई वाढलीय.

हा ना. २०१५ मध्ये कधी येतोय?

(अवांतरः एकच ट्रेलर/टीझर आलाय ना अजून?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

संजय मिश्राची १ २ ३ सारख्या सुमार चित्रपटातील "पाssssपा" ही हाक आणि बाकी एकूणच काम ह्यामुळे त्या सीन्सची पारायणं झाली आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एरवी पाट्या न टाकणारे किती लोक असणार! 'आंखो देखी' (आणि मिक्स डबल, भेजा फ्राय, मिथ्या) मिळणार असेल तर गोलमाल सारख्या चित्रपटांत त्यांना कोपर्‍यातल्या शक्ती-कपूरी बकवास भूमिका पोटासाठी करायला लागण्याबद्दल तक्रार बंद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मस्त लिहिलंय! खूप भारी वाटलेला हा पिच्चर.
@ऑखो देखी- ह्याच्या शेवटी म्हातारा मुक्त होतो, स्वतःला कड्यावरून ढकलून देतो. ते खरंखुरं आहे का प्रतिकात्मक? फारसं महत्त्व नाही त्याला, पण म्हातारा सत्याच्या शोधापायी एवढा खुळावलाय की त्याला हेही करुन बघूयाच, असंही वाटलं असेल का?.
बाकी चित्रपट सुंदरच आहे- आणि संजय मिश्रा टू मच काम करतो... Smile (म्हणूनच म्हातारा जेव्हा त्याच्या हाफिसातल्या प्यून(?)ला "तू किती सुंदर दिसतोस" असं म्हणतो, तेव्हा ते विनोदी न वाटता खरंखुरं वाटतं)
"संसार माया है, जीवन मिथ्या है" वगैरे मानून सगळं तोडून टाकण्यापेक्षा हे असं संसारात राहून पण मोकळंढाकळं जगून पहाणं जास्त अस्सल आहे असं वाटलं चित्रपट पाहिल्यावर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय ते प्रतीकात्मक आहेच. एरव्ही पॉपकॉर्नच्या फ्लेवरची काळजी जास्त असणार्‍याला हा शेवट प्रचंड खटकू शकतो. कारण सुरुवातीपासूनचा चित्रपटाचा टोन हा अतिगंभीर केलेला नाहीय. त्यामुळे तो जास्त खटकेल. किंबहुना तो याहून अधिक संयतसा वेगळा दाखवता आला असता तरी चित्रपटाचा एकुण परिणाम अजिबात कमी झाला नसता.
इथे रजत कपूर टोक दाखवून प्रेक्षकांची गय करत नाही हेच पटले. एकतर सुरुवातीच्या त्या निवेदनाचे कलात्मक वर्तूळ शेवटच्या प्रसंगात ठाशीवपणे पूर्ण होतेच, पण इथे हा तात्विक परिणामातही उणा पडत नाही.तुम्ही म्हणताय तो अर्थ चपखल आहेच, आणि तो गंभीरही आहे.
चित्रपटाचे एडिटींग होत असता त्यात अप्रत्यक्ष सहभागी असणार्‍या माझ्या एका मित्राने त्याचे अपार कौतुक केले होते. का तर ते चित्रण अस्सल होते. त्यावर त्याने हे ही सांगितले की "ह्यातले अनेक प्रसंग दिग्दर्शकाला "परके" नाहीत."
हे मात्र माझ्या डोक्यात फिट बसले. त्यामुळे त्या चित्रपटाचा टोन/शेवट अतिशय प्रामाणिक, विनातडजोड होतो असेही मला वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आँखों देखी बघितलेला नाही अजून पण त्याविषयीचे वर्णन आवडले.

बाय द वे - मुंबई दाखवताना दादर स्टे दाखवलेले मी फारसे पाहिले नाही. व्हीटी दाखवतात सहसा. आणि हे जागतिक आहे. इंग्रजी चित्रपटही बहुतांश हेच करतात. मात्र त्यातील अनेक चित्रपट त्या त्या शहराचे वातावरण जास्त डीटेल्स मधे दाखवतात - तसे हिन्दी पिक्चर्स मधे कमी असावे. माझ्या आठवणीत सत्या, सरफरोश (मुंबई), युवा/कहानी (कलकत्ता), बंटी और बबली (उत्तर प्रदेश), बॅण्ड बाजा बारात (दिल्ली) असे काही आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देव-डी विसरू नका हो!
काहिच्या काही भारी वाटलेलं देव-डी मधल्या सग़ळ्याच जागा बघून. (विशेषतः ती दिल्लीमधली देवची हॉटेल रूम)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मान्य.
एक बारीक पुस्ती.
पण त्याच गोष्टी वापरून वापरून नकोश्या होतात. मला तंतोतंत आठवत नाही, पण "every frame a painting" ह्या ब्लॉगवर की कुठेसे एक उदाहरण पाहिलेले आठवले. हीरोने/की कुणीतरी शहर बदललंय हे ट्रांसिशन अत्यंत तोकड्या वेळेत दाखवताना एका फ्रेममध्ये भाडोत्री टॅक्सीवरचा "टॅक्सी" असा लिहिलेला पार्ट दाखवलेला आणि दुसर्‍या फ्रेम मध्ये "कॅब" असा लिहिलेला.(किंवा वाईस वर्सा) लंडन शहरामध्ये स्थलांतरासाठी इतकी कल्पकता इतक्या कमी वेळेत दाखवता येते असे ते उदाहरण. तर अजून मोठे कॅन्व्हास लाभलेल्यांनी त्याचा यथोचित वापर करावा हीच इच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसे आम्ही समीक्षानिरक्षर, विशेषतः पिच्चरसमीक्षा तर नाहीच नाही.

पण हा लेख चक्क समजला, आवडला व पटलाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुम्ही यवनी भाषा लवकरच शिकून मुघले आजम, गेला बाजार डेढ इश्कियाची खुमासदार समीक्षा कराल हे स्वप्न या टिकानी या माद्यमातून बोलुन दाकवतो. (किमान भागानगरीय चित्रपटांचा रसाविष्कार आपल्या कडून तिथल्याच, रसाळ पानाळ भाषेत व्हावा ही णम्र इनंती)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुग़ले आज़म वा डेढ़ इश्क़िया म्हणजे जरा जास्तच आहे, परंतु भागानगरीय चित्रपटांबदल कधीकाळी काही अवश्य बोलू शकेन. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

समिक्षेसारखे काहीतरी आवडले.
आँखों देखी, मिक्स्ड डबल्स नक्की बघणार. पण भेजा फ्राय मात्र अजीबात आवडला नव्हता.
मिथ्या प्रचंड आवडलेला. आणि फस गये रे ओबामापण ठीक होता.

विशाल भारद्वाजचे नक्की कोणते चित्रपट आवडले नाहीत? मलातर सात खून सोडून बाकी सर्वच फार आवडले. मटरू पाहिला नाही अजून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आंखो देखी हा निर्विवाद मागच्या वर्षी चा सर्वोत्तम चित्रपट होता . म्हाताऱ्याच्या रोल साठी रजत कपूर च्या डोळ्यासमोर नेहमीच संजय मिश्रा हाच होता . पण काही कारणांनी संजय शी रजत चा काहीच संपर्क होऊ शकला नाही . म्हणून नाइलाजाने रजत ने नसीर ला घेऊन चित्रपट सुरु केला . आणि अचानक संजय मिश्रा अचानक रजत कपुर च्या संपर्कात आला . रजत ने पण पटकथा संजय मिश्रालाच डोळ्यासमोर ठेवून लिहिली होती . मात्र नसीर ला तू चित्रपट सोड असे कसे सांगायचे ? मग शेवटी रजत नेच मांजराच्या गळ्यात घंटा बांधली . नसीर ला त्याने संजय हाच या भुमिके साठी कसा योग्य आहे हे समजावून सांगितले . नसीर ने पण फारशी खळखळ न करता चित्रपट सोडला . आणि संजय मिश्रा बाबूजी च्या रोल मध्ये आला . नसीर सारख्या अभिनेत्याला संजय मिश्रा सारख्या गुणी पण छोट्या रोल मध्ये गुणवत्ता वाया जाणाऱ्या अभिनेत्याने replace करणे हा मोठा जुगार होता आणि संजय मिश्रा ने सिद्ध केल कि that gamble was worth .

रजत कपूर ने हि स्क्रिप्ट घेऊन अनेक studio चे आणि निर्मात्यांचे दरवाजे ठोठावले पण सगळीकडून त्याला नकार घंटा ऐकायला मिळाली . शेवटी frustrate होऊन रजत कपूर ने twitter वर आपली भडास बाहेर काढली . व्यावसायिक असणारया आणि चित्रपट क्षेत्राशी कुठलाही संपर्क नसणारया मनीष मुंद्रा ने twitter वरच्या या पोस्ट वाचून रजत कपूर ला हा चित्रपट मी produce करतो अशी ऑफर दिली आणि हा चित्रपट पडद्यावर आला . आंखो देखी ला मिळालेल्या यशानंतर मनीष मुंद्रा आता अजून चित्रपट produce करत आहे .

बाय द वे आंतरजालावर या चित्रपटाची पटकथा उपलब्ध आहे . Screenplay , आंखो देखी असा गुगल सर्च मारला तरी मिळेल . नक्की वाचा . मस्त अनुभव आहे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

कुठल्याही गोष्टींची होते, तशी समीक्षेचीही एक ठरीव शैली (किंवा काही जणांच्या बाबतीत न-शैली) होऊन बसलेली आहे. (निव्वळ त्या शैलीमुळे आमच्यासारख्या टारगट आणि उनाड लोकांना जंतूंसारख्या महामहोपाध्यायांच्या धोतराला हात घालता येण्याची सोय होते, ते एक सोडा. (म्हणजे धोतर नव्हे. आमची सोय.)) भल्याभल्यांना तिची लक्ष्मणरेषा ओलांडून बाहेर येणे अवघड होऊन बसते. अशात झडकरांनी (आं, बदलले वाटते नाव? असो.) हे असे समीक्षे'सारखे' काहीतरी भारदस्त आणि तरीही दिलचस्प लिहिले, की मजा येते, आपल्या ठरीव वाचनवर्तुळांची (आणि दर्शनवर्तुळांचीही) कुंपणे दिसायला लागतात आणि हातपाय पसरता बनचुकेपणा झटकून पुन्हा ताजेतवाने झाल्यासारखे वाटते.

तर अजून लिहीत जावा, समीक्षे'सारखे' काहीतरी..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ते एक सोडा. (म्हणजे धोतर नव्हे. आमची सोय.))

ROFL मेले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लिहिलंय. फ्रेश शैली! अजून लिहा. वाचायला आवडेल.
चित्रपटांबद्दल अधिक लिहित नाही.

मात्र चित्रपट बघण्याआधी इतकी पूर्वतयारी बघुन गंमत वाटली. आम्ही तर "जे शब्द दिसतील ते वाचावेत नी स्क्रिनवर जे जे हलेल ते पहावे" या पंथातील आहोत. त्यामुळे मला चित्रपट पैसे देऊनही नावडलेला चालतो. पैसे न देता तर अक्षरशः काहीही बघु शकतो.

किंबहुना (इथल्या वर्ल्डफेमस) "चिखल-कमळ" न्यायाने असा चित्रपटांचा चिखल तुडवू लागलो की (आणि असा चिखल अस्तित्त्वात असल्यानेच) एखादे क्वीनसारखे कमळ समीक्षकी संस्कारांशिवाय हाती लागते.

मी सहसा समीक्षा व कथासुत्र न वाचता चित्रपटांना जातो. पूर्ण पाटी कोरी ठेऊन. नुकतीच लाट येऊन गेल्यावर लेवलला आलेल्या वाळूवरची अक्षरे अधिक रेखीव वाटतात. नी पुढल्या लाटेने पुसणे काही अवघडही जात नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उत्पलचा आजच्या दिव्य मराठीत आलेला लेख -

आँखों देखी : सत्याचं थेट प्रक्षेपण

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आँखो देखी चा दिग्दर्शक रजत कपूर ह्याची मुलाखत प्रेक्षकांनी घेतलीये त्याचे विडियो-
http://moifightclub.wordpress.com/2014/04/16/ankhon-dekhi-qa-with-rajat-...

[शेवटाबद्दल थोडा खुलासा केलाय त्याने. आवडला मला त्याचा पर्स्पेक्टिव.]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पिफला सिटीप्राईड कोथरूडला शुक्रवारी ९ जानेवारीला सकाळी ११:१५ वाजता हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहता येईल. (फक्त पिफचा डेलिगेट पास असणार्‍यांनाच प्रवेश असेल एकाच शो चे तिकीट काढता येत नाही)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!