Skip to main content

वाचेल तो वाचेल!

पुढे दिलेली काही उदाहरणं पाहा:

● कुठलाही गुन्हेगार जन्मत: वाईट नसतो. परिस्थितीमुळे तो तसा बनतो.

● मराठी नाटकाचा प्रेक्षक बहुतकरून उच्च मध्यमवर्गातला आहे.

● सरकारी नोकर म्हटला म्हणजे कुठल्याही जातीतून वर आलेला असला तरी एकदा पदावर आला की मग त्याने प्रत्येकच नागरिकाचं हित बघायला पाहिजे. 'हा ब्राह्मण, हा मराठा, हा आपला माणूस' असा भेदभाव त्याने करणं बरोबर नाही.

ही सगळी वाक्यं 'सेक्सिस्ट' मराठीत आहेत, म्हणजे त्यांच्यात उल्लेखिली गेलेली यच्चयावत माणसं पुल्लिंगी आहेत. तर माझा चर्चाप्रस्ताव असा की असं मराठी तुम्हाला खटकतं का? यामध्ये आपल्या मनातल्या कायमस्वरूपी प्रतिमांचा संबंध येतो. 'गुन्हेगार' हा शब्द पाहिला की बहुतेकांच्या डोळ्यांसमोर पुरुष येतो, आणि याचं एक कारण म्हणजे स्त्री गुन्हेगारांचं एकूणांतलं प्रमाण खरोखरीच कमी असतं. पण याउलट नाटक बघायला स्त्रिया खूपच येतात, आणि नाटक पाहणारी 'सरासरी' व्यक्ती पुरुष असते असं मुळीच नाही. तेव्हा यातली काही वाक्यं काहींना काही प्रमाणात खटकतात आणि बाकीची नाहीत असं अर्थातच शक्य आहे.

मी राहतो तिथे (म्हणजे कॅनडामध्ये) सर्वसाधारण सामाजिक वातावरण असं आहे, की sexist English हे अप्रतिष्ठित मानलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ, 'Every doctor in Canada tries to provide the best care for his patients' हे वाक्य लोकांना इतकं पटकन चुकीचं वाटतं की वर्तमानपत्रांत, पुस्तकांत वगैरे अशा प्रकारची भाषा आता खूपच मागे पडली आहे. (त्यामानाने sexist French काहीसं जास्त प्रचलित आहे, पण फ्रेंच व्याकरणात न शिरता ह्या मुद्द्याची चर्चा करणं शक्य नसल्यामुळे तो सोडून देतो.)

इथे 'सेक्सिस्ट' (लिंग-पक्षपाती?) असं विशेषण लावण्यामागे तसं मराठी गैर आहे असं मी मुळीच गृहीत धरलेलं नाही. 'सेक्सिस्ट असलं तर असलं, आम्ही समजून घेतो आणि आम्हाला ते खटकत नाही' अशा प्रकारची भूमिका ही काही आपोआपच चुकीची ठरत नाही. तर महाराष्ट्रात सध्या काय परिस्थिती आहे, अशा तऱ्हेचे भाषिक प्रयोग केले जाऊ नयेत असं तुम्हाला वाटतं का, वाटत असल्यास तुम्ही काय पर्याय सुचवाल इत्यादि विषयांवर चर्चा झाल्यास बिघडणार नाही.

राजेश घासकडवी Fri, 07/11/2014 - 07:27

वाचाल तर वाचाल या स्वरूपाचा, संघर्षाला बगल देण्याचा मार्ग उपलब्ध आहे. प्रेक्षकवर्ग म्हणूनदेखील तो की ती याचा उल्लेख टाळता येतो. असे आडमार्ग वाढताना दिसत आहेत.
हे पाहून लिंगनिरपेक्ष भाषेकडे झुकता कल दिसून येतो. अजून अर्थातच बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. पण त्यासाठी काही चळवळ व्हावी अशी ईच्छा नाही.

धनंजय Fri, 07/11/2014 - 09:21

In reply to by राजेश घासकडवी

माझ्या लेखनातही मी साधारणपणे अशी बगल देतो. शिवाय अधूनमधून अविवक्षित व्यक्तीकरिता "व्यक्ती" हा स्त्रीलिंगी शब्द वापरतो.

पुंल्लिंग हे मराठीतले अविवक्षित लिंग आहे खरे. (मात्र क्वचित - उदाहरणार्थ प्रश्नार्थक "कोण" - नपुंसकलिंगही ऐकू येते. "वाचणारं असं कोण वाचलं?")

मराठीत क्रियापदाला लिंगविकरण असल्यामुळे पुष्कळदा साधे वाक्य लिंगनिरपेक्ष रचणे अशक्य असते.

नितिन थत्ते Fri, 07/11/2014 - 09:25

यावरून एक प्रश्न पडला....

काही ठिकाणी वरच्या उदाहरणातील tries to provide the best care for his patients च्या ऐवजी his/her असा उल्लेख असतो. तिथे यापुढे काय लिहिले जावे?

धर्मराजमुटके Fri, 07/11/2014 - 10:03

In reply to by नितिन थत्ते

हे वाक्य 'Every doctor in Canada tries to provide the best care for his patients' च्या ऐवजी
'Every doctor in Canada tries to provide the best care for patients' असे लिहावे. ज्यांना वरील (पहिले) वाक्य खटकते ते 'तो / ती / ते ' यापैकी कोणताही पर्याय वापरायला मोकळे आहेत.

लेखकाने दिलेल्या उदाहरणात नक्की काय खटकते ते कळाले नाही ? म्हणजे ती पुल्लींगी वाक्यरचना आहे म्हणून स्त्रियांना खटकते, की एकूणातच समजाला लिंगभावरहित भाषा हवी आहे ?

अवांतर : एकंदरीत एकूणच पाश्चात्यांना सगळ्या गोष्टी लिंगभेदरहित करायची आस लागून राहिलीय की काय ? युनिसेक्स कपडे, युनिसेक्स सलोन्स इ. इ.

बॉक्सर आणि ब्रीफ अंडरवियर लवकरच संग्रहायलात बघाव्या लागणार बहुधा. :)

अरविंद कोल्हटकर Fri, 07/11/2014 - 10:14

सर्वनामे - विशेषतः तृतीयपुरुषी - मुळातूनच लिंगदर्शी आहेत आणि त्यातून सर्वसाधारणतः पुरुषप्रधान संस्कृतीचे आता कालबाह्य वाटणारे दृश्य दिसते ही जाणीव इंग्रजीमध्ये बर्‍यापैकी आली आहे असे वाटते. ह्यातून वाट काढण्याचे दोन प्रकारचे मार्ग माझ्या नजरेस आलेले आहेत. 'The Doctor attends to his patients' च्या जागी 'The Doctor attends to their patient' अशा प्रकारची रचना, कारण डॉक्टर पुरुष अथवा स्त्री कोणीहि असू शकते, हा एक मार्ग. दुसरा मार्ग म्हणजे जेथे लिंग वरकरणीच स्पष्ट नसते आणि जेथे ते परंपरेने पुल्लिंग मानले गेले असते, त्याऐवजी ते आता स्त्रीलिंग मानणे. उदाहरण म्हणजे flu-shots तयार करणारी कंपनी आपल्या प्रसिद्धि-साधनांमध्ये The Doctor administers flu-shots to his patients असे सहजगत्या म्हणून गेली असती येथे आता हेच वाक्य नव्या लिंगनिरपेक्ष वाक्यरचनेत The Doctor administers flu-shots to her patients असे म्हणून लिंगसमानता दर्शवते.

ह्याच्या पलीकडे जाऊन he-she अशी लिंगसापेक्ष सर्वनामे भाषेतून पूर्णतः काढून टाकून त्यांच्या जागी लिंगनिरपेक्ष अशी नवी सर्वनामे निर्माण करून वापरामध्ये आणणे असेहि करण्याचे प्रयत्न अतिमर्यादित प्रमाणामध्ये सुरू झाले आहेत. ही सर्वनामे पुरुष आणि स्त्री दोघांच्याहि संदर्भामध्ये वापरता येतील आणि लिंगनिरपेक्षता निर्माण होईल. हे करू इच्छिणार्‍यांनी अशी अनेक सर्वनामे सुचविली आहेत. ती अशी:

१. Ne/nem/nir/nirs/nemself
२. Ve/ver/vis/vis/verself
३. ey/em/eir/eirs/eirself
४. Ze/Hir and its derivatives
(ze/hir/hir/hirs/hirself)(zie/hir/hir/hirs/hirself)
(ze/zir/zir/zirs/zirself)(zie/zir/zir/zirs/zirself)
५. Xe/xem/xyr/xyrs/xemself

इंग्रजी भाषेतील हा प्रश्न त्या मानाने कमी जटिल आहे. मराठी, तसेच हिंदी, संस्कृत, गुजराथी इत्यादी भाषांमधील लिंगसापेक्षता इंग्रजीप्रमाणे नुसत्या तृतीयपुरुषाइतपतच मर्यादित नाही. ती प्रथम आणि द्वितीय पुरुषामध्येहि आहे. उदा: मी गेलो (पु), मी गेले (स्त्री), तू गेलास (पु), तू गेलीस (स्त्री). ह्याचा अर्थ असा की मराठीमध्ये शंभर टक्के लिंगनिरपेक्षता आणायची असेल तर प्रथम आणि द्वितीय पुरुषी क्रियापदांचीहि काही नवी सोय निर्माण करावी लागेल.

असे करणे कितपत शक्य आणि योग्य आहे ह्याबाबत मी साशंक आहे. भाषेचे रसायन शेकडो वर्षे चालत आलेल्या भट्टीमधून निर्माण झालेले असते. त्यातील कोठेले घटक कोणी आणि केव्हा त्या रसायनामध्ये आणून ओतले हे सांगणे शक्य नसते. अशा नैसर्गिकरीत्या निर्माण झालेल्या ह्या गोष्टीवर उद्यापासून एक कृत्रिम कलम करायचे कोणी योजले तर ते कलम कितपत जीव धरेल? टक्कल पडणे ज्याच्या जीन्समध्ये लिहिलेले आहे अशा माणसाने कितीहि तेले चोपडली तरी त्याच्या डोक्यावर केस येतात का?

(प्रमाण/शुद्धलेखन म्हणजे नक्की काय ह्यावरील धुमश्चक्री ह्या लिंगनिरपेक्षतेने एका नव्या आयामाने लढली जाईल इतके निश्चित! So, sit back, relax and watch!)

(अवान्तर -'वाचेल तो वाचेल' ह्या शीर्षकाचा धागाविषयाशी काय संबंध आहे ते लक्षात आले नाही.)

राजेश घासकडवी Fri, 07/11/2014 - 10:28

In reply to by अरविंद कोल्हटकर

(अवान्तर -'वाचेल तो वाचेल' ह्या शीर्षकाचा धागाविषयाशी काय संबंध आहे ते लक्षात आले नाही.)

या वाक्यातही वाचणारा 'तो' गृहित धरलेला आहे. हे वाक्य नैसर्गिकच वाटावं, आणि त्यातून लिंगवैशिष्ट्याचा वासही येत नाही इतकं 'तो' हे क्रियापद कर्त्यासाठी सर्रास झालं आहे. हे लेखकाला अधोरेखित करायचं आहे.

'न'वी बाजू Fri, 07/11/2014 - 17:32

In reply to by राजेश घासकडवी

आणि त्यातून लिंगवैशिष्ट्याचा वासही येत नाही इतकं 'तो' हे क्रियापद कर्त्यासाठी सर्रास झालं आहे. हे लेखकाला अधोरेखित करायचं आहे.

प्रस्तुत शीर्षकातून प्रस्तुत लेखकास काहीही अधोरेखित करायचे असो. मात्र, 'लिंगवैशिष्ट्याचा वास' हा वाक्प्रचार लिहिताना प्रस्तुत प्रतिसादकाच्या मनात (आणि बहुधा तो वाचताना त्याच्या बहुतांश वाचकांच्याही मनात) कोणतीही 'ईक्स'-भावना पैदा होत नाही, इतका हा वाक्प्रचार प्रस्तुत प्रतिसादकासाठी (आणि कदाचित त्याच्या बहुतांश वाचकांसाठीसुद्धा) सर्रास झाला असावा, हे प्रस्तुत प्रतिसादातून अधोरेखित व्हावे काय?

(अतिअवांतर:

इतकं 'तो' हे क्रियापद कर्त्यासाठी सर्रास झालं आहे.

'तो' हे क्रियापद नाही. बाकी चालू द्या.)

--------------------------------------------------------------------------------------------

'प्रतिसाद' हा मराठीत पुल्लिंगी आहे, म्हणून 'तो'चे प्रयोजन.

प्रस्तुत प्रतिसादक हा पुल्लिंगी असावा, अशी निदान आमची तरी समजूत२अ आहे, या कारणास्तव 'तो'चे प्रयोजन.

२अ बोले तो, प्रस्तुत प्रतिसादकाच्या लिंगवैशिष्ट्याचे निदान आम्ही केलेले नाही (तशी गरजही आम्हांस भासलेली नाही); केवळ गृहीत धरलेले आहे. (पण मग प्रश्न असा उद्भवतो, की (उदाहरणादाखल) राजेश घासकडवी (किंवा जयदीप चिपलकट्टी. किंवा बॅटमॅन. किंवा 'न'वी बाजू.) हे पुल्लिंगी आहेत, या केवळ गृहीतकाच्या आधारे जर ते कर्ता असलेल्या वाक्यांत आम्ही त्यांना पुल्लिंगी प्रत्यय लावू शकतो, तर मग कोठल्यातरी र्‍याण्डम सार्वनामिक कर्त्याच्या बाबतीत तो कर्ता पुल्लिंगी आहे असे नुसते गृहीत धरले, तर नेमके काय बिघडते?)

बॅटमॅन Fri, 07/11/2014 - 17:50

In reply to by 'न'वी बाजू

(पण मग प्रश्न असा उद्भवतो, की (उदाहरणादाखल) राजेश घासकडवी (किंवा जयदीप चिपलकट्टी. किंवा बॅटमॅन. किंवा 'न'वी बाजू.) हे पुल्लिंगी आहेत, या केवळ गृहीतकाच्या आधारे जर ते कर्ता असलेल्या वाक्यांत आम्ही त्यांना पुल्लिंगी प्रत्यय लावू शकतो, तर मग कोठल्यातरी र्‍याण्डम सार्वनामिक कर्त्याच्या बाबतीत तो कर्ता पुल्लिंगी आहे असे नुसते गृहीत धरले, तर नेमके काय बिघडते?)

बाय डिफॉल्ट क्यारेक्टर पुल्लिंगी असले तर तो स्त्रियांवर अन्याय आहे असं लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे अलीकडे डिफॉल्ट कर्ता स्त्रीलिंगी करायचा पयत्न इंग्रजी लिखाणात दिसतो. पण गुन्हेगारी क्षेत्राच्या लिखाणात मात्र हे बदलणं कधी दिसलं नाही, सबब हा सर्व सोयीस्कर बनाव आहे.

अशा गमतीजमती करून क्रांती केल्याचे समाधान मिळावे ही बाकी प्रामाणिक अँड/ऑर भाबडी इच्छा असेल तर मग आपला पास.

'न'वी बाजू Fri, 07/11/2014 - 18:47

In reply to by बॅटमॅन

बाय डिफॉल्ट क्यारेक्टर पुल्लिंगी असले तर तो स्त्रियांवर अन्याय आहे असं लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे अलीकडे डिफॉल्ट कर्ता स्त्रीलिंगी करायचा पयत्न इंग्रजी लिखाणात दिसतो.

हा स्त्रियांवर अन्याय आहे असे कोणास वाटत असल्यास, आणि/किंवा या (किंवा कोणत्याही) कारणास्तव (किंवा कारणाविना) त्याने/तिने स्वतःच्या लिखाणात/बोलण्यात (खरे तर लिखाणातच, आणि त्यातही फॉर्मल लिखाणात; बोलण्यात असे बदल किती जण करत असतील याबाबत साशंक आहे.) स्वतःपुरता बदल केल्यास त्याबद्दल आमचे काहीही म्हणणे नाही. आणि, असे अनेकांना वाटून त्यातून काही नवा प्रघात प्रचलित झाला, तर त्याबद्दलही आम्हांस काही प्रत्यवाय असण्याचे काही कारण निदान आम्हांस तरी दिसत नाही. (अनेकदा, असा प्रयत्न आम्हीही जमेल तसा आणि जाणूनबुजून आमच्यापुरता करतो, हेही जाताजाता नमूद करतो.)

मात्र, सर्वांनीच असे करावे किंवा तसा नियम असावा असा अट्टाहास करण्याचेही काही कारण आम्हांस (आमच्यापुरते) दृग्गोचर होत नाही, इतकेच.

पण गुन्हेगारी क्षेत्राच्या लिखाणात मात्र हे बदलणं कधी दिसलं नाही, सबब हा सर्व सोयीस्कर बनाव आहे.

दिसले नाही खरे. (भारतात अशी तरतूद आहे की नाही, माहीत नाही (बहुधा असावी), परंतु अमेरिकेपुरते तरी या बाबतीत पाचव्या घटनादुरुस्तीच्या अ‍ॅण्टाय-सेल्फ-इन्क्रिमिनेशन तरतुदीचा फायदा प्रतिपक्षास द्यावयास मी तयार आहे.)

उलटपक्षी, विरोधी पक्षास 'गुन्हेगारी क्षेत्रातील उल्लेख लिंगनिरपेक्ष (उदाहरणादाखल, नपुंसकलिंगी) व्हावेत' असा ष्ट्याण्ड घेऊन स्वतःच्या भाषेत तसा बदल करण्याची मुभा आहेच; तिचा फायदा विरोधी पक्षांनी घेतल्याचेही कधी दिसले नाही. विरोधी पक्षाने असा पुढाकार घेण्यासही आमचा काही प्रत्यवाय असण्याचे काही प्रयोजन आम्हांस आढळत नाही; नेहमी प्रतिपक्षावर कसले ते अवलंबून राहायचे?

(बाकी, 'सोयिस्कर बनाव' वगैरे मुद्दे तूर्तास सोयिस्कररीत्या सोडून देऊ. तो असेलही/नसेलही; असल्यास, त्यास भाव देण्याचे फारसे कारण आम्हांस दिसत नाही, इतकेच.)

अशा गमतीजमती करून क्रांती केल्याचे समाधान मिळावे ही बाकी प्रामाणिक इच्छा असेल तर मग आपला पास.

क्रांती नाही; परंतु, त्यातून उत्क्रांतीची शक्यता अगदीच नाकारता येत नाही, आणि उत्क्रांतीस आमचा आक्षेप असण्याचे काहीच कारण आम्हांस दिसत नाही. ('अग्निरथगमनागमननिदर्शनपट्टिका' म्हणण्यास विरोध नाही; मात्र, सर्वांनीच तसे म्हणावे, आणि 'सिग्नल' म्हणू नये, या अट्टाहासास विरोध आहे.)

मेघना भुस्कुटे Fri, 07/11/2014 - 10:38

एरवी स्त्रीवादावर सहजी फुरफुरणारी माझी जीभ या बाबतीत थोडी गोंधळलेली आहे.

अशा प्रकारच्या लिंगभेदविरहित भाषेचा आग्रह धरून ती लोकांच्या तोंडी रुळवण्यासाठी लागणारे कष्ट आणि त्यातून मिळणारा परतावा, हा फायदेशीर सौदा आहे का, हे मला ठरवता येत नाही. कुणीसं म्हटल्याप्रमाणे भाषा ही खर्‍या अर्थानं लोकशाही पद्धतीनुसार चालणारी व्यवस्था आहे. आपल्या धारणा, परंपरा, प्राधान्यक्रम, सोय आणि समकालीन प्रभाव या सगळ्यांसकट लोकच भाषेचं भवितव्य ठरवत असतात. असं असताना आपण या तुलनेनं निरुपद्रवी (वादग्रस्त आहे, मान्य.) अभिव्यक्तीकडे नक्की किती लक्ष पुरवायचं? आणि समजा, त्यानुसार अभिव्यक्ती बदललीच, तरी तिच्या अन्वयार्थाचा व्यत्यासही तितकाच खरा नसेल कशावरून? (उदाहरण आवश्यक आहे इथे. लेखक आणि लेखिका अशा लिंगभाव दर्शवणार्‍या संज्ञा वापरणं समतेचं, लेखक ही परंपरेनं पुल्लिंगी असलेली संज्ञा दोघांसाठी वापरणं हे लिंगभावाला त्याची जागा दाखवणारं, की लेखकू (किंवा तत्सम काहीतरी) संज्ञा निर्माण करून ती रुळवण्याचा घाट घालणं समतेचं आणि व्यवहार्य? युक्तिवाद कोणत्याही बाजूनं तितक्याच समर्थपणे करणं शक्य आहे.) मला ठाम उत्तर माहीत नाही.

मी स्वतः या बाबतीत मराठीतली पारंपरिक व्यवस्था स्वीकारते. लोकांचा निवडीचा अधिकारही मान्य करते.

चिंतातुर जंतू Fri, 07/11/2014 - 11:24

मराठी व्याकरणात असलेल्या लिंगपद्धतीअंतर्गत प्रत्येक नामाला लिंग असतं हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्यायला हवा. उदा : वर म्हटल्याप्रमाणे 'गुन्हेगार' किंवा 'प्रेक्षक' पुल्लिंगी शब्द असले, तरी 'व्यक्ती' स्त्रीलिंगी आहे. असाच मुद्दा 'न्यायमूर्ती'सारख्या शब्दाच्या बाबतीत येतो : बहुतांश न्यायाधीश पुरुष असले, तरीही न्यायमूर्ती हा शब्द स्त्रीलिंगी आहे. आपण जो शब्द वापरतो त्याच्या लिंगानुसार प्रमाण मराठीत वाक्य लिहिणं मला सेक्सिस्ट वाटत नाही. मात्र, 'वेश्या', 'मोलकरीण' 'परिचारिका' असे शब्द स्त्रीलिंगी, पण साधू, महात्मा, चोर, कवी असे शब्द पुल्लिंगी असणं ह्यात एक सेक्सिझम अंतर्भूत आहे असं मानून प्रमाण मराठीतच सहज वापरता येतील असे बदल अधिकृतरीत्या केले, तर माझा त्याला विरोध नसेल. इथे ह्याविषयी अधिक माहिती मिळेल.

घाटावरचे भट Fri, 07/11/2014 - 11:44

असलं काहीतरी करून प्रचलित भाषेची मोडतोड करण्याची गरज काय? सामान्य पब्लिक असा विचार करतं का? मूठभर लोकांच्या (जे असा विचार करतात) भावना कदाचित दुखावल्या जाऊ शकतात ('गोगो खुश हुवा होयेंगा' च्या धर्तीवर), म्हणून सगळ्यांनी आपल्या बोली भाषेत बदल करायचा का? भाषा ही भावना/विचार पोहोचवण्यासाठी आहे. तेवढं पोहोचलं की झालं. आणि अशी वाक्य (Every doctor in Canada tries to provide the best care for his patients) ही सामान्य विधानं असल्याने कोणी पर्सनली वगैरे घ्यायची शक्यता कमी वाटते. मग मराठी भाषेत अशी वाक्यं लिंगनिरपेक्ष नसल्याने काय फरक पडतो?

अतिशहाणा Fri, 07/11/2014 - 19:31

In reply to by घाटावरचे भट

कैच्या कै प्रकार आहे याच्याशी सहमत. मराठीचा नैसर्गिक गोडवा घालवून तिला शक्य तितके वर्तमानपत्री बदलण्याची ही कुटील योजना आहे असे या ठिकाणी या माध्यमातून आम्ही सांगत आहोत!

बॅटमॅन Fri, 07/11/2014 - 11:53

सध्याच्या भाषेला अल्टरनेटिव्ह सुचवणं हे अपरिहार्यपणे विशिष्ट अजेंड्याशी निगडीत आहे. त्याने काही फायदा होईल असं वाटत नाही - अपार्ट फ्रॉम सॅटिस्फाईंग सम पीपल्स अजेंडा.

बाकी अलीकडे इंग्लिशमध्येही ही ऐवजी शी असे डिफॉल्ट सर्वनाम दिसते आहे.

आदूबाळ Fri, 07/11/2014 - 12:05

In reply to by बॅटमॅन

इंग्लिशमध्येही ही ऐवजी शी असे डिफॉल्ट सर्वनाम दिसते आहे.

हो. अनेक इकोनॉमिस्ट त्यांच्या लेखनात आवर्जून स्त्रीलींगी विशेषण योजतात

बॅटमॅन Fri, 07/11/2014 - 12:07

In reply to by आदूबाळ

पण गुन्हेगारी क्षेत्रातल्या लिखाणात मात्र हे नवीन सर्वनाम कधी दिसत नाही/दिसले तरी नाही. हा मुद्दाम स्टेरिओटाईप बनवायचा प्रकार का समजू नये?

अंतराआनंद Fri, 07/11/2014 - 16:23

अश्या प्रकारची लिंग निरपेक्ष भाषा ही मराठी भाषेत व्याकरणनियमांमुळे जमणे कठीण. बरेचदा ई-लर्निंग कन्टेन्ट लिहीताना किंवा त्याचा अनुवाद करताना ही समस्या जाणवते. कारण विद्यार्थ्यांसाठीचे ई-लर्निंग कन्टेन्ट लिंगनिरपेक्ष असावे अशी अपेक्षा असते. मग ईंग्लिश मध्ये लिहीताना कर्मणी प्रयोग वापरता येतो; पण त्या प्रयोगातील वाक्य मराठीत बोजड वाटतं. कधीकधी एकवचनाऐवजी बहुवचन वापरुन ही समस्या तात्पुरती निकालात काढता येते. उदा. वरील वाक्ये (१) कुठ्लेही गुन्हेगार जन्मजात..... (२) मराठी नाटकांचे प्रेक्षक... (३) सरकारी नोकर कुठल्याही जातीतून वर आलेले असले........ वगैरे.

पण याचा काय उपयोग? अर्थात अश्या प्रकारचे भाषिक प्रयोग करावेत का हे ज्याच्या त्याच्यावर/ जिच्या तिच्यावर अवलंबून आहे. नविन पिढी ते स्वीकारत असेल तर ( चुकीचे असोत वा बरोबर) ते रुळतील. जसं की किंवा माझी मदत (मला मदत ऐवजी) इत्यादी शब्दप्रयोग चुकीचे असले तरी सर्रास वापरले जातात काही वर्षांनी ते रुळतील.

बाकी मराठीला युनिसेक्स साज चढवण्यापेक्षा सरकारी बोरुबहाद्दरांनी तिचे विरामचिन्हांचे अलंकार उतरवले आहेत ते तिला बहाल करावेत असं वाटतं.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 07/11/2014 - 19:37

बंडखोरी आणि विक्षिप्तपणा करण्यासाठी या क्षेत्रात भरपूर वाव असल्यामुळे मराठी भाषेत सर्वसामान्य वाचक पुल्लिंगीच असतो याचा मला आनंद होतो.

'वाचाल तर वाचाल' अशा घोषणा लहानपणापासून गावांकडे भिंतींवर रंगवलेल्या बघितलेल्या आहेत; त्या सुद्धा सरकारी खात्याने रंगवलेल्या. म्हणून शीर्षक पुरेसं पटलं नाही तरी मुद्दा मान्य आहे. पण तो अपूर्ण वाटतो. इंग्लिशमध्ये ज्याला जेंडर म्हणतात ते लिंग का (पक्षी - स्त्रीलिंग हा शब्द हास्यास्पद वाटत नाही का?), किंवा प्रथम, द्वितीय, तृतीय 'पुरुष'च का, (उदा : ती हा शब्द तृतीय पुरुषी!) असेही प्रश्न विचारता येऊ शकतात. प्रतिसादात असं लिहिण्यासाठी जागा सोडण्याबद्दल आणि खरंतर, हा विषय काढण्याबद्दल आभार.

Nile Fri, 07/11/2014 - 22:43

इंजिनीअरींगला असताना कोणतेतरी एक अमेरीकन पुस्तक विकत घेतले होते. इंजिनीअरींचे असले तरी रेफरंस बुक असल्याने बर्‍यापैकी 'डिस्क्रीप्टीव्ह' पुस्तक होतं. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लेखकाने सबंध पुस्तकात कोणते लिंग वापरले आहे याबद्दल पान-दीड पान खर्च केलं होतं (दुर्दैवाने पुस्तक/लेखकाचे* नाव आठवत नाही). त्या विषयावर प्रथमच वाचत असल्याने मला फार नवल वाटले होते. तेव्हा पासून मी शक्यतो लिहताना काळजी घेतो.

आता सहसा लिहताना मी कोणाला उद्देशुन आहे, वाचक कोण आहे यावरून 'कर्ता' निवडतो. लिहताना आपण काय लिहतो आहोत याचा विचार करत असल्याने तसा सापेक्ष 'कर्ता' निवडणे मला जास्त योग्य वाटते. यात कुठेहीए भाषेची मोडतोड होते आहे असे वाटत नाही. पण त्याच बरोबर इतर कंटेक्सशिवाय पुल्लिंगी वापर 'सेक्सिस्ट' आहे असे मी ठरवायला जात नाही.

* "तो" लेखकच होता, हे मात्र खात्रीने आठवते.

ऋषिकेश Mon, 10/11/2014 - 16:16

काही वेळा खटकतं, काही वेळा नाही.
अधिक सामान्यतः परिचित उदाहरणे देतो.
-- पुलंच्या लेखनात तर अनेकदा हे खूप म्हणजे खूपच खटकतं. उदा. मुंबईकर पुणेकर वगैरेत तुम्हाला मुंबईकर होण्यासाठी "घरजावई" व्हावे लागेल हे शालेय वयात ऐकल्यावरच खटकले होते. (खरंतर अनेकानेक उदा देता येतील)
-- साधारणतः अपत्याचा उल्लेख पुलिंगी झाल्यास खटकते. "अपत्य" हा लिंगनिरपेक्ष शब्द उपलब्ध असल्याने जोवर एखाद्या विशिष्ट लिंगाच्या अपत्याविषयी बोलत नसु तर तोच वापरण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करतो. त्याच बरोबर केवळ आई वा वडिलांविषयी बोलत नसू तर पालक हा शब्द वापरतो. (अवांतरः मला तर "काय, आईने तिला/त्याला साध्या पोळ्याही शिकवल्या नाहीत" किंवा "वडिलांनी त्याला/तिला अजिबातच धाकात ठेवलेला नाही" वगैरेतील आई-वडीलांचे स्पेसिफिक उल्लेखही खटकतात. पण ज्यांना खटकत नाहीत त्यांनी तसे वापरण्याबद्दल मी सुचवत नाही)
-- बहुतांश धार्मिक किंवा तत्वचिंतनात्मक लेखनात सगळा विचार पुलिंगी सर्वनामातच नाही तर पुरूषांच्या दृष्टीकोनातून झाला आहे हे ही अनेकदा जाणवते.
-- काही शब्दच लिंगवाचक आहेत व त्याला लिंगनिरपेक्ष पर्याय उपलब्ध नाही हे खटकले तरी फार बाऊ न करता (निरूपायाने) वापरतो. उदा. "राष्ट्रपती", चालक, मराठीत 'नर्स' म्हणणे इत्यादी.

बाकी: नवीबा वर म्हणतात तसे. हे मला खटकते म्हणून सर्वत्र तसे नियम बदलले जावेत असे मात्र वाटत नाही. आणि मला हे बदल करायला कोणी अडवू नये असेही वाटत नाही.

अवांतर: यावरून आठवले सामाजिक चर्चामध्ये "स्त्रीयांना (किंवा कोणालाही) स्वातंत्र्य 'द्यावे'" मधील 'द्यावे' हा वाक्प्रयोगही मला अस्वस्थ करतो.

आदूबाळ Mon, 10/11/2014 - 16:21

एक बारीकसा प्रश्नः

माझ्या पहाण्यात "वाचाल तर वाचाल" असं आलेलं आहे. "वाचेल तो वाचेल" हे मुद्दाम या लेखाला समर्पक शीर्षक हवं म्हणून म्यानुफ्याक्चर केलंय का?

अजो१२३ Mon, 10/11/2014 - 19:07

कुठलाही गुन्हेगार जन्मत: वाईट नसतो. मराठी नाटकाचा प्रेक्षक बहुतकरून उच्च मध्यमवर्गातला आहे. सरकारी नोकर म्हटला म्हणजे कुठल्याही जातीतून वर आलेला ...

ही सगळी वाक्यं 'सेक्सिस्ट' मराठीत आहेत, म्हणजे त्यांच्यात उल्लेखिली गेलेली यच्चयावत माणसं पुल्लिंगी आहेत. तर माझा चर्चाप्रस्ताव असा की असं मराठी तुम्हाला खटकतं का?

९०% गुन्हेगार पुरुष आहेत.**
मराठी नाटके पाहणारा ऑडियन्स मला माहित नाही, पण सिनेमे पाहणारे मॅक्स लोक पुरुषच असतात. मी जी काही २०-२५ मराठी नाटके पाहिली त्यात श्रोते लार्जली सगळे पुरुषच होते.
५०% पेक्षा सरकारी नोकर पुरुष आहेत.

सबब हे तुम्हाला खटकतं का असं विचारणं किमान भारतीय संदर्भात तरी मला कोणत्यातरी न्यूनगंडातून आलं आहे असं वाटतं.
-------------------------------
पण भाषेमधे लिंगशुद्धी करावी का हा प्रश्न मला व्हॅलिड वाटतो. (तो किती व्यवहार्य आहे हे असो.)
१. ज्या गोष्टींना जैविक* लिंग नाही, अशा कितीतरी गोष्टींना, संकल्पनांना सार्‍याच भाषांत कोणते ना कोणते लिंग आहे. नपुसकलिंग हे सुद्धा एक जैविक लिंग आहे. खरे तर अलिंगी शब्द अलिंगी म्हणून वेगळ्याने ओळखले जावेत.
२. जिथे स्त्री, पुरुष, नपुसकलिंगी आणि अलिंगी संकल्पनांचे वेगवेगळ्या प्रमाणात मिश्रण आहे तिथे सर्वनामे नि क्रियापदे कशी असावीत हा सुद्धा एक truely-desiring-not-be-sexist-भाषेसाठी चॅलेंज आहे. (भाषा स्त्रीलिंगवाचक करून ती सेक्सिस्ट होत नाही असे म्हणणे हास्यास्पद आहे. मग हा समज जगात कोठेही असो.)
३. मूळात कोणत्याही संकल्पनेचा परिचय करून देताना लिंग ही तिची प्राथमिक, आद्य, आवश्यक, ठळक ओळख करून द्यायची भाषांतील प्रथा निकालात काढता येईल का यावरही संशोधन होऊ शकते.
--------------------------------
भाषेच्या दौर्बल्यांना समाजमनाचा आरसा म्हणून पाहणे नेहमीच योग्य नसावे.
--------------------------------

* उदा. खुर्ची खाली 'पडली' असे आपण म्हणतो पण खुर्चीत स्त्रीत्ववाचक एकही जैविक लक्षण नसते.
** अधिक अचूक आकड्यासांठी रेकॉर्ड्स आहेत. तो मुद्दा नाही.

नितिन थत्ते Mon, 10/11/2014 - 20:16

In reply to by अजो१२३

पुनरागमनाचे स्वागत.

प्रतिसाद आवडला.

जेथे लिंगाचा संबंध नाही अशा वस्तूंनासुद्धा लिंग चिकटते आणि ते सेक्सिस्ट नसते हा मुद्दा महत्त्वाचा आहे.

बॅटमॅन Tue, 11/11/2014 - 12:52

In reply to by अजो१२३

(भाषा स्त्रीलिंगवाचक करून ती सेक्सिस्ट होत नाही असे म्हणणे हास्यास्पद आहे. मग हा समज जगात कोठेही असो.)

काही ठिकाणी तरी दिसतो हा रोचक समज सध्या. तुफान विनोदी प्रकरण आहे हेवेसांनल.

जयदीप चिपलकट्टी Tue, 11/11/2014 - 00:35

मी दोन्ही वापर पाहिलेले आहेत. पण धाग्याचं शीर्षक आवडलं नसेल तर 'कसेल त्याची जमीन' असं ते बदलून घ्या.

सुनील Tue, 11/11/2014 - 15:07

मागे एकदा, इंग्रजीतील लाँगमन इत्यादी आडनावे बदलून त्याऐवजी लाँगपर्सन इत्यादी आडनावे ठेवण्याचा बूट निघाला होता, त्याचे काय झाले? ;)

अजो१२३ Tue, 11/11/2014 - 15:27

दया, क्षमा, शांती, करुणा, वात्सल्य, प्रेम, माया हे शब्द काम, क्रोध, मद, मोह, मत्सर असे उलटे केले जाणे देखिल विचारात घेता येईल.

बॅटमॅन Tue, 11/11/2014 - 15:29

In reply to by अजो१२३

सर्व चांगल्या भावना स्त्रीलिंगी अन षड्विकार तेवढे पुल्लिंगी हा सेक्सिस्टपणा अगोदरपासूनच आहे तर! इकडे लक्ष वेधल्याबद्दल बहुत धन्यवाद.

अजो१२३ Tue, 11/11/2014 - 15:55

In reply to by बॅटमॅन

शांत गदाधारी भीम, शांत
--------------------------------
शांतीला शांतता केले कि स्त्री, शांतपणा केले कि पुरुष.
क्रोधाला क्रुद्धता केले कि स्त्री.
---------------
भाषारंभाच्या काळात जेंडर चळवळी नसाव्यात. म्हणून सगळीकडे रँडमपणा आहे.

बॅटमॅन Tue, 11/11/2014 - 16:00

In reply to by अजो१२३

म्हणून सगळीकडे रँडमपणा आहे.

हे समजलं तर काड्या कशा टाकता येणार, नाही का? उगा भाषेत यंव नाही अन त्यंव नाही म्हणून भाषा बदलून क्रांती करू पाहणार्‍यांना हे समजेल तो सुदिन.

ऋषिकेश Tue, 11/11/2014 - 15:45

In reply to by अजो१२३

वात्सल्य नी प्रेम याचा मक्ता स्त्री वा पुरूष यांपैकी कोणाही एकाकडे न ठेवल्याबद्दल उगाचच गंमत वाटली :)

बाकी विविध भावभावनातून मिळणारा आनंदही "तो" आहे नी "खेद" ही :)

अजो१२३ Tue, 11/11/2014 - 15:58

In reply to by ऋषिकेश

वात्सल्य नी प्रेम याचा मक्ता स्त्री वा पुरूष यांपैकी कोणाही एकाकडे न ठेवल्याबद्दल उगाचच गंमत वाटली

तरीच मी सांगत असतो कि जुना काळ फार महान होता म्हणून. नपुसकलिंग सर्व चांगल्या, वाईट, न्यूट्रल संकल्पनांना काहीही भेद न करता दिलेले आहे.

बॅटमॅन Tue, 11/11/2014 - 16:56

In reply to by अजो१२३

बायदवे नपुंसक या शब्दातच एक पुरुषप्रधानता आहे. नस्त्रीक असा शब्दप्रयोग रूढ केला पाहिजे.

(हा शब्दप्रयोग पहिल्यांदा नासदीयसूक्तभाष्यात वापरलेला पाहिला आहे.)

नितिन थत्ते Tue, 11/11/2014 - 16:04

In reply to by अजो१२३

हे डबा-डबी उदाहरण प्रत्यक्ष स्त्रीमुक्ती कार्यकर्त्यांच्या तोंडून ऐकले आहे म्हणून कोट केले.

अनुप ढेरे Tue, 11/11/2014 - 16:19

In reply to by नितिन थत्ते

आवरा. मला हे सगळं थट्टेचा भाग वाटत होता. खरच असल्या आर्ग्युमेंट करत असतील लोक तर अवघड आहे.

अजो१२३ Tue, 11/11/2014 - 17:13

In reply to by अनुप ढेरे

हस्तीदंती मनोर्‍यातून कोणताही माल खाली आणताना त्याला खालची हवा लागतेच. म्हणून खालच्यांना खाली नि वरच्यांना वर निपटून घ्यावे.

बॅटमॅन Tue, 11/11/2014 - 16:09

In reply to by अजो१२३

पण पृथ्वीसमोर सूर्य मोठा आहे, म्हणजे परत पुरुषप्राधान्य आलेच की.

पण असे म्हणता म्हणता लक्षात आले की आकाशगंगा/दीर्घिका हा तर स्त्रीलिंगी शब्द आहे. सबब, विश्वातील सर्वांत मोठे युनिटच जर स्त्रीलिंगी असेल तर भाषा पुरुषप्रधान असूच शकत नाही. क्यू.ई.डी.

अजो१२३ Tue, 11/11/2014 - 16:55

In reply to by बॅटमॅन

सध्याला सर्वात मोठ्या संकल्पना मल्टीवर्स, युनिवर्स, विश्व, ब्रह्मांड, जग, जगत, नक्षत्र, इ इ आहेत. हे सगळे नपुसकलिंगी असल्याने सध्याला एलजीबीटी चळवळ सगळ्यात जोमात चालू आहे हे लगेच ध्यानात येते. त्यानंतर बॅट्या म्हणतो तसे दिर्घीका किंवा गॅलेक्सी सर्वात मोठी आहे. त्यावरून दुसरी मोठी चळवळ फेमिनिस्ट आहे हे कळते**. त्यानंतर सूर्य, ग्रह, उपग्रह, इ इ. हे पुरुष !!! पण कालांतराने हे ही तारे मरतात, ग्रहोपग्रह त्याच्यावर सती जातात नि त्यांचे एक नपुसकलिंगी कृष्णविवर बनते*. पुरुषांची कोणती नाव घेण्याजोगी चळवळ नसल्यामुळे शेवटी त्यांचे पुरुषत्व देखिल हिरावून घेतले जाते म्हणायचे!!

ब्रह्मांडात सगळीकडे स्त्रीलिंग (उर्जा) आणि नपुसकलिंग (अवकाश, द्रव्य) माजलेले असताना पुरुषांना एकच कंफर्ट होता. या सगळ्यांना पुरून उरणारा काळ!!! पण अलिकडे म्हणे उर्जा नि द्रव्य काळाचे बारसे जेवायचे थोडक्यात राहिलेत*. त्याला ते आरामात मागे पुढे खेचू शकतात नि चक्क रुद्ध करू शकतात. काहीं लोकांनी तर म्हणे काळ मूळी असतोच का* असा प्रश्न उभा केला आणि तो सोलेस देखिल गेला.

मॅक्रो-स्केलवर पुरुषांचे असे धिंधवडे निघालेले आहेत आणि जयदीपजी "सेक्सिस्ट भाषा खटकण्याबद्दल" विचारताहेत !!! वाह री दुनिया !!! ;) ;)
--------------------------
* इंटर्-शास्त्रज्ञ वाद इथे नकोत.
** साक्ष - हा लेख.

ऋषिकेश Tue, 11/11/2014 - 16:58

In reply to by अजो१२३

=))
आज अजो प्लेझेंटली फॉर्मात आहेत!


पण कालांतराने हे ही तारे मरतात, ग्रहोपग्रह त्याच्यावर सती जातात नि त्यांचे एक नपुसकलिंगी कृष्णविवर बनते

सगळ्यांचेच असे होत नाही काहिंचा श्वेतबटू (व्हाईट ड्वार्फ) सुद्धा होतो म्हणतात!

बॅटमॅन Tue, 11/11/2014 - 17:00

In reply to by ऋषिकेश

सगळ्यांचेच असे होत नाही काहिंचा श्वेतबटू (व्हाईट ड्वार्फ) सुद्धा होतो म्हणतात!

सती न जाणार्‍या 'पांढर्‍या कपाळाच्या' विधवेशी 'श्वेतबटू' ही संकल्पना चपखल सामंतर्य राखून आहे.