भित्तिचित्रे - दिएगो रिवेरा - भाग १

दोन वर्षांपूर्वी मी माझ्या मेक्सिको भेटीनंतर हा लेख येथे लिहिला त्याचवेळी तेथे पाहिलेल्या दिएगो रिवेरा (१८८६-१९५७) ह्यांच्या भित्तिचित्रांवरहि कहीतरी लिहावे असे ठरविले होते. तो प्रकल्प आता पुरा होत आहे. दिएगो रिवेरा हे एख ख्यातनाम भित्तिचित्रकार (Muralist) होते. त्यांची अनेक भित्तिचित्रे अमेरिका आणि मेक्सिको ह्या देशांमध्ये पसरली आहेत.

मेक्सिको सिटी येथील प्रमुख चौक ’सोकालो’ (Zócalo) (अधिकृत नाव ’घटना चौक’ Plaza de la Constitución) ह्या जागी स्पेनने जिंकून अ‍ॅझटेक संस्कृति नष्ट करण्यापूर्वीचे अ‍ॅझटेकांचे मुख्य मंदिर (Templo Mayor) उभे होते. शहराचे तत्कालीन नाव स्थानिकांच्या नाउआत्ल् Nāhuatl भाषेमध्ये 'तेनोश्तित्लान' (Tenochtitlan) असे होते. शेजारीच अ‍ॅझटेक राजांचे निवासस्थान होते. १५२० नंतर स्पेनचा अंमल सुरू झाल्यावर म्ंदिर पाडून त्याच जागी ख्रिश्चन कथीड्रल बांधण्यात आले. ते आता मेक्सिकोचे प्रमुख कथीड्रल आहे. विजेत्यांचा नेता एर्नान कोर्तेज् (Hernán Cortés) ह्याने राजवाडयाच्या भग्नावशेषांवर स्वत:साठी निवासगृह बांधले. कालान्तराने त्याही जागेवर अन्य प्रासाद उभारले गेले. पहिली तीनशे वर्षे मेक्सिको देश स्पेनची एक वसाहत होता आणि स्पॅनिश राजप्रतिनिधि (Viceroy) तेथे रहात असे. १८२१ मध्ये मेक्सिको स्वतन्त्र देश झाल्यावर तेच अध्यक्षांचे निवासस्थान बनले. सध्या ह्या प्रासादामध्ये अनेक शासकीय कार्यालये आहेत. येथे मधल्या चौकातून वरच्या मजल्यांकडे जाण्यासाठी एक प्रशस्त दुहेरी जिना आहे. ह्या जिन्याच्या सर्व बाजूंच्या भिंतींवर दिएगो रिवेरा ह्यांनी काढलेली आणि मेक्सिकोचा स्पेन-पूर्व काळापासून आजच्या काळापर्यंतचा इतिहास सांगणारी अशी अनेक भित्तिचित्रे आहेत. ह्या विख्यात भित्तिचित्रांपैकी काहींचा परिचय करून देणे हा हेतु ह्या लेखमालिकेमागे आहे.

तेनोश्तित्लान शहर आणि मुख्य मंदिर
तेनोश्तित्लान शहराचा अजून एक देखावा

एर्नान कोर्तेज् आणि त्याच्या सैनिकांनी ह्या शहराकडे पहिली नजर टाकली तेव्हाच्या दृश्याने ते अचंबित होऊन गेले. युरोपात त्यांनी पाहिलेल्या कोठल्याहि शहराहून मोठे, अधिक वस्तीचे आणि अधिक शिस्तीत बांधलेले हे शहर, त्यातील मंदिरे आणि घरे, गजबजलेल्या आणि विकायच्या वस्तूंनी दुथडी वाहणार्‍या बाजारांनी त्यांना आपण स्वप्नातच हे पहात आहोत असे क्षणभर वाटले. कोर्तेजचा सहकारी Bernal Díaz del Castillo लिहितो:
"When we saw so many cities and villages built in the water and other great towns on dry land we were amazed and said that it was like the enchantments (...) on account of the great towers and cues and buildings rising from the water, and all built of masonry. And some of our soldiers even asked whether the things that we saw were not a dream? (...) I do not know how to describe it, seeing things as we did that had never been heard of or seen before, not even dreamed about." (The Conquest of New Spain.)
तेक्सकोको नावाच्या विस्तृत पण उथळ अशा पाणथळीच्या जागी मातीदगडांचे भराव घालून निर्माण केलेल्या जमिनीवर हे शहर उभे होते. येथील सर्वात प्रमुख मंदिर पहिल्या चित्रामध्ये दिसत आहे. पायर्‍यापायर्‍यांच्या पिरॅमिडवर उभ्या अशा ह्या मंदिरामध्ये अ‍ॅझटेकांचा प्रमुख पूजाविधि - सूर्यदेवतेला मानवी रक्ताचा नैवेद्य पोचविणे - हा चालत असे. ह्यासाठी अ‍ॅझटेकांचे सैनिक आसपासच्या अन्य वस्त्यांवर हल्ले चढवून तेथून कैदी पकडून आणत असत आणि वर्षामधून कित्येक वेळा अशा कैद्यांना देवळाबाहेर बळी देत असत. बळी देण्यासाठी प्रमुख पुरोहित कैद्याचे पोट ऑब्सिडिअन सुरीने उघडून आत हात घालून कैद्याचे हृदय खेचून बाहेर काढी आणि ते अजून हलत असलेले हृदय सूर्यदेवतेला दाखवून अर्पण म्हणून जळत्या विस्तवात टाकी.

केत्झल्कोअ‍ॅत्ल Quetzalcóatl

’केत्झल्कोअ‍ॅत्ल’ (पिसारा असलेला सर्प) हा तोल्तेक, माया, अ‍ॅझटेक अशा सर्व संस्कृतींमध्ये भेटणारा देव येथे दिसत आहे. आपल्या उजव्या हातामध्ये त्याने प्रश्नचिह्नासारखे दिसणारे जे धरले आहे ते त्याचे शस्त्र आहे आणि त्यावर कृत्तिका नक्षत्रातील (Pleiades) सात तारका दिसत आहेत. तो वर्णाने गोरा आहे आणि त्याचे शिरोभूषण केत्झल पक्षाच्या हिरव्या पिसांमधून बनविलेले आहे. त्याच्यामागे सूर्याचा पिरॅमिड आणि डाव्या बाजूस चन्द्राचा पिरॅमिड दिसत आहे. दोन्हीवरून बळी दिलेल्या नरबलींच्या रक्ताचे पाट वाहत आहेत. ( हे दोन्ही पिरॅमिड तेओतिहुआकनमध्ये उभे आहेत.) मधोमध अस्ताला चाललेला सूर्य दिसत आहे कारण त्याचे डोके खालच्या बाजूकडे आहे. त्याच्या पुढ्यात काही पुजारी बसलेले असून त्यांच्यातील एक देवाला मागुए झुडपापासून - निवडुंगाची एक जात - बनविलेले ’पुल्के’ नावाचे मादक पेय अर्पण करीत आहे. सूर्य आणि चन्द्र पिरॅमिडमागे स्फोट होणार्‍या ज्वालामुखीच्या स्वरूपात अग्निदेवता दिसत आहे. (मेक्सिकोपासून सुमारे ७० किमी अंतरावरच पोपोकातेपेत्ल आणि इझ्ताचिउआत्ल - Popocatépetl and Iztaccíhuatl - नावाचे १७,००० फुटांहून अधिक उंच असे ज्वालामुखी आहेत. पैकी पहिला जागृत असून मधूनमधून त्याचे लहान मोठे स्फोट चालूच असतात. मी तेथे असतांनाहि त्याच्या मस्तकातून धुराचे लोट बाहेर पडत होतेच. त्याचा खरा मोठा स्फोट जेव्हा होईल तेव्हा मेक्सिको शहराचे काय होईल ही चिन्ता सर्वांना जाळत असते.) अग्निदेवतेमागे उडणारा सर्प म्हणजे शुक्रतारा आणि उजव्या बाजूचा उडणारा सर्प म्हणजे पुन: केत्झल्कोअ‍ॅत्ल. दोन्ही पिरॅमिडच्या मधोमध चार दिशा दर्शविणारे चारजण आहेत. त्यांच्या डावीकडॆ वजने पाठीवर घेऊन पिरॅमिड चढणारे चौघेजण आणि त्यांच्या डावीकडे पिरॅमिडवर उभा असलेला जाग्वारच्या मुखाचे शिरोभूषण असलेला योद्धा. त्याच्या डावीकडे हातामध्ये लाकडाची गदा (mace) धरलेला एक योद्धा. त्याच्या पायाशी एक युद्धात घेतलेला कैदी आहे. त्याच्या अंगावरील हाडांची चित्रे असलेल्या वस्त्रावरून कळते की कैद्याचा लवकरच बळी चढविण्यात येणार आहे. डाव्या बाजूस सर्वात तळाशी निळ्या रंगातील योद्धा अन्य जमातींशी लढत असून बळी देण्यासाठी कैदी पकडणे हा त्याचा प्रमुख हेतु आहे. चित्राच्या खालच्या मध्यात आणि उजवीकडे मूर्तिकार, चित्रकार, दागिने बनविणारे, विणकरी, शेतकरी अशा कामात गुंतलेले लोक दिसत आहेत.

तेनोश्तित्लान - १५व्या शतकाची अखेर

ह्या चित्रामध्ये कोर्तेज येण्यावेळच्या शहराचे दैनंदिन जीवन दाखविले आहे. चित्रामध्ये सर्वात मागे दूरवर पर्वतशिखरांची रांग दिसत असून दोन्ही ज्वालामुखींची बर्फाने वेढलेली शिखरे दिसत आहेत. त्या रांगेच्या पुढे दोन मंदिरे दिसत आहेत. पैकी डाव्या बाजूच्या मंदिरात दोन देवतांची स्थाने आहेत. निळ्या रंगाच्या उभ्या रेषा असलेले पर्जन्यदेवतेचे मंदिर आणि जांभळ्या रंगातील सूर्यदेवतेचे. सूर्यदेवतेच्या मंदिरावर चारी बाजूस प्रत्येकी पाचापाचाच्या चार ओळी आहेत. बळी दिलेल्यांच्या कवटया अशा मांडून ठेवल्या आहेत. दोन्हीपुढे बळी दिलेल्यांच्या रक्ताचे पाट वाहात आहेत. मूळचे मंदिर ह्याच सोकालो चौकामध्ये होते असे वर म्हटलेच आहे. त्या मंदिराचे जेवढे अवशेष जमिनीखाली उरले त्यांचे उत्खनन करून आता पाहण्यास मिळतात. ह्या दोन्ही मंदिरांच्या जागा तेथे आजहि दिसतात.

चित्राच्या उजव्या अंगाला जे देऊळ आहे त्याच्या शेजारची मोकळी जागा म्हणजे ’चेंडूचा खेळ खेळण्याची जागा’. धार्मिक विधीचा भाग म्हणून रबराच चेंडू वापरून एक प्रकारचा बास्केटबॉलसारखा खेळ दोन गटामध्ये खेळला जाई. हरणार्‍या बाजूच्या कप्तानाचा नंतर बळी दिला जाई. ह्याचे आपणास आश्चर्य वाटेल पण असे दिसते की असा बळी दिला जाणे हे एक मोठे पुण्यकृत्य मानले जाई आणि पुष्कळ जण आपले वाहते रक्त अर्पण करण्यापासून बळी जाण्यापर्यंत कृत्ये मोठया स्वेच्छेने करीत. सूर्यदेवता ही रोज आपले स्वत:चे रक्त वाहून जगाला जगविते आणि तिला वारंवार नवे रक्त अर्पण केल्याने ती देवता आपले हे नित्यकर्म करीत राहील अशी समजूत ह्या रक्त अर्पण करण्यामागे होती.

उरलेल्या चित्रामध्ये बाजारातले आर्थिक व्यवहार दिसत आहेत. येथे कसलीच नाणी वा चलन वापरात नव्हते. सर्व व्यवहार वस्तूंच्या देवाणघेवाणीने आणि सोन्याच्या वा अन्य मौल्यवान दगडांच्या माध्यमामधून होत असे. चित्रामध्ये एक प्रकारच्या मखरात बसलेला शहराचा निर्माता देव ’तेनोश’ असून चारजणांनी उचलून धरलेल्या पालखीतून तो जात आहे. जवळ त्याचे करवसुली अधिकारी दिसतात. एक व्यापारी एका तांबडे वस्त्र पांघरलेल्या अधिकार्‍याला सोन्यामध्ये आणि खुणांनी काही कर देत आहे. अनेक जमातींचे लोक बाजारात येत असल्याने काहीजण भाषा बोलू शकत नाहीत. ते बोटाच्या खुणांनी एकमेकांशी बोलत आहेत. बाजारात वेताच्या चटया, फळे, मक्याची कणसे. पिठाच्या चपात्या, मीठ, दूधभोपळ्यासारखॆ लांबट भोपळे अशा अनेक गोष्टींचा व्यापार चालू आहे. अगदी डाव्या खालच्या कोपर्‍यात एक लहान मुलगी आपल्या धाकटया भावंडाला पाठीवर बांधून मागे एक खेळण्यातला प्राणी ओढत चालली आहे. शेजारीच बापलेक पाठीवरून जड वजने घेऊन चालले आहेत. अ‍ॅझटेकांना कोणताच पाळीव ओझ्याचा प्राणी माहीत नव्हता त्याने मनुष्यबळ हेच सर्व कामांना वापरले जात असे. डोक्याभोवती दोरीने सर्व वजन घेऊन उचलण्याची प्रथा सर्वत्र दिसते. उजव्या कोपर्‍यात खाली एक वैदू एका मुलाच्या तोंडाची तपासणी करीत आहे. शेजारी त्याचे बायको औषधी जडीबुटी विकत आहे.

तेनोश्तित्लान - १५व्या शतकाची अखेर, एक तपशील

माझ्याजवळील छायाचित्रांमध्ये वरील फोटोचा खालच्या उजव्या कोपर्‍यातील भाग दुसर्‍या फोटोमध्ये गेला आहे. तो येथे दाखवीत आहे. ह्यामध्ये असेच अन्य बाजारव्यवसाय दिसत आहेत. अगदी पुढे मासे, मांस आणि अन्य प्राणी विकले जात आहेत. मागे शिकार करून आणलेले प्राणी दिसतात.

चित्रामधील आकर्षक स्त्री म्हणजे ’होचिकेत्झाल’ (Xochiquetzal) नावाची गणिका आहे. तिच्या आसपास तिचे चाहते तिची खुषमस्करी करीत आहेत. एकजण तिला मानवी हाडातून बनविलेल्या बासरीचे प्रलोभन दाखवीत आहे तर एक लढवय्या त्याने नुकत्याच जिंकून मारलेल्या शत्रूचा उजवा कापलेला हात दिला भेट करण्याची इच्छा धरून आहे. असा हात देणे हे मोठे मानाचे मानले जाई. गणिकेने हातामध्ये धरलेले फूल हे तद्देशीय असून प्रेम आणि आनंदी जीवनाच्या देवतेचे प्रतीक आहे. तिचे पाय गोंदविलेले आहेत.

ह्या गणिकेचा चेहरा प्रसिद्ध मेक्सिकन चित्रकार फ्रिडा काहलो (Frida Kahlo) हिचा आहे. रिवेरोची ही विद्यार्थिनी आणि त्याची तिसरी आणि चौथी पत्नी. (रिवेरोच्या एकूण पाच बायका आणि अनेक मैत्रिणी झाल्या. फ्रिडाचा आणि त्याचा एकदा घटस्फोट आणि पुन: विवाह झाला.) जाड भुवयांमुळे तिचा चेहरा लगेच ओळखून येतो कारण तिच्या भुवया खरोखरच ध्यानात येण्याइतक्या जाड होत्या. नंतरच्या चित्रांमधून फ्रिडा पुन: भेटेल आणि अन्यहि काहीजण ओळखीचे भेटतील.

(ह्यापुढील भागामध्ये अ‍ॅझटेकपूर्व काळातील चार संस्कृति पाहू.)

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

नेहमीप्रमाणेच छान लेख !
एक शंका : दिएगो नावाचा काही विशिष्ट अर्थ आहे काय ? कारण हा शब्द बरेच वेळा वाचण्यात येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्पॅनिश दिएगो, शेक्स्पिअरचा (लॅटिन/इटालियन) आयागो/इयागो आणि इंग्रजी जेम्स वा जेकब : हे सर्व याकूब/याकोव या बिब्लिकल नावाचे वेगवेगळ्या मार्गांनी झालेले अपभ्रंश आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगली ओळख!
कासा अझुल (फ्रीडा काह्लोचं घर) म्युझियमलाही गेला होतात का? आम्ही बंद गेट बघुन परतलो होतो.

माझ्या आठवणीप्रमाणे चेंडुच्या खेळात जिंकलेल्याला बळी दिले जायचे हरलेल्याला नाही, म्हणुन जिकणे सन्मानाचे होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0