॥उजेड पाडला तुळशीपाशी॥
काही वर्षांपूर्वी पुण्याच्या बाहेरच्या भागांत का होईना, पण नोकरी मिळवण्याएवढं आणि राहण्याएवढं पुण्य मी जमा केलं. तेव्हा लक्ष्मी रोड आणि तुळशीबागेत जाण्याचं भाग्यही माझ्या नशिबी आलं.
लक्ष्मी रोडचा काही भाग एकमार्गी आहे, ज्याला ठाण्यात वनवे म्हणतात. वनवे असूनही मी एकदा चुकीच्या बाजूला स्कूटर घातली तरीही संभाजी पुलावर मामानं पकडलं तसं लक्ष्मी रोडवर पकडलं नाही. मी लगेच दगडूशेठचे मनातल्या मनात आभार मानले आणि पुन्हा मला संभाजी पुलासमोर पकडलं नाही तर लाल महालासमोर नारळ फोडण्याचा नवस बोलले.
लक्ष्मी रोडला फार सुंदर दुकानं आहेत. त्यातल्या 'गांधी खादी भांडारा'तून आणलेल्या कापडाचा कुडता सगळ्यांना आवडला. त्या दुकानात अमराठी आणि अभारतीय लोकांनाही खरेदी करण्याची सोय आहे. मी तिथे अशा काही लोकांना घेऊन गेले असता, आणि मराठीतून हिंदीत आणि इंग्लिशमध्ये भाषांतरं करून दिली असता, कुणीही 'पाहुणे कुठले' असं मला विचारलं नाही. पण शेवटी मला मी कुठली, ते विचारलं. मी ठाण्याची हे सांगितल्यावर, 'तरी तुम्ही चांगलं मराठी बोलता' अशी शाबासकीसुद्धा दिली. कापड विकणं हा फक्त व्यवसाय नसून माणसं जोडण्याची संधी आहे, हे लक्ष्मी रोड विसरला नाही.
लक्ष्मी रोडच्या शेजारीच तुळशीबाग आहे. ठाण्यात राहणाऱ्या लोकांना सहज चालत जाता येईल अशा अंतरावर आहे. संपूर्ण पुण्यातले आत्यंतिक प्रेमळ पुरुष बघायचे असतील तर या दुकानांत जावं. लक्ष्मी रोडवर ज्या गोष्टी दुकानात लपवून विकतात, त्या तुळशीबागेत, अभिमानानं, अमेरिकेत झेंडे मिरवावेत तशा मिरवतात. मी आणि माझी मैत्रीण अगदी दोन टोकांच्या आकारांच्या आहोत. दोघी एकत्र एका दुकानात गेलो असता, "या भाभीजी, तुम्हां दोघींच्या आकाराच्या ब्रा आमच्याकडे आहेत", असं त्यांनी आम्हांला प्रेमादरानं सांगितलं. तुळशीबागेतल्या ब्रा तशा रिकाम्याच असतात. म्हणजे ॲलर्जीसारख्या, नुस्तीच लक्षणं खरा रोग नाहीच. किंवा आपल्या ह्यांच्यासारख्या, नुस्तीच दाढी पण आतमध्ये साधूच नाही!
तुळशीबाग हा पाश्चात्त्य आणि भारतीय संस्कृतीचा अभूतपूर्व मिलाफ आहे. पायांत जीन्स आणि कपाळावर टिकली ही फॅशन तुळशीबागेतच जन्माला आली, असा माझ्या एका अस्सल आणि अट्टल पुणेकर मैत्रिणीचा दावा आहे. तुळशीबागेत तुलसी हे गृहोपयोगी गोष्टींचं भांडार आहे. भांडवलशाही वापरून जनसामान्यांचं कल्याण कसं करावं, आणि top down पद्धतीनं अर्थव्यवस्था कशी चालवावी याचं हे दुकान उत्तम उदाहरण आहे. चैत्रगौरीच्या वाणासाठी लुटण्यासाठी बुटुकभर, प्लास्टिकच्या वस्तू विकून हे लोक भंगारवाल्यांचा धंदा चालवण्याची सोय करतात. उजव्यांच्या भांडवलशाहीचं एवढं लोकोपयोगी उदाहरण मी आजवर कुठेही बघितलेलं नाही, अमेरिकेतही नाही.
लक्ष्मी रोड आणि तुळशीबागेत पुन्हापुन्हा जायला मला खूप आवडेल. पण सध्या मढं बशिवलं या करोनाचं आणि दूश्ट अमेरिकेचं. सागरा, आता लक्ष्मी रोड-तुळशीबागेत जायला माझा जीव तळमळला.
(प्रेरित)
समीक्षेचा विषय निवडा
स्त्रीवादी टिकल्या
१. स्त्रीवादी टिकल्यांचा व्यास कॉलेज कुमारी लावतात त्यापेक्षा थोडा मोठा आणि टळटळीत सवाष्ण लावतात त्यापेक्षा थोडा कमी असतो.
२. त्या लालखेरीज इतर रंगांच्या असतात. शक्यतो काळया असतात कारण काळी टिकली निषिद्ध मानलेली आहे.
३. कधी कधी त्या साप किंवा बाण अशी रूपं घेऊन येतात. अशा टिकल्या कुणी लहर किंवा फॅशन म्हणून लावत नाही. त्याला काही अर्थ असतो जो बघणाऱ्यांनी लावायचा असतो.
४. चंद्रकोर, कुयरी, तुळशी वृंदावन असल्या टिकल्या परंपरावादी टिकल्यांमध्ये मोडतात. स्त्रीवादी बायका अशा टिकल्या लावत नाहीत.
५. स्त्रीवादी टिकल्या आणि मंगळसूत्र यांचा काही संबंध नसतो. एखाद्या बाईने टिकली लावली आहे यावरून लगेच तिला प्रतिगामी म्हणून झोडपण्याआधी तिनं मंगळसूत्र घातलं आहे का ते बघावं. आणि घातलं असेल तरी झोडपू नये. एकूणच स्त्रियांनी स्त्रियांना झोडपू नये. कारण मग पुरुष खुश होतात. आणि आपल्या कृतीमुळे पुरुषांनी आनंदी व्हावे यातच स्त्रीवादाचा पराभव आहे.
@जोकोविच
व्हिसा नाकारल्यामुळे का असेना. ऐसीवर तुमचे स्वागत!
लेखिका विदुषी असली तरी .. . .
तिने कायम गंभीर, तर्कशुद्ध, व्याकरणशुद्धच लिहावे असा आग्रह का? सध्याच विनोदाचं खातं उघडलंय. ( शेजारचे काका,काकू मालिका आठवतेय?) त्यालाही विरोध झाला म्हणतात.
(( काहींची तुळस म्हणे सावली पडली की जगतच नाही अशा तक्रारीही
करतात. जसं काही यांच्या बाल्कनीत इतर झाडं फोफावतात व तुळस संस्कृतीला जागते/मरते.!))
ठाण्यातला स्टेशनरोडचा बाजार आणि तुळशीबाग यात फारसा फरक नसावा. पण ठाण्याने मार्कैटिंग ( साहित्यिक हो) केलेच नाही. तिथे आलेला गावकरी जाताना पुरीभाजी,पियुश घेऊनच जाणार.
मुद्दाम पाडलेला उजेड...
तो या प्रकरणाचा उजेड पडलाय.
तुळशी बागेत भातुकलीची, पितळी
माफ करा तुळशीबागेबद्दलच लिहायचे होते परंतु 'नभ मेघांनी आक्रमिले' सारखे मन, स्मृतींनी आक्रमिले.
------------------------------
तुळशी बागेत भातुकलीची, पितळी भांडी मस्त मिळतात. पुणे-मुंबई-पुणे सिनेमा पाहून मिळालेले द्न्यान. (अवांतर - मुंबईत वाढलेली मुलगी पुण्यात ॲडजस्ट होउ शकत असेल का? गैरसमज नको मी पुण्याचीच आहे पण पुण्याचा चार्म वेगळा. मुंबईचा वेगळा.लग्न होउन मुंबईला गेले तेव्हा दुकानांचा झगमगाट पाहून मनाशी म्हणत असे - यांना दिवाळीचं काही अप्रुप असेल तरी का? ७ दिवस/बारा महीने झगमगाट. आमच्या पुण्यात कशी ७:३० नंतर दुकाने बंद.
शाळा मात्र पुण्यातच असावी. नाही मला तसा तौलनिक अनुभव नाही पण आमची हुजूरपागा काय मस्त मस्त मस्त शाळा होती.)
बाकी लहानपणी शाळेला जायचा रस्ता तुळशी बागेतूनच जात असे. काय मज्जा मज्जा आहे पुण्यात. विश्रामबाग वाडा, मुंजाबाचा बोळ, शनिवार पेठ, पर्वती, सारस बाग, मुकुंद नगर. सदाशिवपेठेत फारसे जाणे व्हायचे नाही. जरी मामा तिथे रहात होता, आजोळ होते तरी तिथला चार्म पल्ले कधीच पडला नाही. मात्र साळू नावाची गोरीपान , घाऱ्या डोळ्यांची एक मैत्रिण होती तिथे अगदी लहानपणी. पुढे दातार क्लासला खूप मैत्रिणी होत्या सदाशिव पेठेमधील. या मैत्रिणी लक्षात रहाण्याचे कारण - क्लास सुटल्यावरती, त्यांना सोडत सोडत रमत गमत मी शाळेत जात असे. तेव्हा वाड्यावाड्यातून जाणे होइ. काय मस्त आमटी भात, भाज्यांचे, गोडा मसाला वगैरे वास दरवळत आई ग्ग!!
नंतर नूमवि मध्ये असताना, जोगेश्वरी देवीला मैत्रिणीसमवेत जाणे होत असे. पुस्तक प्रदर्शनात ही मैत्रिण व मी खूपदा जात असू.
आणि येस्स आमचा कॅन्टॉन्मेन्ट एरिया. आमची सोसायटी, टेकडीच्या पायथ्याशी वसलेली होती. पावसाळ्यात धनगर मेंढ्यांचा कळपच्या कळप चरायला तेथे आणत. दूरवर एक पारसी लोकांची विहीर होती. बापरे हे लोक म्हणे शवाची विल्हेवाट त्या विहीरीत टाकून लावत. आमच्या भागात टेकडीवरती घारी व गिधाडांचा सुकाळ होता. अत्यंत निसर्गरम्य परिसर. अत्यंत. त्यात लहानपणच्या हायटन्ड सेन्सेस व एस्थेटिक गिफ्टसमुळे, निसर्ग फार फार एन्जॉय करता आला.
गंज पेठ, भवानी पेठ, रामोशी टिंबर मार्केट, शनिवार पेठ वगैरे भाग बसमधून दिसत. तिथे कधी फिरणे झाले नाही. कोथरुड, दशभुजा गणपती कधी विशेष पालथे घातले नाहीत हे भाग. सारंग सोसायटी, सहकारनगर, ठुब्यांचा बंगला - फार लहान असल्याने तेथिल फार आठवणी नाहीत.
पण अरण्येश्वराचे मंदीर फार गूढ वाटे. जेमतेम ५-६ वर्षांची होते. मॉन्टेसरीत होते. म्हणजे खरं तर ३-४ वर्षांचीच असेन. नक्कीच. घराजवळ अरण्येश्वर मंदीर होते. लहानपणी कोणाचा ना कोणाचा हात धरुन विशेषतः सोमवारी अरण्येश्वरास जाणे होई. देवळापाशीच जुना पुराणा, ऊंच, भारदस्त पिंपळवृक्ष होता. ज्यावरती पोपट, कावळे, साळुंक्यांची अविरत लगबग चाले. बाजूलाच आवळा, बोगनवेल, तगर, आंबा, जांभुळ आदि झाडाझुडपांची दाटी असे. या झाडांवरती संध्याकाळच्यासुमारास, चिमण्यांचा अविरत चिवचिवाट चाले. तसा प्रचंड चिवचिवाट नंतर कधी फारसा अनुभवला नाही. पिंपळाचा काळसर, जाड, पुरातन बुंधा, संधीप्रकाशात अधिकच जुनाट व भारदस्त वाटत असे. जणू एखादा पुराणपुरुष असावा तसा. हे अरण्येश्वराचे देऊळ फार आठवते. उत्कटतेने, गूढ रंगात आठवते. संध्याकाळी कोणा मोठ्या व्यक्तीचा हात धरुन निघालेली मी. लहानपणी कोणीतरी भीती घातलेली होती की त्या देवळात एक भिकारी बसतो ज्याच्या पायात किडे पडलेले आहेत आणि जर खोटे बोलले तर आपल्याही पायात किडे पडतात.
विद्या विकास विद्यालयचे ही मॉन्टेसरी - आमचे जांभोरकर सर अर्थात जांभो काका. बाळू शिपाई, तुतीचे झाड. या शाळेत एका गॅदरिंगमध्ये, वारकरीण झालेले मी. माझ्या बरोबरच्या वारकऱ्याचे नाव अभिजीत होते असे स्मरते. आडनाव माहीत नव्हते.
या सर्व आठवणी परत जगाव्याशा वाटतात.
विलेपारले
वाल्यांनी आपण मुंबई मध्ये राहतो असा गोड गैर समज करून घेवू नये.
मुंबई माहीम पर्यंत अजून ताणली तर बांद्रा पर्यंत च.
आणि खरी मुंबई अगदी ओरिजनल दादर पर्यंत च .
चर्च gate,vt च्या बाजूचा प्रदेश,मलबार हिल, ही 100,% असली.
ब्रिटिश लोकांचे नियोजन ,आखणी, अप्रतिम.
मोठ मोठी सरकारी हॉस्पिटल.
चार km व्यासाच्या सीमेत एक तरी मोठे मैदान.
हे फक्त ह्याच भागात बघायला मिळेल.
+/-
(तत्त्वतः सहमत आहे, परंतु…)
आणि खरी मुंबई अगदी ओरिजनल दादर पर्यंत च .
चूक.
खरी मुंबई, अगदी ओरिजनल बोले तो (वेस्टर्नवर) महालक्ष्मीपर्यंतच. (सेंट्रलवर नक्की कोठपर्यंत, याबद्दल खात्री नाही; बहुधा भायखळ्याच्या किंचित पुढे, कदाचित करी रोड किंवा चिंचपोकळीपर्यंत असावी. हार्बरबद्दल आपला पास.)
दादर, परळ वगैरे ‘ओरिजनल’ मुंबईत येत नाहीत.
अस्मितेला धक्के कुठेही आणि कसेही बसतात.
अगदी ठाणे नौपाड्यातला इसम दुसरा कुणी ठाण्यातच राहणारा असला तरी त्याच्या जागेचा उल्लेख "तो न पार तिकडे नितीन कंपनीजवळ राहतो" असं बोलताना सापडेल. म्हणजे ठाणे नौपाडा मध्यवर्ती असावे.
इंग्रजीतही शहरातील एखाद्या जागेचा उल्लेख उदाहरणार्थ "two miles from the city centre.." वगैरे असतो. तर हे सिटी सेंटर म्हणजे पोस्ट ओफिस असावे बहुतेक. पण हल्ली रेल्वे स्टेशन धरत असावेत, किंवा बसडेपो.
ठाण्याचे भौगोलिक तुकडे
दक्षिणेकडे कोपरी रोड, तीन हात नाक्याकडे हाइवे आणि जुना आग्रा रोड ( लालबहादुरशास्त्री मार्ग) हे उत्तरेकडे कापत जातात. सेंट्रलचा रेल्वे मार्गही उभा कापतो. आणि उत्तरेचा एक आडवा कळवा रोड आणि मुंब्रा डोंगराला वळसा घालून येणारा पुढे मानपाडा किंवा भिवंडीकडे जाणारा मार्ग हे ठाण्याचे तुकडेतुकडे करतात.
टिकल्या
तुळशीबागेत एक टिकल्यांचा मॉल आहे. तिथे स्त्रीवादी आणि परंपरावादी अशा दोन्ही प्रकारच्या टिकल्या मिळतात. मी नेहमी तिथून स्त्रीवादी टिकल्या घेते. आणि लावते. पण तरीही फेसबुकवरच्या काही स्त्रीवादी बायका मी टिकली लावते म्हणून माझा अपमान करतात.