Skip to main content

प्रेयर्स फॉर बॉबी

तीन चार वर्षापूर्वी शिक्षणानिमित्य पुण्याला जावून राहण्याचा योग आला, नवीन बरेच मित्र मिळाले. आत्ता मी पुण्यात नसतानाही हे मित्र कायम फोनवरून, ईमेलवरून संपर्कात असतात, त्यापैकी एका मित्राच्या बाबतीत अतर्क्य घडले, त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. वास्तविक मी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला चांगला ओळखतो. उच्चशिक्षित कुटुंब त्याचे. लगेच मी पुण्याला गेलो आणि तिथे कळले की ह्या मित्राला लग्नाचा घरी आग्रह झाला तेंव्हा त्याने असे केले. त्याला काय वाटते त्याची त्याने आई वडिलांना अगोदरच कल्पना दिली होती पण ते ऐकून वडिलांना धक्का आणि आई संतापली होती. हाच प्रकार दिवसेंदिवस वाढून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. रोजच्या रोज जिमला जाणारा हसतमुख, उत्साही मित्राचे असे कसे व्हावे आणि घरचे नेमके असे कसे वागले?

इतर मित्र मंडळीना भेटलो त्यांना या प्रकाराची कुणकुण लागली होती पण काही विषय अगदी वैयक्तिक असतात, आपण त्यात पडायचे नसते. त्याच्या ‘त्या’ मित्रालाही भेटलो, त्याची अवस्था तर अधिकच वाईट, मित्राला हॉस्पिटलमध्ये जावून भेटता येत नाही, त्याच्याशी बोलता येत नाही, त्याच्या जीवाची घालमेल तर अधिक वाईट. डोळ्यात सतत पाणी, इतरांना सांगायची चोरी अशी त्याची अवस्था. पण त्याही अवस्थेत मला तो इतर मुलांपेक्षा वेगळा (वाईट अर्थाने) वाटला नाही तर जास्ती प्रेमळ आणि चांगली शैक्षणिक अर्हता असलेला. दोघेही मराठी. आम्हा सर्व मित्रांना ह्या बाबतीत हे काही वाईट आहे असे वाटत नव्हते.

सदर लेख लिहू की नको लिहू असा प्रश्न पडला होता, ३_१४ विक्षिप्त आदितीताईने लिहिलेला “खासगी आयुष्यात सरकारी हस्तक्षेप?” हा लेख वाचला. आणि लिहावे असे ठरवले कारण असे कितीतरी लोक असतील की ज्यांना असे प्रश्न असतील आणि मी तसा नाही म्हणून आपण त्याकडे डोळेझाक करतो आणि असे नाहीच असे मानतो.

इतरापेक्षा वेगळे वाटणे आणि ते ही अगदी वैयक्तिक पातळीवर, हा काही गुन्हा असतो का असा मित्राच्या मित्राचा प्रश्न होता! मी काय उत्तर देणार? त्याने दिलेला आणि बघच म्हणून सांगितलेला एक हटके चित्रपट आवर्जून पाहिला. खरोखरच चांगला आहे, विचार करायला लावणारा, त्याचा संक्षिप्त गोषवारा –
----------------------------------------------------------------------------------------------------
प्रेयर्स फॉर बॉबी
बॉबी नावाचा २०-२१ वर्षाचा तरुण. कर्मठ घरातला (Presbyterian Church शी निगडीत), याला दोन बहिणी आणि एक मोठा भाऊ असतो. बॉबी इतर चार मुलांसारखाच! पण जास्ती प्रेमळ, नात्यांचा विचार करणारा. इतर सर्व वागणेही “नॉर्मल”.

वयात आल्यापासून त्याला जाणवत असते की इतर मुलांप्रमाणे आपल्याला मुलींची फारशी आवड नाही म्हणजे डेटिंग, सेक्स वगैरे. मनात होणारी घुसमट वाढत असते आणि एका (बेसावध) क्षणी तो आपल्या मोठ्या भावाला आपल्याला काय वाटते ते सांगून टाकतो आणि भावाकडून असेही वचन घेतो की ही गोष्ट तो कोणालाही सांगणार नाही विशेषत: आईला. पण मोठा भाऊ बॉबीच्या खरोखर काळजीने आईला सांगतो (चित्रपटातील आईचे नाव मेरी, मुले मातृभक्त आहे), बॉबी भावावर संतापतो आणि आता आईचे उपाय सुरु होतात. (चित्रपटकथा काळ साधारणत: १९७८ ते १९८२ पर्यंतचा असल्याने त्याकाळात अमेरिकेत अशा लोकांना मानसिक रुग्ण समजले जाई आणि मानसोपचार तज्ञ अगदी शॉक ट्रीटमेंट देऊन “रोगी” बरा केल्याचा दावा करत, खरे तर १९७३ साली अमेरिकेत मानसोपचार तज्ञांनी होमोसेक्युअलिटी हा मानसिक रोग नसल्याचे मान्य केलेले आहे) होमोसेक्युअलिटी म्हणजे एड्सच अशीच तिची समजूत असते (आणि काही प्रमाणात ती खरी आहे), बायबलमधल्या ओळी काढून त्या एका कागदावर लिहून ती घरभर चिकटवते अगदी बॉबीच्या बाथरूमच्या काचेवरही, जेणेकरून देवाचे शब्द बॉबी वाचेल आणि त्याचा ‘रोग’ लवकर बरा होईल (होमोसेक्युअलिटी म्हणजे भयानक रोग अशी मेरीची समजूत). त्यामुळे जास्तीत जास्त देवाची प्रार्थना करून ह्या ‘आजारातून’ बॉबीने बाहेर पडावे असे आईला वाटत असते. बॉबीला मानसोपचार तज्ञाकडे आई घेऊन जाते. तेथे त्याचे सेशन सुरु होतात इकडे त्याची “असा” असण्याची बातमी जवळच्या मित्रात नातेवाईकात फुटते. बॉबी आईला अधेमध्ये सतत सांगयचाही प्रयत्न करतो की गे म्हणजे फक्त पॉर्न नाही, आणि गे असणे कोणी मागून घेत नाही पण आईचे समाधान होत नाही.

वास्तविक बॉबीच्या घरच्यांची, आई सोडून सगळ्यांची तो जसा आहे तसा स्वीकारण्याची तयारी झालेली असते. त्याचदरम्यान बॉबीची बहिण (कझिन) सहज भेटायला येते, जेवायला बसलेले असताना ह्याच विषयावरून आई आणि बॉबीत आलेला तणाव स्पष्ट दिसतो आणि बॉबीला होणारा मानसिक त्रास, आईचा त्रागा, तिचे बॉबीला अशा रोगातून वाचवण्याचे प्रयत्न हे पाहून तिला कसेसेच वाटते आणि ती बॉबीला सांगते की लहानपणापासून तिला हे कुटुंब आदर्श वाटत असते पण तसे नाही आहे.

बॉबी आईला अनेकदा समजावतो की प्रार्थना आणि मानासोपचारांचा काही उपयोग होत नाही आहे. वारंवार येणाऱ्या अपराधीपणातून आणि आईला जसं हवं तसा बदल न झाल्याने बॉबी आपल्या (कझिन) बहिणीकडे राहायला जातो तिथे त्याला बारमध्ये त्याला त्याचा बॉयफ्रेंड डेव्हिड (डेविड?) भेटतो, ह्या बॉयफ्रेंडच्या घरच्यांना त्यांच्या मुलाची मानसिकता माहित असते, त्यांनी त्याला आहे तसा स्वीकारलेलं असतं.

थोडे दिवसाने बॉबी परत आपल्या घरी एक दोन दिवसासाठी जाणार असतो त्यावेळी डेव्हिड त्याला सांगतो की आईला तू जसा आहेस तसाच स्वीकारण्याविषयी सांग. घरी परत आल्यावर बॉबी आई ला सांगण्याचा प्रयत्न करतो पण आईची मानसिक तयारीच नसते की आपल्या मुलाला गे म्हणून स्वीकारण्याची. तो परत आपल्या बहिणीकडे (ओरेगॉनला) परत जातो. पण आईच्या स्वभावात झालेला बदल त्याला प्रचंड अस्वस्थ करत असतो. त्यात एके दिवशी गे बार मध्ये डेव्हिडशी त्याचा एक जुना मित्र सलगी करण्याचा प्रयत्न करतो, डेव्हीड न्युट्रल असतो पण असे दृश्य पाहून बॉबी जास्तच अस्वस्थ होतो. शेवटी बॉबी आपण आईचा पहिल्याप्रमाणे लाडका मुलगा नाही किंवा तिला जसा मुलगा हवा आहे तसे आपण नाही आणि प्रयत्न करून होऊही शकत नाही असे वाटून फ्री वे च्या पुलावर उभा राहून, १८ चाकी ट्रक खाली उडी मारतो आणि आत्महत्या करतो (मला खरे तर वाटत होते की बॉबी कसातरी जगणार आणि आईच्या वागण्यात बदल होणार, पण चित्रपट ‘सत्य घटना’ पे आधारित असल्याने असे काही सुखद वळण नव्हते).

मेरीला वाईट वाटते पण त्यानंतर ती परत बायबल मध्ये आत्महत्या करणे हे पाप आहे असे सांगितल्यामुळे बॉबी नक्कीच नरकात गेला असेल अशा विचाराने चिंतीत होते (इथे एक गोष्ट महत्वाची - सत्य घटनेत तसेच चित्रपटात मेरी (पात्र) वाईट नाही आहे तर तत्कालीन धर्मविचाराने आणि समाजभयाने ती अशी वागते). डेव्हिड फ्युनरलला येतो जेंव्हा मेरीला कळते की हाच तो डेव्हिड तेंव्हा ती त्याची खाण्याची प्लेट सरळ डस्टबिन मध्ये टाकून देते (इतरांच्या प्लेट्स ती धुवून व्यवस्थित ठेवत असते).

त्यानंतर लगेचच एकदा कधीतरी ती बॉबी त्यांच्या घरात ज्या खोलीत राहत असतो तेथे जाते, तिथे तिला बॉबीने पाठविलेले काही पाकिटे मिळतात त्यात एकत् तिला एका चर्चचा पत्ता मिळतो, तो पत्ता शोधत मेरी जाते आणि तिथे तिला एक पाद्री होमोसेक्स्युअल लोकांसाठी मानसिक आधार केंद्र म्हणता येईल असा उपक्रम चालवत असतो, ते पाहून मेरी भडकते आणि धर्माविरुद्ध वागण्याविषयी त्याला काही ऐकवू लागते की बायबल मध्ये होमोसेक्युअलिटीवर मृत्युदंड अशी शिक्षा आहे तेंव्हा तो पाद्री तिला सांगतो की आत्ता काही बोलू नका माझ्याशी काही बोलायचे असेल तर मला ‘ह्या ह्या’ ठिकाणी भेटा. मेरी परत आपल्या घरी येते आणि बायबल मध्य होमोसेक्स्युअल लोकांना काय शिक्षा सांगितलेत (सोडोम आणि गोमोर्राची बायबल मधली गोष्ट) ह्याच्या नोंदी करून घेऊन परत त्या पाद्रीला नंतर भेटायला जाते त्यात पाद्री तिला थोडक्यात पुराणातली वांगी पुराणात असे एक लेक्चर ऐकवतो आणि उदाहरणेही देतो की लग्नानंतर जर नवऱ्याला असे कळले की नवीन नवरी कुमारिका (VIRGIN) नसेल तर तिला परत माहेर पाठवून दगडाने ठेचून मारावे असे सांगितले आहे (ह्याविषयी मला स्वत:ला काही ज्ञान नाही चित्रपटात जसे आहे तसे लिहिले चू.भू.द्या.घ्या.)तसेच लहान मुलांना करावयाच्या शिक्षा ही फार कठोर सांगितल्या आहेत आपण तसे आत्ता वागतो का? मग हा अन्याय फक्त होमोसेक्स्युअल लोकांवरच का? इतके होवूनही मेरी संभ्रमात असते. पण तिला लवकरच सत्य परीस्थितीची जाणीव होते आणि ती माझ्या मुलाचा मीच खून केला म्हणून मानसिक दृष्ट्या कोसळते, अशावेळी घरचे तसेच हा पाद्री तिला मानसिक आधार देतात.

शेवटच्या दृश्यात बॉबीचे संपूर्ण कुटुंबीय (मेरीसकट) गे परेड मध्ये सहभागी होते असे दाखवले आहे आणि सगळ्यात शेवटी खरा बॉबी आणि त्याच्या आईचा फोटोपण दाखवला आहे. पूर्ण चित्रपटात एकच बॉबी आणि त्याच्या मित्राचा किसिंग सीन आहे (पॉर्न वगैरे काही नाही).
--------------------------------------------------------------------------------------------------
माझा मित्र वाचला, उच्चाभ्यासाचे तणाव वगैरे सांगून त्याच्या आई वडिलांनी वेळ मारून नेली. पण प्रश्न खरेच सुटला का? आणि भारत सरकारचे असे धोरण - फक्त बाहेर कळत नाही म्हणून असे काही नाही किंवा मी तसा नाही म्हणजे असे काही असणे शक्य नाही हे बरोबर आहे का?

ऋता Tue, 28/02/2012 - 21:54

फारच नाजूक अशा विषयावर तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे लिहिलं आहे.
मला एक अतिशय निराशाजनक बातमी आठवली...http://timesofindia.indiatimes.com/india/Aligarh-Muslim-University-prof…
आणि त्याबदद्ल या (http://harmanjit.blogspot.com/search?q=Siras) ब्लॉग मधे मी वाचलं होतं.

वास्तवात, समलिंगी संबंध उघड झाल्यास, ते असणार्यांचा शेवट आपल्या समाजात निराशाजनक होतो, हे फार दु:खदायक आहे.
निदान या मुद्द्यांवर वाद्/चर्चा होत आहेत हे चांगल लक्षण आहे.

धनंजय Tue, 28/02/2012 - 23:08

चांगले लिहिले आहे.

जर माझ्या कुटुंबातच मी वस्तीला असतो, तर कुटुंबाच्या प्रेमळ दबावामुळे मी खुद्द शोकांतिकेत गोवला जाण्याची शक्यता होती (आणि माझ्याबरोबर अन्य लोकही शोकांतिकेत गोवले जाण्याची शक्यता होती), असे मला राहून-राहून वाटते.

अज्ञात Wed, 29/02/2012 - 04:28

फार छान लिहिले आहे. तुमच्या मित्राला शुभेच्छा कळवाव्यात.. त्याची ट्रॅजेडी होता होता वाचली म्हणायची पण यापुढेही त्याला बर्‍याच गोष्टींना सामोरे जावे लागेल ( म्हणून शुभेच्छा ) आणि त्याला म्हणावे stay strong

प्रसाद Wed, 29/02/2012 - 10:09

नक्कीच! आमचे सगळ्यांचे प्रयत्न सुरु आहेत, त्याच्या आई वडिलांनी त्याला समजून घेणे सगळ्यात जास्त आवश्यक वाटते (पण ह्याबाबतीत आम्ही काही करू शकत नाही!!!!!!!!!!!!).

ऋषिकेश Wed, 29/02/2012 - 10:22

खरे दोन पुरुषांमधील अथवा स्त्रियांमधील संबंधांमधे नवे, वेगळे किंवा अनैसर्गिक असे काहि नाही! मात्र समाजात बदल व्हायला वेळ लागणारच!
माझ्या मित्रांपैकी एक जवळचा मित्र समलिंगी संबंध ठेवतो व सुदैवाने त्याला व त्याच्या पार्टनरला घरच्यांनी झिडकारले नाही. आई-वडीलांना (समाजाच्या प्रश्नांचा) त्रास नको मात्र आधार तर द्यायला हवा म्हणून ते वेगळा फ्लॅट घेऊन त्यांच्या जवळच रहात आहेत.

अश्या व्यक्तींशी जाहिरपणे सामान्य वागणे वाढले तर हळू हळू बदल होतील असे वाटते.

मन Wed, 29/02/2012 - 14:01

हे ज्या कुठल्या लोकांविषयी लिहिले जात आहे, त्याबद्दल मागील काही वर्षांतच एकाएकी लिहिणे, बोलणे कसे काय वाढले?
म्हणजे मागच्या काही वर्शांतच एकदम माध्यमांतून चर्चा, कोर्टात केसेस, आरोग्य मंत्रालयाने दखल घेणे हे सुरु झालेले दिसते.
त्यापाठोपाठ अशा केसेस भारतात दिसू लागल्या. मधे काही मोर्चेही निघाले.
नक्की काय प्रकार आहे?
पूर्वीही हे सर्व होते, पण समाज भयाने कोणी समोर येत नव्हते असे काही आहे काय? आताच समाजभय कमी वगैरे कसे झाले?
१९९० पर्यंतचे उल्लेख वगैरे वाचले, गाजलेल्या केसेस पाहिल्या, नेत्यांची विधाने पाहिली, चित्रपट पाहिले, तर हा विशय कुठे चर्चेला का आला नाही? तेव्हा तो नव्हता व आता माध्यमांनी ग्लॅमर मिळवून दिल्याने वाढला असे आहे काय?
उदा:वाचतो.ब्रिटिश कालातील स्वात्म्त्र्य चलवळीतील कित्येक घटना वाचतो. ध्येयाने झपाटलेल्या कित्येक तरुणांनी लग्न रद्द केल्याचे वाअचतो. त्यांच्या भावंडांचे वगैरे विवाह कुठे झाले वगैरे ह्याचेही उल्लेख दिसतात.पण मग त्यादरम्यान कुनाचाच इंटरेस्ट "अशा " गोष्टींत असल्याचे का दिसत नाही?

--शंका सरळच विचारल्या आहेत.कारण सदर प्रकराबद्दल फारशी माहिती नसनार्‍या सामान्य लोकांपैकी मीही एक आहे. व हे लोक सामान्यच आहेत कंवा मनोरुग्नच आहेत, असा कुठलाही दावा मी करु शकत नाही. हिणवण्याचा उद्देश तर नाहीच.

ऋषिकेश Wed, 29/02/2012 - 15:20

In reply to by मन

खूप पूर्वीपासून अश्या घटना होत आहेत.. अगदी वैदिक काळापासून..
सद्य आधुनिक समाजात कुटुंबाकडून अश्या गोष्टींना आजार समजले गेल्याने / न समजताही दडपले गेले. असे काहि आढळले तर उलट लवकर लग्न लाऊन दिले जात असे (म्हंजे तो 'बरा होईल' अशी कल्पना)

गेल्या अर्ध्या शतकात जग जवळ आले, विविध देशांतील घटना अधिक तपशीलवार समजू लागल्या आणि मग अमेरिकेमधील घटनांमुळे या दडपलेल्या चेहर्‍यांना आवाज मिळू लागला. याची झलक गेल्या पन्नासएक वर्षांतील साहित्यात दिसते. अगदी (साजूक) पु.ल. देखील 'जावे त्यांच्या देशा' मधे न्यूयॉर्क वरील लेखात (उपहास/हेटाळणीने का होईना) याचा उल्लेख करताना आढळतील .
नाकी कोणार्कच्या शिल्पांमधेही असे संबंध दाखवले गेले आहेत.

तेव्हा हे समाजाला नवीन नव्हते. जर हे अगदी नवे आहे तर 'गांडूगिरी' वगैरे शब्द आपल्या बुजूर्गांकडून कश्या ऐकायला मिळाल्या असत्या?

चिंतातुर जंतू Wed, 29/02/2012 - 15:48

In reply to by मन

माझा फार अभ्यास आहे असा दावा नाही, पण काही माहिती/निरीक्षणं -

>>म्हणजे मागच्या काही वर्शांतच एकदम माध्यमांतून चर्चा, कोर्टात केसेस, आरोग्य मंत्रालयाने दखल घेणे हे सुरु झालेले दिसते.

माझ्या मते तुमच्या निरीक्षणांतल्या सुट्या घटकांमधला कार्यकारणभाव असा असावा: एड्सच्या संदर्भात काम करणार्‍या एका संस्थेनं कोर्टात केस केली. समलिंगी संबंध बेकायदेशीर असल्यामुळे समाजाच्या या घटकापर्यंत पोहोचणं अवघड जातं; त्यामुळे एड्सविषयी जागरूकता किंवा कंडोम/चिकित्सा/औषधं यांसारखे, म्हणजे प्रतिबंधक आणि रोगनिवारक उपाय योजणं कठीण होऊन बसतं असं या संस्थेचं म्हणणं असावं. अधिक माहिती इथे मिळेल. आता अशी केस म्हटल्यावर कोर्टात आपली बाजू मांडायला आरोग्य मंत्रालय बांधील आहे. आणि त्याला आजच्या माध्यमांत सनसनाटी प्रसिद्धी मिळणं अपरिहार्य आहे.

>>त्यापाठोपाठ अशा केसेस भारतात दिसू लागल्या.

अशा केसेस भारतात पूर्वीपासून आहेत. मी इतरत्र दिलेला 'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली'मधल्या लेखाचा दुवा इथे पुन्हा देतो. या कलमाखाली चाललेल्या विविध केसेसचं वर्णन त्यात मिळेल.
http://qmediawatch.wordpress.com/2006/11/25/sec-377-and-the-dignity-of-…

>>आताच समाजभय कमी वगैरे कसे झाले?

असं अनेक सामाजिक रुढींबाबत होत असतं. संमतीवय, विधवा पुनर्विवाह यांवर सुमारे १०० वर्षांपूर्वी अचानक समाज ढवळून निघाला. त्यामागे ब्रिटिश सरकारचे कायदे, इंग्रजीत उपलब्ध साहित्यातून मिळालेले सुधारक विचार, आपल्या सुधारकांनी हा प्रश्न नेटानं उचलून धरणं वगैरे कारणं शोधता येतील. तशीच कारणं आताही असावीत.

>>नेत्यांची विधाने पाहिली, चित्रपट पाहिले, तर हा विशय कुठे चर्चेला का आला नाही?

भारतीय नेते आणि चित्रपट दोन्हींबाबत खेदानं असं म्हणावं लागतं की चर्चेत असायला हवेत असे अनेक विषय त्यांच्या खिजगणतीत नसतात. त्यामुळे या विशिष्ट प्रश्नापुरतं म्हणायचं झालं तर 'अशी अपेक्षा ठेवणं अवास्तव आहे' यापलीकडे काही विधान करता येत नाही.

>>ध्येयाने झपाटलेल्या कित्येक तरुणांनी लग्न रद्द केल्याचे वाअचतो. त्यांच्या भावंडांचे वगैरे विवाह कुठे झाले वगैरे ह्याचेही उल्लेख दिसतात.पण मग त्यादरम्यान कुनाचाच इंटरेस्ट "अशा " गोष्टींत असल्याचे का दिसत नाही?

ज्या गोष्टीला अधिकृतपणे समाजमान्यता नाही (किंबहुना जी टवाळीचा किंवा तुच्छतेचा किंवा लज्जेचा विषय आहे) अशी गोष्ट अशा प्रकारे कुणी जाहीर का करेल? उदाहरण म्हणून सांगतो. आपल्या पाल्याच्या केसात उवा झालेल्या असताना ही माहिती गुप्त ठेवणारे पालक मी बघितले आहेत. कारण काय? तर उवा होणं हे अस्वच्छतेचं लक्षण आहे आणि तथाकथित 'चांगल्या घरातल्या' मुलांच्या डोक्यात उवा होऊच शकत नाहीत! आता जिथे ही परिस्थिती आहे तिथे तुमच्या शब्दांत "अशा" ('शरीरसंबंधांसारख्या खाजगी आणि अशिष्ट मानल्या जाणार्‍या' असा इथे याचा अर्थ घेता येईल) गोष्टीची जाहीर वाच्यता होईल अशी अपेक्षा काहीशी अवास्तव नाही का?

दुसरं आणि विषयाशी अधिक जवळचं उदाहरणः इंग्रजी साहित्यातले अनेक गाजलेले लेखक समलिंगी प्रवृत्तीचे होते. पण विसाव्या शतकापर्यंत ती गोष्ट सर्वसाधारण म्हणून समाजात मान्य नव्हती आणि बेकायदेशीर होती म्हणून लोक त्याची वाच्यता करत नसत. त्यातच ऑस्कर वाईल्डच्या खटल्यामुळे ही बाब अधिकच गुप्त ठेवली जाऊ लागली. कायद्याच्या बडग्याचा आणि समाजाच्या तुच्छतेचा असा परिणाम होतच असणार. नाही का?

Nile Wed, 29/02/2012 - 20:27

माझं (इतरांच्या अनेक उदाहरणांवरून) असं मत झालेलं आहे की आई वडील असलेतरी काही वेळा त्यांच्या मताला (आपल्या आयुष्याशी निगडीत निर्णयांना) किती महत्त्व द्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आई वडीलांनी नकार दिला म्हणून प्रेमाचं विवाहात रुपांतर न करु शकणारे, आई वडील नाही म्हणाले म्हणून परगावची हवी असलेली नोकरी नाकारणारे वगैरे लोक पाहिले की गंमत वाटते.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 29/02/2012 - 21:21

In reply to by Nile

प्रत्यक्ष आयुष्यात असे किती दुर्दैवी बॉबी असतील कोण जाणे!

धर्माला घाबरून जगणारे लोकं पाहिले की आनंदात 'गे प्राईड परेड'मधे नाचणारे लोकं आठवतात. हजार - दोन हजार वर्षांपूर्वींची मूल्य आजच्या समाजाला लागू करून आजचं आयुष्य का नासवायचं? अपघातानेच का होईना, एकदातरी 'गे प्राईड परेड' पाहिली याचा मला आनंद आहे. त्या परेडमधे आनंदाने नाचणारे समलैंगिक, त्यांचे 'बहुसंख्ये'तले मित्र आणि मैत्रिणी, लहान मुलं, या सगळ्यांचा विचार करून माझं क्षितीज निश्चितच विस्तारलं.

अरविंद कोल्हटकर Wed, 29/02/2012 - 22:08

हे ज्या कुठल्या लोकांविषयी लिहिले जात आहे, त्याबद्दल मागील काही वर्षांतच एकाएकी लिहिणे, बोलणे कसे काय वाढले?> मन ह्यांच्या प्रतिसादामधून.

जेव्हा म.टा. (माझ्या दृष्टीने) आतापेक्षा अधिक वाचनीय होता अशा पूर्वीच्या काळात सुमारे ४० वर्षांपूर्वी संपादक गोविंद तळवलकर त्यांच्या विचाराने महत्त्वाच्या अशा इंग्रजी पुस्तकांवर रविवारच्या अंकात लेख लिहीत असत. त्यांपैकी एक लेख रॅडक्लिफ हिललिखित The Well of Loneliness नावाच्या १९२०च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या कादंबरीवर होता. ह्या कादंबरीवरचा विकिपीडियामधील लेख येथे पाहता येईल.

ऑस्कर वाइल्ड ह्या अतिशय गुणवान लेखकाचे आयुष्य समलिंगी संबंधांकडे पाहण्याच्या तत्कालीन ब्रिटिश कायद्यामुळे उद्ध्वस्त झाले. ह्या सर्वावर विस्तृत लिखाण मी ६०-६५ साली वाचलेले आठवते.

इंग्लंडमध्ये, विशेषेकरून उच्चभ्रू समाजामध्ये आणि ईटन-हॅरो सारख्या प्रख्यात शाळांमध्ये ह्याचा बराच प्रसार होता अशी समजूत आहे. ५०च्या दशकातील किम फिल्बी आणि त्याच्या वर्तुळाभोवती केंद्रित असलेली Cambridge Spy Ring अशाच शाळाकॉलेजातील मैत्रीमुळे निर्माण झाली होती. (आय.सी.एस.अधिकारी आणि प्रसिद्ध अरेबिस्ट सेंट जॉन फिल्बी ह्यांचा किम हा मुलगा. सेंट जॉन फिल्बी हे नंतर सौदी अरेबियाचे पहिले राजे फैजल ह्यांचे निकटवर्ती झाले. किमने आपली हेरगिरी उघडकीस येणार अशी शंका येताच सोवियेट रशियात आश्रय घेतला आणि मृत्यूपर्यंत तो तेथेचे राहिला.) फिल्बी प्रकरणाची विस्तृत चर्चा ५० आणि ६०च्या दशकात झाली आहे.

अलीकडच्या दिवसात व्यक्तिस्वातन्त्र्याच्या वाढत्या जाणिवेमुळे ह्या विषयावर सहानुभूतीने पाहणारी अशी बरीच नवी निर्मिति होतांना दिसते. ऑस्कर विजेता चित्रपट Brokeback Mountain त्यापैकीच एक. (त्यातील नट हीथ लेजर जानेवारी २००८ मध्ये अमली पदार्थाच्या अतिसेवनामुळे केवळ २८व्या वर्षी मृत्यु पावला.)

अलीकडेच काही महिन्यांपूर्वी न्यूयॉर्कर मासिकात वाचलेल्या टायलर क्लेमेंटीच्या पुलावरून उडी मारून जीव देण्याच्या गोष्टीची येथे आठवण झाली. (लेख येथे पाहता येईल.) टायलर क्लेमेंटी आणि NRI कुटुंबातील मुलगा रवि हे कॉलेजात रूम-पार्टनर होते आणि टायलरचा मित्र रवीच्या संमतीने त्यांच्या खोलीत काही तास घालवत असे. त्यांच्या संबंधाचे चित्रण गुप्तपणे रवीने वेबकॅम वापरून केले आणि ही गोष्ट इतरांना कळविली. ह्यामुळे व्यथित होऊन टायलरने नदीच्या पुलावरून उडी मारून जीव दिला. त्या म्रुत्यूला कारण झाल्याच्या आणि टायलरची छळणूक केल्याच्या आरोपाखाली रवीवर आता खटला चालू आहे.

भारतीय नेते आणि चित्रपट दोन्हींबाबत खेदानं असं म्हणावं लागतं की चर्चेत असायला हवेत असे अनेक विषय त्यांच्या खिजगणतीत नसतात.> चिं.ज. ह्यांच्या प्रतिसादामधून.

बाळासाहेब ठाकरे ह्यांनी दीपा मेहता-दिग्दर्शित 'Fire' ह्या चित्रपटाच्या संदर्भात 'असले काही भारतात होत नाही' अशा अर्थाचे विधान केल्याचे आठवते. ह्या चित्रपटामध्ये ह्या विषयाला ईषत्स्पर्श केलेला आहे. (बाळासाहेब भारतवर्षातील प्रत्येक शयनगृहात डोकावून आले असावेत आणि त्यामुळे त्यांचे ह्या विषयाचे ज्ञान पक्के असणार ह्याची खात्री आहे.)

Nile Wed, 29/02/2012 - 22:20

In reply to by अरविंद कोल्हटकर

ऑस्कर वाइल्ड ह्या अतिशय गुणवान लेखकाचे आयुष्य समलिंगी संबंधांकडे पाहण्याच्या तत्कालीन ब्रिटिश कायद्यामुळे उद्ध्वस्त झाले. ह्या सर्वावर विस्तृत लिखाण मी ६०-६५ साली वाचलेले आठवते.

Alan Turing या गुणवान शास्त्रज्ञाचं ह्या गाढव ब्रिटिश सरकारमुळं काय झालं?

http://en.wikipedia.org/wiki/Alan_Turing#Conviction_for_indecency

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 29/02/2012 - 22:31

In reply to by Nile

निदान आज चूक सुधारत आहेत.

युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टर हे युरोपमधलं आकाराने सर्वात मोठं विद्यापीठ आहे. त्यांच्या खगोलशास्त्र आणि गणित प्रभागाच्या इमारतीचं नाव अ‍ॅलन ट्यूरींग बिल्डींग असं आहे.

आतिवास Thu, 01/03/2012 - 12:42

In reply to by Nile

Early in 1944 a suspicion arose that he might have been the man responsible for molesting schoolboys at the main public library in Luton, ...>>

असंही तुम्ही दिलेली लिंक सांगते, त्यात तथ्य आहे का नाही हे मला माहिती नाही, नसेल तर - असेल तर असा फक्त विचार करता येतो.

तत्कालीन सरकारवर टीका करण्यात फारसा अर्थ नसतो (त्यांचे चुकले असले तरी) कारण लोकशाहीत सरकार लोकांपेक्षा फारसं वेगळ असू शकत नाही - लोक मत देतील तरच ते निवडून येणार ना! लोकशाहीची ही एक मर्यादाच म्हणायला हवी.

सगळ्याच सामाजिक सुधारणा अनेकांनी भोगल्यावर, भोगणा-यांचा critical mass तयार झाल्यावर .. अशा अनेक गोष्टींमुळे होतात असं इतिहास सांगतो.

शिवाय गुणवान लोकांची आपल्याला माहिती तरी होते, जे गुणवान आणि प्रसिद्ध नसतात तेही या चक्रातून जात असतात.

ते बदलायला हव याबाबत दुमत नाही .. त्यासाठी प्रयत्न करायला हवेत हेदेखील मान्य आहेच, गैरसमज नसावा.

चिंतातुर जंतू Thu, 01/03/2012 - 14:21

In reply to by आतिवास

>>तत्कालीन सरकारवर टीका करण्यात फारसा अर्थ नसतो (त्यांचे चुकले असले तरी) कारण लोकशाहीत सरकार लोकांपेक्षा फारसं वेगळ असू शकत नाही - लोक मत देतील तरच ते निवडून येणार ना! लोकशाहीची ही एक मर्यादाच म्हणायला हवी.

मला वाटतं यात एक मूलभूत मुद्दा दुर्लक्षित होतो आहे. त्याच विकी पानावरूनः

since he was perhaps the only man in Menzies's service who might have been called ‘indispensable,’ his services were retained.

While no proceedings arose, it was decided that the need for good order and discipline required his removal - but not before he had done his finest work

पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांनी जाहीर केलेल्या माफीनाम्यानुसारः

While Turing was dealt with under the law of the time and we can't put the clock back, his treatment was of course utterly unfair and I am pleased to have the chance to say how deeply sorry I and we all are for what happened to him ... So on behalf of the British government, and all those who live freely thanks to Alan's work I am very proud to say: we're sorry, you deserved so much better

थोडक्यात काय, तर: ऐन युद्धकाळात ट्युरिंगमुळे शत्रूपक्षाचे निरोप अविश्वसनीय इतक्या जलद गतीनं डीकोड करता येत होते; युद्ध जिंकण्यासाठी हे अत्यावश्यक काम होतं; यामुळे त्याला काम करू दिलं गेलं. दोस्त राष्ट्रांनी युद्ध जिंकण्यामागे हा एक महत्त्वाचा घटक होता. १९५२ साली, म्हणजे युद्ध संपल्यावर, ट्यूरिंगची इतकी निकड उरलेली नव्हती. मग त्याचं वाटेल ते होऊ दे म्हणून ब्रिटिश सरकारनं त्याला शिक्षा होऊ दिली - गरज सरो अन् वैद्य मरो या नात्यानं. त्याच्यावर हॉर्मोनल ट्रीटमेंट केली गेली. अंततः ट्यूरिंगनं आत्महत्या केली. तरीही आपण म्हणत असाल की तत्कालीन सरकारवर टीका करण्यात अर्थ नसतो कारण ते फक्त कायद्याची अंमलबजावणी करतात, तर असहमत. आजही सरकारं अशा पद्धतीनं माणसांचा सोयीस्कर वापर करून घेतात आणि मग त्यांना फेकून देतात. हे अमानुष आहे. यावर टीका व्हायलाच हवी. याशिवाय आजही, याच संस्थळावर आणि समाजात इतरत्रही, 'गेशिप हा हार्मोनल प्रॉब्लम आहे' असं म्हणणारे तथाकथित शिकलेसवरलेले लोक वावरतात. त्याची जबाबदारीही अज्ञानातून आलेल्या या असल्या पूर्वीच्या उपचारपद्धतींवर आणि त्यांच्या सरकारमान्यतेवर काही प्रमाणात पडतेच.

१ - http://www.aisiakshare.com/node/565#comment-7727

Nile Thu, 01/03/2012 - 21:07

In reply to by आतिवास

तत्कालीन सरकारवर टीका करण्यात फारसा अर्थ नसतो (त्यांचे चुकले असले तरी) कारण लोकशाहीत सरकार लोकांपेक्षा फारसं वेगळ असू शकत नाही - लोक मत देतील तरच ते निवडून येणार ना! लोकशाहीची ही एक मर्यादाच म्हणायला हवी.

तात्विक दॄष्ट्या तुमचा मुद्दा बरोबर असला तरी तो मान्य होत नाही. सरकार हे लोकप्रतिनिधी असले तरी "लोकांचे" मत = सरकारचे मत असे होत नाही. भारतात लोकप्रतिनिधी भ्रष्टाचार करतात, त्यांनाही लोकांनीच निवडून दिले आहे, पण म्हणून भ्रष्टाचार क्षम्य होतो का?

किंवा आजचे उदाहरण घ्या. सद्ध्या अमेरीकेत 'अबॉर्शन' हा वादाचा मुद्दा आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रपदी-पदाचे उमेदवार 'अबॉर्शन' विरोधात आहेत तर डेमोक्रेटिकपक्षाचे लोक अबॉर्शन च्या बाजूने आहेत (वाद लोकांच्या टॅक्समधून गोळा केलेला पैसा प्लान्ड पॅरेंटहूड ( http://en.wikipedia.org/wiki/Planned_Parenthood ) सारख्या संघटनांना जाण्यापासून ते 'देवाची देन' मारण्यापर्यंत आहे). दोघांपैकी कोणाचेही सरकार आले तरी अनेक लोक असे असणार आहेत की ज्यांचे तत्कालिक सरकारच्या विरोधी मत असेल. पण म्हणून त्या लोकांनी सरकारने कोणताही निर्णय घेताना तारतम्य ठेवावे अशी अपेक्षा ठेवूच नये का? (इथे दुसर्‍या पक्षाचा विरोध असेल हे बरोबर, पण काही उदाहरणांमध्ये दोन्ही(बहुसंख्य) पक्षांच्या संमतीने अनेक चुकिचे निर्णय घेतले जातात.)

सरकारला निवडून दिले. आता त्यांचा चार/पाच वर्षे काय करायचे ते करूदे हा लोकशाहीचा अर्थ असेल असे वाटत नाही. सरकारला तुम्हीच निवडून दिले असेल तर योग्य प्रसंगी टिका (चळवळी इ.) करण्याची गरज पडू शकते.

इतिहासातील गोष्टींवर/निर्णयांवर टिका का? इतिहासातील अनेक चुकिचे निर्णय पुन्हा घेतले जाण्याची उदाहरणेही आहेत. त्याशिवाय, अशा चुकांची पुनरावृत्ती होऊ नये या साठी त्या चुका निदर्शनास आणणेही महत्त्वाचे आहे. (इथे ही काही नमुने दिसलेच असतील तुम्हाला)

Early in 1944 a suspicion arose that he might have been the man responsible for molesting schoolboys at the main public library in Luton, ...>>

असंही तुम्ही दिलेली लिंक सांगते, त्यात तथ्य आहे का नाही हे मला माहिती नाही, नसेल तर - असेल तर असा फक्त विचार करता येतो.

त्याला सरकारने दिलेली वागणूक ही होमोसेक्शूअल अ‍ॅक्ट्स बेकायदेशीर म्हणून "gross indecency under Section 11 of the Criminal Law Amendment Act 1885" या कायद्यान्वये दिली गेली. त्यावर इतर आरोप असतील तर त्याचा निवाडा सरकारने काय लावला? तो योग्य लावला की नाही हा वेगळा मुद्दा आहे. तो आरोप खरा होता असे "मानले" म्हणून सरकारची वागणूक क्षम्य होते का?

सानिया Thu, 01/03/2012 - 09:32

फिलाडेल्फिया(१९९३) हा समलिंगी संबंध-एड्स-त्यामुळे मिळणारी वाईट वागणूक या विषयावरचा माझा आवडता चित्रपट. टॉम हँक्सला या चित्रपटाबद्द्ल ऑस्कर मिळाले होते. एड्सच्या खुणा जेव्हा शरीरावर दिसू लागतात, तेव्हा काहितरी निमित्त काढून त्याला कामावरून काढून टाकण्यात येते. नायक अन्यायाविरूध्द खटला भरतो. या खटल्याचा प्रवास म्हणजे हा चित्रपट. सुरूवातीला कुठलाही वकील नायकाच्या बाजूने खटला चालवायला तयार होत नाही. डेंझल वॉशिंग्ट्नने त्याच्या वकीलाची भुमिका केली आहे. तो चक्क डोक्टरांकडे जाऊन खात्री करून घेतो, की हातमिळवणी करण्यातून एड्स आपाल्याला तर होणार/झाला नाही ना. नंतर मात्र तो या खटल्यात साथ द्यायला तयार होतो. या चित्रपटातील हा ऑपरा हे एक अविस्मरणीय दृश्य!

'उंबरठा' या चित्रपटातील चांद मातला या गाण्यात समलिंगी संबंधांचा सूचकतेने केलेला उल्लेख आढळतो.

आतिवास Thu, 01/03/2012 - 21:58

चिंतातूर जंतू आणि Nile,

ते बदलायला हव याबाबत दुमत नाही .. त्यासाठी प्रयत्न करायला हवेत हेदेखील मान्य आहेच, गैरसमज नसावा.>>

असं मी आधीही म्हटलं होत माझ्या प्रतिसादात आणि आजही म्हणते. कदाचित ते मला तितकेसे ठासून म्हणता आले नसेल तर तो दोष अर्थातच माझा आहे हे मी कबूल करते.

मला सरकारवर टीका करू नका असं म्हणायच नव्हत .. टीकेतून बदल होतात असेही अनुभव आपल्याला आहेत. पण अनेकदा त्या त्या काळातील समाजमनाच्या ज्या मर्यादा असतात त्या विसरल्या जातात आणि सरकारवर टीका केली जाते त्याबद्दल मी बोलत होते. आज आपण त्या काळाच्या पुष्कळ पुढे आलो आहोत (आहोत का, असा कधीकधी प्रश्न पडतो तो भाग वेगळा - म्हणून अवांतर!!) म्हणून त्या काळाचे विविध धागेदोरे आपल्याला स्पष्ट दिसतात. पण आपण त्याच काळात असतो तर? आजच्या प्रश्नांबाबत आपण जे काही करत आहोत त्याबद्दल पुढची पिढी काय म्हणेल ते पाहणे मनोरंजक ठरावे - पण तशी संधी आपल्याला कधी मिळणार नाही!! विनोबा म्हणतात तसं आपण त्यांच्या खांद्यावर बसलो आहोत म्हणून आपल्याला पुढच (त्यांच्या) आणि मागच (आपल्या) दोन्ही दिसतय - असं मला म्हणायच होत फक्त!! सरकारचे हे समर्थन नाही.

आपल्यातले किती लोक या विषयाबाबत (आणि अन्य अनेक विषयांबाबत) संवेदनशील आहेत हा माझ्या मते कळीचा मुद्दा आहे. जनमत बदलले तर सरकारला बदलावे लागेल - निदान वरवर तरी बदलावे लागेल. मला आता फक्त सतत सरकारला दोष देण्याचा कंटाळा आलाय इतकेच!!

माझा कोणत्याही सरकारशी त्यांच्या बाजूने मी असण्यासारखा संबंध नाही - मी एक सामान्य नागरिक या नात्याने हे लिहिते आहे हेही इथे लक्षात घ्यावे ही विनंती. :-)

Nile Thu, 01/03/2012 - 23:30

In reply to by आतिवास

माझा कोणत्याही सरकारशी त्यांच्या बाजूने मी असण्यासारखा संबंध नाही - मी एक सामान्य नागरिक या नात्याने हे लिहिते आहे हेही इथे लक्षात घ्यावे ही विनंती.

याविषयी गैरसमज नाही. (असं वाटलं असतं तर इतका मोठा प्रतिसाद टाईप केलाच नसता. ;-) )

इतिहासातील गोष्टी त्याच कंटेक्स्टने पाहिल्या पाहिजेत हे मला मान्य आहे (इथे मी तोच मुद्दा अधोरेखित केला आहे: http://aisiakshare.com/node/570#comment-7733 ).

पण खांद्यावर बसून मागचं दिसतंय तर त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. आपल्या पुढच्यांनी आपल्या खांद्यावर बसून "तुम्ही खांद्यावर होता तेव्हा काही शिकला नाहित वाटतं" असं म्हणायला नको हा उद्देश आहे. :-)

मला आता फक्त सतत सरकारला दोष देण्याचा कंटाळा आलाय इतकेच!!

असं होतं कधी कधी. पण दोष देण्याचा आही कंटाळा केला तर संस्थळांवर येऊन करायचं काय असा प्रश्न आमच्या समोर निर्माण होईल. ;-)

मणिकर्णिका Fri, 02/03/2012 - 00:25

मूळ मेख इथेच आहे. कायदा बनवतानाही कायदा बनवणारयांच्या सोयीनुसार जेवढं नैसर्गिक तेव्हढंच नैसर्गिक मानलं जाणार. अमेरिकन सरकारची 'डोण्ट आस्क डोण्ट टेल'ची मुस्काटदाबी तर माहीत असेलच.
आपल्याकडे मात्र २ जुलै, २००९ च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर असं होणं खरंच दुर्दैवी आहे.
मुळातच कोणी कोणाबरोबर झोपावं ह्या इतक्या वैयक्तिक प्रश्नात सरकारने ढवळाढवळ करायची गरज नाही कारण 'व्यक्तिस्वातंत्र्य' या संज्ञेमध्ये परस्परसंमतीने 'संभोगस्वातंत्र्य' येतंच. मग तो बाईने पुरुषाबरोबर केला पाहिजे किंवा vice a versa आणि तसं झालं तरच ते नैसर्गिक असं परस्पर कोणीतरी ठरवायचं- हा शुद्ध खुळचटपणा आहे.

मुळातच ह्या माणसांना 'वेगळं' मानण्यातच discrimination आहे. त्यांना वेगळं मानलं तर ते आपल्यासारखे वाटणारच कसे? केवळ सेक्शुअल ओरिएंटेशन इतरांपेक्षा वेगळं आहे म्हणून अख्खाच्या आख्खा माणूस वेगळा काढायचा हा फंडा काही पटत नाही.

तुम्ही वर म्हणताय तशा थीम वर आणखी एक मूव्ही आहे तो म्हणजे 'ब्रोकबॅक माऊंटन'. त्यातही होमोसेक्शुअल कपलला ठेचून मारलं गेलेलं दाखवलंय. त्या दहशतीत एनिस डेल मार आणि जॅक ट्विस्ट ही दोघंही असतात. दोघेही लग्न करतात, त्यांना मुलंही होतात. पण शारिरीक ओढीचं मात्र ते काहीही करु शकत नाही, ती तशीच राहते.

आपल्याकडेही बरयाच पुस्तकांतून, नाटकांतून यांवर भाष्य केलं गेलंय.
'ड्रीम्स ऑफ तालिम'/ चेतन दातारच्या '१, माधवबाग' मध्ये समाजाच्या भीतीने नैसर्गिक प्रेरणांच्या विरुद्ध जाऊन मुलीशी लग्न करणारा तरुण आहे, 'अशी उत्तरे येती' मध्ये भावाकडून वापरला गेलेला, ब्लॅकमेल होणारा तरुण आहे, कोणाकडेही बोलायची चोरी असणारा, आतल्या आत पिचत जाणारा मुलगा आहे, सुमेध वडावला-रिसबूड यांच्या 'तृष्णा'मध्ये तर समलिंगी संबंधांवर स्ट्रेट फ्रॉम हॉर्सेस माऊथ विवेचन आहे, कुंडलकरचं 'कोबाल्ट ब्लू' आहे. खूप काही वाचण्यासारख् आहे.

शंभरातले अठ्ठ्याण्णव जण एखादी गोष्ट एक्स रितीने करतात म्हणून ती बरोबर आणि नैसर्गिक असं असायची गरज नसते. उरलेले दोघे वेगळ्या रितीने बरोबर असू शकतात. 'असंही होऊ शकतं-असू शकतं' या कल्पनेला जागा ठेवली की 'हे बरोबर आणि ते चूक' अशा प्रतवारया लावायची गरज भासणार नाही मग.

नंदन Fri, 02/03/2012 - 01:08

लेख आणि त्यावर झालेली चर्चा आवडली. विस्तृत प्रतिसादासाठी जागा राखून ठेवतो.

पुढील वाक्य मात्र खटकले -

होमोसेक्युअलिटी म्हणजे एड्सच अशीच तिची समजूत असते (आणि काही प्रमाणात ती खरी आहे),

लेखकाचा तसा उद्देश नसला, तरी हे दिशाभूल करणारे ठरू शकते.

चिंतातुर जंतू Fri, 02/03/2012 - 13:51

>>पण अनेकदा त्या त्या काळातील समाजमनाच्या ज्या मर्यादा असतात त्या विसरल्या जातात आणि सरकारवर टीका केली जाते त्याबद्दल मी बोलत होते.

>>जनमत बदलले तर सरकारला बदलावे लागेल - निदान वरवर तरी बदलावे लागेल. मला आता फक्त सतत सरकारला दोष देण्याचा कंटाळा आलाय इतकेच!!

लोकशाही म्हणजे जनमत आणि जनमत म्हणजे बहुमत असा काहीसा हा मुद्दा मला वाटला. हे मला अतिशय धोकादायक वाटतं. मुळातच कोणत्याही दृष्टीनं अल्पसंख्य असणार्‍या माणसांना जनमताचा पाठिंबा मिळेलच असं नाही. जेव्हा महात्मा फुल्यांनी स्त्रियांना शि़क्षण द्यायला सुरुवात केली तेव्हा जनमत स्त्रियांना शिक्षण देण्याच्या बाजूचं नव्हतं. अर्धी लोकसंख्या असूनही स्त्रियांना काही आवाज नव्हता म्हणून त्या अल्पमतात आणि अल्पसंख्य होत्या असं म्हणता येईल. जनमत नाही म्हणून तत्कालीन सरकारनं फुल्यांवर निर्बंध घातले की शाळा चालवू दिली, ही बाब इथे मला महत्त्वाची वाटते. ब्रिटिश सरकारऐवजी पुण्यातल्या कर्मठ ब्राह्मणांची तेव्हा सत्ता असती तर कदाचित फुल्यांना शिक्षा झाली असती. तात्पर्य काय, तर (समलैंगिकताच असं नाही) कोणत्याही मुद्द्यावर आपलं अधिकृत मत बनवताना सरकारनं (विशेषतः लोकशाही सरकारनं) निव्वळ जनमताला भिऊन अल्पसंख्य किंवा आवाज नसलेल्या जनतेच्या अहिताचे निर्णय घेतले की जगात इतरत्र काय चाललंय, शास्त्रज्ञ किंवा तज्ज्ञ काय म्हणतात याकडे लक्ष दिलं आणि एक पथदर्शी भूमिका घेतली यावर मी सरकारची गुणवत्ता ठरवतो.

आतिवास Fri, 02/03/2012 - 22:37

चिंतातुर जंतू, मूलतः आपण एकच गोष्ट बोलतो आहोत फक्त मांडण्याची पद्धत वेगवेगळी आहे असं मला वाटत. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय त्याच्याशी मी सहमत आहे असं म्हणून थांबते.