प्रश्न शौचालयांचा
अलीकडील द न्यूयॉर्क टाइम्सच्या अंकात गार्डिनर हॅरिस या पत्रकाराने भारतातील शौचालयाच्या समस्येला पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. बिहारमधील एका खेडेगावातील घटनांचा आढावा घेत असताना बालकांचे कुपोषण आणि सार्वजनिक स्वच्छता (सॅनिटेशन) यांच्यातील परस्पर संबंधावर त्यानी प्रकाश टाकला आहे. दृष्ट लागू नये म्हणून एका वर्षाच्या बाळाच्या डोळ्यात काजळ, गालावर तीट लावून मांडीवर झोपविणार्या आईला आपले बाळ कुपोषित आहे हे कसे काय लक्षात येत नाही याचे त्याला आश्चर्य वाटते.
त्या बाळाचे पालक बालसंगोपनासाठी जे काही करायला हवे ते सर्व उपाय अगदी काळजीपूर्व करत आले आहेत. आई त्या बाळाला स्तनपान करते. त्यांच्या घरात सहा शेळी व एक म्हैस असल्यामुळे ताज्या दुधाची कमतरता नाही. घरात गव्हाच्या पोत्यांची थप्पे लागलेले आहेत. बाळाला जितक्या वेळा भूक लागते तितक्या वेळा आई त्याला पाजते, खायला घालते. वर्षभरात 8-10 वेळा त्या बाळाच्या तपासणीसाठी प्राथमिक उपचार केंद्रातील डॉक्टरांच्याकडे ती जाऊनसुद्धा आली. परंतु डॉक्टरांच्या मते बाळ कुपोषित आहे. मागच्या दशकापेक्षा या दशकात राज्याचे सरासरी राहणीमान सुधारल्याचे सरकारी आकडे सांगत आहेत. गावात वीज, पाणी, रस्ते असूनसुद्धा त्या बालकावर ही स्थिती का ओढवली, हा त्याच्यासमोरचा प्रश्न आहे.
हा प्रश्न केवळ बिहारच्या खेड्यातच नव्हे तर आपल्या देशातील प्रत्येक खेड्यात विचारला जाणारा प्रश्न आहे. गेल्या 30-40 वर्षात झालेली प्रगती व आर्थिक सुबत्ता यांना वेशीवर टागणाऱे बालकुपोषण, बालमृत्यु, व खुंटत असलेली शारीरिक व मानसिक वाढ याबद्दल पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. बालमृत्युच्या तडाख्यातून वाचलेल्या बालकांचे आयुष्यच बरबाद करणार्या परिस्थितीला कोण जवाबदार आहेत, हा प्रश्न अनुत्तरितच राहत आहे.
या विषयातील काही विशेषज्ञांच्या मते दर वर्षी या बाळासारखी पाच वर्षाखालील 16 कोटी मुलं, अन्नाच्या कमतरतेमुळे किंवा उपासमारीमुळे नव्हे तर, सार्वजनिक अस्वच्छतेमुळे कुपोषित ठरत आहेत. थोडक्यात सांगायचे तर गलिच्छ व घाणीच्या (filth) साम्राज्यात ही मुलं वाढत आहेत. देशातील इतर खेड्याप्रमाणे या बाळाच्या खेड्यातसुद्धा कुटुंबासाठी स्वतंत्र वा सार्वजनिक शौचालय नाहीत. बहुतेक खेड्यात उघड्यावर शौच करणार्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेली मुलं मैलापाणीतून येणार्या रोगाणूंना बळी पडतात. कितीही सकस व भरपूर अन्न पोटात गेले तरी त्यांची शारीरिक वाढ त्यामुळे होऊ शकत नाही. अस्तित्वासाठी झगडणार्या या मुलांच्या शरीरातील ऊर्जा व पोषणमूल्ये रोगाणूंना शरीराबाहेर काढण्यातच खर्ची घातले जातात. जन्मल्यानंतरच्या पहिल्या दोन वर्षात असे घडत असल्यास कुठल्याही औषधोपचारांना न जुमानता त्यांच्या उंचीतील उणीव व बुद्धीमत्तेतील कमतरता आयुष्यभरासाठी कायम राहतात.
यापूर्वी युनिसेफ किंवा जागतिक आरोग्य संघटना बालकुपोषणावरील उपाय म्हणून सकस व भरपेट आहारावर व काही लशीकरणावर भर देत होत्या. त्यांच्या कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य वा स्वच्छतेविषयक तरतुदींचा साधा उल्लेखही नसे. परंतु अलीकडील संशोधन मात्र पोषक आहाराच्या या पूर्वीच्या कल्पनांना छेद देत आहे. याच संबंधात सब सहारन आफ्रिकेतील बालकांपेक्षा भारतातील मुलं इतके कुपोषित का हाही प्रश्न उपस्थित केला जातो.
कांगो, सोमालिया, झिंबाब्वे, बुरुंडी या आफ्रिका खंडातील देशांची गणना गरीबातील गरीब देश म्हणून केली जाते. तरीसुद्धा या देशातील मुलं तुलनेने भारतीय मुलांपेक्षा जास्त सशक्त आहेत. भारतीय व आफ्रिकन मुलांच्या उंचीची तुलना केल्यास भारतीय मुलं खुजे का आहेत या प्रश्नाचे उत्तर उघड्यावर शौचाला बसण्याच्या वृत्तीत आहे असे म्हणण्यास वाव आहे. त्याचप्रमाणे जवळ जवळ बसून शौच करण्याची पद्धत कदाचित फक्त आपल्या देशातच असावी व त्याचेही दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होत असावेत. अशा प्रकारच्या खुरटलेल्या स्थितीमुळे लाखो बालकांचा दर वर्षी मृत्यु होतो. शिवाय यातून जे जगले वाचले ते आयुष्यभर रोगिष्टावस्थेत व गरीबीत आयुष्य काढतात. यांच्यात मधुमेह, हृदयाघात व पक्षाघाताचा धोका असतो.
खेड्यातील बायका शौचास एकट्या-दुकट्याने न जाता 5-6 बायका एकाच वेळी व जवळ जवळ बसून शौच उरकतात. त्यामुळे मैलापाणी साचू लागते व रोगाणूंची बेसुमार वाढ होऊ शकते. या मैलापाणीमुळे पिकं, आहारपदार्थ, पाण्याचे श्रोत, व बालकांचे हात आरोग्यदृष्ट्या सुरक्षित राहत नाहीत. पोटात गेलेल्या बॅक्टेरियामुळे पोटाचे व आतड्याचे विकार होतात. यातून होणाऱ्या Enteropathy या आजारामुळे शरीराला पोषकमूल्ये व प्रथिनं पचन करण्याची क्षमता नष्ट होऊ लागते. आर्थिक सुबत्ता, वाढते उत्पन्न वा शासनाच्या सबसिडीमुळे मिळणारे पोषक आहार कुपोषणाला थोपवू शकत नाहीत.
आपल्या देशातील मानवी क्षमतेलाच ही खुंटलेली वाढ आव्हान ठरत आहे. काही तज्ञांच्या मते HIV/Aids पेक्षा 20 पटीने ही समस्या जास्त गंभीर आहे. त्यामुळे आपला देश बालसंगोपनाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरत आहे. सार्वजनिक स्वच्छता दुर्लक्षित राहल्यामुळे क्षयरोगासारख्या सांसर्गिक रोगांची लागवण होत आहे. व त्याचेही परिणाम बालमृत्युच्या संख्यावाढीस कारणीभूत ठरू शकते.
इतर अविकसित देशांनी यावर उपाय शोधून प्रगती करत आहेत. चीनमध्ये उघड्यावर शौच करणाऱ्याची संख्या फक्त 1 टक्का तर बांगलादेशात 3 टक्के आहे. भारतात हेच प्रमाण 50 टक्के आहे. शासनानेच बांगलादेशात संडास बांधून दिल्यामुळे उघड्यावरील शौचाचे प्रमाण भरपूर कमी झालेले आहे.
उघड्यावरील शौच ही समस्या गेली कित्येक वर्षापासून चर्चेचा विषय आहे. आपल्या देशात संडास बांधणीसाठी आपण खर्च का करावा हीच मानसिकता उघड्यावरील शौचास प्रोत्साहन देते. हिदू धर्मग्रंथानुसार घराजवळ शौचविधी निषिद्ध आहे. त्यामुळे शौचविधी घरापासून लांबच करायला हवी. ही मानसिकताच घराला लागून संडास बांधण्यास अडचणीचे ठरत असावे. परंतु 1925 साली महात्मा गांधीनी या अनिष्ट रूढीच्या विरोधात आवाज उठविला. उघड्यावर, झाडाझुडपात, कुठेही आडोश्याला शौचविधी न करता घराजवळील बंदिस्त संडासात शौच केल्यास आरोग्य रक्षण होते हा विचार त्यानी त्याकाळी मांडला होता. त्या अनुषंगाने गावात मैलापाणी वाहून नेणारी व्यवस्था, पाणी पुरवठा इत्यादी गोष्टींची गरजही त्यानी अधोरेखित केली होती. शौचाबरोरबरच उघड्यावर आंघोळ हेसुद्धा आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी वेळ लागतो व रोगाणूंची वाढ होत राहते.
भारतीय प्रशासनसुद्धा संडास बांधणीसाठी भरपूर सबसिडी देते. तरीसुद्धा सबसिडीचा वापर प्रत्यक्षात संडासांच्या बांधणीसाठी व (चुकून) बांधल्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांकडून त्याचा दैनंदिन वापर यांची अजिबात खात्री नाही. बालकुपोषण टाळण्यासाठी शासन सकस आहार वा सर्वांसाठी आहार अशा योजना राबवत असले तरी ही खुरटलेली वाढ या योजनांना सपशेल बाद ठरवित आहे. टोकाच्या दारिद्र्यामुळे कुपोषण, बालमृत्यु होतात याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु या उपासमारीबरोबरच सार्वजनिक अस्वच्छतासुद्धा तितकीच कारणीभूत ठरत आहे. दारिद्र्य निर्मूलनावरील उपायाबरोबरच सार्वजनिक अस्वच्छतेविषयी घृणा उत्पन्न होणे व त्यासंबंधी कार्यप्रवण होणे हेसुद्धा अत्यंत गरजेचे आहे.
बांगलादेश किंवा झिंबाब्वेसारख्या देशाबरोबर आपल्या देशाच्या तुलनात्मक आकडेवारीवर समाधान न मानता या गलिच्छ वातावरणातून बालकांना बाहेर काढण्यास अग्रक्रम देण्याची गरज आहे. केवळ लशीकरणातून वा वैयक्तिक वैद्यकीय उपचारातून कुपोषण शून्यावर येणार नाही. खरे पाहता युरोप वा अमेरिकेतील 19व्या व 20 व्या शतकात स्वच्छतेविषयक उपायामुळे कुपोषण, रोगराई यांचे निर्मूलन शक्य झाले. त्याकाळी लशीकरणही नव्हते किंवा अँटिबायोटिक्सचा माराही होत नव्हता. तरीसुद्धा बालकांची वाढ व्यवस्थितणे या देशात होत होती.
दारिद्र्यातून बाहेर पडत असतानाच बंदिस्त शौचालय व सांडपाण्याची निचरा करणारी व्यवस्था व त्यातून उद्भवणारे स्वच्छ वातावरणच बालकांना अकाली मृत्युपासून वाचवू शकते, व मोठेपणी त्यांच्या उंचीत व बुद्धीमत्तेत वाढ करू शकते.
माहितीमधल्या टर्म्स
जोपर्यंत शौचालय चळवळ होत नाही
जोपर्यंत शौचालय चळवळ होत नाही तोपर्यंत हे प्रश्न अत्यंत मंदगतीने सुटणार.दै. सकाळ याबाबत नेहमी हे प्रश्न मांडत असतो. लेखकाचा उपक्रमावरील गेट्स फौंडेशनचा पुढाकार: संडास सुधार संशोधन हा लेख यानिमित वाचावा. मायबोली वर स्वच्छतेच्या बैलाला.....! हा लेख देखील संवेदनशील आहे.
विकसित देशात सार्वजनिक जीवनात पुरेशी व वापरण्यायोग्य स्वच्छतागृहे असणे हे गांभीर्याने घेतले जाते.माझ्या मते स्वच्छतागृह हा हक्क असला पाहिजे. एखाद्या संस्थेचे/कार्यालयाचे मूल्यमापन करायचे असेल तर तेथील सार्वजनिक स्वच्छतागृहास भेट द्या त्यावरुन त्या संस्थेची लायकी समजते.
धर्मसिंधू या ग्रंथातील उल्लेख
अनमोल प्रकाशनाने छापलेल्या 'धर्मसिंधू' या पुस्तकातील आता मूत्रपुरिषोत्सर्गादिविधि सांगतो (पा.. ४९८) या परिच्छेदाप्रमाणे मार्ग, जल, देवालयसंबंधी स्थल, नदीचे तीर इत्यादिक स्थली मलोत्सर्ग (मलत्याग) करू नये. अधिक जागा असल्यास मूत्रोत्सर्ग करणे तो तलाव इत्यादिक जलाशयापासून १२ किंवा १६ हात जागा सोडून करावा. मलोत्सर्ग करणे तो मूत्रोत्सर्गाच्या चतुर्गुणित जागा सोडून करावा. ..... इत्यादी गंमतीशीर उल्लेख आहेत. गंमत म्हणजे मलोत्सर्गाविषयी शुद्धीबद्दल सांगताना मृत्तिका व जल यांचा किती व केव्हा वापर करावा हेही त्यात सुचवले आहे. ते सर्व मुळातूनच वाचायला हवे. यावरून उघड्यावर शौच करण्यास धर्मसंमती होती असे अनुमान काढता येईल. कदाचित घरोघरी कुठल्याना कुठल्या तरी स्वरूपात जलस्रोत असल्यामुळे जलस्रोतापासून (जास्तीत जास्त) लांब जाऊन मलोत्सर्ग करण्याचा परिपाठ पडला असावा. जाणकार याविषयी नक्कीच जास्त सांगू शकतील.
हरप्पा - मोहेंजोदारो संस्कृतीच्या कालखंडात शौचालय व मलनिःसारणाची सोय होती, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. परंतु त्यानंतरच्या आर्य काळातील मनुस्मृतीच्या चौकटीतील समाजात ती पद्धत नष्ट झाली व धर्मसिंधूच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यास समाजाला भाग पाडले.
वापर का नाही?
एक तर घरात संडास ही कल्पनाच धार्मिक कारणांमुळे पचनी पडण्यासारखी नाही. 'बहिर्दिशेला जाणे' हेच नाव जिथे या क्रियेसाठी वापरले जाते, तिथे 'दिशा' बदलण्याचे हे काम कठिणच आहे. दुसरे म्हणजे आपल्या पद्धतीनुसार आपण स्वच्छतेसाठी पाण्याचा वापर करतो. फ्लशसाठी भरपूर पाण्याची आवश्यकता असते. जिथे पिण्याच्या पाण्याची मारामार तिथे स्वच्छतेसाठी पाणी कुठून आणणार? सौरपॅनेल्सद्वारे मैला जाळणे अथवा अगदी कोरडा, दुर्गंधरहित करणे हा उपाय कोणीतरी सुचवल्याचे आठवते. तिसरी सगळ्यात महत्त्वाची आडकाठी ठरणारी गोष्ट म्हणजे हे संडास स्वच्छ कुणी करायचे? हे काम परंपरेने एका जातीकडे आहे किंवा त्यांनीच ते करावे अशी अपेक्षा आहे. घरातली माणसे हे काम अजिबात करू इच्छीत नाहीत. आणखी म्हणजे जेमतेम उपलब्ध होणार्या दीडखण जागेमध्ये संडासासाठी जागा सोडणे परवडणारे नाही. वारंवार करावी लागणारी देखभाल(जिची आम्हांला अगदीच सवय नाही, एकदा काय ते बांधकाम करायचे आणि वर्षानुवर्षे ते सडू द्यायचे ही आमची वृत्ती) हाही एक अडसर आहे. शोषखड्ड्यांसाठी योग्य तंत्रज्ञानाचा अभाव अथवा ते राबवण्यातली बेफिकिरी आणि भ्रष्टाचार हाही अडथळा आहेच.
तिसरी सगळ्यात महत्त्वाची
तिसरी सगळ्यात महत्त्वाची आडकाठी ठरणारी गोष्ट म्हणजे हे संडास स्वच्छ कुणी करायचे? हे काम परंपरेने एका जातीकडे आहे किंवा त्यांनीच ते करावे अशी अपेक्षा आहे.
अगदी बरोबर आहे. ही आडकाठी आहे हे व्यक्तिगत अनुभवातून* कळले होते आणि तेव्हा पासून अक्षरशः भारतातील घाणीचे चित्र कधी बदलणार हा प्रश्न पडेनासा झाला.
*नव्या जागी रहायला गेल्यावर मोलकरीण/स्वैपाकीण हवी का वगैरे विचारणा सुरू होते. तसेच गेल्यावर्षी झाले. दरवेळ प्रमाणे सगळ्यांना आम्ही नाही म्हणत राहिलो. तरी एक
मोलकरीण मला लिफ्टमध्ये भेटली आणि ती 'बाई लागतच नाही' असे कसे वगैरे म्हणू लागली. पुढे ती म्हणाली 'बाई नाही...मग टॉयलेट कोण साफ करते?' तेव्हा अर्थातच
तिला म्हटले मी किंवा घरातलेच लोक करतो साफ. तिने विचित्रच नजरेने मला पाहिले आणि तिचा मजला आल्याने ती लिफ्ट्बाहेर पडली. पण तिच्या प्रश्नाने माझे भारतातील अस्वच्छतेबद्द्लचे
प्रश्न सुटले.
वारीच्या काळात एका
वारीच्या काळात एका स्नेह्यांनी सांगितलेला किस्सा. वारीच्या वाटेवर एका शेतकरी बाईने वारकर्यांच्या सोयी साठी एक चर खांडुन आडोसा करुन आपल्या शेतात शौचालय केली होती. वारकर्यांना इकडे या असे करुन आवाहन करत होती त्यांची चहापाण्याची व्यवस्थाही केली होती. तिला जेव्हा स्नेह्यांनी विचारले तेव्हा ती म्हणाली जेवढे लोक जास्त येतील तेवढे आमचे सोनखत तयार होते व पीक चांगले येते. त्यातला काही भाग हा मी वारकर्यांसाठी खर्च करते. त्यांच्यामुळेच पीक चांगले येते ना.
रोचक लेखन. हा अतिमहत्त्वाचा
रोचक लेखन. हा अतिमहत्त्वाचा विषय आहे. युरोप अमेरिकेशी तुलना न करता चीन बांगलादेशशी तुलना केली हे सुयोग्य आहे. या पार्श्वभूमीवर भारत फारच मागे आहे खास. तरी परिस्थिती हळूहळू का होईना, सुधारत आहे. याबद्दल मी मागे उद्धृत केलेला टॉयलेट मॅप ऑफ इंडिया इथे पुन्हा देतो. तालुका लेव्हलचा मॅप आहे.
http://datastories.in/blog/2013/09/09/a-toilet-map-of-india-2/
मिरज तालुक्यात २००१ मध्ये ५०.६% घरांत टॉयलेट्स होती, आता २०११ मध्ये ७१.६% घरांत आहेत. जनरल इम्प्रूव्हमेंट सगळीकडेच होताना दिसत आहे. २०११ मध्ये ४७% घरांना टॉयलेट्स असल्याचे दिसते, २००१ मधल्या ३६% वरून ही सुधारणा झालेली आहे. मनावर घेतलं तर १० वर्षांत ४७% वरून ६०-७०% पर्यंतही जायला अडचण असू नये.
नाही, इतकीही वाढ नाहीये.
नाही, इतकीही वाढ नाहीये.
२००१ साली १.०२१ बिलियन तर
२०११ साली १.२१ बिलियन
इतकी पॉप्युलेषन होती, सबब २००१ सालचे ६०% म्हंजे ६०० लोक असले तर २००१ सालचे ६०% म्हंजे ७२० लोक आहेत. टोटल नं. ऑफ हौसहोल्ड्स फॉर २००१ आणि २०११ दिली तर त्यावरूनही अॅब्सोल्यूट नंबर ऑफ हौसहोल्ड्स विथ टॉयलेट्स हे वाढल्याचे अन विथौट टॉयलेट घटल्याचे दिसून येईल. मुख्य म्ह. लोकसंख्येतली वाढ अन नं. ऑफ हौसहोल्डातली वाढ तुलून पाहता निव्वळ नं. ऑफ हौसहोल्ड फार कै वाढले असतील असे वाटत नाही. पण पाहिले पाहिजे, यावच्छक्य पाहून सांगतो.
जिवनमान
उंचावलेल्या जिवनमानात मुलभुत स्वच्छतेच्या गरजा आपोआप भागतात असे निरिक्षण आपले सगळ्यांचे नाही काय? तसे नसल्यास सार्वजनिक सुविधा एका मर्यादेपलिकडे फारसे काही साध्य करु शकतील असे वाटत नाही.
रोजगार नाही पण स्वच्छतेच्या अपेक्षापुर्तींच्या सुविधासांठी किती गुंतवणूक योग्य असेल? शौचालयांचा अभाव नक्की कोणत्या आजारांचे मुळ आहे आणि त्यांचा सांख्यकी विदा उपलब्ध आहे काय?
हायजीन हायपोथेसिस? In
In medicine, the hygiene hypothesis is a hypothesis that states that a lack of early childhood exposure to infectious agents, symbiotic microorganisms (e.g., gut flora or probiotics), and parasites increases susceptibility to allergic diseases by suppressing the natural development of the immune system. In particular, the lack of exposure is thought to lead to defects in the establishment of immune tolerance.
लेख आवडला. दोनेक वर्षांपूर्वी
लेख आवडला. दोनेक वर्षांपूर्वी अशाच अर्थाचा एक लेख वाचला होता. त्यात त्यांनी अस्वच्छतेमुळे पसरणारे रोगजंतू, जंतूंचा प्रसार हवेवाटे होत असल्यामुळे फक्त गरीबांनाच नव्हे, मध्यमवर्गीय आणि श्रीमंतांच्या मुलांनाही होणारा त्याचा त्रास याकडे लक्ष वेधून घेतलं होतं. (आम्हाला काय त्याचं, म्हणत कोणीही हस्तिदंती मनोऱ्यात राहू शकत नाही.)
अर्थमंत्र्यांनीही येत्या पाच वर्षांत घरोघरी संडास बांधण्यावर भर दिला आहे ही गोष्ट आशादायक आहे.
सार्वजनिक शरमेची गोष्ट
संजय पवार यांचा या विषयावरील लेख
http://www.loksatta.com/lokrang-news/lack-of-toilets-social-shame-for-i…
उत्तम लेखन! अनेक आभार!
उत्तम लेखन! अनेक आभार!