चळवळी : अशाश्वतांच्या तलवारी
चळवळी : अशाश्वतांच्या तलवारी
लेखक - राजेश घासकडवी
या जगण्यांतुन या मरणांतुन
हसण्यांतुन अन रडण्यांतुन या
अशाश्वताच्या मुठी वळूनी
अपाप चढतिल वरती बाह्या
अखेर घेता टक्कर जरि मग
युगायुगांचा फुटेल भाल
अशाश्वताच्या तलवारीवर
शाश्वताचिही तुटेल ढाल
- बा. सी. मर्ढेकर
आपण सगळेच इतिहास शिकतो. आपले पूर्वज कोण होते? ज्याला आपण आपली भूमी म्हणतो तिथे काय घडले? आणि आत्ता आपल्या आसपास जी परिस्थिती दिसते ती कशी निर्माण झाली? या सगळ्यांची सांगड लागावी, पूर्वीच्या चुकांतून लागलेल्या ठेचा, जखमा तपासून पाहून आज शहाणे व्हावे आणि त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टींचे धडे गिरवून ते समाजाचरणात आणावे हे मुख्य उद्देश. प्रत्येक रूढीला, परंपरेला इतिहास असतो. धर्माला, समाजाला इतिहास असतो. हिंसेला इतिहास असतो, शोषणाला इतिहास असतो. पण इतिहासाला मर्यादा असतात. काळात जितके मागे जावे तितके दिसणारे चित्र अंधारमय होते. अनेक खुणा, पुरावे काळाच्या ओघात नष्ट झालेले दिसतात. स्पष्ट प्रकाश असणारे कोनाडे फक्त राजेरजवाड्यांच्या बखरकारांकडे सापडतात. तिथे जे धूसर तुकडे हातात येतात त्यातून केवळ युद्धांचा, राज्यबदलांचा, कटांचा, राजांच्या कर्तृत्वांचा आणि त्यांच्या विक्षिप्तपणाचा इतिहास हाती लागतो. पण हा पूर्ण इतिहास नव्हे.
खरा इतिहास जाणून घ्यायचा झाला, तर राजांच्या महालांतून खाली उतरून सामान्य समाजात शिरावे लागते. ज्याला राजधानीत राजा बदलला म्हणून काहीही फरक पडत नाही, किंबहुना ज्याला राजधानी कुठची हेही माहीत नसेल, अशा सामान्य माणसाला पडणारे प्रश्न, त्याचे जीवन नियंत्रित करणाऱ्या सामाजिक शक्ती, आणि त्यातून आपले जीवन सुधारण्यासाठी त्याने दिलेला लढा हा खरा इतिहास. मर्ढेकरांनी ज्याला 'या जगण्यांतून या मरणांतून ... युगायुगांचा फुटेल भाल' म्हटलं, त्या जगण्यांची आणि मरणांची कथा म्हणजे इतिहास. या कथेत घडणारे बदल म्हणजे इतिहास. हे बदल घडले. पण थोडेफार मागे गेले की त्यांचा इतिहास दिसत नाही.
इतिहासातून नजर काढून आसपास फिरवली तर बदल हा आजच्या जीवनाचा स्थायिभाव झालेला दिसतो. अनेक वेळा भीती वाटावी या गतीने बदल होत आहेत. भारतीय समाजच गेल्या पंचाहत्तर वर्षांत स्वातंत्र्य चळवळ, हरित क्रांती, धवल क्रांती, इंटरनेट क्रांती, मोबाइल क्रांती अशा अनेक बदलांतून गेलेला आहे. पण कोणे एके काळी ही परिस्थिती नव्हती. 'ठेविले अनंते तैसेचि राहावे' हा अपरिहार्यतेतून आलेला मूलमंत्र होता. सशक्त जातिव्यवस्था, कट्टर वर्णव्यवस्था आणि न तोडता येणारी सरंजामशाही यांमुळे बदल जवळपास अशक्य होते. तरीही अन्यायाविरुद्ध लढे झाले, प्रगतीची लहान लहान पावले उचलली गेली. यात लढ्यांची शिंगे फुंकणार्यांची नावे माहीत नाहीत. त्यांच्या चळवळींचे स्वरूप ठाऊक नाही. इतिहासाच्या अंधारात ते लुप्त झाले. पण परिस्थिती बदलली खरी. ब्रिटिशांच्या काळात सुशिक्षित वर्गाला भारताबाहेरचे जग दिसले. तिथल्या लढ्यांची, चळवळींची आणि त्यांतून मिळालेल्या हक्कांची ओळख झाली. त्यांनी याबद्दल लोकांना सांगितले, आणि लोकांमध्येही आत्तापर्यंत जे काही वाईट चालले आहे ते बदलावे, अशी इच्छा निर्माण झाली. आधुनिक संघटित चळवळी उगवण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली.
भारतभर चालू असलेल्या स्वातंत्र्य चळवळीला १९४७ साली यश आले. स्वातंत्र्य मिळाले. 'आधी स्वातंत्र्य मिळवू मग समाज बदलू' असे म्हणणाऱ्या टिळकांच्या मृत्यूनंतर २७ वर्षांनी राज्य तर हाती आले, पण या खंडप्राय देशासमोरचे प्रश्न अर्थातच एका फटक्यात सुटणार नव्हते. दारिद्र्य, अज्ञान, अन्नतुटवडा यांबरोबर अनेक त्याज्य परंपरा, शोषण यांपासून मुक्तता मिळवायची, तर स्वस्थ बसून चालणार नव्हते. हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक गटाने आपापल्या संघटना उभारल्या, आणि चळवळी सुरू झाल्या. दलित चळवळ, कामगार चळवळ, स्त्री-मुक्ती अशा अनेक प्रश्नांसाठी संघटित प्रयत्न सुरू झाले. या चळवळींशिवाय लोकशाही कुचकामी होती. कारण शाश्वताची ढाल तशीच मजबूत होती. निव्वळ राज्यपद्धतीत बदल घडून समाजव्यवस्थेवर तितकासा परिणाम होणार नव्हता. त्यासाठी चळवळींच्या तलवारी उपसण्याची गरज होती.
या वर्षीचा 'ऐसी अक्षरे'चा दिवाळी अंक अशाच चळवळींना समर्पित आहे. स्वातंत्र्यानंतरच्या साठ-सत्तर वर्षांच्या चळवळींचा नुसता आढावा घेणे, हेही महाप्रचंड काम आहे. त्यातल्या कुठच्याही एका चळवळीवर लक्ष केंद्रित करायचे झाले तरीही ते काही लेखांत करणे शक्य नाही. म्हणून विशिष्ट चळवळींचा अभ्यास मांडण्याऐवजी 'चळवळींचा जीवनक्रम' या विषयाबद्दल लिखाण सादर करायचे ठरवले आहे. या अशाश्वतांच्या तलवारी कोणत्या पोलादाच्या बनतात, त्यांना सैन्यबळ कधी मिळते, त्या तेजाने तळपतील की गंजून जातील हे कसे ठरते, आणि त्या म्यान करण्याची अथवा संग्रहालयात ठेवण्याची वेळ केव्हा येते - अशा प्रश्नांचा ऊहापोह करण्याचा इथे हेतू आहे. चळवळींचा जन्म कसा होतो, त्या कशा फोफावतात, कधी यशस्वी होतात वा विरून जातात, त्यांची गरज किंवा कार्यशक्ती कधी संपते याचा अभ्यास करायचा तर त्यांकडे विविध दृष्टिकोनांतून पाहायला हवे. असे विविध पैलू विविध कोनांतून मांडण्याचा इथे प्रयत्न आहे.
चळवळी कुठल्याच पोकळीत निर्माण होत नाहीत. समाज, परिस्थिती, तंत्रज्ञान, मूल्ये अशा अनेक घटकांच्या ताण्याबाण्यांतून त्या जन्मतात, वाढतात. आनंद करंदीकरांच्या लेखातून चळवळी जगण्यासाठी, त्या यशस्वी होण्यासाठी कुठचे घटक कारणीभूत ठरतात याची एका व्यापक बैठकीतून केलेली मांडणी आहे. ही मांडणी समजावून देण्यासाठी त्यांनी कमीअधिक प्रमाणात यशस्वी आणि अयशस्वी ठरलेल्या चळवळींची उदाहरणे दिल्यामुळे त्यांची मांडणी निव्वळ हस्तिदंती मनोऱ्यातली न राहता जमिनीवर घडणाऱ्या घटनांशी सांगड घालते. चळवळींचा पाया असलेल्या विचारप्रणालींमध्ये परिस्थितीनुसार बदल करणे, हीदेखील एक वैचारिक चळवळ असते. मिलिंद मुरुगकरांच्या लेखातून डाव्या आदर्शवादाची गेल्या पस्तीस वर्षांत झालेली पडझड आणि ती सावरण्यासाठी काय करावे, याबद्दल टिप्पणी आहे. प्रतिमा परदेशी स्त्रीवादाची पुरुषप्रधान चौकटीतली मांडणी आणि त्यापेक्षा व्यापक मानवतेची चौकट वापरून केलेली मांडणी यांतला फरक स्पष्ट करतात. चळवळी शेवटी माणसांनी बनतात. मुग्धा कर्णिकांच्या लेखातून एका कार्यकर्तीची - चळवळीच्या मूलभूत एककाची - तिच्या स्वत:त होणाऱ्या वैचारिक बदलातून चळवळीबाबतची तिची दिशा कशी बदलली गेली, याचे चित्रण दिसून येते; तर त्याच वैयक्तिक पातळीवर एकाच चळवळीशी संलग्न असलेल्या विभिन्न संस्थांमधल्या विभिन्न व्यक्तींशी येणाऱ्या संबंधांची आणि संघर्षांची माहिती दीपक पवारांच्या लेखात येते. चळवळी माणसांनी बनलेल्या असतात, तशाच त्या माणसांच्याच समाजाच्या पार्श्वभूमीवर जन्मतात, मूळ धरतात, फोफावतात. समाजपरिस्थितीची जमीन चळवळींसाठी पोषक नसेल तर त्यांची रोपे तग धरू शकत नाहीत. गिरीश कुबेर, हेमंत कर्णिक यांनी महाराष्ट्रातली सद्यस्थिती ही चळवळींची वाढ होण्यासाठी कशी मारक आहे हे सांगितले आहे. या चळवळींचे कार्य चालते, ते अशाच माणसांनी बांधलेल्या संघटनांतून. अशा संघटना कशा तग धरतात, स्वतःला कशा बदलतात, कुठच्या जमिनीत मुळे पसरवतात याची चर्चा द्वादशीकरांच्या लेखात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उदाहरण देऊन केलेली आहे. तर ''एक नंबर'ची गोष्ट' हा लेख, नुकतीच जन्मणारी 'राइट टु पी' चळवळ व्यापक होण्यासाठी काय घडते आहे याची कथा तिच्या संस्थापकांच्या वैयक्तिक हृद्य कथेसोबत मांडतो. त्याशिवाय सुनील तांबे, राजीव साने, संजीव खांडेकर अशा मान्यवरांचे विचारही वाचायला मिळतील.
अंकात असलेल्या चळवळविषयक काही लेखांची ही ओळख वाचून एकंदरीत लिखाणाच्या व्याप्तीचा अंदाज यावा. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. तिची वैचारिक बैठक आपल्या बैठकीशी जुळेलच असे नाही. पण या सर्वच लेखकांना आपापल्या जागेवरून जे तुकडे दिसतात त्यांचे एक मनस्वी कोलाज तयार होते, याबाबत आमची खात्री आहे. या तुकड्यांतून वाचकाचा दृष्टिकोन समृद्ध व्हावा, सध्याच्या समाजातल्या प्रश्नांची जाण यावी आणि पुढे काय आणि कसे या प्रश्नांच्या उत्तरांच्या दिशा स्पष्ट व्हाव्यात, ही आमची मनोमन इच्छा आहे. तुम्हांला या लेखांतून काय गवसले याबद्दल भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती.
प्रतिक्रिया
व्वा, उल्लेखनीय लिखाण झालंय हे
'संपादकीय ' मस्त जमलंय. व्वा! पहिले दोन परिच्छेद विशेष आवडले. "
" या ओळी वाचल्यावर झर्र्कन डोळ्यांपुढे आला तो 'सिंहासन' मधला निळू फुलेंचा पत्रकार; सलूनच्या खुर्चीत बसताना 'केशकाराचं' राजकीय परिस्थितीवरचं तावातावाने केलेलं भाष्य ऐकून थोडं विषादपूर्वक हसत "मुख्यमंत्री कोण आहे याने तुम्हाला-आम्हाला काय फरक पडतो? पडतो का?" विचारणारा.
दिवाळी अंकासाठी मेहेनत घेणार्या, काम करणार्या चमूला, घरचे/दारचे उद्योग संभाळून निव्वळ आंतरीक ओढीपोटी या म्हारक्या करणार्या चमूला विशेष धन्यवाद....
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
+१
असेच म्हणतो. अनेक धन्यवाद
प्रश्न .... अनुक्रमणिकेत
प्रश्न ....
अनुक्रमणिकेत लेखांच्या नावांवर हायपरलिंका नाहीत. लेखकांच्या नावावर आहेत. तिथे क्लिक केल्यावर लेखकाच्या प्रोफाइलवर जायला होते.
अनुक्रमणिकेतून लेखावर कसे जायचे?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
उत्तर
जसजसे लेख प्रकाशित होत जातील तसतसे लेखांच्या लिंका अनुक्रमणिकेवर मिळातील तसेच मुख्य ट्रॅकरवरही दिसतील.
तुर्तास, ऋणनिर्देश, संपादकीय, आदुबाळ व श्री नानावटी यांचे लेख प्रकाशित झाले आहेत व ते अनुक्रमणिकेवरही उपलब्ध आहेत.
तोवर अनुक्रमणिकेत या अंकात काय वाचायला मिळेल /आगामी लेखनाची कल्पना यावी म्हणून शीर्षके दिली आहेत.
गेल्या वेळेप्रमाणे याही वर्षी, दिवाळीच्या दिवसापर्यंत टप्प्याटप्प्याने अंक प्रकाशित होईल.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ओके
ओह... ओके
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षीही
गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षीही दिवाळी अंकाचं प्रकाशन आम्ही टप्प्याटप्प्यात करत आहोत. त्यामुळे दररोज दोन ते चार लेख प्रसिद्ध होतील. जसजसे लेख प्रसिद्ध होतील तसतसे आम्ही त्या त्या लेखाच्या लिंका सक्रिय करू. उदा. आज प्रसिद्ध झालेले लेख - ऋणनिर्देश, संपादकीय, आनंद करंदीकरांचा लेख, दोनशेत्रेसष्ठ ही कथा आणि शिसपेन्सिलची कुळकथा या लेखांच्या लिंकांवर क्लिक करून त्या लेखांवर जाता येईल.
छान आहे संपादकीय. एकंदर हा
छान आहे संपादकीय. एकंदर हा अंकदेखील 'उच्च' असणार हे जाणवतेय .
+
आवडले. लेखकांची नावे पाहून उत्सुकता वाढली आहे.
कवितेची निवड करूनच अर्धी बाजी
कवितेची निवड करूनच अर्धी बाजी जिंकली आहे, असं म्हटलं तर पुढच्या ओघवत्या संपादकीयावर अन्याय होईल! संपादकीय आवडलं. मात्र मुखपृष्ठाला दाद द्यायला जागा न ठेवल्याबद्दल संपादकांचा घोर निषेध. बोलकं आणि देखणं आहे मुखपृष्ठ. अमुकरावांचं अभिनंदन.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
पीडीएफ उतरवून घेता येत नाहिये.
पीडीएफ उतरवून घेता येत नाहिये. काही मदत मिळेल काय ?
दरवर्षीप्रमाणे, संपूर्ण अंक
दरवर्षीप्रमाणे, संपूर्ण अंक प्रकाशित झाला की पूर्ण दिवाळी अंकाची पीडीएफ, यथाशक्ती लवकरात लवकर, उपलब्ध करून दिली जाईल.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
विनोदी लेखांची आतुरतेने वाट
विनोदी लेखांची आतुरतेने वाट पहात आहोत.
संपादकीय आवडलं. विषय विचार
संपादकीय आवडलं. विषय विचार करायला लावणारा आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
प्रत्येक व्यक्ती वेगळी असते.
वा! आवडले.
उत्सुक
संपादकीय प्रास्तावीकाने अंकाबद्दलची उत्सुकता वाढवली आहे, लेख आणि लेखकांची/लेखिकांची सुचीही उत्सुकता वाढवणारी.
-Nile
इतिहासाचा अपुरेपणा
<अनेक खुणा, पुरावे काळाच्या ओघात नष्ट झालेले दिसतात. स्पष्ट प्रकाश असणारे कोनाडे फक्त राजेरजवाड्यांच्या बखरकारांकडे सापडतात. तिथे जे धूसर तुकडे हातात येतात त्यातून केवळ युद्धांचा, राज्यबदलांचा, कटांचा, राजांच्या कर्तृत्वांचा आणि त्यांच्या विक्षिप्तपणाचा इतिहास हाती लागतो. पण हा पूर्ण इतिहास नव्हे.>
ह्या संदर्भात इतिहासाचार्य राजवाडे ह्यांनी लिहिलेले कोठेतरी वाचले होते त्याची आठवण झाली. इतिहास म्हणजे काय अशी चर्चा करतांना त्यांनी असे काहीसे म्हटले होते की राजे-सरदारांच्या लढायांच्या आणि उन्नति-अवनतीच्या जन्त्र्या म्हणजे इतिहास नव्हे. अशा लढायांतून राजे आणि त्यांच्या जवळचे काही हसतात आणि काही रडतात कारण त्यांमधून त्यांनाच काही लाभ मिळतो किंवा ते काही गमावतात. सर्वसामान्य शेतकर्याला आणि गावकर्याला त्याचे काहीच सुखदु:ख नसते कारण राजा कोणीहि असला तरी त्याची दैन्यावस्था तीच ती राहणार असते. स्वतःच्या राजाचे किंवा शत्रूचे सैनिक आणि त्यांचे घोडे त्याच्या शेतात शिरून तीच नासधूस करणार असतात आणि स्वकीय-परकीय असा भेदभाव न दाखवता त्याला नागवणार असतात.
जुन्या मराठी कागदपत्रांमध्ये आपल्याच सैनिकांनी शेतात घोडे घालून पिके खराब केली आणि जुलमाने बाजारातून वस्तु ओरबाडल्या अशा तक्रारी अनेकदा वाचायला मिळतात .
पुर्ण अंकाच्या
पुर्ण अंकाच्या दर्जेदारपणाबद्द्ल खात्री देणारे उत्तम संपादकीय. चळवळींसाठीचा "अशाश्वतांच्या तलवारी " हा शब्द आणि त्यामागचा विचार आवडला.
प्रवाही!
संपादकीयातून लेखांचाच नव्हे, तर बर्याच चळवळींचाही आढावा घ्यायचा असूनही ते तुटक न होता, अतिशय प्रवाही झालंय, म्हणून अभिनंदन. मुखपृष्ठाबद्द्ल मेघनाशी सहमत आहे. इतक्या सुंदर मुखपृष्ठावर सुद्धा प्रतिक्रीया देण्यासाठी एक चौकोन असायला हवा होता!
दिवाळी आणि हिवाळ्यात वेळ काढणंच होत नव्हतं, पण आता अख्खा अंक कधी वाचून पालथा घालत्येय असं झालंय.