ज्याचा त्याचा प्रश्न

श्रीयुत रामचंद्र कलगुटकर हे पक्के शाकाहारी. गेली 50 वर्षे ते घास फूस खाऊनच – तरी धडधाकट – जीवन जगत आहेत. कुठलेही शारीरिक तक्रारी नाहीत. त्यांचा शाकाहार म्हणजे अगदी टोकाचा शाकाहार असे म्हणता येईल. दूध वा दुग्धजन्य पदार्थसुद्धा वर्ज्य. त्यांची शाकाहारावरील ही निष्ठा काही काही वेळा घरातल्यांना अडचणीचे ठरत होते. तरीसुद्धा मुकाटपणे ते सहन करीत.

खरे पाहता भोवतीच्या चंगळवादी वातावरणात यांचा शाकाहार थट्टेचा विषय झाला होता. त्यांचे सहकारी, मित्र मंडळीच नव्हे तर त्यांची मुलं, सुना, नातवंड हेसुद्धा मांसाहाराची मजा घेत होते. केएफसी, मॅक्डोनाल्ड्स, पंजाबी रेस्टॉरंट्स, हायवे वरील धाबे त्यांना खुणावत असत. केएफसीमधील चिकन चार्जर, चिकन बकेट, हॉट विंग बकेट, चिकन स्ट्रिप्स, धाब्यातील चिकन बंजारा, चिकन कोल्हापुरी (पांढरा/तांबडा रस्सा), चिकन मालवणी, चिकन हंडी इत्यादी पदार्थांची चर्चा होत असताना व ऐकत असताना आपलही काही तरी चुकत आहे की काय असे काही काही वेळा त्यांना वाटत होते. तोंडात पाणी सुटत असले तरी मनाची समजूत घालत शाकाहारी आयुष्य जगत होते.

एके दिवशी त्यांच्या मित्रानी अगदी आग्रह करून त्यांना एका पोल्ट्री फार्मला घेऊन गेला. जनुक सुधारित कोंबड्यांची पैदास तेथे केली जात होती. फार्ममध्ये अत्याधुनिक यंत्रणा होती. सर्व काही स्वयंचलित. एखाद्या CNC मशीनिंग सेंटरसारखे तिथले वातावरण होते. एकदम टापटिप, स्वच्छ. धुळीचा एक कणसुद्धा सापडणार नाही. हवा, पाणी, उजेड व खाद्यान्न यांची योग्य प्रमाणात सोय केलेली असल्यामुळे फार्ममधील कोंबड्या प्रसन्न वातावरणात (काही दिवसापुरते असले तरी!) वाढत होत्या. पिंजऱ्याच्या बाहेर जावे, वा आपल्या पिलावळांना जवळ घ्यावे वा आपणच घातलेल्या अंड्यांना ऊब देवून पिल्लं बाहेर काढावीत असले कुठल्याही प्रकारच्या संवेदनांचा मागमूस तेथे त्यांना दिसला नाही. त्यांची हत्या करून ब्रॉयलरच्या स्वरूपात पॅकिंग करतानासुद्धा कुठेही किळसवाणा प्रकार दिसला नाही. त्यामुळे आपण ज्या प्रकारे शेतात गाजर, काकडी पिकवतो आणि नंतर तुकडे करून खातो तसाच काहिसा प्रकार या फार्ममधील कोंबड्यांच्या बाबतीत घडत असावा असे त्यांना वाटू लागले. जणू काही कोंबड्या त्यांना मला खा म्हणून खुणावत आहेत की काय असे त्यांना वाटत होते. त्यामुळे कलगुटकर यांना भाजी वा चिकनमध्ये तसा फरक नाही याचा ‘साक्षात्कार ’ झाला. फार्ममधून प्रसन्न चित्ताने ते बाहेर पडले. या भेटीनंतर शाकाहारासंबंधीची त्यांची मानसिकता हळू हळू बदलू लागली. शाकाहारावरील निष्ठा ढळू लागली. इतके दिवस जपून (कुरवाळून!) ठेवलेल्या आपल्या शाकाहारावरील तत्वनिष्ठेचे ते पुनर्विचार करू लागले.

त्या दिवशी त्यांच्या प्लेटमध्ये चिकन मालवणी होती. त्यांना पोल्ट्री फार्मची आठवण झाली. फार्ममध्ये प्रत्यक्ष पाहिलेली कोंबडी हीच तर नाही ना असा विचार त्यांच्या मनात आला. बघता बघता स्वतःबद्दल घृणा उत्पन्न झाली. आयुष्यभर शाकाहारी होतो व आता जिभेचे चोचले पुरवण्यासाठी शाकाहारावरील निष्ठा त्याज्य करणे कसे तरी वाटू लागले. तरीसुद्धा मन घट्ट करून त्यांनी हातात चमचे घेत प्लेट पुढे ओढले आणि खाण्यास....
** ** **
मुक्या प्राण्यांच्यावर दया दाखविणारे नेहमीच मांसाहाराला विरोध करण्याच्या पावित्र्यात असतात. कारण प्राण्यांना वाढविणे व नंतर त्यांचा बळी घेवून खाणे हे त्यांच्या नैतिकतेत बसत नाही. परंतु मांसाहाराचे तरफदारी करणारे शाकाहारामध्येही (सजीव) वनस्पतींचा बळी दिला जातो व त्यामुळे शाकाहारही तितकाच अनैतिक असल्याचा दावा करत असतात. केवळ मांसासाठी वाढवल्या जाणाऱ्या त्या प्राण्यांच्या दुस्थितीबद्दल शाकाहारी अश्रू ढाळत असतात. त्यांना पिंजऱ्यात कोंडून ठेवणे, नंतर त्यांच्या वेदनेकडे दुर्लक्ष करून मारणे या बाजारी व्यवस्थेवर त्यांचा राग असतो. पोल्ट्री फार्ममध्ये रक्ताचे पाट वाहत असलेले आपल्याला दिसत नाही का हा त्यांचा प्रश्न असतो. प्राण्याच्यांतही केंद्रीय मज्जासंस्था असल्यामुळे – त्या तोंडाने सांगू शकत नसल्या तरी – वेदना होतच असणार याबद्दल शाकाहाऱ्यांच्या पुरस्कर्त्यात दुमत नाही.

परंतु येथे प्राण्यांच्या कत्तलीपेक्षा प्राण्यांना ‘जिवंतपणा’ कशा प्रकारे प्रदान केले जाते हा प्रश्न उपस्थित करायला हवा. आणि त्यांना मारून टाकण्यासाठीची जी यंत्रणा उभी केली आहे त्याबद्दलही विचार करायला हवा.

आपण मारून खाणाऱ्या प्राण्यांच्या नैसर्गिक वाढीसाठी प्राण्यांची नीट देखभाल करावी, मोकळी हवा, प्रकाश, पाणी यासारख्या मूलभूत सोयी-सुविधा पुरवाव्या, प्राण्यांच्या उपजत गुणविशेषांना उत्तेजन द्यावे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. रोगिष्ट प्राण्यांचे मांस खाणारे आजारी पडतात, एवढी समज मांसाहाऱ्यात नक्कीच असेल. बकरी, बोकड, यासारखे प्राणी खुल्या वातावरणात बागडतात व चांगले आयुष्य जगतात. पोर्क व चिकन यांचे यांत्रिकीकरण झालेले असले तरी तेथेसुद्धा रोगराई न होण्याची खबरदारी घेतली जात असावी.

परंतु शाकाहाऱ्यांचा आक्षेप मूक प्राण्यांना तुम्ही कसे वाढवता हा नसून त्या प्राण्यांचे हालाहाल करून निर्घृणपणे मारण्याबद्दल असण्याची शक्यता आहे. कोंबडीची मुंडी पिरगळून वा बोकडांचा ‘हलाल’ पद्धतीने (रक्ताच्या चिळकांड्या उडतात हे माहीत असूनसुद्धा!) मारून खाणे कितपत नैतिक ठरेल? गाजर उपटून खाणे व कोंबडीला मारून खाणे यात फरक नाही का? गाजर काकडीत संवेदना नाहीत; परंतु मूक प्राण्यात संवेदना आहेत, हे कसे विसरता येईल? मांसाहारच नैसर्गिक नाही यावर शाकाहाऱ्यांचा भर असतो. त्या पुष्ट्यर्थ माणसाच्या दातांची रचना आणि माणसात अंगभूत असलेल्या दया, करुणा, सहानुभूती इ. सद्गुणांचे संदर्भ ते नेहमीच देत असतात.

निसर्ग नियम मात्र वेगळेच काही तरी सूचित करत असतात. मानवी उत्क्रांतीचा अभ्यास केल्यास मांसाहाराच्या विरोधातील हवा निघून जाईल. मुळात मांसाहाराला आक्षेप घेणाऱ्यांच्यामध्ये प्राणी हत्येबद्दलच्या प्रक्रियेबद्दल मनात अढी असते. येथे किळसवाणे, उबग आणणारे काही तरी घडत असावे अशी शंका असते. आणि हे अनैसर्गिक असून ते योग्य नाही अशी एक भावना त्यांच्या मनात रुज(व)लेली असते. जर हे काही त्यांच्या अपरोक्ष घडत असल्यास वा त्या प्रक्रियेची इत्थंभूत माहिती नसल्यास वा ते दुर्लक्ष करण्याच्या मनस्थितीत असल्यास मांसाहारसुद्धा नक्कीच आवडेल, यात शंका नसावी. नैसर्गिकतेचा बाऊ करणे हे नित्याचीच बाब झालेली आहे. या कारणाने जर मांसाहार अनैसर्गिक वाटत असल्यास अवयवारोपण, रक्तदान, गर्भपात, नेत्रदान, कृत्रिम गर्भधारण, सीजरिंग, नकली दातांची कवळी, चष्मा, इत्यादी सर्व गोष्टी अनैसर्गिक असूनसुद्धा समाजाने हे सर्व स्वीकारलेले आहे व त्यात कुठेही अनैतिकता नाही असेच सर्वांना वाटत आहे.

असाच काहीसा प्रकार मांसाहाराच्या बाबतीतही घडत असावा, असे म्हणण्यास वाव आहे. खाण्यासाठीच प्राण्यांची पैदास करत असल्यास व अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून प्राण्यांना कमीत कमी क्लेश देवून हत्या करत असल्यास त्यात आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही.

आपल्याला काय आवडते, काय आवडावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला जे आवडते तेच सर्वानी खावे हा दुराग्रह अनाठायी आहे. म्हणूनच श्रीयुत रामचंद्र कलगुटकर चिकन खात असताना एखादा शाकाहारी त्यांच्याच शेजारी बसून श्रीखंड पुरी (वा साबुदाण्याची खिचडी) का खाऊ शकत नाही?

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

>>> मला जे आवडते तेच सर्वानी खावे हा दुराग्रह अनाठायी आहे. (मी फारसा मांसाहारी नाही हे उगाचच लिहिले तरीही ) मांसाहार या बाबतीत "मुक्या प्राण्यांच्यावर दया दाखविणारे ... मांसाहाराला विरोध ... हलाल झटका वगैरे पध्धती "या बाबतीत सगळीकडे फार वैचारिक भोंगळ पणा आहे . भोंगळ पणाचा कळस म्हणजे ( भूतदया वगैरे ) वादी लोक याचा संबंध पर्यावरण रक्षणाशी वगैरे जोडतात , किंवा कत्तलखान्यातील स्वच्छता वगैरे जोडतात तो . ( यांनी डेअरी प्रॉडक्ट्स /मिठाई प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या ठिकाणची स्वच्छता बघायला पाहिजे )
या सगळ्याच वादांमध्ये शास्त्रीय दृष्टिकोनाचा *आणि तारतम्याचा अभाव एवढेच दिसते .
पण तरीही हा प्रश्न का पडला ते कळले नाही .
* येथे शास्त्रीय दृष्टिकोन म्हणजे पर्यावरण या विषयाची अभावाने असलेली जाण , व फूड सेफ्टी विषयी चे शास्त्रीय ज्ञान या पुरता मर्यादित ठेवत आहे .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मांसाहार आणि पर्यावरण यांचा संबंध उगाच जोडलेला नाही - The Triple Whopper Environmental Impact of Global Meat Production

याचं दुसरं अंग - मासेमारीच्या अतिरेकामुळे काही प्रकारचे मासे त्यांच्या नैसर्गिक पर्यावरणातून नष्ट होत चाललेले आहेत.

तिसरा मुद्दा - अन्नाची नासाडी; पण त्यात शाकाहारी लोक फार व्यवस्थित, ऑरगनाईज्ड असतात अशातली गत नाही.

पण आठवड्यातून दोन-चार वेळा मांस खाणं, त्यातही विविध प्रकारचं मांस-मासे खाणं आणि भात-भाज्या-फळं-सुकामेवा यांतलं बाकीचं फार न खाता मांसावरच जगणं (या गरीबांच्या टेक्सासात!) या दोन्हींत फरक आहे.

शाकाहारी लोकांनीही पर्यावरणाबद्दल जागरूक व्हायला हरकत नाही. कारण भाज्या, फळं, धान्य पिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतं, औषधं वापरली जातात; तो प्रकारही पर्यावरणाला घातक आहेच. १००% 'स्वच्छ' (शाकाहारी असो वा मिश्राहारी) अन्न खाणं सध्या आपल्यापैकी बहुतेकांना परवडेलही, पण उपलब्ध असेल का आणि आपण तेवढा खर्च करायला सध्या तयार आहोत का, असेही प्रश्न येतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>>मांसाहार आणि पर्यावरण यांचा संबंध उगाच जोडलेला नाही हे तुम्ही म्हणता ते खरेच ...
अन्न म्हणून वापरण्याकरिता उत्पादित वनस्पतींपेक्षा मांस निर्मितीकरिता लागणार "पर्यावरणीय खर्च "खूप जास्त आहे या बद्दल काहीही दुमत नाहीये . तसेच मासे व caviar निर्मितीकरिताची कत्तल ... या कुठल्याच सर्व मुद्यांवर दुमत नाही .
मी भोंगळपणा म्हणत होतो तो वेगळा . भूतदया ( आणि पर्यायाने शाकाहार ... बादरायण ) आणि पर्यावरण रक्षण यांचा संबध जोडणे भोंगळ आहे हे माझे म्हणणे . जसे आम्ही तुळशीचे झाड लावतो कारण त्याने पर्यावरण रक्षण होते म्हणणे भोंगळ तसेच .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असल्या लोकांपासून 'सुरक्षित अंतर ठेवा'यला सुरुवात केल्याला अनेक वर्षं लोटल्यामुळे हे लक्षात आलं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दूध पिणं आणि अंड खाणं यात अंड खाणं कमी कृरपणाचं आहे असं वाटतं. ( मांसाहार आणि भूतदया यावरून आठवलं की अजो दिसले नाहीत् बरेच दिवसांत‌. नानावतीसर तुम्ही त्यांचा याच विषयावरचा एक लई मोठा धागा वाचा. यातले सर्व मुद्दे त्यातच कव्हर झालेले आहेत‌. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कलगुटकर जर अट्टल मांसाहारी कुटुंबात जन्माला आले असते तर त्यांचे विचार वेगळे असते. एकाला ज्याच्याविषयी प्रेम वाटेल त्याविषयी दुसऱ्याला घृणा वाटू शकते. अशा वेळी सहअस्तित्व टाळण्याकडे सर्वांचा कल असतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

तेच दारुचं. सगळे दारु पिणारे म्हणजे बेवडे/दारुडे असा आम्हा दारुच्या थेंबालाही न शिवणाऱ्यांचा गैरसमहज असतो व आपण्च कसे शहाणे असा अविर्भाव असतो. माझाहि होता. पण एकदा मेंदु-मंथनमय चर्चेतोओन तो गैरसमज लोप पावला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"गाजर उपटून खाणे व कोंबडीला मारून खाणे यात फरक नाही का? गाजर काकडीत संवेदना नाहीत; परंतु मूक प्राण्यात संवेदना आहेत, हे कसे विसरता येईल?" नक्की ?

सर जगदीश चंद्र बोसांना विसरलात? त्यांच्या वनस्पती तर संगीत एकायच्या.

या उलट पौड रस्त्यावरील " कुझीन कल्चर" या रेस्तौरेंत तर पाटीच आहे "EAT FISH ... THEY DO NOT HAVE FEELINGS"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वनस्पतीच्या वेदना आपल्याला समजत नाहीत‌. प्राण्यांच्या समजतात‌. वनस्पतीची तडफड होताना दिसत नाही. त्यामुळे दृष्टीआड सृष्टी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

जीवो जीवस्य जीवनम्!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखाचे नाव "मांसाहाऱ्यांच्या मनाचा प्रश्न‌" असे अधिक शोभून दिसले असते. असो !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बुद्धाने धर्माचरणात शाकाहार मासाहार विषय टाळला आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

world is a big giant restaurant. it all depends on who eats whom _____ woody allen

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0