नव‌व्याच्या शोध‌क‌ळा

गेल्या काही दशकांमध्ये दुर्बिणींच्या तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आकाशगंगेतील सूर्याव्यतिरिक्त इतर अनेक ताऱ्यांभोवती ग्रहांचा शोध लागला आहे. १९९२ मध्ये पहिल्या परग्रहाचा शोध लागल्यानंतर आत्तापर्यंत असे हजारो परग्रह सापडले आहेत. त्याच वेळी २००६ साली प्लूटोला बटुग्रहाचा (ड्वार्फ प्लॅनेट) दर्जा देण्यात आला आणि आपल्या सूर्यमालेने एक ग्रह गमावला. त्यामुळे सध्या आपल्या सूर्यमालेत आठ ग्रह आहेत. पण २०१६ मध्ये अमेरिकेतील कॅलटेक या नामांकित संस्थेतील खगोलशास्त्रज्ञांनी नेपच्यून आणि प्लूटोच्याही पलीकडे सुदूर क्षेत्रात नववा ग्रह असण्याची शक्यता वर्तवली आणि खगोलशास्त्रज्ञांच्या समुदायात खळबळ उडाली. नवव्या ग्रहाच्या शोधाची पार्श्वभूमी जाणून घेण्यापूर्वी आपण सूर्यमालेतल्या इतर ग्रहांच्या शोधाविषयी थोडक्यात जाणून घेऊया.

बुध, शुक्र, मंगळ, गुरू आणि शनी हे पाच सर्वात तेजस्वी ग्रह नुसत्या डोळ्यांनी सहज पाहता येत असल्याने प्राचीन काळापासून मानवाला माहित होते, पण इतर ग्रहांच्या अस्तित्वाबद्दल त्याला कल्पना नव्हती. रात्रीच्या आकाशात दिसणारे तारे आणि दीर्घिकांसारख्या दूर अंतराळातील वस्तू एकमेकांच्या तुलनेत स्थान बदलत नाहीत. ते जवळजवळ स्थिर असतात. पण सूर्यमालेतल्या खगोलीय वस्तूंचं स्थान प्रत्येक दिवशी थोडंथोडं बदलतं. १७८१ साली ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्शेल यांना रात्रीच्या आकाशाची अनेक निरीक्षणं घेतल्यावर एक तुलनेने मोठ्या आकाराची वस्तू आकाशात स्थान बदलताना दिसली. त्यांना पहिल्यांदा तो धूमकेतू आहे असं वाटलं. पण तो धूमकेतू नसून एक ग्रह होता, ज्याला “युरेनस” हे नाव देण्यात आलं. युरेनसच्या शोधापूर्वीही अनेक खगोलनिरीक्षकांनी त्यांच्या निरीक्षणात हा ग्रह नोंदवला होता. पण हि वस्तू तिचं स्थान बदलतेय हे त्यांच्या लक्षात आलं नाही. मग जुन्या आणि नव्या निरीक्षणांच्या साहाय्याने युरेनसच्या कक्षेची पुनर्रचना केली गेली. तेव्हा शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की, युरेनस त्याच्या अपेक्षित मार्गावरून थोडा भरकटतोय. असं युरेनसच्याही पलीकडे असणाऱ्या एखाद्या ग्रहाच्या गुरुत्वीय बलामुळे होऊ शकतं. हे समजल्यावर अर्बन लेव्हेरिए या फ्रेंच खगोलशास्त्रज्ञाने युरेनसच्या कक्षेचा अनेक वर्ष अभ्यास करून संभाव्य ग्रहाचं अस्तित्व गणिताने सिद्ध केलं आणि त्यावेळचं त्याचं आकाशातलं स्थानसुध्दा वर्तवलं. लेव्हेरिएच्या विनंतीवरून जर्मनीच्या एका वेधशाळेने आकाशातल्या त्या भागाचं निरीक्षण करायला सुरुवात केली आणि काही वेळातच त्यांना नवीन ग्रह सापडला, ज्याला आपण नेपच्यून या नावाने ओळखतो. या उल्लेखनीय शोधानंतर अशाप्रकारे फक्त गणिताचा वापर करून आपण नेपच्यूनच्याही पुढचे ग्रह शोधू शकू असं काही शास्त्रज्ञांना वाटलं. पार्सीवल लॉवेल हे त्यापैकी एक. त्यांनी लॉवेल वेधशाळेची स्थापना केली आणि अनेक दशकं पुढच्या ग्रहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अपयश आलं. पुढे क्लाईड टॉमबॉग यांनी प्लूटोचा शोध लावला, पण आता प्लूटोला ग्रह मानलं जात नाही. त्यानंतर कितीही शोध घेतला तरी आपल्या सूर्यमालेत नवीन ग्रह सापडला नाही.

पण नेपच्यूनच्या पलीकडे शास्त्रज्ञांना लघुग्रहांसारख्या सूर्याभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंचा एक पट्टा सापडला ज्याला कायपर पट्टा म्हणतात. यातल्या सर्व वस्तूंच्या कक्षा नेपच्यूनच्या जवळून जातात आणि त्याच्या कक्षेशी गुरुत्वीय बलाने बांधल्या गेल्या आहेत. त्यानंतर सेडना या बटुग्रहाचा शोध लागला ज्याची कक्षा अतिशय लंबवर्तुळाकार आहे आणि तो नेपच्यूनपेक्षाही खूप लांबून अतिदूर क्षेत्रात सूर्याभोवती फिरतो. नंतर सेडनासारख्या कक्षा असणाऱ्या पाच इतर बटुग्रहांचा शोध लागला. त्यांच्या कक्षांबद्दल एक विशिष्ट गोष्ट अशी की, त्या सर्व एकाच बाजूला झुकल्या आहेत आणि नेपच्यूनच्या गुरुत्वाकर्षणाचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. हा केवळ योगायोग असू शकतो किंवा त्यामागे काही कारणंही असू शकतात. या गोष्टीचा अभ्यास करताना खगोलशास्त्रज्ञ माईक ब्राउन आणि कॉन्स्टॅन्टिन बॅटिगीन यांनी अनेक शक्यता पडताळून पाहिल्यावर बटुग्रहांच्या कक्षेला एखाद्या मोठ्या वस्तुमानाच्या वस्तूने तिच्या गुरुत्वीय बलाने विचलित केले असण्याची शक्यता वर्तवली. सेडनासारख्या वस्तूंच्या कक्षा ज्या प्रकारे आणि जेवढ्या विचलित झाल्या आहेत तेवढ्या पृथ्वीच्या वस्तुमानाच्या १० पट किंवा जास्त वस्तुमानाची वस्तू करू शकते. एवढं वस्तुमान ग्रहाचंच असू शकतं. जर तसं असेल तर अश्या ग्रहाच्या गुरुत्वीय बलामुळे इतर वस्तूंच्या कक्षेवर आणखी कसा परिणाम होईल याचा त्यांनी अभ्यास केला. त्यातून त्यांना काही इतर मूठभर अतिदूर खगोलीय वस्तू आढळल्या ज्यांच्या कक्षेमध्ये अपेक्षेप्रमाणे एखाद्या मोठ्या ग्रहाचा गुरुत्वीय प्रभाव आढळला. त्यामुळे नेपच्यूनच्या पलीकडे अतिदूर भागात नवव्या ग्रहाच्या शक्यतेला पाठबळ मिळालं.

या संभाव्य ग्रहाचं वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या सुमारे १० पट किंवा त्यापेक्षा जास्त वर्तवण्यात आलं आहे. त्याची कक्षा एवढी लांब आहे कि त्याला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला १५,००० ते २०,००० वर्ष लागू शकतात. तसंच त्यावर हायड्रोजन आणि हेलियमचं घन वातावरण असू शकतं. २०१६ साली हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आणि नववा ग्रह शोधण्याची स्पर्धा सुरु झाली. कारण जोपर्यंत हा ग्रह प्रत्यक्ष कॅमेऱ्यात टिपला जात नाही, तोपर्यंत त्याचे अस्तित्व मान्य करता येणार नाही.

संभाव्य ग्रह आकाराने जरी मोठा असला तरी तो खूप लांब आणि अंधुक आहे. त्याचबरोबर त्याच्या कक्षेची आणि स्थानाची अचूक माहिती नसल्यामुळे त्याचा शोध घेणे अतिशय अवघड आहे. असं असलं तरी योग्य नियोजन करून पद्धतशीरपणे शोध घेतला तर पुढच्या एक ते दोन वर्षात हा ग्रह सापडेल अशी शास्त्रज्ञांना आशा आहे. यासाठी आपणही मदत करू शकता. नवव्या ग्रहाच्या शोधासाठी नासाने सामान्य जनतेची मदत घ्यायचं ठरवलं आहे. त्यासाठी आपल्यापैकी कुणीही बॅकयार्ड वर्ल्डस् (Backyard Worlds: Planet 9) च्या वेबसाईटवर जाऊन नववा ग्रह शोधण्यासाठी मदत करू शकतं.

पूर्व‌प्र‌काशित: दैनिक‌ स‌काळ‌ दि. १८/०५/२०१७ (http://epaper.sakaalmedia.com/EpaperData/Sakal/Pune/2017/05/18/Main/Saka...)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

>>संभाव्य ग्रहाचं ( नेपच्युन) अस्तित्व गणिताने सिद्ध केलं आणि त्यावेळचं त्याचं आकाशातलं स्थानसुध्दा वर्तवलं>>
ते गणित कोणतं असावं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवर स्वागत आहे! उत्तम लेख.
इच्छुकांसाठी लेखात उल्लेखलेल्या बॅकयार्ड वर्ल्ड्सचा दुवा. हा Zooniverse ह्या प्रकल्पाचा भाग आहे. Zooniverse वर अनेक प्रकल्प आहेत, ज्यात सामान्य नागरिक सहजपणे भाग घेऊ शकतात. असंच आणखी एक उदाहरण म्हणजे गॅलॅक्सी झू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पीटी??? प्र‌थ‌मेश‌ ताम्हाणे का? प्रोफाईल‌ ज‌रा अद्य‌याव‌त‌ क‌र‌ नाही त‌र‌ मूळ‌ लेख‌काचा लेख‌ तू च‌र्चेसाठी टाक‌ला आहे असे वाट‌ते. ऐसीव‌र‌ स्वाग‌त‌ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/