दिल से या दिमाग से

(गूगलवर दिल (heart) हा शब्द टाकून बघितल्यास सर्च इंजिन 137 कोटी संदर्भ दाखवते व दिमाग (brain) म्हणून टाकल्यास फक्त 64 कोटी! यावरून दिल पेक्षा दिमाग किती 'कमकुवत' आहे याची थोडी फार कल्पना येवू शकते.)

आजकाल कुठल्याही कुरघोडीचे वा दंगलीचे कारण आमच्या भावना दुखविल्या या विधानाभोवती फिरत असते. गंमत म्हणजे या दंगलखोरानाच भावना असतात व इतरांना नाही हा अर्थ त्यातून अभिप्रेत होत असतो. सामूहिक भावना काही तरी निमित्त उकरून भडकवल्या जातात हे खरे असले तरी भावनेच्या संदर्भात वैयक्तिकरित्या आपण फारच हळवे होत असतो, हे नाकारता येत नाही. आपल्या भावना (emotions) व संवेदना (feelings) यांच्यात एका प्रकारचे भांडण सतत चाललेले असते. त्यामुळे मला तसे का वाटते याचे स्पष्टीकरण देण्याचे माझ्यावर बंधन नाही, याबद्दल आपण ठाम असतो. भाव-भावनांचा योग्य वेळी दखल न घेतल्यास शारीरिक प्रकृतीवर परिणाम होतो हे कारण त्यासाठी पुरेसे ठरते. मला राग येत नाही, असे रागाच्या भरात ओरडण्याची सवय कित्येकांना जडलेली असते. त्यांची देहबोली ते किती उद्विग्न झालेले आहेत याची साक्ष देत असते. परंतु आपण त्या गावचेच नाही हा पवित्रा घेत ते आपल्याशी भांडत असतात. परंतु राग ओसरल्यानंतर बहुतेकांना भावनोद्वेग योग्य नाही याची जाण असते, विशेषतः तुम्ही दुसऱ्याच्या भावनोद्वेगाचे बळी ठरलेले असल्यास! रागाच्या भरात, सूड उगवण्याच्या ईर्षेमुळे वा असूयेमुळे आपले जास्त नुकसान होऊ शकते हे माहित असूनसुद्धा आपण आपला भावनोद्वेग आवरू शकत नाही.

थोडे फार विचार करणारे भावनोद्वेग चुकीचे आहे हे मान्य करतात. परंतु आपल्या भावना योग्य नसले तरी भावनावश न होणे आपल्या हातात नसते. कुठे तरी तोल जातो व भावना उचंबळून येतात. अशा प्रसंगी विचार करण्याची वा विचार करून कृती करण्याची कुवतच हरवलेली असते. विचार व भावना या एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत, व एकात बदल झाल्यास दुसऱ्यातही बदल होतो असे मानसतज्ञ सांगत असले तरी भावना विचारावर मात करते. व त्याचे विश्लेषण करणे वा स्पष्टीकरण मागणे शक्य नाही अशीच भावना जनसामान्यात रुजलेली असते.

परंतु ‘हे’ की ‘ते’ ही स्थिती कधीच नसते. विचार न करता भावनांना शरण जाणे किंवा भावनांना पूर्णपणे अव्हेरणे हे शक्य होत नाही. आपण एखाद्या विशिष्ट भावनेची दखल घेत असतानाच ते योग्य नाही याची जाणीव खोल मनात कुठे तरी असते. परंतु त्या विवेकाला दाबून टाकणे सहज शक्य होते व भावना आपले कार्य साधतात.

तुमच्या बरोबर काम करणाऱ्याचे वा तुमच्याच वयाच्या नातलगाच्या यशाबद्दल हेवा वाटतो. आपण एवढे मरमरतो व आपल्या पदरी काही नाही ही भावना मनात असल्यामुळे त्या मित्राचा/नातलगाचा आपण दुस्वास करू लागतो. हा हेवा चुकीचा वा हेवा वाटणे हे चुकीचे हेही लक्षात येते. परंतु भावनावेग या विचारावर मात करते. खरे पाहता उत्स्फूर्तपणे वाटणे व त्याबद्दल थोडेसे विचार करणे, त्याचे विश्लेषण करणे व नंतर कृती करणे व बुद्धीनिष्ठ/वस्तुनिष्ठपणे पाहणे हे या संबंधातील टप्पे असू शकतात. त्यामुळे बुद्धीच भावनोद्वेगाला थोपवू शकते. त्याचप्रमाणे हीच बुद्धी आपल्या भावनांना केव्हा वाट करून द्यावे हेही सुचवते. परंतु यासाठी आपल्या बुद्धीचा आवाज ऐकण्याची सवय करून घ्यावी लागते.

सामान्यपणे दिल व दिमाग एकमेकाचे स्पर्धक आहेत असेच वाटत असते. प्लेटोच्या मते भावना हे रथाचे घोडे असून बुद्धी त्या रथाचा सारथी असतो. हा बुद्धी नावाचा सारथी भावनेच्या भरात उधळणाऱ्या घोड्यांचे नियंत्रण करतो व त्यांना वठणीवर आणतो. परंतु डेव्हिड ह्यूम या तत्वज्ञाच्या मते घोडेच सारथीचे नियंत्रण करत असतात. कारण बुद्धीपेक्षा भावनानांच स्वहित जास्त कळते. विवेकच भावनांचा गुलाम असतो. ब्लेज पास्कल या अजून एका तत्वज्ञाच्या मते भावनांना स्वतःचाच विवेक असतो, त्याच्या नियंत्रणासाठी बुद्धीची आवश्यकता नाही. अशा प्रकारे आपल्यासमोर बुद्धी व भावना यासंबंधीचे 3 मॉडेल्स आहेत. परंतु या तीन्ही मॉडेल्समध्ये दिल व दिमाग हे एकमेकाच्या विरोधातच आहेत असे गृहित धरलेले दिसते. गंमत म्हणजे हे दोन्ही एका पाठोपाठ कार्य करत नसत्या तर त्यांना नीटपणे ओळखणेसुद्धा जड झाले असते. बहुतेक वेळा – नेहमीच नव्हे – आपण कार्य करत असताना आपण ते करत आहोत हेच जाणवत नसते. परंतु त्याबद्दल विचार केल्यास कार्यकारण भाव समजून घेता येते. अनेक वेळा आपल्याला एखादी वस्तु आपल्या मौजमजेसाठी हवीहवीशी वाटते. परंतु ते मिळणार नाही याची खात्री झाल्यास तो हव्यास ओसरून जातो. आपल्यावर अन्याय झाला नाही हे लक्षात आल्यानंतर आपला राग शांत होतो. प्लेटोचा बुद्धीसाठी म्हणून वापरलेल्या सारथी या शब्दापेक्षा घोडेस्वार हा शब्द तेथे चपखलपणे बसला असता. कारण धुंदीत असलेल्या घोड्यांना केवळ इशाऱ्याने शांत करणे त्यालाच शक्य झाले असते, चाबकाने मारून नव्हे.

प्लेटोच्या तुलनेत ह्यूमचे मॉडेल वास्तवतेच्या जवळ जाणारे आहे. त्याच्या मते दिलला दिमागापेक्षा, दिमागालाच दिलची जरूरी जास्त असते. कारण प्रेरणा देण्यासाठी पूर्णपणे बुद्धीनिष्ठ असे काही नसते. शिवाय नैतिकता इतराबद्दल संवेदनशील असल्याशिवाय काही कामाचे नाही. भावना व संवेदना नसत्या तर बुद्धिनिष्ठतेचे वर्तन अगदी शुष्क, नीरस, कोरडे, कामापुरते व यांत्रिक झाले असते. भावनाचा ओलावा असल्याशिवाय कामाला गती येत नाही व काम करण्यास प्रेरणा मिळत नाही, हे मान्य कारयला हवे. बुद्धिनिष्ठ वर्तनामुळे आपल्या कृतीचे नेमके काय परिणाम होतील हे कळेल परंतु ते आपल्याला खरोखरच तसेच हवे होते का हे कळणार नाही.

तसे पाहिल्यास आकस्मिकपणे उद्भवणाऱ्या भावनेच्या उत्सुफूर्ततेला थोपवण्यासाठी व भावनेच्या उत्कट प्रतिसादांना वेळीच थांबवण्यासाठी बुद्धिनिष्ठतेला पर्याय माही. आपण चुकीच्या गोष्टीबद्दल कारण नसताना आपल्या मनात भीती असते व त्यासाठी आपण निर्भय व्हावे असे तत्वज्ञ नेहमीच सल्ला देत असतात. किर्कगार्ड हा तत्वज्ञ मात्र आपल्या मनातील ही भीतीच आपल्या अस्तित्वाच्या लढ्यात आपल्याला कायम मदत करत आली आहे, असे मानतो. फक्त आपण आपला हात तुटला, बायको पळून गेली वा चोरी झाली अशा क्षुल्लक गोष्टीबद्दल काळजी करत बसतो त्याऐवजी आपले स्वत्व हरवले यासाठी रडत नाही. उदाहरणार्थ मृत्युची भीती कायमची मनात असते. परंतु अनेक तत्वज्ञांना मृत्यु हा काही चिंतेचा विषय असू शकत नाही, व विनाकारण आपण त्या विषयात गुंतत असतो, असे वाटते. सॉक्रेटिसच्या मते आपल्याला ज्ञात नसलेल्या गोष्टीबद्दल काळजी करत बसणे हेच अविवेकीपणाचे प्रमुख लक्षण आहे. कदाचित मृत्यु हे एक वरदानही ठरू शकेल. मुत्युनंतर वा पूर्वजन्मी आपले जीवन फारच वाईट होते अशी समजूत करून घेण्यास कुठलाही आधार नाही. वाईट वाटून घ्यावे असे काही जगात नसल्यास कुठल्याही गोष्टीचे वाईट वाटणार नाही. (Nothing can be bad if there is nothing for it to be bad for) आपण काही मृत्युपासून लांब पळत नाही. परंतु एखाद्या गोष्टीबद्दल भीती बाळगणे व ती गोष्ट कधीही होऊ नये अशी अपेक्षा बाळगणे यात फार मोठा फरक आहे. यावरून ज्या गोष्टीबद्दल खरोखरच काळजी करावी यासाठी मार्गदर्शक म्हणून उत्स्फूर्तपणे उद्भवणाऱ्या भावनिक प्रतिसाद निरुपयोगी ठरतात, असे म्हणावयास हरकत नसावी.

आपली भीती अनाठायी आहे किंवा आपण चुकीच्या गोष्टीबद्दल भीती बाळगून असतो, असे काहीही असले तरी भीतीची कारणमीमांसा करणे योग्य ठरेल. आपण भीतीवर अंकुश ठेवण्याची चिंता करत नसून आपल्याला विमनस्कतेकडे नेणाऱ्या गोष्टींना अव्हेरत आहोत हे लक्षात येईल. आपण प्रवास करत असलेले विमान सुरक्षितपणे उतरेल की नाही याचा विचार करण्याऐवजी विमानाला अपघात झाल्यास त्यानंतरचे आपले जीवन कसे असेल याचीच चिंता आपण करत असतो. मृत्युच्या भीतीच्या छायेखाली वावरताना खऱ्या-खुऱ्या जीवनाची मजाच आपण घालवत असतो.

हे सगळे खरे असेलही, परंतु बुद्धिनिष्ठता मला जे वाटते ते बदलू शकत नाही. गंमत अशी आहे की बहुतेकांना आपण बदल पचवू शकत नाही असेच वाटत असते. परंतु प्रत्यक्षात मात्र इतरांच्या वर्तनातील फरक वा परिस्थितीतील बदलानुसार आपण माणसांना पारखत असतो व त्यांच्याबद्दलची आपली मतं बदलत जातात. पोल्ट्री फार्मला भेट दिल्यानंतर नेहमीच खावेसे वाटणारे केएफसीमधील चिकन नगेट्सबद्दल घृणा उत्पन्न होऊ शकते. आयुष्यभर साथ दिलेल्या नवऱ्याचे एखादे लफडे आहे हे कळल्यानंतर त्याच्याबद्दलची मतं पूर्णपणे बदलू शकतात.

भावनेला योग्य वाट करून देणे म्हणजे त्याची गुलामी पत्करणे असे होत नाही. आपल्याला जे वाटते ते आपण बदलू शकत नसलो तरी त्या भावनेशी निगडित कृती करताना तरी आपण विचार करणे अपेक्षित आहे. आणि ही क्षमता एक नैतिक व्यक्ती म्हणून नेहमीच वापरायला हवी. जगभरातील सर्व तत्वज्ञ स्वतःच्या भावनेची अभिव्यक्ती कशी करावी याबद्दल भाष्य न करता दुसऱ्यांना तुमच्याबद्दल काय वाटते याचाच विचार करण्याचा, त्यासंबंधातील आपली कृती काय असावी आणि प्राप्त परिस्थितीत इतर कसे मार्ग काढत होते याबद्दल सल्ला देत असतात. यासाठी आपल्याला भावनेवर मात करणे गरजेचे आहे. परंतु ही गोष्ट समाजातील त्या त्या काळच्या रूढ समजुतीच्या विरोधात जाणारी असते. परंतु भावनेलाच वाट करून देणे व भावनेच्या भरात कृती करणे वा भावनेला अग्रक्रम देणे हे स्वप्रतिमेचे उदात्तीकरण केल्यासारखे होईल व नैतिकतेला दुर्लक्ष केल्यासारखे होईल.

अशा वेळी काहीही न बोलता ओठ शिवून घ्यायचे हाच उपाय समजला जातो व त्याला भावनेचे अपयश न समजता नैतिकतेचा विजय असाच समजला जातो. समोरच्यानी भावनेच्या भरात कितीही उचकवले तरी, व त्यामुळे मानसिक त्रास होत असतानासुद्धा तोंडातून एक ब्र ही न काढता गप्प बसणाऱ्याचे आपण नेहमीच कौतुक करत असतो.

दुसऱ्यांच्या भावनेची कदर करत असताना एक प्रकारचे शेअरिंग करणे गरजेचे असते. त्या भावनांना प्रतिसाद देणे अपेक्षित असते. परंतु अशा प्रसंगी एकही शब्द न उच्चारणारेसुद्धा समाजात सापडतात. त्यांच्या मते समस्येचे शेअरिंग करण्याच्या प्रयत्नात आपण समस्या दुप्पट करत असतो. काही जण अशा कठिण प्रसंगी आपले भावनिक दुःख विसरण्यासाठी काही तरी चांगले काम करत आपल्या भावनांना वाट करून देत असतात.

वरील विवेचनावरून पास्कल या तत्वज्ञाच्या मॉडेलमध्ये काही तरी चूक असावी असे वाटू लागते. त्याच्या मते भावनांना स्वतःचाच विवेक असतो व त्याच्या नियंत्रणासाठी बुद्धीची आवश्यकता नाही. भावना व बुद्धी हे एकमेकाच्या विरोधात असले तरी प्रत्यक्ष लढ्याऐवजी गनिमीकाव्याने त्या एकमेकावर मात करण्याच्या प्रयत्नात असतात, असे त्याला वाटले असावे. कदाचित यात थोडासा सत्यांश असलेही. परंतु त्याकडे नियम म्हणून न बघता अपवाद म्हणून बघायला हवे. दिल व दिमाग या दोन्हीलाही स्वतःचीच विचारसरणी असू शकते. परंतु त्या दोन्हीही एकमेकाच्या सहकार्याने कृती करणे इष्ट ठरेल. करुणा, सहानुभूतीतून कार्य प्रवृत्त करणे दिलचे काम असेल व कुठल्या भावनांना अग्रक्रम द्यायचे याचा निर्णय घेत आव्हानांना सामोरे जाण्याचे काम दिमाग करेल. भावनांना नियंत्रित करणे वा त्यांना मुक्तपणे वावरू देणे यापेक्षा बुद्धीची त्याला जोड देणे अधिक हितावह ठरू शकेल.

भावनेच्या संदर्भात अभिव्यक्त करणे, स्वीकारणे, बदलणे, समावेश करणे, जिंकणे वा नियंत्रण करणे अशा अनेक शब्दांचा वापर करता येईल. भावनेच्या छत्राखाली अनेक गोष्टीं सामावलेले असतात व त्यातील काही गोष्टींचा कदाचित संवेदनाशी संबंधही नसतो. परंतु भावनांचे काही वेळा उघड उघड प्रदर्शन मांडले जाते व काही वेळा नको तेवढे दाबून ठेवले जाते. आकर्षणाचा मागमूसही नसलेल्या व एकतर्फी नसलेल्या उत्कट प्रेम व्यक्त करायला हवे याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. त्याप्रमाणे एकामेकात वितुष्ट आणणाऱ्या रागावर कुठल्याही परिस्थितीत नियंत्रण ठेवणे सर्वांच्याच हिताचे ठरेल.

भावनेच्याबद्दल विचार केल्यास भावना ही एक अत्यंत गुंतागुंतीची, गोंधळात टाकणारी बाब आहे. कदाचित मनोतज्ञ फ्रॉइडच्या हा वारसा असू शकेल. फ्रॉइडचे अनेक समज, गैरसमज व गृहितकं कळत न कळत आपल्या विचारावर परिणाम करत असावेत. भावनांचा आपल्या शरीरावर परिणाम होऊ शकतो हेसुद्धा फ्रॉइडचेच गृहितक आहे. फ्रॉइड, नित्शे वा 20 व्या शतकातील कुठल्याही मानसतज्ञांचे काहीही मत असो, संवेदना नियंत्रित करण्यापेक्षा भावना व्यक्त करणे याला आपण जास्त महत्व देत आहोत. त्याला आता एक उत्सवीस्वरूप येत आहे. मला असे वाटते यावर कुठलाही अपील करायचे नाही असेच ठरवल्यासारखे आपली उत्सवप्रियता असते. परंतु ही उत्सवप्रियता केव्हा, कुठे धोक्यात आणेल याची खात्री देता येत नाही. आणि अनेक वेळा भावना अप्रस्तुत, अयोग्य वा टोकाचे असतात. आपल्यातील अनेकांना दुसऱ्यांच्या भावनेद्वेगाचे बळी ठरलेले आठवत असेल. राग, द्वेष, असूया या किती वाईट असू शकतात याचा प्रत्यय नक्कीच आला असेल. म्हणूनच आपण भावनोद्वेग योग्य नाही असे म्हणण्याइतपत सुज्ञ झालो असेल.

भाव भावनांचे नियंत्रण करणे म्हणजे तोंड मिटून सहन करणे वा दबावाखाली सतत वावरणे किंवा प्रेम करण्याला वा रडून दुःखाला वाट मोकळे करून देण्याची क्षमताच पूर्णपणे हरवून घेतल्यासारखे होईल. तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन केल्यासारखे वाटेल. काहींना अशा उत्कट प्रसंगी शांत राहण्यापेक्षा व भावना दाबून ठेवण्यापेक्षा जे काही होईल त्याचा सामना करणे इष्ट ठरेल. परंतु खरोखरच भावनेचे नियंत्रण की त्याच्या दयेची भीक अशी निवड असू शकते का? अरिस्टॉटलच्या मते भावनेच्या अतिरेकाच्या भीतीमुळे ठेवण्यात येणारे नियंत्रण आयुष्यातील एका थ्रिलिंग अनुभवापासून दूर पळायला लावते. व भावनेवरील अगदीच तोकडे नियंत्रण राग, लोभ व द्वेष इत्यादींच्या आहारी जाण्याची शक्यता वाढते व जे काही आयुष्यात थोडे फार सौख्य आहे त्या आयुष्यालासुद्धा सुरुंग लावल्यासारखे होते या प्रकारचे राग, द्वेष, लोभ इत्यादी समस्या आपल्या रोजच्या आयुष्यात नेहमीच डोकावतात. अगदी प्रेमसुद्धा समस्या म्हणून आपल्यासमोर उभे राहते. प्रसंगी या संवेदना आपल्याला सत्याकडे नेत आहेत की आपल्याला खोटे पाडत आहेत हे ओळखणेसुद्धा आव्हानात्मक ठरते.. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवावा की त्याच्यापासून लांब पळून जावे असा पेच उभा राहू शकतो.

मनात उमटणाऱ्या भावनोद्वेगाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कृतीशील होण्यापेक्षा प्रसंगाचे गांभीर्य ओळखून थोडेसे विचार करून कृती केल्यास प्रसंगातून बाहेर पडणे शक्य होईल. याचा अर्थ आपण भावनांना नाकारत आहोत असे होत नाही. भावनेची कदर करत असतानाच त्याच्या अतिरेकातून होणाऱ्या नुकसानीचा अंदाज घेत केलेली कृती आपल्या परिप्रेक्ष्याला वा करत असलेल्या कृतीला किंवा या दोन्ही गोष्टींना एक वेगळे परिमाण देऊ शकते. भीतीचेच उदाहरण घेतल्यास ही एक क्लेश देणारी अत्यंत त्रासदायक भावना आहे. परंतु या भीतीच्या संदर्भात शक्य होत असल्यास आपण वेगळा विचार केल्यास त्यात भिण्यासारखे काय आहे असे वाटू लागेल व फार मोठ्या नुकसानापासून वाचण्याची शक्यता वाढेल. मुळात भीतीचे एवढे बाऊ करण्याची गरज नाही, कारण ते आयुष्यभर तुमच्या बरोबर असणारी भावना आहे व ते अत्यंत नैसर्गिक आहे. त्यामुळे आपण एखाद्या कृतीबद्दल उत्सुक असताना त्यातील धोक्यांची चिंता करत बसल्यास ती कृती बाजूला राहील व फक्त मनात भीती उरेल. त्यामुळे भीतीच्या आहारी न जाता तुम्हाला जे काही करायचे – उद्योग-व्यवसाय, नवीन नाते संबंध, वा प्रवास इत्यादी – त्यात मन गुंतवल्यास व झोकून घेतल्यास भीतीची भीती उरणार नाही. मनातील भीती पूर्णपणे नष्ट होईपर्यंत वाट बघत राहिल्यास वा भीतीची तीव्रता कमी होण्याची वाट बघत राहिल्यास आयुष्यभर फक्त वाटच बघत बसावे लागेल. त्यामुळे जे काही करायचे ते करणे योग्य ठरेल.

काहींना भीतीवर जय मिळवण्याची आस लागलेली असते, व त्यासाठी आपल्या जिवाचे हाल करून घेण्याची त्यांची तयारी असते. परंतु त्याची खरोखरच इतकी गरज नाही. एक मात्र खरे की धोक्याची घंटा वाजत असल्यास त्याकडे लक्ष देणे नेहमीच चांगले. विशेष करून अत्यंत धोक्याच्या वा नैतिकतेला अव्हेरणाऱ्यांच्या बाबतीत तर आपण जास्त सावध राहायला हवे. कायम कंफर्ट झोनमध्ये राहणे वा विनाकारण कंफर्ट झोनच्या बाहेर पडण्यासाठी धडपडणे या दोन्ही गोष्टी शक्यतो टाळायले हवेत. कडाक्याच्या थंडीच्या दिवसात एव्हरेस्ट शिखर चढण्याचा विचार सोडून देणे केव्हाही शहाणपणाचे ठरेल. परंतु इतर अनेक गोष्टींच्या छटा या उदाहरणाइतके स्पष्ट नसणार. त्यामुळे त्याबद्दलच्या भीतीला थारा द्यावे की जे काय होईल ते होऊ दे म्हणून बिनदिक्कत पुढे जावे अशा द्विधा मनस्थितीशी सामना करावा लागेल. अशा वेळी ही कृती आपल्या जीवनमूल्यांच्या जवळ जाणारी आहे की नाही वा ती कितपत जवळ आहे हा विचार आपल्याला मार्गदर्शी ठरेल.

Acceptance and Commitment Therapy (ACT) या उपचार पद्धतीतसुद्धा भावनांना अव्हेरण्यापेक्षा त्यांचा स्वीकार करून आपल्या तत्वांशी बांधिल असण्यावर भर दिला आहे. ही थेरपी नकारात्मकतेवर जय मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. नकारात्मक भावनेवर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्यातून काहीही हाती लागत नाही. त्यामुळे आहे तशा स्थितीत भावनांचा स्वीकार करत राहणे याला पर्याय नाही. आपण आयोजित केलेल्या एखाद्या पार्टीत नको असलेले गेस्ट्स घुसत असले तरी आपण त्यांना हाकलून देत नाही, कारण पार्टीत रसभंग होऊ नये हा उद्देश त्यामागे असतो. तशाच प्रकारे या नकारात्मक भावना आपल्या आयुष्यात न बोलविता आलेले असतात व त्यांना सहन करण्यापलिकडे आपल्या हातात काहीही नसते याची जाणीव असणे हाच त्यावर उपाय असू शकेल. कितीही प्रयत्न केले तरी भीती किंवा इतर तत्सम भावना आपल्या मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी ठाण मांडून असतात. व त्यांना बाहेर काढणे अशक्यातली गोष्ट ठरते. परंतु आपण याची जाणीव ठेवून आपली कृती करत राहणे हाच यावरील उपाय ठरू शकेल. भावना नेहमीच आपल्याला एखाद्या रोलरकोस्टरमध्ये नेल्यासारखे अनियंत्रित अवस्थेत नेण्यासारखे असतात. समुद्रातील लाटावर स्वार झाल्यासारखे त्यांच्यावर स्वार होण्याचे कौशल्य आपल्याकडे असल्यास या भावनांचा तितकासा त्रास होणार नाही हे मात्र निश्चित.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet