प्रार्थनेने आजार बरे होऊ शकतात का?

अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील गर्भधारणेवर संशोधन करणाऱ्या तज्ञांनी वैज्ञानिकांना बुचकळ्यात टाकणारा एक शोधनिबंध 2001 साली प्रसिद्ध केला होता. त्यांच्या निष्कर्षानुसार ख्रिश्चन बांधवाने केलेल्या प्रार्थनेमुळे सुखद बाळंतीण होण्याचे प्रमाण प्रार्थना न केलेल्या बाळंतिणींच्या दुप्पट आहे. प्रार्थनेचा अशा प्रकारच्या उपयोगाबद्दलचा हा निष्कर्ष ख्रिश्चन धार्मिकांना सुखावणारा होता आणि इतर धार्मिकसुद्धा आपापल्या धर्मातील प्रार्थनेविषयक गोष्टींना पुनरुज्जीवित करण्यास प्रेत्साहन देणारा होता. तीन वर्षानंतर यातील एका संशोधकाने आपला शोधनिबंध चुकीच्या विदावर आधारलेला होता व आम्ही इतर शास्त्रज्ञांना फसवण्यासाठी विदामध्ये अफरातफर केली होती अशी जाहीर कबूली दिली. तो शोधनिबंध नंतरच्या काळात अंतर्जालावरून काढून टाकण्यात आला व विद्यापीठातर्फे त्या तज्ञांवर कारवाई करण्यात आली. यातील एक तज्ञ मात्र आपल्या निष्कर्षाप्रती निष्ठा ठेऊन होता.

या शोधनिबंधाच्या निमित्ताने तज्ञांच्या वर्तुळात पुन्हा एकदा प्रार्थनेने आजार बरे होऊ शकतात का? हा परस्पर अंतर्विरोध असलेला विषय चर्चेला आला.

गंमत म्हणजे अमेरिकन शासनाने या अत्यंत अवैज्ञानिक स्वरूपातील विषयावरील संशोधनासाठी सुमारे 25 लाख डॉलर्स अगोदरच खर्ची घातलेले असल्यामुळे वैज्ञानिक जगतात शासनाची छी थू होत होती. अनेक वैज्ञानिकांच्या क्षोभाला शासन लक्ष्य झालेले होते. कुठल्याही दृष्टीने विज्ञानाशी संबंध नसलेल्या विषयावर करदात्यांचा पैसा खर्च करणे निव्वळ अपव्यय ठरेल असे वैज्ञानिकांना वाटत होते. शासन मात्र एकदा या विषयाचा सोक्ष मोक्ष लावण्यासाठी पैसा खर्च करत आहे या बचावाच्या पावित्र्यात होते.

हॉर्वर्डच्या एका मानसतज्ञाच्या मते प्रार्थनेच्या प्रकारात अतींद्रिय शक्तीचा सहभाग असतो आणि तो विज्ञानाच्या कक्षेत येत नाही. यातून काही मिळणार नाही; एवढेच नव्हे तर याबद्दलच्या संशोधनात श्रम व पैसा व्यर्थ जातात असे त्याने ठाम विधान केले होते. परंतु प्रार्थनेचा पुरस्कार करणाऱ्या संशोधकांचा प्रार्थनेच्या रोगोपचार क्षमतेवर भलताच विश्वास असल्यामुळे प्रार्थनेचे परिणाम कसे होतात किंवा त्या तपासण्याची रीत कोणती याबद्दल मुख्य प्रवाहातील वैज्ञानिक अनभिज्ञ असतात म्हणून ते सरधोपट विधान करतात; त्यामुळे त्यांना समजून घेण्याची गरज नाही .असे प्रतिवाद करत होते.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ या संस्थेच्या पर्यायी रोगोपचार विभागाच्या मुख्यस्थाच्या मते हा प्रश्न धर्माचा नसून प्रत्यक्ष व्यवहारात याचा काही उपयोग होऊ शकतो का यावर भर द्यायला हवा. अस्पिरिनच्या गोळ्या डोकेदुखीवरील इलाजाप्रमाणे हृदयासंबंधीच्या रोगावरही परिणामकारी ठरू शकतात, हे आता आम्हाला कळले. कदाचित प्रार्थनेच्या अभ्यासातून हाती काही तरी लागेल असे या संस्थेला वाटत होते.

शासनाच्या एका सर्वेक्षणानुसार सुमारे 45 टक्के रुग्ण रोगोपचाराच्या कालावधीत प्रार्थनेचा अवलंब करतात व त्यांच्यातील बहुतेक, महागडे औषधोपचार न परवडणारे गरीब असतात. सार्वजनिक आरोग्योपचारासाठी प्रार्थनेतून काही लाभ मिळत असल्यास ते नाकारण्यात हशील नाही, असे शासनालाही वाटते.

काही समाजशास्त्रज्ञांच्या मते प्रार्थना हे रुग्णांच्या वेदनेविषयी सहानुभूती दाखवण्याचा एक प्रकार असून त्यात गैर काही नाही.

प्लासिबो परिणाम
2000 सालापासून प्रार्थनेचा रुग्णावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास किमान वेगवेगळ्या दहा ठिकाणी झाला असेल. त्यात बोस्टन येथील Mind/Body Medical Institute आणि शासन पुरस्कृत National Institute of Health (NIH - एनआयएच) या प्रमुख संस्थांचाही सहभाग होता. एनआयएच संस्था अपघातात इजा झालेल्यांच्यावर रुग्णाची ओळख असलेल्यांनी व ओळख नसलेल्यांनी केलेल्या प्रार्थनेमुळे होणाऱ्या प्लासिबो परिणामावर संशोधन करत होती. स्तनविकार झालेल्या काही स्त्री रुग्णांच्या संमतीने त्यांच्या पाठीवर मुद्दामहून थोडीशी इजा करण्यात आली. आणि दूर दूर ठिकाणी असलेल्या त्यांच्या नातेवाइकांना प्रार्थना करण्याची विनंती करण्यात आली. प्रार्थना करणाऱ्यांमध्ये वेगवेगळे उत्पन्न गटातील व वेगवेगळ्या चर्चशी संबंधित असलेले कॅथोलिक धर्मपंथीय होते. परंतु या अभ्यासातून हाती काही लागले नाही. अशाच प्रकारचे इतर अभ्यासही निष्फळ ठरले.

प्रार्थनोपचाराचे समर्थकसुद्धा अशा प्रकारचे अभ्यास फार फार क्लिष्ट असल्यामुळे ठाम निर्णयापर्यंत पोचणे अवघड जाते, अशी टीका करत होते. पुरस्कर्त्यांमध्येच ‘इजा’ कमी होण्यासाठी प्रार्थनेचा कुठला ‘डोज’ द्यायला हवे होते याबद्दल टोकाची मतं होती. काहींच्या मते एकेकट्यासाठी प्रार्थना केली तरी चालेल. परंतु इतरांच्या मते मोठ्या समूहानी प्रार्थना केल्यास अपेक्षित परिणाम दिसू लागतील. या समर्थकांमध्ये काही ख्रिश्चन धर्म प्रचारक, काही ज्यू धर्मगुरू, काही बुद्ध धर्मीय, आणि काही पर्यायी उपचार करणारे होते.

प्रार्थनेच्या उपचारासंबंधी अजून एका गृहितकाची मांडणी केली जाते. खरोखरच प्रार्थनेमुळे रुग्ण बरा होत असल्यास – या बद्दलच मुळात शंका उपस्थित केले जात होते – त्यात धर्म वा परमेश्वरावरील श्रद्धा वा बळजबरी नसल्यास – जे काही होत आहे ते ‘आंतरिक ऊर्जा’ वा दोन मनाचे संभाषण किंवा ज्ञात काळ – अवकाश या पलीकडील एखादी अदृश्य मिती या सदरात मोडते. वैज्ञानिकांनी मात्र या सर्व शक्यतांना नकार दिला. त्यांच्या मते आंतरिक ऊर्जा वा मना-मनामधील संभाषण या गोष्टी फक्त कल्पनेतच असू शकतात, वास्तवात नाही. काल व अवकाश या पलिकडे एखादी मिती असू शकते याबद्दलही ठाम पुरावे नाहीत. काहींना मात्र रुग्णाला आपल्यासाठी प्रार्थना केली जात आहे हे माहित झाल्यावर त्याच्या आजारावर सकारात्मक परिणाम होऊ शकतात असे वाटत होते. येथे एका प्रकारे feel good factor काम करत असावे.

एक मात्र खरे की मंदिराला नियमितपणे जाणाऱ्यातील कित्येकांना प्रार्थना हा प्रकार विज्ञानाच्या अखत्यारीतील विषय नाही, असेच वाटत आले आहे. कारण प्रार्थनेचा उद्देश व त्यातील आशय यामध्ये फार मोठ्या प्रमाणात विविधता असते – काही जण प्रार्थनेच्या वेळी परमेश्वराचे वर्णन करतात, काही जण (सहन) शक्ती देण्याची याचना करतात, तर काही जण सर्व काही भगवान के हाथ में या मनस्थितीतून प्रार्थना करत असतात. काहीना तर परमेश्वराला विनंती केल्यास तो नक्कीच विनंतीला मान्यता देऊन पदरी काही तरी टाकेल यावर विश्वास असतो.

परमेश्वराला अशा प्रकारे चाचणीला सामोरे करणे व प्रार्थनेचा पडताळा पाहणे हेच चुकीचे आहे, असे धर्मगुरूंना वाटते. हा सर्व प्रकार धर्माचरणाला काळिमा फासणारा आहे. जोपर्यंत परमेश्वर ज्ञात नैसर्गिक नियमांच्या आवाक्यात न येणारा आणि या नियमांच्यापेक्षा वेगळे काहीही करू शकणारा यावर वैज्ञानिक विश्वास ठेवत नाही तोपर्यंत त्यांचे निष्कर्ष चुकीचेच ठरणार, असे स्पष्ट मत धर्मगुरू नोंदवतात.

प्रार्थना आणि हृदय रोग
प्रार्थनेचे पुरस्कर्ते नेहमीच प्रार्थनेमुळे हृदय विकार कमी झालेले दाखले देत असतात. या दाव्यातील तथ्यांश शोधण्यासाठी सॅन फ्रान्सिस्को येथील एका हॉस्पिटलमध्ये चाचणी करण्यात आली. पुनर्जन्मावर विश्वास असलेले काही ख्रिश्चन, हृदयविकारग्रस्त 393 रुग्णापेंकी 192 रुग्णासाठी प्रार्थना करत होते. त्या हॉस्पिटलमधील तज्ञांच्या मते इतर रुग्णापेक्षा प्रार्थना केलेल्या रुग्णांच्या आरोग्यस्थितीत भरपूर सुधारणा दिसत होत्या. नेहमीच्या औषधांपेक्षा फार कमी औषधं ते घेऊ लागले. श्वासोच्छ्वासाचा त्रास कमी झाला. शोधनिबंधाच्या शेवटच्या ओळीत या तज्ञांनी परमेश्वराचे आभार मानून प्रार्थना किती उपकारक आहे असे निष्कर्ष काढले होते. अजून एका अभ्यासात 990 हृदयविकारग्रस्त रुग्णांसाठी कित्येक अनोळखी व्यक्तींनी प्रार्थना केल्यामुळे या रुग्णांच्या आजारासंबंधींच्या सुमारे 30 घटकावर सकारात्मक परिणाम झाला होता. या निबंधाच्या संशोधकांच्या मते डार्विनचा सिद्धांतच मुळात अंदाजपंचे आहे, तसेच त्यांचे निष्कर्षही त्यास मिळते जुळते आहेत.

गंमत म्हणजे या दोन्ही प्रयोगात संशोधकांना नेमके काय घडत आहे याची पुसटशीसुद्धा कल्पना नव्हती. कोण, कुणासाठी, केव्हा, कुठे प्रार्थना करत आहेत, प्रार्थनेचा आशय कोणता, किती वेळ प्रार्थना केली इत्यादींच्या नोंदी नव्हत्या, माहिती नव्हती. इतर चिकित्सकांच्या मते सरधोपटपणे केलेल्या अशा प्रकारच्या चाचणींच्या निष्कर्षावर विश्वास ठेवणे विज्ञानाशी प्रतारणा ठरेल. रुग्णाच्या आजारापणावरील घटकातील सुधारणा योगायोगानेसुद्धा झाली असण्याच्या शक्यतेला नाकारता येत नाही. संख्याशास्त्रज्ञांच्या मते जोपर्यंत अपेक्षित निष्कर्ष मिळत नाहीत तोपर्यंत प्रयोगानंतर प्रयोग करत राहणे असे काही तरी येथे घडल्यासारखे वाटते. यातील एका संशोधकाने स्वतःच एक फॉर्म्युला तयार करून सर्व विदा त्यात कोंबून निष्कर्ष काढलेला होता. परंतु मुळातच फॉर्म्युलाच्या योग्यायोग्यतेची दखल घेतलेली नव्हती. अनेक तज्ञांनी या प्रकारच्या निष्कर्षावर सडकून टीका केली. अतींद्रिय शक्तीवर विश्वास ठेवणारेच असे काही तरी निष्कर्ष काढतील अशी एक तिखट प्रतिक्रिया त्याबद्दल होती. तरीसुद्धा धर्मोपासक व पर्यायी उपचारांचे समर्थक प्रार्थनेमुळे होणाऱ्या परिणामांची चिकित्सा संशोधकांनी करायलाच हवे असे आग्रह धरत होते. हा एक open minded चिकित्सा असेल यावर त्यांचा भर होता.

संशोधनातच अफरातफर
Distant healing वरील संशोधनासाठी एका संशोधकाने विद्यापीठाकडून निधीची तरतूद केली होती. यात दूर अंतरावरील व्यक्तींनी रुग्णासाठी प्रार्थना केल्यास रुग्णावर काय परिणाम होऊ शकतात हा संशोधनाचा विषय होता. वेगवेगळ्या धर्मातील धार्मिकांनी व परमेश्वरच्या चमत्कारशक्तीवर श्रद्धा असणाऱ्यांनी प्रार्थनेमुळे रुग्णावर सकारात्मक परिणाम होतात याचा बराच बोलबाला झालेला असल्यामुळे या संशोधकाला हा विषय संशोधनासाठी घ्यावासा वाटला. या संशोधकाने काही एड्सग्रस्त रुग्ण व काही मेंदूचे कॅन्सर असलेले रुग्ण यांच्यावर दूर अंतरावरून केलेल्या प्रार्थनेचा काही उपयोग होतो का यासाठी निधी मागितली होती. हे दोन्ही प्रयोग सॅन फ्रान्सिस्को येथील एका हॉस्पिटलमध्ये करण्यात आले. परंतु हा संशोधकच काही दिवसानी ब्रेन कॅन्सरचा बळी ठरला. हॉस्पिटलने या संशोधनातील दूर अंतरावरून केलेल्या प्रार्थनेमुळे रुग्णावर होणाऱ्या सकारात्मक निष्कर्षाला भरपूर प्रसिद्धी दिली. परंतु संशोधकाच्या मृत्युनंतर त्यानी यापूर्वी केलेल्या चाचणीतील पुराव्यांची पुनर्तपासणी करण्यात आले. पुराव्यात भरपूर तफावत होती. मोठ्या प्रमाणात चुका होत्या. निष्कर्षात विसंगती होती. प्रयोगासाठी नोंदी केलेल्या रुग्णांची नावे व पत्ता आणि निष्कर्षातील रुग्णांची नावे व पत्ता यात ताळमेळ नव्हता. हॉस्पिटलचे मुख्यस्थ मात्र आमच्याजवळ निष्कर्ष होते व त्यावर आमचा विश्वास बसत नव्हता. आम्ही त्याची छाननी करू शकलो नाही, विश्लेषण करू शकलो नाही, तरीसुद्धा आम्ही निष्कर्षाना जाहीर प्रसिद्धी दिली असे कबूल केले. कदाचित निधी मिळवण्यासाठी अपरातफर केल्याची शक्यता वर्तविली जात होती. या सर्व व्यवहारात सुमारे 20 लाख डॉलर्सची अफरातफर झाली होती. संबंधितावर खटलेही भरले गेले. सुरुवातीला उल्लेख केलेल्या कोलंबिया विद्यापीठातील संशोधनातही असाच प्रकार घडला होता अशी बातमी न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राने छापली.

जॉन टेंपलटन फौंडेशनने 25 लाख डॉलर्सची निधी Mind/Body Medical Instituteला प्रार्थनेच्या परिणामावरील संशोधनासाठी दिले होते. मन व शरीर यामधील अंतर्गत संबंधावर संशोधन करत असलेली ही संस्था होती. या संशोधनात 1800 रुग्णांनी आपणहून भाग घेतला. हृदयाचे बाय पास शस्त्रक्रिया झालेल्या या रुग्णांना शहरातील सहा हॉस्पिटल्समध्ये शस्त्रक्रिये-नंतरचे निरीक्षण व उपचारासाठी ठेवलेले होते. वैद्यकीय मार्गदर्शनानुसार त्यांच्यावर प्रार्थनेचा काय परिणाम होतो याची माहिती गोळा करण्यात आली. काही डॉक्टर्सच्या मते हे संशोधन अगदी बारीक सारीक तपशिलासह अतिशय गांभिर्याने केले जात होते. वैद्यकीय जगतात उत्सुकता शिगेला पोचली होती. परंतु या संशोधनाचे निष्कर्षच कधी प्रसिद्ध झाले नाहीत. नावाजलेल्या दोन वैद्यकीय विषयक नियकालिकांनी शोधनिबंध प्रसिद्ध करण्यास नकार दिला. या निबंधाच्या संशोधकाच्या मते हे सामान्य शोधनिबंध नसून वैद्यकीय शास्त्राला कलाटणी देणारे निबंध असेल. विज्ञान व धर्म यांचे सांधेजोड करणारा हा पुरावा असेल. तरीसुद्धा हे संशोधन कधीच प्रकाशात आला नाही. संशोधकांचे वैयक्तिकरित्या ईश्वर व धर्म यावर असलेली श्रद्धा संशोधनाकडे वस्तुनिष्ठ रीतीने पाहण्यास आडकाठी आणली असेल असे त्यावर टीका करणाऱ्यांचे मत होते.

अजून एका प्रयोगात 40 व्यसनाधीन रुग्णावर प्रार्थनेच्या परिणामांचा अभ्यास केला. तेथेही काही हाती लागले नाही. या रुग्णांना आपल्यासाठी प्रार्थना केली जात आहे हे माहित होते तरीही त्यांची स्थिती आणखी बिघडत गेली.

प्रार्थनेसंबंधीच्या समस्या
प्रार्थनेच्या विषयात संशोधन करत असताना संशोधकांना डोकेदुखी ठरणाऱ्या काही प्रश्नांचा सामना करावा लागतो.

 • प्रार्थनेचे संख्यात्मक व गुणात्मक अशी विभागणी केल्यास संख्यात्मक विभागणीत प्रार्थनेची वारंवारता, प्रार्थनेची संख्या, प्रार्थनेसाठी दिलेला वेळ, प्रार्थना करणाऱ्यांची संख्या इत्यादी घटकांचा अभ्यास करता येईल का?
 • गुणात्मक विभागणीत प्रार्थना करणाऱ्यांची संवेदनशीलता, त्यांची तीव्रता, त्याचे गांभीर्य इत्यादी गोष्टी तपासता येतील का? परंतु हे घटक व्यक्तिनिष्ठ असल्यामुळे वस्तुनिष्ठतेला प्राधान्यक्रम देणाऱ्या वैज्ञानिकांना याचा काहीही उपयोग होत नसावा.
 • प्रार्थनेतील आशयामुळे प्रार्थनेचे यशापयश ठरत असल्यास – काहींची प्रार्थना जास्त appealing असू शकेल – त्याचे मोजमाप करता येईल का?
 • प्रार्थना श्रद्धा या प्रकारात मोडत असल्यामुळे श्रद्धेचे मोजमाप करता येईल का?
 • प्रार्थनेचे यशापयश रुग्णासाठी किती जणांनी प्रार्थना केली यांच्यावर अवलंबून असू शकेल का?
 • प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीचे लिंग, वय, धार्मिकतेकडील कल, अनुभव, प्रार्थनेचे कौशल्य यावरून प्रार्थनेचे यशापयश ठरत असेल का?
 • प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीची नैतिकता, सामाजिक बांधिलकी, सहानुभूती, संवेदनशीलता, सहिष्णुता, औदार्य, आस्तिकता इत्यादी घटकांचा प्रार्थनेच्या अनुकूल वा प्रतिकूल परिणामावर प्रभाव असू शकेल का?
 • कुणासाठी प्रार्थना केली जात आहे याचाही प्रभाव होत असेल का?
 • प्रार्थनेचे चांगले परिणाम दिसून येण्यासाठीचे निकष कोणते?
 • या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं शोधणे वैज्ञानिकांना जिकिरीचे ठरते. त्यामुळे संशोधन पुढे सरकत नाही. संशोधक, श्रद्धावंतांच्या परमेश्वराला मानवी पातळीवर – माणसाचे सर्व गुणावगुणासकट - आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप केला जातो. संशोधकामुळे आस्तिकांच्या सर्वज्ञ, सर्वव्यापी, सर्वांतर्यामी परमेश्वराच्या अस्तित्वाला धक्का बसतो. त्यामुळे प्रार्थना हे वैज्ञानिकांचा संशोधनाचा विषय न राहता धर्माशी निगडित अशी एक entity म्हणून त्याकडे बघावे लागत आहे. जेव्हा परमेश्वराला अशा प्रकारे मानवी पातळीवर आणण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हासुद्धा अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात.

 • आस्तिकांचा हा परमेश्वर एका कुशल व्यापाऱ्याप्रमाणे प्रार्थना करणाऱ्यांची संख्या, त्याची वारंवारता वा प्रार्थनेतील आशय बघून रुग्णावर परिणाम करत असेल का?
 • परमेश्वर फक्त उत्कृष्ट प्रार्थनेलाच प्रतिसाद देत असेल का?
 • प्रार्थनेचा योग्य प्रकार हेच निकष असल्यास अधिकृत फॉर्मवरील विनंतीची मागणी करणाऱ्या सरकारी नोकरामध्ये व परमेश्वरामध्ये काहीही फरक नाही असे म्हणता येईल का?
 • प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीचा त्याग, वा त्यानी प्रार्थनेच्या वेळी दिलेली आश्वासनं यावर प्रार्थनेची फलनिष्पत्ती होत असल्यास परमेश्वर हा मुरलेला व्यवहारी आहे असे म्हणता येईल का?
 • प्रार्थना करणाऱ्यांची संवेदनशीलता प्रार्थनेतून व्यक्त होत असल्यास त्यातील बारकावे परमेश्वराच्या लक्षात येत असतील का?
 • प्रार्थनेच्या वेळी दिलेली आश्वासनं व विनंती परमेश्वर कशाप्रकारे विश्लेषण करत असेल कुठली विनंती योग्य आहे हे त्याला कसे कळत असेल?
 • प्रार्थनेतील विनंती वा आश्वासनं यापेक्षा प्रार्थना करणाऱ्यांची श्रद्धा हा निकष महत्वाचा ठरत असेल का?
 • प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीची नैतिकता, धार्मिकता, सत्य़ाबद्दलचे प्रेम, प्रामाणिकपणा इत्यादी गुणविशेषांना परमेश्वर महत्व देत असेल का? जर या गुणविशेषांना प्राधान्य देत असल्यास परमेश्वरासमोर सर्व जण सारखेच या उक्तीचे काय?
 • परमेश्वर हा करुणाळू आहे असे सर्व धर्म सांगत असतात. परंतु ही करुणा फक्त काही निवडक लोकापुरते मर्यादित असल्यास रुग्णावर होणाऱ्या परिणामांना जबाबदार कोण?
 • प्रार्थनेचे यशापयश, प्रार्थना करणाऱ्याचे धर्म, जात, वा कुठल्या देवतेला तो/ती शरण जात आहे यावर अवलंबून असेल का? देव देवतांच्यामध्ये कार्यविभागणी असेल का? आपण कुठल्या देवतेला शरण गेल्यास आपली मनोकामना पूर्ण होईल हे कसे कळू शकेल?
 • हत्तीसाठी केलेली प्रार्थना व मुंगीसाठी केलेली प्रार्थना यात काही फरक असू शकेल का?
 • प्रार्थनेमुळे रुग्ण बरा होणे हे एक चमत्कार वा चमत्कारसदृश घटना असेल तर हा चमत्कार सरसकट सर्व रुग्णाच्या बाबतीत का होत नाही?
 • या प्रश्नांना विज्ञानात उत्तरं नाहीत. धार्मिक दृष्टिकोनातून उत्तर शोधत असल्यास आपापले धर्मगुरू सांगतील तेच व तेवढेच उत्तर असे म्हणता येईल. वैज्ञानिक दृष्ट्या मोजमाप करण्यास येथे वाव नाही.

  1. एखाद्याची श्रद्धा, अनुकंपा, सहानुभूती, धार्मिकता, नैतिकता कसे मोजणार?
  2. प्रार्थनेचे यशापयश कसे मोजणार? कारण काही वेळा रुग्णामध्ये थोडासा फरक पडलेला दिसतो व काही वेळा लक्षणीय प्रमाणात. यात प्रार्थनेचा वाटा किती व औषधोपचारांचा वाटा किती?

  हे शक्य होत नसल्यास प्रत्येक चाचणीसाठी वेगवेगळे निकष निर्धारित करावे लागतील. त्यामुळे या चाचण्या वस्तुनिष्ठ राहणार नाहीत.

  प्रार्थनेसाठी संघटित धर्मातील देव-देवताऐवजी एखाद्या अज्ञात शक्तीची वा ऊर्जेची प्रार्थनासुद्धा करता येईल. या शक्तीला शरण गेल्यास रुग्ण बरे होतील का? ही शक्ती कुठे असते? त्याची दिशा ठरलेली असते का? त्याच दिशेला उभे राहून प्रार्थना करावे का? निर्दिष्ट वेळेलाच प्रार्थना करायला हवे अशी अट असेल का? असे अनेक प्रश्न आपल्याला उपस्थित करता येतील

  एक मात्र खरे की प्रार्थनेमुळे कर्करोगाच्या गाठी नाहिश्या झालेले नाहीत वा पक्षघाताची तीव्रता नष्ट झालेली नाही किंवा मृत मेंदू जिवंत झाला नाही हे सत्य आपण स्वीकारायला हवे. आतापर्यंत झालेल्या अभ्यासावरून प्रार्थना हा काही soft outcome साठी उपयोगी ठरला आहे असे म्हणता येईल. उदा – सुरक्षित बाळंतपण वा शरीरावरील क्षुल्लक इजा. प्रार्थनेपासून यापेक्षा जास्त अपेक्षा करणे निरर्थक ठरू शकेल.

  वर उल्लेख केलेल्या चर्चेतून आपण काही शिकणार आहोत की नाही हा आपल्यासमोरचा प्रश्न आहे. मृगजळामागे पळण्यात काही अर्थ नाही हे स्पष्ट दिसत असतानासुद्धा अजूनही प्रार्थनेतून रोग बरा होऊ शकतो, पाऊस पडू शकतो, अडचणी दूर होऊ शकतात, आंधळ्याला दिसू लागते, पांगळा डोंगर चढू शकतो इत्यादीवर विश्वास ठेवणाऱ्यांची व त्याचे समर्थन करणाऱ्यांची संख्या काही झाले तरी कमी होत नाही. कदाचित ही श्रद्धाळूंची अगतिकता असेल. परंतु याच अगतिकतेचा फायदा घेणाऱ्यांचे त्यामुळे आयतेच फावते. म्हणूनच अधून मधून अशा बातम्यांचे पीकही येत असते व फसविणाऱ्यांची थोडी फार छी थू होते. परंतु या छी थूला ते कधीच घाबरत नसतात. या गल्लीत छी थू झाले की आणखी एका गल्लीत, वा गावात वा कुठेतरी ते दुकान मांडतात व सावजाला हेरत असतात. गंमत म्हणजे त्यांची भरभराटीही होते.

  म्हणूनच सावधान! हा इशारा द्यावासा वाटतो.

  संदर्भः Can Prayers heal? Benedict Carey, 2004
  Prayer and healing: A medical and scientific perspective on randomized controlled trials, Chittaranjan Andrade and Rajiv Radhakrishnan, Journal of Psychiatry, 2009

  धाग्याचा प्रकार निवडा: : 
  माहितीमधल्या टर्म्स: 
  field_vote: 
  0
  No votes yet

  प्रतिक्रिया

  हो.

  लोकांना काम नाहीत, कसले पण संशोधन करताहेत. जर हे खरं असेल तर त्याच न्यायाने मी जर दुसऱ्याचा मरण्याची प्राथना केली तर मरायला पाहिजे. ~125 करोड वाला भारत सगळ्यात पॉवरफुल व्हायला पाहिजे. **

  आणि चीन भारतापेक्षा आणखी पावरबाज होणार नाही, कारण तिथे बहुतेक लोक अधार्मिक आहेत.

  ---

  सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

  १२५ करोड की ६०० करोड? नक्की किती?

  इष्टदेवतेचे/ओंकाराचे/गायत्री वा अन्य तत्सम पवित्र मानल्या गेलेल्या मन्त्राचे ध्यान आणि त्याचे चिन्तन - meditation - ह्यांच्या बाबतीत हाच प्रश्न उपस्थित होऊ शकतो. आणि हो - विपश्यनेचे काय?

  आपल्याकडचे सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे, कुली चित्रपटाच्या वेळच्या अपघातात अमिताभ जखमी होऊन मरणपंथाला लागला होता, तेंव्हा त्याच्या लाखो-करोडो चाहत्यांनी एकसाथ प्राथना केल्यामुळे(च) त्याचे प्राण वाचले - असे सर्व वृत्तपत्रांनी त्यावेळेस ठळकपणे छापले होते. त्याला अर्थातच शास्त्रीय आधार नव्हता.
  तर त्यातले तथ्य काय ?

  आम्हाला त्याचे प्राण कशामुळे वाचले, असा प्रश्न पडत नाही.

  का वाचले, असा प्रश्न पडतो.

  कसला भयंकर पिच्चर होता तो!

  खरं म्हणजे कुणाला काही द्यायचे बाकी राहिले असेल ते देऊन झाल्याशिवाय कुणी मरत नाही. प्रार्थनावाले, अंगारावाले,रुद्रवाले उगाच श्रेय ढापतात.

  काही वर्षापूर्वी महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस येण्यास नेहमीपेक्षा फार उशीर झाला. त्यामुळे आपल्या राज्यपालाने महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट दूर करण्याच्या उद्देशाने महाराष्टातील सर्व शाळेतील सर्व विद्यार्थ्यानी एका निर्दिष्ट वेळी वरुणराजाची प्रार्थना करावी असा फतवा काढला. सर्वांनी असे एकमुखी प्रार्थना केल्यास पुढील 48 तासात पाऊस नक्कीच पडेल याची त्यांना खात्री होती. लाखो विद्यार्थ्यांनी प्रार्थना करूनसुद्धा त्यांच्या अंदाजाप्रमाणे पाऊस काही पडला नाही, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
  हे सर्व त्याकाळी फक्त प्रार्थनेवर निभावले. आजचे शासन असते तर सर्व शाळा कॉलेजिसने पर्जन्ययाग करावा असा फतवा काढला असता. व सर्व शिक्षकांना वेठीस धरले असते!

  ...मागे एकदा (२००७ साली) दुष्काळ पडला होता तेव्हा आमच्या तत्कालीन (उजव्या) गौरनरानेसुद्धा असलाच फतवा काढला होता, असे आठवते.

  हे तुमचं टेक्सस, उदाहरणार्थ.

  -Nile

  कदाचित अशा प्रकारच्या out and out फसवा फसवीच्या गोष्टीवर संशोधन करणे वैज्ञानिकांना आवडत नसावे किंवा त्यांना (धार्मिक संघटना व्यतिरिक्त) कुणीही निधी उपलब्ध करून देत नसावेत.
  गूगलवर शोधल्यानंतर रॅशनल विकीतील माहिती व संदर्भ वाचनीय आहेत.
  2014 साली प्रसिद्ध झालेला ALTERNET चा हा लेख बालमृत्यु व प्रार्थना याबद्दल बरेच काही सांगत आहे.
  भारतातील मनशक्ती या संस्थेच्या मुख्यस्थाचा प्रार्थनेची स्तुती करणारा लेख गंमत म्हणून वाचायला हरकत नाही.

  प्रार्थनेचं माहिती नाही पण..

  प्रार्थनेमुळे आजार बरे होत नसतील पण त्यावरील श्रद्धेमुळे आजाराशी सामना करायला सश्रद्ध रुग्णाला मानसिक बळ मिळते.

  प्रकाश घाटपांडे
  http://faljyotishachikitsa.blogspot.in/