टीप : मूळ इंग्रजी लेख डॉ. प्राची साठे (एम.डी., एफ.आर.सी.पी., एफ.सी.सी.सी.एम.) यांच्या ब्लॉगवर ५ एप्रिल २०२० रोजी पोस्ट केला गेला आहे. डॉ. साठे या पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये अतिदक्षता विभागाच्या (आय.सी.यू.) संचालिका आहेत. भाषांतरासाठी त्वरित परवानगी दिल्याबद्दल डॉ. प्राची साठे यांचे 'ऐसी अक्षरे'तर्फे आभार.
व्हेन्टिलेटर्स या जीव वाचविणाऱ्या यंत्रांबद्दल असलेले अनेक गैरसमज दूर करून, सत्यपरिस्थिती काय आहे हे लोकांसमोर आणणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी हा प्रपंच...
अनुवाद : डॉ. अजेय हर्डीकर
-----------------
थोडासा इतिहास
ऱ्होड आयलंड पोलिओ साथीदरम्यान टँक रेस्पिरेटर आणि लोखंडी फुफ्फुसे लावलेला एक रुग्ण डॉक्टरांच्या तपासणीदरम्यान. (१९६०) स्रोत : सीडीसी
आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जेव्हा जेव्हा काही गंभीर आपत्ती समोर येतात तेव्हा तेव्हा चाकोरीबाहेर जाऊन, सर्जनशील विचार करून उत्तरं शोधावी लागतात, याला इतिहास साक्षीदार आहे. १९५२ साली कोपनहेगन येथे आलेल्या पोलिओच्या साथीचं उदाहरण बघूया. तिथे काही आठवड्यांच्या अल्प कालावधीतच सुमारे ३०० रुग्णांची श्वसनसंस्था काम करेनाशी झाली (रेस्पिरेटरी परॅलिसिस). खास संसर्गजन्य रोगांसाठी असलेल्या हॉस्पिटल्सची त्रेधा उडाली. अशा कठीण प्रसंगी एरवी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करून बघाव्या लागतात. त्या मंडळींनी वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या तुकड्या तैनात केल्या. ॲनेस्थेटिस्ट्सच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांच्या गळ्याला भोक पाडून (ट्रॅकिऑस्टमी) त्यात नळी घालून, रबरी पिशव्या हाताने दाबून, या रुग्णांचा श्वासोच्छवास चालू ठेवला.
दुसरं उदाहरण बीजिंगचं. २००३ मध्ये तिथे एव्हिअन फ्लूची साथ आली होती. तेव्हा मोबाइल फोनवरून परदेशातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या विषयातला अनुभव नसलेले शिकाऊ डॉक्टर्स सीलबंद आय.सी.यू. मध्ये एव्हिअन फ्लूच्या रुग्णांवर उपचार करत होते.
---
प्रस्तावना
आधुनिक काळातला व्हेन्टिलेटर
खवळलेल्या समुद्रात जर कोणी गटांगळ्या खात असेल, तर एखादी छोटीशी होडी कदाचित त्याचे प्राण वाचवू शकेल. पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा काही वेळाने समुद्र शांत होईल, किंवा होडी जवळच्या किनाऱ्याला लागेल. होडी काही वादळाला रोखू शकत नाही, पण निदान त्या बुडत्याला थोडाफार आधार देऊ शकते. व्हेन्टिलेटरची तुलना अशा होडीशी करता येईल. असं असूनही, आणि अनेकांचे प्राण वाचूनही, कृत्रिम श्वासोच्छवासाबद्दल (आर्टिफिशल व्हेन्टिलेशन) जनमानसात अनेक गैरसमज पसरले आहेत. अतिदक्षता विभागात केल्या जाणाऱ्या उपचारपद्धतींमध्ये (विशेषतः ‘लाइफ सपोर्ट इंटरव्हेन्शन्स’) असलेल्या गुंतागुंतीच्या संदर्भात तर खूपच अज्ञान दिसून येतं.
सध्या संपूर्ण जगासमोर नॉव्हेल करोनाव्हायरसचं एक गंभीर आव्हान उभं आहे. अनेक रुग्णांना अतिदक्षता विभागात भरती व्हावं लागतंय. या परिस्थितीत व्हेन्टिलेटरच्या वापरामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. किंबहुना अत्यवस्थ रुग्णाला वाचविण्याचा तो सर्वोत्तम मार्ग ठरतो आहे. लॉकडाऊन, संचारबंदी आणि आर्थिक आपत्तीच्या जोडीला घरोघरी व्हेन्टिलेटर्सच्या कथित तुटवड्याबद्दल चर्चा होत आहेत. प्रत्येक देश आपल्यापाशी चालू अवस्थेत किती व्हेन्टिलेटर्स उपलब्ध आहेत, याचा आढावा घेत आहे – युद्ध सुरू करण्याआधी शस्त्रास्त्रांचा घेतात तसाच.
१३० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात, खाजगी आणि सरकारी हॉस्पिटल्स मिळून सुमारे ४०,००० व्हेन्टिलेटर्स चालू स्थितीत आहेत. कोव्हिड-१९ जगात ज्याप्रमाणे पसरतोय, ते पाहता दर सहा बाधित रुग्णांपैकी एकाचा आजार गंभीर स्वरूप धारण करतो. यात श्वसनामध्ये येणारे अडथळे आलेच. जगभर जे चित्र दिसतंय, त्याप्रमाणे आपल्याकडेही हॉस्पिटल्सच्या तुलनेत रुग्णसंख्या खूप जास्त होण्याची शक्यता आहे. पुरेशी साधनसामग्री हाताशी नाही, अशा परिस्थितीत कोणाचे प्राण वाचवायचे, आणि कोणाचे नाही, हे ठरवण्याचं धर्मसंकट डॉक्टर्सपुढे उभं राहणार आहे. स्थानिक पातळीवर तयार करता येईल असं स्वस्त यंत्र बनविण्यासाठी अनेक मंडळी कार्यरत आहेत, आणि अशा प्रयत्नांना आपलं सरकार प्रोत्साहन देतंय, ही आनंदाची गोष्ट आहे.
व्हेन्टिलेटर म्हणजे काय?
तो जीव वाचवणारा आहे का? की काही वर्षांपूर्वी आमीर खानच्या ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमात म्हटल्याप्रमाणे ते ‘पैसे बनविण्याचं मशीन’ आहे? की माणसाचं निरर्थक आणि निष्फळ अस्तित्व चालू ठेवण्याचं एक साधन आहे? तर व्हेन्टिलेटर म्हणजे रुग्णाच्या खाटेशेजारी असलेलं एक असं यंत्र आहे जे दोन अतिशय महत्त्वाची कामं करतं – स्वतःच्या फुफ्फुसात पुरेशा प्रमाणात हवा खेळती ठेवण्याइतपतही ताकद नसलेल्या, किंवा गंभीररीत्या आजारी असलेल्या रुग्णाच्या रक्तापर्यंत पुरेसा ऑक्सिजन पोचविणं, आणि साचून राहिलेला कार्बनडायऑक्साईड रक्तातून बाहेर काढणं. ‘पॉझिटिव्ह प्रेशर’च्या साहाय्याने योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवण्याचं काम व्हेन्टिलेटर करतो. शिवाय श्वासोच्छवास घेण्यात अत्यवस्थ रुग्णाची जी दमछाक होते, त्यातून त्याला विश्रांतीही मिळते. त्यामुळे शरीराची झालेली झीज भरून निघणं सुलभ होतं.
श्वास घ्यायला त्रास होणाऱ्या (रेस्पिरेटरी डिस्ट्रेस) रुग्णांसाठी व्हेन्टिलेटर्स म्हणजे आम्हा डॉक्टर्सशी खांद्याला खांदा लावून लढणारा ताकदवान साथीदार असतो. व्हेन्टिलेटर्स मूळ आजार बरा करत नाहीत किंवा ते वापरणं हा एकमेव उपचार असू शकत नाही, हे खरंच आहे. रुग्णाच्या शरीरात चालू असलेले अनेक चढ-उतार सांभाळत असताना व्हेन्टिलेटर्स आम्हाला हाताशी थोडा वेळ देतात. म्हणजेच ते ‘सपोर्ट सिस्टिम’ची भूमिका निभावतात. फुफ्फुसांना बरं व्हायला संधी देतात. हे सर्व खरं असलं तरी, जीव वाचवू शकणाऱ्या या यंत्रांविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी ही वेळ योग्य आहे.
ICUमधली वेगवेगळी यंत्रं
व्हेन्टिलेटर्सविषयी कोणकोणते गैरसमज आहेत, आणि त्याबद्दलची सत्यपरिस्थिती काय आहे?
गैरसमज : एकदा का पेशंट व्हेन्टिलेटरवर ठेवला गेला, की मृत्यू अटळ असतो.
सत्य : जेव्हा आजाराचं स्वरूप गंभीर असतं, किंवा शरीर अतिताणाखाली (स्ट्रेस) असतं, तेव्हा हृदय आणि फुफ्फुसांना जमेल तितका सपोर्ट आवश्यक असतो. शरीरातल्या अनेक क्रिया-प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीच्या असतात, त्यांचा समतोल काटेकोर नियंत्रणाखाली असतो. त्यामुळे नाजूक अवस्थेत श्वासोच्छवास कृत्रिमरीत्या नियंत्रित करणं उपयुक्त ठरतं. व्हेन्टिलेटरवर असलेल्यांपैकी ७५%-८५% रुग्ण बरे होतात आणि दीर्घ काळ व्हेन्टिलेटरवर असूनही भविष्यात आरोग्यपूर्ण आयुष्य जगतात.
गैरसमज : व्हेन्टिलेटर्स फक्त मरण पुढे ढकलतात.
सत्य : प्रत्येक आजाराच्या बाबतीत ‘रिव्हर्सिबल’ आणि ‘इररिव्हर्सिबल’ अशा दोन अवस्था असतात. त्यामुळे असाध्य वाटणाऱ्या आजारांच्या बाबतीतही रुग्ण बरा होऊ शकेल अशी सूक्ष्म का होईना, संधी हाताशी उपलब्ध असते (विंडो ऑफ रिव्हर्सिबलिटी). इथे मशीनच्या जोडीला अतिदक्षता विभागातल्या तज्ज्ञाचा (इंटेन्सिव्हिस्ट) अनुभव महत्त्वाचा असतो. सुयोग्य वेळी, म्हणजे आजार हाताबाहेर जाण्याअगोदर जर मशीन वापरलं, तर रुग्ण बरा होण्याला मदत होते.
गैरसमज : डॉक्टर्स आपल्या मर्जीनुसार व्हेन्टिलेटर वापरतात.
सत्य : जीवन-मरणाच्या मध्ये अधांतरी असलेल्या रुग्णाला व्हेन्टिलेटर केव्हा लावायचा याचे काही शास्त्रीय निकष आहेत. हे निकष अतिशय निर्णायक ठरू शकतात. विज्ञानाच्या जोडीला रुग्णाच्या कुटुंबियांशी चर्चा करून मगच व्हेन्टिलेटर लावण्याचा निर्णय घेतला जातो.
ICUमधल्या रुग्णाच्या आरोग्यावर देखरेख
गैरसमज : एकदा रुग्ण व्हेन्टिलेटरवर ठेवला की डॉक्टरांना फारसं काम उरत नाही.
सत्य : व्हेन्टिलेटरच्या एका रुग्णामागे अनेक मंडळी कार्यरत असतात – ज्येष्ठ इंटेन्सिव्हिस्ट, निवासी डॉक्टर्स, मेडिकल कन्सल्टन्ट्स, इत्यादी तज्ज्ञ चोवीस तास सेवेत असतात. दिल्या जाणाऱ्या ऑक्सिजनची टक्केवारी, मिनिटाला किती श्वासोच्छवास, कार्बनडायऑक्साईड बाहेर कसा काढायचा, फुफ्फुसांना इजा होऊ नये याची काळजी कशी घ्यायची, अशा अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं.
नर्सेसही खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. यात रुग्णाचं आणि त्याच्या कुटुंबियांचं मनोधैर्य टिकवून ठेवण्याचा भाग मोठा असतो. लॅब टेक्नीशियन्स आणि इमेजिंग (एक्सरे, स्कॅन, वगैरे) तज्ज्ञ यांनाही रोजच्यारोज आपापल्या भूमिका असतात. व्हेन्टिलेटरवरून रुग्णाला बाहेर काढताना त्याचे ढिले पडलेले स्नायू पूर्ववत करण्यासाठी फिझिओथेरपिस्ट लागतात, शिवाय रुग्णाची स्वच्छता, त्याची पोझिशन बदलणं, आणि लागणाऱ्या इतर किरकोळ गोष्टी सांभाळायलाही स्टाफ लागतोच.
गैरसमज : व्हेन्टिलेटरवर असणं म्हणजे जीव धोक्यात घालणं.
सत्य : व्हेन्टिलेशनमधला मुख्य धोका म्हणजे इन्फेक्शन. व्हेन्टिलेटरच्या नळ्यांमधून रोगजंतू फुफ्फुसांत शिरू शकतात. आपला नैसर्गिक श्वासोच्छवास म्हणजे ‘निगेटिव्ह प्रेशर व्हेन्टिलेशन’ असतं. याउलट, व्हेन्टिलेटरद्वारा ‘पॉझिटिव्ह प्रेशर व्हेन्टिलेशन’ दिलं जातं, त्यामुळे शरीराच्या क्रियांवर त्याचा परिणाम होणं स्वाभाविक आहे. हृदयावर प्रेशर येतं आणि त्यावर ताण येतो. कधी कधी रक्तदाब कमी झाल्याने हृदयावर जास्तच ताण येतो. कधी कधी फुफ्फुसांच्या आतला रक्तदाब वाढू शकतो. अर्थात या गोष्टी शक्यतो होऊ नयेत यासाठीच तर आम्ही इंटेन्सिव्हिस्ट मंडळी रात्रंदिवस झटत असतो.
गैरसमज : एकदा एखाद्याला व्हेन्टिलेटरवर ठेवलं, की हॉस्पिटल दीर्घ काळ त्याला त्याच्यावर ठेवतं.
सत्य : रुग्णाच्या शरीराला उसंत देऊन, बरं होण्यास मदत करणं हा व्हेन्टिलेटरचा मुख्य हेतू असतो. बहतेक वेळा रुग्णाला स्वतःचा स्वतः श्वास घेता येऊ लागला, की त्याला व्हेन्टिलेटरवरून काढलं जातं. अनेक प्रकारच्या चाचण्या घेऊन रुग्णाची श्वास घेण्याची कुवत डॉक्टर्स आजमावतात. अर्वाचीन काळातली एक अतिशय मोठी लढाई लढण्यात जगातल्या आरोग्यसेवा प्रणाली जुंपलेल्या आहेत. याची मुळं इकडेतिकडे, सर्वदूर पसरली आहेत. आम्ही डॉक्टर्स, आपत्कालीन व्यवस्थापन नियोजनाचा भाग म्हणून आमच्या नित्याच्या कामापेक्षा या काहीशा वेगळ्या कामाशी दोन हात कसे करायचे, याचे विविध मार्ग पडताळून पाहतोय. जीव वाचवणं हे आमचं नित्याचंच काम आहे. पण हा काळ कसोटीचा आहे. आम्हाला नवीन प्रकारे विचार करायला लागणार आहे आणि प्रतिभेचा वापर करून योग्य ती उत्तरं शोधावी लागणार आहेत.
-----------------------------------
मूळ लेखक : डॉ. प्राची साठे (एम.डी., एफ.आर.सी.पी., एफ.सी.सी.सी.एम.), पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये अतिदक्षता विभागाच्या (आय.सी.यू.) संचालिका
मूळ लेखाचा दुवा
अनुवाद : डॉ. अजेय हर्डीकर (अनुवादक पुण्यातील एका नामवंत वाहननिर्मिती कंपनीतून वैद्यकीय अधिकारी पदावरून नुकतेच निवृत्त झाले आहेत.)
प्रताधिकार : डॉ. प्राची साठे
सद्यस्थितीविषयी जनप्रबोधन करण्यासाठी हा अनुवाद केला आहे. त्यामागे अनुवादकाचा किंवा 'ऐसी अक्षरे'चा व्यावसायिक अथवा अन्य हेतू नाही.
व्हेंटिलेटर ही एक जीवन रक्षक प्रणाली आहे
व्हेंटिलेटर एक जीवन रक्षक प्रणाली आहे .
फुफुसात दोष निर्माण झाल्यास पर्याय म्हणून ते वापरलं जाते .
पण तो काही उपचार नाही व्हेंटिलेटर मुळे जे दिवस आपल्या हातात राहतात त्या काळात फुफुसाचे कार्य चालू होणे गरजेचे आहे .
तरच रोगी वाचू शकतो.
व्हेंटिलेटर वर जास्तीजास्त किती दिवस व्यक्ती जिवंत राहू शकते?
ह्याचा काही डाटा आहे का