दूर गेल्यामुळे जवळून दिसलेले जग (भाग २) - पुणेकरांना केले उणे...

दूर गेल्यामुळे जवळून दिसलेले जग
हेमा पुरोहित

भाग दुसरा - पुणेकरांना केले उणे...

आज २० मार्च. उद्या भारतात परत जायचे... २१ तारखेचे सकाळचे विमान शेवटचेच international flight. त्यामुळे ते उडेपर्यंत थोडी धाकधूक होती. कोरोनाने खूप करामती झाल्या होत्या. तीन आठवडेच झाले होते अमेरिकेत येऊन पण तेवढ्यात परिस्थिती खूप बदलली आणि मनोरंजनाची जागा मानसिक तणावाने घेतली.

अखेर २२ तारखेला दुपारी साडेतीनला दिल्लीला सुखरूप पोचलो. बाहेर येताना प्रत्येकाचे स्क्रिनिंग. पुढे पुढे सरकताना हुश्श होत होते. तेवढ्यात प्रत्येकाला एकेक खाद्यपदार्थांचे पॅकेटही मिळाले. कारण कळले नाही म्हणून आश्चर्यही वाटले. बेल्टवरून बॅगेज घेतले आणि विमानातच भरलेला self declarationचा फॉर्म हातात घेऊन एका लाईनीत उभे राहिलो. जेव्हा तो चेक झाला तेव्हा लक्षात आले खाद्यपदार्थांचे पॅकेट मिळण्याचे कारण – आम्हांला विलगीकरणात ठेवणार होते. सर्व ज्येष्ठ नागरिक, ज्यांना रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड वगैरेची गोळी चालू आहे ते सावधानता म्हणून विलगीकरणात जाणार होते. बाकी सर्दी, खोकला, ताप वगैरे काहीही नव्हते तरीही. सरकारची ही उपाययोजना खूप चांगली हे मान्य करावेच लागेल. आमच्यानंतर विदेशातून आलेल्या अजून २ विमानांतून प्रवासी वाढत गेले. आणि मग तिथले वातावरणच बदलले. पुढे काय हे काहीच कळत नव्हते. आमचे पासपोर्ट आधीच काढून घेतल्यामुळे शांत बसणे गरजेचे होते. ३ / ४ तास होऊन गेले तसे छोट्याशा पॅकेटमधील पदार्थ संपून गेले, सगळ्यांनी घरी तशी कल्पना दिल्यामुळे आता घरचे फोन यायला लागले, पण पुढचे काहीच सांगितले जात नव्हते त्यामुळे पॅसेंजर्सची चिडचिड वाढायला लागली, पण त्रास करून घेऊन काहीही साध्य झाले नसते, National policy होती ती. पुढचे पुण्याचे विमान मार्गस्थ झाले होते अनेक पुणेकरांना उणे करून!!!

अखेर रात्री साडेअकरानंतर बाहेर येऊन आम्ही एका गाडीत बसलो. नरेला येथील विलगीकरणाच्या कॅम्पमध्ये जाण्यासाठी. पहाटे अडीच वाजता पोचलो तिथे. वाटेत पूर्ण सामसूम. फक्त कुत्री विहरत असलेली किंवा आमच्या गाडीच्या आवाजाने जागी होऊन रागाने आमच्याकडे पाहणारी. त्यांना ना “करोना”ची भीती ना रस्त्यात खांबाजवळ “ना करोना”ची भीती. त्यांना सगळंच माफ.

कॅम्पमध्ये मात्र लगेचच प्रत्येकाला वेगवेगळ्या खोल्या, गरजेच्या सर्व वस्तू दिल्या गेल्या, आमचे सामान पोचवले गेले. आणि रात्री अडीच वाजता जेवण पण मिळाले. स्वतःला पूर्ण कव्हर करून तिथला स्टाफ आम्हांला चांगली वागणूक देत होता. नाण्याची दुसरी बाजूही स्पष्ट दिसायला लागली. त्यांचे कर्तव्य ते व्यवस्थित बजावत होते. भूक लागली असल्याने अडीच वाजताही जेवलो... आणि झोपी गेलो. तसा प्रयत्न केला.

नरेला कॅम्प

दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता, बिस्किटं, बिसलेरीच्या बाटल्या, दुपारी जेवण पण आले. पण पुढे काय, किती दिवस रहायचे काहीच माहिती मिळत नव्हती. अखेर रात्री अकरा वाजता निरोप मिळाला “मेडिकल चेकअपसाठी खाली जायचे आहे.” म्हणजे इथले डॉक्टर्स अजूनही बिझी आहेत. नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा अजून थोडासा अंश. २ / ३ दिवसांत आम्हांलाच अंदाज यायला लागला. खोलीच्या बाहेर फक्त गरजेच्या काही गोष्टी आणण्यासच जायचे. तेही मास्क लावून. हातात कागदाचा तुकडा घेऊन, हो लिफ्टने जाताना बटण दाबण्यासाठी उपयोगी. शक्यतो कुठेही स्पर्श नको ना. वर आल्यानंतर लगेच हात साबणाने धुणे... सगळ्या जुन्या सवयी आता बाहेर येत आहेत तर. २ खोल्या, छोटेसे स्वयंपाकघर असे कोरे करकरीत फ्लॅट्समध्ये आम्ही रहात होतो. जिथे रोज झाडू, फरशी केली जायची. सगळ्या १२ मजली अशा दहा / बारा इमारती भोवताली मला बाल्कनीतून दिसल्या आणि मधल्या रिकाम्या जागेत छोटे छोटे उभारलेले तंबू. स्टाफ च्या वापरासाठी. ज्या जागेत रोज जंतुनाशक फवारले जायचे. बाहेर २४ तास लाईट्स असायचे त्यामुळे रात्रीसुध्दा खोलीत अंधार होऊ शकायचा नाही. खिडक्यांना पडदे नव्हते त्यामुळे दुपारी सूर्य आणि रात्री बाहेरच्या दिव्यांचा उजेड. लाऊडस्पीकरवरून दिवसभर काही ना काही सूचना चालू असायच्या त्यामुळे रात्री शांत झोप नाहीच मिळायची. पण रात्री खडा पहारा होता हे जाणवायचे त्यामुळे. तो पहारा देणारी माणसं त्यांची कर्तव्य पार पाडत होती. अमेरिकेतून आल्यानंतर “जेट लॅग”ऐवजी “विलगीकरण” या शब्दाचाच वापर करावा लागला परिस्थितीमुळे.

नरेला कॅम्प

आणि दोनच दिवसांत lock downची घोषणा झाली. आता १४ एप्रिलनंतरच पुणे. त्याचीही मानसिक तयारी. मी स्वतः प्राणायाम, ध्यानधारणा, रेकी या गोष्टी करत असल्याने मला कोणत्याही परिस्थितीला तोंड देताना अडचण आली नाही आणि तब्येत चांगली रहायला मदत झाली, हे मी जरूर नमूद करते. तसेच रोज येणारे घरच्यांचे आणि मित्र-मैत्रिणींचे फोनही मनोबल वाढवत होते.

तसेही कोणास गरज पडल्यास मानसोपचारतज्ज्ञाची मदत मिळेल असे आणि त्यांचे फोन नंबरचीही announcement झाली दोनच दिवसांत. त्यामुळे स्वतःला मानसिकदृष्ट्या संभाळणे किती गरजेचे आहे हे जाणवत होते.

रोज मेडिकल चेकअप झाले की हुश्श व्हायचे. टेम्परेचर आणि BP बघायचे. नॉर्मल होतेच. आमच्यापैकी फक्त एकाला ताप आला होता त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवले होते, ७४ जणं होतो आम्ही. बाकी सगळे तब्येतीने छान होते. फारशा ओळखी नव्हत्याच कोणाच्या. चेहरेही मास्कमुळे पटकन् ओळखू यायचे नाहीत. आमची ओळख एकच होती “quarantined people”.

६ दिवसांनंतर चेकअप पण बंद. गरजेची औषधे आणि लागणाऱ्या वस्तू आणायला फक्त खाली जायचे. मी तर दोन दिवसांतच लिफ्टने न जाता जिन्याने जा ये सुरू केली माझ्या चौथ्या मजल्यावरून. तेवढाच व्यायाम आणि तिथे जास्त वर्दळ नसल्याने जास्त सुरक्षित वाटायचे.
गरजेच्या लहानसहान गोष्टींकडे ही (hair oil, शॅम्पू, टूथपेस्ट, ब्रश) लक्ष दिले होते. जेवण ठीकठाक होते. गुढीपाडव्यानंतर काही जणांचे उपवास सुरु झाले त्यांना फराळाचे पदार्थ दिले जायचे. काही जणांना कांदा-लसूणविरहित जेवण दिले जायचे. विलगीकरणातील प्रवासी म्हणून जरी ५-स्टारच्या सुविधा नसल्या तरी १६ दिवस व्यवस्थित जगू शकलो आम्ही.

नरेला कॅम्प

पुढच्या आठवड्यात शेजारच्या २ / ३ बिल्डिंग्जमध्ये एक मोठ्ठा ग्रुप आला. कोठून ते माहीत नाही. त्यांचेही आमच्यासारखेच चेकिंग सुरू झाले. रोजच त्यातील काही जणं तरी हॉस्पिटलमध्ये पाठवले जायचे. आता आमचे बाल्कनीत जाणेसुध्दा पूर्ण बंद केले गेले. कोरोनाची वाढत चाललेली तीव्रता चिंताही वाढवत गेली. दोनच दिवसांत मिलिटरीसुद्धा दाखल झाली. आम्ही सुरक्षित होतो.

असेच एक दिवस खाली गेले असताना इथल्या लोकांचा whatsapp ग्रुप असल्याचा शोध लागला. माणसं जवळ यायला लागली. त्यातून ११ पुणेकर जास्त जवळ आले. आणि पुढच्या काही योजना आखल्या जाऊ लागल्या. कारण तोपर्यंत आम्ही पुण्याला रोडने जाऊ शकतो अशी माहिती मिळत होती.

मग १२व्या दिवशी सगळा बायोडाटा भरला गेला आणि १३व्या दिवशी कोरोनाची टेस्ट केली गेली. नाकातून नमुना घेतला गेला. आता रिपोर्टची प्रतीक्षा सुरू झाली. तोपर्यंत १५ एप्रिलचे विमानाचे तिकीट असले तरी रस्त्यानेच जाण्याचे ठरले. मनाची तयारी झाली. दिल्ली - पुणे अंतर कमी नाही पण घरी जायला मिळणे हा आनंद त्याहून जास्त होता ना!!! अधून मधून घराची खूपच आठवण यायला लागली की अस्वस्थ होण्याऐवजी तो विषय डोक्यातून काढून टाकावा लागे. मानसिक खचून चालणार नव्हते.

आणि मग १७व्या दिवशी फोनवर प्रत्येकाला कोरोनाच्या निगेटिव्ह रिपोर्टची माहिती मिळाली. तो आनंद शब्दांत सांगता येणार नाही. पाचच तासांत सगळ्या formalities पूर्ण करून आम्ही ९ पुणेकर टेम्पो ट्रॅव्हलरने प्रवास करण्यास तयार झालो.

आपल्या स्वतःच्या ४ भिंतींची गरज किती महत्त्वाची असते हे माहीत असल्याने तो ४० तासांचा प्रवासही आम्ही तितक्याच संयमाने पूर्ण केला. आणि अचानक सामोरं जावं लागलेल्या या सगळ्या परिस्थितीचा संयमाने स्वीकार केल्यामुळे आत्मविश्वास अजून वाढला. Smile

या १६ दिवसांच्या विलगीकरणाने स्वातंत्र्याची आणि स्वातंत्र्यवीरांची महती खूप भावली.

(क्रमशः)
भाग तिसरा आणि अंतिम - झाले मोकळे आकाश...
---

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आमची ओळख एकच होती “quarantined people”.

हे अंगावर आलं ... क्वारंटिनचं महत्त्व समजलं तरीसुद्धा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.