कोकणची करोना कैफियत

याचसाठी केला अट्टाहास?
१६ मे २०२०
- डॉ. अनिरुद्ध डोंगरे

Wadis in Diveagar 1

गेले महिनाभर मुंबई आणि पुण्याच्या रोजच्या बातम्या ऐकून अतिशय वाईट वाटत होतं. तिथल्या लोकांचं मृत्यूच्या छायेतलं रोजचं जिणं बघून त्यांच्याबद्दल सहानुभूतीही वाटत होती. आणि आम्ही सगळे कोकणवासी स्वतःला अतिशय नशीबवान समजत होतो की हे असं जगणं कोकणवासीयांच्या तरी नशिबात लिहिलेलं नाही. मुळातच कोकणातला माणूस समाधानी. त्यामुळे लॉकडाउन झाला तरी कोकणातल्या माणसाच्या जीवनमानात फारसा फरक पडला नाही. नाही म्हणायला सगळेच उद्योगधंदे बंद असल्यामुळे काहींना आर्थिकदृष्ट्या गतकाल काहीसा कठीण गेला, आताही जातोय आणि कदाचित भविष्यातही जाईल. पण समाधानाची बाब अशी की, इतके दिवस जीवाची भीती तरी कोकणवासीयांना नव्हती. अर्थात हे सगळं चालू असताना कुठेतरी मनात शंकेची पाल चुकचुकत होतीच. मुंबई जात्यात आणि कोकण सुपात तर नाही ना!

गेल्या ६-७ दिवसांतल्या घडामोडी पाहता ही शंका खरी ठरणार असं प्रकर्षाने वाटतंय. मुंबईहून येणारे माणसांचे लोंढे, वाढत्या स्थलांतराबरोबर कोकणातल्या कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा आणि या सगळ्याला हाताळण्यात सपशेल अपयशी ठरलेली सरकारी यंत्रणा यांचा एक दुर्दैवी ग्रहयोग कोकणच्या पत्रिकेत डोकावतोय. त्यामुळे कोकणाचं भविष्य वर्तमानापेक्षा जास्त भयानक होईल की काय अशी शंका मनात डोकावत्ये.

मुळातच कोकण हा भौगोलिक, आर्थिक आणि सामाजिकदृष्टया अतिशय दुर्गम भाग. त्यात भरीस भर म्हणजे गेल्या काही वर्षांत कोकणाला लाभलेलं अत्यंत अदूरदर्शी नेतृत्व. यामुळे आजही वैद्यकीय, आर्थिक, शैक्षणिक, सर्वच दृष्टीने कोकण सदैव मुंबईवर अवलंबून. यातल्या कुठल्याही क्षेत्रात कोकणात गेल्या काही दशकात म्हणावी तशी प्रगती झालेलीच नाहीये.

वैद्यकीय क्षेत्राचा विचार करता कोकण महाराष्ट्रातला सर्वात मागास भाग म्हणावा लागेल.

आकडेवारी असं सांगते की, संपूर्ण महाराष्ट्रात सरकारी आरोग्य विभागात १७,००० पदे रिक्त आहेत. त्यात स्पेशालिस्ट डॉक्टरांची सुमारे १००० पदे, नर्सिंग स्टाफची ३०% पदे आणि याव्यतिरिक्त आरोग्यसेविकांची ७०% पदे रिक्त आहेत. यात कोकणचा अनुशेष सर्वात जास्त आहे. अन्य सरकारी कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचीही अशीच परिस्थिती आहे.

ही सगळी वस्तुस्थिती प्रशासनाला माहीत आहे. तरीही गेले ७-८ दिवस कोकणातल्या चाकरमान्यांना कोकणात परत आणण्याचा अट्टाहास चाललाय. आणि तोही इतक्या नियोजनशून्य पद्धतीने सुरू आहे की येत्या महिनाभरात स्वतःला home quarantine न करणारा प्रत्येक व्यक्ती संक्रमित होण्याची शक्यता आहे. आणि हे सगळं केवळ आणि केवळ मुंबईला वाचवण्यासाठी. मुंबई वाचवण्यासाठी प्रशासन उघड्या डोळ्यांनी कोकणचा बळी द्यायला निघालंय. आणि कोकणी माणूस हताशपणे ते बघण्याव्यतिरिक्त काहीही करू शकत नाहीये.

भरीस भर म्हणून कोकणातले राजकीय नेतेही याचीच एकमुखाने मागणी करतायत. इथल्या मतदानावर मुंबईकरांचा, गावागावातल्या मुंबई मंडळांचा सर्वात जास्त प्रभाव असतो हे इथल्या नेत्यांना पक्कं माहितेय. त्यामुळे की काय माहीत नाही, पण कोकणातले झाडून सगळे लोकनियुक्त प्रतिनिधी मुंबईकरांना परत आणण्याला अनुकूल वक्तव्य आणि वर्तन करतायत. ना कुणाजवळ याचा पद्धतशीर रोडमॅप आहे, ना सुनियोजित कार्यपद्धती आहे, ना भविष्यातल्या इथे उद्भवणाऱ्या परिस्थितीबद्दल प्लॅनिंग.

खरंतर जेव्हा लॉकडाउन सुरू झाला तेव्हाच जर मुंबई रिकामी केली असती तर मुंबई आणि कोकण, दोन्ही वाचलं असतं. आता ती वेळ निघून गेली. आता पावसाळ्यापूर्वी मुंबई रिकामी करणं हीच राज्य सरकारची प्राथमिकता आहे. पण तीही अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करणं आवश्यक होतं. मुंबईतून कोकणात परत येणाऱ्या लोकांची व्यवस्थित नोंद ठेवणे, त्यांचे काटेकोर स्क्रीनिंग करणे, त्यांना स्थानिकांच्या संपर्कात न येऊ देणे, त्यातल्या कोरोनासंक्रमित व्यक्तींचे विलगीकरण करून त्यांच्या उपचारांची सोय करणे आणि स्थानिक पातळीवर community spread न होऊ देणे या पद्धतीने मुंबईकरांचं स्थलांतर होणं आवश्यक होतं, सोयीचंही होतं. दुर्दैवाने अशा नियोजनबद्ध पद्धतीने काहीही न होता, धरण फुटल्यावर पाणी जसं नदीपात्रात धांवतं तसं हे स्थलांतर चालू आहे.

गेले दोन महिने कसोशीने पाळलेल्या सगळ्या बंधनांवर आणि त्यामुळे इतके दिवस कोकणात असलेल्या कोरोनावरच्या कंट्रोलवर यामुळे पाणी फिरणार असं चित्र आहे. आणि नेमक्या याच आणीबाणीच्या वेळी प्रशासनाने आपली जबाबदारी संपुष्टात आणायला सुरुवात केल्याचं चित्र आहे.

आता यापुढे कोकणात सर्वत्र कोरोनाचं साम्राज्य असेल. आपल्याला कोरोनाला स्वीकारून त्याच्यासोबत जगायची तयारी करावी लागेल. यापुढील काळात लॉकडाउन हा पर्याय आपल्यापुढे उपलब्ध नाही. ते परवडणारं सुद्धा नाही. पण त्याही परिस्थितीत मार्ग काढावाच लागेल. परिस्थितीवर मात करण्यात नेहमीच यशस्वी ठरणारा कोकणी माणूस ही परिस्थिती कशी हाताळतो ते येणारा काळच ठरवेल.

पण सध्या तरी "उद्धवा, अजब तुझे सरकार" असं म्हणण्याशिवाय कोकणी माणसाच्या हाती काही नाही.

-----
हे लिखाण 'ऐसी अक्षरे'ला उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. अनिरुध्द डोंगरे आणि भूषण पानसे यांचे आभार

field_vote: 
0
No votes yet

आणून टाकलेले लेख वाचायला ठीक. पण ऐसीसारख्या संस्थळावर ( किंवा कोणत्याही दुसऱ्या) प्रश्नोत्तरे होणे अपेक्षित आहे ते साध्य होत नाही. लेखक इथे येत नाही. मग पेपरातल्या लेखासारखेच झाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखकापेक्षा लेख महत्वाचा.
तुम्ही प्रश्न विचारा , घेऊ त्याची उत्तरे.
लेखकाला इथे यायला सवड होत नसेल तर त्याकरिता कंटेंट राहून जायला नको.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी सतत विरोधच करतो असे वाटत असेल तर माझा पास.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

च्रट्जी सतत विरोध कुठे करता तुम्ही? पण वाचायला सकस मिळत असेल तर संवादाचाही हट्ट नको. मला व्यक्तिश: गुप्ते यांचे लिखाण फार आवडले. फार फार. एकदा कोणीतरी त्यांची मुलाखत घ्या ब्वॉ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण वाचायला सकस मिळत असेल तर संवादाचाही हट्ट नको.

मान्य.

मला व्यक्तिश: गुप्ते यांचे लिखाण फार आवडले. फार फार. एकदा कोणीतरी त्यांची मुलाखत घ्या ब्वॉ.

नवे श्री ना पेंडसे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

८ जून

मुळातच कोकण हा भौगोलिक, आर्थिक आणि सामाजिकदृष्टया अतिशय दुर्गम भाग. त्यात भरीस भर म्हणजे गेल्या काही वर्षांत कोकणाला लाभलेलं अत्यंत अदूरदर्शी नेतृत्व. यामुळे आजही वैद्यकीय, आर्थिक, शैक्षणिक, सर्वच दृष्टीने कोकण सदैव मुंबईवर अवलंबून. यातल्या कुठल्याही क्षेत्रात कोकणात गेल्या काही दशकात म्हणावी तशी प्रगती झालेलीच नाहीये.

अदूरदर्शी नेतृत्वाच्या माथी प्रगती न होण्याचं कारण मारलं. झालं काम.
कोकणची इकॉनमी म्हणजे कोणते पदार्थ कोकणातून बाहेर जाऊन बाहेरचा पैसा कोकणात आणतात.
१)सुपारी, २)वाल, ३)समुद्री उत्पन्न. ते फारच थोड्यांच्या हातात आहे. त्यात काय बदल होणार?
आंबे - वैयक्तिक मुठभर सधन मालक पाठवतात. बाकीचे अडते/दलाल यांना ठोक जागेवर विकतात.
असहकार( शेतीउत्पन्नासाठीचा) हा इथे मुरलेला आहे. कुणी नेतृत्वाने पुढाकार घेतला म्हणून पीळ जळणार नाही. देवदैवतांच्या उत्सव जत्रेत मात्र सहकार घट्ट आणि परंपरेची री ओढणारा.

ब्यारिस्टर अंतुलेंनी मात्र स्थानिक तरुणांना मदत केली. पॉलिटेक्निकमधून काही ट्रेड शिकून अरबी देशांत तरुण गेले. काही शिकून कोकणातच राहणाऱ्या कुटुंबाला मदत करत राहिले. इतर ठिकाणी मात्र वाडे ओस आहेत. सर्वजण मुंबईत पळाले. सणापुरते जातात.
जो तरुण शिकून कुठे जात नाही तो पहिली ओटोरिक्षा 'टाकायला' बघतो. मग एवढ्या रिक्षा होतात की त्या रूटवरच्या यष्ट्या बंद. मग चार किमिटरचे शंभर दोनशे रु भाडं सांगतात ते सामान्यांना परवडत नाही.

मुंबईत नोकऱ्या नाहीत, पगार नाहीत आणि सुरू होण्याची शक्यताही नाही. तर ही मंडळी गावी कोकणात जाऊन काय करणार?
माड - पोफळी : झाडावर चढून नारळ उतरवणेही जमत नाही म्हणजे कुणा केरळी माणसाची मदत. उत्पन्नात खोट.

प्रगती होण्यासाठी काही मोड्युल नाहीच शोधले. कुणी शोधायचे? कुणाला हवंय?
----–------------------
९ जून -+
काजू राहिलेच की!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0