चकचकित जपान

photo 1 जपानमधील एक शाळा. शेवटचा पिरियड संपत आला आहे. दिवसभराच्या 7-8 तासिकांच्यानंतर येणारी मरगळ प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे. ‘इथून एकदा केव्हा बाहेर पडेन व बाहेर पडून मोकळा श्वास घेईन,’ यासाठी सर्व उतावीळ झाले आहेत. सगळ्यांना घरी पळायचे वेध लागले आहेत. परंतु नेहमीप्रमाणे शिक्षिका उद्याच्या अभ्यासाविषयी सांगते व शेवटी “स्वच्छतेसाठी तयार व्हा”, असे फर्मान सोडते. पहिल्या दोन रांगा वर्गाची, नंतरच्या दोन रांगा पायऱ्या व व्हरांडा, आणखी दोन रांगा शाळेचे आवार,.... व शेवटच्या दोन रांगा वॉशरूम-टॉयलेट्स असे त्या दिवसाच्या स्वच्छ करण्याच्या कामाची विभागणी करून देते. शेवटच्या ओळीतील काही मुलां-मुलींची नाराजीची कुरबूर अस्पष्टपणे ऐकू येते. परंतु सर्व जण झाडू-पोछा ठेवलेल्या खोलीकडे वळतात व अतीव उत्साहाने आपल्याला नेमून दिलेल्या जागा स्वच्छ करू लागतात. इतर वर्गातल्या मुलां-मुलीच्या बाबतीतही हेच घडत असते. एवढेच नव्हे तर जपानमधील सर्व शाळा कॉलेजमध्ये हेच दृश्य या वेळी बघायला मिळेल. खरे पाहता हे रोजचेच काम असल्यामुळे कुठलीही मुलं या कामाचा कंटाळा करत नाहीत की कामचुकारपणा करत नाहीत.

जपानला भेट देणाऱ्यांना जपानमधील चकचकीतपणा चटकन डोळ्यात भरतो. कुठेही कागदाचा तुकडा, मोडक्या-तुटक्या प्लॅस्टिकच्या बाटल्या वा पिशव्या दिसत नाहीत. रस्त्याच्या कडेला थोडासा अंधार आहे म्हणून काही तरी फेकले आहे, कुजत आहे असे दृश्य दिसणार नाही. रस्त्यावर झाड-लोट करणाऱ्यांची फौजही दिसत नाही. वा ठिकठिकाणी सीसिटीव्ही यंत्रणा 24x7 सर्वांवर पाळत ठेवते म्हणून घाबरून जपानीज स्वच्छता पाळत आहेत असेही वाटत नाही. इथली शहरं इतकी स्वच्छ कसे याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही.

जपानमधील सर्व जण कुठेही कचरा होऊ नये व/वा कचरा दिसू नये याची पुरेपूर काळजी घेतात हेच याचे सोपं उत्तर आहे. शाळेच्या 12 वर्षाच्या कालावधीत विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या तासिका तंतोतंत पाळाव्या लागतात. त्यात कुठलीही हयगय केलेली सहन केली जात नाही. घरीसुद्धा प्रत्येक पालक स्वच्छतेचे धडे देत मुला-मुलींना घडवत असतात. याबाबतीत कुणाचेही लाड केले जात नाहीत. घर व घराचा परिसर अस्वच्छ असणे किती धोकादायक आहे या गोष्टी कायमचेच अगदी लहानपणापासूनच प्रत्येकाच्या मनावर कोरलेले असतात. व त्या इतके सहजासहजी विसरता येत नाहीत. घाण केल्यास ते शेवटी आपल्यालाच निस्तरावे लागते याची जाण असल्यामुळे वेळीच काळजी घेतली जात असावी. “काही वेळा संडास साफ करण्याचा मला कंटाळा येतो. परंतु हासुद्धा आपल्या जीवनाचाच अविभाज्य भाग आहे, याची मला सतत जाणीव असते.” एक माजी विद्यार्थी सांगत होता. “आपले घरदार, आपले परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. कारण त्याचा वापर आपणच करत असतो.”

वर्गात प्रवेश करताना प्रत्येक विद्यार्थी आपल्या पायातील बूट काढून कपाटात ठेवतो व दुसरे ट्रेनर्स घालून वर्गात प्रवेश करतो. घरीसुद्धा बाहेर वापरलेले बूट बाहेरच ठेवल्या जातात व सॉक्स घालून घरात सर्व जण वावरतात. घरकाम करण्यासाठी येणाऱ्यांनासुद्धा हा नियम लागू पडतो. शालेय शिक्षण संपवून बाहेर पडल्यानंतरसुद्धा ही शिस्त आपोआपच पाळले जाते. जपानच्या या स्वच्छतेच्या अतिरेकाच्या गोष्टी व्हायरलसुद्धा झालेले आहेत. ७ मिनिटात आख्खी ट्रेन कशी स्वच्छ होते हा जगभरचा कौतुकाचा विषय झाला आहे. आणि हा ‘स्वच्छता अभियान’ बघण्यासाठी परदेशी प्रवासी मुद्दाम त्या स्टेशनला भेटी देतात. FIFA कपसाठीच्या 2014 सालच्या ब्राझिल येथील जागतिक फुटबॉल स्पर्धेच्या वेळी व रशियन स्पर्धेच्या वेळी जपानच्या खेळाडूंनी स्पर्धेनंतर पूर्ण स्टेडियम साफ केलेले कुणीच विसरणार नाही. त्यांच्या ड्रेसिंगरूमची स्वच्छता वाखाणण्यासारखी होती. “आम्हाला कुणीही अस्वच्छ, घाणेरडे म्हटलेले आवडणार नाही. कुणीतरी आम्हाला आमच्या पालकांनी नीटपणे वाढवले नाही असे म्हटल्यास आमचा स्वाभिमान दुखावला जातो.” एका जपान्याची ही प्रतिक्रिया बरेच काही सांगून जाते.

जपानच्या सर्वात मोठ्या फ्यूजी रॉक संगीत महोत्सवाच्या ठिकाणीसुद्धा या स्वच्छतेची शिस्त काटेकोरपणे पाळलेले बघायला मिळते. धूम्रपान करणारे निर्दिष्ट ठिकाणी जाऊनच धूम्रपान करतील व संपूर्ण जग म्हणजे एक अ‍ॅशट्रे अशी समजूत करून घेऊन सिगरेटचे थोटके कुठेही न टाकता त्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावतील. याची तुलना 1969च्या वुडस्टॉक महोत्सवाशी केल्यास किती फरक जाणवतो याची कल्पनासुद्धा करवत नाही. त्या महोत्सवातील कलावंताना आपण एका उकिरड्यावरील कचऱ्यासाठीच कला सादर करत नाही ना असे वाटले असेल.

स्वच्छतेचे हे वेड केवळ कुटुंब वा शाळापुरतीच नसून सर्व सार्वजनिक ठिकाणीसुद्धा राबवली जाते. ऑफिसमध्ये काम करणारे वा बाजार पेठेतील दुकानदार हे सर्व जेव्हा सकाळी सकाळी कामाच्या ठिकाणी आल्यानंतर आपापले ऑफिस/दुकानच नव्हे तर समोरील रस्तेसुद्धा साफ करतात. शाळा-कॉलेजमधे शिकत असलेल्या स्वयंसेवकांसाठी रस्त्यावरील कचरा गोळा करण्याची मोहीम सुट्टीच्या दिवशी राबवली जाते. तसे पाहता रस्त्यावर साफ करण्यासारखे काहीही नसतेच. कारण बहुतेक जण समोर दिसत असलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची पूर्ण दक्षता घेत असतात.

कागदी चलनी नोटा हाताळतानासुद्धा या स्वच्छतेचा प्रत्यय परदेशी यात्रिकांना येत असतो. जपानमधील नोटा इतक्या कोऱ्या करकरीत कसे याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. नव्या, कोऱ्या करकरीत, स्टार्च केलेल्या कपड्यासारखे या नोटा भरपूर काळापर्यंत क्रिस्प राहतात. कारण दुकानं, हॉटेल्स व टॅक्सीतसुद्धा नोटा ठेवण्यासाठी ट्रेची सोय केलेली असते. व कमीत कमी हस्तस्पर्श होण्याची व कसे तरी नोटांची घडी करून खिशात न कोंबण्याची शिस्त पाळली जाते.

कदाचित हस्तस्पर्शातून रोगाणूंची लागण होईल अशीही भीती वाटण्याची शक्यता असावी. सर्दी-पडश्यानी त्रस्त असल्यास शक्यतो जनसंपर्क टाळण्याकडे यांचा कल असतो. आपल्यामुळे इतरांच्यात लागण होऊ नये, रोगराई पसरू नये याची काळजी घेतली जाते. आपल्यामुळे त्यांच्या कामात खोडा होईल, औषध-पाण्यावर खर्च होईल याचे भान ठेवले जात असल्यामुळे जपानीज स्पर्श टाळत असावेत.

जपानमध्ये स्वच्छतेविषयी एवढी जागरूकता कशी काय आली असेल?

खरे पाहता या देशातील स्वच्छतेबद्दलची जागरूकता नुकतीच जन्मला आलेली फॅड वा फॅशन नाही. 1600 साली विल अ‍ॅडम्स नावाचा इंग्रज प्रवासी पायी चालत चालत जपानच्या राजाच्या दरबारी पोचला. त्याच्या प्रवास वर्णनातसुद्धा त्या काळच्या तेथील स्वच्छतेबद्दल, संडास व गटार व्यवस्थेबद्दल उल्लेख सापडतात. त्यांनी जपानच्या सरंजामशाहीतील अभिजनांच्या स्टीमबाथ व त्या स्नानगृहातील सुगंधी दरवळाबद्दल लिहिताना त्या काळच्या इग्लंडमधील दयनीय अवस्थेशी व मलमूत्रानी तुंबलेल्या गटाराशी तुलना केली आहे. जपानीजंना नेहमीच युरोपियनांच्या वैयक्तिक अस्वच्छतेबद्दल एका प्रकारची घृणा वाटत आली आहे.

मुळात जपानच्या दमट व उष्ण हवामानात अन्न पदार्थ लवकर खराब होतात. त्यातून स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास अन्नपदार्थावर रोगाणूंची भरमसाठ वाढ झाल्यास ते खाण्यालायक रहाणार नाही व तसेच खाल्यास रोगांना व/वा मृत्युला आमंत्रण दिल्यासारखेच अशी एक अव्यक्त भीती मनात घर करून असते. त्यामुळे व्यावहारिक शहाणपणाच त्यांना स्वच्छतेची काटेकोर बजावणीसाठी उद्युक्त करत असेल.

परंतु यापेक्षाही जास्त महत्वाचे म्हणजे सहाव्या शतमानात चीन व कोरियातून जपानमध्ये आलेल्या बौद्ध धर्माने व 12 व्या शतकात आलेल्या झेन पंथाने जपानमध्ये स्वच्छतेची मूहूर्तमेढ रोवली. झेन महायान बौद्ध पंथाचा एक उपपंथ आहे. मनन किंवा चिंतन हा झेनचा मूलभूत अर्थ असून विश्व व मानवी जीवन यांचे वास्तव स्वरूप जाणण्यासाठी विचार केंद्रित करण्याची ती एक पद्धत आहे. बुद्धत्वाच्या प्राप्तीवर झेनचा भर आहे. 1191मध्ये क्योतो शहरात एका ध्यान विहाराची स्थापना झाली. जपानचे जीवन, कला, साहित्य, आचरण, नीतीतत्वे या साऱ्यांवर झेनचा प्रभाव पडलेला आढळतो. याच पंथाने रोजच्या स्वैपाकाला व त्याला अनुसरून करत असलेल्या स्वच्छतेला धार्मिक व पवित्र अनुष्ठान प्राप्त करून दिले. ध्यानधारणे इतकेच स्वच्छतेला आध्यात्मिक स्थान मिळवून दिले.
photo 2 झेन पंथात जेवण व जेवण करण्याच्या जागेभोवतीच्या स्वच्छतेला अत्युच्च आध्यात्मिक व धार्मिक कृती समजले जाते. कुठेही किंचितही घाण असू नये याबद्दलची दक्षता व त्याच्या स्वच्छतेला रोजच्या धार्मिक व्यवहारात फार महत्व दिले जाते. 1906च्या सुमारास प्रकाशित झालेल्या बुक ऑफ टी या कारुझो ओकाकुरा या कलावंताच्या पुस्तकात चहा पिणे ही एक धार्मिक विधी असून त्यासाठी त्याच्या संबंधातील सर्व गोष्टी – चहा, साखर, पाणी, चहा पिण्याची जागा, चहा पिणारे इ.इ. – स्वच्छ असणे अत्यंत गरजेचे आहे असा उल्लेख आहे. 1906मधील या उल्लेखाचे पालन आजही केले जाते. हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेल्यास टी मास्टरची किमोनो घातलेली मदतनीस गुडघे टेकून जमिनीवर एक धुळीचा कणही राहू नये याची काळजी घेत असलेले दृश्य हमखास बघायला मिळेल. चहापानाच्या विधीला झेनमध्ये एक स्वतंत्र स्थान आहे. चहा अतिशय समारंभपूर्वक बनवला जातो आणि शिष्यांना दिला जा तो. प्रत्येक शिष्याला हा चहापानाचा विधी शिकावा लागतो. या चहापानाच्या विधीशिवाय इतर कुठलेही कर्मकांड झेन मध्ये नाही.

हे सर्व जर खरे असल्यास बौद्ध धर्म असलेल्या सर्व देशात एवढी स्वच्छता का नाही, हा प्रश्न विचारावासा वाटेल. याचे उत्तर झेन पंथ व बौद्ध धर्म या देशात येण्यापूर्वी असलेल्या शिंटो (ईश्वर प्राप्तीचा मार्ग) या धर्मात मिळेल. शिंटो हेच जपानची खरीखुरी ओळख करून देणारे चिन्ह आहे. इतर बौद्ध धर्मीय देशात स्वच्छता हे परमेश्वरानंतरच्या क्रमांक असते. परंतु शिंटो धर्मात स्वच्छता हेच परमेश्वर आहे. त्यामुळे नंतर अवतरलेला बौद्ध धर्म या पूर्वीच्या शिंटो धर्माला पूरकच ठरला असावा.

शिंटो धर्मामध्ये ‘पवित्र’ याच्या विरोधार्थी शब्द अस्वच्छता – जपानिजमध्ये ‘केगारे’ – हा आहे. केगारे या संकल्पनेत मृत्यु - आजारपणापासून कुठलीही न आवडणारी गोष्ट असू शकते. त्यामुळे सातत्याने स्वच्छ करणे, करत राहणे हेच केगारेला दूर ठेऊ शकते अशी जपानीजची भावना आहे. रोगाणू पसरू नये म्हणून इतरांच्या बाबती काळजी करणे हा त्याचाच एक भाग आहे. व्यावहारिकरित्या यावरील उपाय म्हणून प्रथम आपल्या आळशीपणातून वा दुर्लक्षामुळे घाण तशीच ठेवणे हे योग्य ठरणार नाही, याची त्यांना जाणीव असल्यामुळे स्वच्छता पूर्णपणे त्यांच्या अंगवळणी पडलेली आहे. पूर्वीच्या काळी स्वतःला पवित्र ठेवण्यासाठी ध्यान विहारात दगडी बेसिनमध्ये हात-तोंड धुतल्यानंतरच प्रवेश करत होते. अजूनही एखादी नवी कार घेतल्यावर मंदिराच्या बौद्ध भिक्षूकडून चवरीसदृश ‘ओनुसा’ने कार पवित्र करून घेतली जाते. कारच्या आतून, इंजिनच्या ठिकाणी, बॉनेट या सर्व ठिकाणी ओनुसा फिरवला जातो. जमीन वा घर खरेदीच्या वेळी हा ओनुसा कामी येतो.

आपण जर जपानमध्ये राहायला गेल्यास आपणसुद्धा कळत - न कळत स्वच्छतेची शिस्त पाळतो. जपानीजच्या जीवनपद्धतीला अंगीकारतो. नको तेथे नाक शिंकणे, थुंकणे या सवयी बंद होऊ लागतात. हँड सॅनिटायजर वापरत रोगाणू पसरणार नाही याची काळजी घेऊ लागतो. सुका व ओला कचरा वेगवेगळे करून निर्दिष्ट ठिकाणी निर्दिष्ट वेळी ठेऊ लागतो. बूच वेगळे केलेल्या पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, काचेच्या बाटल्या, इलेक्ट्रॉनिक कचरा वेगवेगळ्या पेटीत ठेऊ लागतो. व आठवड्यातून एकदा- दोनदा येणाऱ्या रिसायक्सिंगच्या व्हॅनची वाट पाहतो.

जर हे सगळे जपानमध्ये करत असल्यास आपल्या देशात का करत नाही?

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

जर हे सगळे जपानमध्ये करत असल्यास आपल्या देशात का करत नाही?

थुंकणार्‍याची मानसिकता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

भूतान सुद्धा असाच स्वच्छ देश आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खेळ आपला पण बॅट माझी म्हणून नियम माझे... अन्यथा चपला विसरू नका.

तसा पण जपान महाराष्ट्र पेक्षा आकाराने थोडा मोठाच आहे आणि लोकसंख्या 12 कोटी पेक्षा जास्त
आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या देशांत, केगारेचेच नगारे वाजत असतात. साधा कुठल्याही भारतीय चित्रपटातला पत्र येण्याचा प्रसंग पहा. नायक, नायिका वा कोणालाही पत्र आले असताना, पाकिटाची चिन्धी टरकवून पत्र हातात घेतात आणि तो टरकावलेला भाग बिनदिक्कत खाली टाकून देतात. अगदी लहानपणापासून मला हे दृष्य खटकत आले आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो.
मलाही नेहमीच खटकतं.
टीव्ही मालिकांमधेही असंच दिसतं. पण साधारणत: ही दृष्ये घरातील असतात. त्यामुळे गप्पही बसावं लागतं.

हे केगारे प्रकरण कळले नाही. पण त्याने फारसा फरक पडला नाही. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ट्रेन च्या सीट वर बूट ,चप्पल सहित पाय ठेवणे.( शिक्षित अशिक्षित सर्व असतात असतात ह्या मध्ये)
गुटखा,तंबाखू खिडकी मधून बाहेर थुकने.
बिसलेरी bottle,chips che pkts,शेंगाची टरफले,plastic पिशव्या फेकून देणे असे drush सर्रास दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0