(नदीम-) श्रवणभक्ती

[हल्लीच मी लिहिलेल्या 'बटाट्याच्या चाळीतला लॉकडाउन' या कथेला 'काहीतरी बऱ्यापैकी वरिजिनल लिहा' असा एक प्रेमळ सल्ला मिळाला होता. त्यामुळे ('वरिजिनल' हा शब्द लेखकाचा ओरिजिनल असल्यामुळे नीट कळला नाही, पण-) माझं हे ओरिजिनल आणि रिजनल असं दोन्ही प्रकारचं लिखाण लिहायचा मोह अनावर झाला. अर्थात हे सगळं गंमत-जंमत या हेतूनंच लिहितो आहे याची कृपया नोंद घ्यावी. 'बऱ्यापैकी' हा शब्द कळला. हे त्यात सामील होतं की नाही हे वाचकांवर सोपवतो....]

आम्ही नदीम-श्रवणच्या संगीताचा बारकाईनं अभ्यास केला आहे.

... अर्थात त्याचा 'फार काही न' अभ्यास केला तर अधिक चांगलं होईल असं आमच्या ज्येष्ठ बंधूंचं मत आहे!

साधी गोष्ट आहे. आमच्या आई-वडिलांचा काळ शंकर-जयकिशनचा; तर बंधूंचा काळ आर. डी. बर्मनचा; अन् आमच्यावर वेळ आली नदीम-श्रवण ऐकण्याची. ('काळ आला होता, पण वेळ आली नव्हती' असं यावर आमचे बंधू म्हणतील असा आमचा तर्क आहे. आमचं त्यावर 'काळ काही सांगून येत नाही' असं उत्तर तयार आहे.)

पण प्रत्येक काळ वेगळा असतो. आमचे आई-वडील शंकर- जयकिशनच्या लाखेच्या तबकड्या ग्रामोफोनवर लावायचे (त्यांना त्या लाखमोलाच्या वाटायच्या). ज्ये. बंधूंच्या काळात घरात रेकॉर्ड-प्लेअर आला. मग त्यावर आमचे बंधू आर. डी. ची एल. पी. लावायला लागले. त्यांना एल. पी. पसंत नव्हते. आम्ही 'एल. पी. लावूया का', 'एल. पी. लावूया का' असं हट्टानं म्हटलं तरी ते हटकून आर. डी. लावायचे. म्हणजे, आम्ही 'सावन का महिना' लावूया म्हणून शोर करायला लागलो की ते 'मेरे नैना सावन भादो' लावून आमच्या डोळ्यांत पाणी आणवायचे.

वास्तविक, 'नदीम-श्रवण यांनी शंकर-जयकिशन किंवा आर. डी. यांचीच परंपरा पुढे चालवली' असं वाक्य सुरुवातीला टाकून एक वाद आपण सुरू करायला हरकत नसावी. तसा नव्वदीत 'परंपरा' नावाचा एक चित्रपटही आला होता; पण त्याचं संगीत शिव-हरी यांचं होतं. त्यानंतर त्यांनी (अनुक्रमे) 'शिव शिव' आणि 'हरी हरी' करत 'आधी रात को' चित्रपट-संगीत-सन्यास घेतला. आपणच पूर्वी संगीतबद्ध केलेल्या 'देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए' या गीताची प्रचीती त्यांना जवळ-जवळ वीस वर्षांनी आली! याचं श्रेय नदीम-श्रवण यांना प्रामुख्यानं द्यायला हवं.

'शंकर- जयकिशन यांचं संगीत, नेहरूंची भाषणं आणि रेशनचं किडकं धान्य यावर आमचं बालपण गेलं', असं एकदा शिरीष कणेकरांनी म्हटलंहोतं. त्यावर 'तुमचा शंकर-जयकिशनवरचा आकस यातून दिसून येतो', अशी कुणीतरी टीका केली. त्याला कणेकरांनी असं उत्तर दिलं की 'आमचं सगळं बालपण वाईटच गेलं असं का तुम्हांला वाटतं? '

आमचं बालपण 'नदीम-श्रवणचं संगीत, ठाकऱ्यांची भाषणं आणि हॉस्टेलचं जेवण (याला विशेषण सापडत नाहीये)' यांवर गेलं. ठाकऱ्यांनी 'आम्हांला नथुरामाचा अभिमान आहे' असं आपलं 'ट्रंप'-कार्ड भाषण करून अजून एक निवडणूक शिवसेनेला हरवून दिली होती, तोच हा काळ!

पण परंपरा कुठली? शंकर-जयकिशन आणि आर. डी. यांनी इतर भाषांमधलं संगीत भारतात आणलं (त्याला नक्कल म्हणू नका नाहीतर जुने आणि त्यापेक्षा जाणते लोक आमची पंचाईत करतील). 'कौन हे जो सपनों में' हे गाणं आलं म्हणून आम्हांला एल्विस प्रिस्टली कळला. आर. डीं. च्या 'मिल गया हम को साथी' या गाण्यामुळे 'आब्बा'चं सुगम संगीत आमच्यापर्यंत आलं. (आता हे आम्हांला तेव्हा माहिती नव्हतं हा काय आमचा दोष? ) नदीम-श्रवण यांनीही 'बॅचलर बॉय'चं 'ओ मेरे सपनों के सौदागर' करून आपला सौदा खरा केला आणि आपलं संगीत कसं अगदी पारंपरिक आहे हे सिद्ध केलं!

असो. हा असली-नकली वाद बॉलिवूडच्या बाबतीत दूरच ठेवायला हवा. संगीतकाराची प्रतिभा एकदा समजून घेतली आणि हा म्हणजे महानच हे शिक्कामोर्तब केलं की बाकी गाणी 'रतीब घालण्यासाठी असं करावं लागतं' या स्पष्टीकरणात दडपता येतात. आमच्या बारकाईच्या अभ्यासाचा हाच मुख्य विषय आहे.

'आशिकी' या पहिल्याच गाजलेल्या चित्रपटावरून आम्हांला त्यांच्या क्षमतेचा अंदाज आला. (त्या आधी ते अकरा वर्षं कार्यरत होते हे नंतर कळलं.... 'त्यांनी तेच कार्य का नाही चालू ठेवलं? ' असा आमच्या बंधूंचा प्रश्न आहे. ) त्या चित्रपटातली सगळीच गाणी आम्हांला आवडली आणि अपेक्षा अतिशय वाढल्या. 'अब तेरे बिन' हे गाणं आम्ही आधी ऐकलं नव्हतं. प्रत्यक्ष चित्रपट बघताना ते प्रथम कानी पडलं. असाच प्रसंग 'बाजीराव-मस्तानी'तली सगळी गाणी ऐकली आहेत असं वाटलं आणि आयत्या वेळी 'मल्हारी' 'याचि देही याचि डोळा' बघावं लागलं तेव्हाही आमच्यावर आला होता. फरक इतकाच पहिल्यावेळी आम्ही थक्क झालो होतो, तर दुसऱ्या वेळी धक्का बसला होता! पण रात्री चित्रपट बघतानाही त्या अहिर भैरव या सकाळच्या रागातले सूर, अन् गिटार आणि व्हायोलिनचा वापर अंगावर रोमांच आणून गेले होते. ('नुसतं नदीम-श्रवण नाव काढलं की आमच्या अंगावर काटा येतो' हे आमच्या बंधूंच वाक्य उगाचच इथे आम्हांला आठवतंय.) 'सनम तोड दे, ता मुहब्ब्त के वादे' अशी एवढी शब्दांची तोड सोडली तर त्या गाण्याला तोड नाही. (पण तशी ही तोडफोडही परंपरागतच आहे - 'एहसान तेरा हो, गा मुझपर' किंवा 'गम और खुशी में फर्क न महसू, स हो जहां' अशा सुंदर गाण्यांमध्ये रफीसाहेबांनीही सम कशी दाखवून दिली आहे ते पाहा. जाऊ द्या, पुन: आपण दुसऱ्यांशी तुलना करण्याचा मोह टाळू आणि 'वेगळेपणा' शोधू.

'दिल है के मानता नही' हे रात्रीच्या वेळी रात्रीच्याच रागातलं (झिंझोटी) गाणं (चित्रपट यायच्या आधीच) एकदा ऐकलं. त्यातली सुरावट, तिच्यात मूळ रागाच्या चलनापेक्षा (प ध सा रे ग म ग ऐवजी प नि सा रे ग म ग) केलेला परिणामकारक बदल आणि सतारीचे बोल हे खरंच (नदीम-)श्रवणीय वाटले बुवा.

नदीम-श्रवणचा कालखंड इथेच संपला असं म्हणायला आमची हरकत नाही. पण जसं संजय मांजरेकरबद्दल लिहिताना सुरुवातीचा वेस्ट-इंडिज आणि पाकिस्तानविरुद्धचा तंत्रशुद्धपणा संपला की पुढची ओढाताण सांगणं भाग पडतं तसंच काहीसं इथे होईल. पूर्वीचा मांजरेकर कधी दिसेल असंच त्याचा खेळ बघताना सारखं वाटायचं, तसंच नदीम-श्रवणचं झालं. फक्त नदीम-श्रवणची वाटचाल 'कोंफिडंट' होती असं आमच्या एका गुजराथी मित्राचं मत आहे. (गुजराथी लोक खरे संगीतज्ञ! - जयकिशन गुजराथी होता, तसेच कल्याणजी- आनंदजी 'शहा'ही होते आणि अगदी हिमेश रेश... जाऊ द्या, आपण मूळ मुद्द्याकडे वळू.) मांजरेकर जसा प्रत्येक चेंडूवर स्वीप मारू लागला तसंच नदीम-श्रवण प्रत्येक गाण्याला तीच चाल देऊ लागले. (कुमार सानूंनाही याच सुमारास सर्दीची लागण झाली.)

मात्र 'साजन'चं संगीत 'कोंफिडंट' होतं यात शंकाच नाही. 'दोन ठोकळे आणि एक सुंदरी' असं त्या चित्रपटाचं वर्णन कमलाकर नाडकर्णींनी म. टा. त केलं होतं. पण नदीम-श्रवणनी त्या चित्रपटात काय काय केलं हे खरं बघण्यासारखं आहे. 'देखा है पहली बार' मध्ये अलका याज्ञिकला आणून अनुराधा पौडवालच्या गाण्यांची संख्या कमी केली हे काय कमी कौतुकास्पद आहे? (ती कायम रेफ्रिजिरेटरमधे बसून गायची असं कणेकरांनी म्हटल्याचं आठवतं.) एस. पी. बालसुब्रमण्यम सारख्या चांगल्या गायकालाही किती कमाल रडवता येतं हेही त्यांनी दाखवून दिलं (उदा. 'पहली बार मिले हैं' किंवा 'देख के यूं मुझे तेरा'). मात्र त्यांचं खरं वेगळेपण दिसतं ते 'बहोत प्यार करते है तुमको सनम' या गाण्यातून. मुखडा शब्दांसकट 'बहोत खूबसूरत है मेरा सनम' या मेहदी हसनसाहेबांच्या गाण्याची आठवण करून देतो. फक्त मेहदी हसनसाहेबांच्या गाण्यात वापरलेला शुद्ध निषाद दरबारीत बसत नसल्यामुळे नदीम-श्रवणनी वगळला! केवढी ही जाणकारी! .... पण, थांबा. पुढे अंतरा ऐकताना तर - 'सागर की बाहों में मौजे हैं जितनी' आणि 'ये क्या बात है आज की चांदनी में' या ओळींमधलं साम्य बघा. अनुकरण करतानाही राग (मिश्र किरवाणीचा दरबारी) आणि ताल (दादऱ्याचा केरवा) दोन्ही कसे बदलता येतात याचा हा एक उत्तम धडा आहे असं आम्हांला वाटतं. शिवाय, शुद्ध गंधार वापरून 'आम्हांलाही मिश्र दरबारी करता येतो' हे त्यांनी दाखवून दिलं. केवढी ही प्रतिभा! केवढं हे वेगळेपण! आणि ह्या सगळ्यांच्या वरताण एकमेव 'ओरिजिनॅलिटी' - जी अभ्यास केल्याशिवाय सहजासहजी दिसत नाही ती - म्हणजे समीर यांच्या शब्दांतल्या अंतऱ्यांतल्या शेवटच्या ओळी 'के ये बेकरारी ना अब होगी कम'!

अर्थात, ही प्रतिभा त्यांनी 'तू मेरी जिंदगी है' या गाण्याच्या मुखड्यातही दाखवली होती. मूळ मेहदी हसनसाहेबांच्या याच गाण्यातला 'बंदगी' हा शब्द बदलून तिथे 'आशिकी' घालून त्यांनी पूर्ण गाण्याचा कायापालट केला.

आपलं कुणी अनुकरण करायला लागलं की आपण महान आहोत हे समजावं. अन्नू मलिक यांना यांच गाण्यांमधून प्रेरणा मिळाली असावी. त्यांनी देशाची सीमा ओलांडण्याचेही कष्ट घेतले नाहीत. आपल्याच जगजीतसिंग साहेबांची 'देर लगी आने में तुमको' ही गझल त्यांनी आपल्या गीतावळ्यात (अशा शब्द आहे की नाही माहिती नाही; पण ही आमची ओरिजिनॅलिटी आहे) समाविष्ट केली!

'तेरी उम्मीद तेरा इंतजार' मधला परमेश्वरी, 'सोचेंगे तुम्हे प्यार', मधला मारूबिहाग असे नंतर काही तुषार अंगावर आले खरे; पण तोपर्यंत कुमार सानूंची सर्दीही फारच वाढली होती आणि गाण्यांमधलं 'सामिर्य' देखील (हा साम्य आणि साधर्म्य यांच्यामधला शब्द आहे - पुनः एकदा आमची ओरिजिनॅलिटी). आमच्या बंधूंचं मत प्रत्ययकारी होऊ लागलं.

मग नदीम-श्रवण यांनी 'परदेस' हा प्रयोग केला. सोनू निगमसारख्या चांगल्या गायकालाही किती कमाल रडवता येतं हे त्यांनी (पुनः एकदा) दाखवून दिलं. अर्थात, आमच्या मते या चित्रपटातलं एकच 'दो दिल' हे कुमार सानुनासिक (अभ्यासूंना हा समास सोडवायची संधी आहे) गीत वगळता बाकी संगीत हे घईंचं असावं. कारण त्यातून नदीम-श्रवणच दिसत नाहीत. याउलट 'तेरी पनाह में हमें रखना' या भजनातूनही ते कसे स्पष्ट दिसतात!

'साजन चले ससुराल' या चित्रपटातल्या 'दिल-जान-जिगर तुझपे निसार किया है' या गाण्याचा आवर्जून उल्लेख करायला हवा. असंबद्धता (असा शब्द बहुधा मराठीत असावा) हा या गाण्याचा स्थायीभाव आहे. पण ते गोविंदावर चित्रित झाल्यामुळे सगळं कसं अगदी सुसंबद्ध वाटतं!

यानंतर काही काळ त्यांना उदित नारायण हा चांगला गायक आहे हा साक्षात्कार झाला असावा. कारण 'परदेसी' पासून ते 'धडकन' पर्यंत त्यांनी आपली प्रमुख गाणी उदित नारायण यांना दिली. श्री. नारायण हे रडू शकत नाहीत किंवा त्यांना सर्दीही फारशी होत नाही, हे बहुधा त्यांच्या लक्षात आलं असावं. मधल्या काळात त्यांनी विनोद राठोड (हे श्रवणचे बंधू) आणि अभिजीत (हे नदीमचे कुणी नाहीत) यांनाही संधी दिली होती. तसंच, जरी प्रत्येक आल्बमवर स्वतःची छबी छापून घेत असले तरी, आशा भोसलेकडून 'चेहेरा क्या देखते हो' हे गाणंही गाऊन घेतलं होतं!

अलीकडेच नदीम यांनी 'इश्क फॉरेव्हर' या चित्रपटाला संगीत दिलं....कुणाचंच संगीत फॉरेव्हर राहत नाही हे यातून 'बिलकुल' सिद्ध होतं.

मात्र हल्लीच स्टॅफोर्डला (इंग्लंड) एका बांग्लादेशी इंडियन(!) रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. त्याचं नाव 'मेला'. जेवण चांगलं होतं आणि आम्ही अजून जिवंत आहोत हेही जाता जाता सांगायला हरकत नाही. त्यांनी बहुधा 'उदित नारायण सिंग्स फॉर नदीम श्रवण' अशी प्लेलिस्टच लावली असावी. वास्तविक 'मेला' या खाद्यगृहात अन्नू मलिकची गाणी जास्त शोभली असती. असो. पहिलंच गाणं 'दिल का रिश्ता बडा ही प्यारा है' हे 'दिल में इक लहर' उठवून गेलं. (अक्षरशः - कारण चाल जवळ-जवळ तशीच होती. फक्त तिचं पूर्णतः नदीम-श्रवणायझेशन झालं होतं आणि शिवाय तिच्यावर समीरच्या शब्दांचे संस्कार झालेले होते.) 'प्यारा' ऐकूनच आम्ही मनात 'सारा', 'हमारा', 'पुकारा' अशा भेंड्या लावून टाकल्या. ('मेला'मध्ये आलू भेंडी चांगली मिळते - तीच खात होतो.) मोक्ष मोक्ष म्हणजे तरी दुसरं काय असतं?

असाच समीर 'जो मेरी रुहको चैन दे प्यार दे' या गाण्यात 'मैने तनहा कभी जो लिखी थी वही शायरी बन गए हो तुम, जिंदगी बन गए हो तुम' हे लिहून जातो... आपणच वाढवलेल्या आणि न पूर्ण झालेल्या अपेक्षांबद्दल आपल्यालाच वाईट वाटत राहतं... जाऊ द्या.

नदीम-श्रवणच्या संगीतातलं थोडं संगीत 'श्रवणीय' आहे आणि बाकींत नुसताच 'नदीमी कावा' आहे असं आपण समजूया. आता त्यांच्या या गाण्यांनी चित्रपट-संगीतात एक वेगळा कालखंड तयार केला की त्याचा काल खंडित केला हे ज्याचं त्यानं ठरवावं! काय?

- कुमार जावडेकर
'

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लेख आवडला.
नदीम-श्रावण ह्यांची संपूर्ण चोरी इथे सापडेल. ही लिस्ट मोठी आणि वाढत जाणारी आहे असा माझा अंदाज. श्रावण बाळांनी (सन्जीव-दर्शन) हीच उज्ज्वल परंपरा पुढे चालू ठेवली आणि "मन" ह्या पहिल्या चित्रपटात सगळीच्या सगळी गाणी चोरली.
----
भारतीय रेस्टॉरंट्स आणि त्यांची ९०तल्या भिकार संगीताची आवड - हे समीकरण कसं जुळलं असेल? आता आतापर्यंत (२०१० नंतर) कित्येक भारतीय रेस्टॉरंटांत हे मंद ९०दीय संगीत ऐकू येतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>भारतीय रेस्टॉरंट्स आणि त्यांची ९०तल्या भिकार संगीताची आवड - हे समीकरण कसं जुळलं असेल? आता आतापर्यंत (२०१० नंतर) कित्येक भारतीय रेस्टॉरंटांत हे मंद ९०दीय संगीत ऐकू येतं.

चूक....हे संगीत पाणवठ्यांवर ऐकू येतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

याच्या अगोदरच्या काळात केस कापण्याच्या दुकानात लागणारी गाणी असत. ती फक्त तिथेच लागत. कुठून मिळायच्या त्या कॅसेट कोण जाणे.

अगदीच बेवफा, मिलन, जुदाई, यारा, दिलदारा, मुहोब्बत, तनहाई वगैरे ठासून भरलेला खस + गुलाबपाणी फ्लेवर्ड बाजारू बर्फीसारखा तो प्रकार असे.

लिखनेवालेने लिख दी है मिलनके साथ जुदाई

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संगीत पाणवठ्यांवर

म्हणजे काय??

पण हिंदी चित्रपट संगीताची ही कल्ट भावंडं नीट नोंदवायला हवीत.
रिक्शा संगीत (१ आण्याचं गाणं आणि १२ आण्याचं ढिनचॅक)
डान्सबार? (प्रत्यक्ष अनुभव नाही.)
लग्नाच्या आधी घरी नाचायला म्हणून लावण्यात येणारी पेशल गाणी.
कॉलेज फेस्टीव्हल फेवरिट्स
मंडप स्पेशल.
इ.इ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संगीत पाणवठ्यांवर

म्हणजे काय??

ते वाक्य " हे संगीत, पाणवठ्यावर ऐकू येतं" (याने की पब/बार/वॉटरिंग होल) असं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

भाषेचे दौर्बल्य.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नदीम-श्रवण यांचे संगीत, आणि शास्त्रोक्त संगीत, या दोहोंशीही अपरिचित-अनभिज्ञ असल्याकारणाने, लेखातले बरेच संदर्भ डोक्यावरून गेले. त्यामुळे, काहीबाही कमेंटा टाकण्यापेक्षा, (मार्गदर्शक तत्त्वांस अनुसरून) 'लिखाण आवडलं' म्हणून आपला पास नोंदविणे अपरिहार्य ठरते.

हॅविंग सेड दॅट...

ढापाढापीवरून नदीम-श्रवणना दुकट्यांनाच सिंगलौट (खरे तर डबलौट) करण्यात काय हशील आहे? तुमचे ते सी. रामचंद्र याहून वेगळे काय करायचे? 'घरकुल'मधली गाणी काय आहेत? (त्यात तर नुसते संगीतच ढापीव नाहीये, तर काही अंशी गीतरचनासुद्धा... आणि तीही शांता शेळक्यांसारख्या नावाजलेल्या नि ताकदीच्या कवयित्रीकडून!) आणि नंतर 'एक मैं, और एक तू'मध्ये (मला वाटते आर.डीं.नी) मुखड्याचा तुकडा उचलून उचलून कशावरून उचलला असेल, तर 'If you're happy and you know it, clap your hands' या बालगीतावरून? आरारारारारा! अरे, गाण्याचा विषय काय, तुम्ही चाल लावताय कसली, काही विधीनिषेध? उगाच बसवता येते, म्हणून काय वाटेल ती बसवायची?

बरे, ते जाऊ द्या. 'जागृति' नावाच्या पिक्चरबद्दल ऐकले आहेत? नाही, तो ढापलेला नाही. वरिजनलच आहे. मात्र, त्याच्याच काही वर्षांनंतर, तोच बालकलाकार (संतोषकुमार उर्फ त्याचे खरे मुसलमानी नाव विसरलो.) नंतर पाकिस्तानास सहकुटुंब सहपरिवार कायमचा स्थलांतरित झाल्यानंतर, त्याला वापरून पाकिस्तानातील एका निर्मात्याने 'बेदारी' (उर्दूतला अर्थ: 'जागृती'.) नावाचा एक पिच्चर काढला. कधी 'जागृती' आणि 'बेदारी' दोन्हींची रेकॉर्डिंगे मिळाल्यास, ती बाजूबाजूला ठेवून, एकदा दहा मिनिटे याची, तर एकदा दहा मिनिटे त्याची, अशा पद्धतीने पाहा. थक्क व्हाल. रील-बाय-रील, शॉट-बाय-शॉट, डायलॉग-बाय-डायलॉग, आणि गाणे-बाय-गाणे कॉपी आहे. फक्त, 'हिंदुस्तान'ऐवजी 'पाकिस्तान', 'साबरमती के संत'ऐवजी 'क़ाइद-ए-आज़म', 'अजय'ऐवजी (माझी स्मृती दगा देत नसेल, तर) 'अहमद', वगैरे असे माफक ग्लोबल सर्च-अँड-रिप्लेस आहेत. (हे नुसतेच 'जमीन उचलणे' नव्हे, 'अतिक्रमण'सुद्धा नव्हे, तर सरळसरळ 'ऑक्युपेशन' झाले. असो.)

तर सांगण्याचा मतलब, ही ढापाढापी, उचलाउचली, 'जमीन उचलणे' वगैरे हे सर्व दक्षिण आशियाई संस्कृतींत जुने आहे, पुरातन काळापासून चालत आलेले आहे; त्या संस्कृतींचा अविभाज्य घटक आहे. इतके जण उचलतात, तर त्या बिचाऱ्या नदीम-श्रवणच्या दुकट्यांच्याच नावाने का खडे फोडायचे?

बाकी,

मात्र हल्लीच स्टॅफोर्डला (इंग्लंड) एका बांग्लादेशी इंडियन(!) रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. त्याचं नाव 'मेला'.

आमच्या अटलांटाच्या ईशान्येकडील एका बाह्य उपनगरात एक बांग्लादेशी इंडियन रेस्टॉरंट होते/आहे. (बोले तो, एके काळी होते. नंतर मग ते ज्या वॉलमार्टाच्या बाजूस वसलेले होते, ते वॉलमार्ट स्थलांतरित झाल्याकारणाने, त्या वॉलमार्टाच्या आडोशास वसलेल्या इतर अनेक लघुउद्योगांप्रमाणे ते मध्यंतरी अनेक वर्षे बंद पडलेले होते. नंतर मग काही वर्षांनी दुसऱ्या एका जागेत पुन्हा सुरू झाले.)

या रेस्टॉरंटाचे नाव 'पूना'. वास्तविक, त्याचा पुण्याशी कोणत्याही प्रकारे काहीही संबंध नाही. पण तरीही, त्यातसुद्धा एका बांग्लादेशी रेस्टॉरंटाने, आपले नाव 'पूना' का बरे ठेवावे?

कारण सोपे आहे. बिझनेस है, भाई! कोणी जर 'ढाका' नावाचे रेस्टॉरंट काढले, तर मला सांगा, ते चालेल काय?

पाकिस्तानी रेस्टॉरंटे स्वत:स 'इंडो-पाक' रेस्टॉरंटे का म्हणवितात?

(बादवे, या 'पूना'ची पूर्वी लंडनमध्येसुद्धा शाखा होती म्हणे. आता आहे की नाही, ठाऊक नाही. संपूर्ण जगात फक्त दोनच शाखा; एक डुलूथ, जॉर्जियामध्ये, तर दुसरी लंडनमध्ये.)

(बाकी, 'बांग्लादेशी इंडियन' या संज्ञेतील 'इंडियन' या शब्दापुढील कंसातल्या उद्गारचिन्हावरून एक तर आपल्याला या संकल्पनेचे वावडे असावे, नपेक्षा किमानपक्षी या कल्पनेने तुम्हाला अचंबा तरी वाटत असावा, असा ग्रह होतो. आता, तेलुगू मंडळी जर पंजाबी रेस्टॉरंटे चालवू शकतात, तर बांग्लादेश्यांनीच तेवढे काय घोडे मारलेय? त्यांनीच तेवढी 'इंडियन' रेस्टॉरंटे का चालवू नयेत?)

जेवण चांगलं होतं आणि आम्ही अजून जिवंत आहोत हेही जाता जाता सांगायला हरकत नाही.

जेवण 'चांगले होते' म्हणताय, म्हणजे एक तर ते रेस्टॉरंट खरोखर बांग्लादेशी नसले पाहिजे, किंवा मग तुमची अभिरुची अत्यंत भिकार असली पाहिजे. तिसरी शक्यता उद्भवत नाही. सॉरी!

('मेला'मध्ये आलू भेंडी चांगली मिळते - तीच खात होतो.)

'ढाका'मध्ये - आपले, 'पूना'मध्ये - खूप पूर्वी एकदा पनीर टिक्का मसाला की कायसेसे खाल्ले होते. वास्तविक, तीच डिश जर त्या रेस्टॉरंटवाल्याने 'साबूदाण्याची खिचडी' किंवा 'केळ्याची शिकरण' ('कारण शेवटी आम्ही भटेच', इ.इ. - पु.लं.कडून साभार!) म्हणून जरी खपविली असती, तरी काहीही फरक पडला नसता. कारण, मूळ चिजेशी तिचा संबंध तितपतच होता. चालायचेच.

(आता हे आम्हांला तेव्हा माहिती नव्हतं हा काय आमचा दोष? )

नेमका मुद्दा! पूर्वीचे लोक जेव्हा ढापाढापी करायचे, तेव्हा आमची (किंवा एकंदरीतच आपल्या समाजाची) आपल्या सांस्कृतिक परिघाबाहेरची जाण अंमळ मर्यादितच असल्यामुळे, उचलेगिरी कळायची नाही. उलट, 'वा! काय ग्रेट माणूस आहे.' असे वाटायचे. आताच्या पिढीत अवेअरनेस वाढला. त्यामुळे त्याला आता कोणी ग्रेट म्हणत नाही, इतकेच. परंतु, अवेअरनेस असूनसुद्धा असल्या लोकांची सद्दी अजून बंद झाली नाही, आणि ते आपला धंदा बिनदिक्कत आणि निर्लज्जपणे चालवू शकतात, याबद्दल (त्यांच्या chutzpahबद्दल) तरी त्यांना 'ग्रेट' म्हटलेच पाहिजे!

असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

न.बा.
सगळ्याच मुझिक डिरेक्टर्सनी गाणी उचलली आहेत हे मान्य.
पण त्याची टक्केवारीही महत्त्वाची आहे ना?
उ.दा महामहीम प्रीतम. २००० सालानंतर उदयास येऊन आजवर दिलेल्या गाण्यांतली ५०%पेक्षा जास्त गाणी सरळ उचलली आहेत. (खरं तर हा आकडा ९०% ही असेल)
किंवा अन्नू मलिक- इस्राइलचं राष्ट्रगीत सरळ सरळ छापून त्यावर "मेरा मुल्क -मेरा देश मेरा ये वतन" नामक भिकार गाणं दिलजले या चित्रपटात त्याने वापरलं.
(आणि आकाश खुरानाच्या महा तुपट चेहेऱ्यावर कॅमेरा मारून ते कुणीतरी चित्रितही केलं.असो.) मलिकसाहेबांनी एकच गाणं २ वेळा वेगळ्या चित्रपटांत छापलं आहे.

तर त्याचं आणि एस.डी/आर.डी/सलील चौधरी ह्यांची तुलना अयोग्य आहे. हे लोक काही धुतल्या तांदळाचे नव्हेत- पण सरसकट चोरही नाहीत.
तेव्हा तुम्ही आणि अशावेगळ्या तळटीपा वापरा अशी विनंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काळासोबत बदलू शकले नाहीत हाच काय तो मोठा दोष...

बाकी नदीमने सर्व आदर गमावला असल्याने.... त्याचा उल्लेख केला काय नाही केला काय... एकच बाब

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खेळ आपला पण बॅट माझी म्हणून नियम माझे... अन्यथा चपला विसरू नका.

अस्वल, घाटावरचे भट, गवि, 'न'वी बाजू, कुमाऊचा नरभक्षक,
प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
काही मुद्दे-
हे सगळं नदीम-श्रवणचंच नाही तर परंपरागतच (शंकर जयकिशन आणि आर. डी. ची उदाहरणं देऊन) हा उल्लेख केला आहे त्यामुळे यांनाच वेगळं काढलंय असं नाही.
ही गाणी खाद्यगृहांमधे का वाजवली जातात हे खरंच् कोडं आहे... आणि संजीव-दर्शनचा उल्लेखही मस्तच.
'न'वी बाजू,
तुमचं ससंदर्भ स्पष्टीकरण आवडलं. काय करणार, नदीम-श्रवणचं गाणं ऐकताना 'मेला'तली बांग्लादेशी भेंडीही आवडू शकते, यातच जे काय समजायचं ते समजा... बांग्लादेशी इंडियन(!) लिहिण्यामागे एवढंच सुचवायचं होतं की कुणाला काय काय करायला लागेल या जगात ते सांगता येत नाही. (आम्ही जॉन लेननच्या 'इमॅजिन' पंथाचे आहोत.)

- कुमार्

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला. आणि तुमच्याबद्दलचा आदर दुणावला. प्रत्येक गाण्यातला राग तुम्हाला शोधून काढता येतो हे वाचून सदगदित झालो. आम्ही कधी, रामा रघुनंदना म्हणजे बिलासखानी तोडी, याच्या पुढे जाऊच शकलो नाही. काय करणार, जातिवंत ममव आम्ही. बाकी आम्ही तुमच्या तीर्थरुपांच्या किंवा त्याही आधीच्या काळातले असल्यामुळे, शंकर-जयकिशन पेक्षा, मदनमोहन, रोशन, एस.डी.(आकाशातला बाप), सलील चौधरी, अनिल विश्वास, अण्णा,जयदेव आणि तत्कालीन अनेकांच्या गाण्यांतच रमलो. यासर्वांनीच थोडीफार उचलेगिरी केली असली तरी त्यांच्यात प्रगाढ प्रतिभाही आहे असं आमचं मत आहे. त्यावरुन ऋषिचे कुळ आणि गाण्याचे मूळ शोधायला जाऊ नये, अशी नवीन म्हणही आम्ही बनवून घेतली आहे.
शंकर-जयकिशन यांच्या किंवा आरडीच्याही अनेक सुरावटींनी आम्हाला प्रचंड आनंद मिळवून दिला आहे. तुलनेने, एलपी, कल्याणजी यांच्या फक्त मोजक्याच गाण्यांत आम्हाला श्रवणसुख मिळाले , हे नमुद करतो. ऐंशीच्या दशकात आम्ही प्रचंड निराश झाले असताना, नव्वदच्या दशकांत, नदीम-श्रवणची गाणी ऐकून, मेलडी या प्रकारांत कोणी परत प्रयत्न करत आहे की काय, या आशेने आमच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण अनेक गाणी ऐकताना त्यांत जुनीच गाणी ऐकू यायला लागल्यामुळे, आम्ही तो नाद सोडून दिला.
त्यानंतरच्या काळात मात्र, आंग्लाळलेल्या पंजाबड्या संगीताने(?) आमचे कान कायमचे किटल्याने, आम्ही आता स्वत:भोवती एक गुहा बांधून घेतली आहे. त्यांत फक्त, आमच्या कलेक्शनलाच प्रवेश आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

तिरशिंगराव, आपला प्रतिसाद आवडला, आपण समदु:खी आहोत असं वाटलं. शंकर-जयकिशन, सलील चौधरी, मदन-मोहन इ. प्रतिभावंत होतेच. त्याचप्रकारे नव्वदीत आशा पल्लवित झाल्या आणि मग काय झालं ते वर लेखात आलं आहेच - 'आपण प्रतिभा शोधून काढू आणि मग रतीब कोणता हे पाहू' या नादात.
- कुमार्

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

महाराष्ट्राचं तिसरं लाडकं व्यक्तिमत्व कणेकरांचं लेखन या लेखासारखं आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट2
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

दुसरं लाडकं व्यक्तिमत्त्व कोण है?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुल पवार

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण नावं सांगतो - अवचट, भावोजी, कणेकर, निलेश साबळे and so on..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

हिंदी सिनेमांच्या गाण्यांतले राग आणि इंग्लिश बोलणाऱ्या लोकांच्या हेलांवरून त्यांचे मूळ प्रांत ओळखणाऱ्या लोकांबद्दल मला अतीव आदर वाटतो. मग मी त्यांच्यासमोेर गाणं म्हणत नाही आणि इंग्लिशही बोलत नाही. उगाच का लोकांना त्रास द्यायचा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख आवडला.
थोडं अवांतर:
90च्या दशकातला संगीत दिग्दर्शक विजु शाह जरा अंडर्रेटेड होता असं वाटतं. नदीम श्रवण, जतीन ललित, रेहमानवगैरे असताना त्याला फार प्रसिद्धी नाही मिळाली. पण गुप्त, मोहरा, विश्वात्मा वगैरे चित्रपटांमधली गाणी मला खूप आवडतात. इथे अजुन आहे का कोणी विजु शाहचे चाहते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मी आहे.
त्रिदेव, मोहरा, गुप्त, विश्वात्म, सोबतच तेरे मेरे सपने आणि तुझे मेरी कसम ही पण गाणी मस्त दिलेली विजू शाहने.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरं तर मी ऐकलं होतं की 'त्रिदेव'चं संगीतही 'गुप्त'पणे विजू शाहचं होतं पण ते कल्याणजी (त्याचे वडील)-आनंदजींच्या नावानं प्रसिद्ध झालं. ते मला आवडलं होतं. 'गुप्त'चं ही चित्रपटाला साजेसं होतं.
बाकी मला वाटतं अन्नू मलिक आणि काही प्रमाणात जतिन-ललित (अर्थात रहमानला यातून पूर्णपणे वेगळा काढायला हवा) सोडले तर हे सगळे एका काळातून बाहेर पडू शकले नाहीत. या उलट अन्नूनं (इथे फक्त संगीताच्या काळाची चर्चा करतो आहे) आधी एल. पी. सारखं (उदा. मर्द, आवारगी), मग नदीम-श्रवणसारखं (उदा. बाजीगर, फिर तेरी कहानी... ), त्यानंतर अजून वेगळं (बहुधा स्वत:चं असं) आपलं संयोजन बदलत नेलं आणि कायम वाहत्या गंगेत राहिला.
- कुमार

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणून त्याचा स्पेक्ट्रम बराच वाईड म्हणता येईल... बाकी चुरा के दिल मेरा असो, की तेरे दर पर सनम असो अथवा संभाला है मैने बहोत अपने दिल को असो अथवा मेरा पिया घर आया ओ रामजी सारखी चोरी असो अनु मलिक इस डिसेंट ऐनटरटेनर... फॉ शूर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खेळ आपला पण बॅट माझी म्हणून नियम माझे... अन्यथा चपला विसरू नका.

अगदी त्याची प्यार ईश्क और मोहबत ची गाणीही मी मनसोक्त गुणगुणली आहेत...

रेहमान पूर्व काळातील माझ्या नजरेतील तो सर्वोत्तम वा कदाचित एकमेव कीबोर्ड प्लेअर होता

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खेळ आपला पण बॅट माझी म्हणून नियम माझे... अन्यथा चपला विसरू नका.

विजू शहासुद्धा या उचल्यांच्याच रांगेतला... काही गाणी मात्र चांगली आहेत. अगदी लोकांना आवड्णाऱ्या 'गुप्त' सिनेमाच्या गाण्यांचे प्रिल्यूड्स उचललेले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0