कोविडोत्तर अर्थव्यवस्था : नवयुग चूमें, नैन तिहारे । जागो जागो, मोहन प्यारे ।

डोकीवर आणि दाढीत पांढरे केस उगवण्याचा एक तोटा म्हणजे सदरहू इसम हा मार्गदर्शन करणेलायक झाला आहे अशी एक गप्प ममव मार्केटमध्ये पसरते. विशेषतः दहावी बारावीच्या निकालानंतर मार्गदर्शनेच्छू लोकांचा सुकाळू होतो, आणि बऱ्याच जणांचा मुख्य प्रश्न असतो,

"सध्या स्कोप कशाला आहे?"

लेट मी क्ल्यारिफाय, विचारणाऱ्याच्या बाजूने या प्रश्नात चूक काहीही नाही. डोकीवर एकही पांढरा केस नसताना आणि दाढीचा उदय होत असताना मीही हा प्रश्न कोणा बेसावधाला पकडून विचारला असेल.

समस्या माझ्या बाजूने आहे. 'सध्या' आणि 'स्कोप' म्हणजे नक्की काय हा अचूक व्याख्येचा प्रश्न ऑप्शनला टाकला तरी 'सध्या स्कोप कशाला आहे?' या प्रश्नाचं खरंखुरं, प्रामाणिक उत्तर "मला माहीत नाही, भो" हे आहे.

आणि ही परिस्थिती कोविडपूर्वकाळाची.

आता बोलताना कोविडपूर्वकाळ आणि कोविडोत्तरकाळ या शाब्दिक खुंट्या अपरिहार्य होणार आहेत. जग बदललं. तीनचार महिन्यांच्या काळात, डोळ्यांसमोर, बघता बघता बदललं. 'जुने जाऊ द्या...' ही ओळ पूर्ण करायला भीती वाटावी अशी परिस्थिती अजूनही आजूबाजूला आहे, पण 'सावध, ऐका पुढल्या हाका' हे मात्र चिरकालीन सत्य टिकून आहेच.

तीनचार महिन्यांच्या अनुभव-निरीक्षणांवरून कोविडोत्तरकाळातली अर्थव्यवस्था यावर लिहिण्याचा हा प्रयत्न आहे. चर्चा “न्यू नॉर्मल”ची, अर्थात ‘नवयुगा’ची आहे. कोविड-१९ या महामारीने माणसाच्या आयुष्यात काय उत्पात घडवले याचा संपूर्ण लेखाजोखा मिळवायला पुढची कैक वर्षं जातील. आत्ता आपली अवस्था तैलचित्राच्या पृष्ठभागावरून चालणाऱ्या मुंगीसारखी आहे. "मला माहीत नाही, भो" हे कधी नव्हतं तेवढं आज लागू आहे, त्यामुळे ते जाणूनच पुढलं वाचा.

■■

विचार करण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली, अनुमानजन्य युक्तिवाद, किंवा साध्या भाषेत inductive reasoning. यात निरीक्षणांपासून सुरुवात करतात, आणि जे दिसतंय त्याचा अर्थ लावत लावत यातून काही नियम किंवा प्रमेय सिद्ध करता येतंय का ते बघतात. दुसरी पद्धत म्हणजे निगमनिक युक्तिवाद, अर्थात deductive reasoning. यात एक सूत्र / वाक्य / परिकल्पना (hypothesis) मांडतात, आणि निरीक्षणांचा आधार घेऊन ती परिकल्पना सिद्ध होते (किंवा होत नाही.)

आपल्या विषयासाठी आजच्या घडीला अनुमानजन्य युक्तिवाद तोकडा आहे. कोविडमुळे जग बदलायला लागून उणेपुरे चार महिने झाले आहेत. कोविडने माजलेल्या उतमातीचं चित्र पूर्ण सोडाच, निम्मंही काढून झालं नाहीये. सध्या मिळणारी विदा तोकडी, एकांगी, आणि दिशाभूल करणारी असू शकते. (अर्थात : वेगवेगळ्या लिंकांची अस्त्रं सोडू नयेत. त्यासाठी हा धागा वापरा) आपल्याला सध्या निगमनिक युक्तिवादाचा आश्रय घेण्याशिवाय पर्याय नाही.

त्यामुळे, पुढील लेखात लिहिलेल्या गोष्टी ‘भाकीत’स्वरूपी आहेत. यातल्या अनेक गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत, पूरक आहेत, प्रसंगी छेद देणाऱ्या आहेत. शिवाय, यातल्या अनेक बदलांच्या तीव्रतेविषयी काही भाष्य आत्ताच करणं चूक ठरेल. (म्हणजे, घरांच्या किमती घसरतील हे सांगता येईल, पण नेमक्या किती टक्क्यांनी घसरतील हे सांगणं निव्वळ अशक्य आहे.) या लेखात कोणत्याही एका देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला नाहीये. कोणत्याही ‘देशाची अर्थव्यवस्था’ अशी तुकड्यातुकड्यात पाहता येत नाही, पाहणं चूक आहे. या लेखातलं ‘नवयुग’, आणि त्यातली अर्थव्यवस्था जागतिक आहे. भारताची किंवा होन्डुरासची किंवा पापुआ न्यू गिनीची नाही. शेवटी, कोविडमुळे आर्थिक महामंदी येऊ पाहते आहे, किंबहुना येऊन ठेपली आहे. त्या मंदीचे परिणाम हा वेगळा आणि खोल विषय आहे. नवयुगातल्या अर्थव्यवस्थेचा विचार करताना आर्थिक मंदी आणि त्याचे परिणाम हा भाग मुद्दाम वगळला आहे.

आता हे थोडं मराठी वाहिनीवरच्या भविष्यासारखं (गुरुकृपा लाभेल, अचानक खर्च उद्भवतील, उजव्या किडनीतून आनंदाच्या लहरी येतील) किंवा वर्तमानपत्रांतल्या घोड्यांच्या शर्यतींच्या वृत्तांकनासारखं (पहिल्या स्थानासाठी मंबा क्वीन आणि सिफिलिस ड्रीम यांच्यात चुरस होईल, पण शेवटच्या क्षणी व्हिस्परिंग जिप्सी जिंकेल!) होतं आहे. पण त्याला इलाज नाही. यातल्या किती परिकल्पना, किती भाकितं खरी होणार ये आनेवाला वक्तच बताएगा. ‘आत्ता जितकं कळतंय / वाटतंय / दिसतंय ते आणि तितकं हे आहे’ या bounded rationalityच्या चष्म्यातून याकडे बघायला पाहिजे.

■■

जगात माणूस जसा जगत होता त्यात काही मूलभूत बदल घडू पाहताहेत. हे मूलभूत बदल अर्थव्यवस्थेच्या कोणत्या अंगांना स्पर्शून जाणार आहेत?

१) आरोग्य

कोविड महामारीमुळे आजच्या तारखेपर्यंत सुमारे दोन कोटी तीस लाख लोक बाधित झाले आहेत, आणि सुमारे आठ लाख लोकांचा मृत्यू ओढवला आहे. नवयुगात सर्वात पहिली गरज आहे ती ही बाधा आणि मृत्यू थांबवायची. कोविडवरची लस शोधण्यासाठी जगातल्या अनेक फार्मा कंपन्या प्रयत्न करत आहेत. जो कोणी ही लस प्रथम शोधेल त्याचं उखळ किती पांढरं होईल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो! तेच औषधांचंही. उदा० Cytokine storm शमवणाऱ्या औषधांची गरज अचानक वाढली आहे.

औषधं आणि कोविडची लस हा तात्कालिक भाग झाला. आरोग्याशी संबंधित अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम काय होऊ शकतात?

फार्मा क्षेत्रात वर्षानुवर्षांच्या संशोधनानंतर मानवी चाचण्या होऊन औषध बाजारात येतं. कोविड-लसीच्या संशोधनासाठी ही सगळीच प्रक्रिया अत्यंत वेगाने घडवण्यासाठी फार्मा कंपन्यांनी कंबर कसली आहे, आणि त्याला विविध देशांच्या अन्न आणि औषध प्रशासनांचीही साथ आहे. यामुळे औषधनिर्मिती क्षेत्रात क्रांती होऊन औषध-संशोधन-निर्मितीचा वेग वाढण्याची शक्यता आहे. जास्त औषधं, म्हणजे जास्त विक्री, आणि जास्त नफा.

लोभ आणि भीती हे माणसाच्या वर्तनात बदल घडवून आणणारे दोन मोठे घटक असतात. विमाव्यवसायाचा उदय, एड्सच्या प्रादुर्भावानंतर काँडोम्सच्या वापरात झालेली वाढ, अशी भीतीमुळे मानवाच्या वर्तनात बदल घडल्याची अनेकानेक उदाहरणं जगाच्या इतिहासात आहेत. कोविडने संसर्गजन्य रोगांची एक भीती उदयाला आणलेली आहे. संसर्गजन्य रोगांवर लसीकरण हा एक भाग झाला, पण खरं सुरक्षा कवच आपलीच रोगप्रतिकारशक्ती देणार ही जाणीव बळावते आहे. रोगप्रतिकारशक्ती बळकट करणारी औषधं याकडे फार्मा कंपन्या ‘उद्याचा धंदा’ म्हणून बघत असणार.

आजच्या घटकेला आरोग्य सेवा (रुग्णालयं आणि संबंधित सेवा) मोडून पडतील की काय अशी भीती वाटत आहे. महामारीमुळे मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त आहे. औषधं / लसीकरणामुळे मागणी कमी होत जाईल, आणि पुरवठा वाढत जाईल. पण याचा एक परिणाम आरोग्यसेवांच्या भाववाढीचा होईल की काय अशी शक्यता वाटते. परत कधी “पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त” अशी स्थिती आलीच, तर जो रुग्ण जास्त पैसे मोजू शकतो त्याला प्राधान्य मिळणार हे उघड आहे. आणि ही प्रीमियम सर्व्हिस घ्यायला पैसे बाळगणारे लोक पैसे मोजणार, हेही.

एकंदरच आरोग्याशी संबंधित व्यवसायांना सोन्याचे दिवस दिसणार आहेत, अशी चिन्हं आहेत.

२) सुरक्षितता

आरोग्याबरोबर येते ती सुरक्षितता. कोविडच्या संसर्गापासून सुरक्षा पुरवणारी साधनं ही जवळजवळ प्राथमिक गरज झालेली आहे. मास्क, ग्लोव्ह्ज आणि सॅनिटायझर हे त्रिकूट नवयुगातल्या आयुष्याची प्रतीकं गणावी लागतील. या तीन गोष्टींचं उत्पादन करण्याचा व्यवसाय चांगलाच फोफावला आहे, आणि आणखी फोफावण्याचीच शक्यता जास्त आहे.

वर लिहिलेला ‘वर्तनातला बदल’ इथेही महत्त्वाचा आहे. अमुक एका प्रकारे निर्जंतुक केलेली कामाची ठिकाणं, सार्वजनिक प्रवासाची साधनं (बसेस, रेल्वे, इ.), इत्यादी कदाचित कायद्याने सक्तीचं केलं जाईल. तसं निर्जंतुकीकरण करण्याच्या व्यवस्था उदयाला येतील, आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्य केली जाणारी मानकं (standards) उदयाला येतील. (उदा० खाद्यपदार्थ बनवताना पाळायच्या स्वच्छतेची हसॅप मानकं जगभर मानली जातात.) पण भीती जाणार नाही, आणि त्यामुळे अमुक प्रकारे, तमुक मानकांशी सुसंगत असलेलं निर्जंतुकीकरण केल्याची ग्वाही देणारी एक परीक्षण करून प्रमाणपत्र देणारी व्यवस्था उदयाला येईल.

वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता हा बऱ्याच अंशी ऐच्छिक विषय होता. तो आता अनिवार्य विषय होईल असं वाटतं आहे. (आणि तसा तो व्हावाही.)

३) बाजारहाटाच्या बदलत्या सवयी

लोक घराबाहेर पडून बाजारहाट करायला घाबरतायत. लस सापडून, ती त्या व्यक्तीपर्यंत पोचून, लशीची गुणवत्ता सिद्ध झाल्यावरच लोकांच्या मनातलं भय पूर्णपणे संपेल. कदाचित संपणारही नाही.

याचा दुहेरी परिणाम दिसतो आहे. गेल्या तीनचार महिन्यांत ऑनलाईन बाजारहाटाकडे जगभर वाढता कल दिसू लागला आहे. अमेझॉनसारखे ऑनलाईन बाजार अभूतपूर्व व्यवसाय करत आहेत. ऑनलाईन बाजारहाट ग्राहकांसाठी सुकर असला तरी विक्रेत्यांसाठी अवघड असतो. पूर्वी कोपऱ्यावरच्या माताजी डिपार्टमेंटल स्टोअरला साबणाच्या वड्यांचा बॉक्स विकला की काम होत असे. नवयुगात ग्राहकाच्या दारापर्यंत साबणाची वडी पोचवावी लागेल. ग्राहक साबणाची एक वडी मागवून थांबणार नाही, फेसपावडरचा डबा, टिकलीचं पाकीट, इत्यादी गोष्टीही मागवेल. हे सगळं वेळच्यावेळी ग्राहकापर्यंत पोचवणं (धंद्याच्या भाषेत fulfillment) ही गोष्ट ऑनलाईन दुकानांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. विक्रेते म्हणतील, आम्ही आमच्या वस्तूकडे लक्ष देऊ की ही fulfillmentची झंझट करत बसू? मग ती झंझट हाच मुख्य व्यवसाय असणारे मध्यस्थ / दलाल लोक निर्माण होतील. (अमेझॉन, उबर हे असेच मध्यस्थ / दलाल आहेत.)

पूर्वी ज्या वस्तू ऑनलाईन मिळत नव्हत्या त्या नवयुगात ऑनलाईन मिळायला लागतील. जुने दुकानदार (धंद्याच्या भाषेत brick and mortar विक्रेते) ऑनलाईन दुकानं थाटायला लागतील. शहरी भागात भाज्या, फळं, इत्यादी गोष्टी घरपोच मिळायला सुरुवात झालेलीच आहे. तयार अन्नही मिळायला लागलेलं आहे.

(मराठी नियतकालिकं आणि दिवाळी अंक ऑनलाईन मिळणार नाहीत. जग अजून इतकंही पुढे गेलं नाहीये. उगाच माजायचं नाही!)

याचीच दुसरी बाजू म्हणजे ‘प्रत्यक्ष’ खरेदीत होणारी घट. बऱ्याच देशांत ऑनलाईन बाजारहाटाच्या वाढत्या प्रभावामुळे ‘हाय स्ट्रीट’ दुकानं आधीच धोक्यात होती. आता त्यांना असलेला धोका आणखीच वाढेल. ‘हाय स्ट्रीट’ खरेदी ही फक्त चैनीच्या वस्तूंपुरती मर्यादित राहील, बाकी गरजेच्या वस्तू ऑनलाईन माध्यमातून घेणं ग्राहकाला सोयीचं पडेल. हा बदल आगोदरच होत आहे. लक्ष्मी रस्त्यावर आता लग्नाचे उभयलिंगी भरजरी कपडे आणि दागिने सोडून काही मिळत नसावं. नवयुगात हा बदल आणखी वेगाने घडेल एवढंच.

एका अर्थी बघायला गेलं तर ही लहान व्यावसायिकांसाठी इष्टापत्ती आहे. अनेक लघुउद्योजकांचे स्फुल्लिंग ‘दुकान परवडत नाही’ म्हणून विझून गेले असतील. आता दुकानाची गरज उरणार नाही. प्रचंड मोठा, कदाचित जागतिक ग्राहकवर्ग मिळू शकेल.

४) घरबशांचं मनोरंजन

घरी बसून करणार काय? काम करण्याबद्दल बोलूच, पण मनोरंजनाचं काय? मनोरंजनाच्या पारंपरिक प्रकारांत आमूलाग्र बदल होताना दिसतो आहे. सिनेमा-नाट्यगृहं बंद तरी झाली आहेत किंवा जायची भीती वाटते. एकत्र जमून काहीही करण्याची भीती वाटते आहे.

त्यामुळे मोठा वर्ग ऑनलाईन मनोरंजनाकडे वळला आहे. नेटफ्लिक्स किंवा अमेझॉन प्राईमसारखे ओटीटी प्लॅटफॉर्म आगोदरच हातपाय पसरत होते, आणि आता नवयुगात कदाचित हेच मनोरंजनाचं प्रमुख साधन म्हणून उदयाला येईल. कलाकार आपली कला युट्यूबसारख्या मंचावर सादर करायला लागलेच आहेत. कला सादर करण्याच्या माध्यमात होणाऱ्या बदलामुळे मूळ कलेतच बदल होतो हेही अनेकदा पाहायला मिळालं आहे. ऑनलाईन सादरीकरणाला नाक मुरडणाऱ्या कला हळूहळू ऑनलाईन माध्यमाशी जुळवून घेता आहेत. (‘नेटवरचं नाटक’ अर्थात ‘नेटक’ असा अभिनव प्रयोग नुकताच झाला.)

वर जे लहान व्यावसायिकांबद्दल लिहिलं तेच लहान कलाकारांबाबतही लागू पडतं. करोना ही त्यांच्यासाठी इष्टापत्ती आहे, कारण नवयुगात तुलनेने अप्रसिद्ध असलेला एकांडा कलाकारही आपल्या कलेच्या चाहत्यांपर्यंत पोचू शकतो.

काही मनोरंजन निर्माण करण्याची प्रक्रिया अजूनही एकेकटी करता येत नाही. एखादी वेबसिरीज किंवा चित्रपट एकट्याने पाहता आला तरी तो निर्माण करण्याच्या प्रक्रियेतील काही घटक (मुख्यत्वे चित्रीकरण) मात्र एकत्र जमूनच करायला लागतात.

५) घरबशांचं काम

एक काळ असा होता,की ‘घरून काम’ हे गुलबकावलीच्या फुलाइतकं दुर्मीळ होतं. लॉकडाऊनमध्ये अनेकांनी घरून काम केलं, आणि नोकरी करणाऱ्या आणि देणाऱ्या अशा दोन्ही वर्गांच्या लक्षात हळूहळू येऊ लागलं की लोकांना घरून काम करू देणं सोयीचं आहे.

नोकरी देणाऱ्याच्या बाजूने विचार केला, तर खुर्चीउबव्या लोकांसाठी चकाचक ऑफिस आणि जेवण्यासाठी कँटीन वगैरे गोष्टींची गरज काय? नवयुगात या खुर्चीउबव्याने काम केलं म्हणजे झालं. मग ऑफिसचा खर्च तेवढाच कमी करता येईल. त्यामुळे कंपन्यांनी सुरुवातीला जुलुमाने केलेला रामराम आता स्वखुशीत बदलतो आहे. काही काळात “घरून काम करणार असाल तर अमुकतमुक सवलती / चार पैसे अधिक पगार / अधिक सुट्ट्या” वगैरे गाजरबाजी कंपन्यांनी सुरू केल्यास नवल वाटायला नको. याचा परिणाम अर्थातच ऑफिस स्पेसची मागणी घटण्यात होणार आहे.

कारकुनांचं एक ठीक आहे, पण काही व्यवसाय हे ‘घरबशे’ नव्हते. नवयुगात ते व्यवसायही घरून करायची मुभा मिळेल. उदा० वकिलांना पूर्वी कोर्टात हजेरी लावण्याशिवाय पर्याय नव्हता. आता कोर्टाने व्हिडियोकॉन्फरन्सिंग सुरू केलं आहे. (त्याचा फायदा घेऊन एक न्यायमूर्ती निवांत हुक्का मारत न्यायदान करत असतानाचा व्हिडियो नुकताच व्हायरल झाला आहे. कोर्टाचा अवमान झाला असेल तर आगोदरच दिलगिरी व्यक्त करतो. नंतर वडवड नाय पायजे.)

घरबशांना घरून काम करायला पूरक गोष्टी हाही नवयुगातल्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग असणार आहे. त्यातल्या ‘संपर्क तंत्रज्ञान’ (इंटरनेट इ.) या भागाविषयी खाली वेगळं लिहिलेलं आहे. त्याव्यतिरिक्तही घरबशांना काम करण्यासाठी अनेक पूरक वस्तू / सेवा लागणार आहेत. व्हिडियो कॉन्फरन्सिंग ही घरून काम करण्याची गरज झाल्यात जमा आहे. ‘झूम’ हे नाव चार महिन्यांपूर्वी कोणी ऐकलंही नव्हतं, आणि आता “दत्त प्रासादिक ज्येष्ठ नागरिक भजनी मंडळा”ची साप्ताहिक मीटिंगही झूमद्वारे होते.

क्लाउड तंत्रज्ञानाचा वापर कंपन्या आपली विदा सुरक्षित ठेवण्यासाठी वापरायला लागले आहेत. भौगोलिकदृष्ट्या लांब असलेल्या नोकरदारांसाठी काम करणं सुलभ करणारी ‘मायक्रोसॉफ्ट टीम्स’सारखी सॉफ्टवेअर्स बाजारात आली आहेत. आपल्या संगणकाच्या पडद्यावर दिसणाऱ्या या ‘व्हर्च्युअल ऑफिस स्पेस’चा वाटा वाढत जाणार आहे.

घरून काम करणाऱ्या लोकांची मोठी तक्रार म्हणजे “आमचं घर लहान आहे, घरात शांतपणे काम करण्यासाठी जागा नाही”. यावर उपाय, अर्थातच, ‘मोठी घरं’ हा आहे. इतके दिवस घर - ऑफिस - घर या प्रवासचक्रात किती वेळ घालवायचा आहे यावर ‘कुठे राहायचं’ हा निर्णय अवलंबून होता. नवयुगात या निर्णयात ‘मोठं घर कुठे मिळेल’ यावर अवलंबून राहील, कदाचित. याचा परिणाम घरांच्या किमतीवर आणि उपलब्धतेवर कसा आणि किती होईल याबद्दल बोलणं आत्ता अस्थानी आहे.

६) घरबशांची जगाशी ‘जोडणी’

संपर्क तंत्रज्ञान (communications technology) ही नवयुगात पायाभूत असणार आहे. दोन किंवा जास्त व्यक्तींनी एकमेकांच्या समक्ष न येताही एकमेकांशी ‘संपर्क’ करण्याची व्यवस्था. वेगवान आणि स्थायी (stable) इंटरनेट ही जवळजवळ मूलभूत गरज होईल. इंटरनेटच्या वाढत्या वापराबरोबर ‘इंटरनेट सुरक्षितता’ यालाही अतिशय महत्त्व प्राप्त होईल. यातच येतात इंटरनेट ज्यामार्फत वापरलं जातं ती उपकरणं (devices). तीही ताकदवान आणि सुरक्षित असणं गरजेचंच आहे. एकंदरीतच चिपसेट उत्पादक (एएमडी), उपकरणं बनवणाऱ्या कंपन्या (अॅपल), इंटरनेटचा कणा (backbone) असलेलं संपर्कजाल पुरवणाऱ्या कंपन्या (व्हेरायझन), ग्राहकाला इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्या (जिओ), इंटरनेटवापर जलद करणारं तंत्रज्ञान पुरवणाऱ्या कंपन्या (अकामाई), ग्राहकाला संपर्काचं सॉफ्टवेअर पुरवणाऱ्या कंपन्या (झूम) या सगळ्यांच पुरवठा साखळीला अनन्यसाधारण महत्त्व नवयुगात प्राप्त होणार आहे.

७) प्रवास आणि पर्यटन

नवयुगात सर्वात मोठा फटका कोणाला बसणार असेल तर तो प्रवास आणि पर्यटन क्षेत्राला. लॉकडाऊनमुळे प्रवास आणि पर्यटन सध्या तर जवळजवळ ठप्पच झालं आहे. यात विमान कंपन्या, प्रवास सुखकर करून देणारे एजंट, (राहण्याची) हॉटेलं, पर्यटनाशी संबंधित इतर सेवा (उदा० प्रेक्षणीय स्थळे दाखवणारे गाईड), उपाहारगृहं, असे सगळे येतात.

पण नवयुगातही, जोपर्यंत संसर्गजन्य रोगांची (कोविडजन्य) भीती टिकून आहे, तोपर्यंत प्रवास आणि पर्यटन या क्षेत्रांना लागलेलं ग्रहण सुटण्याची शक्यता फार कमी आहे. किंबहुना प्रवास आणि पर्यटन या गोष्टींचा प्रवास महाग होण्याकडे होईल असा अंदाज आहे, कारण नवयुगात सुरक्षितता या गोष्टीला किती महत्त्व येणार आहे हे आपण वर बघितलंच. अशा सुरक्षिततेचे निकष पाळून होणारा प्रवास / पर्यटन हे आत्तापेक्षा महाग असणार हे नक्कीच.

८) सणसमारंभ

सणसमारंभ हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं म्हणतात. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे, आणि मोठे सण, समारंभ, उत्सव, हे गर्दीशिवाय होत नाहीत. यंदा २०२०मध्ये ईद, पंढरपूरची वारी, आणि गणेशोत्सव या तिन्ही गोष्टींवर निर्बंध लादले गेले आहेत. लग्न समारंभही कमीत कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत साजरे करायचे आदेश आहेत. आपल्या समाजातल्या एकंदर उत्सवप्रियतेचा विचार करता कमी उपस्थितीत सण-समारंभ साजरे करणं कदाचित तात्पुरतं असू शकतं.

पण नवयुगात, कोविडच्या भीतीमुळे यदाकदाचित सण-समारंभांतली गर्दी कमी झाली तर भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा आणि दूरगामी परिणाम होईल हे नक्की.

९) शिक्षणक्षेत्र

काही वर्षांनी “लॉकडाऊनच्या आठवणी” असं कुणी काही लिहिलं तर त्यात एक महत्त्वाची गोष्ट असेल : “ऑनलाईन शिक्षण”. या महामारीच्या काळात अगदी पहिली-दुसरीपासून ते उच्चशिक्षणापर्यंत ऑनलाईन वर्ग भरायला लागले. शिक्षण क्षेत्रात ही मोठी क्रांती म्हणायला लागेल.

भारतासारख्या देशात ऑनलाईन शिक्षण ही सोपी गोष्ट नाही. मुळात ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारी पायाभूत उपकरणं (infrastructure) - म्हणजे कॉम्प्युटर इंटरनेट इत्यादी - उपलब्ध असणारे समाजातले घटक फारच थोडे आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण आजच्या घडीला सर्वसमावेशक होऊ शकतं का याविषयी मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. याकडे बघण्याची दृष्टी “हे संकट नसून संधी आहे” अशी असेल तर ऑनलाईन शिक्षणक्षेत्राच्या वाढीच्या संधी त्यात दिसू शकतात.

ही पायाभूत उपकरणं उपलब्ध झाली, की ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमाद्वारे जगातल्या उत्तमोत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. कोर्सेरा किंवा उदेमीसारख्या मूक (Massive open online course) उपलब्ध करून देणाऱ्या वेबसाइट्स याबरोबरच इंग्लंडमधली ‘ओपन युनिव्हर्सिटी’ किंवा कॅलिफोर्नियातली ‘यूनिव्हर्सिटी ऑफ द पीपल’ अशा माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता असलेल्या पदव्या मिळवणं आजही शक्य आहे. नवयुगात ऑक्सफर्ड केंब्रिज किंवा कॅल्टेकसारखी पारंपरिक विद्यापीठंही ऑनलाइन शिक्षणाकडे वळतील अशी शक्यता अजिबातच नाकारता येत नाही.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या शिक्षण सम्राटांनी गल्लीबोळात उघडलेल्या शिक्षणसंस्थांचं भवितव्य काय हा मोठा प्रश्न भविष्यात उभा राहू शकतो.

१०) बँका आणि आर्थिक सेवा

वर लिहिल्याप्रमाणे महामारीमुळे येऊ घातलेली आर्थिक मंदी, आणि त्याचे परिणाम हा या लेखाचा विषय नाही. महामारीमुळे आलेल्या नव्या युगात बँक आणि अन्य आर्थिक सेवा कशा प्रकारे बदलू शकतात याचा विचार इथे करतो आहोत.

बदलत्या तंत्रज्ञानामुळे आणि भारत सरकारच्या कॅशलेस कोलांट्याउड्यांमुळे बँकेसारख्या आर्थिक सेवांसाठी प्रत्यक्ष बँकेच्या शाखांमध्ये जाणं कमी झालं आहे. तरीही विम्यासारख्या आर्थिक सेवा अजूनही जुन्या पद्धतीनेच चालतात - विशेषतः सरकारी कंपनीत.

(लॉकडाउनच्या काळात एलआयसीचा आणि माझा काही कामाबाबत अत्यंत मनोरंजक पत्रव्यवहार झाला. त्याचं ठोसा बाय ठोसा वर्णन कधीतरी वेगळा लेख लिहून करावं लागेल, पण एकंदर एलआयसीचा सूर असा होता की जग २०२०मध्ये पोचलेलं असूदे, जगात महामारी सुरू असूदे, पण आम्ही १९५०च्या दशकात ठरवलेल्या आमच्या प्रक्रियेप्रमाणेच जाणार. याबाबतीत मराठी नियतकालिकांच्या संपादकांचे आणि एलआयसीचे अगदी छत्तीस गुण जुळतात. असो.)

११) सरकार आणि सरकारी सेवा

काही वर्षांपूर्वी “सुबत्ता आली की सरकारवरचं अवलंबित्व कमी होतं” असं प्रतिपादन एका लेखात केलं होतं. सध्या सरकारवरचं अवलंबित्व वाढलेलं दिसत आहे, पण अर्थात महामारी ही सुबत्ता नव्हे.

गेल्या चार महिन्यांत महामारीसारख्या संकटांशी मुकाबला करण्यासाठी ‘सरकार’ ही व्यक्ती किती महत्त्वाची आहे याचा पुन्हा एकदा साक्षात्कार झाला आहे. सामान्यतः असं चित्र आहे, की जिथे (अ) सरकार कार्यक्षम आहे, (आ) "सरकार / सरकारी यंत्रणा कार्यक्षम असून आपल्या हिताची त्यांना काळजी आहे" हा विश्वास लोकांना आहे, आणि (इ) अशा सरकारी यंत्रणांना बळ पुरवण्यासाठी सामान्य नागरिक आपापली भूमिका बिनतक्रार बजावतो आहे अशा ठिकाणांनी महामारीला यशस्वीपणे तोंड दिलं आहे. जिथे या त्रिसूत्रींपैकी किमान एक गंडलेली आहे, तिथे महामारीचं थैमान चालू आहे.

समाजवाद कशाला म्हणावं, आणि त्याची व्याप्ती काय, या तांत्रिक प्रश्नांत न गुंतता सरळ विचार केला, तर आपल्या नागरिकांच्या योगक्षेमाची (well beingची) जबाबदारी सरकारची असते यात दुमत नसावं. महामारी, परचक्र, आर्थिक अस्थैर्य अशा घटना घडल्या की ही जबाबदारी अधोरेखित होते. नवयुगात सरकारी सेवांची व्याप्ती वाढण्याची चिन्हं आहेत. विशेषतः ‘आरोग्य आणि सुरक्षितता’ या विषयात, पण या विषयांपुरती सीमित नव्हे. नवयुगात होणाऱ्या बदलांमुळे मागणीची प्रारूपं कशी बदलू शकतील हे आपण वर पाहिलंच. अशा बदलत्या मागणीत समाजातल्या सर्व घटकांना सामाजिक न्याय मिळतो आहे ना, शोषण तर होत नाहीये ना, हे पाहण्याची जबाबदारी निस्संशयपणे सरकारचीच आहे.

या व्यापक सरकारी सेवा पुरवण्यासाठी सरकारांना खर्च करावा लागेल. वित्तीय तूट त्यामुळे वाढेल, आणि करांचे दरही वाढतील. नवे कर (उदा० डिजिटल व्यवहारांवर व्हॅटसारखा अप्रत्यक्ष कर, किंवा भारतात अद्याप नसलेला inheritance tax) उदयाला येतील.

याला समाजवाद म्हणायचा असेल तर म्हणोत.

■■

नवयुगातल्या अर्थव्यवस्थेत काही संरचनात्मक (structural) बदल होण्याची शक्यता आहे. पुरवठा किंवा तंत्रज्ञान या गोष्टींत काही पायाभूत बदल झाले की असे संरचनात्मक बदल होतात. उदा० औद्योगिक क्रांतीमुळे वस्त्रनिर्मिती क्षेत्रात संरचनात्मक बदल झाले, आणि ‘उच्च दर्जाचे टिकाऊ कपडे’ ही समाजातल्या पैसेवाल्या घटकांची मक्तेदारी राहिली नाही. एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात हातपाय पसरलेल्या रेल्वेने जिल्हे-तालुक्याच्या गावी नाटकं नेणं सुलभ केलं, आणि नाटकधंद्याला चालना दिली, वगैरे.

नवयुगात असे संरचनात्मक बदल होऊ घातले आहेत.

a

महामारीपूर्व अर्थव्यवस्थेत ‘घरून काम करणारे’ लोक एक तर अल्पसंख्येत होते, आणि घरून काम करणं हे ऐच्छिक होतं. काम करण्यासाठी घराबाहेर पडणे हा नियम होता.

महामारीनंतरच्या, म्हणजे नवयुगातल्या अर्थव्यवस्थेत अधिकाधिक लोक घरून काम करायला लागतील. पण अर्थव्यवस्थेतले किती लोक घरून काम करू शकतात याला मर्यादा आहे. उदा० शेतकरी घरात बसून शेती करू शकत नाही, नर्स घरबसल्या रुग्णांची शुश्रूषा करू शकत नाही. धरण बांधणारा अभियंता बेडरूममधून धारण बांधू शकणार नाही. त्यामुळे घराबाहेर जाऊन काम करणाऱ्या लोकांचा टक्का कमी झाला तरी मोठा राहील. पण संरचनात्मक बदल येईल तो ‘घरात बसून काम करणाऱ्या लोकांना विविध सेवा पुरवणं’ या भागात. तशी एक पूरक अर्थव्यवस्था तयार होईल. त्या पूरक अर्थव्यवस्थेतले काही लोक घरून काम करू शकतील, आणि काही शकणार नाहीत.

नवयुगात “कशाला स्कोप आहे” हा प्रश्न या तीन मितींच्या चष्म्यातून बघायला हवा. तुमचा सध्याचा, किंवा भावी व्यवसाय या तीनपैकी कोणत्या मितीत बसतो? (एकापेक्षा अधिक मितीतही बसू शकतो.) “स्कोप” - असं काही असलंच तर - यावर ठरेल.

■■

तैलचित्राच्या पृष्ठभागावरून चालणारी मुंगी संपूर्ण चित्र बघू शकत नसेल, कदाचित, पण रंगाचा थर कुठे पातळ आहे, कुठे जाड आहे, आणि कुठे आजिबात नाही हे नक्की सांगू शकेल!

■ समाप्त ■
धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

आबा , उत्तम लेख.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तम मांडणी आबा. सगळी निरीक्षणं चोख.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

This too shall pass!

मांडणी आवडली. लेख भविष्यात डोकावून पहायला चालना देणारा आहे.

बाजारहाटाच्या बदलत्या सवयी बद्धल मला थोडे वेगळे वाटते. डि-मार्ट हे वॉलमार्ट सारखं भारतात हात पसरवू पहात आहे. त्यांनी मागच्यावर्षी डि-मार्ट रेडी नावाचे अ‍ॅप पण लाँच केले, गेल्या तिमाहीत (लॉकडाउन च्या १-२ महिन्यांनंतर- जून जुलै) त्यांचा अ‍ॅपवरूनचा सेल पण वाढला आहे. असे असले तरी डिमार्ट व्यवस्थापन मोठ्या आकारचे डिपार्टमेंटल स्टोअर्स दरवषी ६० नवीन या गतीने वाढवणारच आहे (खासकरून टिअर टू सिटीज मध्ये). त्या स्ट्रॅटेजीत त्यांनी अजूनही बदल केला नसल्याचे व्यवस्थापनाने गेल्या तिमाहीच्या कॉल मध्ये सांगितले. त्याचे एक कारण असे आहे की मध्यम वर्गाला मोठे मोठे शॉपिंग कार्ट वापरून शॉपिंग करण्यात एक "फिल" येतो. हा फिल देणे हा एक व्यावसाय वृद्धीचा भाग आहे. लॉएस्ट कॉस्ट, मॅक्स सेव्हिंग, भारतातल्या मध्यम वर्गाला शॉपिंग फिल ही डि-मार्टची खासियत आहे. डि-मार्ट पेक्षा वेगळी स्ट्रॅटेजी रिलायन्स जिओ मार्टची आहे. त्यांनी किराना शॉपचे (कोपर्‍यावरचे वाण्याचे दुकान) जाळे पसरवून त्यात + जिओ मार्ट (ईंटरनेट/सेल्यूलर सोल्यूशन) + व्हॉट्सॅअ‍ॅप / फेसबूक यांची गुंतवणूक यामूळे एक तगडे आव्हान दिले आहे. आणि अगदी कालच डिपार्टमेंटल स्टोअर्सच्या कर्जामुळे डब्यात गेलेल्या बिग बाजारला (फ्युचर रिटेल) पण अंबानीने विकत घेतले आहे. अ‍ॅमेझॉन पँट्री, बिग बास्केट हे प्लेअर पण हात पाय पसरवत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात होणार्‍या बदलांकडे सगळ्यांचेच लक्ष आहे.

डि-मार्ट आता २४ तास चालू असते त्यामुळे ओळखीतले काही लोक तर भल्या पहाटे पाचला डिमार्ट मध्ये शॉपिंग केल्याचे आणि मूळीच गर्दी नसल्याचे सांगत होते.

प्रवास आणि पर्यटन - मी पर्यटनाचा फॅन नाही. पण कुणीतरी मला ध्रुव राठीच्या ट्रॅव्हल व्हिलॉगची एक लिंक पाठवली. मला खूप हेवा वाटला. इटली मध्ये, व्हॅटिकन सिटी मध्ये एकतर कमी पर्यटक आणि गव्हरमेंट/हॉटेल मालकांकडून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बर्‍याच स्किम तर काही ठिकाणी कॅश इन्सेन्टीव्हज. त्याला या दिवसात अशी मजा मारताना पाहून हेवा वाटला. पर्यटन आवडणाऱ्या लोकांना अजून काय हवे? त्यामुळे पर्यटन आवडणार्‍यांसाठी हा बेस्ट कालावधी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(मराठी नियतकालिकं आणि दिवाळी अंक ऑनलाईन मिळणार नाहीत. जग अजून इतकंही पुढे गेलं नाहीये. उगाच माजायचं नाही!)

लेख आवडला .... असता; पण माजायचं नाही, असं लेखातच सांगितल्यामुळे मोठा जटिल प्रश्न निर्माण झाला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेखात उल्लेख केलेले परिणाम he तात्पुरते आहेत.
मीडिया दाखवते ते जग आणि प्रत्यक्षात असलेले रोजचे जीवन खूप वेगळे आहे.
आता covid ची भीती जवळ जवळ नष्ट झाली आहे.
सर्व markets, mandaya लोकांनी भरून गेल्या आहेत.
एवढं खोलवर परिणाम समाजावर,होणार नाही.
परत लवकरच पहिल्या सारखे चालू होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

किराणा दुकाने सहजासहजी ऑन्लाईन जगरनॉटने डिस्मिस होणारी वाटत नाहीत. लॉकडाऊन काळ हा ग्रोफर्स किंवा बिग बास्केट यांच्यासाठी सुवर्णसंधी होता आपली सेवा लोकांपर्यंत पोचवायचा. पण त्या सायटी आणि त्यांची व्यवस्था फार लवकर झोपल्या. पण किराणा दुकानवाल्यांची साखळी काहीही डिसरपशनविना चालु होती. काही दिवस मॅगीचे शॉर्टेज( जे कंपनीमुळे होते) आणि दुकानातील रांग हे वगळता आधी प्रमाणेच दुकाने चालू होती. ऑनलाईन दुधवाल्याची सर्विस वापरतो मी ती देखील एक आठवडा झोपली. पण इमारतीतले बाकीचे दुधवाले चालु होते. किराणा, दुध, फळे, भाज्या, औषधे हे ऑफलाईन आधीसारखेच चालू राहील असा अंदाज. पुस्तके, खेळणी, इलेक्ट्रोणिक्स या वस्तुसाठी करोनापूर्वच ऑनलाईन वरचढ ठरत होते. जे तसेच राहील.

बाकी किराणामालवाले नवे तंत्रद्न्यान सहज वापरतात. नियमित गिऱ्हाईके दुकानदाराला फोन वर किंवा व्हाटसॅपवर यादी देतात जी घरपोच येते. गुगल पे/भीमने पैशाची देवाण होते. एक दुकानदार व्हाटसपच्या ब्रॉडकास्ट लिस्टवरुन लोकांना दुकानात नवीन काही खास आले तर कळवतो. हायटेक वेब्साईट नाही , जाहिराती नाहीत की व्हीसी लोकांचा पैसा नाही. तरीही ऑनलाईन.

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनेक स्थानिक किराणावाल्यांनी लोकांना नेहेमी लागणाऱ्या वस्तू सगळ्या कष्टंबरांना विचारून विचारून दुकानात आणून ठेवल्या. उदा. विशिष्ट ब्रँडच्या वस्तू, विशिष्ट समाजात वापरल्या जाणाऱ्या वस्तू वैग्रे वैग्रे. व्हॉइस ऑफ कस्टमर ऑनलाईन कंपन्यांपेक्षा या सिंध्या-गुजराथ्या-मारवाड्यांनी अधिक अचूक पकडला असे निरीक्षण आहे. एकच उदाहरण द्यायचे झाले तर आमच्या एरियात अनेक ज्येष्ठ अथवा होऊ घातलेले ज्येष्ठ नागरिक स्थानिक वाण्याकडे सामान घेऊ लागले आहेत. यादी आणि घरपोच डिलिव्हरी सिस्टीम पुन: सुरु झालेली आहे.

आणि जरी ब्र्यांड तोच नसला तरी 'वेळेला केळं' या नात्याने पब्लिकनेही त्या वस्तू वापरल्या. उदा. म्हैसूर सँडल साबण कंपनी भांडी घासायचा लिक्विड सोप बनवते हे मला लॉकडाऊन झाला नसता तर समजले नसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्हॉइस ऑफ कस्टमर ऑनलाईन कंपन्यांपेक्षा या सिंध्या-गुजराथ्या-मारवाड्यांनी अधिक अचूक पकडला असे निरीक्षण आहे.

अगदी सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ऑनलाईन वाले म्हणुन कोपऱ्यावरचे किराणा दुकानवाले नष्ट होणार नाहीत. जे लोक काळानुसार बदलतील ते नक्कीच तगतील.

घरांत पुढच्या काही मिनीटांत काही वस्तु हवी असली तर कोपऱ्यावरचे किराणा दुकान हाच उत्तम पर्याय आहे. आणी जे दुकानदार WhatsApp वर ऑर्डर स्वीकारुन घरपोच माल देत असतील तर हा अजुनच चांगला पर्याय आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आठवड्ा मधून एकदा फॅमिली सहित हॉटेल मध्ये जेवायला जाणे हे बदलणार नाही.
हॉटेल चे जेवण घरी मागवून खाण्यात ती मज्जा नाही.
शेतकऱ्या ची शेती करण्याची पद्धत आणि शेती मालाचे वितरण हे नाही बदलणार.
म्हणजे तेच होलसेल मार्केट,लोकल भाजी वाले आहे तसेच राहणार.
Work from Home je atta चालु आहे ते असेच पुढे राहील असे वाटत नाही .
मजबुरी म्हणून घरात बसून काम करत आहेत पण ऑफिस मध्ये काम करण्या मुळे जो उत्साह येतो तो घरात बसून येणार नाही.
मानसिक स्थिती लोकांची बिघडेल आणि त्याचा परिणाम कामावर होईल.
बार,पब्स,क्लब हे जसे च्या तसे च पुढे असेल.
सार्वजनिक प्रवास बदलणार नाही.
तीच ट्रेन तीच गर्दी ह्या पासून सुटका नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आरोग्य सेवेमधला सगळ्यात मोठा बदल म्हणजे हेल्थ इन्शुरंस घेण्याची सवय लागणे हा होईल. आत्ता बिलाचे आकडे ऐकुन डोळे पांढरे होतात. असली स्थिती येऊ नये म्हणून पूर्वी विमा नसलेले लोक आरोग्य विमा काढायला सुरुवात करतील. पुढील काही वर्षे तरी. ( काही वर्षांनी आपल्याला विमा लागत नाही म्हणून रिन्यु करणे बंद देखील करतील मेबी.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हेल्थ insurance चे प्रमाण वाढेल आणि ते वाढावे हे फायद्याचे आहे.
गृह कर्ज ची पद्धत सुरू झाली आणि प्रॉपर्टी चे भाव फुगले.
हेल्थ इन्शुरन्स मुळे आरोग्य सेवेचे दर अनैसर्गिक वाढतील.
आणि ते दर परवड त नाहीत म्हणून हेल्थ insurance असे ते चक्र असेल. .
असा परिणाम मात्र होईल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फारच छान आणि रोचक लेख!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

माझे थोडे वेगळे निरिक्षण आहे. मी लॉकडाउनच्या सुरुवातीला कोपर्‍यावरच्या वाण्याकडूनच सामान भरले. कारण डि-मार्ट, अ‍ॅमेझॉनची डिलेव्हरी होत नव्हती / टाईम स्लॉट फुल असायचा. आणि ते दिवस पण असे होते की, आपला नेहमीचा ब्रँड मिळत नसेल (समजा खाद्यतेलाचा), तर फारसा परिचित नसलेल्या ब्रँडवर भागवले. पण ते एक-दीड महिनाच. नंतर डि-मार्ट सुरळीत झाले. कोपर्‍यावरच्या किराणा वाण्याचे ते सुगीचे दिवस होते खरे. पण ते आता बॅक टू प्रि-कोव्हीड आले आहेत. आताशा रांगा नसतात. गर्दी नसते. माझ्या मते, याला जबाबदार अर्थात जवळच असलेले डि-मार्ट आहे. दहा वर्षापूवी कोपर्‍यावरच्या दुकानात २-३ नोकर होते. दुकानात सामान भरलेले असायचे. आता इन्व्हेंट्री कमी झालेली दिसते. दुकानात एकच नोकर असतो. तात्काळ/अचानक लागणार्‍या सामानासाठीच आता त्याचा उपयोग होतो आणि अर्थात कष्टकर्‍यांना (त्यामुळे अशी दुकाने राहतीलच, पण त्यांची उलाढाल कमी होईल). बरेच डेली वेजर्स वाले मी पाहिलेत (उदा जवळच्या इमारत बांधकामावरचे मजूर). त्या बिचार्‍यांची खरेदी आज कमवा आज खा या हिशेबाने. म्हणजे अक्षरशः २ कांदे २ बटाटे अशी खरेदी मी पाहिली आहे. (आणि यांचीच सगळ्यात दूरावस्ता झाली लॉकडाउन मध्ये). त्यातल्या त्यात एरियातल्या मध्यवर्ती भागात, एक दुकान अजूनही जोरात चालू आहे.नोकर संख्या घटलेली नाही. खूप जुनी गिर्‍हायिकं असावित. आणि त्यांना तो दुकानदार सॉर्ट ऑफ क्रेडीट देतो पण एमआरपीवर एका रुपयाचे पण डिस्काउंट देत नाही. महिनाभर सामान भरायचे. ते प्रत्येकाच्या वहीत लिहिले जाते. घरी डिलेव्हरी मिळते. पैसे महिना अखेरीस द्यायचे (पुढल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात). पण हा वर्ग जुन्या पिढितला क्रेडीट कार्ड न वापरणारा आहे असे मला वाटते. कारण तेच सामान डि-मार्ट मध्ये घेतल्यावर १०%-१५% कमीत कमी डिस्काउंट मिळते आणि क्रेडीट कार्डवर कधी कधी ऑफर्स पण असतात. अर्थात जिथे डि-मार्ट नाही तिथे लोकल किराणा वाणीच डॉमिनेट करत असावा. बर्‍याच वेळा ही दुकाने एक रिअल इस्टेट म्हणूनही घेतलेली असतात (आगे दुकान पिछे मकान). पण नव्या पिढिला परंपरागत आलेल्या वाण्याच्या दुकानात रस असतोच असे नाही. त्यामुळे अशी दुकाने बंद झालेली पाहिलीत. भाड्याने फार क्वचित कुणी वाण्याचे दुकान चालवत असावा (खास करून शहरात जिथे रेंट जास्त असतात). कारण त्यात तेवढी अ‍ॅट्रॅक्टीव्ह मार्जिन नसेल कदाचित. (बिग बाजर पडण्यात ते एक कारण आहे).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हातावर पोट असलेले लोक इंग्लिशमध्ये 'डेली वेज'वाले असतात. वेजर निराळं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भारतात सर्रास डेली वेज वर्कस असं लांबसडक न म्हणता डेली वेजर्स म्हणतात. (अर्थात ते चुकीचे असल्यास त्याचे समर्थन नाही.) अगदी वर्तमान पत्रात पण. उदा. ही कालची इटीची बातमी वाचली. २०१९मध्ये ४२,४८० रोजंदारी मजूर/शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची. (अवांतर: विश्वगुरुला अशा बातम्या शोभत नाहीत म्हणून त्यांना प्राईम टाईम स्लॉट मिळत नाही. त्यापेक्षा मिडिया ट्रायल शक्य होईल, टिआरपी वाढेल अशा पेज-थ्री सेलिब्रेटीची "रचित कथा" दाखवल्या की जास्त प्रेक्षक लाभतात, अ‍ॅड रेव्ह्यून्यू येतो, धंदा दुप्पट चालतो.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रोचक लेख, मार्मिक निरीक्षणे.
परवाच आम्ही एका साखरपुड्याला ऑनलाइन हजेरी लावली. १५-२० माणसे प्रत्यक्षात असावीत. पन्नासेक माणसे ऑनलाइन.
*
पाळणाघर या व्यवसायावर काही काळ तरी विपरित परिणाम होतील असे वाटते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख. आढावा आणि निरीक्षणं नेमकी आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हेल्थ इन्श्युरन्स सेक्टरमध्ये तसेपण प्रि-कोव्हिड प्रिमियम कलेक्शन २५%-२६% YoY वेगाने वाढत होते. त्याचा मंथली डेटा (ग्रॉस डायरेक्ट प्रिमियम इन्कम - GDPI) आयआरडीएआय च्या वेबसाईट वर येतो. टॉप प्रायव्हेट सेक्टर जनरल इन्शुरन्स वाल्याच्या हेल्थ इन्शुरन्सच्या ग्रॉस प्रिमियम ग्रोथ मध्ये कोव्हिडमूळे बिलकूल घट झालेली नाही (ओव्हर ऑल इकॉनॉमी स्लो झाली असली तरी) पण अधिक वेगाने प्रिमियम इन्कम वाढत आहे असेपण अजून स्पष्टपणे म्हणता येत नाही. दोन आठवड्यापूर्वी आयसीआयसीआय लोंबार्ड आणि भारतीअ‍ॅक्साच्या मर्जरला इन्व्हेस्टर्सनी फारसा हिरवा झेंडा दिला नाही. त्याचे एक कारण असे आहे की कोव्हीडमुळे क्लेम्स कदाचित सरासरीपेक्षा अधिक वाढतील आणि नफा कमी होईल अशी अटकळ बाजार बांधत असावा. क्लेम्स प्रेडिक्ट करायला इथे तुमचे डेटा सायन्स उपयोगी पडेल कदाचित. त्यामानाने लाईफ इन्शुरन्स थोडे थंडावल्यासारखे वाटते. प्रायव्हेट सेक्टर वाल्यांची व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेसची (VNB) ग्रोथ गेल्या तिमाहीत सरासरीपेक्षा कमी होती. एखाद दोन ऑड क्वार्टर मुळे ट्रेंड ठरवण्याची घाई करण्यात अर्थ नाही तसा. नेमका ट्रेंड पाहण्यासाठी थोडी वाट पहावी लागेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0