प्रकरण ५: अमेरिकेची व्हिसा (परवाना पद्धत) सिस्टिम: बंधने आणि भारतीयांसमोरील पेच.

तसं बघायला गेलं तर कायदेशीर मार्गाने अमेरिकेत येण्यासाठी १८५ प्रकारचे विविध व्हिसा आहेत. परंतू त्यातील भारतीयांसाठी फारच कमी उपलब्ध आहेत. अमेरिकेचे जगाबरोबर व्यापार संबंध जसजसे विस्तारत गेले तसे विविध प्रकारचे व्हिसा अस्तित्वात आले, उदा. इ-३ व्हिसा; हा व्हिसा फक्त ऑस्ट्रेलियन नागरिकांसाठी आहे.

अमेरिकेची व्हिसा पद्धत प्रायोजकत्वाधारित (Sponsorship based) आहे. अमेरिकेतील व्यक्ती/संस्था/कंपनी/.. कुणीतरी तुम्हाला प्रायोजित करणे गरजेचे आहे. आधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे, तुम्ही कौटुंबिक; तुमच्या कुटुंबातील अमेरिकन नागरिक असलेला सदस्य, किंवा रोजगाराच्या माध्यमातून; अमेरिका स्थित कंपनीने, तुम्हाला नौकरीच्या निमित्ताने किंवा शिक्षणाच्या माध्यमातून, अमेरिकेतील विद्यापीठाने तुम्हाला प्रवेशासाठी.. वगैरे मार्गातून व्हिसासाठी अर्ज करता येतो. ह्या व्यतिरिक्त अजून मार्ग आहेत, जसे आश्रित (refugee) म्हणून किंवा आंतरराष्ट्रीय मुसद्दी (diplomat) किंवा आंतरराष्ट्रीय संस्थेत, जसे युनो, वर्ल्ड बँक किंवा तत्सम संस्थांमध्ये नौकरीच्या निमित्ताने वगैरे.

अमेरिकेत कायदेशीररित्या वास्तव्यासाठी लागणारी परवाना (व्हिसा) पद्धत दोन (२) श्रेणींमध्ये विभागली आहे. तात्पुरत्या वास्तव्याचा परवाना (temporary non-immigrant visa) आणि कायम (आजीवन) स्वरूपी वास्तव्याचा परवाना (immigrant visa; permanent residency); ह्यालाच ग्रीन कार्ड असेही नाव आहे. दोन्ही परवान्यांमध्ये तुमचे नागरिकत्व भारतीयच रहाते हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. भारतीय नागरिक म्हणून तुम्ही अमेरिकेत तात्पुरत्या किंवा कायम स्वरूपी व्हिसावर वास्तव्य करू शकता. परंतू दोन परवाना पद्धतीमध्ये व्यक्तीला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांमध्ये जमीन - अस्मानाचा फरक आहे.

सर्व प्रथम आपण तात्पुरत्या स्वरूपाच्या व्हिसाचा विचार करू. पर्यटन, व्यापार, नौकरी, अमेरिकेतील कुटुंबाला भेटण्यासाठी, किंवा उच्च - शिक्षणासाठी वगैरे विविध कारणांसाठी तात्पुरत्या वास्तव्यासाठी अमेरिकेत लोक येत असतात.

पर्यटन, व्यापार किंवा अमेरिकेतील कुटुंबाला भेटण्यासाठी येणारे लोक बी-१ किंवा बी -२ व्हिसाच्या श्रेणीमध्ये येतात. ह्या परवान्याचा कालावधी १-३ महिने इतका अल्प असू शकतो. ह्या परवान्यावर तुम्ही अमेरिकेत उत्पन्नाधारित नौकरी/व्यवसाय करू शकत नाही.

शिक्षणासाठी एफ किंवा एम श्रेणीमध्ये येतात, तर नौकरीसाठी येणारे एच-१ किंवा एल-१ श्रेणीच्या व्हिसाअंतर्गत वास्तव्य करतात. उच्च - शिक्षण, नौकरीसाठी अमेरिकेतील वास्तव्याच्या परवान्याचा कालावधी २ वर्षांपासून ५-६ वर्षांइतका मोठा असू शकतो.

जर तुमच्या प्रायोजकाने; कंपनीने (sponsor), प्रायोजकत्व (sponsorship) काढून घेतले तर त्या क्षणी तुम्ही बे-कायदेशीर ठरता आणि तुमच्या परतीच्या प्रवासाची सोय कंपनीने (sponsor) करणे अपेक्षित आहे. विद्यापीठाने जर तुमचे प्रायोजकत्व काढून घेतले तरी तीच परिस्थिती.

तुमच्या काम करण्याच्या, शिक्षणाच्या जागेची माहिती, सरकार दरबारी नोंदवणे कायद्याने बंधनकारक आहे. तुम्ही अगदी राहायची जागा (घर) जरी बदलली तरी त्याची सरकार दरबारी नोंद करणे अपेक्षित आहे.

अमेरिकेबाहेर जाऊन (भारत-वारी नंतर) काही विशिष्ठ परिस्थितीमध्ये तुमच्या देशातील (भारतातील) अमेरिकेच्या दूतावासातील परवान्यावरच्या मिळणाऱ्या मान्यतेवर, अमेरिकेतील (पुनः) प्रवेश अवलंबून आहे.

तात्पुरत्या स्वरूपाचा परवान्याला कालमर्यादा आहे, त्यामुळे अमेरिकेतील वास्तव्यासाठी परवान्याचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे आणि नवीन कालावधी किती द्यायचा हे सर्वस्वी सरकारी अधिकाऱ्यावर अवलंबून आहे.

जेंव्हा तुम्ही तात्पुरत्या परवान्यासाठी नवीन अर्ज करता तेंव्हा अर्जावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याला असे वाटले की तुम्ही तात्पुरत्या परवान्याच्या माध्यमातून अमेरिकेत स्थलांतरण करण्याचा तुमचा उद्देश (हेतू) आहे तर तुमचा अर्ज खारीज होऊ शकतो.

थोडक्यात काय, तर तुमचे अमेरिकेतील वास्तव्य तुमच्या प्रायोजकाच्या (कंपनी) आणि सरकारच्या मुठीत बंद आहे. तुमच्या वास्तव्यासाठीची पात्रता पदोपदी सरकार दरबारी सिद्ध करणे गरजेचे आहे. वाईट काळात एका क्षणात पायाखालचे जाजम खेचून घ्यावे तसे तुमचे वास्तव्य कधीही संपुष्टात येऊ शकते.

कायम (आजीवन) स्वरूपी वास्तव्याचा परवाना (permanent residency; green card);

ह्या परवान्यावर, कुठल्याही प्रायोजकाशिवाय (without sponsor) तुम्ही आजीवन अमेरिकेत वास्तव्य करू शकता, दर १० वर्षांनी तुम्हाला ह्या व्हिसाचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे, जे तुम्हीच स्वतः करू शकता. मतदानाचा हक्क सोडला तर अमेरिकन नागरिकाप्रमाणेच तुम्ही अमेरिकेत कुठेही मुक्तपणे राहू शकता.

ड्युअल इन्टेन्ट व्हिसा: जे सध्या अमेरिकेत नौकरी करत आहेत त्यांच्यासाठी ग्रीन कार्डसाठी अर्ज करायची वेगळी पद्धत आहे का? तर नाही, त्यांनाही रोजगाराच्या प्रायोजकत्वाच्या (sponsorship) माध्यमातून त्यांची नियोक्ता (sponsor) (कंपनी), ग्रीन कार्डासाठी अर्ज करू शकते. त्यासाठी कायद्यामधे काही तात्पुरत्या स्वरूपाच्या व्हिसांना ड्युअल इन्टेन्ट व्हिसाचे स्वरूप देण्यात आले आहे. एच - १ व्हिसा, के व्हिसा (अमेरिकन नागरिकांच्या विदेशी जोडीदार - नवरा किंवा बायको), एल व्हिसा (कंपनी - ट्रान्सफर) वगैरे व्हिसांचा ड्युअल इन्टेन्ट व्हिसामध्ये समावेश आहे.

रोजगाराच्या माध्यमातून; समजा अमेरिकेत तुम्ही उच्च - शिक्षणासाठी आलात, मग कंपनीने नौकरीसाठी (एच - १ बी) व्हिसा प्रायोजित केला, किंवा तुम्ही थेट नौकरीसाठी (एच - १ किंवा एल - १) आलात.
मागील अंकात लिहिल्याप्रमाणे एच १ - बीची कालमर्यादा; कमाल कालावधी ६ वर्षे (२००० चा अमेरिकन कॉम्पेटिटिव्ह ऍक्ट AC21) संपायच्या आत जर तुमच्या कंपनीने ग्रीन कार्डसाठी अर्ज केला असेल तर तुम्ही तुमचे अमेरिकेतील वास्तव्य अखंडित ठेवून राहू शकता नाही तर मात्र तुम्हाला तुमच्या देशात परत जावे लागते.

कौटुंबिक प्रायोजकत्वाच्या माध्यमातून;
तुम्ही जर के - व्हिसावर अमेरिकेत राहात असाल, तरी कौटुंबिक प्रायोजकत्वाच्या माध्यमातून तुमच्या अमेरिकेतील वास्तव्यात ग्रीन कार्डसाठी अर्ज दाखल करू शकता.

तुमचा ग्रीन कार्डाचा अर्ज ड्युअल इन्टेन्टच्या माध्यमातून जरी दाखल झाला असला तरी अर्जावर जोपर्यंत निर्णय येत नाही (ग्रीन कार्ड मिळत नाही.) तोपर्यंत तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपाच्या व्हिसाच्या सर्व बंधनातच रहावे लागते. तसेच तुम्हाला तुमच्या देशाचे (भारताचे), अमेरिकेचे सर्व नियम पालन करावे लागते. उदा, अमेरिकेतील तात्पुरत्या स्वरूपाच्या व्हिसाच्या नूतनीकरणाबरोबर तुमच्या देशाचे पारपत्राचे (passport) देखील नूतनीकरण करत रहाणे गरजेचे आहे.

विविध प्रकारच्या माध्यमातून ग्रीन कार्डसाठी अर्ज करण्यात आणि ड्युअल इन्टेन्ट व्हिसाच्या माध्यमातून करण्यात तुलनात्मक दृष्ट्या काय फरक आहे?

आधीच म्हटल्याप्रमाणे, कौटुंबिक, रोजगार किंवा अन्य माध्यमातून ग्रीन कार्डासाठी अर्ज करता येतो. कौटुंबिक श्रेणीमधून (Family Based) जर तुम्ही ग्रीन कार्डसाठी अर्ज केला असेल तर ग्रीन कार्ड मिळेपर्यंत तुम्हाला तुमच्या देशातच (भारतातच) राहावे लागते, तुमचे ग्रीन कार्ड मंजूर झाल्यावर, तुम्ही त्या परवान्यावर अमेरिकेत प्रवेश करु शकता. रोजगाराच्या माध्यमातून (Employment based) देखील तुम्ही ह्याच प्रक्रियेने ग्रीन कार्ड प्राप्त करू शकता. तुमचा ग्रीन कार्डचा अर्ज सरकार दरबारी प्रलंबित असताना जर तुम्ही तात्पुरत्या स्वरूपाच्या परवान्यासाठी अर्ज केलात तर कधी कधी त्यात गुंतागुंत वाढण्याची शक्यता असते.

अन्य प्रकारातील ग्रीन कार्डचा अर्जदार, ग्रीन कार्ड मिळेपर्यंत त्याच्या मूळ देशातच (भारतातच) वास्तव्य करतो परंतू ड्युअल इन्टेन्ट व्हिसाच्या माध्यमातून ग्रीन कार्डसाठी अर्ज केलेले नागरिक, आधीपासूनच अमेरिकेत वास्तव्य करत आहेत. विविध प्रकारचे कर भरत असून त्याचबरोबर सामाजिक, सांस्कृतिक जीवनात समरसून योगदान देत आहेत. इतकेच नव्हे तर व्यक्तिगत आयुष्य; जसे लग्न, मुले (कुटुंब) अशी आयुष्याची चढत्या क्रमाने होणारी, आकार (स्थैर्य), रुजवातही झालेली आहे.

तुम्ही उच्च - शिक्षणासाठी या, पी. एच. डी. करा, पुढे पोस्ट डॉक्टरेट करा, किंवा थेट नौकरीसाठी अमेरिकेत या, ग्रीन कार्ड मिळेपर्यंत तुमचे येथील वास्तव्य विद्यापीठाच्या, कंपनीच्या (प्रायोजकाच्या) आणि अप्रत्यक्षपणे सरकारच्या निर्बंधातच म्हणजे अस्थिरच राहणार आहे.

** जे वाचक अमेरिकेत राहिले आहेत किंवा तुमचा जर अमेरिकन कर-व्यवस्थेशी संबंध आला असेल, तर तुम्हाला अमेरिकेन नागरिक आणि सरकार, कर पद्धतीबद्दल किती जागरूक आणि गंभीर आहेत त्याची जाणीव असेलच.

भारतीयांसमोरील पेच:

आत्तापर्यंत वाचकांच्या हे लक्षात आले असेलच की एखाद्या सामान्य नागरिकांप्रमाणे किंवा तुम्ही महत्वाकांक्षी असाल तर ते "अमेरिकन ड्रीम"चे लक्ष गाठण्यासाठी ग्रीन कार्ड मिळणे किती महत्वाचे आणि गरजेचे आहे.

तुमचा ग्रीन कार्ड मिळण्याचा कालावधी जितका लांबत जाईल, तितके अधिक काळ तुम्हाला बंधनात राहावे लागणे साहजिकच आहे. जगातील इतर देशांच्या बाबतीत; म्हणजे अगदी इंग्लंड, जर्मनी, पाकिस्तान, भूतान, सँडविच आयलंड पासून कुठलाही देशातील नागरिकांना ड्युअल इन्टेन्टच्या माध्यमातून रोजगाराच्या (ड्युअल इन्टेन्ट) माध्यमातून ग्रीन कार्ड मिळण्याचा कालावधी काही महिने, फार फार तर १-२ वर्ष असला तरी फक्त आणि फक्त भारतीयांच्या बाबतीत हा कालावधी सध्या १५० वर्षे आहे. म्हणजे एका अर्थाने भारतीयांना ग्रीन कार्ड नाकारण्यातच आलेले आहे. ह्यात अडकलेल्या भारतीयांची संख्या १० लाखाच्या आसपास आहे. तुम्ही नुकताच ग्रीन कार्डासाठी अर्ज केला असेल किंवा अर्ज करून १० वर्ष झाली असतील, तरीही तुम्हाला सर्व व्हिसा बंधनातच जीवन जगावे लागते. १० लाख भारतीयांचे अमेरिकेतील जीवन हे कायमच्या बंधनात आणि कुणाच्यावर तरी अवलंबून राहणार आहे. ह्याचा थेट परिणाम त्यांच्या जीवनाच्या गुणवत्तेवर (quality of life) झालेला दिसून येतो. त्यावर सखोल चर्चा करायच्या आधी ग्रीन कार्ड प्रदान करायची सिस्टिम कशी काम करते त्याकडे एक नजर टाकूया. त्या सिस्टिम मधील त्रुटी आणि ही परिस्थिती निर्माण होण्याचे मूळ कारणही समजून घेऊया, पुढील लेखात.

https://en.wikipedia.org/wiki/Dual_intent
https://en.wikipedia.org/wiki/Visa_policy_of_the_United_States
https://www.uscis.gov/green-card/green-card-eligibility-categories
https://travel.state.gov/content/travel/en/us-visas/visa-information-res...

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नेहमीप्रमाणे लेख आवडला.

मी अमेरिकेसाठी व्हिसाला अर्ज केला होता त्यातील एक प्रश्न मला भलताच आवडला होता आणि त्या प्रश्नाचे उत्तर कोण होय असे देणार हा प्रश्न पडला होता. तर तो प्रश्न होता-- 'Do you intend to enter the United States in order to carry out terrorist or subversive activities' Smile

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही काय उत्तर दिलं होतं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

त्याच प्रश्नमालिकेत, Are you a prostitute? असादेखील एक प्रश्न होता, असे आठवते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पर्यटन, व्यापार किंवा अमेरिकेतील कुटुंबाला भेटण्यासाठी येणारे लोक बी-१ किंवा बी -२ व्हिसाच्या श्रेणीमध्ये येतात. ह्या परवान्याचा कालावधी १-३ महिने इतका अल्प असू शकतो. ह्या परवान्यावर तुम्ही अमेरिकेत उत्पन्नाधारित नौकरी/व्यवसाय करू शकत नाही.

बी-१ = बिझनेस व्हिसा.
बी-२ = टूरिष्ट व्हिसा.

(हल्ली अनेकदा बी-१/बी-२ असा संयुक्त श्रेणीचा व्हिसा इश्यू करतात.)

राहता राहिला प्रश्न व्हिसाच्या कालावधीचा. बी-१/बी-२चा कालावधी हा १-३ महिन्यांपासून ते जास्तीत जास्त ५ वर्षांपर्यंत असू शकतो. (काही विशिष्ट कॅटेगरीतील भारतीय नागरिकांकरिता, भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय करारानुसार, हा कालावधी १० वर्षांपर्यंतसुद्धा असू शकतो. उदा., ज्यांची मुले अमेरिकेत राहतात आणि त्यामुळे ज्यांना अमेरिकेत त्यांना वारंवार भेटावयास येण्याची गरज आणि/किंवा इच्छा आहे, असे वरिष्ठ नागरिक. अर्थात, किती मुदतीचा व्हिसा द्यायचा - किंवा द्यायचा की नाही - हे सर्वस्वी व्हिसा-अधिकाऱ्याच्या मर्जीवर.)

येथे एक लक्षात घेणे आवश्यक आहे, की हा व्हिसाचा कालावधी म्हणजे हा व्हिसा वापरून तुम्ही अमेरिकेत किती दिवस राहू शकता, याचा कालावधी नव्हे. हा कालावधी म्हणजे केवळ कोणत्या मुदतीत हा व्हिसा वापरून तुम्ही अमेरिकेत प्रवेश करू शकता, याचा कालावधी आहे. तेथे प्रवेश केल्यानंतर तुम्ही तेथे किती दिवसांपर्यंत राहू शकता, हे व्हिसा ठरवत नाही; ते, तुम्ही ज्या बंदरातून, विमानतळातून, किंवा भूसीमेवरून अमेरिकेतला तुमच्या सध्याच्या प्रवासातला पहिला प्रवेश करता, तेथला इमिग्रेशन अधिकारी ठरवतो, आणि त्यानुसार तुमच्या पासपोर्टावर (परत जाण्याच्या मुदतीच्या तारखेसह) ठप्पा मारतो. (किंबहुना, मुळात तुम्हाला अमेरिकेत प्रवेश द्यावा, की परतपावली हाकलून द्यावे, हेसुद्धा व्हिसा ठरवत नाही; तो इमिग्रेशन अधिकारीच ठरवतो.) बी-१/बी-२ कॅटेगरीकरिता हा राहण्याच्या परवान्याचा सर्वाधिक कालावधी हा सहा महिने आहे. अर्थात, सहा महिन्यांहून अधिक मुदतीचा परवाना मिळू शकत नाही; त्या इमिग्रेशन अधिकाऱ्याच्या मर्जीवर अवलंबून सहा महिन्यांपेक्षा कमी मर्यादेचा परवाना अर्थातच दिला जाऊ शकतो, परंतु, बहुतांश परिस्थितींत, ॲज़ अ रूटीन, सरसकटपणे सहा महिन्यांची मुदत देतात.

याचा अर्थ, तुम्हाला जरी दहा वर्षांचा व्हिसा मिळाला, तरी तुम्ही त्या व्हिसाच्या आधारावर अमेरिकेत दहा वर्षे राहू शकत नाही; फक्त, त्या दहा वर्षांच्या मुदतीत कधीतरी अमेरिकेत प्रवेश करू शकता. आणि, प्रवेश केल्यानंतर सहाच महिने राहू शकता. उलटपक्षी, तीन महिन्यांचा व्हिसा मिळाल्यास त्या तीन महिन्यांच्या मुदतीत प्रवेश करू शकता, आणि प्रवेश केल्यानंतर सामान्यत: सहा महिन्यांपर्यंत राहू शकता. (अगदी व्हिसाची मुदत संपण्याच्या शेवटच्या दिवशी जरी अमेरिकेत टपकलात, तरीसुद्धा सहा महिन्यांपर्यंत राहण्याचा परवाना मिळू शकतो.)

(अर्थात, ही सहा महिन्यांच्या रहिवासाच्या मुदतीची गोष्ट झाली ती बिझनेस/टूरिष्ट व्हिसा कॅटेगरीकरिता. एच, एल वगैरे कॅटेगरींतील व्हिसांकरिता व्हिसाच्या मुदतीचे तथा रहिवासाच्या मुदतीचे गणित वेगळे आहे; त्यात तूर्तास शिरत नाही.)

याउपर, सिंगल एंट्री, मल्टिपल एंट्री याही भानगडी आहेत. बी-१/बी-२ कॅटेगरीतील व्हिसा इश्यू केले जातात ते सिंगल एंट्री किंवा मल्टिपल एंट्री यांपैकी एका प्रकारात इश्यू केले जातात. सिंगल एंट्री याचा अर्थ, एकदा का तुम्ही त्या व्हिसावर अमेरिकेत प्रवेश केलात, की तो आपोआप रद्द होतो, आणि मग पुन्हा तुम्ही तोच व्हिसा अमेरिकेत पुन्हा प्रवेशाकरिता वापरू शकत नाही. मल्टिपल एंट्री म्हणजे तो व्हिसा अमेरिकेत येण्याकरिता तुम्ही एकदा वापरल्यानंतरसुद्धा, तो आपोआप रद्द न होता, जोवर त्याची मुदत संपलेली नाही, तोपर्यंत अमेरिकेत पुन्हा प्रवेश करण्यासाठी अनेकदा वापरू शकता. सहा महिन्यांहून कमी मुदतीचा व्हिसा हा (तसेच काही विशेष कारण असल्याखेरीज) सामान्यत: सिंगल एंट्री म्हणून दिला जातो, तर त्याहून अधिक मुदतीचा व्हिसा हा सामान्यत: मल्टिपल एंट्री म्हणून दिला जातो.

==========

याच द्विपक्षीय कराराचा दुसरा परिणाम म्हणजे, भारताचा टूरिष्ट व्हिसा हा इतरदेशीय नागरिकांना सामान्यत: सहा महिन्यांहून१अ अधिक काळाकरिता (किंवा बिझनेस व्हिसा बहुधा - चूभूद्याघ्या - एका वर्षाहून अधिक काळाकरिता) मिळत नाही; तो केवळ अमेरिकन नागरिकांना दहा वर्षांपर्यंत कालावधीकरिता (एका खेपेस जास्तीत जास्त सहा महिने राहण्याच्या अटीवर) मिळू लागला.

म्हणजे, समजा तुमची फ्लाइट मुंबई - पॅरिस - अटलांटा किंवा मुंबई - दोहा - अटलांटा अशी आहे, नि तुमचे अंतिम गंतव्यस्थान अटलांटा आहे. या परिस्थितीत, तुमचा सध्याच्या प्रवासातला अमेरिकेतला पहिला प्रवेश हा अटलांटात घडला; सबब, तुम्हाला अटलांटाला उतरल्यानंतर इमिग्रेशन अधिकाऱ्याला तोंड द्यावे लागेल. परंतु समजा तुमची फ्लाइट ही मुंबई - पॅरिस - न्यूयॉर्क - अटलांटा किंवा मुंबई - पॅरिस - डेट्रॉइट - अटलांटा अशी आहे, आणि तुमचे अंतिम गंतव्यस्थान अटलांटा आहे. याउपर, मध्ये न्यूयॉर्क किंवा डेट्रॉइट येथील थांब्यावर तुम्हाला विमानतळाबाहेर पडायचे नाही; केवळ कनेक्टिंग फ्लाइट पकडण्यापुरते उतरायचे आहे. किंवा, कनेक्टिंग फ्लाइटसुद्धा नव्हे; तेच विमान पुढे अटलांटाला जाणार आहे. या परिस्थितीत, तुमचा सध्याच्या प्रवासातला अमेरिकेतला पहिला प्रवेश न्यूयॉर्कमध्ये (किंवा डेट्रॉइटमध्ये) घडला; सबब, तुम्हाला न्यूयॉर्कला (किंवा डेट्रॉइटला) उतरून, प्रथम इमिग्रेशनबाबूचे दर्शन घेऊन, मग सामान उतरवून, कष्टमबाबूचे दर्शन घेऊन, त्यानंतर मग सामान अटलांटाच्या फ्लाइटमध्ये चढविण्याकरिता सुपूर्द करणे इतकी कसरत करून मगच पुन्हा अटलांटाच्या विमानात बसणे भाग आहे. मात्र, या परिस्थितीत, अटलांटाला उतरल्यावर पुन्हा हे सोपस्कार करावे लागणार नाहीत; सरळ आपले सामान उतरवून बाहेर पडता येईल.

पूर्वीच्या काळी या पासपोर्टावरील ठप्प्याव्यतिरिक्त, आय-९४ नावाचा एक फॉर्म भरावयास लागायचा, त्याच्यावरसुद्धा ठप्पा मारून त्याची काउंटरफॉइल परत दिली जात असे. ही काउंटरफॉइल म्हणजे दिलेल्या तारखेपर्यंत अमेरिकेत राहण्याचा तुमचा अधिकृत परवाना तथा अमेरिकेत आल्याचे तथा त्या कालावधीत अमेरिका सोडल्याचे अधिकृत रेकॉर्ड असे. अमेरिका सोडण्यापूर्वी विमानात चेकइन करताना (किंवा जहाजाने प्रवास करीत असल्यास चेकइनचे तेथे जे काही ईक्विव्हॅलंट असेल, ते करताना) विमानकंपनीस (किंवा जहाजकंपनीस) ती परत करावे लागे, नि तेथून ती इमिग्रेशन खात्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी संबंधित विमान/जहाजकंपनीची असे. (भूसीमा ओलांडल्यास, ती सीमेवरील कनेडियन किंवा (मेक्सिकोस जाताना) अमेरिकन इमिग्रेशनबाबूस परत करावी लागे.) ती हरवल्यास किंवा परत न केल्यास तुमच्या डिपार्चरची नोंद इमिग्रेशनखात्याच्या लेखी न होऊन, तुमच्या पुढच्या अमेरिकाप्रवेशाच्या वेळेस तुम्हांस अडविले जाण्याची शक्यता असे. (अशा वेळेस, उदाहरणार्थ, त्या मुदतीच्या काळातले इतर देशांतील प्रवेशाचे तुमच्या पासपोर्टावरचे ठप्पे किंवा तत्सम पुरावे दाखवून, तुम्ही वेळच्या वेळी अमेरिका सोडली होती, हे सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची असे.) आता या कागदी आय-९४ची प्रथा बहुतांशी बंद झाली आहे. त्याऐवजी, तुमच्या विमान किंवा जहाज कंपनीने पुरविलेल्या प्रवासी यादीच्या मॅनिफेस्टच्या आधारावरून तुमच्या प्रवेशाची तथा परतीची नोंद तुमच्या अपरोक्ष परस्पर होते. त्याबद्दल तुम्हाला कोणताही कागदी पुरावा मिळत नाही वा बाळगावा लागत नाही वा परत करावा लागत नाही. (गरज पडल्यास कागदी पुरावा नाव, राष्ट्रीयत्व, तथा पासपोर्ट क्रमांक पुरवून इमिग्रेशनखात्याच्या वेबसाइटवरून उतरवून घेता येतो.) भूसीमेवर मात्र अद्यापही कागदी आय-९४चीच प्रथा आहे.

अमेरिकेचा व्हिसा म्हणजे अमेरिकेचा प्रवेशपरवाना नव्हे. प्रत्यक्ष प्रवेशपरवाना हा अमेरिकेतील विमानतळावरचा/बंदरावरचा/भूसीमेवरचा४अ इमिग्रेशन अधिकारीच देऊ शकतो. (तसेच नाकारूही शकतो.) ती सर्वस्वी इमिग्रेशन खात्याच्या अखत्यारीतील तथा अधिकारातील बाब आहे. अमेरिकन वकिलाती किंवा कॉन्सुलेट्स किंवा ती ज्या डिपार्टमेंट ऑफ स्टेटखाली (अमेरिकन परराष्ट्रखाते) येतात, त्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही, तथा ही त्यांच्या अखत्यारीतील बाबसुद्धा नव्हे. अमेरिकन वकिलाती किंवा कॉन्सुलेट्स या फक्त व्हिसा देऊ शकतात. व्हिसा हा मूलत: अमेरिकेत प्रवेश करण्याचा परवाना नव्हे; तो केवळ अमेरिकेच्या विमानतळ/बंदर/भूसीमेपर्यंत जाऊन त्या इमिग्रेशन अधिकाऱ्याकडे प्रवेशासाठी आवेदन करण्याचा परवाना, तथा, 'या मनुष्याची कागदपत्रे मी तपासली आहेत, आणि तो सांगितलेल्या कारणांसाठी अमेरिकेत दाखल करण्यास लायक आहे, असे मला वाटते' असे सांगणारी वकिलातीची किंवा कॉन्सुलेटची शिफारस आहे. त्या शिफारशीचा मान राखणे हे त्या इमिग्रेशन अधिकाऱ्यावर बंधनकारक नाही. कोणत्याही कारणाने त्याचे ज्या कॅटेगरीखाली तुम्हाला व्हिसा देण्यात आलेला आहे, त्या कॅटेगरीखालील तुमच्या प्रवेशपात्रतेबद्दल समाधान न झाल्यास (किंवा, प्रस्तुत भेटीत किंवा अगोदर कधीतरी तुम्ही अमेरिकन इमिग्रेशन कायद्याचे उल्लंघन अथवा लफडे (फ्रॉड) करू पाहात आहा किंवा केले आहे, असे त्याला आढळल्यास किंवा तसा संशय आल्यास) तो तुम्हाला प्रवेश नाकारू शकतो (तथा, बहुधा - चूभूद्याघ्या - तुमचा व्हिसा रद्दसुद्धा करू शकतो). म्हणजे, व्हिसा असणे ही प्रवेशाची हमी नव्हे; निव्वळ शिफारस आहे. आता, काही देशांच्या (ज्यात भारत येतो) नागरिकांकरिता अशी शिफारस अनिवार्य आहे; ती असल्याशिवाय तो इमिग्रेशन अधिकारी तुमच्या अर्जाचा विचारसुद्धा करू शकणार नाही, आणि तुम्हाला प्रवेश नाकारेल; इतकेच नव्हे, तर मुळात तुमची विमान/जहाज कंपनी तुम्हाला त्याशिवाय विमानात/जहाजात चढू देणार नाही; अन्यथा, तुम्हाला तेथवर आणल्याबद्दल त्यांना दंड होऊ शकेल. इतर काही देशांच्या नागरिकांकरिता (यात बहुतांश पश्चिम युरोपीय देश तथा जपान, सिंगापूरसारखी इतर काही तुरळक राष्ट्रे येतात), केवळ काही ठराविक कारणांकरिता (बिझनेस किंवा टूरिझम), अत्यल्प मुदतीच्या (९० दिवसांपर्यंत) वास्तव्याकरिता अशी शिफारस लागत नाही, अन्यथा व्हिसा लागतो. (कनेडियन नागरिकांना, तुरळक अपवाद वगळता, सामान्यत: कोणत्याही कारणाकरिता व्हिसा लागत नाही.)

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगातील इतर देशांच्या बाबतीत; म्हणजे अगदी इंग्लंड, जर्मनी, पाकिस्तान, भूतान, सँडविच आयलंड पासून कुठलाही देशातील नागरिकांना ड्युअल इन्टेन्टच्या माध्यमातून रोजगाराच्या (ड्युअल इन्टेन्ट) माध्यमातून ग्रीन कार्ड मिळण्याचा कालावधी काही महिने, फार फार तर १-२ वर्ष असला तरी फक्त आणि फक्त भारतीयांच्या बाबतीत हा कालावधी सध्या १५० वर्षे आहे.

माफ करा, पण... हा दीडशे वर्षांचा आकडा तुमच्या लिखाणात वारंवार पाहिला. हा टायपो वगैरे आहे काय? कदाचित, तुम्हाला १५ वगैरे म्हणायचे होते काय?

१५० वर्षे म्हणजे मनुष्याच्या कमाल आयुर्मानाहूनही अधिक झाले. अशा परिस्थितीत, कोठला भारतीय य**वा नि कशासाठी म्हणून ग्रीनकार्डाकरिता अर्ज करेल?

(माझे स्वत:चे ग्रीनकार्ड ईबी-३खाली पाच वर्षांत झाले होते. परंतु ते २००१मध्ये. आजमितीस हा कालावधी प्रचंड वाढलेला आहे, याची कल्पना आहे. परंतु तरीही, १५० वर्षे डझण्ट मेक सेन्स.)

----------

आत्ताच स्टेट डिपार्टमेंटचे प्रायॉरिटी डेट्सचे पान पाहिले. (बहुतांश भारतीय हे ईबी-३ किंवा क्वचित ईबी-२खाली अर्ज करतात, हे लक्षात घेता) भारतीयांकरिता प्रायॉरिटी डेट ही आजमितीस (२०२०च्या सप्टेंबर महिन्यात) ईबी-३खाली १ ऑक्टोबर २००९ तथा ईबी-२खाली ८ जुलै २००९ अशी आहे. (ईबी-२ची तारीख ही ईबी-३च्या तारखेअगोदर असणे हे अंमळ संशयास्पद वाटते खरे, परंतु हे अधिकृत आकडे आहेत.) याचा अर्थ, ज्यांचे त्या तारखेअगोदर लेबर अप्रूवल (एम्प्लॉयमेंट बेस्ड ग्रीनकार्डाच्या प्रोसेसची पहिली पायरी) झाले होते, आणि ज्यांचे आय-१४० पेटिशन (= त्यापुढची पायरी) अप्रूव होऊन (अर्थात, ग्रीनकार्ड इश्यू करण्याकरिता तत्त्वत: मान्यता मिळून), केवळ वार्षिक कोटा उपलब्ध नसल्यामुळे आजमितीस त्यांना ग्रीनकार्ड प्रदान करणे शक्य नसल्याकारणाने ते आजवर वेटिंग लिष्टेत तिष्ठत पडले होते, ते इत:पर आय-४८५ पेटिशन (अर्थात, ॲडजस्टमेंट ऑफ स्टेटस, म्हणजेच, आत्तापर्यंतच्या नॉनइमिग्रंट स्टेटसमधून इमिग्रंट स्टेटसमध्ये बदली करून ग्रीनकार्ड इश्यू करण्याकरिता अर्ज; एम्प्लॉयमेंट बेस्ड ग्रीनकार्ड प्रोसेसची शेवटची पायरी) भरण्यास पात्र आहेत.

आता, लेबर अप्रूवलकरिता आजमितीस किती वेळ लागतो, मला कल्पना नाही. माझ्या वेळेस, मला नीट आठवत असेल, तर साधारणत: वर्ष-दीड वर्ष लागे. आजमितीस, समजा, तीन वर्षे मानू. म्हणजे, आज जे लोक ईबी-२खाली ॲडजस्टमेंटकरिता अर्ज करण्यास पात्र आहेत, त्यांनी मुळात ग्रीनकार्डाकरिता अर्ज हा ८ जुलै २००९ उणे तीन वर्षे म्हणजे साधारणत: २००६च्या जुलैच्या आसपास केला असावा. त्याउपर, ॲडजस्टमेंट प्रोसेसला आजमितीस किती वेळ लागतो, याची मला कल्पना नाही, परंतु, माझ्या वेळेस जवळपास सव्वादोन वर्षे लागली होती. आजमितीस चला समजा पाच वर्षे लागतात, असे मानू. म्हणजे, आज ॲडजस्टमेंटसाठी अर्ज करणारास साधारणत: सप्टेंबर २०२५च्या आसपास प्रत्यक्ष ग्रीनकार्ड लाभेल.

आता, जुलै २००६ ते सप्टेंबर २०२५ म्हणजे किती वर्षे झाली? घाला बोटे, मोजा बघू? साधारणत: सव्वा-एकोणीस वर्षे झाली, नाही?

आता, लेबर अप्रूवलकरिता आजमितीस लागणारा वेळ तथा ॲडजस्टमेंटकरिता आजमितीस लागणारा वेळ यांबद्दलचे माझे अंदाज अतिरेकी असू शकतात, हे जमेस धरले, तर हा वेळ याहून कदाचित थोडा कमीही असू शकतो. म्हणजे, एकूण वेळ हा पंधरा ते वीस वर्षांच्या बॉलपार्कात यावा.

मग, कोठे पंधरा ते वीस वर्षे, नि कोठे दीडशे वर्षे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रायॉरिटी डेट म्हणजे लेबर (= स्टेज १) अप्रूवलची तारीख नव्हे, तर लेबर अप्रूवलकरिता अर्ज ज्या दिवशी सरकारदरबारी दाखल झाला, ती तारीख. माझी चूक! आता, या अनुषंगाने गणित पुन्हा मांडले पाहिजे.

समजा, भारतात जन्मलेला एक मनुष्य, सिंगापुरात जन्मलेला दुसरा मनुष्य, आणि फ्रान्समध्ये जन्मलेला तिसरा मनुष्य, तिघांनीही ८ जुलै २००९ रोजी ईबी-२ खाली ग्रीनकार्डाकरिता (एकाच राज्यातून) फाइल केले. (पक्षी, ८ जुलै २००९ रोजी तिघांचेही अर्ज लेबर अप्रूवलकरिता एकाच राज्यातून दाखल झाले. अर्थात, ८ जुलै २००९ ही तिघांचीही प्रायॉरिटी डेट आहे.

आता समजा, तिघांच्याही लेबर (= स्टेज १) अप्रूवलकरिता बरोबर तीन वर्षे लागली. त्यांनंतर तिघांनीही एकसमयावच्छेदेकरून पुढील पायरीसाठी (= आय-१४० = स्टेज २) अर्ज दाखल केला. ते अप्रूव व्हायला तिघांनाही बरोबर एक वर्ष लागले.

आतापर्यंत तिघांनीही या प्रक्रियेत घालवलेला वेळ = प्रत्येकी ३ + १ = ४ वर्षे, आणि आजची तारीख ८ जुलै (२००९ + ४ Smile २०१३.

पुढची (आणि शेवटची) पायरी म्हणजे आय-४८५ अर्थात ॲडजस्टमेंट ऑफ स्टेटसकरिता अर्ज करणे, जी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ग्रीनकार्ड हातात पडते. समजा, या प्रक्रियेला तिघांनाही सारखाच वेळ (समजा पाच वर्षे) लागणार आहेत.

आता इथे एक गोची होते. सिंगापुरात जन्मलेला माणूस आणि फ्रान्समध्ये जन्मलेला माणूस, दोघांकरिताही ८ जुलै २०१३ रोजी (म्हणजे त्यांची स्टेज १ अधिक स्टेज २ दोन्ही पूर्ण झाल्याच्या दिवशी) त्यांची प्रायॉरिटी डेट करंट असते. (म्हणजे ॲज़ ऑन दॅट डेट ते स्टेज ३करिता अर्ज दाखल करण्यास पात्र होण्याकरिता वेटिंग लिष्टेत नसतात.) त्यामुळे, ते अधिक वेळ न दवडता ताबडतोब आपापला अर्ज दाखल करू शकतात, नि मग पाच वर्षांनी (= ८ जुलै २०१८ रोजी) त्यांच्या पासपोर्टात ग्रीनकार्ड अप्रूवलचा शिक्का (अर्थात हंगामी ग्रीनकार्ड) पडतो, नि मग यथावकाश (समजा तीन महिन्यांनी, ८ ऑक्टोबर २०१८ रोजी) पोष्टाने त्यांच्या हातात प्रत्यक्ष ग्रीनकार्ड पडते.

इथे भारतात जन्मलेला माणूस अडकलेला असतो. त्याची प्रायॉरिटी डेट करंट होईस्तोवर १ सप्टेंबर २०२० उजाडतो. तोवर (स्टेज २पर्यंत सर्व सुरळीतपणे पार पडलेले असूनसुद्धा) तो स्टेज ३करिता अर्ज करण्यास पात्र नसतो, कारण वेटिंग लिष्टेत असतो. १ सप्टेंबर २०२० रोजी तो पात्र होतो. समजा त्या दिवशी त्याने अधिक वेळ न दवडता अर्ज दाखल केला, नि त्यालाही (इतरांप्रमाणेच) पाच वर्षे लागली, तर १ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांच्या पासपोर्टात ग्रीनकार्ड अप्रूवलचा शिक्का बसेल, नि त्यानंतर साधारणतः तीनएक महिन्यांनी (१ डिसेंबर २०२५ रोजी) त्याच्या हातात प्रत्यक्ष ग्रीनकार्ड पडेल.

म्हणजे, तिघांनीही प्रक्रियेला सुरुवात केली ८ जुलै २००९ रोजी.

सिंगापुरात नि फ्रान्समध्ये जन्मलेल्या मंडळींना प्रत्यक्ष ग्रीनकार्ड मिळाले ८ ऑक्टोबर २०१८ रोजी, अर्थात ९ वर्षे ३ महिन्यांनंतर.

भारतात जन्मलेल्या व्यक्तीस प्रत्यक्ष ग्रीनकार्ड मिळाले १ डिसेंबर २०२५ रोजी, अर्थात (साधारणतः) १६ वर्षे ५ महिन्यांनंतर.

(इतर सर्व घटक समान धरले आहेत.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगातील इतर देशांच्या बाबतीत; म्हणजे अगदी इंग्लंड, जर्मनी, पाकिस्तान, भूतान, सँडविच आयलंड पासून कुठलाही देशातील नागरिकांना ड्युअल इन्टेन्टच्या माध्यमातून रोजगाराच्या (ड्युअल इन्टेन्ट) माध्यमातून ग्रीन कार्ड मिळण्याचा कालावधी काही महिने, फार फार तर १-२ वर्ष असला तरी फक्त आणि फक्त भारतीयांच्या बाबतीत हा कालावधी सध्या १५० वर्षे आहे.

ही माहिती अंशत: चुकीची आहे.

ग्रीनकार्ड प्रोसेससाठी लागणाऱ्या वेळातली ही तफावत ही चार्जेबिलिटी एरियावर अवलंबून आहे, हे खरे आहे. मात्र, हा चार्जेबिलिटी एरिया हा प्रकार, तुरळक अपवाद वगळल्यास, सामान्यत: अर्जदार व्यक्तीच्या नागरिकत्वावर अवलंबून नसून जन्मस्थानावर अवलंबून आहे.

म्हणजे, उदाहरणार्थ, इंग्लंडात, तैवानमध्ये किंवा केनयात जन्मलेल्या भारतीय नागरिकाचे ग्रीनकार्ड झटक्यात होऊ शकते, तर भारतात जन्मलेला ब्रिटिश, तैवानी किंवा केनयन नागरिक वर्षानुवर्षे खितपत पडू शकतो.

(चार्जेबिलिटी एरियाबद्दल अधिक माहिती इथे. त्यातील लीगॅलीज़ समजू शकत असल्यास, तथा तितका पेशन्स असल्यास.)

(भारत, चीन, मेक्सिको, फिलिपीन्स, व्हिएतनाम, एल साल्वादोर, ग्वातेमाला, होंडुराज़, अशा काही "खास देशांत" जन्मलेल्या लोकांकरिता ही इतर "सर्वसामान्य देशां"पेक्षा वेगळ्या चार्जेबिलिटी एरियाची भानगड लागू होते. तीदेखील, काही ठराविक कॅटेगरीतील ग्रीनकार्डांकरिता. "पांढरपेशा" कॅटेगरीतील ग्रीनकार्डाच्या बाबतीत जास्तीत जास्त नुकसान हे भारत आणि चीन या देशांत जन्मलेल्यांचे होते. त्यातसुद्धा भारतात जन्मलेल्यांचे अधिक. असो.)

(तसेही, चार्जेबिलिटी एरिया हा (माझ्या कल्पनेप्रमाणे; चूभूद्याघ्या.) फक्त प्रायॉरिटी डेट ठरवीत असावा. लेबर अप्रूवलकरिता तथा आय-१४०करिता लागणाऱ्या कालावधीवर त्याचा काहीही परिणाम होत नसावा. म्हणजे, तरीही गेला बाजार तीनचार वर्षे तर झालीच. काही महिने नव्हे. शिवाय, ॲडजस्टमेंटकरिता लागणारा वेळ हा सर्वांसाठी (बहुधा) समान असावा; चूभूद्याघ्या. चार्जेबिलिटी एरियामुळे ज्यांचा फायदा होतो, तो फायदा माझ्या कल्पनेप्रमाणे फक्त स्टेज-२ (= आय-१४०) अप्रूवलनंतर स्टेज-३ (= ॲडजस्टमेंट ऑफ स्टेटस) करिता अर्ज करण्याकरिता पात्र होण्यास वेटिंग लिष्टेत तिष्ठत बसण्याचा वेळ वाचल्यामुळे होत असावा, इतकेच. (म्हणजे, तरीही, आजमितीस साधारणत: सव्वाअकरा वर्षे वाचत असावीत. गणित अन्यत्र सुधारले आहे.))

असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0