"द डिसायपल" : नाद आहे या घड्याला अन् घड्याच्या भोवती

चैतन्य ताम्हाणे यांच्या "द डिसायपल" या मराठी सिनेमाला व्हेनिस चित्रपटमहोत्सवात महत्त्वाचा पुरस्कार मिळाल्यानंतर तो सिनेमा पाहाण्याची उत्सुकता वाढली होती. त्या आधी हा सिनेमा हिंदुस्तानी गायकी, गुरुशिष्य परंपरा यांच्याशी संबंधित आहे हे कळलेलं असल्याने या जिव्हाळ्याच्या विषयांवर असणारा हा सिनेमा पहायचा हे ठरलेलं होतंच.

काल एका ऑनलाईन पोर्टलवर, अधिकृतरीत्या प्रदर्शित झालेला हा सिनेमा पाहायला मिळाला. तो विशेष आवडला.

image 1
या पुढील परिच्छेदांमधे कथानक, व्यक्तीरेखा, आणि अन्य पैलूंबद्दल बोलताना त्यातला काही भाग कळतनकळत उल्लेखला जाणार आहे. सिनेमा पहायची इच्छा असलेल्यांनी हा भाग नाही वाचला तरी चालेल.

शास्त्रीय संगीताची लहानपणापासून आवड जोपासलेल्या, पुढे आपल्या उमेदीची सगळी वर्षं शास्त्रीय संगीताला वाहून घेतलेल्या शरद नेरूळकरचा प्रवास इथे चितारलेला आहे. त्याच्या गुरुजींशी, आई वडलांशी, आजीशी , त्याच्या समकालीनांशी आणि मग पुढे त्याच्याकडून संगीत शिकणार्‍यांशी असलेले त्याचे संबंध त्यात येतात.

सिनेमा मेनस्ट्रीममधला नाही. कथानायक आपल्या नेत्रदीपक कर्तृत्वाने सरकारदरबार जिंकतो, जग जिंकतो, प्रसिद्धी आणि यशाच्या शिखरावर पोचतो आणि या प्रवासात परीकथेप्रमाणे घटना घडतात ते इथे नाही. त्याच्या गुरुजींवर आणि गुरुंच्या गुरुंवर त्याची श्रद्धा आहे पण इथे श्रद्धेचे उमाळे नाहीत. हयात असलेल्या आणि दिवंगत व्यक्तींचं दैवतीकरण नाही. आपला हिरो हळुहळू तारुण्यातून प्रौढत्वाकडे जातो. कोवळेपणाचे थर गळतात. तो शरीराने काहीसा निबर बनतो. थोडा मनाने सुद्धा.

पैसा, प्रसिद्धी, कलात्मक यश याच्यात आपला हिरो कुठे शिखरावर पोचत नाही. निम्न आर्थिक स्थितीतून आलेला असतानाही, शास्त्रीय संगीताचा शिक्षक हा व्यवसाय म्हणून निवडतो आणि ते बनायच्या आधीची वर्षंसुद्धा शास्त्रीय संगीताच्या सीडीज विक, मैफलींमधे गा, आयोजक लोकांशी संबंध निर्माण करून काही काम मिळवता येतं का ते पहा असेच प्रयत्न करतो. त्याची मिळकत मोजकी आहे आणि ती तशीच राहाते. थोडं उशीरा का होईना, पण लग्न, संसार सुरू होतात पण तो असतो नि राहातो संगीताचा शिक्षक.

ज्यांच्यावर मूकपणे प्रेम केलं, ज्यांच्यावर श्रद्धा ठेवली ते गुरुजी आणि कधी न भेटलेल्या गुरुजींच्या गुरु "माई" - ज्यांची फक्त भाषणं त्याने ऐकली आहेत - तेही वयोपरत्वे दुरावतात, त्यांच्याबद्दलची मिथकं कुठेतरी असत्य आहेत की काय असा भास होतो.

आणि या सर्वाची निवड करून झाल्यावर , हे सर्व पाहत, अनुभवत असताना त्याचा जीवनप्रवास चालू राहातो.

image 2

सिनेमा पाहाण्यापूर्वी शास्त्रीय संगीताचा पाया असलेले, "कट्यार काळजात घुसली", "बालगंधर्व"यांसारखे गेल्या काही वर्षांमधे येऊन गेलेले सिनेमे आठवले. "डिसायपल" सुरू झाला आणि जाणवलं की हा सिनेमा त्या सिनेमांपेक्षा वेगळा आहे. (याचा अर्थ "कट्यार काळजात घुसली", "बालगंधर्व" हे वाईट आणि "डिसायपल" थोर असं मला म्हणायचं नाही. इतकं बटबटीत विधान करायचं नाहीये. )

सिनेमाच्या माध्यमातून आपल्याला पडलेले प्रश्न, आपल्याला पडलेली कोडी सोडवायचा हा प्रयत्न आहे असं मला वाटलं. हा सिनेमा पैसे कमावणार नाहीये आणि तशी त्याची प्रतिज्ञा नाहीये. मात्र कथानायक जितक्या प्रामाणिकपणे हिंदुस्तानी संगीताकडे आणि पर्यायाने आपल्या आयुष्याकडे पाहातो तितक्याच खरेपणाने सिनेमादेखील बनवला आहे असं मला कुठेतरी वाटलं.

कलेशी असलेलं आपलं नातं नेमकं काय असतं? कलेमधे मिळालेलं यश अपयश म्हणजे काय? लौकिक यशापयशाला जरी बाजूला ठेवलं तरी कलेतून काहीएक अर्थ लावण्याचा हेतू या गोष्टीच्या संकल्प आणि सिद्धीला काही अर्थ आहे कां? कलेशी प्रामाणिक राहायचा प्रयत्न करत ठेवणं ही गोष्ट In and Of itself श्रेयसात्मक आहे का? मग ते करत असताना - किंवा ते केल्यामुळे - एक अत्यंत सामान्य , काहीसं उपेक्षित, अनामिक आयुष्य बनत गेलं तर ते श्रेयात्मक की निरर्थक? आणि असं जगत असताना आपल्या आजूबाजूच्या झपाट्याने बदलत असणार्‍या जगाशी आपला सांधा कसा राखून ठेवायचा? शरीरा-मनाच्या भुकांचं आणि मुख्य म्हणजे अतृप्तीचं आणि क्वचित कधीकधी खिंडीत गाठणार्‍या हपापलेपणाचं काय करायचं?

"द डिसायपल" ने हे प्रश्न मनात जागे केले. ते करत असताना जे समोर उलगडत गेलं त्यामधे कमालीचा संयम मला जाणवला. चैतन्य ताम्हाणे नावाच्या जेमतेम तीशीत असलेल्या माणसाकडे इतका संयम कसा आला असेल?

image 3

थोडं हिंदुस्तानी संगीत आयुष्यात ऐकलं आहे. थोडं शिकून पाहिलं आहे. त्यात "ठहराव" या गोष्टीला अपरिमित महत्त्व आहे. स्वरांच्या लगावामधे एक घनगंभीरता हवी असं मानलं जातं. शुद्धतेइतकंच या घनतेला खूप महत्त्व आहे. "द डिसायपल"ची निर्मिती, लिखाण , दिग्दर्शन करणार्‍यांना हा ठहराव गवसला आहे. अरुण द्रवीड या बुजुर्गाची गायकी आणि त्यांचा अभिनय मला आवडला. आणि मुख्य रोल केलेल्या आदित्य मोडकला आलिंगन द्यावं असं मला चित्रपटाच्या शेवटी वाटलं.

शरद नेरूळकरच्या या प्रवासामधे दिवंगत माईंनी दिलेल्या भाषणांची त्याला सोबत आहे. माईंची ही भाषणं मला अर्थसंपृक्त वाटली. त्याचा एक हिप्नॉटिक इफेक्ट - किमान मला - जाणवला. सार्‍या चित्रपटाचा जणू बोधस्वर म्हणजे ही उधृतं आहेत. सुमित्रा भावेंनी त्याकरता आपला आवाज दिलेला आहे. मला हा भाग परतपरत पाहावा वाटला.

सिनेमाबद्दल जे वाटतं ते याहून अधिक आहे पण सांगता येत नाही. माझे शब्द संपले. शरद नेरूळकर या कथानायक कसा विचार करत असेल ते सांगणारी शंकर रामाणींची एक मला अतिशय आवडणारी कविता देतो आणि समारोप करतो.

एकल्याने गावें
एकट्याचे गाणें;
परक्याचे नाणें
खरें-खोटें.

खरी आहे फक्त
नागवली काया
हंबरते माया 
एकट्याची.

एकट्याच्या तेथे
उधळल्या वाटा
चढणीच्या घाटा
अंत नाही.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

लिखाण वाचलं. चित्रपट बघायच्या यादीत टाकलाय. शेवटच्या ओळी खासच.
अवांतर --
ह्या धाग्याला रेटिंग देता येत नाहीये. कुणीतरी माझ्यावतीनं पाच तारका द्या. तितकाच अधिक लोकांच्या रडारवर येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शिनुमा पाहायचा आहे त्यामुळे फक्त शेवटची कविता वाचली. कविता आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

You know, sometimes I think I was born with a leak, and any goodness I started with just slowly spilled out of me and now its all gone. And I'll never get it back in me.
~ BoJack Horseman Secret

लेख वाचल्यावर चित्रपट पाहायची उत्सुकता वाढली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला. चित्रपट सापडला तर पाहीनच. चित्रपट बनवणे हीसुद्धा कला आहेच. भडक न करता आशय पोहचवता येणे शक्य आहे.
धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

... याच विषयावरचे याहून उत्तम आणि 'खरेखुरे' कथानक मी त्यांना दिले असते. ते असे 'ठहराव' वगैरे असणारे संयत झाले असते की नाही ते माहित नाही पण चमकदार आणि जिवंत झाले असते हे मात्र नक्की. असो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एका ऑनलाईन पोर्टलवर, अधिकृतरीत्या प्रदर्शित झालेला

कुठल्या? भारतात की बाहेर?

-ओंकार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमेरिका

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

हा सिनेमा मला माझ्या IPTV connection वर मिळाला आणि प्रस्तुत लेख येथे येण्याच्या दोनच दिवस आधी मी तो पाहिला होता. दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेंचा 'कोर्ट' मी ह्यापूर्वी पाहिला होता आणि हा दिग्दर्शक काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतो हे तेव्हाच ध्यानात आले होते.

ह्या चित्रपटातहि वेगळेपण आहे. शास्त्रीय संगीताला वाहून घेण्याच्या इच्छेने प्रेरित अशा तरुणाचा हा प्रवास आहे. संगीताचा वारसा त्याला आपल्या वडिलांकडून मिळालेला आहे आणि वडिलांचे गुरु हेच त्याचेहि गुरु आहेत. (ही भूमिका किशोरी आमोणकारांचे शिष्य आणि अमेरिकेतील उच्चपदस्थ - सध्या निवृत्त - अरुण द्रविड ह्यांनी केली आहे.)

चित्रपट पाहिल्यानंतर मात्र 'इतका वेळ घालवून हातात काय मिळाले' अशी खंत मागे राहिली. ह्याचे कारण म्हणजे कोठल्याच भूमिकेस खोली अशी नाही. शरद नेरुळकर शास्त्रीय संगीताला आपली करियर करण्याचा प्रयत्न करतांना दिसतो पण त्यासाठी लागणारी कुवत त्याच्यापाशी नाही. त्यामुळे उमेदवार गायकांच्या स्पर्धेत त्याला तिसरा क्रमांक मिळतो. गाण्याच्या बैठकीत गायला बसतो पण त्याला गायला सुरुवातच करता येत नाही त्यामुळे बैठक सोडून तो चक्क निघून जातो. त्याच्या गुरुजींनाहि गायनक्षेत्रामध्ये काही विशेष प्राप्त झाले आहे असे जाणवत नाही कारण ते आपल्या समोर असतात तेव्हा चाळीमधल्या एक खोलीवजा आपल्या घरामध्ये बसून ते गाण्याचा क्लास चालवितांना दिसतात.

शास्त्रीय संगीताला निष्ठा वाहिलेल्या ह्या दोघांची ही स्थिति का होते ह्याचे उत्तर चित्रपटातच सूचित केलेले सापडते. सर्व नव्या गायकांना Sa Re Ga Ma Pa L'il Champs किंवा America's Got Talent असल्या TV Shows आपण चमकावे असे वाटत असते. ह्यातून मिळणारे प्रसिद्धीचे वलय आणि पैसा शास्त्रीय संगीत देऊ शकत नाही ही वस्तुस्थिति आहे. वर उल्लेखिलेल्या उमेदवार गायकांच्या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवणारी मुलगी लगेचच टीवीवरील L'il Champs प्रकारच्या कार्यक्रमाकडे आकर्षिली जाते. शास्त्रीय संगीताचा निष्ठावंत शरद नेरुळकर ह्या स्पर्धेत मागे राहतो पण तो मागे राहतो ह्याचे कारण हे आहे की त्याच्यामध्ये कसलीच कुवत मुळातच नाही.

आपल्या संगीतसाधनेचे वैयर्थ्य केव्हातरी शरद नेरुळकरच्या लक्षामध्ये आलेले असावे कारण चित्रपटाच्या शेवटाशेवटाकडे त्याने संगीताच्या सीडीज करून विकायचा व्यवसाय सुरू केलेला दिसतो आणि त्यामध्ये त्याला माफक यशहि आलेले दिसते. पण हा सांधाबदल का आणि कधी घडला ह्याचे कसलेच स्पष्टीकरण - प्रत्यक्ष वा सूचित - चित्रपटामध्ये नाही.

अशा प्रकारे चित्रपटाला पुरेशी खोली न मिळाल्यामुळे चित्रपट निराशाजनक वाटतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वांनाच यश येते असे नाही हे दाखवायचे असेल.
स्पर्धा कार्यक्रमातून बाहेर पडल्यावर 'केतकी माटेगावकर'ने केलेला सांंधाबदल यशस्वी झाला. तसे करवण्यात तिचे वय आणि पालकांचे संस्कार1 कारणीभूत झिले असतील.

#1 -वेगळ्या अर्थाने "ती एक गंमत असते, करिअरचा शेवट नसतो" हे सांगून तयार मानसिक तयारी करवली असेल. तिच्या बरोबरच्या इतर कलाकारांनी केतकीचा कित्ता उशिरा गिरवला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या चित्रपटाविषयीची चैतन्य ताम्हाणे ह्यांची New York Film Festival मधील मुलाखत येथे पहा: https://www.youtube.com/watch?v=EaQhPPw8tuQ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काल बीएफआयच्या कृपेने बघायला मिळाला. चित्रपट हे मला 'कळणारं' माध्यम नाही. (मुख्यत्वे माझ्या आळसामुळे.) त्यामुळे खालील मतं मिठाची चांगली धार सोडून घ्यावीत. शिवाय - स्पॉयलर अलर्ट वगैरे.

***

शास्त्रीय संगीत वगैरे बाजूला केलं तर या सिनेमाची थीम अत्यंत परिचित आहे.

एखाद्या क्षेत्रात 'सरासरीपेक्षा सरस' असलेल्या, पण 'सर्वोत्कृष्ट नसलेल्या' व्यक्तीची शरद नेरूळकरसारखी फरपट होणं अनेकदा पाहायला मिळतं. आपल्या क्षेत्राचं शिखर 'दिसतं' पण तिथे पोचता येत नाही. सुरुवातीला आत्मवंचना (denial) होते. शिखर कष्टसाध्य आहे या भावनेने आयुष्यातल्या अन्य गोष्टींवर पाणी सोडून 'शिखरा'च्या पाठीमागे धावणं होतं. आणि हळूहळू जाणीव कानाखाली जाळ करून जाते, की बाबा, you were always a 'maybe'. 'तिथे' पोचण्याएवढं पाणी तुझ्या आडात नाही.

एका लिमिटपलिकडे स्वत:ला फसवणं शक्य नसतं. कष्टांसाठी ज्या इतर गोष्टींवर पाणी सोडलं त्याच गोष्टी आजूबाजूच्या व्यक्तींच्या लौकिक यशामध्ये मोजल्या जातात, आणि त्या नसतात म्हणून आपल्याला यशस्वी गणलं जात नाही.

म्हणजे एकीकडे स्वत:च्या लेखीही यशस्वी नाही, आणि समाजाच्या लेखीही नाही. कडवटपणा आणि नैराश्य दारावर धडका देत असतं, अशा क्षणी. त्या मानाने शरद नेरूळकराने हे स्थित्यंतर चांगलं हाताळलं आहे.

कोल्हटकरकाकांना पडलेला "पण हा सांधाबदल का आणि कधी घडला ह्याचे कसलेच स्पष्टीकरण - प्रत्यक्ष वा सूचित - चित्रपटामध्ये नाही." हा प्रश्न मला पडला नाही, कारण हे वरचं सगळं. सांधाबदल हा एक साक्षात्काराचा क्षण क्वचितच असतो. साठून येतं, आणि एका क्षणी असह्य होतं.

***

(पट)कथा जास्त बांधीव असती तर मला आवडलं असतं. सिनेमात शरद नेरूळकर हाच फोकल पॉईंट आहे. (शरदचा स्क्रीन प्रेझेन्स भागिले सिनेमाची लांबी हे गुणोत्तर किमान ८०% तरी असावं.) त्याच्या आजूबाजूची पात्रं शरदच्या रेफरन्सने येतात आणि जातात. शरद वगळता कोणालाच 'कॅरेक्टर आर्क' अशी नाही.

पण कित्येकदा पार्श्वभूमीचे बारकावे मुख्य पात्राला खोली देऊन त्रिमित करतात. उदा० शेवटाकडे एकाच प्रसंगापुरतं येणारं 'जोशी' हे पात्र चेखॉव-बंदूक-तंत्राने आधीच सूचित करून ठेवलं असतं तर आवडलं असतं. शरद आणि त्याच्या सहाध्यायांचे व्यक्तिगत संबंध हाही भाग रंगवलेला आवडला असता.

अर्थात, 'हर गार्डाची न्यारी शिट्टी...'

***

एकंदर बघता, 'कोर्ट'इतकाच आवडला.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

चित्रपट बघितल्याशिवाय प्रतिक्रिया द्यायची नाही हे ठरवलं होतं. त्यानुसार आज चित्रपट पहाता आला. पाहिल्यावर राबांचं परीक्षण पुन्हा वाचलं. अतिशय सुंदर आणि प्रत्ययकारी वाटलं. हा चित्रपट धंदा करु शकणार नाही. पण संगीताच्या बाबतीतल्या अनेक बाबींवर मार्मिक भाष्य करणारा आहे. ज्यांना शास्त्रीय संगीताची ओळख आहे त्यांना यातले बारकावे जास्त चांगले समजतील.
मी लहानपणापासून आमच्या घरी चालणाऱ्या अनेक 'रविवार सकाळींच्या अनौपचारिक मैफिलींचा साक्षीदार आहे. हवशे-गवशे नवशे आणि थोर कलाकारांच्या अनेक मैफिली ऐकल्या आहेत. त्यांत अनेक मिडिऑकर कलाकारांच्या आयुष्याचा प्रवास जवळून पाहिला आहे. त्यामुळे हा चित्रपट मला पुनर्प्रत्यय देऊन गेला. संगीताचा गळा आणि त्यांतली बुद्धिमत्ता, ह्या दोन्हीची देणगी फारच थोड्यांना मिळते, बाकीचे अनेक ऑलसो रॅन, या कॅटेगरीत आयुष्य काढतात. सुदैवाने त्यातील बऱ्याच जणांना स्वत:च्या लिमिटसची जाणीव असते. काही महाभागांना तीही नसते. अशांचे अर्थातच, त्यांच्यापाठी हसं होतं.
कलाकारांचे मुख्यत: तीन प्रकार बघितले आहेत. काही कलाकार तसे पारंपारिक चांगलं गाणारे असतात, सुरांतही गातात पण नवनिर्मितीची क्षमता नसते. तरीही कमर्शियली यशस्वी होतात. काही प्रतिभावंत असतात पण पीआरओगिरी न जमल्यामुळे हल्लीच्या जगांत मागे पडतात. तर काही इतके अदभुत प्रतिभावंत असतात की त्यांची अद्वितीय कलाच त्यांना तारुन नेते. त्यांचे सर्व विक्षिप्त प्रकार, संगीतप्रेमी जनता, त्यांच्या कलेवरच्या प्रेमामुळे गोड मानून घेते. तर अशा या सांगितिक जगाचा एक वेगळाच लेखाजोगा मांडणाऱ्या ताम्हाणेंना सलाम!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

धन्यवाद ति.मा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

सिनेमाची कथा वाचून ‘व्हसेक पॉस्पीसिल’ची आठवण झाली. हा तीसेक वर्षें वयाचा कॅनडातला एक व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. जवळपास प्रत्येक ग्रॅँड-स्लॅममध्ये असतो, याचा अर्थ तिथपर्यंत पोहोचण्याइतकं नैपुण्य त्याने सातत्याने टिकवून धरलेलं आहे. पण एकदा तिथे गेला की फारतर दुसऱ्यातिसऱ्या राउंडपर्यंत पोहोचून हरतो. हे आता नित्याचं झालं आहे.

वयाच्या सातव्या वर्षापासून तो लहानसहान टूर्नामेंट्स जिंकत आला आहे, म्हणजे एकंदरीने पाहता लहानपणापासून त्याच्या स्वत:च्या आणि आप्तेष्टांच्याही आशाआकांक्षा खूप असणार. पण तितकं नाही जमलं आणि आता या वयात जमेलसं वाटतही नाही.

वास्तविक त्याचे आईवडिल कम्यूनिस्ट युरोपातून कातडी बचावून कसेबसे कॅनडात येऊन पोहोचले, आणि पैशाची बाजू भक्कम नसतानाही त्यांनी मुलाला टेनिस खेळायला शिकवलं अशी काहीतरी कथा आहे. तेव्हा जगन्नियत्याला काही लाज असेल तर व्हसेक पॉस्पीसिल विंबल्डन फायनलला पोहोचतो, आणि फेडररला पाचव्या सेटपर्यंत झुंजवून एक मॅचपॉइंट वाचवून शेवटी गवत चारतो, असा त्याच्या कारकीर्दीचा सिनेमॅटिक शेवट होईल. पण प्रत्यक्षात तसं काही होण्याची शक्यता फार कमी दिसते. There is something decidedly tragic about such a story, precisely because the hero is not so grand.

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)

There is something decidedly tragic about such a story, precisely because the hero is not so grand.

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी आज आणि काल मिळून दोनदा पाहिला. बराच काळ डोक्यात घर करून राहावा असा सिनेमा आहे. संयम हा राबांना जाणवलेला गुणविशेष मलाही प्रकर्षाने जाणवला.

‘आदुबाळ’ यांचा प्रतिसाद विशेष आवडला, पण (पट)कथेमुळे त्यांना झालेला त्रास मला झाला नाही. दोन प्रकारच्या कथावस्तू मला आवडतात: एकतर बांधेसूद किंवा हेतुपुरस्सर बांधेसूद नसलेल्या.

परदेशी प्रेक्षकांना यातल्या काही जागा कळणार नाहीत असं वाटतं, पण इथेतिथे तसं होणं साहजिकच आहे. उदाहरणार्थ, शरद नेरूळकरच्या एका गाण्याच्या कार्यक्रमात मागे लावलेला कापडी फलक मी टेप थांबवून लक्षपूर्वक वाचला तेव्हा त्यावर ‘प्रवेश विनामूल्य’ असं लिहिलेलं दिसलं.

बारकावे फार कौशल्याने दाखवलेले आहेत. सिनेमा काढायचा म्हणजे (करायचा ठरवला तर) किती प्रचंड खटाटोप असतो हे पुन्हा एकदा जाणवलं.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)

पाहिला. बरा वाटला. अभिनय उत्कृष्ट आहे – विषेशत: अरूण द्रविड यांचा. तंत्र सफाईदार आहे, आणि दिग्दर्शन उत्तम. पण माझ्या मते कथावस्तू कच्च्या पायावर बांधली आहे. नायकाची motivations आणि प्राधान्यक्रम प्रमाणाबाहेर गोंधळलेली दिसतात. “तेल गेलं, तूपही गेलं”; किंवा थोडं ज्यास्त कठोरपणे, “गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्यही गेलं” अशी अवस्था. कथानकाचा तोच उद्देश आहे, पण सिनेमात एक गायक म्हणून नायकाची mediocrity अति-उघड दिसते. तोच कलाकार अभिनेता आणि गायक म्हणून वापरण्याचा अट्टाहास केल्यामुळे असेल. तो अभिनयात उजवा आहे, पण गाण्यात अगदीच कुचकामी. एखादा बरा पार्श्वगायक वापरला असता तर नायक ज्यास्त credible वाटला असता. शास्त्रीय संगीताच्या जाणकाराला कथेतले कच्चे दुवे ज्यास्त स्पष्ट दिसतील कदाचित. शेवट मात्र मला कळलाच नाही. तो परिणामकारक आहे असे ऐकतो. कुणी समजावून सांगेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0