प्लॅन के मुताबिक…



संकल्पना #संसर्ग #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२०

प्लॅन के मुताबिक…

- अस्वल

[प्रस्तुत कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. कथेच्या सोयीसाठी त्यातल्या पात्रांची नावं बदलली आहेत. तरीही हा निव्वळ योगायोग वगैरे समजू नये.]

१ : भांडुप स्टेशन.

इन्स्पेक्टर राणे आज थोडे खराब मूडमध्ये होते. दाढी करतानाच त्यांच्या मुलाने बाथरूमचा दिवा बंद केला होता आणि बाहेरून तो "श्टाप" असं जोरात किंचाळला होता. राणे दचकले आणि रेझरचा स्ट्रोक चुकून नेमकं कापलं. राणे हरमळले.

मुलावर खेकसून खाली उतरेपर्यंत त्यांना सतत बायकोची बडबड ऐकू येत होती. रेडिओवरच्या प्रायोजित कार्यक्रमाप्रमाणे त्यांची बायको एका संततधार सुरात त्यांना कसली तरी यादी वाचून दाखवत होती.

राण्यांच्या मेंदूत आत कुणीतरी घण घातल्यासारखा टोला बसत होता. त्यामुळे त्यांचा मूड बिघडणं स्वाभाविक होतं. आज पोलीस स्टेशनला येणाऱ्या लुंग्यासुंग्याचं काही खरं नव्हतं. एरवीच राणेसाब आए है म्हटल्यावर समोरचे पाकीटमार चड्डीत मुतत, आज बहुतेक त्यांचा चेहेरा बघून कुणीतरी पॅंटमधेच गडबड करणार होतं.

तरी डब्यात असलेली नवलकोलाची भाजी त्यांनी अजून बघितली नव्हती. राणेंना एक वेळ केळं किंवा सुरण वगैरे भाज्याही चालल्या असत्या, पण नवलकोलाची ती साबणासारखी गिळगिळीत भाजी बघूनच त्यांचं डोकं आउट व्हायचं.

त्यांनी कित्येकदा बायकोला सांगितलं होतं – त्यापेक्षा डबा देऊच नकोस म्हणून. पण तीही त्यांचीच बायको होती. त्यामुळे अधेमधे कधीतरी राणेंच्या नशिबी नवलकोलाची भाजी येई.

सकाळी नवाचा टोला पडला. राणेंनी हक्काचा चहा उचलला आणि ते 'सकाळ'मधल्या ठळक बातम्या चाळायला लागले.

कुणा नटाची एका नव्या सिनेतारकेसोबत चाललेली भानगड सकाळचा वार्ताहर तपशीलवार कव्हर करत होता.

बाहेर फोन वाजला. बहुतेक मुजावरने घेतला असावा कारण तिसऱ्याच सेकंदाला आवाज आला – "साहेब अर्जंट फोन आहे. लाईन २."

राणेंनी बातमीतल्या नटाला कचकावून शिवी घातली आणि माऊथपीसमध्ये तोंड जवळपास कोंबून पुकारा केला, "राणे बोलतोय."

त्यांनी राणे बोलतोय अशा सुरात म्हटलं की जगात ते सोडून कुणी राणे असू शकतील असं ऐकणाऱ्याच्या मनातसुद्धा आलं नसतं.

"नमस्कार साहेब, मी मुंबई युनिव्हर्सिटीमधून प्रोफेसर कीर्तने बोलतोय."

"बरं मग?" राणेंनी प्रयत्नपूर्वक आवाजावर संयम ठेवला. पुढच्या काही सेकंदांत जर समोरच्याने काही महत्त्वाचं सांगितलं नाही तर त्याची खैर नव्हती.

"साहेब एक विचित्र केस आहे. म्याटर अर्जंट आहे. कुलगुरूंनी ताबडतोब मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने पोलिसांची मदत घ्यायला सांगितलेलं आहे. तेव्हा..."

कीर्तनेसुद्धा मुरलेले खेळाडू होते. त्यांनी दुसऱ्याच वाक्यात जमतील त्या व्हीआयपीची नावं कोंबली होती आणि मोक्याच्या ठिकाणी पॉज टाकला होता.

आपला बाण अचूक लागल्याचं कीर्तनेंना जाणवलं कारण पुढच्याच सेकंदाला पलीकडून आवाज आला –

"शीएमचा फोन होता?"

"हो साहेब."

"कुठून बोलताय?"

"साहेब मी भांडुप स्टेशनवर आहे. घड्याळाच्या खाली उभा आहे," कीर्तनेंनी पुन्हा एकदा कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त माहिती दिली.

पण राणेंमधला पोलीस आता पुन्हा जागा झाला होता.

"उभे राहा तिथेच. हलू नका," म्हणून राणेंनी फोन ठेवला आणि आपल्या रेग्युलर इन्स्पेक्टर आवाजात त्यांनी बाहेर साद घातली – "मुजावर, ट्रेस करा आणि कन्फर्म करून घ्या सीएमची ऑर्डर."

राणेंच्या डोक्यात आता शीएम ठाण मांडून बसले होते. पुढली ८ मिनिटं मोठी धामधुमीची गेली. नवव्या मिनिटाला राणेंकडे सगळी माहिती हजर होती आणि मुजावरच्या बुटांचे तळवे काही कणांनी झिजले होते.

"गाडी घ्या स्टेशनकडे," राणेंनी ऑर्डर दिली. ड्रायव्हर गोंधळला. "साहेब स्टेशनवरच आहोत."

मोठ्या मुश्किलीने आतल्या सैतानाला मनगटात कोंबत राणे एक एक शब्द उच्चारत सावकाश म्हणाले, "रेल्वे स्टेशनवर घे."

भांडुप स्टेशनवर घड्याळाच्या खाली उभं राहून कीर्तनेंना आता अर्धा तास झाला होता. येणारे जाणारे लोक वेळ नसूनसुद्धा उगाच त्यांना एक त्रासिक लुक देत होते.

भांडुप स्टेशनबाहेरच्या दत्तमंदिरासमोर चरणाऱ्या गायीला साईडला काढून ड्रायव्हरने जीप लावली.

लगोलग सगळा तांडा स्टेशनकडे निघाला. राणे घुश्श्यातच होते.

"च्यायला या सायकलीच्या…" स्टेशनबाहेर पार्क केलेल्या काही सायकलींना अकारण शिव्या घालत राणे आता प्लॅटफॉर्म नंबर एकवर पोचले.

आता जर तुम्ही मुंबईत राहात असाल तर तुम्हाला कल्पना असेल की भांडुप हे एक मध्यम दर्जाचं, छोटं स्टेशन आहे. सकाळची साडेनवाची वेळ म्हणजे अतिगजबजलेली. तर अशा इवल्याशा स्टेशनातल्या गर्दीत उभं राहून राणे घड्याळ शोधत होते.

"लगेज कम्पार्टमेन्टच्या बाजूलाच आहे साहेब," मुजावर पुढे होत म्हणाले.

वीस कदम चालल्यावर त्यांना घड्याळाच्या खाली एक चश्मिश मनुष्य रुमालाने घाम पुसताना दिसला.

किरकोळ देहयष्टी, वय साधारण ४५, गहू वर्ण, शर्ट-पँट आणि बुटांसकट ६० किलो. राणेंनी त्याला टॅग केलं. हेच ते प्रोफेसर असावेत.

राणेंना येताना पाहून तो मनुष्य धावत पुढे आला. "नमस्कार इन्स्पेक्टर राणे. प्रसंग फार गंभीर आहे. प्लीज, माझ्यासोबत चला."

एक वळसा घेऊन आता सगळे भांडुप स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकाच्या टोकाशी पोचले. हवालदार पुढे जाणार तोच कीर्तनेंनी त्यांना रोखलं.

"इथून पुढे फक्त राणेसाहेब आणि मीच जाणार आहोत, तुम्ही बाहेर उभे राहा आणि कुणालाही आत सोडू नका."

मुजावरने राण्यांकडे पाहिलं, राण्यांनी मान किंचित खाली करून परवानगी दिली आणि मुजावरच्या खांद्यावर थोपटून ते म्हणाले, "प्रोफेसर सांगतात तसं करा. जर कुणी आत यायला मागितलं तर दोन थोतरीत ठेवून द्या तिच्यायला. चला प्रोफेसर."

'पॉवर रूम' असं लिहिलेल्या एका रूमचा दरवाजा उघडून प्रोफेसर कीर्तनेंनी इन्स्पेक्टर राण्यांनाच आत घेतलं. आत अंधार होता. क्षणभर कुणालाच काही दिसलं नाही. कीर्तनेंनी पुढे होऊन लाईटचा स्विच दाबला.

समोर एका टेबलावर दोन घुबडं गॉगल लावून बसली होती.

गॉगल लावलेली घुबडं

२ : पॉवर रूम

राणे अवाक झाले. वाईल्डलाईफ प्रोटेक्शनच्या केससाठी एवढा तमाशा? राणेंचा पारा पुन्हा चढला.

"प्रोफेसर, हे illegal pet प्रकारासाठी एवढं नाटक कशाला? तुम्हाला -", राणेंना तोडून मधेच स्वच्छ मराठीत आवाज आला,

"तुमच्यात काही नमस्कार वगैरे म्हणत नाहीत वाटतं, इन्स्पेक्टर राणे?".

आवाज ज्या दिशेने आला तिथे राणेंनी रोखून पाहिलं. त्यांची नजर खोलीत समोरच्या अर्धवट प्रकाशात आवाजाचा उगम शोधत होती. पण तिथे त्यांना उघडी कपाटं, शेल्फ आणि अडगळ सोडून काहीच दिसलं नाही. त्यांनी सराईत नजरेने तिथली जुनीपानी उपकरणं, वायरी, फुटलेले दिवे आणि बॅटरीज, शेवचिवड्याचे डाग लागलेले कागद – असला सगळा कचरा न्याहाळला आणि पुन्हा ते आवाजाचा उगम शोधू लागले.

पण त्या खोलीत प्रोफेसर आणि राणे स्वतः सोडून कुणीच नव्हतं.

"कोण लपलंय इथे भेन्चोद? शहाणा असलास तर पुढे ये, नायतर एकदा मी आलो की फोडून काढीन बेल्टने," राणेंनी आपल्या पेटंट आवाजात पुकारा केला.

पुढले काही सेकंद शांतता होती. प्रोफेसरांनी विचारपूर्वक घसा खाकरला आणि ते पुढे येऊन राणेंना हळू आवाजात म्हणाले – "साहेब, ही घुबडं -"

"थांबा हो प्रोफेसर, घुबडांचं नंतर. आधी ह्या भडव्याला बघून घेतो," राणेंनी प्रोफेसरांना उडवून लावलं.

राणे आणखी काही दमदाटी करणार इतक्यात पुन्हा आवाज आला,

"राणे, बसा. आम्ही इथे आहोत टेबलावर."

"कुठे? काय?" राणे समोर बघत होते. टेबलावर तीच दोन घुबडं गॉगल लावून शांतपणे बसली होती.

आता मात्र प्रोफेसरांना हे असह्य झालं आणि ते राणेंच्या कानात कुजबुजले – "राणेसाहेब, ही घुबडं बोलतायेत, हा साधा प्रकार नाही. ऐकून घ्या."

राणेंचा चेहेरा वेडावाकडा झाला. त्यांच्या मेंदूला ही माहिती कशी प्रोसेस करायची हे नीट कळलं नाही.

एक घुबड तेवढ्यात खाकरलं आणि म्हणालं, "बसून घ्या. मग सविस्तर सांगतो."

राणे अजूनही सावरले नव्हते. ते मागे वळून फक्त इतकंच म्हणू शकले, "काय? काय चाललंय…"

कीर्तनेंनी दोन खुर्च्या पुढे ओढल्या. एकीत ते स्वतः बसले आणि त्यांनी राणेकडे बघून दुसऱ्या खुर्चीत बसायची खूण केली. इन्स्पेक्टर राणे झोपेत असल्यासारखे गपकन खुर्चीत कोसळले.

दोहोंमधल्या छोट्या घुबडाने पंख फडफडवले आणि आळस दिल्यासारखं केलं. दुसरं मोठं घुबड त्याच्याकडे बघून बहुतेक रागावलं असावं कारण छोट्या घुबडाने पंख मिटून घेतले आणि ते मान पूर्ण ३६० अंशात फिरवून पुन्हा समोर पाहायला लागलं.

"राणेसाहेब, तुम्हाला दिलेल्या तसदीबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. पण प्रसंग गंभीर आहे आणि आम्हांला तुमची गरज आहे. तेव्हा मी काय म्हणतो ते प्लीज ऐकून घ्या," मोठ्या घुबडाने प्रस्तावना केली.

"आमचं मूळ स्वरूप तुम्हाला दिसू शकत नाही. आणि त्याची कल्पनाही तुम्हाला करणं कठीण आहे. कारण तुमच्या तीन मितींच्या जगात आमचं स्वरूप तुमच्यापुढे आणता येत नाही. तेव्हा तुम्हाला परिचित असेल अशा रूपांत आम्ही इथे प्रकट झालो आहोत."

"तुम्ही... तुम्ही एलियन आहात का?" राणेंनी प्रश्न केला. आता ते जरा सावरले होते.

"नाही. आम्ही कोण आहोत आणि कुठून आलो हेही तुम्हाला सांगणं कठीण आहे. पण थोडक्यात सांगायचं तर आम्ही भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ अशा तिन्ही काळांत अस्तित्वात होतो, आहोत आणि असू."

"काय येडझवेपणा चाललाय ? हे काय डिस्कव्हरी चॅनेल आहे काय? नीट सांगा." राणे आता पुष्कळच नॉर्मल झाले होते.

"राणेसाहेब ते intergalactic beings आहेत, ते लक्षावधी वर्षं जगू शकतात. ते महत्त्वाचं नाही. पुढे ऐका जरा," कीर्तने घाईघाईत म्हणाले.

"प्रोफेसर कीर्तने, इट इज ओके. आपल्याकडे अजून ३ तास आहेत. शिवाय राण्यांना सगळे डिटेल्स देणं गरजेचं आहे," मोठ्या घुबडाने कीर्तनेंकडे मान वाळवून पाहत सूचना केली.

"आम्ही तुमच्याशी संपर्क करायला म्हणून ह्या रूपात आलो आहोत. आम्ही पृथ्वीचे निरीक्षक आहोत. गेल्या काही लाख वर्षांपासून आम्ही तुमच्या पृथ्वीचं निरीक्षण करत आलोय. डायनोसॉर नष्ट झाले तेव्हा आम्ही आमची पहिली नोंद केली होती – हा तेव्हा नवाच आला होता," छोट्या घुबडाकडे निर्देश करत मोठं घुबड म्हणालं.

"तेव्हापासून पृथ्वीवरच्या महत्त्वाच्या घटनांची नोंद आम्ही करतोय. आजवर जवळपास २० घटनांची नोंद आम्ही केली आहे. अर्थात सुरुवातीला बरीच वर्षं काहीच घडत नव्हतं, पण जशी माणसं उत्क्रांत होत गेली तशा नोंदी वाढायला लागल्या. कारण तुम्ही माणसांनी गेल्या काही शतकांत खूपच प्रगती केलीत. गणित, खगोलशास्त्र, तंत्रज्ञान आणि भाषा – अशा चौफेर अंगाने तुम्ही पुढे जायला लागलात. आमच्या शेवटल्या ८ नोंदी गेल्या ३ शतकातल्या आहेत. म्हणजे बघा. त्यांतली शेवटली महत्त्वाची घटना म्हणजे शीतयुद्ध. त्या वेळी आम्ही क्युबाला प्रकटलो होतो. शीतयुद्ध टाळणं ही आमच्या आयुष्यातली अलीकडली सर्वात महत्त्वाची घटना आहे. क्युबानंतर आम्ही आज पहिल्यांदाच प्रकट झालो आहोत."

हे ऐकून छोटं घुबड अस्खलित स्पॅनिशमध्ये "कोपाकबाना…" म्हणालं आणि मान पुन्हा २७० अंशात वळवून ते आता वेगळ्याच भिंतीकडे बघायला लागलं.

"त्यानंतर कित्येक घटना घडल्या पण कुठलीही घटना पूर्ण पृथ्वीवर प्रभाव पाडू शकेल इतकी मोठी नव्हती. अगदी ९/११देखील. पण आता परिस्थिती वेगळी आहे."

"का? आता काय झालंय? आयसिस? टेररिष्ट? च्यायला हा भोसडीचा पाकिस्तान म्हणजे..." शेजारी राष्ट्राला शिवी घातल्याने उत्साहित झालेल्या राणेंनी पृच्छा केली.

"झालं नाहीये, होणार आहे," प्रोफेसर कीर्तने म्हणले.

"म्हणजे? हे लोक काय भविष्य सांगतात की काय? नॉष्ट्रेदेमसच एकदम हां?" राणे कुत्सितपणे घुबडांकडे बघत म्हणाले.

त्यावर छोटं घुबड खिक् करून हसलं आणि खुर्चीवर गोल फिरलं. "चाहा क्या- क्या मिला! बेवफा- तेरे प्यार में!" छोट्या घुबडाच्या तोंडून हे आकस्मिक गाणं ऐकून राणे दचकले. पण मोठ्या घुबडाला हा थिल्लरपणा मान्य नसावा.

"इतकं हसण्यासारखं काही झालं नाहीये," मोठ्या घुबडाने त्याला तंबी दिली. "राणे, आम्हांला भूत-भविष्य असा फरक करता येत नाही कारण आम्हाला सगळंच दिसतं. तुम्ही ज्याला भविष्य म्हणता ती फक्त अगणित शक्यतांमधली एक शक्यता असते. आणि अशा अनंत शक्यता असू शकतात तेव्हा भविष्यही अनंत असतात. असो, आपण ह्यावर नंतर बोलूच कारण शक्याशक्यता आणि भविष्य हाच आपल्या प्रश्नाचा विषय आहे. पण ते नंतर.

मी मगाशी म्हटलं तशी फार महत्त्वाची घटना पुढल्या वर्षी म्हणजे २०२० साली होणार आहे. आणि आम्हांला त्याची चाहूल आताच म्हणजे २०१९ सालीच लागली आहे. आणि त्यासाठीच आम्हांला तुमची मदत लागणार आहे".

"काय होणार आहे नेमकं? आणि माझी मदत? माझी कसली मदत?" राणे आता जरा काळजीत पडले होते.

"थांबा. राणेंना हे सांगता येणार नाही, त्यांना अजून सिस्टीम क्लिअरन्स मिळालेला नाहीये", प्रोफेसर कीर्तनेंनी घुबडाला थांबवलं पण राणे उसळले. "प्रोफेसर, माझीच मदत मागता आणि मलाच सगळं सांगता येणार नाही म्हणता? काय तो क्लिअरन्स गेला गाढवाच्या..."

पुन्हा मोठ्या घुबडाने कीर्तनेंकडे रोखून पाहिलं आणि जणू तो इशारा मिळाल्यासारखे कीर्तने चूप झाले.

"राणेसाहेब, नक्की काय होणार आहे ते आम्हांला पूर्ण माहिती नाही, पण आमच्या अंदाजाप्रमाणे २०२० साली पृथ्वीवर काहीतरी मोठी घटना घडणार आहे. ह्या घटनेचे दूरगामी परिणाम होतील. ह्या घटनेची शक्यता आजच्या घडीला ७०.९४५३४% आहे."

"समजा हे खरं मानू की तुम्हाला २०२० साली काय होणारे ते माहितीये. पण तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी मुंबई पोलीसचा माणूस आहे, डॉक्टर किंवा प्रोफेसर नाही. ह्या कीर्तनेंची मदत हवीये का तुम्हाला?" राणेंनी घुबडाला विचारलं. आता त्यांना ह्या सगळ्या प्रकाराचं जरा टेन्शन येऊ लागलं होतं.

"नाही राणेसाहेब, आम्हाला तुमची आणि फक्त तुमचीच मदत लागणार आहे. पण त्यासाठी मला तुम्हाला 'बटरफ्लाय इफेक्ट' काय आहे ते समजावून सांगावं लागेल. प्लीज ऐकून घ्या.

एका घटनेचा दुसऱ्या घटनेवर परिणाम होतो आणि त्याचा तिसऱ्या घटनेवर परिणाम होतो. अशी साखळी तयार होऊन मग पहिल्या घटनेचा परिणाम शंभराव्या घटनेवर होऊ शकतो. मी एक उदाहरण देतो.

समजा तुम्ही एका मित्राला भेटायला गेलात. तिथे मित्राने तुम्हाला दोन पर्याय दिले – घरीच बसून गप्पा मारायच्या किंवा नव्या सिनेमाला जायचं.

आता समजा तुम्ही सिनेमाला गेलात आणि तिथे तुम्हाला वाटेवर एक लॉटरी स्टॉल दिसला. मित्राने तुम्हाला लॉटरीचं तिकीट घ्यायचा आग्रह केला. तुम्ही गंमत म्हणून तिकीट घेतलं आणि मित्रासोबत लॉटरीचं बक्षीस वाटून घ्यायचं ठरवलंत. ४ दिवसांनी लॉटरीच्या सोडतीत तुम्हाला दहा लाख रुपयांचं बक्षीस मिळालं.

पण ह्या निमित्ताने तुमच्यात आणि तुमच्या मित्रात वितुष्ट आलं आणि कालांतराने तुम्ही एकमेकांचं तोंडही पाहिलं नाही.

पण समजा तुम्ही घरीच बसून गप्पा मारायचा निर्णय घेतला. तुम्ही आणि मित्राने एक व्यवसाय सुरू करण्याबद्दल बोलणी केली असती. काही काळाने त्याचं पर्यवसान एका दुकानात आणि मग एका मोठ्या कंपनीत झालं असतं. तुम्ही आणि तुमचा मित्र कालांतराने कोट्यधीश झाला असता.

वरवर बघता ह्या दोन्ही शक्यता खूपच वेगळ्या आहेत. पण त्यांच्या मुळाशी आहे एक निर्णय – मित्रांसोबत गप्पा मारायच्या की सिनेमाला जायचं ?

ह्या एका निर्णयाच्या टोकाला आहेत दोन संपूर्ण विरोधी निकाल. तुम्हाला समजावं म्हणून मी मुद्दाम ह्या नाट्यमय घटना निवडल्या आहेत. पण आयुष्यात दर क्षणी घेतलेल्या निर्णयांमुळे शक्यता बदलतात.

एका माणसाच्या निर्णयाने इतका बदल होतो, तर अब्जावधी माणसांच्या निर्णयांनी किती शक्याशक्यता तयार होत असतील? ह्या चक्राला 'बटरफ्लाय इफेक्ट' असं म्हणतात – म्हणजे एखाद्या फुलपाखराच्या पंख फडफडवण्याने लांबवर कुठेतरी चक्रीवादळ येऊ शकतं!

काय, मी म्हणतोय ते समजतंय का?" मोठ्या घुबडाने राणेंना प्रश्न केला. आणि ते राणेंकडे उत्तरादाखल पाहू लागलं.

"हो, म्हणजे समजा मी उद्या जोरात पादलो तर कदाचित बांगलादेशात वादळ येईल, असंच ना?"

"च्या मायला, लय भारी!" छोट्या घुबडाने राणेंना उद्देशून हे म्हटलं की नाही ते कळणं कठीण होतं.

मोठ्या घुबडाने मान शिस्तबद्ध हलवली. "बरोबर. तेव्हा हा झाला 'बटरफ्लाय इफेक्ट'.

तर २०२० साली जे काही संकट जगावर येणार आहे त्याला असेच 'बटरफ्लाय इफेक्ट' कारणीभूत असतील. वरवर अतिशय असंबद्ध आणि क्षुल्लक दिसणाऱ्या घटना जर आपण टाळू शकलो तर कदाचित आपण २०२० सालची घटना बदलू शकतो. आम्ही आता ह्या घटनेला कारणीभूत ठरू शकणाऱ्या 'बटरफ्लाय इफेक्ट'च्या साखळ्या तोडायचा प्रयत्न करतो आहोत. त्यातली एक साखळी तुमच्याशी निगडित आहे.अशाच एका 'बटरफ्लाय इफेक्ट'च्या साखळीतला तुम्ही महत्त्वाचा दुवा आहात त्यामुळे आम्हांला तुमच्याशी हे सगळं बोलावं लागतंय," मोठ्या घुबडाने समजावलं.

१० मिनिटं उलटून गेली होती. राणेंना आता डोक्यात पुन्हा घण घातल्यासारखा आवाज येत होता. एकतर ही सगळी भयानक मस्करी होती किंवा स्वप्न तरी.

राणेंनी कीर्तनेंकडे वळून पाहिलं- पण त्यांच्या चेहेऱ्यावर काळजीव्यतिरिक्त आणखी काहीही नव्हतं. समोरची घुबडं जे सांगत होती त्यावर त्यांच्या पोलिसी मेंदूला काही तर्कही करता येत नव्हता. राणेंनी विचार केला, पण त्यांना नक्की काय चाललंय ह्याचं खास स्पष्टीकरण देता आलं नाही.

"तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास नाही हे साहजिक आहे. आम्ही जे सांगतोय त्यावर विश्वास ठेवा, असं सांगून तुम्ही थोडीच मानणार! तेव्हा मी तुम्हाला एक पुरावा देतो- चालेल?" घुबडाच्या बोलण्यातला पुरावा हा शब्द ऐकून राणे चमकले आणि त्यांनी घुबडाला प्रतिपश्न केला- "कसला पुरावा देताय?"

"तुमच्या खाजगी आयुष्यातल्या काही गोष्टी मी सांगू शकतो, ज्या फक्त तुम्हालाच माहिती आहेत."

"उदा. तुमच्या मुलाच्या -" छोट्या घुबडाने एक डोळा बारीक करत मुद्दामच पॉज घेतला.

"आई झवाड्या - एक शब्द नाय अजून. फ्यामिलीचा संबंध नाही. माझ्याबद्दल बोल भेन्चोद," इन्स्पेक्टर राणेंची सटकली.

"राहिलं! ये चांद सा रोशन चेहरा…" छोटं घुबड पुन्हा भलतीकडेच बघायला लागलं.

"राणेसाहेब, मी तुम्हाला तुमच्या पूर्वयुष्यातल्या काही गोष्टी दाखवतो. फक्त डोळे मिटा," मोठ्या घुबडाने राणेंना जरा शांत केलं.

राणेंनी ह्यावर डोळे बारीक केले आणि ते मनाशी काही विचार करून बुलडॉगसारख्या चेहेऱ्याने म्हणाले -"बरं, मिटतो डोळे. पण फालतू वेळ काढलात तर झाटं सोलीन दोघांची."

"चालेल. डोळे मिटा आणि काय मनात येतं ते सांगा," असं म्हणून मोठ्या घुबडाने छोट्या घुबडाला खूण केली.

"गवाह है, चांद तारे गवाह है!" असं म्हणत छोट्या घुबडाने पंख हलवले आणि शीळ घातली.

राणेंनी डोळे मिटले. पुढल्याच क्षणी – कॉमिक बुक्समध्ये दाखवल्याप्रमाणे राणेंना आता एक चित्र आणि बाजूला मनातल्या विचारांचा मजकूर (दिसत?) होता.

इन्स्पेक्टर राणे वय वर्षं १०. गल्लीच्या तोंडाशी उभं राहून आईची वाट बघताना त्यांना रडू कोसळलं होतं.
इन्स्पेक्टर राणे वय वर्षं १४. वर्गात पोरींची छेड काढली म्हणून मास्तरांनी त्यांना बदडून काढलं होतं, त्याचे वळ नंतर भलभलत्या जागीही राहिले होते.
इन्स्पेक्टर राणे वय वर्षं १८. वडलांचा डोळा चुकवून त्यांनी संडासात पहिली सिगारेट ओढली होती. आणि त्यांच्या छातीला भोक पडेल एवढा खोकला आला होता.
इन्स्पेक्टर राणे वय वर्षं २४. पोलिसात भरती झाल्यावर त्यांनी गल्लीवरच्या पानवाल्याला कोपच्यात घेऊन उगाच हग्या दम दिला होता.
वय वर्षं ३०. बायकोबरोबर हनिमूनला गेल्यावरही रात्री त्यांना…

"थांबा थांबा…", खाडकन डोळे उघडून राणे ओरडले. "हे सगळं तुम्ही – कसं केलंत?"

"फार कष्टाने आम्ही ही माहिती गोळा केली आहे, त्याला फार मेहनत करावी लागली होती," छोट्या घुबडाकडे पंख उचलून दाखवत मोठं घुबड राणेंना म्हणालं.

"अच्छा? मग भूत-भविष्य डिस्कव्हरी चॅनेल, मग आता माझ्या आयुष्यात पुढे काय होणारे ते पण सांगा," राणे मोठ्या घुबडाला चॅलेंज द्यावं तसं म्हणाले.

"तुझं एकट्याचंच भविष्य सांगायला तू स्वतःला हिटलर समजतोस काय रे राण्या?" इतका वेळ शांत बसलेल्या छोट्या घुबडाने अचानक राणेंना प्रश्न केला.

एका पक्षीरूपी एलियनकडून का होईना, एवढा अपमान झाल्यावर राणेंच्या डोक्यात फटाके वाजले.

"मादरचोद... तुला पिंजऱ्यातच घालतो आता," राणे आवेशात म्हणाले आणि त्यांनी हात वर नेला.

मोठ्या घुबडाने छोट्या घुबडाला पंखाने फटकारलं आणि ते अगम्य भाषेत काहीतरी म्हणालं. पण त्याचा साधारण सूर "किती वेळा सांगितलंय चुत्यागिरी करू नकोस" असा होता.

छोटं घुबड मान १८० अंशात वळवून आता मागे भिंतीकडे बघू लागलं.

"माफ करा, तो जरा भडक डोक्याचा आहे आणि त्याला भूक सोसवत नाही. मी त्याच्या वतीने माफी मागतो, सॉरी."

राणेंनी गरम कानशिलाने हे ऐकून घेतलं आणि हात खाली केला.

"आम्ही तुमचं काय कोणाचंच भविष्य सांगू शकत नाही. पण मोठ्या प्रमाणावर शक्याशक्यतेचं भाकीत करू शकतो. हिटलर ही एक विलक्षण व्यक्ती होती, तिच्या वैयक्तिक आयुष्याची आणि जगाच्या भवितव्याची सांगड घातली गेली होती. ते असू दे. तुम्हाला पुरावा मिळाला असेल तर पुढे बोलू या?"

राणेंची मूकसंमती समजून मोठ्या घुबडाने पुढे बोलायला सुरुवात केली.

"तेव्हा आम्हाला ह्या २०२० मधल्या संकटाचा सामना करायला तुमची मदत लागणार आहे. तुम्ही तयार आहात का?"

राणेंना कल्पना होती की "नाही म्हणणं" हा ऑप्शन नव्हता. आणि इथे तर वरून पार सीएमपर्यंतचा मामला. त्यांना क्षणभरातच सीएमचा संताप आठवला.

त्यांनी मान डोलावली. मोठ्या घुबडाने निश्वास सोडल्यासारखे काही आवाज काढले आणि टेबलावर हालचाल केली. त्याच्या एकंदरीत वागण्यावरून वाटत होतं की त्याचं बरंच टेन्शन कमी झालं होतं.

३ : प्लॅन

"राणेसाहेब, तुम्हाला काय करावं लागणार आहे, ते मी सांगतोच, पण त्या आधी आणखी काही माहिती ऐकून घ्या.

आपण जो 'बटरफ्लाय इफेक्ट' बदलायचा प्रयत्न करणार आहोत, त्याची टाइम विंडो आहे १२ ते २ – म्हणजे फक्त दोन तास. ह्या दोन तासांत आम्ही ४२ वेगवेगळ्या लोकांना काही विशिष्ट सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे ते वागतील. जर सर्वांनी ह्या सूचना पाळल्या, तर आमच्या अंदाजाप्रमाणे २०२० साली पृथ्वीवर संकट यायची शक्यता ३०% पेक्षाही खाली जाईल. तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्यात तुमचा पार्ट चोख बजावायचा आहे."

"हे म्हणजे नाटकासारखंच झालं! आयला, तुम्ही नाटकात काम करायला लावणार म्हणजे मला. हा?" राणेंना गंमत वाटली.

"बरोबर! नाटक करायचंय असंच समजा. आणि तुमची त्यात साईड हिरोची भूमिका आहे. तेव्हा काम मनापासून करायचं आहे."

"पण करायचं काय नक्की? की कापडं चढवून भाषण द्यायला सांगताय?"

"तसं काहीच नाही. तुम्ही नेहमीसारखंच वागायचं आहे, पण फक्त एकच गोष्ट टाळायची - शिव्या."

"काय?" राणे थोडेसे चक्रावले होते.

"तुम्ही १२ ते २ ह्या वेळात अजिबात शिव्या द्यायच्या नाहीत. बस. एवढंच," मोठ्या घुबडाने राणेंकडे पाहत गंभीर सुरात उत्तर दिलं. कधी नव्हे ते छोट्या घुबडानेही आता राणेंकडे पाहिलं.

"शिव्या द्यायच्या नाहीत? भोसडीच्यांनो, मी काय दिवसभर शिव्या देतो काय? एखादी येते अधूनमधून कधीतरी," राणेंचा कानावर विश्वास बसला नाही. शिव्या? आणि पृथ्वीवरचं संकट? काय संबंध? पण मग त्यांना बांगलादेशातलं वादळ-पाद दृष्टांत आठवला आणि ते जरा शांत झाले.

"मी काय म्हणतो, जर का तुम्हाला माझ्या तोंडून शिव्या नको असतील, तर मला झोपेचं औषध द्या ना – किंवा तोंडावर पट्टी बांधून ठेवा. किंवा मग मला एखादा सिनेमा नाटक बघायला सोडा- मग मी कशा शिव्या देईन?"

"राणे, आइन्स्टाइनच तुम्ही. आम्हाला का सुचलं नाही हो हे?" छोट्या घुबडाने त्रस्त सुरात राणेंना सवाल केला.

राणेंच्या चेहेऱ्याचा रंग आता तांबूस झाला होता. "भोसडीच्या, तुझ्या तर आता मी गांडीतच सळई खुपसणार आहे. थांब तुझ्या आयला..." राणेंनी एका झेपेत छोट्या घुबडाला पंजाने फाटकारायचा प्रत्यत्न केला. घुबडापासून ३ इंचावर राणेंचा हात कशावर तरी आपटला आणि ते विव्हळून खाली बसले.

"तेरे मेरे बीच मे- कैसा है ये बंधन-" छोट्या घुबडाने असह्य तान घेतली.

"उत्तम प्रश्न विचारलात," हे एवढं सगळं पूर्ण दुर्लक्षित करून मोठ्या घुबडाने उत्तर दिलं.

मोठ्या घुबडाला हा प्रश्न अपेक्षित असावा.

"राणेसाहेब, जर घटना नेहेमीपेक्षा खूपच वेगळ्या असतील, तर त्याचं पर्यवसान आणखीच निराळ्या शक्यतांमध्ये होतं. आता वरच्या उदाहरणात म्हटल्याप्रमाणे जर तुम्हाला झोपेचं औषध दिलं तर कदाचित त्यामुळे इतर ४१ शक्यतांवर एवढा वेगळा परिणाम होईल, की आम्ही निवडलेली वेळ, आणि माणसं ह्यांच्या वागण्याचा काहीच परिणाम होणार नाही. तेव्हा आपल्याला नेहेमीच्याच प्रोबॅबिलिटीच्या चौकटीत राहून हे करायचं आहे."

"पण मग माणसासारखं येऊन सांगायचं ना. हे काय फोदरीचं नाटक आहे?" राणेंना आणखी काही बोलता येईना तेव्हा ते उगाच डाफरले.

"कुठल्याही माणसाने तुम्हाला हे सगळं सांगितलं तर तुम्ही त्याला लॉकअपमध्ये टाकून फटके दिले नसते? म्हणून मग आम्हाला हे सगळं करावं लागलं," मोठ्या घुबडाने स्वतःच्या पंखांकडे बघून म्हटलं.

"पण मग दोनच तास का? "

"१२ ते २ ह्या वेळेतच जास्तीत जास्त यशाची शक्यता आहे. असं बघा, एखादा गुन्हेगार दरोडा घालणार आहे ह्याची टिप असेल तर तुम्ही योग्य वेळेची वाट बघूनच ऍक्शन घेता ना? तसंच समजा."

"आणि मीच का? बाहेर उभ्या असलेल्या हवालदाराला किंवा ह्या कीर्तनेंना सांगा- ते कधीच शिव्या देत नसतील. काय हो प्रोफेसर?" राणेंनी कीर्तनेंना विचारलं. कीर्तनेंनी खांदे उडवले आणि घुबडाकडे पाहिलं.

"राणेसाहेब, दरोडेखोरांना पकडणाऱ्या टीममध्ये कीर्तने किंवा हवालदार नाहीयेत. तुम्हीच आहात- तेव्हा तुमच्याशिवाय दुसरं कुणी नाही करू शकत."

हे एवढं ऐकल्यावर, आपल्याला हे करावंच लागणार आहे – हे राणेंच्या डोक्यात फिक्स झालं. मग ते टेन्शनमध्ये आले. दिवसाला आपण किती वेळा आणि कधी शिव्या देतो हे त्यांना तरी कुठे ठाऊक होतं? ते ह्याचा जेवढा जास्त विचार करायला लागले तेव्हढं त्यांना आणखीच टेन्शन आलं.

"राणे, टेन्शन घेऊ नका," आता कीर्तनेंची पाळी होती. त्यांनी राणेंचा ताबा घेतला. "आम्ही तुम्हाला काही स्टेप्स सांगणार आहोत, त्या पाळल्या तर सगळं सोप्पं जाईल."

"आमच्या संशोधनानुसार, तुम्ही जर सतत काही चघळत राहिलात तर तुमच्या तोंडून शिव्या यायची शक्यता कमी आहे. काहीतरी चघळत राहा- चिंगम, सुपारी किंवा पण वगैरे. अर्थात तुमच्या आवडत्या ब्रॅन्डचं. जे काही पण आवडतं ते नेहेमीच्या पानवाल्याकडून मागवून घ्या. तेही संपलं तर मग पाणी प्या. नेहेमीपेक्षा जास्त."

राणे ऐकत होते. पण त्यांच्या मेंदूत एक धागा कुठेतरी ह्या सगळ्यातली चूक शोधत होता.

"बारा ते दोन ही जेवायची वेळ आहे, तेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये कामाच्या फायली वगैरे चाळू नका. दुसऱ्याला कुणाला तरी द्या. पण तुम्ही पोलीस स्टेशनमध्येच असणं आवश्यक आहे. तेवढा एरिया सोडून कुठे जाऊ नका."

"मनातल्या मनात शिव्या द्याव्याश्या वाटतील- पण तो धोका आहे. प्लीज मनातही शिव्या देऊ नका."

कीर्तने आणखी बरंच काही बोलले. राणेंना थोडा कॉन्फिडन्स आला(?)

त्यांनी घड्याळाकडे पाहिलं तर ११ वाजले होते. जीप घेऊन परत पोचायला २० मिनिटं तरी लागतील, मग थोडा वेळ उरतो.

"ऑल द बेस्ट राणेसाहेब. वी आर काउंटिंग ऑन यू," मोठ्या घुबडाने त्यांना निरोप दिला.

पुढल्याच क्षणी दोन्ही घुबडं दिसेनाशी झाली.

राणे बघतच राहिले.

"चला राणेसाहेब, निघू या?" कीर्तनेंच्या प्रश्नावर पोटावरचा बेल्ट ऍडजेस्ट करत राणेंनी रूम एकदा बघून घेतली आणि ते बाहेर आले.

४ : नाटक

घड्याळात ११:५५ झाले तेव्हा राणेंच्या पोटात पाकपुक होत होतं. कॉलेजमध्ये असताना एकदा त्यांना भाषण द्यायची वेळ आली होती, तेव्हा त्यांना असंच वाटलं होतं. त्यांनी अस्वस्थपणे समोरचा पाण्याचा ग्लास उचलला आणि गटागटा रिकामा केला.

आता ५ मिनिटांनी नाटक सुरू. आजूबाजूला सगळं नेहेमीसारखंच दिसत होतं. समोर एखादी डोक्यात जाणारी फाईल नको म्हणून त्यांनी डेस्क रिकामा केला होता. बाहेरचा कुणी लुंगासुंगा माणूस येऊ नये म्हणून मुजावरनेही बाहेर सक्त ताकीद दिली होती - राणेसाहेबांना तशाच महत्त्वाच्या कारणाशिवाय डिस्टर्ब् करायचं नाही.

भिंतीवरच्या बापूंच्या तसबिरीला राणेंनी एक विनंतीवजा नमस्कार केला - बापू, आज वाचवा. तुमच्यातली १% तरी अहिंसा वगैरे आम्हाला द्या.

राणेंनी ऍक्शन प्लॅन ठरवला होता. कीर्तनेच्या सल्ल्यानुसार त्यांनी पान मसाला मागवून ठेवला होता. बाजूला कोल्ड्रिंकच्या ४ बाटल्याही मागवल्या होत्या.

राणेंचं टेबल सेट होतं.

घड्याळात आता ११:५८ झाले होते. राणेंनी एक दीर्घ श्वास घेतला, त्यांचं पोट आत गेलं आणि बेल्ट घसरला.

पुन्हा उच्छवास सोडेपर्यंत राणेंनी मन तयार केलं.

नाटकाचा पडदा आता वर जाणार. पुढे ऑडियन्स तर कुणीच नव्हता, पण राणेंना पक्कं ठाऊक होतं की ते घुबडरूपी एलिअन्स राणेंवर नजर ठेवून होते. अख्ख्या पृथ्वीसाठी राणेंचा हा परफॉर्मन्स महत्त्वाचा होता - मग भले ते कुणाला ठाऊक का असेना.

११.५९ = मॅचचा पहिला बॉल. राणे पिचवर बॅट वगैरे आपटून अंदाज घेऊन उभे होते. त्यांच्या हाताला ग्रिप जाणवत होती. समोर फास्ट बॉलर. इन स्विंग की आउट स्विंग? की गुड लेन्थ? बाउन्सर टाकला तर?

राणेंच्या मनात काहीबाही चित्रं दिसत होती.

आणि समजा बॉल दिसलाच नाही तर? कडा लागून मागे कॅच? किंवा गुडघ्यावर बॉल आपटला तर? सरळसोट एल.बी.डब्ल्यू?

राणेंच्या युनिफॉर्ममधे घामाचा एक ओघळ मानेवरून खाली सरकला.

घड्याळाचा सेकंद काटा आता वेगाने बाराकडे धावत होता.

राणेंनी डोळे मिटून घेतले.

पुढल्याच क्षणी जेव्हा आपण डोळे उघडू तेव्हा नाटक सुरू झालं असेल. राणेंना आता घुबडांची नजर स्वतःवर जाणवली - जणू कुणी लेझर मारलं होतं.

त्यांनी डोळे उघडले. समोर काहीच बदललं नव्हतं. त्यांचा डेस्क, समोरचा दरवाजा, त्यांची बॅग सगळं तसंच होतं. राणेंना हायसं वाटलं. सकाळचा प्रसंग त्यांना स्वप्नवत वाटायला लागला. मनात जरा ठेहराव आला.

पोटातली भूक त्यांना पहिल्यांदाच जाणवली- आणि आजचा नाश्तासुद्धा नीट झाला नव्हता.

राणेंच्या पोटातले कावळे आता चांगलेच कोकलायला लागले होते!

प्लॅनप्रमाणे त्यांनी समोरच्या बॅगमधला डबा बाहेर काढला आणि उघडून पहिला. समोर आलेल्या फुलटॉसवर आपसूक बॅट फिरावी तसे राणेंच्या तोंडून शब्द उमटले-

"आई झवली – आजच नेमकी नवलकोलाची भाजी दिलीस!"

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

काय वाह्यात इसम आहे हा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मस्त गोष्ट एकदम !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झकास...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुन्हा वाचावी लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारी हो अस्वलराव,
आधी एकच देवदत्त होता, आता त्याला अस्वल मिळाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अस्वलाला डब्यात नवलकोलाची भाजी अचानक सापडली असणार!

अरे हो, ते छोटं घुबड फार आवडलंय. ते सांगायचं राहिलंच, भें....!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नवलकोल मस्त लागतो की अस्वलभाऊ. काय तुमचे राणे, अगदीचे 'हे'. ते धाकलं घुबड बाकी धांदरट आणि अच्रट... फार आवडलं. छान जमलीये कथा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अप्रतिम!
चेकॉव्हची बंदूक ती साक्षात् हीच Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेच त्या नारायणाला उठा बद्दल काही बोलू नकोस असे सांगूनही झाले असते!
बाकी गोष्टीबद्दल म्हणाल तर, या नवनवलनयनोत्सवा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0