नैतिकतेसाठी परमेश्वर हवा(च) का? – एक सर्वेक्षण

माणूस हा एक विचित्र प्राणी आहे. या प्राण्याला नाविन्याची फार हौस आहे. त्याच्यात सर्जनशीलतेची क्षमता आहे. गुंतागुंतीच्या समस्यांना योग्य उत्तरं शोधण्याची हतोटी आहे. त्यानी केलेल्या तंत्रज्ञानातील अफाट प्रगतीमुळे मानवी जीवन सुसह्य होत चालले आहे. स्वत:च्या आरोग्य स्थितीवर संशोधन करत तो आता जास्तीत जास्त वर्षे जगण्याचा प्रयत्न करत आहे. दुर्धर समजलेल्या रोगांवर औषधोपचार शोधल्यामुळे निरोगी आयुष्य जगणे त्याला आता शक्य होत आहे. परंतु एवढे करूनसुद्धा अजूनही तो अविचारांना, चुकीच्या विचारांना बळी पडतोच आहे. याचा एक अत्युत्तम पुरावा म्हणून अजूनही जनसामान्यांच्या मनात असलेली परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल असलेली श्रद्धा याचा उल्लेख करता येईल. एकदा आपण परमेश्वराच्या अस्तित्वाला मान्यता दिल्यास त्या अनुषंगाने येणारे धर्म, धार्मिक व्यवहार, कर्मकांड, पूजा-प्रार्थना, सण-उत्सव, जन्मापासून मृत्युपर्यंतचे विविध प्रकारच्या विधी, गंडे, दोरे, तावीज, पाप-पुण्य, पवित्र-अपवित्र या संकल्पना, भव्य-दिव्य पूजास्थानांची उभारणी, धर्मस्थळांची सहल, दैव-नशीब, इत्यादी आपसुकच येणार याची खात्री असावी. या गोष्टी-कमी अधिक प्रमाणात जगभर सापडतील. परंतु त्यांचे समूळ उच्चाटन झाले नाही. तंत्रज्ञानाची घोडदौडही त्यांना रोखू शकली नाही.
photo 1

परमेश्वर ही संकल्पना अजूनही टिकून आहे यामागे कदाचित परमेश्वरप्रणीत धर्मामुळे नैतिक मूल्ये रुजविले जातील ही मानसिकता अजूनही मूळ धरून आहे. आधुनिक काळात सत्ता व धर्म यांची फारकत केल्यास कल्याणकारी राज्यव्यवस्था चालविणे शक्य होईल असे वाटल्यामुळे जगभरातील अनेक लोकशाही राष्ट्रांनी धर्मनिरपेक्षतेला अग्रक्रम दिल्याने चांगले परिणामही दिसू लागले. पुरोगामी विचारवंतानी तार्किकरित्या धार्मिक मूल्ये व नैतिक मूल्ये यांचा अर्थाअर्थी एकमेकाशी काही संबंध नाही असे सिद्ध केले. तरीही धार्मिक मात्र अजूनही आपला हेकेखोरपणा सोडण्यास तयार नाहीत. काही वेळा जनसामान्य परमेश्वर-धर्म इत्यादींचा कास सोडून स्वतंत्रपणे जगत आहेत असेही वाटत असते. याचा पडताळा घेण्यासाठी देव धर्माविषयी सर्वेक्षण घेतले जाते. त्यातून नेमकी काय स्थिती आहे ते कळू शकते. अशाच प्रकारच्या एक व्यापक सर्वेक्षणातील अहवालातील निष्कर्ष वाचकांसमोर ठेवण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न.

प्यू रिसर्च सेंटर या जागतिक स्तरावर काम करणाऱ्या संशोधक संस्थेने धर्म, परमेश्वर व नैतिकता, आणि धर्माचरणात पूजा – प्रार्थना इत्यादींचे महत्व याबद्दलची मतं जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले असून त्यांनी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या सर्वेक्षणात युरोप व पूर्वीच्या सोव्हिएत युनियनच्या देशात परमेश्वराला महत्व देण्याची ही संकल्पना कशी उत्क्रांत होत गेली याचे विश्लेषण करण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे.

या अहवालासाठी 13 मे ते 2 ऑक्टोबर 2019च्या दरम्यान 34 देशातील 38426 प्रतिसादकांची प्रतिक्रिया नोंदविली. आफ्रिका-लॅटिन अमेरिका-मध्यपूर्व एशिया येथील राष्ट्रात प्रत्यक्ष भेटीतून तर अमेरिका व कॅनडा येथे फोनवरून माहिती मिळवली. तसेच भारत, इंडोनेशिया, फिलिपाइन्समध्येसुद्धा प्रत्यक्ष भेटीवर भर दिला. परंतु फ्रान्स, जर्मनी, दि नेदरलँड्स, स्पेन, स्विडन, येथून फोनवरून सर्वेक्षण करण्यात आले. मात्र बल्गेरिया, झेक रिपब्लिक, ग्रीस, हंगेरी, इटली, लुथेनिया, पोलंड, रशिया, स्लोव्हाकिया, युक्रेन येथे प्रत्यक्ष संदर्शनातून माहिती मिळविली.

सर्वेक्षणाची पद्धत
या केंद्राने भारतातील सर्वेक्षणासाठी 276 प्राथमिक चाचणी नमून्यांच्या गटामार्फत (Primary sampling units) कोलकत्ता, व मुंबई या मेट्रो शहराबरोबर अहमदाबाद व काही इतर शहरं आणि अनेक छोटे मोठे खेड्यात प्रत्यक्ष घरोघरी जाऊन यादृच्छिक पद्धतीने प्रतिसादकांची निवड केली. परमेश्वर, धर्म व नैतिकता या संबंधी एक प्रश्नावली तयार केली व या प्रश्नांच्या उत्तरांच्या स्वरूपात प्रतिसादकांकडून माहिती मिळविली. प्रतिसादकांची निवड करताना प्रतिसादक त्या त्या देशातील भाषिक, भौगोलिक, सास्कृतिक, धार्मिक, सामजिक, आर्थिक, राजकीय इत्यादी सर्व स्तरांतील समुदायांचे प्रतिनिधित्व ते करतील याची काळजी घेतली होती. या उपक्रमासाठी संगणकांची मदत घेतली गेली. 18 वर्षाच्या वरील हे प्रतिसादक वेगवेगळ्या उत्पन्न समूहातील, वेगवेगळ्या वयोगटातील व उच्च-निम्न जाती व उत्पन्न गटातील स्त्री-पुरुष होते. जास्तीत जास्त तीनदा भेटी देऊन अपेक्षित असलेली प्रश्नावली भरून घेतली होती. हीच पद्धत इतर देशातील प्रतिसादकांकडून प्रत्यक्ष भेटीतून व/वा फोनवरून माहिती मिळवून अहवाल तयार केला आहे.

देशा-देशातील टक्केवारी
नीती व चांगली मूल्ये टिकविण्यासाठी परमेश्वरावर श्रद्धा हवी असे म्हणणाऱ्यांची सर्वेक्षण केलेल्या देशातील टक्केवारी खालील प्रमाणे आहेः

photo ३

नीती व चांगली मूल्ये टिकविण्यासाठी परमेश्वरावर श्रद्धा हवी असे ठामपणे म्हणणाऱ्या सहा खंडात पसरलेल्या 34 देशांतील प्रतिसादकांची सरासरी टक्केवारी 45 आहे. परंतु या प्रश्नांचे असे ठामपणे उत्तर देणाऱ्यांच्यात देशागणिक वेगवेगळ्या प्रमाणात टक्केवारी आहे, हे वरील चित्रातून स्पष्ट होईल.
आर्थिकरित्या विकासाच्या मार्गावर असलेल्या देशातील नागरिक पूर्ण विकसित झालेल्या देशातील नागरिकांपेक्षा तुलनेने जास्त धार्मिक आहेत, असे या सर्वेक्षणात आढळले आहे. आर्थिकरित्या मागासलेल्या या देशातील लोकांमध्ये आपल्या आयुष्यात धर्माला महत्व देणाऱ्यांची संख्या मोठी असून ही संख्या आर्थिकरित्या पूर्ण विकसित झालेल्या देशांपेक्षा जास्त आहे. नैतिकतेसाठी परमेश्वर हवाच यावर श्रद्धा असणारे या देशात बहुसंख्य आहेत. त्याचप्रमाणे या देशात यामताच्या विरोधात विचार मांडणारेसुद्धा आहेत. नैतिक असण्यासाठी परमेश्वरावर श्रद्धा हवी असे त्यांना वाटत नाही.

परमेश्वर, प्रार्थना, धर्म
काही प्रमाणात व्यत्यास असला तरी सर्वेक्षणात जगभरातील देशात सरासरी 62 टक्के प्रतिसादकांनी आयुष्यात परमेश्वराचे स्थान अत्यंत महत्वाचे स्थान आहे असे आढळते. 53 टक्के प्रतिसादकांना प्रार्थनेची गरज भासते. 1991नंतर रशिया व युक्रेनमध्ये ही संख्या वाढलेली आहे. तुलनेने पश्चिमेतील युरोपियन देशात ही संख्या कमी होत आहे.

सर्वेक्षण केलेल्या पश्चिमेतील आठ युरोपियन राष्ट्रामध्ये नैतिकतेसाठी परमेश्वराची गरज आहे असे म्हणणाऱ्यांची सरासरी 22 टक्के आहे. व पूर्वेतील सहा युरोपियन राष्ट्रांत ही संख्या 33 टक्के आहे. युरोप खंडातील राष्ट्रे जास्त प्रमाणात धर्म निरपेक्ष (secular) आहेत. परंतु या राष्ट्रामध्ये अल्पसंख्याकांकडे व त्यांच्या धर्माकडे बघण्याच्या दृष्टिकोनात फार मोठा फरक जाणवतो, हेही या सर्वेक्षणातून लक्षात येते.

परमेश्वर व नैतिकता
चागली मूल्ये रुजविण्यासाठी परमेश्वरावर श्रद्धा हवी असे म्हणणाऱ्यांची मते देशा-देशागणिक बदलत आहेत.
परमेश्वर व नैतिकता यांच्यात घनिष्ठ नाते आहे यावर विश्वास ठेवणारे युरोपियन युनियनमधील 13 देशापैकी ग्रीकमध्ये 53%, बल्गेरियामध्ये 50 % व स्लोव्हाकियामध्ये 45 % आहेत. मात्र याच युरोपियन युनियनमधील स्विडनमध्ये फक्त 9%, झेक रिपब्लिकमध्ये 14% व फ्रान्समध्ये 15% प्रतिसादकांना परमेश्वर व नैतिकता यांच्यात एकमेकाशी काही संबंध आहे असे वाटते. अमेरिका व कॅनडा येथे अनुक्रमे 26% व 44% ही टक्केवारी आहे. कदाचित या देशातील राजकीय ध्रुवीकरणामुळे या आकडेवारीवर परिणाम झाला असावा.

मध्यपूर्वेतील व आफ्रिकेतील देशामध्ये दहापेकी सात जणांना परमेश्वर व नैतिकता यांच्यात घनिष्ठ नाते आहे असे वाटते. लेबनानमध्ये 72%, टर्कीत 75% व ट्युनिशियामध्ये 84% लोकांना चांगल्या मूल्यांसाठी परमेश्वराची गरज आहे असे वाटते. इस्रायलमध्ये मात्र याविषयी लोकं अर्ध्यावर (48%) विभागले गेले आहेत.
photo 4
इंडोनेशिया व फिलिपाइन्स मध्ये ही संख्या प्रत्येकी 96% आहे. भारतात 79% आहे. परंतु पूर्व एशियातील दक्षिण कोरियामध्ये 53% गरज आहे व 46% गरज नाही असे कौल देतात. जपानमध्ये 39% व ऑस्ट्रेलियामध्ये 19% लोकांना परमेश्वर व नैतिकता यात संबंध आहे असे वाटते.

आफ्रिकेतील केनिया व नायजेरिया या देशात ही टक्केवारी अनुक्रमे 95% व 93% आहे. दक्षिण आफ्रिकेतही परमेश्वर व नैतिकता यांच्यात संबंध आहे म्हणणाऱ्यांची संख्या 84% आहे. लॅटिन अमेरिकन देशातील ब्राझिलमध्ये 84% प्रतिसादकांचा नैतिकतेसाठी परमेश्वर हवा यावर भर आहे. परंतु मेक्सिको व अर्जेंटिनामध्ये हे प्रमाण 44% आहे. बायबल या धर्मग्रंथावर विश्वास ठेवणाऱ्या बहुसंख्य रोमन कॅथोलिक्सच्या या तिन्ही देशात माणूस नैतिक असण्यासाठी परमेश्वरी कृपा हवी याबद्दल त्यांच्या मनात संशय नाही.

2002 व 2019 च्या सर्वेक्षणांची तुलना
याच संस्थेने 2002 साली अशाच प्रकारचे एक सर्वेक्षण केले होते. 2019च्या सर्वेक्षणातील आकडेवारींशी यापूर्वीच्या आकडेवारीशी तुलना केल्यास काही देशामध्ये परमेश्वरावरील श्रद्धेबद्दलच्या मतात फरक झालेला जाणवतो. ऱशियामध्ये 11 टक्के वाढ झाली असून युक्रेनमध्ये 11 टक्के कमी झाली आहे. त्याचप्रमाणे बल्गेरिया व जपान या दोन्ही देशात वाढ झालेली असून उलट अमेरिकेत 14 टक्के कमी झाली आहे. त्याचप्रमाणे मेक्सिको, टर्की, दक्षिण कोरियातही नैतिकतेसाठी परमेश्वराची गरज आहे असे म्हणणाऱ्यांची आकडेवारी कमी झाली आहे.

सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP)
सामान्यपणे सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) किती आहे यावरून देशाची आर्थिक स्थिती मोजली जाते. आपल्या देशाची 2018 साली GDP 2.72 लाख कोटी डॉलर्स (USD) होती. (अमेरिका - 20.54 लाख कोटी डॉलर्स केनिया - 8,790.83 लाख कोटी डॉलर्स, स्विडन - 55,608.6 लाख कोटी डॉलर्स) परंतु केवळ GDP देशाची खरी आर्थिक स्थिती दाखवू शकत नाही. त्याच्याबरोहर त्या देशाची लोकसंख्या किती आहे हेही महत्वाचे असते. प्रती माणशी किती GDP आहे यावरून खरी आर्थिक स्थिती कळू शकेल. भारताची प्रती माणशी GDP 2010 डॉल्रर्स एवढी आहे. हे निर्देशांक त्या देशातील लोकांच्या क्रयशक्तीवर (Purchasing Power Parity – PPP) अवलंबून असते. प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणात परमेश्वरावरील श्रद्धा व नैतिकता यांचा प्रती माणशी GDPवर अवलंबून आहे, असे आढळले. स्थूल मानाने प्रती माणशी GDP व परमेश्वरावरील श्रद्धा व नैतिकता याबद्दलची टक्केवारी हे एकमेकाशी व्यस्त प्रमाणात आहेत असे म्हणता येईल.

photo 2

उदाहरणार्थ केनिया येथील प्रति माणशी GDP सर्वेक्षण केलेल्या 34 देशात सर्वात कमी प्रती माणशी GDP आहे व 95 टक्के प्रतिसादकांचा परमेश्वरावरील श्रद्धामुळे नैतिकता टिकून राहते यावर विश्वास आहे. तद्विरुद्ध स्विडनची प्रती माणशी GDP सर्वात जास्त ($55,815) असून परमेश्वर व नैतिकता यांच्यातील संबंधाविषयी फक्त 9 टक्के प्रतिसादक विश्वास ठेवतात. सामान्यपणे युरोपियन राष्ट्रे कमी प्रमाणात धार्मिक आहेत.

वयोमान
परमेश्वराची पाठराखण करणाऱ्यांचे सर्वेक्षण करत असताना वयोमानाप्रमाणेसुद्धा श्रद्धेत फरक पडतो हे लक्षात येते. पिढ्या-पिढ्यामधील अंतरसुद्धा परमेश्वर व नैतिकता यांच्या संबंधातील मतामध्ये फरक जाणवतो. 18 ते 29 या वयोगटातील प्रतिसादक 50च्या पुढच्या वयातील प्रतिसादकांपेक्षा कमी प्रमाणात परमेश्वरावरील श्रद्धेमुळे नैतिकता येते यावर विश्वास ठेवणारे आहेत. या पूर्वीच्या सर्वेक्षणातसुद्धा ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली होती.

yyy
दक्षिण कोरियातील 64 टक्के जेष्ठ नागरिकांना परमेश्वर व नैतिकता यांच्यात संबंध आहे असे वाटते. परंतु 18-29 वयोगटातील केवळ 20 टक्के प्रौढांना परमेश्वर व नैतिकता यांच्याशी संबंध जोडता येईल असे वाटते. हाच प्रकार ग्रीस, अर्जेंटिना, अमेरिका, मेक्सिको, जपान, पोलंड, हंगेरी या देशातही आढळते. परंतु ब्राझिल, नायजेरिया व भारत या देशात तरुण व वृद्ध पिढीत फार फरक जाणवत नाही.

व्यक्तिगत पातळीवरील उत्पन्न
व्यक्तिगत पातळीवरील उत्पन्नाच्या प्रमाणातसुद्धा हाच प्रकार दिसून येईल. ज्यांचे उत्पन्न जास्त आहे, त्यांचे परमेश्वरावरील श्रद्धा कमी आहे, हे काही देशातील सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून कळून येईल.

शिक्षण
प्रतिसादकांची शैक्षणिक पातळीसुद्धा परमेश्वरावरील श्रद्धेबद्दलचा एक निकष होऊ शकतो. अमेरिका व युरोपमधील सर्वेक्षणात जास्त शिक्षण घेतलेल्यांच्यामध्ये नैतिकतेसाठी परमेश्वर हवा याबद्दलचा विश्वास कमी आहे, हे लक्षात येते. शिक्षण व उत्पन्न यातही परस्पर संबंध असून शिक्षणानुसार हा विश्वास कमी जास्त होतो, हे सर्वेक्षणात स्पष्ट होत आहे.

34 पैकी 24 देशातील उच्च शिक्षित प्रतिसादक परमेश्वराचा नैतिकतेशी संबंध आहे यावद्दल कमी विश्वास ठेवत होते. परंतु इतर 10 देशात मात्र शिक्षणामुळे त्यांच्या विश्वासात काही फरक आढळला नाही. 15 देशातील प्रतिसादकांचे या बद्दलचे मत त्यांच्या राजकीय विचारांशी निगडित होते. जरी उजवी व डावी विचारपद्धती देशानुसार बदलत असली तरी सामान्यपणे उजव्या विचारगटातील प्रतिसादकांना नैतिकता व चांगुलपणासाठी परमेश्वरावरील श्रद्धा आवश्यक आहे अस वाटते. अमेरिका, ग्रीस, इस्रायल मधील उजव्यागटांबरोबर डाव्यागटांतील अर्ध्यांपेक्षा जास्त प्रतिसादकांना परमेश्वरावरील श्रद्धेमुळे माणूस नीतीवान होतो यावर विश्वास आहे. अमेरिका, पोलंड व ग्रीसमध्ये ही दरी 30 टक्केपेक्षा जास्त आहे. स्वीडनमध्ये उजव्या गटातील 10 टक्के प्रतिसादकसुद्धा नैतिकतेसाठी परमेश्वरावरील श्रद्धेची पाठराखण करत आहेत. 2 टक्के डाव्यांनासुद्धा असेच वाटत आहे. हंगेरी, स्पेन, कॅनडा, जर्मनी, इस्रायल, ब्राझिल, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, ब्रिटन, दि नेदरलँड्स, व स्वीडनमधील बहुतेक उजव्या गटांना परमेश्वर व नैतिकता यांच्यात संबंध आहे याबद्दल अजिबात संशय नाही.

धर्माचे महत्व
या सर्वेक्षणात (संघटित) धर्माविषयी प्रश्न विचारण्यात आले होते. तुमच्या आयुष्यात धर्माला आपण किती महत्व देता याविषयी अती महत्वाचे, कमी महत्वाचे, थोडे-फार महत्वाचे वा बिन महत्वाचे अशी वर्गवारी करणारा प्रश्न विचारला होता. इतर राष्ट्रांच्या तुलनेत युरोपियन राष्ट्रांनी धर्माला महत्व नाही असे उत्तर दिले. 34 पैकी 23 राष्ट्रांना धर्म ही बाब अत्यंत महत्वाची वाटते. इंडोनेशिया, नायजेरिया, ट्युनिशिया, दि फिलिपाइन्स, केनिया, भारत, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल व लेबनान या राष्ट्रातील 90 टक्के प्रतिसादकांना धर्म अत्यत महत्वाचे वाटते.

यातील अनेक राष्ट्रांमधील जनतेंची त्यांच्या आयुष्यात धर्माविषयीची बांधिलकी जास्त प्रमाणात आहे. आकडेवारीप्रमाणे इंडोनेशिया (98%), नायजेरिया (93%), दि फिलिपाइन्स (92%), केनिया (92%), ट्युनिशिया(91%), दक्षिण आफ्रिका (86%), ब्राझिल (84%), भारत (77%) व लेबनान (70%) यांचा धर्माविषयीच्या बांधिलकीबद्दल क्रमांक लावता येईल.

युरोपमधील राष्ट्रं मात्र धर्माला जास्त महत्व देत नाहीत. धर्माला महत्व देण्याचे प्रमाण स्वीडनमध्ये 22%, झेक रिपब्लिकमध्ये 23%, फ्रान्समध्ये 33% व दि नेदरलँड्स व हंगेरीमध्ये 39% आहे.

बहुसांस्कृतिक युरोपमध्ये आयुष्यात पूर्णपणे धर्माला नाकारणाऱ्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात आहे. झेक रिपब्लिक, फ्रान्स, दि नेदरलँड्स, स्वीडन, ब्रिटन या देशातील तरुण वर्ग इतर कुठल्याही ऑप्शनपेक्षा धर्म नको असेच म्हणत आहे.

त्याच वेळी ग्रीस, पोलंड, इटली येथील दहापैकी सहा प्रतिसादकांना थोड्या फार प्रमाणात धर्म हवा असे वाटत हे. ग्रीसमधील 80% प्रतिसादकांना थोड्या फार प्रमाणात धर्म हवासा वाटतो. जर्मनी, स्लोव्हाकिया, लिथुआनिया या युरोपियन देशांतील 55% प्रतिसादकांना थोड्या फार प्रमाणात धर्म हवासा वाटतो. बल्गेरियात ही संख्या 59% आहे.

प्रार्थना
सर्वेक्षणातील एक प्रश्न प्रार्थनेविषयी होता. परमेश्वर जास्त महत्वाचा की त्याची प्रार्थना? या प्रश्नाला अर्ध्यापेक्षा जास्त देशांनी दोन्ही तितकेच महत्वाचे आहेत असे मत नोंदविले. 34 देशात 61% प्रतिसादकांना परमेश्वर महत्वाचा वाटतो व 53% प्रतिसादकांना प्रार्थना महत्वाचे वाटते.

आर्थिकरित्या विकसित असलेल्या देशातील प्रतिसादक परमेश्वराला नाकारल्याप्रमाणे प्रार्थनेलाही ते त्यांच्या आयुष्यात महत्व देत नाहीत. मात्र विकसनशील देश पूर्ण विकसित देशापेक्षा दुपटीने प्रार्थनेच्या उपयुक्ततेवर भर देत आहेत. दहापेकी नऊ विकसनशील देश परमेश्वराला त्यांच्या आयुष्यात महत्वाचा स्थान आहे यावर श्रद्धा ठेऊन आहेत. (अपवाद फक्त युक्रेनचा). त्या तुलनेने 11 विकसित देशात अर्ध्यापेक्षा कमी प्रतिसादक परमेश्वराला महत्व देत आहेत. विकसित देशातील सरासरी 41% जणांना प्रार्थनेची उपयुक्तता आहे असे वाटते. परंतु हीच टक्केवारी विकसनशील देशात 96% आहे.

काही देशातील प्रतिसादकांना आयुष्यात प्रार्थनेपेक्षा परमेश्वरच जास्त महत्वाचा आहे, असे वाटते. इस्रायलमधील 71% प्रतिसादकांना प्रार्थनेपेक्षा परमेश्वर महत्वाचा वाटतो, तर 54% प्रतिसादकांना प्रार्थना महत्वाचा वाटतो. इस्रायलमधील मुस्लिम समुदायातील 96% जणांना व तेथील ज्यू समुदायातील 66% जणांना परमेश्वर महत्वाचा वाटतो, परंतु 81% मुस्लिम व 50% ज्यू प्रार्थनेली महत्व देत आहेत.

आयुष्यात परमेश्वराला महत्वाचे स्थान आहे याबद्दलचे मत हे प्रतिसादक कुठल्या धर्माचे आहेत यावर अवलंबून आहे, असे म्हणता येईल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बहुतेक देशातील धर्म न मानणाऱ्यामध्ये परमेश्वराला मानणारेसुद्धा आहेत. अमेरिका व अर्जेंटिनामध्ये सुमारे 30% निधर्मिकांचा परमेश्वराच्या अस्तित्वावर विश्वास आहे. मेक्सिकोधील धर्मावर विश्वास न ठेवणारे बहुसंख्य जण त्यांच्या आयुष्यात परमेश्वराला महत्व देत आहेत.

ब्राझिल, केनिया व दि फिलिपैआइन्स मधील बहुतेक धार्मिक त्यांच्या आयुष्यात परमेश्वराला जास्त महत्व देत आहेत. त्याचप्रमाणे नायजेरियतीव मुस्लिम व क्रिश्चियन धार्मिकसुद्धा परमेश्वराला महत्वाचे स्थान देत आहेत.

सोव्हिएत युनियनच्या अस्तानंतर
१९९१नंतरच्या पश्चिम युरोपमधील देशात क्रिश्चियन धर्माला उतरती कळा लागल्याचे स्पष्ट संकेत अनेक अहवालामध्ये नमूद केलेले आहे. धर्माकडे बघण्याच्या दृष्टिकोनात स्पेन, इटली व पोलंड या कट्टर समजल्या जाणाऱ्या देशात २०१९च्या सर्वेक्षणात अनुक्रमे २६,२१ व १४ टक्के बदल झाला आहे. लुथियानियासकट बहुतेक युरोपियन राष्ट्रांमध्ये हाच ट्रेड अधोरेखित होत आहे. पूर्वीच्या सोविएट संघातील या राष्ट्रात चक्क १२ टक्के फरक झालेला जाणवतो.

सोविएट संघराज्यात धर्मावर बंदी होती. परंतु सोविएटच्या अस्तानंतर रशिया व युक्रेनमधील धार्मिकांची संख्या वाढत आहे. बल्गेरियामध्ये १९९१साली धार्मिकांची संख्या 41% होती. ती २०१९मध्ये 55% झाली.

हाच ट्रेंड प्रार्थनेच्या बाबतीतसुद्धा दिसून येत आहे.

धर्म, परमेश्वर, प्रार्थना इत्यादीच्या बाबतीतील हे सर्वेक्षण जगभरातील जनसमुदायांच्या वैचारिक क्षमतेवर प्रकाश टाकत आहे. यावरून पुरोगामी, नास्तिक व अंधश्रद्धा निर्मूलन करणारे कार्यकर्ते इत्यादींचे कार्य किती कठिण आहे याची नक्कीच कल्पना येईल. वैचारिक क्षमतेवर पसरलेली श्रद्धेची गडद छाया लवकर काढता येणार नाही हे मात्र निश्चित.

सदर्भ

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

शीर्षक 'नैतिकतेसाठी परमेश्वर हवा(च) का?' असे आहे.

आता, परमेश्वर आहे किंवा नाही, या वादात मी पडू इच्छीत नाही. मात्र, समजा जर तो असला, तर मग तो आहे; तुम्हाला तो (नैतिकतेसाठी, किंवा अन्यथा) हवा की नको, याने काहीही फरक पडत नाही. जरी तुम्हाला तो नको असला (किंवा नको झाला), तरीही तो असणारच; तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही त्याला नष्ट करू शकणार नाही; त्याला वाटले, तर (आणि तरच) तो नष्ट होईल. तुम्हाला त्यात काहीही चॉइस नाही.

उलटपक्षी, समजा जर तो नसला, तर (आणि तरच) मग तुम्ही त्याला तुमच्या गरजेनुसार निर्माण किंवा नष्ट करण्याचा प्रश्न उद्भवतो.

आता, '(नैतिकतेसाठी) परमेश्वर हवाच का?' या प्रश्नात, या बाबतीत (हवा की नको ते ठरविण्याचा) तुम्हाला पर्याय आहे, हे अभिप्रेत आहे. म्हणजेच, पर्यायाने, परमेश्वर नाही (आणि तुम्ही तो गरजेनुसार निर्माण किंवा नष्ट करू शकता, आणि/किंवा तुमच्या गरजेसाठी आणि/किंवा इच्छेने तुम्ही त्याला निर्माण केलेला आहे), हे गृहीत धरलेले आहे. आता, यात तथ्य असेलही, किंवा नसेलही; परंतु मुळात गृहीतकच जर हे असेल (केवळ शक्याशक्यतेचा विचार नव्हे), तर मग पुढील चर्चा, सर्वेक्षणे वगैरे सर्व फ़िज़ूल आहेत. म्हणजे मग (कोणीतरी म्हटल्याप्रमाणे) अगोदर बाण मारून मग वर्तुळे रंगविण्याचाच हा प्रकार झाला!

असो, चालू द्या.

----------

तळटीपा:

येथे, परमेश्वर (असलाच, तर) पुरुष आहे, असे दर्शविणारी भाषा (केवळ परंपरेने) वापरली आहे. परमेश्वर (असलीच, तर) स्त्री(च) असली पाहिजे, अशीही (सकारणमीमांसा) आर्ग्युमेंटे (तीही पुरुषांकडून) ऐकलेली आहेत; त्यात सविस्तर शिरण्याची ही जागा नव्हे.१अ तूर्तास, परमेश्वर (असलीच, तर) स्त्री असण्यास माझी व्यक्तिशः काहीही हरकत नाही, एवढेच सविनय नमूद करू इच्छितो.

१अ गरजूंनी जॉर्ज मिकॅशचे 'हौ टू बी गॉड' हे पुस्तक (मिळू शकल्यास) अवश्य वाचावे. पुस्तकाचा लेखक स्वतःस कट्टर नास्तिक म्हणवितो, परंतु ईश्वर या संकल्पनेची मीमांसा करतो. पहिल्याच प्रकरणात, सलामीलाच, 'ईश्वर नाही, परंतु जर तो असलाच, तर तो स्त्री असला पाहिजे' असे आर्ग्युमेंट मांडतो, नि मग ते पटवून देतो. आणि त्यानंतर मग (दुसऱ्या प्रकरणापासून पुढे) आख्खे पुस्तकभर परमेश्वराचा उल्लेख कटाक्षाने स्त्रीलिंगी करतो. परंतु, असो; हे फारच अवांतर झाले.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाऊ टु बी एलिअन ची ऑडीओ कॉपी आहे युट्युबवरती. ऐकली मी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळ्यात आधी आस्तिक आणि नास्तिक ह्यांच्या व्याख्या काय आहेत? हे कोणी समजाऊन सांगेल काय?
१) जे लोक मरीआईची आराधना करतात, तिला संतुष्ट कारण्यासाठी कोंबडे कापतात त्यांना आस्तिक म्हणायचे की नाही? भारतात कोठेतरी एक देवीचे मंदिर आहे. त्या देवीला म्हणे दारूचा नैवैद्य दाखवतात. ह्याला का म्हणायचे?
२)काही घराण्यात लग्न विधी झाल्यावर देवीला बकरे कापतात. इतरही काही धर्मात ही प्रथा आहे. हे लोक स्वतःला आस्तीकच सामाजात असावेत.
३)काही जण वेदांत, उपनिषद , गीता वगैरे मानतात. ते स्वतःला काय मानतात आस्तिक ?
असे अनेक चढत्या भांजणीचे लोक आहेत
४) आता उरले नास्तिक. जे न्यूटन, डार्विन, आईन्सटाइन ह्यांना मानतात. ते खरोखरचे नास्तिक ? ह्यात अजून एक उपप्रकार विज्ञानाचे -न्यूटनचे - सिद्धांंत वापरून रॉकेट तर उडवायचे पण त्या आधी सत्यनारायणाची पूजा घालायची. ह्यांना काय म्हणायचे ??

आता ३)प्रकारातले लोक १)ल्या प्रकारातील लोकांना काय समजतात? आस्तिक की मूर्ख?
मला स्वतःला मी आस्तिक आहे की नास्तिक आहे हे एकदा पक्के ठरवायचे आहे म्हणून हा उपद्व्याप.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जगात आस्तिक किंवा नास्तिक अशी दोन टोकं नसतात. 'काळा' आणि 'पांढरा' असे दोनच कप्पे करून मग प्रत्येक काळपट, पांढरट, करडा, राखाडी तुकडा घेऊन तो या दोन कप्प्यांत कुठे टाकायचा असं विचारत बसलं तर दुसरं काय होणार? हा एक स्पेक्ट्रम आहे. दोन टोकांमध्ये बसणारी अनेक लोक आहेत. त्यातही हा स्पेक्ट्रम एकमितीय नाही. विचार करण्याची पद्धत आणि आचरण अशी किमान दोन परिमाणं आहेत. 'देवबिव काही पटत नाही, पण समाजात राहायचं म्हणून मी देखल्या देवा दंडवत घालतो.' असे अनेक आहेत. तेव्हा कॉंप्लेक्स प्रश्नाला हट्टाने दोन उत्तरांत विभागायला जाणं हे मुळात चुकीचं आहे. मग तसं करताना समस्या येतात हे म्हणण्यात काय हशील?

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजून एक
काही लोक काही वेळेला आस्तिक असतात, तर काही वेळेला नास्तिक. वेळ येईल त्याप्रमाणे. त्या तुमच्या स्पेक्ट्रम मध्ये लंबकासारखे दोलायमान असतात. हे जर असे असेल तर असे बायनरी --हो / नाही-- असे प्रश्न विचारून त्यांच्या उत्तरांवरून काही निष्कर्ष काढणे कितपत बरोबर आहे? ज्याला प्रश्न विचारले जातात त्याची मनस्थिती कशी असेल तशी उत्तरे मिळतील. असे लेखही निरर्थक आणि त्याच्या वरच्या चर्चा ही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चर्चा निरर्थक नाहीत. काही वैचारीक आळशी लोकं असतात. त्यांच्या विचारांना चालना देण्याचे काम अशा चर्चा करतात, सजगता वाढते. विद्न्यान, अंधश्रद्धा विरोध या गोष्टींना खतपाणी मिळते. सतत एखादा विचार ऐकल्याने, निश्चित प्रभाव पडतो. समाजातील काही अध्वर्यु (स्पेलिंग??) चांगले काम करत असतात. कणाकणाने का होइना सजगता आली तरी खूप झालं.
___________
घर शोधत असताना, एजंटने मला विचारले तुम्हाला वास्तुशास्त्र वगैरेवर विश्वास नाही ना. तेव्हा माझ्या मनात विचार आला - अरे खरच की हादेखील एक आस्पेक्ट आहेच. पण इतक्या वर्षांच्या जालीय वावरानंतर, निदान ती एक अंधश्रद्धा तरी गेलेली आहे, असे मी म्हणु शकते.
स्त्रीमुक्तीवादी विचार/सजगता
अंधश्रद्धा विरोध्
विद्न्यानाची किंमत
या काही चांगल्या बाबी मला आंतरजालावरती साप्[अडल्या. ज्याने माझे आयुष्य बदलले असे मी खात्रीपूर्वक म्हणु शकते.
माझ्यासारखे बरेच जण असतील मग ते क्रेडीट कोणाला देवोत वा न देवोत,
आस्तिकता फार भिनलेली गोष्ट आहे, ती अशी अचानक जाणार नाही. पण तीसुद्धा क्वेश्चनेबल वाटते, मन संभ्रमित होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चर्चेबद्दल बोलत नाहीये, वादे वादे जायते तत्व बोधः. ज्या बायनरी हो/ना प्रश्नोत्तरावर निष्कर्ष काढले जातात. मी त्याबद्दल बोलत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ लेखात एक मुख्य विषय हाताळला आहे तो म्हणजे, 'नीतीमत्ता बाळगण्यासाठी परमेश्वर/देव ही संकल्पना आवश्यक आहे का?' हा प्रश्न आस्तिक-नास्तिक बायनरी विभागणीपलीकडचा आहे. याऐवजी असा प्रश्न विचारून पाहू - 'चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम करणं आवश्यक आहे का?' आता इश्वरावरील विश्वासाप्रमाणेच व्यायाम करणं न करणंही बायनरी नाही. लोकं कमीअधिक व्यायम करतात. तरीही व्यायामाच्या चढत्या प्रमाणात लोकांचं आरोग्य सुधारत असताना दाखवून देण्याचा अभ्यास करता येतो. तेव्हा बायनरी नाही, व्यायामक आहे की नाही याची व्याख्या करता येत नाही म्हणून अभ्यास वा चर्चा निरर्थक ठरत नाही.

या अभ्यासासाठी जसं आपण 'व्यायाम म्हणजे काय?' असा प्रश्न विचारून काही विशिष्ट कृतींकडे (चालणे, धावणे, पोहोणे, वजनं उचलणे, मैदानी खेळ खेळणे) लक्ष देऊ, त्यांची मोजमाप करू, त्याप्रमाणे 'परमेश्वर मानणे' यामागच्या कृती/विचारांचा अभ्यास मांडलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडक्यात व उत्तम विवेचन राजेश.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

जगात आस्तिक किंवा नास्तिक अशी दोन टोकं नसतात. 'काळा' आणि 'पांढरा' असे दोनच कप्पे करून मग प्रत्येक काळपट, पांढरट, करडा, राखाडी तुकडा घेऊन तो या दोन कप्प्यांत कुठे टाकायचा असं विचारत बसलं तर दुसरं काय होणार?

@राजेश घासकडवी

तुम्ही सदर धागालेखकाला अगदी योग्य सल्ला दिला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहुमान्य नैतिकतेसाठी परमेश्वर हवाच असे नाही. पण बहुसंख्यांना जर स्वत:च्या नैतिक संतुलनसाठी त्याच्या त्याच्या परमेश्वराची गरज लाभली तर अशा व्यक्तींशी व त्यांच्या परमेश्वरांशी आमचे भांडण नाही. अशी कशी तुम्हाला नसलेल्या परमेश्वराची गरज लागते. आम्हाला बरी लागत नाही.जी गोष्ट नाहीच आहे ती गोष्ट तुम्ही मानताच कशी? याचा अर्थ तुम्ही यडपट आहात. तुमच्या बुद्धीचा विकास अजून व्हायचा आहे. जी गोष्ट अस्तित्वातच नाही ती मानणे हा मनोविकार आहे. शहाणे करुन सोडावे सकल जन म्हणून आमचे ते कर्तव्य आहे की तुम्हाला सत्याची जाणीव करुन देणे. एवढ आम्ही कंठशोष करुन सांगतोय की जी गोष्ट नाहीये ती मानणे तद्दन मुर्खपणा आहे तर तुम्ही ऐकतच नाही. तुम्हाला (वैचारिक) झोडपूनच काढले पाहिजे.तुम्हाला विद्वान, विचारवंत, शास्त्रज्ञ म्हणून घ्यायचा काय अधिकार आहे? ईश्वर या गोष्टीला विज्ञानात काहीही आधार नाही ती मानायची कशाला? अंधश्रद्धाळू कुठले? संकल्पना पातळीवर तरी कशाला मानायचा? उगीच अस्तित्वात नसलेल्या गोष्टीबद्दल कपोल कल्पित संकल्पना मांडत बसून फुकट वैज्ञानिक जाणीवांचा अपमान करायचा? जे विज्ञान सिद्ध आहे तेच मानावे. जर ईश्वर विज्ञानाने सिद्ध केला तर आम्ही तो तेव्हा मानू. जी गोष्ट कदापिही शक्य नाही.अन काय हो तुमचा तो निर्गुण निराकार ईश्वर मानला काय आन न मानला काय? अन जो नाहीच आहे तो काय शिक्षा देणार?तुमची सदसदविवेकबुद्धि दिलीय ना निसर्गाने ती वापरा. कशाला देव पाहिजे? मी सदसदविवेकबुद्धीला पटत नाही म्हणून खोटे बोलणार नाही. देवाला आवडत नाही म्हणून नाही. तुम्ही देवाला आवडत नाही म्हणून खोटे बोलणार नसाल तर आम्हाला ते मान्य नाही................
असा विचार करणारे ही लोक आहेतच. त्यांचे ते स्वातंत्र्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

उत्तम प्रतिसाद !
मतामतांचा गलबला!
ह्यावरून एक गोष्ट आठवली
एका सल्लागार संस्थेत फक्त एकच हात असणारे लोक काम करत होते.
जेव्हा एक क्लाएन्ट संस्थेला भेट द्यायला आला तेव्हा ते पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याने चीफला विचारले, "हा काय प्रकार आहे?"
चीफने हसून उत्तर दिले, "आता ते "ऑन द अदर हॅंड" हा वाक्प्रचार रिपोर्ट मध्ये वापरू शकणार नाहीत."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नानावटी सर
आपण लेखाच्या शेवटी जी विधाने केली आहेत त्याच्याशी पूर्ण सहमत आहे. मला एवढेच म्हणायचे आहे की परमेश्वर, नीति अनिती सारखे प्रश्न बहुमताच्या जोरावर सोडवण्यासारखे नाहीत. विज्ञानाने ह्या बाबतीत महान कार्य केले आहे. देव आहे की नाही ह्याच्याशी विज्ञानाला काडीमात्रही देणे घेणे नाही, तुमच्या वाद विवादात विज्ञानाला मुळीच रस नाही. वाद विवाद चालू द्यात. सरते शेवटी आमचे बागेश्वर महाराज म्हणतात तेच खरे आहे," जैसे जिसकी सोच!"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घाटावरचे भट, झालं हो शतक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ओह, ते (खरे तर तो) आगरकर होय!

आम्हाला भलतेच आगरकर आठवले.

असो चालायचेच.

==========

तळटीपा:

क्रिकेटर आणि (असलेला/नसलेला) परमेश्वर (आणि/किंवा कोणताही देव) यांचा उल्लेख एकेरीतच व्हावा, असा एक पूर्वापार चालत आलेला संकेत आहे.१अ, १ब

१अ ईश्वराच्या संदर्भात, प्रस्तुत संकेतास 'ईश्वरी संकेत' असे संबोधता यावे काय?

१ब पूर्वी शिवाजीचा उल्लेखसुद्धा (प्रेम आणि आदर यांजसहित) एकेरी करण्याची प्रथा होती. सांप्रतकाळी तशी सोय राहिलेली नाही. चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने