तीन इच्छा

मी दहावी पास झाल्यावर माझ्या बाबांच्या माझ्याबद्दलच्या अपेक्षा फार वाढल्या. आपला मुलगा कमीत कमी इंजिनिअर होणारच होणार आणि लगेच पहिले विमान पकडून अमेरिकेला जाणार अशी दिवास्वप्ने त्यांना पडू लागली. ती स्वप्ने खरी झाली आहेत अश्या थाटांत कॉलर ताठ करून ते कॉलनीत फिरू लागले. तरी बरं मला फक्त एकोणसाठ टक्के गुण मिळाले होते. गणितात माझी अवस्था वादळांत सापडून वाताहात झालेल्या जहाजावरील खलाशासारखी होती. एखाद्या फळकुटाला पकडून, वादळ आणि लाटांनी अस्त व्यस्त मार खाऊन अर्धमेला झालेला खलाशी शेवटी देवाच्या दयेने किनाऱ्याला पोहोचतो तसा मी गणिताच्या पस्तीस गुणांच्या काठाला येऊन थडकलो होतो. सायन्स मध्ये पाच वर्षे झाली पण अजून मला अर्किमेडिजचा सिद्धांत नीट समजला नव्हता. अर्किमेडिज कपडे न चढवता ‘युरेका, युरेका,’ ओरडत का पळाला? तो युरेका, युरेका असे ओरडत होता की यू रेखा , यू रेखा असं ओरडत होता? पुन्हा शास्त्र आणि गणिताच्या चक्करमध्ये अडकायचे? बाप रे! पण तो बाप रे बापच माझा एकमेव फायनॅन्सर असल्यामुळे माझा नाईलाज होता. शेवटी दबकत दबकत मी अकरावी सायन्सला प्रवेश घेतला.
कॉलेजात प्रवेश घेतल्यावर मी माझी स्ट्रॅटेजी फिक्स केली. आपल्याकडून आपण कुठेही कमी पडायचे नाही. सर्व लेक्चर्सला प्रामाणिकपणे हजेरी लावायची, नोट्स काढायच्या आणि मुख्य म्हणजे मुलींकडे अजिबात लक्ष द्यायचे नाही. परिणाम जो व्हायचा तो झाला. मी पहिल्या टेस्टमध्ये सुखरूप पास झालो.
ही जी गोष्ट मी इथे लिहितो आहे ती कॉलेज मधल्या “यशाच्या दहा गुरुकिल्ल्या” ह्या लिस्टिकलची नाही. की मला शेवटी अर्किमेडिजचा सिद्धांत कसा समजला त्याचीही नाही. ही माझ्या गणितांच्या सरांची आहे.
माझे गणिताचे सर हे किती महान होते ते मला टर्म संपल्यावर समजले. आधी मला (खर तर सर्वांनाच) ते खूप हुशार असावेत असा संशय होता. गणित हा सगळ्यांचा वीक पॉइंट असल्याने सुरवातीला त्यांच्या क्लासला शंभर टक्के हजेरी असे. आमच्या सिनिअर्सनी जेव्हा ते पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
“तो काय शिकवतो ते तुम्हाला समजते? नाही ना. मग कशाला उगाच टाईमपास करता? फेल व्हायचा बेत असेल तर मग ठीक आहे. पास व्हायचे असेल तर जा आणि उदगीर सरांचा क्लास लावा.”
ह्यानंतर हजेरी शंभरची ऐशी टक्के झाली.
गणिताचा क्लास असला की सिनिअर आम्हाला खिडकीतून बारीक बारीक दगड मारत असत. काहीच्या काही कॉमेंट्स पास करत असत. नाव घेऊन शिव्या देत असत.
“ए जोश्या, आई+ल्या. काय आइ्न्स्टाइन व्हायचा बेत आहे काय?”
“अरे ए पडवळ, कॅनटीनमध्ये चहा वाट पाहतो आहे.”
“मार्तंड्या, आम्ही चाललो आहे मॅटीनीला. येणार तर चल लवकर.”
सर क्लासमध्ये आले की प्रेझेंटी घेत असत. प्रेझेंटी झाली की अर्धी मुलं सरांची नजर चुकवून पळून जायची. एके दिवशी प्रेझेंटी झाल्यावर सरांनी सांगितले, “माझ्या क्लासला ज्यांना बसायचे नसेल त्यांनी खुशाल निघून जा. आता ज्यांना जायचे असेल ते जाऊ शकतात.”
त्या दिवसापासून क्लासची हजेरी वीस टक्के झाली. वीस टक्के म्हणजे त्या क्लासमधल्या मुली. आणि मुलांपैकी मी. मला खूप एम्बरास व्हायचे. पण मी ही निश्चय केला होता. मला सरांची खूप दया यायची. बिचारे सर. जे लोक साधे, सरळ असतात त्यांना जग मूर्ख समजते. जे लोक छक्के पंजे करणारे, आत एक बाहेर दुसरे, स्वतःची टिमकी वाजवत फिरणारे असतात त्यांना समाज हुशार समजतो.
हळू हळू क्लासची हजेरी रोडावून एक टक्क्यावर आली. हा एक टक्का म्हणजे मी. मी एकटाच सरांच्या क्लासला सिंसिअरली बसत होतो. माझ्या मित्रांनी मला समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला.
“अरे तू हजेरीसाठी घाबरु नकोस. आपल्या कॉलेजमध्ये पाच रुपये दंड भरला की युनिवर्सिटीचा फॉर्म देतात. तुझ्याकडे पाच रुपये नसतील तर आम्ही देउ. मग तर झाले. अरे भित्र्या पोरी देखील क्लासला बसत नाहीत.” पण मी बधलो नाही. मला बाबांच्याकडे जाऊन उदगीर सरांच्या क्लास साठी पैसे मागायचे नव्हते. बाबांनी पैसे दिले असते पण एक जळजळीत प्रवचन ऐकवून.वर आयुष्यभर त्याची आठवण देत राहिले असते ते निराळेच.
“तेव्हा मी फी भरली म्हणून तुला आज हे दिवस दिसताहेत.”
बाबांनी जर “तेव्हा” स्वतःच्या मनाला तो ‘उत्तम ब्रेक’ लावला असता तर मला एकही दिवस बघावा लागला नसता हे ते सोयीस्कररित्या विसरतात. अर्थात मी बापाला पिताश्री म्हणणाऱ्यापैकी असल्यामुळे असे उघडपणे बोलू शकत नाही.
ह्या सर्व मानसिक टॉर्चरपेक्षा इथे मन लावून सरांची लेक्चर ऐकणे परवडले. शेवटी माझ्या मित्रांनी माझा नाद सोडला.
ह्या सरांची एक गंमत होती. जरी त्यांच्या क्लासमध्ये मी एकटाच बसत असे तरी ते क्लास मध्ये शंभर मुले बसली आहेत अश्या आविर्भावात शिकवत असत. मी समोर पुढच्या बाकावर बसलेला पण माझ्याकडे ते क्वचितच लक्ष द्यायचे. मधेच ते थांबायचे, “ हा ठोंबरे, तुझी काय डिफिकल्टी आहे?” ठोंबरे कॅंटीन मध्ये चहा ढोसत बसलेला असायचा. इकडे सर “मन्या ठोंबरे” ची डिफिकल्टी “समजाऊन” घेत असत आणि त्याचे शंका निरसन पण करत असत. कधी कधी सर “कुणाला” तरी खडू फेकून मारत असत, “मोबाइल बाजूला ठेव. मी काय सांगतो आहे इकडे लक्ष दे. तुझ्या बाबांनी पैसे भरून तुला कॉलेज मध्ये गेम खेळायाला पाठवलेला नाही.”
अश्या प्रसंगी मला सरांची दया यायची, कीव वाटायची. वाटायचे ह्यापेक्षा सर पार्कच्या बाहेर चणा शेंग का नाही विकत?
शेवटी एकदाचे वर्ष संपले. सरांचा शेवटला क्लास होता. सरांनी मनापासून “सगळ्या
क्लासला” बेस्ट विशेस दिल्या.
यथावकाश परीक्षा झाल्या. निकाल लागले. मी गणितात चांगल्या गुणांनी पहिल्या श्रेणीत पास झालो. उदगीर सरांच्या क्लासला जाणाऱ्या मुलांपेक्षा जास्त गुण मिळाले, मी खुश होऊन पेढे घेऊन सरांना भेटायला गेलो. सर कॉमन रूम मध्ये एकटेंच बसले होते. मला पाहून सरांच्या भुवया उंचावल्या, “कोण रे तू?”
मी थोडा खट्टू झालो, “सर मी तुमच्या क्लासमध्ये पहिल्या बाकावर बसत होतो.”
सरांच्या डोक्यांत ट्यूब पेटली असावी. “अरे हो, तू प्रभुदेसाई ना. तुला कसा विसरेन मी? निकाल बघितलास? किती मार्क मिळाले?”
मी लंगडा आणि एक्का असे बोलणार होतो पण वेळेवर स्वतःला सावरले, “सर एक्काहत्तर. आपली कृपा” मी सरांच्या पायाला स्पर्श करून पेढ्यांचा पुडा पुढे केला, “सर हे पहा. मी तुमच्या सर्व लेक्चरच्या नोट्स काढल्या होत्या. डायग्राम सकट.” मी सरांना नोट्स दाखवल्या. माझ्या सुवाच्य अक्षरांतल्या आणि रंगीत डायग्रामसह नोट्स बघून सरांना गदगदून आले. त्यानंतर सरांनी मला दणका दिला.
“प्रभुदेसाई, मी तुझ्यावर खुश झालो आहे. शिष्य असावा तर असा. आपल्या संस्कृतीत शिष्य गुरूला गुरुदक्षिणा देतात. आज मी तुला शिष्यदक्षिणा देणार आहे. मी तुझ्यावर प्रसन्न होऊन तीन वर देतो आहे. ह्या तीन वरांनी तुला काय पाहिजे ते मागून घे.”
मी माझे हसू कसेबसे दाबून धरले. सर एकतर माझी टिंगल करत असावेत, किंवा त्यांची सटकली असावी. सर क्रॅकपॉट असावेत असा माझा संशय होता तो आता दृढ झाला. त्यामुळे काय बोलायचे, कसे बोलायचे मला समजेना. शेवटी सरच बोलले, “तुझा माझ्या बोलण्यावर विश्वास दिसत नाही. असच असते. जो माणूस खर बोलतो त्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. तुझ्या मनात काय आहे माझ्या गुरुजींना चांगले माहीत आहे. उघडपणे बोलायचं धैर्य तुझ्यात नाही. तेव्हा मी तुला आशीर्वाद देतो की तुझ्या मनातली इच्छा पूर्ण होईल. जा देव तुझे कल्याण करो.”
“सर, तुमचे गुरुजी?”
“हो माझे गुरुजी! ते गुरुजी ज्यांनी माझ्या आयुष्याला गणिताचे वळण दिले. ते गुरुजी जे स्थळकाळ अबाधित आहेत. त्रिकालाबाधित सत्य त्यांच्या चरणाशी लोळण घेते. त्यांच्या चरणरजांनी पावन होत्साते ते सत्य त्यांच्या पायाशी एखाद्या श्वाना.....”
असं बरच काहीबाही बोलत राहिले. मला वाटले मी सरांना उगीचच टोकारले. अखेर देवाच्या दयेने सरांचे गुरुजी स्तवन संपले.
आता सरांनी अब्राकाडब्रा सारख्या मंत्राचा जप केला. हवेत वेड्यासारखे हातवारे केले.
त्याक्षणी माझ्या मनात एकच विचार होता की सरांना वेडतर लागले नाही ना. सरांचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो. कोलेजच्या व्हरांड्यातून जाताना सहजच माझे लक्ष गेले. तर लता उकिडवे आपल्या मैत्रिणींच्या घोळक्यांत उभी होती.
लता उकिडवे हे कॉलेजमधले बडे प्रस्थ होते. तिचे वडील म्हणजे सरदार उकिडवे. सरदार उकिडवे ह्यांच्या पूर्वजांनी कुठल्याशा लढाईत काहीतरी पराक्रम गाजवला म्हणून पेशवेसरकारने त्यांना आजूबाजूची काही गावे आंदण दिली. आता ती सगळी गावं बिल्डरच्या घशांत गेली पण कमावलेला गडगंज पैसा होता. तो शहाणपणाने इकडे तिकडे गुंतवल्यामुळे वाढत होता. कॉलेज मध्ये लांबलचक स्टुडबेकर गाडीतून येणारा एकच “विद्यार्थी” होता. तो म्हणजे लता! लता नुसतीच श्रीमंत नव्हती तर दिसायला लाखांत एक होती. आता तिच्याकडे मान वर करून बघायचे डेअरिंग नसल्यामुळे तिला मी कधी नीट बघू शकलो नव्हतो त्यामुळे तिच्या सौंदर्याचे पोकळ वर्णन करणे हा तिच्यावर सरासर अन्याय करणे होईल. ही माझी मैत्रीण असती तर कित्ती कित्ती मजा आली असती हा विचार कधी कधी मनांत आला असणारच. पण लगेच तिची स्टुडबेकर आणि माझी लंगडी “हंबर बरसोतक चलेगी” वाली सायकल डोळ्यासमोर यायची. तिचे वडील सरदार उकिडवे आणि माझे तीर्थरूप पी डब्ल्यू डी मध्ये डिवीजनल अकौंटटंट! कुठे इन्द्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी. जाउदेत झाले.
नेहमीप्रमाणे त्या सुंदरींच्या ग्रुप कडे अर्धवट दुर्लक्ष करीत मी कटण्याचा विचार करत होतो
इतक्यांत लताने मैत्रीणींना सोडून माझ्याकडे मोर्चा वळवला. असा मला भास झाला असणार. म्हणून मी माझ्या मागे कोणी आहे का ते बघत होतो.
“अरे कुंदा, मी तुझ्याशी बोलते आहे.” असे गोड गोड लडिवाळपणे बोललेले शब्द माझ्या कानावर आले. आता माझे नाव मुकंद आहे हे खरं आहे. त्याचा कुंदा असा अपभ्रंश केलेला मी कधी ऐकला नव्हता. म्हणजे हे वाक्य माझ्यासाठी नव्हते तर लता कुणा कुंदा नावाच्या तिच्या मैत्रिणीला उद्देशून असावे.
“कुंदु प्रभुदेसाई, जागा हो माझ्या राजा, मी तुझ्याशी बोलते आहे,” तिने माझा हात पकडला. मला जणू काय चारशे चाळीस वोल्टस् झटका बसल्याची अनुभूती झाली. “तुला मॅथ्समध्ये डिस्टिंशन मिळाले हे मला मालनकडून समजले! ही गोड बातमी तू मला सर्वांच्या आधी का नाही दिलीस? तू फार लब्बाड झाला आहेस. आज कल तुझे माझ्याकडे म्हणावे तसे लक्ष नाहीये. तू त्या चेटकिणीच्या जाळयात फसला नाहीस ना?”
“नाही ग लतु. तू सोडून माझ्या डोक्यांत दुसऱ्या कुणाचाही विचार येत नाही.” मी आता प्रवाहाबरोबर वहात गेलो.
“चल तर माझ्या राजा. धिस कॉल्स फॉर सेलेब्रेशन, लेट अस सेलेब्रेट!” तिने माझा हात पकडून जबरदस्तीने तिच्या लांबलचक गाडीत बसवले, “ पार्ककडे घे.” अश्या त्रोटक शब्दांत ड्रायवरला हुकम दिला. तिच्या सहवासांत गाडीच्या एसी मुळे देखील मला घाम फुटला होता. हो माझ्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यांत तिच्या मैत्रीची इच्छा होती. पण हे जे काय चालले होते ते अघटीत होते. सरांच्या वरदानाचा परिणाम?
“कुंदा, काय हे शम्मी कपूर सारखे केस पिंजारले आहेस? तुला ही स्टाइल अजिबात शोभत नाही. लोक तुला मवाली लोफर समजले तर मला काय वाटेल? मी तुला हजारो वेळा सांगितले की तुला मिडल पार्टिंग कित्ती कित्ती छान दिसतं माझ्या राजा.” असे बोलून तिने पर्स उघडली आणि कंगवा काढला , डाव्या हाताने माझा चेहरा धरून माझे केस विंचरले. लहानपणी माझी आई असाच माझा भांग पाडत असे त्याची आठवण झाली. आता फक्त तिटी लावायचे राहिले होते.
“किती गोंडस दिसतो आहेस रे, त्या चेटकीणीची दृष्ट लागेल बघ. थांब तुला काळा टिक्का लावते,” तिने पर्स मधून एक पेन्सील काढली आणि माझ्या कपाळावर केसांच्या खाली काळा टिक्का लावला. इतक्यांत सुदैवाने पार्क आली आणि माझा मेकप प्रोग्राम थांबला. ड्रायवरने खाली उतरून लांबलचक गाडीचा दरवाजा उघडला. मी आणि लता गाडीबाहेर पडलो.
पार्कच्या मुख्य दरवाज्याबाहेर भेळेच्या, आईस्क्रीमच्या, वडा पाव, थंड आणि गरम पेयाच्या गाड्या लागलेल्या होत्या. हौशी शौकीन लोक बाजूला मांडलेल्या बाकड्यांवर आणि खुर्च्यांवर बसून खाण्यापिण्याचा आस्वाद घेत होते. सहजच माझे लक्ष चना शेंग विकणाऱ्या भैय्याकडे गेली. खांद्यावर गमछा टाकून तो भसाड्या आवाजांत “चना जोर गरम बाबू मै लाया मजेदार” असे गाणे गात होता आणि आजूबाजूला उभ्या चार पाच लोकांसाठी पुड्या बांधत होता. मला काहीतरी संशय आला म्हणून जरा निरखून बघितले तर ते आमचे गणिताचे सर होते. हो माझ्या मनांत कधीतरी विचार येत असत की “ह्यापेक्षा सर पार्कच्या बाहेर चणा शेंग का नाही विकत?” त्याचा हा परिणाम? मला माझा प्रचंड राग आला. शरम वाटली. सरांनी मला वर देऊन स्वतःची अशी वाट लावून घेतली होती. अर्थात त्यांनी मला लताच्या हवाली करून माझी पण वाट लावलीच होती. जे काय झाले होते आणि चालले होते त्याला मीच जबाबदार होतो. माझ्याच अंतर्मनातल्या अतृप्त इच्छा साकार होत होत्या. जवळ जाऊन सरांशी दोन शब्द बोलावेत असे तीव्रतेने वाटत होते पण बरोबर लता असल्यामुळे माझा नाईलाज होता.
लताने माझा हात तिच्या हातांत गुंफला. (जंगलात रानटी जनावरांना पकडण्यासाठी लावलेले सापळे असेच असतील का? त्यांत जनावरांचे पाय अडकतात, इथे माझा हात अडकला होता.) लता आता हळुवारपणे “जीवनांत ही घडी अशीच राहू दे.” असे काही गात होती. माझे रिस्टवाच मागत होती का? मी तिच्याकडे दुर्लक्ष केले.
“मग आपण केव्हा करायचे?” लता मला विचारत होती. मी दचकलो आणि हाय अॅलर्टवर.
“अरे असं काय बघतोस? कालच तर आपण सर्व चर्चा केली होती. तू प्रॉमिस केले होतस की आज निश्चित ठरवूया. तुझ्या आई बाबांची, माझ्या आईबाबांची संमती आहे. बाबांनी मुहूर्त पण निश्चित केला आहे. सतरा मे आपल्या दोघांनाही लाभतो आहे. कार्यालयाशी प्राथमिक बोलणी सुद्धा केली आहेत त्यांनी. फक्त तुझ्या ‘हो’ ची सगळे वाट बघत आहेत. आपल्याला स्वित्झर्लंडची तिकिटे बुक करायची आहेत.”
माझ्या डोक्यांत थोडा थोडा प्रकाश पडायला लागला होता. बापारे ही घोरपड गळ्यांत बांधून घ्यायची जन्मभर? मी होणार पामेरिअन लॅपडॉग? सावधान. सावधान प्रभुदेसाई.
मी नाटकीपणा दाखवत म्हणालो, “लतु, अग लग्न म्हणजे स्वातंत्र्याची आहुती. मला थोडा अजून विचार करू दे. उद्या अगदी म्हणजे अगदी निश्चित बर का. चल आता आई वाट पहात असेल.”
ती परत जायची गोष्ट काढली तेव्हा लता खट्टू झाली, “मुक्याला काय समजणार मुक्याची चव!”
ती काय बोलली ते मला समजले नाही. “काय काय?”
“मी तमिळमध्ये बोलले ना. तुला कसे समजणार?”
आम्ही तिच्या लांबलचक गाडीत बसून परतलो. गाडी माझ्या घराजवळच्या चौकांत आली तशी मी म्हणालो, “मला इथेच सोड. जाईन चालत घरापर्यंत.”
ती काय म्हणते, “आता आलेच आहे तर सासूबाईंना भेटून जाते.”
“लता प्लीज, ती माझी आई आहे. तुझी सासू नाही झाली अजून.”
“अरे तुझी आई म्हणजे माझी सासू ना. तू अगदी हा आहेस.” बरोबर आहे. मी हा च असणार. ही कसा असणार? काय मॅडकॅप मुलगी आहे ही.
आमच्या जुनाट वाड्यासमोर ड्रायवरने लांबलचक गाडी उभी केली. आळीतली खोडकर उपद्व्यापी पोरं गाडी भोवती घोटाळत गाडीला हाताळू लागली. त्यांनी जणू काय असा प्राणी आयुष्यांत पहिल्यांदाच बघितला. इकडे मला टेन्शन! लता मात्र बिनधास्त.
घरी आल्यावर लताने पदर खोचून स्वयंपाकघरात एन्ट्री मारली, “सासूबाई तुम्ही आराम करा .मी कांदा पोहे करते. माझ्या हातचे कांदापोहे ह्यांना फार आवडतात.”
“अग त्याला काय मला पण फार आवडतात.” आई लताकडे कौतुकाने बघत होती. आत दोघींचे खुसुरफुसुर चालले होते. थोड्या वेळाने आई बाहेर आली. “मुकुंदा, तुला गणितात चांगले मार्क मिळाले हे तू लताला सांगितले नाहीस? अरे, तिच्या पायगुणाने तुला एवढे यश मिळाले.”
म्हणजे मी कष्ट केले ते गेले उडत. गणितात चार वेळा नापास झालेल्या लताच्या पायगुणाने मला चांगले मार्क! लताला माझा “पायगुण” दाखवावा असे हिंस्र विचार माझ्या मनांत आले. पण आपण पडलो सभ्य. तो सभ्यपणा आडवा आला.
लता पोह्याच्या बश्या भरून घेऊन आली. मी पोह्याचा एक घास घेतला. आ रा रा रा रा. हे पोहे होते की बासुंदी होती. लताने पोह्यांत साखर घातली होती का साखरेत पोहे घातले होते.? बापरे असले पोहे ही मला आयुष्यभर खिलवणार?
“व्वा किती छान पोहे करतेस ग तू,” आईने लतावर स्तुतिसुमने उधळली. आई खरं खरं बोलत होती की शालजोडीतले देत होती? कळायला मार्ग नव्हता.
“आई ,तुम्ही किती मोकळ्या मनाने बोलता. आणि एक हे? पोहे चांगले झाले आहेत म्हणायला जीभ वळत नाही ह्यांची.” लता लटक्या रागाने बोलत होती.
“अग तो अजून लाजतो आहे. लहानपणापासून तो असाच लाजरा बुजरा आहे. तू काही मनावर घेऊ नकोस.”
आता लताने केलेला चहा कसा असणार ह्याचे वर्णन करायची गरज आहे काय? पुण्यांत म्हणे बासुंदी चहा असा काही प्रकार मिळतो असे ऐकले आहे. ते चहावाले देखील हा चहा बघून आपल्या कपबश्या फोडून दुकान बंद करून शरमेने गावी निघून जातील. लताचे काय पोहे गोड! चहा पण गोड! लताची फोड गोडच गोड!
ह्यातून सुटकेचा मार्ग म्हणजे सरांना शरण जाणे. घड्याळ्यात आठ वाजत होते. अजून वेळ होता. उठलो, कपडे केले, रिक्षा पकडली, सरळ पार्ककडे गेलो. सरांचा चनाशेंगचा धंदा चांगला जोरात चालला होता. मी जरा पुढे झालो.
“बोलो बेटा, चनाशेंग, वाटणा, मसूर क्या चाहिये.” सरांनी खापरांनी गरम केलेला मटका बाजूला करत फुटाणे सारखे केले आणि भसाड्या आवाजांत गाणे गायला सुरुवात केली, “चना जोर गरम बाबू मै लाया मजेदार.”
“सर मी प्रभुदेसाई, कृपा करा. मला ह्या लतावेलीच्या गोड विळख्यातून सोडवा.” मी काकुळतीला येऊन विनवणी करत होतो. सरांनी माझ्याकडे मुळीच लक्ष दिले नाही. त्यांचा धंद्याचा टाईम होता ना. दोन तीन गिर्हाईकं बाजूला उभी होती. ती माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होती. त्यांना चना शेंग देऊन पिटाळले. आता माझ्याकडे लक्ष द्यायला सरांना वेळ मिळाला. एका कागदाच्या पुंगळीत फुटाणे भरून सरांनी माझ्या हातात दिले.
“खा म्हणजे बुद्धी तेज होईल.” ढणाण्याच्या प्रकाशांत सरांचा चेहरा उग्र दिसत होता, “त्याचे कसं आहे, प्रभुदेसाई “न जावे सुंदरपणावर, आधी गुण श्रवण कर.””
“बोल वत्सा, अजुनेक वर आहे तुझ्याकडे. काय मागायचे ते मागून घे.”
मी हात जोडून गदगदून सरांचे पाय पकडले. “चूक झाली माझी. मला ह्या गोड लता पासून सुटका द्या. आयुष्यभर हे साखरेचे पोते वहायची शिक्षा! आतापासून माझ्यामागे डायबेटीस लावू नका. ऐसा क्या गुन्हा किया की हम लता गये आय मीन लुट गये?”
“ठीक आहे. जशी तुझी मर्जी. पण एक प्रॉब्लेम आहे. मी तुझे वरदान रिवर्स केले तर मला पण पुन्हा कॉलेज मध्ये जाऊन गणित शिकवावे लागेल. इथे माझे बरे चालले आहे. आजूबाजूला लोक फिरतात, कधी गप्पा मारतात. गावाकडचा हाल विचारतात. शिवाय इन्कमटॅक्स भरावा लागत नाही. केव्हडा रिलीफ! ह्यापेक्षा माणसाला आयुष्यांत अजून काय पाहिजे !”
“सर, पण हे चांगले दिसतं का? तुम्ही एवढे गणितांत डॉक्टरेट झालेले. आणि इथे चना शेंग विकत बसला आहात? तुम्हीच विचार करा. हा काय न्याय झाला?” मी सरांच्या भावनेला हात घातला.
माझ्या स्तुतीने सर थोडे विरघळले, “मी असं करतो दिवसा कॉलेजमध्ये शिकवतो आणि संध्याकाळी इथे येऊन चना शेंग विकतो. तू माझ्या करिअरला चांगले वळण दिले आहेस. ते मला सोडवत नाही. मी हळू हळू धंदा वाढवत जाईन. गावाताल्या दुसऱ्या बागांसमोर शाखा उघडेन. कॉलेजमधली नोकरी सोडून देऊन हा धंदा मल्टीनॅशनल करेन. हाईड पार्क, सेन्ट्रल पार्क, फॉरेस्ट पार्क, लक्झेंबर्ग गार्डन, विला डोरिया पामफिली ह्याठिकाणी ठेले लावेन. कसा वाटतो माझा विचार तुला?”
सरांना स्वतःची काळजी वाटत होती मला माझी, “सर तुमचा विचार चांगलाच आहे. आपण मराठी लोक “आमची कोठेही शाखा नाही” असं गर्वाने लिहिण्यात धन्य मानतो. तर सर तुम्ही लंडन, पॅरीस, न्यू यॉर्क मध्ये धंदा कसा वाढवता येईल ह्याचा विचार आत्तापासून करून ठेवला आहे. पण त्याआधी माझा विचार करा ना जरा.”
“अरे विसरलोच. तू आता असं कर हे लता प्रकरण विसरून जा. शांत झोप काढ. तुझ्यापाशी अजून एक वर आहे त्याचे काय करायचे ते ठरव. व्यवस्थित विचार करून उद्या सकाळी कॉलेजमध्ये मला भेट.”
“धन्य हो गुरुद्याव.” एवढे बोलून मी उल्हसित मनाने सरांचा निरोप घेतला.
सकाळी उठलो. एक वर अजून पेंडिंग आहे त्याचे काय करायचे? एक मन सांगत होते विसरून जा हे सगळे. काल जे झाले ते एक स्वप्न होते. कोणा लुंग्या सुंग्या प्राध्यापकाकडे अशी ताकद असणे कसे शक्य होते. विचार केला जरा तपासून पाहूया. काल माझी आई लताचे तोंड भरून कौतुक करत होती. बघूया तिला काही आठवतं काय. चहा पिताना खडा टाकला, “ आई, मला गणितात चांगले गुण मिळाले ते तुझ्यामुळे. तू माझ्यासाठी शनिवार करत होतीस ना.”
“अरे बाबा, मी शनिवार तू व्हायच्या आधीपासून करते आहे. तू अभ्यास केलास, तुझ्या नशिबाने तुला साथ दिली. तुला चांगले गुण मिळाले.” आईच्या तोंडून लताच्या नावाचा ल पण निघाला नाही. म्हणजे कालचे ते स्वप्नच होते. तिसऱ्या वराचे काय करावे. दोन वरांबरोबर एक वर फ्री! अशी स्कीम वाया का घालवा.
कॉलेजांत गेलो. लता तिच्या मैत्रिणींच्या घोळक्यांत उभी होती. बहुतेक त्यांचा कुठलातरी तास असणार. मी त्यांच्या खिजगणतीतही नव्हतो. चला, सुंठीवाचून खोकला गेला. प्रकरणाचा ‘गोड’ शेवट झाला. एवढा सगळा अनुभव गाठीशी असतानाही मी मूर्खपणा केलाच. सरळ घरी जायचे सोडून मी तिसऱ्या वरासाठी सरांच्याकडे पावले वळवली. म्हणतात ना जब गीधडकी मौत आती है तो वो शेरकी तरफ भागता है.
सर कॉमन रुममध्ये एकटेच बसले होते. मी पुढे होऊन सरांचे चरणवंदन केले, “हा, मग काय ठरवले आहेस तू ? एक लक्षांत ठेव. जी गोष्ट बनवायचा प्रयत्न परमेश्वर स्वतः गेली पाच हजार वर्षे करतो आहे ती सोडून काहीही माग. मी काय म्हणतो आहे ते तुला समजले ना.”
तेच मागायला मी आलो होतो. म्हणजे सर्व गुणसंपन्न आखूड शिंगी बहुगुणी पतीदेवाची मर्जी ओळखणारी इत्यादी इत्यादी--------- जाउदे. जिथे परमेश्वराने हात टेकले तिथे आपण काय करणार?
“हं, काय ते लवकर माग. पाच मिनिटांत मला क्लास घ्यायला जायचे आहे. उशीर होईल.” सरांनी निर्वाणीचा इशारा दिला. विचार केला, कल्पवृक्षाखाली बसून झोळीला गाठी का द्याव्या? मग मग काय घाई घाईत जे डोक्यांत आले ते बोलून टाकले.
“मला खूप श्रीमंत व्हायची इच्छा आहे. होईल पुरी? कराल तुम्ही मला श्रीमंत ?”
“हत् तेरी. हे अगदी सिम्पल आहे. जा तुझी इच्छा पूर्ण होईल. तथास्तु.” सरांनी अब्राकाडब्रा सारख्या मंत्राचा जप केला. हवेत वेड्यासारखे हातवारे केले. पुस्तक आणि डस्टर उचलून क्लास घ्यायला निघून गेले.
नाजूक किण किणीने मला जाग आली. एक सुंदर तरुणी तितक्याच सुंदर चांदीच्या घंटेच्या आवाजाने मला उठवत होती. तिने मधुर हास्य करून मला गुड मॉर्निंग केले. मी पण बिझिनेसलाईक मॅनेजमेंट स्टाइलने तिचा गुड मॉर्निंग तिला परत केला. “सर बेड टी!” तिने चहाचा ट्रे माझ्या समोर ठेवला आणि चहाची जमवाजमव सुरु केली.
“लिली, आज तुझी ड्युटी इकडे?” मी लीलीकडे कटाक्ष टाकून विचारले, “सर शेलीने आज रजा घेतली आहे. तिचा भाऊ फिलाला परत चालला आहे ना. सर तुम्ही काळजी करू नका. मला इथले सर्व रुटिन माहीत आहे.” असे म्हणून ती मिश्कील हसली, “सर, आपल्याला आठवण करून द्यायची म्हणून, आज फ्रायडे आहे. वीकली रिव्यू मीटिंगचा दिवस.” बर झाले हिने आठवण करून दिली. मी विसरलोच होतो. माझ्या डोक्यांत शेली आणि लिलीचा तुलनात्मक विचार चालला होता.
“हा हा, मला माहीत आहे. मी त्याच मिटिंगच्या अजेंड्या बद्दल विचार करत होतो.” कसला आला आहे अजेंडा अन् कसले काय.
अश्या मीटिंगमध्ये वट मारायच्या दोन पद्धती असतात. एक म्हणजे आपण मिटींगला उशिरा जायचे. सगळे ताटकळत आपली वाट पाहून पाहून, चहा पिऊन पिऊन कंटाळलेले असतात. गेल्यावर मानभावीपणाने म्हणावे, “सॉरी, काय करणार? सी एम चा कॉल होता. आमच्या मदरटंगमध्ये एक म्हण आहे. जाऊ देत. आपण आधीच बोअर झाले असणार, त्यांत मी सीएम ची टेप लाऊन अजून बोअर करत नाही.” असे म्हणून त्यांना अजून बोअर करावे.
किंवा दुसरे म्हणजे आपण वेळेपेक्षा दहा पंधरा मिनिटे आधीच मिटिंगला हजर व्हायचे, दोनचार जण रॉंग फूटवर पकडले जातातच. सगळ्यांना वेळेवर पकाऊ लेक्चर ऐकवायचे. लेक्चरमध्ये “टाईम इज मनि”, किंवा नेपोलिअन वगैरे पेरायचे. मग सगळे म्हणणार साहेब वेळेचा पक्का आहे बरका!
अजून एक टेकनिक. मिटिंग चालू असताना आपण ब्रेकफास्ट करावा. स्टफ्ड ऑम्लेट, पॅन्केक्स, वॅफल्स, आणि बेक्ड बीन्स. वर फ्रुट सॅलड, सिझनल फ्रुट ज्यूस किंवा आईस्क्रीम. समथिंग लाईक दॅट. हळू हळू आरामांत खावे. मधेच आठवण झाल्यासारखे, “अरे आप लोग कुछ ऑर्डर किजीये ना. क्रिक्ष्णमूर्थी ( हो कृष्णमुर्ती नाही, क्रिक्ष्णमूर्थीच ) कुछ चाय कॉफी? वैसे क्रिक्ष्णमूर्थी साहबको जो चाहिये वो तो मै ऑफर नाही कर सकता.” असे सवंग विनोद करून लोकांना लज्जित करण्यांत जी मज्जा आहे! अच्छा कुणाची टाप नाही होणार काही ऑर्डर करायची सगळे म्हणणार, “ हम लोग तो ब्रेकफास्ट करकेही आये है.” मिटिंग चूप चाप पुढे चालू.
हे पहा अजून एक व्हेरी इफेक्टिव टेकनिक
कुणीतरी कुठल्यातरी युनिटचा डेप्युटी असिस्टंट सिनिअर व्हाईस प्रेसिडेंट प्रेझेन्टेशन देत असतो. आपण मधेच आपल्या खाजगी चिटणीसाला बोलवावे, “मणिकंदन, वासेपूर नंबर वन युनिटला फोन कर त्यांना विचारून जरा माहिती काढ.” मणिकंदन इज टोटली लॉस्ट. “कशाबद्दल सार?” (इथे पण सर नाही सारच). त्याच्याकडे आश्चर्याने बघत आपण, “मणिकंदन, कमाल आहे. त्यांचे कोल्ड रोलिंग युनिट नंबर तीन काल रात्री दोन वाजल्यापासून बंद पडले आहे. हे तू मला सांगायला पाहिजे ते मी तुला सांगतो आहे.” असे काहीबाही अद्वा तद्वा बोलून त्याचा पाणउतारा करावा. सगळी मीटिंग अवाक्! “हं, तुमचे प्रेझेन्टेशन चालू द्या.”
ही कलाबाजी मी माझ्या परमपूज्य पिताजींकडून शिकलो. असो. आजची मिटिंग त्यातलीच एक. प्रथम चिली युनिटच्या फ्रान्सिस्को सोटोचा रिपोर्ट होता. “कॉपर आणि आयोडीनचे उत्पादन अॅज पर शेड्युल चालू आहे.”
“व्वा छान, फ्रान्सिस्को, पण मला एक सांग, ----मणिकंदन ती चिलीची फाईल जरा घे रे बाबा,-----हे पहा माझ्या मित्राने सॅन्तिअॅगो टाईम्सचे कात्रण पाठवले आहे. ते वाच. आपण काय करणार आहोत यावर?” मी सोटोला बरोबर कात्रीत पकडले. कात्रीत पकडला म्हणजे फ्रान्सिस्को तसा चांगला माणूस होता. अगदी सिंसिअर. प्रमाणिक माझ्या विश्वासातला. पण जास्त ढील दिले की माणसे शेफारतात. त्यांना वाटायला लागते की मोठ्या साहेबाचे आपल्यावाचून चालणार नाही. थोडी आत्मसंतुष्ट आणि अल्पसंतुष्ट होतात. त्यांची कामगिरी घसरते. म्हणून मधून मधून चाप लावावा लागतो. फ्रान्सिस्को रिपोर्ट वाचून थोडा चमकला, “हो सर, प्लांट मधून दोन वेळा गॅसची गळती झाली होती. ही बातमी मी वाचली होती.”
मला अतोनात हसू आले, “हे तुला प्लांट मध्ये लगेच समजले की टाईम्स वाचून समजले? जोक्स अपार्ट, हे तू मला ताबडतोब कळवायला पाहिजे होते. ते मला माझ्या मित्राने कृपा करून सॅन्तिअॅगो टाईम्स पाठवला तेव्हा समजले. ग्रीनपीसने माझी अपॉइंटमेंट मागितली आहे. हे पहा सोबत त्यांनी एक प्रश्नपत्रिका पण पाठवली आहे. गॅस म्हणजे एसओ २ ना ? किती लोक मेले? कुणीही नाही ना. चला शेपटीवर निभावले म्हणायचे. आपण स्थानिक लोकांसाठी किती सुविधा केल्या. ह्या एका घटनेने सगळ्यावर पाणी फेरले. आता मला फ्ल्यू गॅस मधून एसओ २ सेपरेट करण्यासाठी प्लांट लावावा लागणार. म्हणजे सहाशे कोटींचा भुर्दंड. तेवढ्याने प्रकरण मिटले तरी खूप झाले म्हणायचे. आता एमिशन लेवेल किती आहे? विदिन लिमिट. हे काय उत्तर झाले. तू काय पत्रकारपरिषदेत बोलत आहेस काय? का बायको बरोबर शिळोप्याच्या गप्पा मारतो आहेस? मला फिगर सांग फिगर. किती? एकशेवीस मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटर. ठीक आहे. डोकं वापरलस तर ऐशीच्या खाली आणणे अवघड नाही. मी काय म्हणतो आहे ते तुला समजले ना. मला कुठेही रेकोर्डवर ऐशी लिमिट क्रॉस झालेली दिसली नाही पाहिजे. तू जाऊ शकतोस.” बिच्चारा मान खाली घालून निघून गेला.
तो गेल्यावर मी त्याला यथेच्छ शिव्या घातल्या. दुसऱ्या लोकांना जरब बसावी म्हणून. मिटिंगच्या उरल्या वेळांत उरलेल्या युनिटच्या मुख्य लोकांनी रडगाणी गायली. ऑस्ट्रेलियन युनिटच्या सीईओने क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा पुढचा दौरा स्पॉन्सर करावा अशी सूचना केली. ती सर्वांना पसंत पडली. जगांत क्रिकेट सोडून अजूनही दुसरे खेळ आहेत याची मी आठवण करून दिली. अशी नेहमी कुरघोडी करावी लागते नाहीतर हे लोक सर्व पैसा असा वाटेल तिथे उधळून टाकतील.
आता फक्त आर्थिक सल्लागार आणि सुरक्षा सल्लागार उरले होते. आर्थिक सल्लागाराने रंगवलेले चित्र काही खास उत्साहवर्धक नव्हते. पी डी साई इंटरनॅशनलचे शेअर बाजारांत मार खात होते. आमच्या कंपनीचे शेअर वर खाली करण्याचे काम नत्थूलाल चिमणलाल ह्या ब्रोकरकडे होते. काय करत होता तो? मी लटक्या रागाने विचारले. खर म्हणजे मीच त्याला काय करायचे त्याच्या सूचना देलेल्या होत्या. तो त्याप्रमाणे काम करत होता. जाऊ द्यात. अश्या काही गोष्टी आर्थिक सल्लागाराच्या समजण्यापल्याड असतात. रुपी-डॉलर विनिमय दरावर एक लेक्चर देऊन तो ही खुश होऊन चालता झाला.
आता फक्त मी, सुरक्षा सल्लागार माने आणि मणिकंदन एवढेच उरलो होतो. सुरक्षा सल्लागाराने घसा साफ केला. मणिकंदनसारख्या हुशार पीए ला तेवढा इशारा पुरेसा होता.
“सर, मी शेजारच्या खोलीत आहे. गरज पडली तर बोलावून घ्या.” असे बोलून तो नाहीसा झाला. मी माने सरांसाठी कलिंगड आईस क्रीम मागवले. माने मामांवर माझा लोभ होता.
“मुकुंदराव, वैऱ्याची रात्र आहे,” मानेमांनी सुरुवात केली.
“अंडरवर्ल्ड कडून पुन्हा मागणी आली आहे काय?” मी बेफिक्रीने विचारले.
“अंडरवर्ल्ड नाही. पण सीबीआय, इडी, आयटी हे एकत्रितपणे छापा टाकण्याच्या तयारीत आहेत. गेले महिनाभर सर्व पुरावे गोळा करून आपल्याविरुद्ध अभेद्य केस बनवली गेली आहे. एक दोन तासांत त्यांच्या गाड्या इथे पोहोचतील. आपल्याला बचाव करण्यासाठी मोजकाच वेळ आहे.” माने सरांनी थोडक्यांत भीषण परिस्थितीची कल्पना दिली.
मला आर्थर रोड, ठाणे, नाशिक, येरवडा आदी तुरुंगांची दारे दिसायाला लागली.
“मग आता?” माझ्या तोंडून पूर्ण वाक्य सुद्धा बाहेर पडेना. घशाला कोरड पडली.
मानेमामा पण हिकमतीचे. त्यांनी एक काळी अटैची समोर ठेवली.
“आता मी काय सांगतो ते नीट ऐका. असा प्रसंग केव्हातरी येणार ह्याची कल्पना मला पहिल्यापासून होती. मी सर्व जय्यत तयारी करून ठेवली होती. ह्या ब्रीफकेस मध्ये तुमचा जाली पासपोर्ट आहे. कनेक्टिंग फ्लाईटस् ची तिकिटे आहेत. पर्स मध्ये कॅश आहे , अडीअडचणीला लागली तर. तुमचे नवीन नाव आहे शिवाप्पा नाईके आहे. तुम्ही आता ताबडतोब विमानतळाकडे प्रस्थान करा. प्रथम तुम्हाला कोलंबो फ्लाईट पकडायची आहे. मी आधीच रिमोट चेक इन करून ठेवले आहे. कोलंबोमध्ये तुम्ही बिनधास्त आराम करा. जमले तर चांगली झोप घ्या. कोलंबोहून रात्री एकच्या सुमारास कोलंबो – न्यूयॉर्क फ्लाईट आहे. ती पकडून तुम्ही न्यूयॉर्कला पोहोचाल. न्यूयॉर्कहून मी तुमच्या साठी चार्टर्ड फ्लाईटची व्यवस्था केली आहे. ती तुम्हाला सेंट सॅखोरोम आयलंड वर घेऊन जाईल. पुढील काही वर्षांसाठी हेच तुमच्या मुक्कामाचे ठिकाण राहील. सेंट परसेंट बॅंक ऑफ सॅखोरोम मध्ये आपले खाते आहेच. स्विस मधून मी सगळे पैसे तिकडे तुमच्या नवीन नावाच्या खात्यावर ट्रांसफर केलेले आहेत. तुमचा नवीन मोबाइल पण आत आहेच. इकडे कोणालाही – अगदी मलाही कॉल करू नका. काही दिवसांनी मी लिलीला तिकडे पाठवून द्यायची व्यवस्था करेन. तोपर्यंत प्लीज लोकल लिल्यांवर काम चालवून घ्या. हे सर्व एका फाईल मध्ये लिहिले आहे. ती फाईल बॅग मध्ये आहे. मी आता जातो. काळजी घ्या. देवावर विश्वास ठेवा. सर्वकाही ठीक होईल.” असे बोलून मानेमा निघून गेले.
ते गेल्यावर माझ्या मनात अनेक विचारांची गर्दी झाली. ही सगळी पळापळ करून काय साध्य होणार आहे. किती वर्षे कोर्ट कचेऱ्या कराव्या लागतील? माझी इकडची संपत्ती सरकार गिळंकृत करणार हे ठरलेलेच होते. बाहेर ठेवलेला पैसा लॉयर्सच्या घशांत जाणार. माझ्या हातात काय? करवंटी आणि मनस्ताप! केस जिंकू ह्याची शाश्वती नाही ती नाहीच! केस हरल्यावर इथल्या तुरुंगात रेपिस्ट, ड्रगिस्ट, गांजेकस, खुनी अश्या लोकांबरोबर आयुष्य काढावे लागणार. हा उपद्व्याप कशासाठी? कोणासाठी? श्रीमंत होऊन एक मात्र पक्के समजले. माणूस आणि शेपटी हलवणारा कुत्रा, काही खास फरक नसतो. किंवा लाडिकपणे अंगचटीला येणारी मांजरी ---- जाऊ दे. त्यापेक्षा माझे शांत, सरळ, सज्जन, नाकासमोर चालणारे आयुष्य काही वाईट नव्हते.
लिफ्ट पकडून चौदाव्या मजल्यावर माझ्या पेंटहाउसला पोहोचलो. प्रथम माने सरांनी दिलेली फाईल श्रेडरमध्ये टाकली. जुनी जीन्स ट्राउझर, आणि जुना टीशर्ट काढून कपडे बदलले. पैशाचे पाकीट खिशांत टाकले. माने मामांनी बनवलेल्या चोर मार्गाने कोठीच्या पाठीमागच्या गल्लीत उतरलो. खिशात हात घालून लोफर सारखा पुढच्या रस्त्यावर रमत गमत आलो. माझ्या कोठी समोर पोलिसांची गाडी उभी होती. इतर गाड्या येत होत्या. बाजूला पांडू हवालदार दंडुक्याचा आधार घेऊन तंबाखु मळत उभा होता. जवळ जाऊन विचारले, “ क्या कुछ लफडा हुएला है क्या?” त्याने तीक्ष्ण नजरेने उलटे विचारले, “ का? तुझी नाळ पुरली आहे का इथे?” हो म्हणायचे तोंडांत आले होते पण स्वतःला सावरले. झपाझप पावले टाकत कॉलेजकडे निघालो.
सर गणिताचा क्लास घेत होते. वर्गांत अर्थात नेहमीप्रमाणे एकही विद्यार्थी नव्हता. मी सरळ आत घुसलो.
सर रागावले. “प्रभुदेसाई, तुला काही मॅनर्स? क्लास चालला आहे दिसत नाही? बाहेर थांब.”
कॉरीडारमध्ये चक्कर मारत बसलो. तेवढ्यांत पोलिसांची एक जीप कॉलेजमध्ये घुसली. माझ्या पायातले त्राण गेले. अखेर त्यांनी मला पकडलेच. दोन कॉनस्टेबल आणि इन्स्पेक्टर उतरून कॅंटीनमध्ये घुसले. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला. कॉलेजच्या कॅंटीनमध्ये वडापाव, खिचडी, कांदा पोहे, मिसळ, इडली चहा स्वस्तात मिळते ना, ब्रेकफास्ट करायाला पोलीस इकडेच येतात. माझ्या जिवात जीव आला. सरांचा क्लास संपला होता. सरांच्या पाठोपाठ कॉमन रूम मध्ये गेलो.
“आता काय पाहिजे?” सरांनी पृच्छा केली.
“सर तुम्हाला सर्व काही माहीत आहे. बस्स माझे जुने आयुष्य मला परत द्या.” मी गयावया करत म्हणालो, “ तुम्ही मला वाचवले नाहीत तर आजच मला तुरुंगात जावे लागेल.”
सरांना माझी दया आली, “ मला वर बोलावे लागेल. तुझ्यासाठी रदबदली करावी लागेल. बघतो ट्राय करून.”
पुन्हा सरांनी ध्यान लावले. हातवारे करत काही मंत्र जपले. पुन्हा डोळे मिटून चूप बसले. इकडे माझा जीव खालीवर होत होता. शेवटी सरांनी दहा मिनिटांनी डोळे उघडले, “ वत्सा, जा तुझे काम झाले आहे.”
मी सरांचे आभार मानले. माझ्या चिंता क्षणांत दूर झाल्या होत्या. डोक्यावरचे ओझे उतरल्यामुळे मला हलके वाटत होते. कॅंटीन मध्ये जाऊन काहीतरी खायला पहिजे होते. वडा पाव ,मिसळ खाऊन वर स्पेशल चहा ढोसला. रुबाबात बील द्यायला गेलो तर खिशातले पाकीट गायब. खिशात दिडकी पण नव्हती. कॅंटीनवाल्या शेट्टीला खरी परिस्थिती सांगितली. “चलता है शेठ. आप तो डेलीके है. जब पैसा आयेगा तब देना. आपके खातेमे लिख देता हू.”
चुपचाप घरी चालत चालत निघालो.माझ्या कोठीच्या वरून जाणाऱ्या रस्त्यानेच निघालो. विचार केला बघावे काय तमाशा चालला आहे तिकडे. बघतो तर काय. जिथे माझे ऑफिस कम रेसिडेंसची चौदा मजली कोठी होती तिथे एक छोटीशी जुनाट बंगली होती. ही जागा विकत घेऊन आम्ही आमची कोठी बांधली होती. आता तेथे बाहेर व्हरांड्यात आरामखुर्चीवर म्हातारा पारशी “टाईमपास इंडिया” वाचत वाचत झोपी गेला होता. म्हातारी पार्शीण स्वेटर विणत बसली होती. त्यांना पाहून मला बीटल्सचे सदाबहार गाणे आठवले,
When I get older losing my hair
Many years from now
Will you still be sending me a Valentine
Birthday greetings bottle of wine
If I'd been out till quarter to three
Would you lock the door
Will you still need me, will you still feed me
When I'm sixty-four
मी इतका लकी असेन का ? अरे यार मी हेच का नाही मागितले सरांकडे?

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

मजा आली वाचताना. चना शेंग lol

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

हा हा नाइस!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नील लोमस, नील लोमस अॅंड नील
आभार!
"थ्री विशेस्" हा साहित्यातला (वाङ्मय असं लिहायचं होतं पण वाङ्मय हा शब्द कसा लिहायचा ते माहित नसल्यामुळे साहित्य असं लिहिलं.)प्रसिद्ध trope. अनेकांनी ह्यावर सुरस, चमत्कारिक कथा लिहिल्या आहेत.
त्यात माझी ही बाळबोध कथा. तात्पर्य काय तर मागताना विचार करून मागा. कारण जेव्हा देव आपल्याला छप्परफाडके देता है, तेव्हा त्यात फाईन प्रिंट मध्ये जे काय लिहिले असतं ते आपण वाचत नाही. मग ही अशी गोची होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Bedazzled...!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे पण बघा.
https://tvtropes.org/pmwiki/pmwiki.php/Main/ThreeWishes
https://allthetropes.org/wiki/Wasteful_Wishing
गोष्टी अनेक आहेत. त्यात एक अत्यंत फाजील पण मार्मिक अशी गोष्ट.
एका म्हाताऱ्याला तरुण होण्याची इच्छा असते. त्याच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन डेविल त्याला जादूचा जांघ्या देतो. "हा वापर म्हणजे तू सदाबहार तरुण राहशील." नंतरचा सीन असा आहे. बेडरूम मध्ये नग्न तरुणीच्या शेजारी हा झोपून विचार करतो आहे. आता काय?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0