तुमचं वर्ष कसं गेलं?
माझं असं गेलं-
श्वास घेतोय. भूक लागतेय. कमी झालीय पण लागते एकूणात. आसपास पायी फिरायला जाता येतंय. जी अंतरं सहजी पायी जायची नाहीत तिथं जायला बाईक, कॅब, ऑटो परवडते आहे. पगार सुरु आहे. चिमूटभर वाढलाय. नवी कौशल्य पुरेशा वेगात शिकता आली नाहीत अजून. फेब्रुवारीच्या शेवटी फ्रॅक्चर झालं. पण झपाट्यानं दोनेक महिन्यांत जुळुनही आलं. चारेक महिने होईपर्यंत इतका नीट झालो की पुन्हा पूर्वीसारखंच सातेक किमी दिवसाला फिरता येऊ लागलं. आता थंडी वाढली. हिवाळा आला. ते फ्रॅक्चर दुखेल असं सगळे म्हणाले. काहीही झालं नाही. हे सगळं निव्वळ शाकाहार करुन. अर्थात सोबतीला औषध गोळ्या मात्र होत्या vitamin calcium अन इतर काही.मूग, नाचणी चिकार खाणं झालं. तूप खाल्लं. फ्रॅक्चर काळात झोपून झोपून वजन वाढू शकतं असं ऐकलं. माझं तीन चार किलो कमी झालं तीनेक महिन्यात.
फ्रॅक्चर नीट होतं आलं आहे, असं वाटेपर्यंत जून महिन्यात आई एकदमच आजारी. एकदम admit वगैरे. अर्थात कोविड मुळं नव्हे. त्याच वेळी भारतभर दुसऱ्या लाटेचं थैमान सुरुच. त्या ऐन लाटेत आम्ही हॉस्पिटलात. तिथं दिवसभर. तिथलं कँटीन ग्राउंड फ्लोअरच्या खाली, तळमजल्यावर. तिथल्या दारं खिडक्या मोस्टली बंद बंद. मास्क घालणारं तिथं कुणीच नाही. चिकार गर्दी. मी म्हटलं होईल ते होईल. आईसाठी तिथंच होतो. कोविडचा फटका एवढ्या सगळ्या धिंगाण्यात बसला नाही.
आई चारेक दिवसात घरी परतली. महिना भरात पूर्ण recover.