अशोक राणेः दृक्-श्राव्य कलांचे थरारक अनुभव पोचविणारा अवलिया

p2अशोक राणे हे नाव जाणत्या मराठी चित्रपट रसिकांना नवीन नसावे. चित्रपट गुरु, विकास देसाई यांनी तर त्यांना सिनेमा ‘जगणारा’ माणूस म्हणून गौरविले आहे. एक साधा प्रेक्षक, विद्यार्थी, फिल्म सोसायटीचा कार्यकर्ता, चित्रपट समीक्षक, शिक्षक, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ज्युरीचे सदस्य, कधी ज्युरीचे अध्यक्ष, चित्रपट महोत्सवांचे आयोजक-संस्थापक-संचालक-सल्लागार, टीव्ही मालिकांचे लेखक, चित्रपट कथा लेखक, पटकथा लेखक, माहितीपटाचे दिग्दर्शक,…. अशा अनेक रूपात आपल्याला ‘सिनेमा पाहणारा माणूस’ या आत्मकथनपर पुस्तकात ते भेटतात व चित्रपट हे केवळ चार घडीचे करमणूक नसून ती एक अमोघ अशी कलाकृती आहे व ती नेमकी काय असते हे त्यांच्या खिडकीतून आपल्याला दाखवतात. अशोक राणे यांचे अवघे जग आणि जगणं सिनेमाने व्यापले आहे, असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

सामान्यपणे पूर्वीच्या काळात चित्रपटाचे शौकीन म्हणजे ‘वाया गेलेला’ असेच समजले जात असे. राणे यांनीसुद्धा अशाच प्रकारचे टोमणे (आयुष्यभर!) झेलले असतील. म्हणूनच ते अगदी सहजपणे ‘अंधार माझा सोबती’ असे बिनदिक्कत म्हणू शकतात. याची गंमत सांगताना त्यांच्या आईला त्याच्या गर्भारपणाच्या वेळी दिवसभर घरात अंधार करून बसायचे विचित्र आणि वेगळे डोहाळे लागले होते म्हणे. कदाचित या अंधाराची सवय त्यांना आईच्या पोटात असल्यापासून लागलेली असेल. त्या प्रोजेक्टरच्या अंधारातच त्यांना at home वाटत असावं. कारण आज साठी ओलांडल्यानंतरही पूर्वीच्याच उत्याहाने ते सिनेमा पाहतात.

पौगंडावस्थेच्या त्या वयात फर्स्ट डे फर्स्ट शोचे वेड लागलेल्या राणेंनी सत्तरच्या आसपास मुंबईतील कुलाबा ते मुलुंड – दहिसर दरम्यान असलेल्या 117 थिएटर्समध्ये सिनेमे पाहिले असावेत. त्यातील गोलपिठ्याच्या नाक्यावरील ‘अलेक्झांडर’ थिएटरमधील इंग्रजी सिनेमांचे शीर्षक व टायटल्सचे खुमासदार, बेधडक, बेफाम भाषांतर केलेले असायचे व त्याला पिटातल्या प्रेक्षकांकडून भली मोठी दादही मिळत असे. ‘रायडर ऑन द रेन’चं ‘बरसात में ताकधिनाकधिन’, ‘नेवाडा स्मिथ’चं ‘सस्ता खून महंगा पानी’, ‘ब्लो हॉट ब्लो कोल्ड’चं ‘कुछ नरम कुछ गरम’ अशा भाषांतरामधून चित्रपटातील आशयापेक्षा भाषांतरच जास्त करमणूक करत होती म्हणे. राणे यांना सिनेमा पाहण्यासाठी कुठल्याही गावचे थिएटर वा वेळ वा शेजारी कुणी दारुडे याचे अजिबात बंधन नसेल. अगदी स्क्रीनपासून 2-3 फूट अंतरावर बसून लांबुडक्या दिसणाऱ्या शम्मीकपूर – वैजयंतीमाला यांच्या सिनेमाचा अनुभवही त्यांनी घेतलेली आहे. त्यांच्या हिशोबाप्रमाणे जवळपास तीनेकशे सिनेमे ते दरवर्षी पाहतात म्हणे. या आकडेवारीत डॉक्यमेंटरीज व शॉर्ट फिल्म्स नाहीत. चित्रपट पाहणं हेच त्यांच काम.. हेच त्यांचा ध्यास.. त्यांचा श्वास... जसे राज कपूर म्हणायचेः आय ड्रीम सिनेमा.. आय लिव्ह सिनेमा..आय ब्रीद सिनेमा...

गंमत म्हणजे आमच्या पिढीने (व नंतरच्या पिढीनेसुद्धा!) अगदी लहानपणापासून चांगले-वाईट, (ढिशम-ढुशम) फायटिंग असलेले, खळाखळा हसविणारे, ढसाढसा रडवणारे, भयपट-युद्धपट-साहसपट-संगीतपट-नृत्यपट-पौराणिक-ऐतिहासिक-वैज्ञानिक-रोमॅंटिक-ट्रॅजिक अशी वर्गवारी करता येणारे, जगभराचा प्रवास करून आणणारे, मनोज कुमारसारख्यांच्या उबग आणणाऱ्या देशभक्तीने ओथंबलेले, नृत्य-संगीत-गाण्यांची रेलचेल असलेले, निसर्ग सौंदर्याला उजळून टाकणारे असे कित्येक प्रकारचे चित्रपट पाहिले असतील. त्या काळी घर बसल्या बसल्या काश्मीर, पॅरिस, स्वित्झर्लँडचे नयनरम्य दृष्य दाखविणाऱ्या चित्रपटांची चलती होती. तरुणपणचे राणेसुद्धा असले चित्रपट पाहून वाया गेले असतील, परंतु त्यांच्यासाठी सिनेमा फक्त मनोरंजन करणारी गोष्ट न राहता एखाद्या अनोळख्या प्रदेशाच्या भोवतालच्या कित्येक गोष्टी दाखविणारे आगळे वेगळे रसायन होते. कथा कादंबऱ्यातल्या जगापेक्षा अत्यंत वेगळे. राणे यांना त्या काळच्या मराठी साहित्यातून जेमतेम महाराष्ट्र दिसत होता. मराठी नाटकातल्या बॉक्स सेटमधून श्रीमंतांच्या घरातले दिवाणखाने दिसत होते. परंतु आयुष्यात कधी न पाहिलेले रम्य काश्मीर, सायोनारा म्हणणारा जपान व आख्या जगाची सफर करून आणणारी अशी ही चित्रपटसृष्टी होती व त्याच्या प्रेमात राणे पडले होते.

खूप रडवणारा सिनेमा म्हणजे तो चांगला सिनेमा अशीच त्याकाळी वाटत होते. दुःखाची आळवणी करणारी मीना कुमारी तर प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत होती. म्हणूनच ‘बेटी बेटे’, ‘मेहरबान’, ‘बूट पॉलिश’, ‘तू सुखी रहा’, ‘मोलकरीण’, ‘श्यामची आई’ असल्या चित्रपटांची त्या काळी चलती असावी. ‘दोस्ती’, ‘ससुराल’, ‘जिंदगी’, ‘अनपढ’, ‘पूजा के फूल’, ‘दिल एक मंदिर’, ‘मदर इंडिया’, ‘खानदान’, ‘मैं चुप रहूंगी’ असे काही रड रड रडवणारे चित्रपट पाहताना भावनाविवशतेवर ताबा ठेवणे फारच कठिण गेले असेल. रडवे चित्रपटांबरोबर हिरो-हिरोइन्सचे रोमान्सही राणेसारख्या दर्दी प्रेक्षकांना पागल करून टाकायचे. त्यामुळेच की काय एक संपूर्ण पिढी दिलीपकुमार, राज कपूर, देव आनंद इतकेच प्रदीप कुमार, राजेंद्र कुमार, भारत भूषण, विश्वजित, जॉय मुखर्जी, शम्मी कपूर इत्यादींना पडद्यावर पाहण्यासाठी खिशातील पैसे फेकून अगदी रद्दड चित्रपटांनासुद्धा सिल्वर ज्युबिलीपर्यंत पोचवत होते. राणे यांना तर राज कुमार (कन्नड चित्रपटांचा सुपरहीरो नव्हे!) भलताच आवडायचा. त्याची ती डायलॉगबाजी, त्याच ते स्टायलिश चालणं, त्याचे ते पांढरे बूट, गळ्याभोवती भिरकाऊन दिल्यासारखा टाकलेला मफलरमुळे तो विशेष नजरेत भरायचा. अशा हिरो-हिरोइन्सचे चित्रपट पाहून थिएटरच्या बाहेर पडल्यानंतर रोमान्स व दुःखाचा उत्सव करावा असे ते दिवस होते याची कबूली राणे देतात. व्ही शांतारामच्या ‘नवरंग’ चित्रपटातील ‘आधा है चंद्रमा रात आधी’ या गाण्यातील लताचे स्वर व संध्याच्या नृत्याचा थरारा ते विसरत नाहीत.

अशोक राणेंना चित्रपट संगीताचे वेड रेडिओनी, विशेष करून दर बुधवारी आतुरतेने वाट पहायला लावणाऱ्या बिनाका गीतमाला या कार्यक्रमानी (व त्यातील सरताज गीतांनी!) लावला. अमीन सयानीची आवाज की दुनियाके दोस्तो... ही हाक त्याकाळच्या सिनेसंगीताच्या वेड्यांना परवलीची हाक वाटायची. रेडिओवरील रफीच्या गाण्यांवर, त्याच्या बुलंद, कधी हळुवार, मुलायम व शब्दांचे केलेले लाड यावर राणेंच्या काळातली आख्खी पिढी फिदा झालेली होती. त्याच काळातली आठवण म्हणून सिनेमाच्या मध्यंतराच्या वेळी गाण्याच्या पुस्तकांची होणारी विक्री व तसल्या आठ पानांच्या पुस्तकांच्या संग्राहकाविषयी राणे कौतुकाने उल्लेख करतात.

बालपणी (व तरुणपणीसुद्धा) सिनेसंगीताचे वेड हमखास लागतेच. परंतु तो काळ सरला की त्याचे तेवढे कौतुक वाटेनासे होते व आपण जीवनाच्या रहाटगाडग्यात अडकून पडल्यामुळे संगीत विसरून टाकतो. परंतु काही धुनं आयुष्याची साथ करतात व राणेसारख्या सिनेसंगीताचे वेड्या कुतूहलापोटी त्याच्या निर्मिती प्रक्रियेविषयी विचार करू लागतात व याच शहाणपणामुळे ते संगीताचा रसास्वाद घेऊ लागतात. ‘सिनेमात गाणे कशासाठी हवेत?’ हा एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न असतो. व त्याची उत्तरं राणेसारखे अभ्यासक आपापल्या परीने देत असतात. राणेंना जेव्हा हा प्रश्न सतावत होता तेव्हा त्यांनी चक्क ‘सिंगिंग इन सिनेमा’ ही डॉक्युमेंटरी काढून उत्तर दिले. ही त्यांची पहिली डॉक्युमेंटरी होती. चित्रपटसृष्टीतले आद्य अरेंजर-कंडक्टर असे नावाजलेले अँथनी गोन्साल्विस यांच्यावरही त्यानी एक डॉक्युमेंटरी काढली. या डॉक्युमेंटरीचे नाव होत अंथनी गोन्साल्विसः म्युझिक लीजंड. सिंगिंग इन सिनेमा या डॉक्युमेंटरीसाठी मा. दत्ताराम यांच्या आठवणीचा प्रवास लक्ष्मीकांत – प्यारेलाल या संगीतकार जोडीतील प्यारेलालनी घडवून आणला होता.

या अफाट मुंबई शहरानं अशोक राणे यांना भरपूर काही दिलेले आहे. त्यांनीच उल्लेख केल्याप्रमाणे हे पुस्तक त्या अर्थाने आत्मचरित्र नसले तरी सिनेमा जगू पाहणाऱ्या या वल्लीची जडण-घडण कशी होत गेली हेही पाहणे तितकेच इंटरेस्टिग असू शकेल. मुंबईतील कामगार वस्तीतील त्या चाळी, सार्वजनिक नळावरील 2-3 हंडे पाणी भरण्याच्या वेळचा तो किचाट व राडा, दुधाच्या बाटल्या आणण्यासाठीची भल्या पहाटे केलेली पायपीट, आया-बायांच्या मालवणी शिव्या, वाचनाच्या बाबतीतील होत असणारी उपासमार संपविणारे शेरिंग केलेली वर्तमानपत्रे, त्यातील त्या काळच्या खून-मारामारीच्या भडक बातम्या, गिरणी कामगारांच्या जीवनाशी संबंधित असलेले संप, बोनस, पगारवाढ. आंदोलन इत्यादींच्या बातम्या इत्यादींनी राणे यांचे क्षितिज रुंदावण्यास हातभार लावले. म्हणूनच त्यांना ‘अंडरस्टँडिंग सिनेमा इज अंडरस्टँडिंग लाइफ’ असे म्हणावेसे वाटते.

त्याचप्रमाणे भारतमाता या थिएटरने ‘साधी माणसं’, ‘शेवटचा मालुसरा’, ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘संथ वाहते कृष्णामाई’, ‘एक गाव बारा भानगडी’, ‘एकटी’, ‘जिव्हाळा’ या सारख्या मराठी चित्रपटांचा अर्क असे समजलेल्या मराठी सिनेमांची सवय (नव्हे चटक) त्यांना लावली. त्यातील बहुतेक रडारड चित्रपट होते. तरीसुद्धा सुलोचनाताईंचे अभिनय म्हणजे संयत मेलोड्रामा म्हणजे काय याचे वस्तुपाठच होते असे राणेंना वाटते. जन्मजात उत्सुकतेपोटी वेगळं काही तरी येते कुठून, येते कसे असे प्रश्न विचारत ते साहित्य, नाटक व चित्रपट या कलाप्रकारातून भरपूर काही त्या काळी शिकू शकले.

त्याच सुमारास सिनेमा, सिनेमा संस्कृती व समाज समजून घेण्याचा प्रयत्न ते करू लागले. सिनेमा थिएटरच्या एक्झिट गेटवर उभे राहून आधीचा शो सुटल्यानंतर बाहेर पडणाऱ्यांना सिनेमा कसा आहे असे विचारून चित्रपटाबद्दलचा प्रतिसाद काय होता हे समजून घेऊ लागले. लोक उत्साहाने, बकवास है, सॉलिड है, क्या ढासू पिक्चर है बाप, हिरो मामू है, लेकिन हिरोइन... खल्लास असे बॉंबे स्टाइलने रिअॅरक्शन्स द्यायचे. काही वेळा तर पिक्चर को स्टोरीच नय, यार ही कमेंट ऐकून तर ते गारदच व्हायचे. कारण हिंदी पिक्चर आणि स्टोरी नाही असे कधीच होणार नाही. हिंदी पिक्चर्समध्ये तर सर्व प्रकारचा भरगच्च मालमसाला हवा; पाठलाग, मारामारी, 'खानदान की इज्जत', 'मै मॉ बननेवाली हूं', खून, ('माय लॉर्ड'चे तद्दन खोटे खोटे) कोर्ट, बचपन में बिछडे हुए भाई-बहन, आरे कॉलनीतील झाडाभोवती पिंगा घालत म्हटलेले द्वंद्व गीत, असे काहीही ओढून ताणून चित्रित केलेल्या चित्रपटाला स्टोरी नाही असे कसे शक्य आहे. परंतु हिंदी सिनेमाबद्दलचे हे मत मात्र राणे यांच्या पूर्ण आयुष्यात लक्षात राहिली. हे असले नमूनेदार कॉमेंट्स ऐकून झाल्यानंतर पूर्वग्रह दूर सारून ते चित्रपट पाहायचे. कलाकार, कलाकृती व रसिक हे एक त्रिकोन असून समूहातील रसिकांची मानसिकता कशी असू शकते हे एक न सुटलेले कोडे आहे, हे त्याना उमजू लागले. भरपूर खर्च करून तयार केलेला चित्रपट का आपटतो व एखादा रद्दड सिनेमा बक्कळ धंदा का करतो हे कधीच समजणार नाही. याचा विचार करणे हाच चित्रपट रसग्रहणाचा मूळ पाया आहे. नंतरच्या त्यांच्या आयुष्यात याचा त्यांना भरपूर उपयोग झाला. राजेश खन्नाच्या त्या सुवर्ण काळात (अजून अमिताभ बच्चनची कारकीर्द सुरु झाली नव्हती) अंकुर अनुपमासारखे चित्रपट पाहून भारावून जाण्यावरूनच चित्रपटांकडे बघण्याची त्यांची नजर बदलत गेली असे म्हणता येईल.

फिल्म सोसायटी ही एक सांस्कृतिक चळवळ आहे, हे अनेक सभासदांच्या वा कार्यकर्त्यांच्या ध्यानी मनीसुद्धा नसते. ‘पैसा फेको व सिनेमा देखो’ असेच सभासदांना वाटते. कार्यकर्ते म्हणजे त्यांचे नोकर की काय असे त्यांना वाटत असते. कार्यकर्ते पॅशनपायी लष्कराच्या भाकऱ्या भाजत असतात. व त्याची फिकिर कुणालाही नसते. दर महिन्याला कुठली फिल्म दाखवायची, फिल्मच्या रिळा असलेल्या त्या पत्र्याच्या पेटींची वेळेवर केलेली ने आण, प्रोग्रॅम नोट्स काढणे, सायक्लोस्टाइल (त्याकाळी झेरॉक्स मशीन्स नव्हते.) करून वाटणे, खुर्च्या नीट लावून ठेवणे, बेंच पुसून ठेवणे, प्रोजेक्टरची देखभाल इत्यादीसाठी घेतलेले कष्ट या गोष्टी कुणाच्याही खिजगणतीत नसतं. एफएफएसआय-अर्काइव्ह्ज म्हणजे काय, फिल्म कुठून येते, कशी येते, हे कोण कसं ठरवतं इत्यादी गोष्टी काही अपवाद वगळता कार्यकर्त्यांनासुद्धा माहित नसतात. राणेसारखे दर्दी चित्रपट भक्त मात्र उत-मात न करता वसा घेतल्यासारखे फिल्म सोसायटीच्या चळवळीत झोकून घेत असतात.

फिल्म सोसायटीची चळवळ जोर धरू लागली. राजकपूरच्या आरके फिल्म्सचे पटकथाकार व फिल्म फेडरेशनचे अध्यक्ष वसंत साठे, चित्रपट समीक्षक व फिल्ममेकर के ए अब्बास यांच्यासारखे मातब्बर मंडळी त्यांना भेटले. मायानगरीतील अनेक किस्से व आख्यायिका ऐकावयास मिळाले. जणू काही कुठलेही औपचारिक शिक्षण नसलेल्याला डायरेक्ट विद्यापीठातच प्रवेश मिळाल्यासारखे त्यांना त्याकाळी वाटले असेल. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या फिल्म मेकर्सच्या चित्रपटांनी व इतर अनेक फिल्म फेस्टिव्हल्सनी सिनेमा ही कलाकृती म्हणून किती उच्चप्रतीची आहे याची जाणीव त्यांना दिली. इतरांच्या डोक्यावरून जाणाऱ्या आर्ट सिनेमांना ते डोक्यावर घेवू लागले. त्यांच्यापुरते चित्रपटसृष्टीतला हा प्रवेश अलीबाबाचा गुहेतल्या प्रवेशासारखा होता. चित्रपट रसिकांची जातकुळी वेगवेगळी असली तरी त्यांच्यातील एक कॉमन गोष्ट म्हणजे सिनेमाबद्दलचे विलक्षण वेड व जबरदस्त पॅशन! काही रसिक अत्यंत जुन्या मूक चित्रपटातून बाहेर पडायला तयार नव्हते. काहींना के एल सायगलने वेड लावलेले होते. काहींना दिलीपकुमार तर काहींना ओपी नय्यर वा मदनमोहन. काही जण तर एखादा चित्रपट शंभर – दोनशे वेळा पहात होते. चित्रपटातील डायलॉग पाठ केल्यासारखे धडाधड म्हणून दाखवत होते. अशा विविध प्रकारचे चित्रपटवेड्याच्या अड्ड्यात राणे वावरू लागले. आणि राणेसुद्धा कमी वेडे नव्हते. 1981 सालच्या भारतीय सिनेमाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील रोज चार प्रमाणे महिनाभर जागतिक कीर्तीचे 116 चित्रपट पाहण्यासाठी जीवाच्या आकांताने तासनतास रांगेत उभे राहून पुढे पळताना हातातील पुस्तक व डोळ्यावरील रेबनचे महागातील गॉगल पडून गेल्याची पर्वा न करता व महिन्याच्या पगारापेक्षा दुप्पट पैसे मोजून सिनेमा पाहण्याचा पराक्रम यांच्या नोंदी आहे.

'सिनेमा असाही असतो वा सिनेमाची गोष्ट अशीही असू शकते' याचा ज्ञानोदय त्यांना झाला. त्यांचे डोळे दिपवून गेले. व आयुष्यभरासाठीची शिदोरी त्यांच्या हाती लागली. सिनेमाविषयक समज, समजुतींना छेद देणारी नवी दिशा त्यांना या काळात सापडली. अधाशासारखे सिनेमा पाहत असतानाच त्याच्याबरोबर वाचन हवं हे प्रकर्षाने जाणवू लागले. प्रोग्रॅम नोट्स वाचू लागले. फिल्म सोसायटीच्या स्मरणिका वाचू लागले. खालिद मोहम्मद यांचे टाइम्स ऑफ इंडियात येत असलेवे चित्रपट परीक्षण ते वाचू लागले. चित्रपटांच्या अभ्यासाचे पाठ्यपुस्तकं असे समजलेले क्लोजअप, इफसोन आणि इंडियन फिल्म कल्चर यातील लेखांची उजळणी ते करू लागले. इंटरनॅशनल फिल्म गाइडविषयी कळल्यानंतर रद्दीच्या दुकानात जाऊन रद्दी उपसत चित्रपटविषयक पुस्तकं विकत घेण्याचा (व त्या वाचून काढण्याचा) सपाटा त्यांनी लावला.

याच वाचनातून व भोवतालच्या जगाच्या निरीक्षणातून इतरांपेक्षा वेगळ्या दृष्टीने ते आवतीभोवती बघू लागले व गप्पा-टप्प्यात इतराना सांगू लागले. त्यांच्या निरीक्षणशक्तीला दाद देत गांगलांनी त्यांना लिहिते केले. फाफट पसारा न करता मुद्देसूदपणे लिहिण्याचे धडे त्यांनी राणेंना दिले. अशा प्रकारे मराठी सिनेपत्रकारितेत त्यांचा प्रवेश झाला. तोपर्यंत काही मोजकेच पत्रकार हिंदी वा काही वेळा इंग्रजी चित्रपटाबद्दल मराठीत लिहिणारे होते. चित्रपट परीक्षणात बहुतेक करून चित्रपटाची कथा सविस्तरपणे लिहिलेली असायची व अधून मधून ‘पसरट, ठिसूळ किंवा बांधेसूद पटकथा’, ‘संकलकाने कात्री अधिक चालवायला हवी’, ‘सुमार किंवा चांगले दिग्दर्शन’, ‘नयनरम्य छायाचित्रण’, ‘उथळ किंवा दर्जेदार अभिनय’, अशा समीक्षकी वाक्याची पेरणी असे. या परीक्षणात रसग्रहण हा प्रकार अजिबात नव्हता. चाकोरी बाहेरच्या चित्रपटासाठी त्यांच्याकडे लिहिण्यासारखे काहीही नव्हते. व त्याचप्रमाणे मराठी चित्रपटाबद्दलही. कारण त्या काळचे मराठी चित्रपट म्हणजे सर्व काही अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे या जोडगोळींच्या वर बेतलेले ‘इनोदी’ चित्रपटांचा उच्छाद. परंतु राणेंच्या परीक्षणात प्रेक्षक चित्रपट कसा पाहतो यावर भर असे. कारण फिल्म सोसायटीत बघितलेल्या चित्रपटांनी या क्षेत्रातील अनेक पदर उलगडून दाखविले होते. व त्याचा फायदा राणेंना परीक्षणं लिहिताना झाला. इंग्रजी चित्रपटच परीक्षण लिहिण्याच्या लायकीचे असतात, हिंदी चित्रपट नाही हा पूर्वग्रदूषित दृष्टिकोन विसरून ते हिंदी चित्रपटांचे परीक्षण रसरंगसाठी करू लागले.

याच काळात फ्रेंच न्यू वेव्ह (व तिला प्रेरणा देणाऱ्या सिनेमाथिक फ्रान्से) आणि त्या चळवळीचे फ्रान्स्वा त्रुफो, ज्याँ लुक गोदार, क्लॉडे शाब्रॉल, एरिक रोहमर, आंद्रे बांझा इत्यादींचे लेख असलेले ‘काहिए द्यु सिनेमा’ हे नियतकालिक त्यांच्या हातात पडले. त्या नियतकालिकेतील लेखांनी त्यांच्या लेखनशैलीला वेगळी कलाटणी दिली. सिनेमाचे बायबल असे समजलेले ‘फिल्म सेन्स’ व ‘फिल्म थेअरी’ या पुस्तकातून चित्रपट विश्वाचा अगदी जवळून परिचय त्यांना झाला.

राणे यांना दर्दी चित्रपट रसिक व सिनेपत्रकार घडविण्यात पुण्यातील फिल्म आर्काइव्हतर्फे घेण्यात येणाऱ्या फिल्म अप्रिसिएशन कोर्स व कार्यकर्त्यांच्यासाठी त्यावेळी आयोजित केलेल्या कार्यशाळेचा फार महत्वाचा वाटा आहे. आपल्याला सिनेमा कळतो असे वाटत असते, पण तसा तो कळलेला नसतो याची जाण अशा कोर्सेस व कार्यशाळेतून होऊ शकते, याची पूर्ण कल्पना राणे यांना होती. आर्काइव्हच्या सतीश बहादुर या ऋषीतुल्य शिक्षकांकडून प्रतिमा, ध्वनी, संकलन इत्यादी संकल्पनाबद्दल मिळालेले धडे ते कधीच विसरणार नाही. सत्यजित राय यांच्या 'पथेर पांचाली', 'अपराजितो' व 'अपुर संसार' या चित्रपटांच्या प्रत्येक फ्रेम न फ्रेमच्या वैशिष्ट्याबद्दल त्यांच्या तोंडूनच ऐकून धन्य झालेल्या अनेक विद्यार्थ्यापैकी ते एक होते. त्यांनी करून दिलेल्या चित्रपट रसास्वादाच्या मूलद्रव्यांचा परिचयाची शिदोरी आयुष्यभर लक्षात राहणारी होती. श्यामला वनारसे यांनी फिल्म सोसायटीचा कार्यकर्ता हा सांस्कृतिक चळवळीचा कार्यकर्ता असतो हे मनात बिंबविण्यासाठी अनेक उदाहरणांसकट केलेले विवेचन कार्यशाळेतील कुणीही विसरू शकत नाही.

चित्रपटाचे एडिटिंग कसे होते हे समजून घेतल्याशिवाय चित्रपटाचे शिक्षण पूर्ण होत नाही. तरीसुद्धा एडिटर म्हणजे सबकुछ हेही तितकेसे खरे नव्हे. चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम असून कथा, पटकथा, संवाद कुणीही लिहिले असतील तरी ती दिग्दर्शक सांगत असलेली गोष्ट, नरेटिव्ह असते. गीत-संगीत, हीरो-हीरोइन्स-व्हिलन यांचे स्टाइल्स कितीही उच्च प्रतीचे असले तरीही त्यास दिग्दर्शकांच्या पसंतीच्या शिक्याशिवाय चित्रपट पुढे सरकू शकत नाही. राणे यांना त्या काळी हे सर्व समजून सांगणारी मंडळी भेटली. त्यातील बारकावे समजून सांगितले. त्यामुळे राणे यांना एडिटिंग हे येरा गबाळाचे काम नव्हे हे लक्षात येऊ लागले. चित्रपट निर्मिती हे एक सर्जनशील समूहाच्या प्रयत्नातून होत असलेली कलाकृती असते हे भान ठेवल्यास आपण करत असलेल्या कमेंट्समुळे किती जण दुखावतील हे लक्षात ठेऊनच कमेंट्स करावे हे त्याना कळू लागले.

अनेक वेळा तरूण सिने पत्रकांरांना आपण कुणी तरी वेगळे आहोत याची नशा चढते. कारण सेलिब्रिटीबरोबरची ऊठबस, खाणे-पिणे, प्रेसशो व मुहुर्ताच्या ठिकाणी मिळत असलेले आदरातिथ्य, शूटिंगच्या ठिकाणच्या भेटी इत्यादिमुळे पत्रकार स्वतःला आपण कुणी तरी ग्रेट आहोत, असे (उगीचच) वाटून घेत असतो. त्यामुळे कुठल्याही चित्रपटावर सपासप वार करत सुटणे हेच सिनेपत्रकारांचे कर्तव्य असे वाटत असते. परंतु हे किती खोटे आहे, हे लक्षात ठेवूनच राणे यांची ही सिनेपत्रकाराची वाटचाल होत होती. मुळात परीक्षणामुळे चित्रपट आपटतो किंवा धो धो चालतो यावर राणे यांचा अजिबात विश्वास नव्हता. समीक्षक म्हणजे झोड झोड झोडणारा हे पटण्यासारखे नाही. महत्वाचे म्हणजे सर्वसामान्यांच्या जगण्यातील भाव-भावना, दैव-देव यांना समजून घेत, वैचारिकतेपासून दूर असलेल्या प्रेक्षकांनी काही कळत नाही म्हणून डोज देत राहणे हे योग्य नाही असे राणेंना वाटत असल्यामुळे त्यांची चित्रपट समीक्षा समतोल असत. त्यात कुठेही पुरोगामित्वाचा वा आपल्याला फार कळते याचा आव नसायचा. शोले का चालला, वा जय संतोषी माँ देशभर का गर्दी खेचत होता, हे समीक्षकाला माहित नसल्यास त्याची समीक्षा चित्रपटाला न्याय देणारी नसते, हे राणेंना या पत्रकारितेच्या क्षेत्रात वावरताना कळून चुकले. असेच एकदा निर्भीडपणे केलेल्या महेश कोठारींच्या ‘दे दणादण’ या चित्रपटावरील परीक्षणामुळे राणे यांना किती मनस्ताप सोसावा लागला ही हकीकत मुळातूनच वाचायले हवे. त्याचप्रमाणे मराठी अस्मितेचे ढोल बडविणाऱ्यांचे डोळे उघडायला लावणाऱ्या असे वाचक, अशी प्रतिक्रिया... हाही लेख वाचायला हवा.

राणे यांचा आत्मकथा वजा आलेख वाचत असताना राणे चित्रपटक्षेत्रातील एकाच ठिकाणी विसावले असून त्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून पुढील आयुष्य घालवत आहेत, हे कधीच जाणवत नाही. राणे म्हणजे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व. सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे सिनेमाच्या अनेक रूपात मुक्त संचार. त्यामुळे दिल्ली, हैदराबाद, येथील महोत्सव व गोव्यातील इफ्फीसारख्या वेगवेगळ्या फिल्मोत्सवातील चित्रपट पाहण्यासाठी आटापिटा करणे हे ओघानेच आले. अनेक महोत्सवात ते ज्यूरी म्हणूनही त्यांना बोलवण्यात येत होते. या महोत्सवात त्यांच्या आवडत्या अभिजात चित्रपटाबरोबर झानुसी, इस्तवान गाल, बर्नार्डो बर्तोलुची, रॉबर्टो बेनिग्री, इस्तवान झाबोसारखे अनेक फिल्ममेकर्सही भेटले. या फिल्मोत्सवाची गंमत सांगताना अनेकानेक कलाकृतींची व जगभरच्या लक्षणीय चित्रपटांच्या मेजवानीबरोबर अनसेन्सॉर्ड चित्रपट बघण्यासाठी अशा फेस्टिव्हल्सना आंबटशौकीन गर्दी करतात हे त्यांचे निरीक्षण बरेच काही सांगून जाते. फिल्मोत्सव कशासाठी याचे उत्तर हे त्याच्यांच शब्दात सांगायचे तर “मुळात कुठलाही महोत्सव म्हणजे केवळ अभिजात कलाकृतींचाच त्यात समावेश असायला हवा, असं कसं असू शकेल? आणि केवळ अभिजात कलाकृतीच दाखवायचं हेच महोत्सवाचं कार्य आणि उद्दिष्ट आहे का? नाही! मग महोत्सव म्हणजे काय? सिनेमाच्या जगात काल काय घडलं, त्याने कुठल्या परंपरा निर्माण केल्या, कसल्या प्रकारच दिशादिग्दर्शन केलं, आजचा सिनेमा कसा आहे, कुठले नवे प्रवाह निर्माण होत आहेत, बदलत्या काळानुरूप बदलता आशय, बदलता घाट आणि या सर्वांना वेढून घेतलेलं बदलतं तंत्रज्ञान, उद्याचा सिनेमा असा हा सिनेमा माध्यमाचा आणि त्यानी निर्माण केलेल्या अवकाशाचा विशाल पट एका व्यासपीठावर समजावून सांगणं हे खरे तर महोत्सवाचं कार्य आणि उद्देश आहे. त्यामुळे इतकं वरवर आणि आवडलं-नावडलं एवढ्यापुरतंच बोलता येणार नाही. त्याच्या अल्याडपल्याड खूप काही आहे. आंतरराष्ट्रीय महोत्सव म्हणजे काय याचं नेमकं भान मला आलं आणि न चुकता वारीला जाणं होत राहिलं.” गंमत म्हणजे हे पुस्तक राणे यांच्या आयुष्याच्या हकीकती वा जडण-घडण यांचेच फक्त तपशील न सांगता चित्रपट व इतर कलाक्षेत्रातील मातब्बर मंडळींच्या गुणदोषांचे किस्सेही सुनावत असल्यामुळे एवढे पाचशे पानी पुस्तकं (पुन्ह पुन्हा) वाचताना अजिबात कंटाळवाणा वाटत नाही.

अशाच प्रकारे त्यांची बहुश्रुतता बहरत गेली. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूट आणि झेवियर्स इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकोशनमध्ये सिनेमाचे सौंदर्यशास्त्रही त्यांनी शिकविले. विद्यार्थ्यांना शिकविताना ‘आय अॅनम हीअर नॉट टु टीच बट टु शेअर माय ओन एक्स्पिरियन्स’ अशी सुरुवात करून मास्तरकी करत होते. निखिल वागळेच्या अक्षर प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेल्या राणे यांच्या सिनेमाची चित्तरकथा या पुस्तकाला 1996च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात बेस्ट रायटिंग ऑन सिनेमा या विभागात राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. चित्रपट विषयावर व्याख्यान देण्यासाठी ठिकठिकाणाहून आमंत्रणं येऊ लागली. व्याख्यानाच्या वेळीसुद्धा अशोक राणे हे नेहमीच चित्रपटावरील आपले प्रेम कुठल्या ना कुठल्या रीतीने व्यक्त करण्याची एकही संधी दवडू देत नसल्यामुळे अनेकदा संयोजकांची पंचाइत होत असते. तरीसुद्धा त्यांना बोलावले जाते हेही महत्वाचे.

चित्रपट महोत्सवांचे ज्यूरी व इतर काही निमित्ताने राणे यांनी लंडन, अॅीमस्टरडॅम, बर्लिन, व्हिएन्ना, बुडापेस्ट, मास्को, सेंट पीटर्सबर्ग, झ्युरिक, न्यूयॉर्क, शिकागो, वाशिंग्टन, सॅन फ्रान्सिस्को, टोरांटो, माँट्रिय़ल अशा चित्रपटांच्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. चित्रपटांबरोबर या शहरातील म्युझियम्स पाहिले. युरोपियन, रशियन व अमेरिकन रसिकांच्या कलासक्तपणाला मनापासून दाद दिली. पेंटिंग्स, शिल्पकृती, ऐतिहासिक इमारती पाहून राणे थक्क झाले. यातील काही शहरात त्यांना आलेल्या जिवंत अनुभवाबद्दल वाचत असताना आपणही ते स्रव क्षणं जगलो की काय असे वाटू लागते. जरी बसू भट्टाचार्य राणेंना कितना बदमाश है असे प्रेमाने म्हणत असले तरी राणे यांच्यातील उपजत चांगुलपणामुळे यातील बहुतेक शहरात त्यांची देशी-परदेशी मित्रमंडळी विखुरलेले आहेत. त्यांना केवढी तरी माणसं भेटली. सिनेमावरच नव्हे इतर अनेक गोष्टीवर बोलणारी माणसं भेटली. त्यांच्या नजरेतून, जाणिवातून भरपूर काही राणे यांना मिळाले.

सिनेपत्रकारितेच्या काळात त्यांनी सुमारे दीडशे मुलाखती घेतल्या असतील. त्यात चित्रपटसृष्टीतील दिग्गजाबरोबरच निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ इत्यादींचीही ते मुलाखत घेत होते. नाटक, साहित्य, चित्र, संगीत या क्षेत्रातील मंडळींचाही यात समावेश होता. या मुलाखतीतून कलाकारांचा कलाप्रवास उलगडत होता. त्याकाळच्या वैशिष्ट्य लक्षात येत होते. कलाकारांचे अंतरंग व निर्मितीप्रक्रियेतील खाच-खळगे कळत होते. रूढ प्रकारचे प्रश्न न विचारता कलाकारांना बोलते करत होते. कुणाच्या खासगी आयुष्याविषयी ते कधीच आपणहून प्रश्न कधीच विचारत नसतं. कुठलेही फाजिल कुतूहल त्यांच्या मुलाखतीतून व्यक्त होत नव्हते. मुळात गॉसिपविषयी त्यांना तिटकारा असल्यामुळे कलाकार आपणहून अनेक विषयावर गप्पा मारत असत. त्यामुळे मुलाखती जिवंत वाटायच्या. हे सर्व अनुभव विविध प्रकारचे असत व त्यातूनच राणे यांचे कलाविश्व समृद्ध होत गेले. त्यांच्या मते ग्रेट सिनेमाटोग्राफर व्ही.के.मूर्ती व श्याम बेनेगल यांची त्यानी घेतलेले उत्कृष्ट मुलाखती होत्या. त्यांनीच उल्लेख केल्याप्रमाणे मुळात मुलाखती हे निमित्त, परंतु ज्येष्ठ-श्रेष्ठ मंडळीना भेटणं व त्यांच्या तोंडून सिनेमा व इतर सर्व कला व त्यांच सौंदर्यशास्त्र आणि त्या त्या काळचा बदलत्या समाजाबद्दल जाणून घेणं हे महत्वाच होतं. प्रेक्षक व वाचक यांच्या आवडी-निवडीतील होत गेलेले बदल हेही तितकेच महत्वाचे आहेत, असे राणे यांना वाटते.

मागच्या पिढीतल्या सिने रसिकांचे जागतिक सिनेमाविषयीचे कुतूहल शमविण्यासाठी फिल्म सोसायटीच्या चळवळींने भरपूर मदत केली. परंतु नव्या पिढीतल्या रसिकांना जागतिक सिनेमा घरबसल्या पाहता येऊ शकल्यामुळे फिल्म सोसायटींची उपयुक्तता जाणवेनाशी झाली. 16 व 35 एमएमची फिल्म्सची रिळं व त्यासाठीचे प्रोजेक्टर या वेळखाऊ तंत्रज्ञानाऐवजी व्हिडिओ टेप्स व प्रोजेक्टर्सचा वापर करून चित्रपट पाहता येऊ लागले. त्यानंतरच्या काळात सिडी, डीव्हिडींचा जमाना आला, डिजिटल माध्यमाच्या क्रांतीमुळे हार्ड ड्राइव्ह्जवर हजारो फिल्म्स उपलब्ध होऊ लागल्या. 24 तास रतीब घालणाऱ्या टीव्हीवर अधून मधून अभिजात चित्रपट सादर होऊ लागले. चित्रपटासाठीचेच टीव्ही चॅनेल्स आल्यामुळे प्रेक्षक त्याकडे वळले. त्यामुळे नव्या पिढीतला प्रेक्षकवर्ग सिनेमा पाहायला फिल्म सोसायटीपर्यंत कशाला जाईल?

परंतु राणे यांचे चित्रपटप्रेम स्वस्थ बसणारे नव्हते. विरंगुळा म्हणून चित्रपट पाहणारा वर्ग वगळता अनेक रसिकांना या कलेतील बारकावे समजून घेण्याची इच्छा असते, हे राणेंनी हेरले व त्यासाठी नवीन पिढीला उद्युक्त करण्यासाठी चित्रपट रसग्रहणाच्या कार्यशाळेची कल्पना त्यांनी लढविली. त्यांना सिनेमा आणि साहित्य, सिनेमा आणि नाटकं, सिनेमा आणि संगीत, सिनेमा आणि चित्र-शिल्प-वास्तुकला, सिनेमा आणि लोककला, सिनेमा आणि समाज असे विषय घेऊन तरुण रसिकांना जाणते करायचा विचार होता. परंतु त्यांना आर्थिकरित्या साथ मिळाली नाही, असे विषादाने नमूद करावेसे वाटतेल.

राणेंनी आपली दिग्दर्शक होण्याची इच्छा काही चांगल्या डॉक्युमेंटरींची निर्मिती करून पूर्ण करून घेतली. त्यांच्या डॉक्युमेंटरीतील विषयाची मांडणी थेट व बंदिस्त असते, याबद्दल शंकाच नाही. सिंगिग इन सिनेमा वा बिईंग विथ अपू मध्ये ते प्रकर्षाने जाणवते. त्यांच्याच पटकथा –दिग्दर्शन असलेल्या गिरणगावावरील आणखी एक मोहंजोदारो व संवादिनी साधकः पं. तुळशीदास बोरकर डॉक्युमेंटरीजमध्ये जीव ओतून काम केले होते. त्यांच्या सर्वच्या सर्व डॉक्युमेंटरीजना सिनेरसिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असे.

लाइट, अॅ क्शन, कॅमेरा व दृश्यसातत्यातून सिनेमाच्या तंत्रज्ञानानी अजून पर्यंत ज्ञात नसलेल्या एका कलेला जन्म दिले. गेली शंभरेक वर्षे अनेक फिल्ममेकर्सनी त्यांच्या सर्जनशीलतेतून रसिकांना एक वेगळाच आनंद दिला. द्विमितीतून त्रिमितीचा आभास निर्माण करण्यात ते सर्व यशस्वी झाले. राणेनीसुद्धा या कलेला एका वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केला. जगभरातील अत्यंत गाजलेल्या फिल्ममेकर्सची राणे यांनी करून दिलेला परिचय चित्रपट रसिक सहजासहजी विसरू शकणार नाही. राणे यांनी हे पुस्तक लिहून रसिकांच्या चित्रपटविषयक जाणिवेत भर घातल्याबद्दल रसिक त्यांना नक्कीच धन्यवाद देतील. उत्कृष्ट चित्रपटातील महत्वाच्या जागांचा उल्लेख करत त्यातील सब्लिमिनल एलिमेंटकडे लक्ष वेधणारे हे एक अतिशय सुंदर पुस्तक आहे.

त्यांच्या या पुस्तकाचे निर्मितीमूल्य उत्कृष्ट असून सर्व संबंधितानी भरपूर कष्ट घेतल्याचे जाणवते.

एक अविस्मरणीय आनंद देणारं पुस्तक !

सिनेमा पाहणारा माणूस
अशोक राणे
संधीकाल प्रकाशन, भाईंदर (पू), मुंबई
किंमतः 550 रु, पानेः 512

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान ओळख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0