Skip to main content

पुढचे नाही, मागचे १४ दिवस महत्त्वाचे होते साहेब

डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) मिरजच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधे असोसिएट प्रोफेसर आहेत. समाजात कोरोनाविषयी पसरलेले गैरसमज दूर करण्याच्या हेतूने, शास्त्रीय माहिती देणारे लेखन त्या सातत्याने करत आहेत. त्यांचे हे प्रबोधनाचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आणि मोलाचे आहे. त्यांच्या पूर्वपरवानगीने त्यांचे काही लेख आम्ही ऐसीच्या वाचकांसाठी शेअर करणार आहोत. त्यातील पहिला लेख :

पुढचे नाही, मागचे १४ दिवस महत्वाचे होते साहेब

"देवा यांना माफ कर" या नावाची पोस्ट मी १२ मे २०२१ला लिहिली होती. त्यामध्ये डॉ रवी गोडसे देत असलेली काही माहिती जीवघेणी ठरू शकते असा उल्लेख मी केला होता. आज त्याची प्रचिती पण आली.

ओमायक्रोनबाबत निवांत राहण्याचा सल्ला चुकीचा होता हे आता तुमच्या लक्षात येऊन काय फायदा? लोकांचा या आजाराप्रती आणि नियमांप्रती attitude कधीच बदललाय.

धनुष्यापासून बाण आणि तोंडातून शब्द एकदा सुटले की परत येत नसतात. हे शाळेमध्ये शिकवले होते. मग "मी मागे काय म्हणालो ते विसरा" असे कसे म्हणू शकता?

साथ आणि भूमितीय वाढ कशी असते याची थोडी जरी कल्पना असती तुम्हाला तर "पुढील १४ दिवस महत्त्वाचे" असे म्हणाला नसता.
अहो, पुढील प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे आणि आपल्यापैकी प्रत्येक जण घेईल तो प्रत्येक निर्णयदेखील महत्त्वाचा आहे.

उदा. वाढदिवसाच्या पार्टीला मी जाईन किंवा नाही, तिथे मास्क काढेन किंवा नाही अश्या छोट्याछोट्या कृतीदेखील साथीतील भविष्यातील रुग्ण वाढवू किंवा कमी करू शकतात.

मास्क फक्त १४ दिवस नाही तर ही महासाथ संपेपर्यत वापरायला हवेत, तेही सर्वांनी. तरच आपली या लाटांमधून आणि नवनव्या व्हेरीयंटपासून सुटका होईल.
आणि खरे सांगू का?

अहो, पुढचे नाही तर या आधीचे १४ दिवस अत्यंत महत्त्वाचे होते. कारण त्यावेळी अजून रुग्णसंख्यावाढ सुरू झाली नव्हती आणि तीच वेळ होती सर्वांनी एकत्रितपणे नियम पाळून ओमायक्रोनला रोखायची.

भूमितीय वाढीचा पहिला टप्पा अतिशय महत्त्वाचा असतो. रुग्णसंख्या स्थिर असणारा काळ. तो संपला आता. रुग्णसंख्यावाढ आता "दिन दुगनी और रात चौगुनी" या गतीने वाढणार आहे आणि तुम्ही आता प्रतिबंध शिकवताय? आता नियंत्रणाची वेळ आलीये.

मी दि. ३ डिसेंबरला जेव्हा कर्नाटकमध्ये एक डॉक्टर प्रवासाशिवायच ओमायक्रोनने positive आला तेव्हा "आज, आत्ता, या क्षणी" ही पोस्ट लिहिली होती. कारण कोणताही नवा व्हेरीयंट जेव्हा देशामध्ये प्रवासाशिवाय दिसतो तेव्हा तो पसरायला सुरुवात झालेली असते. आणि त्या क्षणापासून सर्वांनी अलर्ट होणे आवश्यक असते.

ही साधीसुधी साथ नाहीये, ही वैश्विक साथ आहे.

अश्या वेळी प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिकाने अतिशय जबाबदारीने सल्ले द्यायला हवेत. आपल्या सल्ल्याने कोणाचे नुकसान होणार नाही याची खात्री करायला हवी.

ज्यांचा शब्द लाखो लोक मानतात त्यांनी साथ थांबेल असे सल्ले द्यायचे की साथ पसरेल असे? यापुढील काळामध्ये अधिक जबाबदारीने बोलाल ही अपेक्षा.
आणि या अनुभवावरून काही लोकांना तरी तुमच्या सल्ल्यांमधील फोलपणा व अशास्त्रीयपणा समजेल ही आशा!

मास्क फक्त पुढील १४ दिवस नाही तर साथ संपेपर्यंत वापरायचा आहे.

नियम पाळा आणि गर्दी टाळा.

आपली साथ आपल्यालाच थांबवायची आहे.

उंटावरून शेळी हाकणाऱ्याचे हे काम नोहे!

--
डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) M.D. (Community Medicine) साथरोगतज्ज्ञ , मिरज.
(०८/०१/२०२२)
#Fighting_myths_DrPriya
#drgodse_misinformation

पूर्वप्रकाशित : इथे आणि इथे
डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) यांचे सर्व लेखन Info Portal by UHC, GMC, Miraj या पानावर उपलब्ध आहे. #covid_insights_drpriya
त्यांचे 'ऐसी अक्षरे'वर प्रकाशित सर्व लेखन इथे उपलब्ध आहे.

अभिरत Mon, 10/01/2022 - 20:00

१ लसीकरण झाल्यानंतरही इतकी काळजी का घ्यायची? लोकसंख्येच्या किती टक्के प्रमाणात लसीकरण झाल्यावर ते प्रभावी असते आणि भारत कुठे आहे? हेच जर होणार होतं तर लसीकरणाचा काय उपयोग?


भारताच्या शेजारी देशात - ज्याची pandemic प्रोफाइल भारतासारखी मानता येईल - बांगलादेश पाकिस्तान या देशात निर्बंध जवळपास नव्हतेच
गंमत म्हणजे इथलं कोविड तांडव भारताइतके भयाण नव्हते, किंबहुना त्यांचा मृत्यू दर भारतापेक्षा खूप कमी आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा (कडक निर्बंध वाल्या)ऑस्ट्रियाच्या तुलनेत (मुक्त वावर वाल्या) स्वीडनची कोविड कामगिरी बरीच उजवी आहे.

खालील लेखातील हे वाक्य बरच बोलके आहे-

In conclusion, the comparison of Austria and Sweden conclusively shows that a calm, low-intervention and patient-focused approach to the pandemic has been best. In contrast, epidemio­lo­gically irrational strategies, such as “zero covid” and “no covid”, have caused unprecedented social, political and economic damage at an almost civilizational scale.
https://swprs.org/judgment-day-sweden-vindicated/

स्विडन विरुद्ध इतर
दोन वर्षांपूर्वी वैज्ञानिकांकडे डेटा नव्हता हे मान्य, पण आता वेगवेगळ्या देशांच्या विविध अॅप्रोचेस बद्दल पुरेसा डेटा आहे. हे स्वीडिश किंवा पाकिस्तानी धोरण चुकीचे हे सिद्ध करणारा विंदा आधारित पुरावा आहे का?

डॉक्टर मॅडम याकडे कसे बघतात?

३ डेल्टा लाटेच्या प्रकोपानं नंतर जवळपास प्रत्येक भारतीय सेरो पॉझिटिव्ह असणे अपेक्षित असताना नव्या व्हेरियंटचा इतका बाऊ का करायचा?
ऑक्सिजनची पुरेशी उपलब्धता बाळगणे व लसीकरणाचे प्रमाण युद्धपातळीवर वाढवणे पुरेसे नाही का?

शाळा बंद, परिचयातले कित्येक जण बेरोजगार किंवा कमी उत्पन्नावर काम करताना बघतोय. भारतासारख्या गरीब देशाला हे कुठवर सोसवणार?

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 10/01/2022 - 23:46

In reply to by अभिरत

लशींमुळे कोव्हिड झालाच तर रोगाची तीव्रता कमी होते, म्हणजे हॉस्पिटलात कमी लोकांना जावं लागेल; मृत्यू कमी होतील. लशी संसर्ग टाळण्यासाठी नाहीत, रोग टाळणं आणि रोगाची तीव्रता कमी करण्यासाठी आहेत.

मला संसर्गच टाळता येणार असेल किंवा कमी प्रमाणात विषाणूंचा डोस मिळणार असेल तर बरं वाटतं, म्हणून मी सगळीकडे मास्क लावून फिरते.

सध्या माझ्या परिसरातल्या (भारतात आणि अमेरिकेत) काही लोकांच्या चाचण्यांमध्ये संसर्ग झाल्याचं दिसत आहे. काही लोकांना अजिबात काही लक्षणं नव्हती, म्हणजे कोव्हिड नव्हता. काहींना घसा खवखवणं, बारका ताप असलंच काही झालं. आजच फेसबुकवर वाचलं, एकाला १०२ फॅ ताप आणि दोन दिवस खूपच सांधेदुखी झाली. लक्षणं नसणाऱ्यांतले काही लोक ५५+ वयाचे, मधुमेही - म्हणजे सहव्याधी असणारे - आहेत. कोव्हिडमुळे सणसणीत आजारी पडलेला मित्र तरुण आणि काहीही विकार नसणारा आहे.

थोडक्यात, संसर्ग झालाच तर कुणाला किती प्रमाणात कोव्हिडचा त्रास होईल हे सांगता येत नाही. लक्षणं नसताना कोव्हिडची शंकाही येणार नाही, आणि आपल्यामुळे लोकांना लागण होऊ शकते. हे लोक सहव्याधी असणारे, वयस्कर असतील तर कदाचित मला कोेव्हिडचा त्रास होणार नाही, पण हे लोक हॉस्पिटलात जाण्याएवढे आजारी पडू शकतात. या सगळ्या गोष्टी आधीही होत्या आणि आताही आहेत.

लस घेणं, मास्क वापरणं, मास्क नाक-तोंड झाकेल असा वापरणं, शक्यतोवर लोकांपासून सहा फुटांवर राहणं वगैरे गोष्टींना सध्या पर्याय नाही. न पेक्षा थोडी गैैरसोय होईल, तर तेवढी सहन करायची शक्ती माझ्याकडे आहे. मला कोव्हिड होणं आणि/किंवा माझ्यामुळे इतर कुणाला कोव्हिड होणं या गोष्टींचा मला त्रास होईल, त्यापेक्षा मास्क वापरणं फारच सोपं आहे.

लॉकडाऊनच करावेत का, वगैरेंबद्दल माझं काहीही म्हणणं नाही. मी नियमितपणे बाहेरचं घरी आणून खाते आणि चिकार टीप ठेवते. मला घरात बसून काम करता येतं, पगार मिळतो आणि कोव्हिड वगैरे प्रकरणं जेव्हा आटोपतील तेव्हाही मला बाहेर खाण्याची सोय हवी असेल. म्हणून मी सध्या हे लोक आणि उद्योग टिकवून ठेवण्यासाठी जेवढं समजेल, आणि झेपेल तेवढं करते.

नव्या व्हेरियंटचा इतका बाऊ का करायचा?

रोग होण्यापेक्षा निरोगी असणं मला आवडतं. तुम्हाला?

त्यातूनही आजपावेतो सगळे व्हेरियंट लशींना दाद देणारे आहेत. आणखी नवा व्हेरियंट आला आणि तो लशींना दाद देईनासा झाला तर आपली सगळ्यांची, लस घेतलेल्यांचीही पुरती लागेल. ती लागू नये म्हणून तरी बाऊ केलेला बरा. जास्त बाऊ बरा, कमी करण्यापेक्षा. डॉक्टर इथे सुचवत आहेत त्या उपायांमुळे कुणाचे रोजगार वगैरे बुडणार नाहीयेत; त्या फक्त मास्क वापरायला सांगत आहेत.

अभिरत Tue, 11/01/2022 - 07:16

लस घेणं, मास्क वापरणं, मास्क नाक-तोंड झाकेल असा वापरणं, शक्यतोवर लोकांपासून सहा फुटांवर राहणं वगैरे गोष्टींना सध्या पर्याय नाही

मी स्वतः व्यक्तिशः याच्याशी सहमत आहे पण दुर्देवाने बर्‍याचशा व्यवसायाचे स्वरूप आहे की लोकांपासून फार दूर राहणे, सहा फूट अंतर ठेवणे अशक्य आहे. मुंबईच्या लोकलमध्ये लाखो लोक तास/दीड तास एकत्र प्रवास करत असतात. जास्त काळ मास्क वापरून श्वास घेणे कित्येकांना अवघड वाटते, अशा परिस्थितीत बहुतांश भारतीय जनता कोविड पासून फार दूर राहील असे वाटत नाही.

तुम्ही लॉकडाऊन करा असं म्हणत नाही आहात पण सरकारची डिफॉल्ट प्रतिक्रिया असते.
थोडक्यात तुम्ही वैयक्तिक पातळीवर जे करता ते सामाजिक पातळीवर भारतात अनेकांना जवळपास अशक्य आहे आणि असे मुक्त सामाजिक वर्तन असणाऱ्या स्वीडन सारख्या देशांचा डेटा निराशाजनक नाही.

दुसरे म्हणजे केवळ साथरोग नियंत्रण एकाच दृष्टीने केवळ कोविडकडे बघण्याचे दिवस संपले आहेत.
साथरोग नियंत्रण सोबत याचे सामाजिक व आर्थिक परिणाम दिवसेंदिवस जास्त दृग्गोचर होत आहेत.

थोडक्यात,
* भारतात कोट्यावधी लोकांचे लसीकरण झालेले असणे
* बहुतांश भारतीय seropositive असणे
* कमी निर्बंध वाल्या स्वीडन, पाकिस्तान सारख्या देशांची कोविड कामगिरी चांगली असणे
* Omicron चा मृत्यू दर कमी असणे.

ह्या बाबींचा उहापोह होणे अपेक्षित आहे.
"आत्ता चांगला असणारा माझा परिचित अचानक सणकून आजारी पडला" असे कोविड पूर्व काळातही होत होते.
Alert mode: highest (= नेहमी मास्क, सामाजिक अंतर) ठेवून लोक जगतील ही अपेक्षा अव्यावहारिक आहे आणि मुक्त सामाजिक वर्तन असणाऱ्या देशांची कोविड कामगिरी चांगली असल्याने Alert mode: highest ठेवा हा सल्ला कितपत वैज्ञानिक आहे याची शंका वाटते.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/01/2022 - 23:27

In reply to by अभिरत

माझ्या ओळखीतले बरेच वयस्कर लोक ओरडून ओरडून बोलतात, 'हळू बोला, मला मोठ्या आवाजांचा त्रास होतो' असं म्हणाले तर वर 'मला हळू बोलायला जमत नाही', असं सांगतात. आजूबाजूला शांतता असताना मी माझ्या नेहमीच्या आवाजात बोलले तर त्यांना ऐकू येत नाही. यावरून मला समजतं की त्यांना नीट ऐकायला येत नाही. म्हणून 'कानाच्या डॉक्टरकडे जाऊन या', हे सुचवलं तरीही ते ऐकत नाही.

पुणेरी लोकांना हेल्मेट घालूनही त्रास होतो, असं काही वर्षांपूर्वी म्हणलं जात होतं.

ह्या सुतांवरून मी गाठलेला स्वर्ग म्हणजे लोकांना मास्क घालणं आवडत नाही, म्हणून ते घालत नाहीत. श्वसनाला त्रास होतो असे लोक फारच थोडे असावेत. त्यातून डॉक्टर झालेले लोक काय वाटेल ते लिहीत सुटतात, तेही समाजमाध्यमांवर दिसतं. मोठ्यानं बोलणारे लोक ओरडून ओरडून का बोलतात हे समजून घेणं निराळं आणि त्यांच्या मोठ्यानं बोलण्याला प्रोत्साहन देणं निराळं. डॉक्टरांनी किमान ते प्रोत्साहन देऊ नये, असं लेखिका म्हणत आहेत. यात काय आक्षेपार्ह आहे?

मनीषा Tue, 11/01/2022 - 11:10

प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिकाने अतिशय जबाबदारीने सल्ले द्यायला हवेत. आपल्या सल्ल्याने कोणाचे नुकसान होणार नाही याची खात्री करायला हवी.
ज्यांचा शब्द लाखो लोक मानतात त्यांनी साथ थांबेल असे सल्ले द्यायचे की साथ पसरेल असे?

अगदी योग्य...

भाऊ Tue, 11/01/2022 - 14:23

दुसरी बाजू समजली. पण पटली नाही.
काही टिप्पण्या अनावश्यक वाटल्या.

डॉ. गोडसे भारतात येऊन गेले त्यांची मुलाखत सहा वाहिन्या दाखवत होत्या त्या अर्थी त्यांच्या मतास काही आधार असावा.
मला समजला तो आफ्रिकेत संख्या वाढून खाली गेली हा त्यांचा मुद्दा होता. अठरा वर्षांखालील आणि बूस्टर डोससाठी सरकारने दहा तारखेपर्यंत थांबू नये हे तेही म्हणाले.
ऐसीने त्यांना विचारून या मुद्द्यांवर त्यांचीही बाजू मांडावी.

आज महाराष्ट्र सरकार काय म्हणते पाहा.
कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांची टेस्ट करण्याची गरज नाही.

सरकारची नवी नियमावली:
जर वय किंवा इतर आजारावर आधारित हाय रिस्क मधली व्यक्ती संपर्कात असेल तर त्यांचीच टेस्ट आवश्यक

म्हणजे सरकारला माहीत आहे की दोन लसमात्रा झाल्या असतील तर झालेला संसर्ग गंभीर नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/01/2022 - 23:19

In reply to by भाऊ

डॉ. गोडसे भारतात येऊन गेले त्यांची मुलाखत सहा वाहिन्या दाखवत होत्या त्या अर्थी त्यांच्या मतास काही आधार असावा.

तो वैज्ञानिक आधार सापडला की ऐसी जरूर त्यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करेल. लोकप्रियता आणि यूट्यूबवरची दर्शकसंख्या म्हणजे विज्ञान नाही.

पुंबा Wed, 12/01/2022 - 18:37

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आपण गोडसेंशी संपर्क साधून त्यांची बाजू मांडायची विनंती केलीत का? लोकप्रिय असणाऱ्या व्यक्तिचे म्हणणे खोडून काढायचे तर नीट खंडन मंडन व्हायला हवे.

माझे मत: प्रस्तुत लेखिकेचे गेल्या दोन वर्षांपासूनचे कोविडसंबंधीचे लिखाण अतिशय उत्तम आहे. त्यांच्याइतके समतोल व वैज्ञानिक लिखाण करणारे फार क्वचित असतील. हा लेखसुद्धा खुप छान आहे. परंतू तरीही गोडसेंचे म्हणणे इथे आले तर उत्तम उहापोह होऊन अधिक चांगली माहिती लोकांसमोर येईल.

तिरशिंगराव Wed, 12/01/2022 - 20:34

In reply to by पुंबा

काही लोक निव्वळ चमकोगिरी करायला टीव्हीवर किंवा यु ट्युबवर मुलाखती देतात. त्यांना जास्त महत्व न दिलेलंच बरं. इथे जे विज्ञानावर आधारित लिहितात त्यांनाच पाचारण करावं, असं मला वाटतं.

भाऊ Thu, 13/01/2022 - 15:52

In reply to by तिरशिंगराव

सरजी, खुद्द लेखिकेने त्यांचा महत्त्व देऊन उल्लेख केला म्हणूनच चर्चा सुरू झाली याकडे आपले लक्ष वेधू इच्छितो.

बाकी आमच्या मौजे पिंपळगाव जिल्हा कोल्लापुरचे वगैरे चमको लोक जे व्हिडिओ करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष आणि एकट्या रवी गोडसे यानाच पकडून एकतर्फी टीका असे दिसल्याने बोललो हो!
आमचं म्हणणं इतकंच की त्यांचीही काही शास्त्रीय बाजू असेल पण आम्हा पामर वर्गातल्या प्रेक्षकांना टी व्ही वर ते सोपे, रंजक करून सांगत असतील. म्हणून तर इकडे त्यांचे शास्त्रीय दृष्टीकोनातून असलेले मत यावे. आम्हाला वाटते त्यांना तितके ज्ञान नक्की असणार, कारण जे बोलले त्यात काही तथ्ये दिसली, ती वर लिहिली आहेत.

चिंतातुर जंतू Thu, 13/01/2022 - 17:02

In reply to by भाऊ

सरजी, खुद्द लेखिकेने त्यांचा महत्त्व देऊन उल्लेख केला म्हणूनच चर्चा सुरू झाली याकडे आपले लक्ष वेधू इच्छितो.
बाकी आमच्या मौजे पिंपळगाव जिल्हा कोल्लापुरचे वगैरे चमको लोक जे व्हिडिओ करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष आणि एकट्या रवी गोडसे यानाच पकडून एकतर्फी टीका असे दिसल्याने बोललो हो!

कारण गोडसे यांचे व्हिडिओ व्हायरल होतात, आणि त्यामुळे अधिक लोकांमध्ये अज्ञान पसरण्याला कारणीभूत ठरतात, म्हणून? मौजे पिंपळगाव जिल्हा कोल्हापूरचे व्हिडिओ तेवढे व्हायरल झाले तर त्यांचाही समाचार घेऊ, हा का ना का.

भाऊ Thu, 13/01/2022 - 17:24

In reply to by चिंतातुर जंतू

अरेच्चा! गडबड आहे मग.
म्हणजे व्हायरल होतात म्हणून समाचार घ्यायचाय की चुकीची माहिती पसरवतात म्हणून? बरे मग इथल्या लब्बाड सरकारने काहीच केले नाही की इकडे दिशाभूल करून गेले तरी.

मूळ मुद्दा तिरशिंगराव यांच्या प्रतिसादावर, ते असे म्हणले की त्यांना ..म्हणजे अश्या चमकदार लोकांना महत्त्व न दिलेलेच बरे, त्यावर होता. कारण लेखाचा विषयच तो आहे!
असो. पण आता मी थांबतो ब्वा. :)

चिंतातुर जंतू Thu, 13/01/2022 - 18:09

In reply to by भाऊ

व्हायरल होतात म्हणून समाचार घ्यायचाय की चुकीची माहिती पसरवतात म्हणून?

योग्य माहिती पसरवत व्हायरल झाले असते तर समाचार घ्यायची गरज का भासली असती?

अश्या चमकदार लोकांना महत्त्व न दिलेलेच बरे

हे ठीकच आहे, पण ते व्हायरल झाले असतील तर त्यांना समाजात महत्त्व मिळत आहे हे दिसतेच आहे. असो चालायचेच.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 13/01/2022 - 21:09

In reply to by भाऊ

आता मी थांबतो ब्वा.

आभार.

सदर धाग्याचा विषय सार्स-कोव्ह-२ या विषाणूचा संसर्ग कमीतकमी होईल याची काळजी घेणं आणि करोना या रोगाचा त्रास कमीतकमी लोकांना, कमीतकमी होईल याची काळजी कशी घ्यावी असा आहे. ऐसीनं कुणाला आणि किती महत्त्व द्यावं, जालावर आणि कुठल्याही माध्यमात काय प्रकारची चर्चा चालावी आणि ट्रोलांचा समाचार कसा घ्यावा हा सदर लेखाचा विषय नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 13/01/2022 - 07:45

In reply to by पुंबा

चमकोगिरी करणाऱ्यांच्या पिचवर जाऊन खंडनमंडन (वा मारामाऱ्या) टाळायची अधिक गरज आहे. 'ऐसी'वर मुद्दाम होऊन जे लेखन आणलं जातं, ते शक्यतोवर वैज्ञानिकदृष्ट्या सकस असेल असंच असतं. त्यातून चमकोगिरीचं पुरेसं खंडन होत नसेल तर तसं करणारे लेख आणखी आणले जावेत हे मलाही मान्य आहे.

माचीवरला बुधा Thu, 13/01/2022 - 16:41

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

त्यांचा एक व्हिडिओ पाहिला तरी रवी गोडसे, त्यांची मते आणि कथनशैली यांबद्दल मनात गंभीर संशय निर्माण होतो. ते अर्णव गोस्वामीच्या मंचावरही बोलले आहेत, हे सूचक आहे.

Rajesh188 Thu, 13/01/2022 - 14:24

In reply to by तिरशिंगराव

लोकमत ची लिंक .!!!????
लाँग covid ची लक्षण ह्यांना महिना पण नाही झाला भारतात omeycron ला तरी दिसून आली
इतके पण वेगवान होवू नका जग राहील माग .आणि तुम्ही दुसऱ्या galaxy मध्ये पोचाल.

Rajesh188 Thu, 13/01/2022 - 14:12

सर्व सुश्म जीव तज्ञ,सर्व जीवशास्त्र तज्ञ,सर्व पेशी तज्ञ,सर्व साथीच्या रोगाचे तज्ञ लस तज्ञ, आणि शेवटी सर्व डॉक्टर्स ह्यांचे एकमत होवून एकच विचार जेव्हा समाज पुढे ठेवला जाईल तेव्हा लोकांना नीट समजेल.

Rajesh188 Thu, 13/01/2022 - 14:42

जमिनी स्तरावर खरी स्थिती ही आहे covid positive लोकांची संख्या लाखो मध्ये असली तरी गंभीर आजारी असणारे अगदी नगण्य लोक आहे.
Omeycron हा उत्परीवरतीत विषाणू जगाला covid मुक्त करेल ही ground रिॲलिटी आहेत.
तरी काळजी घेतली पाहिजे
मास्क वापराचे सर्व नियम काटेकोर पाळणे कोणालाच शक्य नाही
भारता सारख्या अती प्रचंड लोकसंख्या असलेल्या अगणित शहरात सोशल distance पाळता येणे अशक्य आहे .
ते कोणीच पाळू शकत नाही.
Delta नी अनेक लोकांचे जीव घेतले पण हा omeycron प्राण घातक नाही.
ही जमिनी वरील स्थिती आहे.