पासधारकांचे हजारो कोटी रेल्वेने ‘लाटले’

कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे ‘लॉकडाऊन’ लागू झाल्यानंतर रेल्वे वाहतूक पूर्र्णपणे बंद केल्याने देशभरातील लाखो पासधारकांना त्यांच्या पासाच्या शिल्लक असलेल्या कालावधीत त्या पासावर प्रवास करता आला नाही. पासाच्या या उवर्रित कालावधीसाठी आगाऊ घेतलेली रक्कम परत न करून भारतीय रेल्वेने या पासधारकांचे काही हजार कोटी रुपये अप्रमाणिकपणे लाटले आहेत.
रीतसर तिकीट काढलेल्या किंवा आरक्षण केलेल्या ज्या प्रवाशांना संबंधित गाडीच रद्द केली गेली म्हणून प्रवास करता येणारा नाही त्यांना तिकीटाचे भरलेले पैसे परत करण्याचा रेल्वेचा नियम आहे.२४ मार्च २०२०च्या मध्यरात्रीपासून ‘लॉकडाऊन’ लागू झाल्यानंतर देशभरातील रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद केली गेली. मुंबईमधील उपनगरी लोकलगाड्यांची वाहतूक तर त्याआधीच म्हणजे २२ मार्चच्या मध्यरात्रीपासून बंद करण्यात आली. रेल्वेने स्वत:च सर्व गाड्या बंद केल्याने ज्या प्रवाशांंनी २४ मार्चच्या मध्यरात्रीनंतरच्या प्रवासाचे लांब पल्ल्याच्या गाड्यांचे आरक्षण केलेले होते त्यांना रेल्वेने कोणतीही कपात न करता भाड्याचे सर्व पैसे परत केले. मात्र उपनगरी रेल्वेच्या मासिक व त्रैमासिक पासधारक प्रवाशांना असा परतावा देण्यात आला नाही.

५० लाख प्रवाशांचे नुकसान
मुंबईत मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरी गाड्यांनी प्रवास करणार्‍या प्रवाशांची रोजची संख्या कोरोना महामारीपूर्वी सुमारे ८० लाख होती. पुणे, कोलकाता, चेन्नई या अन्य शहरांमध्येही अशा उपनगरी लोकल आहेत. तेथे लोकलने प्रवास करणार्‍या प्रवाशांची दैनिक संख्याही काही लाखांमध्ये आहे. हे बहुतांश लोकलचे प्रवासी मासिक किंवा त्रैमासिक पास काढूून प्रवास करत असतात. मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक, मुंबई-सूरत, मुंबई-बडोदे या मार्गांवरील मेल/एक्स्प्रेस गाड्यांमधूनही पास काढून प्रवास करण्याची सोय आहे. यात फुकट्या प्रवाशांचे प्रमाण १०टक्के असते असा ढोबळ अंदाज केला तरी २४ मार्च, २०२० पासून गाड्या बंद झाल्या तेव्हा ज्यांच्याकडे वैध पास होते परंतु जे त्या पासांची मुदत संपेपर्यंत प्रवास करू शकले नाहीत, अशा प्रवाशांची संख्या सहज ५० लाखांच्या आसपास असू शकेल.
.
उपनगरी पासधारक प्रवाशांना रेल्वेने परतावा का दिला नाही, याचा मी शोध घेतला. त्यातून माझ्या असे लक्षात आले की, पासधारकांना असा परतावा देण्याची रेल्वेच्या नियमांमध्ये मुळात तरतूदच नाही. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना त्यांनी काढलेल्या तिकिटांचा परतावा देणे व पासधारकांना तसा परतावा न देणे ही रेल्वेची कृती तद्दन बेकायदा म्हणता येणार नाही. तरीही पासधारकांना परतावा न देणे पक्षपाती व अन्याय्य आहे, असे माझे मत आहे

पासधारकांंशी पक्षपात
प्रवाशाने प्रवासासाठी काढलेले तिकिट किंवा केलेले आरक्षण रद्द केल्यास त्याला त्याचे पैसे कसे व किती परत दिले जातील याविषयीचे सविस्तर नियम रेल्वेने केलेले आहेत. याच नियमांमध्ये गाडी रद्द झाल्यास त्या गाडीचे तिकिट काढलेल्या किंवा आरक्षण केलेल्या प्रवाशांना पैसे परत करण्याची तरतूद आहे. परंतु या नियमांनुसार उपनगरी रेल्वेच्या पासधारकांना त्यांच्या पासाच्या शिल्लक असलेल्या दिवसांचा परतावा मिळू शकत नाही. याचे कारण असे की, या नियमांमध्ये ‘तिकीटा’ची जी व्याख्या केलेली आहे त्यात ‘पास’ स्पष्टपणे वगळण्यात आला आहे. यातही गंमत अशी की रेल्वे प्रवाशांना जो ‘पास’ देते त्यावर ‘मासिक किंवा त्रैमासिक सीझन तिकीट’ असे छापलेले असते. म्हणजे रेल्वेने हा ‘पास’ तिकीट म्हणूनच दिलेला असतो. परतावा देण्याच्या नियमांमध्ये मात्र ‘सिझन तिकीट’ असा शब्दप्रयोग न करता ‘पास’ असा शब्द वापरून ‘पासा’ला परताव्यातून वगळले आहे.

रेल्वेचे अवैध परतावा नियम
परंतु पासधारकांना परताव्याच्या नियमांतून असे वगळणे पक्षपती व म्हणूनच अन्यायकारक आहे. याचे कारण असे की, रेल्वेला हे नियम करण्याचे अधिकार १९८९ च्या रेल्वे कायद्याने दिले आहेत व रेल्वेने तो अधिकार वापरून केलेले हे नियम त्या कायद्याच्याच विपरीत आहेत. रेल्वे कायद्यात विनातिकीट प्रवास करणाºया प्रवाशास दंड करण्याची किवा तुरुंगवासाची शिक्षा देण्याची तरतूद आहे. यात ज्याच्याकडे संबंधित प्रवासाचे वैध तिकीट किंवा ‘पास’ नसेल अशा प्रवाशास ‘विनातिकीट प्रवासी’ मानले गेलेले आहे. म्हणजेच रेल्वे कायद्यात तिकिटामध्ये पासाचाही समावेश केलेला आहे. त्यामुळे तिकीट आणि पास यामध्ये हा कायदा फरक करत नाही. रेल्वेचे ‘टीसी’सुद्धा प्रवाशाकडे तिकीट किंवा पास नसेल तर त्याला दंड करतात, हा आपला सर्वांचा अनुभव आहे.
नियम करण्याचे अधिकार देणार्‍या मूळ कायद्याच्या विपरीत केलेले नियम अवैध ठरतात, हे कायद्याचे तत्व न्यायालयांच्या असंख्य निकालांनी सुप्रस्थापित झालेले आहे. त्यामुळे परतावा नियमांमधील तिकीटाच्या व्याख्येतून ‘पास’ वगळण्याचा भाग अवैध आहे. म्हणूनच पासधारकांना परतावा न देण्याची रेल्वेची कृती बेकायदा नसली तरी ती अवैध आहे.

रेल्वेचा अप्रामाणिकपणा
कोरोना महामारी ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करून त्याची झळ पोहोचलेल्यांना मदत व सवलती देण्याच्या एक लाख कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या योजना केंद्र सरकारने जाहीर केल्या. रेल्वेनेही २४ मार्च, २०२० नंतरच्या गाड्यांचे आरक्षण केलेल्या लाखो प्रवाशांना काही हजार कोटी रुपये परत केले. उपनगरी लोकलच्या पासधारकांना असा परतावा देण्यासाठी आणखी काही हजार कोटी रुपये लागले असते. प्रामाणिकपणे मनात आणले असते तर रेल्वेला हे करणे शक्य होते. परंतु रेल्वेने ते केले नाही. त्यामुळे स्वत:च केलेल्या अन्याय्य व अवैध नियमाचा आधार घेत रेल्वेने या पासधारक उपनगरी लोकल प्रवाशांचे काही हजार कोटी रुपये ‘गुपचूप लाटले’, असेच म्हणावे लागेल.
लांब पल्ल्याच्या गाड्यांचे आरक्षण केलेल्या प्रवाशांना त्यांनी तिकीट रद्द केल्यास किंवा र्लेवेनेच गाडी रद्द केल्यास पैशाचा परतावा करणे सोपे असते. कारण हे आरक्षण आॅनलाईन किंवा रेल्वेच्या आरक्षण केंद्रावरून केलेले असते. ते करत असताना प्रवाशांचा नाव, पत्ता घेतला जातो. त्यांनी ज्या ‘पेमेंट सिस्टिम’मधून पैसे दिलेले असतील त्याच ‘सिस्टिम’ने प्रवाशाला पैसे परत करता येतात. पासधारकांच्या बाबतीत हे शक्य नाही. परंतु रेल्वेने अप्रामाणिकपणे पक्षपात न करता पासधारकांनाही परतावा देण्याचे ठरविले असते तर ते अन्य प्रकारे करणे शक्य होते. २४ मार्च, २०२० रोजी ज्यांच्याकडे वैध पास होते त्यांनी लोकलसेवा पुन्हा सुरु झाल्यावर ते पास खिडकीवर घेऊन यायचे व त्यांना त्या पासाच्या राहिलेल्या दिवसांचा नवा पास द्यायचा किंवा नव्या पासात तेवढे दिवस वाढवून द्यायचे, अशा अप्रत्यक्ष पद्धतीने हा परतावा देता आला असता.

रेल्वेला कोर्टात खेचावे
पासधारकांच्या परताव्याच्या बाबतीत रेल्वेने पूर्णपणे सोयीस्कर आणि मतलबी मौन पाळले आहे. परंतु प्रवासी संघटनांनी या विषयाचा नक्कीच पाठपुरावा करायला हवा. सरळ मागणी करून रेल्वे परतावा देण्यास तयार नसेल तर संघटनांनी याविरुद्ध उच्च न्यायालयांत अवश्य दाद मागावी. कारण हुशारीने लढविली तर ही केस नक्की जिंकता येण्यासारखी आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

याच लिखाणाचा इंग्रजी गोषवारा PMO कडे तक्रार म्हणूनही पाठविला आहे.

लोकल ट्रेन च्या मासिक पास वर परतावा दिला होता.

समजा पास 30 तारखे पर्यंत होता आणि 20 तारखेला लॉक डाऊन जाहीर केले तर दहा दिवसांचा
काळ lockdown संपल्या नंतर वाढवून दिला होता.
Uts जे वापरतात त्यांना तरी ही सुविधा मिळाली.

पासाचे तूर्तास बाजूला ठेवू.

१. आरक्षित तिकिटाच्या रद्दीकरणासंबंधीचे नक्की नियम काय आहेत?

२. अनारक्षित तिकिटाच्या रद्दीकरणासंबंधीचे नक्की नियम काय आहेत?

३. अनारक्षित तिकिटाची वैधतेची मुदत किती असते?

(पास हा तत्त्वतः अनारक्षित तिकिटासारखा असल्याकारणाने, अनारक्षित तिकिटाशी निगडित रद्दीकरणासंबंधींच्या नियमांत नि पासाशी निगडित रद्दीकरणासंबंधींच्या नियमांत काही साधर्म्य आढळत आहे काय, ते तपासू पाहात आहे.)

अन् आरक्षित तिकीट रद्द करणे ग्राहकाच्या हातात नाही.
तसा कोणताच नियम नाही.

गाडी रद्द झाली,नैसर्गिक आपत्ती आली,किंवा बाकी काही गंभीर tech अडचण आली तर रेल्वे पर्यायी ट्रेन किंवा पर्यायी मार्ग नी प्रवास करण्याची परवानगी देते.
पण return पैसे मिळतात हे काही माहीत नाही.
काउंटर वर कॅश मध्ये पैसे परत देणे अशक्य आहे तशी यंत्रणा रेल्वे कडे नाही. मोठ्या प्रमाणात
ऑनलाईन बुकींग असेल तर account मध्ये पैसे transfer होवू शकतात

आरक्षित रेल्वे तिकीट रद्द करता येते. प्रत्यक्ष प्रवासाच्या किती तास अगोदर तिकीट रद्द केले त्याप्रमाणे तिकिटाच्या दर्ज्यानुसर कॅन्सलेशन चार्ज कापून रिफंड मिळतो.
गाडी रद्द झाल्यास पूर्ण रिफंड मिळतो.

ते ठीक, परंतु, अनारक्षित तिकिटाच्या बाबतीत काय घडते, ते रद्द करता येते का, करता येत असल्यास कधीपर्यंत करता येते, त्या परिस्थितीत रिफंडचे (असल्यास) काय नियम आहेत, मुळात अनारक्षित तिकीट कधीपर्यंत वापरास वैध असते, वगैरे मुख्य प्रश्न होते.

माझ्या कल्पनेप्रमाणे, अनारक्षित तिकीट हे बहुधा तिकीट विकत घेतल्या तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत वैध असते. (चूभूद्याघ्या. पुढील तारखेचे अनारक्षित तिकीट आगाऊ विकत घेता येते की नाही, कल्पना नाही. बहुधा नसावे. किंवा, असलेच, तर, त्या पुढील तारखेसच फक्त (त्याअगोदर नव्हे) आणि त्या तारखेच्या मध्यरात्रीपर्यंतच असावे, असे वाटते. नक्की खात्री नाही; माहीतगार कदाचित खुलासा करू शकतील. शिवाय, ही मध्यरात्रीपर्यंतची मर्यादा गाडी पकडण्यासाठी यानी कि प्रवास सुरू करण्यासाठी असावी, सलग प्रवास संपविण्यासाठी नव्हे, हे सयुक्तिक वाटते. माहीतगार याही बाबतीत योग्य ती माहिती पुरवू शकतीलच.)

आता, माझी वरील कल्पना तथ्यास धरून आहे, असे गृहीत धरून काही पुरवणी प्रश्न. (माझे गृहीतक चुकीचे असल्यास प्रश्न मिटला. मात्र, त्या परिस्थितीत, कोणी तसे कृपया स्पष्टपणे सांगू शकेल काय?)

१. समजा, मी सकाळीसकाळी स्टेशनावर जाऊन आजच्या प्रवासाचे अनारक्षित तिकीट विकत घेतले. (माझ्या गंतव्यस्थानाकरिता उर्वरित दिवसात बख्खळ गाड्या उपलब्ध आहेत.) तिकीट विकत घेतल्यावर पाचच मिनिटांनी माझा बेत बदलला, आणि मी प्रवासाचा विचार रद्द केला (माझ्या गंतव्यस्थानाकरिता उरलेल्या दिवसात अद्यापही गाड्या उपलब्ध आहेत), तर मी (नियमांप्रमाणे) ते विकत घेतलेले तिकीट रद्द करून रिफंड मिळवू शकतो का? (किती टक्के रिफंड हा तुलनेने गौण मुद्दा.)

१अ. समजा ही (प्रवासाचा विचार रद्द करण्याची) उपरती मला त्या दिवसाची शेवटची गाडी सुटून गेल्यानंतर झाली, तर मी (नियमांप्रमाणे) ते विकत घेतलेले तिकीट रद्द करून रिफंड मिळवू शकतो का?

१ब. समजा, मी आजचे अनारक्षित तिकीट विकत घ्यायला स्टेशनावर गेलो. माझ्या गंतव्यस्थानाच्या सर्व गाड्या सुटून गेल्या आहेत. १ब१. रेल्वे त्या परिस्थितीत मला (माझ्या गंतव्यस्थानाकरिताचे) आजचे अनारक्षित तिकीट विकू शकते का? (बहुधा नसावी, हे सयुक्तिक आहे, परंतु) १ब२. विकू शकत असल्यास, (नियमांनुसार) ते विकत घेतलेले तिकीट रद्द करून मी रिफंड मिळवून मी रिफंड मिळवू शकतो का?

वरील प्रश्न झाले मी प्रवासाचा विचार स्थगित करण्याच्या संदर्भात. आता,

२. समजा, मी आज सकाळीसकाळी स्टेशनावर जाऊन अनारक्षित तिकीट विकत घेतले. माझ्या गंतव्यस्थानाकरिता उर्वरित दिवसात बख्खळ गाड्या आहेत. पैकी पहिल्या गाडीने प्रवास करण्याचा माझा विचार आहे. कर्मधर्मसंयोगाने ती गाडी मी तिकीट विकत घेतल्यानंतर रद्द झाली. (दिवसातून त्यानंतर अजूनही बख्खळ गाड्या उपलब्ध आहेत.) त्या परिस्थितीत, गाडी रद्द झाल्याच्या कारणावरून (नियमांप्रमाणे) मला रिफंड लागू होतो का?

२अ. समजा, परिस्थिती बहुतांशी २.प्रमाणेच. मी अनारक्षित तिकीट भल्या पहाटे जाऊन काढले. दिवसभरात बख्खळ गाड्या उपलब्ध होत्या. त्यापैकी बाकी कोणत्याही गाडीने प्रवास न करता, रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी सुटणाऱ्या शेवटच्या गाडीने प्रवास करायचे मी ठरविले. ही गाडी काही कारणास्तव शेवटच्या क्षणी रद्द झाली. त्या परिस्थितीत, गाडी रद्द झाल्याच्या कारणावरून (नियमांप्रमाणे) मला रिफंड लागू होतो का?

२अ१. वरील २अ.मधील परिस्थितीत आणखी थोडा ट्विस्ट. समजा, ही रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी सुटणारी शेवटची गाडी, आयत्या वेळी रद्द होण्याऐवजी, उशीर होऊन मध्यरात्रीनंतर स्टेशनात आली, आणि २० मिनिटे उशिरा म्हणजे रात्री १२ वाजून १५ मिनिटांनी सुटली. तर, २अ१अ. या परिस्थितीत, नियमांप्रमाणे माझे (आदल्या तारखेचे, अनारक्षित) तिकीट त्या गाडीने प्रवास करण्यासाठी वैध आहे काय? आणि, २अ१ब. नसल्यास, नियमांप्रमाणे रेल्वे मला काही रिफंड देणे लागते काय?

२ब. समजा, परिस्थिती बहुतांशी २.प्रमाणेच. मी अनारक्षित तिकीट भल्या पहाटे जाऊन काढले. दिवसभरात बख्खळ गाड्या उपलब्ध होत्या. मात्र, (टोकाची परिस्थिती) मी तिकीट विकत घेतल्यानंतर काही कारणास्तव त्या सर्वच्या सर्व रद्द झाल्या. त्या परिस्थितीत, गाड्या रद्द झाल्याच्या कारणावरून, नियमांप्रमाणे मला रिफंड लागू होतो का? (प्लीज नोट: नियमांप्रमाणे म्हणतोय; ‘देणे रास्त आहे’ वगैरे नकोय.)

२ब१. (ही केस कदाचित फारशी महत्त्वाची नाही, परंतु) समजा मी दुपारी अनारक्षित तिकीट काढायला गेलो. दिवसाच्या मी तिकीट विकत घेण्याअगोदरच्या काळात माझ्या गंतव्यस्थानाकरिता बख्खळ गाड्या उपलब्ध होत्या; त्या सर्व वेळच्या वेळी सुटल्या. मी तिकीट विकत घेतल्यानंतरच्या उर्वरित दिवसातसुद्धा माझ्या गंतव्यस्थानाकरिता बख्खळ गाड्या उपलब्ध आहेत; मात्र, त्या सर्व एकापाठोपाठ एक आयत्या वेळेस काही कारणांस्तव रद्द होत गेल्या. या परिस्थितीत, गाडी रद्द झाल्याच्या कारणावरून (नियमांप्रमाणे) रेल्वे मला रिफंड देणे लागते का?

वरील सर्व प्रश्न अशाकरिता, की, रेल्वेने पास विकला, परंतु तत्संबंधीची सेवा (सर्व गाड्या रद्द झाल्याकारणाने) देऊ शकली नाही, अत एव रेल्वेने पासाचे पैसे परत केले पाहिजेत (अन्यथा पासाची मुदत वाढवून दिली पाहिजे), वगैरे मागण्या सकृद्दर्शनी ठीक वाटतात, परंतु, पास हा अंतिमतः अनारक्षित तिकिटाचाच विस्तृत प्रकार असल्याकारणाने, ((अनारक्षित तिकिटांच्या) नियमांनुसार तरी) या दाव्यांस काही बेसिस नसावा – आणि, there may be a method to the madness – अशी शंका येते. सबब, असा काही बेसिस आहे किंवा नाही, हे एस्टॅब्लिश करण्यासाठी हा प्रयत्न. शिवाय,

यांचे कारण असे की, या नियमांमध्ये ‘तिकीटा’ची जी व्याख्या केलेली आहे त्यात ‘पास’ स्पष्टपणे वगळण्यात आला आहे. यातही गंमत अशी की रेल्वे प्रवाशांना जो ‘पास’ देते त्यावर ‘मासिक किंवा त्रैमासिक सीझन तिकीट’ असे छापलेले असते. म्हणजे रेल्वेने हा ‘पास’ तिकीट म्हणूनच दिलेला असतो. परतावा देण्याच्या नियमांमध्ये मात्र ‘सिझन तिकीट’ असा शब्दप्रयोग न करता ‘पास’ असा शब्द वापरून ‘पासा’ला परताव्यातून वगळले आहे.

या (लेखकाच्या) दाव्याबद्दल शंका उपस्थित होते. पक्षी, हा पासास तिकिटांतून वगळण्याचा प्रकार नसून, अनारक्षित तिकिटांचे नियम पासास एक्स्टेंड करण्याचा प्रकार असावा, अशी शंका येते.

अर्थात, माझे कंजेक्चर चूक की बरोबर, याचे उत्तर वरील प्रश्नांच्या उत्तरांवर अवलंबून आहे.

बाहेरगावच्या गाड्यांच्या अनारक्षित तिकीटाची वेळवैधता माहीत नाही. लोकल ट्रेनचे तिकीट काढल्यापासून एक तासात प्रवास करावा लागतो. लोकल ट्रेनचे रिटर्न तिकीट दुसऱ्या दिवसाच्या मध्यरात्रीपर्यंत चालते, शनिवारचे सोमवारच्या मध्यरात्रीपर्यंत चालते. हे तिकीट कॅन्सल करता येते की नाही ठावूक नाही. मुंबई लोकलचे तिकीट दर इतके कमी आहेत की कॅन्सल करायची कल्पना कधी केलीच नाही. प्रत्यक्ष प्रयत्न करून खात्री करावी लागेल.

लोकल ट्रेन चे तिकीट कॅन्सल करून refund देण्याची पद्धत नाही

Passenger गाड्यांचे तिकीट refund होते पण प्रवासाच्या वेळेच्या अगोदर कमीत कमी किती तास .
तिकीट कॅन्सल केले तर च.
ते किती तास कन्फर्म माहीत नाही पण चार तास असावे.
आणि तिकीट घेतल्या नंतर local train मध्ये दोन तासात प्रवास करावा लागतो .त्या नंतर ते तिकीट चालत नाही आणि पैसे पण परत मिळत नाहीत.
Passenger train विषयी पण असाच नियम असावा

आरक्षित तिकीट विषयी पण स्पष्ट कायदे आहेत.तुम्ही तिकीट कॅन्सल करून परतावा घेवू शकता.
भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात स्वस्त प्रवासी सेवा आहे.
१८०० km वर राहणारे यूपी,बिहारी,बंगाली फक्त ८०० रुपयात तो प्रवास करू शकतात..
मुंबई ते पुणे १०० रुपये तिकीट आहे
२५० रुपयात ३५ km प्रवास मुंबई मध्ये महिनाभर करता येतो..खूप म्हणजे खूप स्वस्त आहे.
अशा रेल्वे वर आरोप करणे च महा पाप आहे.
जगात कोणी च इतकी स्वस्त सुविधा देवू शकतं नाही.
त्रुटी आहेत पण आरोपी च्या पिंजऱ्यात उभे करण्या इतक्या त्रुटी नाहीत

लाखो कर्मचारी आहेत .रोजगार देणारी सर्वात मोठी संस्था आहे

रेल्वे बाबत जनमत विरुद्ध करून रेल्वे चे खासगीकरण करण्यास लोकांचे समर्थन मिळावे हा हेतू वाटत आहे

नका हो, सुतावरून एवढा स्वर्ग नका गाठू! थोडासाच गाठा!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इथे असे म्हणता, त्या दुसऱ्या धाग्यावर रेल्वेला शिव्या घालता! का असे?

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************