ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ६
प्रकरण ६- आयुर्वेदाची औषधे – भाग १
सुधीर भिडे
यस्य कस्य तरोर्मूलम, येनकेनापि मिश्रितम,
यस्मै, कस्मै प्रदातव्यम, यद्वा तद्वा भविष्यति॥
सुभाषिताचा ढोबळ अर्थ असा – या ना त्या झाडाची फांदी नाहीतर मूळ घ्या, ते यात नाहीतर त्यात मिसळा, काढा बनवून या नाहीतर त्या रोग्याला द्या; काहीतरी होणारच!
विषयाची मांडणी
- द्रव्य चिकित्सा आणि अद्रव्य चिकित्सा
- वनस्पतीजन्य औषधे
- औषधांचे प्रकार
- औषधात सोन्याचा वापर
- सामान्यत: वापरली जाणारी औषधे
- समालोचन
***
द्रव्य चिकित्सा आणि अद्रव्य चिकित्सा
आयुर्वेदाच्या उपचार पद्धतीत दोन प्रकार आहेत – द्रव्य चिकित्सा आणि अद्रव्य चिकित्सा. गेल्या प्रकरणात आपण अद्रव्य चिकित्सेची माहिती घेतली या प्रकरणात आपण द्रव्य चिकित्सेची माहिती घेऊ. बोलीभाषेत द्रव्य शब्दाचा अर्थ निराळा होतो. आयुर्वेदाच्या संदर्भात द्रव्य म्हणजे पदार्थ. ज्या पदार्थांपासून औषधे बनतात असे तीन प्रकारचे पदार्थ असू शकतात.
प्राणीजन्य पदार्थ, खनिज पदार्थ, वनस्पतीजन्य पदार्थ
प्रत्येक पदार्थात असा एक घटक असतो जो आजारावर काम करतो. अशा घटकाला रस असे संबोधले जाते. आयुर्वेदाच्या materia medicaला द्रव्यगुणविज्ञान म्हणतात.
वनस्पतीजन्य औषधे
आयुर्वेदाची औषधे बहुतेक वनस्पतींपासून तयार केलेली असतात. आयुर्वेदिक वनस्पती हे पुस्तक वैद्य खडीवाले यांनी लिहिले आहे. या पुस्तकात २०१ वनस्पतींची माहिती दिलेली आहे. त्यांपैकी काही वनस्पती याप्रमाणे –
- फळे – अननस, आंबा, आवळा, अंजीर, कलिंगड, कवठ, केळी, खजूर, खरबुज, खारीक, चिंच, जांभूळ, डाळिंब, नारळ, बदाम, बोर, भोकर, सफरचंद, सीताफळ.
- फुले – कमळ, कर्दळ, गुलाब, चाफा, जाई, जुई, जास्वंद, झेंडू, पारिजातक, बकुळ (या यादीत रातराणी आणि मोगरा नाहीत.)
- मसाल्याचे पदार्थ – हळद, वेलदोडा, लसूण, लवंग, मोहरी, मिरी, पुदिना, धने, जेष्ठमद्ध, जिरे, जायफळ, केशर, ओवा, आले, आंबेहळद, (या यादीत दालचिनी, तमालपत्र नाहीत.)
- भाज्या – कांदा, कोहळा, गाजर, चुका, बटाटा, मेथी, शिंगाडा, सुरण, शेवगा, रताळे, (बटाटा ही भाजी भारतातली नाही. ती भाजी युरोपमधून भारतात आली. भाज्या तर किती तरी राहिल्या.)
- धान्ये – उडीद, सातू, तीळ (आयुर्वेदाप्रमाणे ही तीन धान्ये सोडता इतर धान्यात औषधी गुणधर्म नसतात!)
- मोठे वृक्ष – अशोक, उंबर, एरंड, ऊस, देवदार, चंदन, पळस, पिंपळ. बाभुळ, बेल, बुच, बांबू, शमी, सुपारी लाजाळू, (या यादीत कितीतरी मोठे वृक्ष नाहीत; शिवाय वड हा नेहमी आढळणारा वृक्ष नाही.)
- काही इतर वनस्पती – अडुळसा, अमरवेल, आघाडा, इसबगोल, कण्हेर, कांडवेल, केवडा, कोकम, कोरफड, कोरांटी, खैर, गवतीचहा, दुर्वा (गवत), गुळवेल, जमालगोटा, तुळस, त्रिफळा, धोत्रा, निरगुंडी, बिब्बा, मेंदी, निवडुंग, अफू, भांग, माका, मरवा, वावडिंग, शिकेकाई, शेवाळ, हिरडा.
वर साधारण शंभर वनस्पती मी पुस्तकातून नोंदल्या. याशिवाय मी नावेही न ऐकलेल्या वनस्पती आहेत. प्रत्येक वनस्पती कोठे मिळते आणि त्या वनस्पतीचा कोणत्या आजारावर उपयोग होतो याची माहिती पुस्तकात आहे. थोडक्यात म्हणजे प्रत्येक वनस्पती औषधी वनस्पती आहे.
खाली उद्धृत केलेल्या दुसऱ्या संदर्भात असे म्हटले आहे की १२००पेक्षा जास्त औषधी वनस्पती आहेत. याचा अर्थ असा की वैद्य खडीवाले यांनी आपल्या नेहमीच्या माहितीत असणाऱ्या वनस्पतींची माहिती दिली आहे.
More than 1,200 species of plants, nearly 100 minerals and over 100 animal products comprise the Ayurvedic Pharmacopoeia
(International Journal of Pharmaceutical & Biological Archives 2010; 1 (1): 24 –30, Asava and Aristha: An Ayurvedic Medicine – An Overview, A. K. Mishra, A. Gupta, V. Gupta, R. Sannd, P. Bansal)
वनस्पतींशिवाय आयुर्वेदात धातूंच्या भस्माचा उपयोग केला जातो. याविषयी पुढे विवरण येईलच.
औषधांचे प्रकार
निरनिराळ्या वनस्पतींची मुळे, खोड, पाने, फळे आणि बिया यांचा वापर करून औषधे बनविली जातात. बहुतेक वेळेला एकापेक्षा जास्त वनस्पतींपासून औषधे बनविली जातात. रोग्यास औषधे तेल, काढा, भस्म, चूर्ण, गोळी, आसव, आरिष्ट अशा निरनिराळ्या प्रकारे दिली जातात. तेले बहुधा बाहेरून चोळण्यासाठी असतात.
आसव आणि अरिष्ट म्हणजे काय?
अरिष्ट बनविण्यासाठी निरनिराळ्या वनस्पतींचा काढा वापरला जातो. आसव बनविण्यासाठी फळांचा रस वापरला जातो. त्या काढ्यात किंवा रसात साखर आणि धाटकी झाडाची फुले घातली जातात, बऱ्याच वेळेला अजून काही मसाले घातले जातात. यानंतर हा काढा किंवा रस आंबवले जातात (Fermentation). आंबवल्यानंतर अल्कोहोलचे प्रमाण १२%पर्यंत असू शकते. (माहितीचा स्रोत – International Journal of Pharmaceutical & Biological Archives 2010; 1 (1): 24 –30, Asava and Aristha: An Ayurvedic Medicine – An Overview, A. K. Mishra, A. Gupta, V. Gupta, R. Sannd, P. Bansal)
खडीवाले वैद्य यांचे आयुर्वेदीय औषधे हे पुस्तक आयुर्वेदाच्या वैद्यांसाठी लिहिले आहे. पुस्तकात ६९ औषधांविषयी माहिती आहे. प्रत्येक औषधाचे घटक, औषध तयार करण्याची कृती आणि ते औषध कोणत्या आजारावर दिले जाते याची माहिती आहे. उदाहरणादाखल दोन औषधांविषयी काय माहिती दिली आहे ते पाहू.
आरोग्य वर्धिनी – या औषधात ११ घटक आहेत. यात पारा (मर्क्युरी), गंधक (सल्फर), लोह, तांबे, अभ्रक यांची भस्मे आहेत. पारा शरीराला अतिशय घातक असतो.
हे औषध कोणत्या आजारांसाठी वापरले जाते – महारोग, त्वचारोग, कोड, कावीळ, ऱ्हूमटॉईड अर्थ्राइटिस, मणक्याचे विकार, मोतीबिंदू, पायोरिया, मलावरोध, हृदयाचे आजार, क्षय (टी. बी.), मधुमेह. याशिवाय अजूनही दहा-बारा आजारांची नावे आहेत. थोडक्यात ‘लाख दुखोंकी एक दवा’ हा प्रकार आहे.
यातील काही आजार जीवाणू संसर्गाने होतात; काही विषाणूच्या संसर्गाने होतात’ काही ऑटो-इम्यून आजार आहेत; काही आजार शरीरातील ग्रंथी नीट काम न करण्याने होतात. काही आजार वयोपरत्वे होतात. आजाराचे मूळ काहीही असो, औषध तेच.
च्यवनप्राश – पस्तीस पदार्थांचा काढा आवळ्याच्या मुरंब्यात मिळवून एकत्र उकळायचा की च्यवनप्राश तयार होतो. च्यवनप्राश हे जनरल टॉनिक म्हणून आवडीने खाल्ले जाते; ही एक फॅशन झाली आहे. एका विशिष्ट आजारासाठी च्यवनप्राश घेतले जात नसल्याने काय फायदा झाला हे सांगणे कठीण आहे.
औषधात सोन्याचा वापर
आपण उदाहरणादाखल तीन औषधांची माहिती घेऊ.
लक्ष्मीविलास रस – या औषधात सोने, चांदी, मोती, अभ्रक, लोह, मोती आणि इतर काही पदार्थांचे भस्म वापरले आहे. या औषधाशिवाय अजूनही काही आयुर्वेदिक औषधात सुवर्णभस्म वापरले जाते. लक्ष्मीविलास रस हे औषध कशासाठी वापरले जाते? क्षय, कावीळ आणि वीर्यात शुक्राणुंची कमतरता. या तीन आजारांचा एकमेकांशी काही संबंध नाही. या आजारांची कारणे अगदी निरनिराळी आहेत.
सुवर्णसिद्ध जल – एक ग्रॅम सोन्याचा पत्रा दोन कप पाण्यात टाकावा. ते पाणी उकळून पाव कप करावे. हे पाणी सकाळी नाश्त्याच्या आधी प्यावे. पित्तविकार, हृदयविकार, नेत्रविकार, गर्भदोष बरे होतात.
सुवर्ण बिन्दु प्राशन – हे औषध लहान मुलांसाठी असून, मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास हे कामी येते असे सांगितले जाते. दर महिन्याच्या पुष्य नक्षत्राच्या दिवशी हे औषध द्यायचे असते. हे औषध सोन्याचे भस्म आणि मध, तूप यासारख्या पदार्थांपासून बनविले जाते.
सुवर्णाचे भस्म
वरील दोन औषधात सोन्याचे भस्म वापरले आहे. हे भस्म म्हणजे काय ते पाहू. सुवर्ण भस्म बनविण्याच्या निरनिराळ्या पद्धती दिसतात. त्या क्रियेनंतर जो पदार्थ भस्म म्हणून बनतो त्याचे आधुनिक उपकरणांनी पृथक्करण केले गेले. त्यात हे आढळले की सोने शुद्ध स्थितीत तसेच आहे. (खालचा संदर्भ पाहा.) यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. सोने हे 'नोबल मेटल' आहे. दोन तीव्र आम्लांच्या मिश्रणाशिवाय सोन्यावर कशाचीही क्रिया होत नाही. थोडक्यात ज्याला भस्म म्हटले जाते ते इतर पदार्थात मिसळलेले शुद्ध सोनेच राहते.
Suvarna Bhasma, an Ayurvedic formulation manufactured as per Bharat Bhaishajya Ratnakar 5/8357 (BBR), has been studied using various instrumentation techniques: X-ray diffraction (XRD), scanning electron microscopy (SEM). Suvarna Bhasma to be crystalline in nature and to contain more than 98% gold. The mean size of the gold crystallites was less than 10 microns, and the morphology was globular and irregular. Suvarna Bhasma contains gold as its single and major element, with EDAX and FT-IR spectra showing that it is more than 98% pure gold.
J Pharmacopuncture , v.20 (1); 2017 Mar , Cited in National Library of Medicine.
सुवर्णभस्माचे सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केले असता आढळले की, त्या भस्मामध्ये सोन्याचे चमकदार कण जसेच्या तसे सूक्ष्म रूपात उपस्थित आहेत. त्यांचे कोणत्याही सल्फाइड अथवा ऑक्साइड यौगिकात रूपांतरण झालेले नाही. सोन्याला इतर धातूंपेक्षा भिन्न समजले जाते (noble metal), कारण त्याचे सल्फाइड अथवा ऑक्साइड यौगिक तयार होऊ शकत नाही. सुवर्ण भस्माचे धातू परीक्षण (Metalography Analysis) केल्यावर त्यात अधिकाधिक प्रमाणात मुक्त सुवर्ण धातूंचे सूक्ष्म कण दिसले.
संदर्भ – मराठी विश्वकोश
अशा प्रकारचे सोन्याचे छोटे कण पोटात गेले तर काय होईल? दोन शक्यता – काहीही न होता कण विष्ठेद्वारे बाहेर पडतील किंवा शरीराच्या कुठल्या ग्रंथीत जमून राहिले तर heavy metal toxicity होऊन अपाय होईल. खरी फसगत तर पुढेच आहे. लक्ष्मीविलास रस या औषधाच्या प्रक्रियेत लिहिले आहे की सुवर्णभस्म मिळत नसेल तर सुवर्ण मक्षिका वापरावे. सुवर्ण मक्षिका काय आहे? सुवर्ण मक्षिका चाल्कोपायराईट हे खनिज आहे. तांबे आणि लोह याचे ते सल्फाईड आहे. या खनिजाला सोन्यासारखी चकाकी असते. ते सोन्यासारखे दिसते म्हणून सोन्याऐवजी वापरायचे? सोने आणि तांबे-लोह यांचे खनिज यांचा एकच परिणाम?
सुवर्णसिद्ध जल म्हणजे पाण्यात सोने टाकून, ते उकळून पाण्यात काहीही फरक पडणार नाही, तुम्ही रोज उकळलेले पाणी प्याल – ज्याचा किमान काही अपाय होणार नाही.
सामान्यत: वापरली जाणारी औषधे
लिव्हर टॉनिक
च्यवनप्राश आणि तत्सम औषधांप्रमाणे आयुर्वेदिक यकृत / लिव्हर टॉनिक बाजारात मोठ्या प्रमाणावर खपते. निरनिराळ्या कंपन्यांनी स्वत:ची लिव्हर टॉनिके काढली आहेत. खालील दोन शोध निबंधांत बाधित यकृतावर आयुर्वेदिक औषधांचे काय परिणाम होतात हे तपासण्यात आले आहे. दोन्ही निबंधात औषधांचा परिणाम चांगला झाला असे निष्कर्ष आहेत. (अजूनपर्यंत मी एकही शोधनिबंध वाचलेला नाही ज्यात असे लिहिले आहे की 'हे' वापरू नये, परिणाम वाईट होतात. काय काम करत नाही हे सांगणे महत्त्वाचे असते;) यावरून टॉनिकांचाही चांगला परिणाम होत असावा.
The positive action in chronic liver diseases of Liv 52, an Ayurvedic herbal compound preparation frequently used in India for chronic liver diseases, is well documented.
Fleig W. W., Morgan M. Y., Hölzer M. A. The ayurvedic drug Liv 52 in patients with alcoholic cirrhosis. Results of a prospective, randomised, double-blind, placebo-controlled clinical trial. Journal of Hepatology. 1997;26
A Complex Multiherbal Regimen Based on Ayurveda Medicine for the Management of Hepatic Cirrhosis Complicated by Ascites: Nonrandomized, Uncontrolled, Single Group, Open-Label Observational Clinical Study
Manish V. Patel et al ; Evidence Based Complement Alternat Med. 2015; 2015: 613182.Published online 2015 Aug 3, doi: 10.1155/2015/613182
ॲलोपथीच्या काही औषधांचा यकृतावर वाईट परिणाम होतो. अशा औषधांबरोबर आयुर्वेदिक लिव्हर टॉनिक घेतले जाते.
- कफ सिरप
- रेचक (laxative)
- झंडूचे नित्यम, डाबरचे laxirid, डॉक्टर मोरपॅनचे कब्ज दूर आणि इतर बरीच
समालोचन
आयुर्वेदाच्या औषधोपचाराचे काय चित्र उभे राहते? आयुर्वेदात 'ह्या आजारावर हे औषध' ही प्रथा नाही. रोग्याची प्रकृती पाहूनच औषध दिले पाहिजे. ॲलोपथीप्रमाणे आता आयुर्वेदात 'ह्या आजारावर हे औषध' असा प्रकार चालू झाला आहे. शेकडो आयुर्वेदिक उत्पादने बाजारात आहेत. प्रमुख उत्पादकांची नावे पाहिली तर त्यात डाबर, पतंजली, असे काही माहीत असलेले ब्रॅण्ड्स सोडता बरीच नावे सामान्यजनांना माहीत नसलेली आहेत. यांपैकी बऱ्याच कंपन्या ISO 9000 certificate असल्याचे सांगतात. ॲलोपथीची औषधे बाजारात येण्यापूर्वी या औषधांना कठीण कसोट्यांतून पास व्हावे लागते. याविषयी आपण येणाऱ्या भागांत माहिती घेणार आहोत. अशा प्रकारच्या कसोट्या आयुर्वेदाच्या औषधांना नाहीत.
काही औषधांत कशी फसवणूक असते हे आपण पाहिले. सोन्याऐवजी सोनेरी रंगाचे लोखंड आणि तांब्याचे संयुग वापरले जाते. नाव मात्र सोन्याचे. काही औषधे ज्यांमध्ये जड धातूंची भस्मे असतात ती शरीराला हानिकारक असतात. काही औषधे इतक्या निरनिराळ्या रोगांवर उपयोगी असतात असे सांगितले जाते की आपण थक्क होऊन जातो.
ॲलोपथीपूर्वीचे पाश्चिमात्य वैद्यक आणि आयुर्वेद यांत बरेच साम्य दिसते. दोन्ही प्रणालींचा निर्माता एक देव होता. पाश्चिमात्य वैद्यकात चार ह्युमर्सचा विचार होतो ज्यातील समतोल बिघडला की आजार होतात असे समजले जाते. आयुर्वेदात वात, पित्त आणि कफ यांचा समतोल गेला की आजार होतो. दोन्ही प्रणालींत धर्माचा प्रभाव होता. पाश्चिमात्य वैद्यकात आजाराचे निदान करण्यासाठी रोग्याची नाडी, त्वचा, मूत्र आणि विष्ठा याचा तपास केला जाई. आपण पाहिले त्याप्रमाणे आयुर्वेदातही याच निर्देशकांचा उपयोग केला जाई. आयुर्वेदात अद्रव्य आणि द्रव्य चिकित्सा असे उपचाराचे दोन भाग आहेत. पाश्चिमात्य वैद्यकात फक्त द्रव्य चिकित्सेचा वापर केलेला दिसतो. पूर्वीच्या पाश्चिमात्य वैद्यकात पंचांगाला फार महत्त्व होते. तोच प्रकार आयुर्वेदात पुष्य नक्षत्राला देण्याच्या औषधाविषयी दिसतो.
(क्रमशः)
***
भाग १ – शास्त्रीय दृष्टीकोनातून निरनिराळ्या वैद्यकीय प्रणालींचे मूल्यांकन
भाग २ – ॲलोपथीच्या आधीचे पाश्चिमात्य वैद्यक
भाग ३ – आयुर्वेदाचे मूल सिद्धान्त
भाग ४ – आयुर्वेदाचे मूल सिद्धान्त – त्रिदोष
भाग ५ – परीक्षा आणि चिकित्सा
thanks!
फारच उपयुक्त भाग.
आयुर्वेदिक औषध म्हट्लं की बरेचदा ऐकू येतं - "त्यात काही अपायकारक तर नाही ना? नैसर्गिकच आहे, रसायनं नाहीत" इ.इ.
पण पारा, धातू वगैरे मंडळी अशा औषधांतून शरीरात जात असतील तर गेम ओवर आहे.
-----------
(विषयात गम्य नसल्याने तुमच्या लेखांवर प्रतिक्रिया देत नाही, पण लेखमालेचे सगळे भाग वाचनीय आहेत.)
==================
भूतकाळातील आस्वल्य.
ॲलोपॅथी, अधुनिक वैद्यक
ॲलोपॅथी, अधुनिक वैद्यक शास्त्राला आयुर्वेदा व्यतिरिक्त अजूनही काही पर्यायी वैद्यकीय प्रणाली आहेत ना?
सुरवातीच्या भागामधे त्यासंबधी थोडक्यात विवेचन आहे पण जास्त भर आयुर्वेदावरच दिसतो आहे.
"निसर्गोपचार" पद्धतीबद्दल बरेच ऐकले आहे.पण आयुर्वेदिक उपचार आणि निसर्गोपचार हे एकच नसावे असे वाटते.
या भागात सुवर्णभस्माचा उल्लेख आहे. मला माझ्या मुलाच्यावेळेस सुवर्णभस्म दिले होते. म्हणजे मी त्या वैद्यांकडे गेलेच नव्हतेच (अन्य कुणी त्या परस्पर करवून आणल्या होत्या). त्यांनी सुवर्णभस्माच्या काही महिन्यासाठी अशा पुड्या बांधुन दिलेल्या होत्या रोज घेण्याकरता म्हणून. त्याचा नक्की काय फायदा/तोटा झाला माहिती नाही..(मला काही त्रास होऊ लागल्याने मी शेवटच्या काही पुड्या घेतलेल्या नव्हत्या.)
लेख माहितीपूर्ण आहे.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
आयुर्वेदाचा शाब्दिक अर्थ आयु
आयुर्वेदाचा शाब्दिक अर्थ आयु वाढविणारे ज्ञान. यात सर्वच पद्धतीची औषधी येतात. हर्बल, धातू आणि रसायन आधारित औषधी वापर सर्वच उपचार पद्धतीत आहे. बाकी औषध घेण्यापूर्वी ज्या औषधींचे गुण आणि विपरीत प्रभाव आपल्याला माहीत असतात त्यांना आपण आधुनिक औषधी म्हणतो. बाकी कारची जसी नियमित सर्विसिंग करतो, टायर मध्ये वायु दाब व्यवस्थित ठेवणे , उत्तम दर्जाचे पेट्रोल इत्यादि वापरतो. हे सर्व म्हणजे निसर्ग उपचार.
बाकी जिभेवर नियंत्रण ठेवले तर रोगी होण्याची संभावना जवळपास नाही.
?
आयुर्वेदाचा अर्थ आयु वाढविणारे ज्ञान असा कुठे आढळला नाही.
बाकी जिभेवर नियंत्रण ठेवले तर रोगी होण्याची संभावना जवळपास नाही.
हे विधान अर्ध सत्य आहे.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
शास्त्रीय पद्धतीने निर्मित
शास्त्रीय पद्धतीने निर्मित भस्म अपायकारक नसते. एक रिसर्च पेपर:
Investigating the Role of Classical Ayurveda-Based Incineration Process on the Synthesis of Zinc Oxide Based Jasada Bhasma Nanoparticles and Zn2+ Bioavailability. ACS Omega, 2023. https://pubs.acs.org/doi/full/10.1021/acsomega.2c05391
...
अधोरेखित वनस्पती (अननस, सीताफळ, बटाटा, रताळे) या मुळातल्या भारतातल्या तर सोडाच, परंतु युरोपातल्या किंवा 'जुन्या जगा'तल्यासुद्धा नव्हेत. 'नव्या जगा'तून कोलंबियन एक्स्चेंजमार्फत प्रथम युरोपात आल्या, आणि तेथून हिंदुस्थानात आल्या असल्या पाहिजेत. वास्को-द-गामापूर्व हिंदुस्थानात त्या माहीत असण्याचेसुद्धा काही कारण नाही.
याचा अर्थ, या वनस्पती आयुर्वेदात गेल्या फार फार तर पाचशेसव्वापाचशे वर्षांत समाविष्ट करून घेतल्या गेल्या असल्या पाहिजेत; त्यापूर्वी नव्हे, आणि अतिप्राचीन काळात तर नव्हेच नव्हे.
काही आजार
TB,cancer, किडनी चे आजार,हाडांचे गंभीर आजार, मलेरिया, बाकी विषाणू जन्य आजार, जीवाणू जन्य आजार.
लोक आधुनिक उपचार च करतात .
लवकर बरे होण्यासाठी आयुर्वेद चा वापर करतात
दोन्ही शास्त्र लोक वापरतात.
घसा घवघवत असेल तर कोमट पाण्यात मीठ टाकून त्याच्या गुळण्या केल्या जातात
कोणी जावून टॅबलेट खात नाही.
Tb मधून लवकर कव्हर होण्यासाठी साठी आहार प्राचीन शास्त्र नुसार च घेतात.
एकमेकाला कमी समजण्याचे काही कारण नाही.