ओझेम्पिकचा कूटप्रश्न

ओझेम्पिकचा कूटप्रश्न

शरीराला भुकेची जाणीव झाली की आपण खातो. काही वेळाने आपलं पोट भरल्याची जाणीव होते आणि आपण खायचं थांबतो. पोट भरलं आहे ही माहिती मेंदूला एका संप्रेरकामुळे मिळते. त्या संप्रेरकाचं नाव जीएलपी १ (ग्लुकागॉन लाईक पेप्टाइड १). हे तयार झालं की शरीरात इन्सुलिन स्रवतं. जेवणानंतर शरीर आपणहून जीएलपी१ तयार करतं. तसं ते आपसूक तयार व्हायला हवं पण मधुमेहामुळे अनेकदा ही प्रक्रिया जशी घडायला पाहिजे तशी घडत नाही. २०१७ साली नोव्हो नॉर्ड्स्क नावाच्या डेनिश फार्मा कंपनीनं टाईप २ प्रकारच्या डायबेटीससाठी सेमाग्लुटाइड नावाचं एक पेप्टाइड तयार केलं. हा रेणू मानवी शरीरावर जीएलपी १सारखाच परिणाम करतो. त्यामुळे, टाईप २ डायबेटीस असलेल्या लोकांना रक्तशर्करा नियंत्रणात ठेवण्यासाठी औषध म्हणून सेमाग्लुटाइड दिलं जाऊ लागलं. याचा अजून एक फायदा असा, की या औषधामुळे विनासायास वजन कमी करता येतं, कारण हे औषध नियमितपणे घेतलं, तर भुकेची जाणीवच कमी होते. एवढंच काय, एकाच वेळी खूप खाताही येत नाही. औषध सुरू केल्याच्या पहिल्या काही आठवड्यांतच घेणाऱ्याचं वजन, आहे त्या वजनाच्या सरासरी १२-१५ % कमी होऊ लागतं. आणि जोवर औषध सुरु आहे तोवर ते पुन्हा वाढत नाही असंही निदर्शनास आलं. त्यामुळे डायबेटिससाठी दिल्या जाणाऱ्या मात्रेपेक्षा थोड्या जास्त मात्रेत हे औषध वजन कमी करण्यासाठी वापरण्यात येऊ लागलं. सेमाग्लुटाइड अमेरिकेत सध्या ओझेम्पिक आणि विगोवी या दोन ब्रँडनावांनी विकलं जातं. याच प्रकारे काम करणारं पण वजन कमी करण्याकरिता जास्त प्रभावी असलेलं टरझेपटाइड हे मुंजारो या नावानं विकलं जातं. ही माहिती या विषयावरल्या गेल्या काही महिन्यांतील छापील रिपोर्ताजमधून घेतली आहे. मी या विषयातील अभ्यासक किंवा तज्ज्ञ नाही. पण कुटुंबातल्या आधीच्या पिढीत सगळ्यांनाच मधुमेह असल्याने याबद्दल मिळेल ती माहिती वाचण्याकडे माझा कल असतो. या व्हिडीओमध्ये ही औषधं शरीरात कशा प्रकारे बदल घडवतात ते सविस्तर दिलं आहे.मधुमेहाचे किंवा डायबेटीसचे तीन मुख्य प्रकार आहेत. टाईप १, टाईप २ आणि जेस्टेशनल. पैकी, टाईप १ डायबेटीसमध्ये पचनादरम्यान अन्नापासून तयार झालेली, ग्लुकोजच्या रूपातील साखर अवयवांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारं संप्रेरक - इन्सुलिन - तयारच होत नाही. स्वादुपिंडात इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशी असतात. टाईप १ डायबेटीसमध्ये, शरीरच त्या पेशी मारून टाकतं (याला इंग्रजीत ऑटोइम्यून डिसऑर्डर म्हणतात). टाईप १ डायबेटीस लहान वयातच होतो. टाईप २ डायबेटीसमध्ये, इन्सुलिन तयार होण्याचं प्रमाण कमी असतं आणि/किंवा शरीराच्या पेशींची इन्सुलिन वापरण्याची क्षमता, इन्सुलिनशी असलेल्या सततच्या संपर्कामुळे कमी होते. त्यामुळे शरीरात पुरेसं इन्सुलिन असूनही, पेशी ते नीट वापरू शकत नाहीत. टाईप २ डायबेटीसला 'ॲडल्ट ऑनसेट डायबेटीस' असंही म्हणतात कारण हा बहुतेकवेळा तिशीपस्तीशीच्या पुढे होतो. जीवनशैली आणि खाण्यापिण्याशी या आजाराचा संबंध आहे आणि या दोन्ही गोष्टींमध्ये सुधारणा केल्या तर टाईप २ डायबेटीस सहज नियंत्रणात ठेवता येतो. तिसऱ्या प्रकारचा जेस्टेशनल डायबेटीस, हा ज्या बायकांच्या कुटुंबात मधुमेह आनुवंशिक आहे, बहुतकरून त्यांना गरोदरपणात होण्याची शक्यता असते. बाळाला पोटात आईचं रक्त मिळत असल्यानं आणि त्यात ग्लुकोजचं प्रमाण जास्त असल्यानं अशा प्रकारचा डायबेटीस असलेल्या आयांची बाळं जन्मतःच सरासरीपेक्षा जास्त वजनाची भरतात.

१९२२ साली कॅनडातल्या लेनर्ड नावाच्या एका चौदा वर्षांच्या टाईप १ डायबेटिक मुलाला, जनावरांच्या स्वादुपिंडांमधून काढून शुद्ध केलेलं इन्सुलिन दिलं गेलं. त्याची गगनाला भिडलेली रक्तशर्करा चोवीस तासांत योग्य पातळीवर आली. फ्रेडरिक बँटिंग नावाच्या सर्जननं कुत्र्यांवर प्रयोग करून १९२१मध्ये इन्सुलिनचा अर्क तयार केला होता. त्या प्रयोगाची पुढची पायरी म्हणजे लेनर्डवरील हा प्रयोग. अशा प्रकारे इन्सुलिन तयार करता येऊ शकतं हा शोध लागायच्या आधी, टाईप १ डायबेटीस असलेले लोक आजार झाल्यानंतर फार जगत नसत. आहारातील सगळी कर्बोदकं (ज्यांपासून ग्लुकोज सहज तयार होऊ शकतं असे पदार्थ) बंद करूनही त्यांचं आयुष्य काहीच वर्षं वाढवता यायचं. शरीरात इन्सुलिनच नसल्याने खाल्लेल्या अन्नातील साखर अवयवांपर्यंत पोहोचायची नाही. असे रुग्ण मग खंगून मरून जायचे. इन्सुलिनही शरीरातलं एक संप्रेरक आहे; आणि मानवी शरीराच्या बाहेर इन्सुलिन तयार करून ते रुग्णांना द्यायची यंत्रणा नसती, तर माझे वडील बेचाळीस वर्षं टाईप १ डायबेटीसबरोबर गुण्यागोविंदाने नांदू शकले नसते. वयाच्या बाविसाव्या वर्षी, काही जखम झाल्याचं निमित्त होऊन त्यांना डायबेटीस आहे हे लक्षात आलं. या विषयावर संशोधन करणाऱ्या पुण्यातील डॉ. याद्निकांनी त्यांचा डायबेटीस टाईप १ आहे हे ओळखून त्यांना लगेचच इन्सुलिनचं इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला. वेळीच योग्य उपचार घ्यायला सुरुवात केल्यामुळे त्यांच्या पुढच्या आयुष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या अनेक तब्येतीच्या समस्या तिथेच मिटल्या.

शरीरात टोचून घेता येणारं इन्सुलिन, टाईप १ डायबेटीस असणाऱ्या लोकांसाठी जितकं महत्वाचं आहे, कदाचित तितकंच ओझेम्पिक हे टाईप २ डायबेटीस असणाऱ्या लोकांसाठी महत्वाचं ठरेल असं गेल्या दोन वर्षांतल्या ओझेम्पिकच्या वापरातून समोर येऊ लागलं आहे. अशा प्रकारचे रेणू तयार करणाऱ्या फार्मा कंपन्या, त्यांचा फायदा करून देणारे डॉक्टर, आहारावर नियंत्रण ठेवण्यापेक्षा औषधांवर भिस्त ठेवणारे रुग्ण - या सगळ्यांचा विचार केला, तरी या औषधांचे फायदेच जास्त आहेत असं म्हणावं लागेल.

भुकेची जाणीव बंद झाल्यामुळे डोक्यातला गोंगाट कसा कमी झाला याचं हृद्य वर्णन पॉल फोर्डच्या 'वायर्ड'मधल्या या लेखात येतं. तो म्हणतो, मुंजारो घ्यायला लागल्यावर, (भुकेच्या जाणिवेने) सतत किंचाळणारा त्याचा मेंदू अचानक शांत झाला. ती शांतता गोंधळवून टाकणारी होती. ती पोकळी आता इतर कशानं भरावी असाही प्रश्न त्याला पडला. त्याचं वजन कमी होत असतानाही त्याला सतत व्याकुळतेनं ग्रासलं असल्याचं तो सांगतो. लठ्ठपणाशी झगडणाऱ्या लोकांना त्याला नेमकं काय म्हणायचं आहे ते नक्कीच कळेल. मुंजारो घेण्याआधी, पॉल अनेक वर्षं वजन कमी करायच्या पारंपरिक पद्धती वापरत होता. दिवसभरातल्या उष्मांकांचा हिशेब लिहीत होता. रोज सकाळी वजनकाट्यावर उभा राहत होता आणि मुख्य म्हणजे, मनातल्या मनात भुकेशी एक मूक लढाई लढत होता. असं करून त्यानं वजनातून शंभर पाऊंड कमी केले. पण लवकरच त्याचं वजन पुन्हा वाढलं.

लठ्ठ, विशेषतः अतिस्थूल, व्यक्तींकडे पूर्वग्रहानं बघितलं जातं. असे लोक आळशी असतात, त्यांचा जिभेवर ताबा नसतो, त्यांच्यात चांगल्या सवयींचा किंवा चिकाटीचा अभाव असतो असं सरसकट मत व्यक्त केलं जातं. अशी एखादी व्यक्ती भेटली, की तिच्या कुटुंबात लठ्ठपणा आणि डायबेटीसची आनुवंशिकता असू शकेल असा विचार न करता, अनेकदा त्या व्यक्तीबद्दल प्रतिकूल मत बनवलं जातं. कधीकधी, त्यांना आधीच माहिती असलेल्या गोष्टी त्यांच्या भल्यासाठी म्हणून त्यांना पुन्हा ऐकवल्या जातात. अलीकडेच आलेला ब्रॅन्डन फ्रेझरचा 'व्हेल' हा सिनेमा, ज्यासाठी त्याला सर्वोकृष्ट अभिनेत्याचं ऑस्करही मिळालं, एका अतिस्थूल आणि समलिंगी पुरुषाची गोष्ट सांगतो. त्या सिनेमाचा हेतू नक्की काय आहे हे मला अद्याप समजलं नाही, पण त्यात एका अतिस्थूल व्यक्तीचं आयुष्य विकृत कुतूहलानं जगासमोर मांडलं आहे असं तो सिनेमा बघताना मला वाटलं आणि मी तो पूर्ण बघूही शकले नाही.

मनोबलाचा अभाव किंवा स्वभावदोष हे जर लठ्ठपणाचं मूळ कारण असतं, तर आठवड्याला एक इंजेक्शन घेऊन, सहजपणे वजन कमी झालं असतं का? स्थूल असणे हे वैयक्तिक अपयश आहे आणि स्थूल नसणे हे यशस्वी असण्याचं लक्षण आहे असं मानणाऱ्या जगात ओझेम्पिकनं हा प्रश्न उपस्थित केला आहे. स्थूलतेवरचा इलाज जर एक औषध असेल तर स्थूलता हा एक आजार आहे आणि सतत लागणारी भूक हे त्याचं लक्षण आहे असंही म्हणता येईल. असा विचार केला तर अतिस्थूल व्यक्तींकडे तुच्छतेनं न बघता सहभावानं, सहानुभूतीनं बघता येऊ शकेल.

या बातम्यांमध्ये मला रस वाटायचं अजून एक कारण आहे. आधी टाईप २ डायबेटीस, नंतर अतिस्थूल व्यक्ती असं करत करत आता ओझेम्पिक एका वेगळ्याच वर्गाचं लाडकं झालं आहे. तो वर्ग म्हणजे सोशल मीडियावर वावर असलेल्या प्रसिद्ध आणि श्रीमंत व्यक्तींचा. गेल्या वर्षभरात अमेरिकेतल्या काही प्रसिद्ध व्यक्तींनी सेमाग्लुटाइडचं गुणगान गायलं आहे. इलॉन मस्कनं विगोवी वापरून सोळा किलो वजन कमी केल्याची कबुली ट्विटरवर दिली. अलीकडच्या काळात हॉलिवूडमधल्या अनेक तारकांनी इतक्या झपाट्यानं वजन कमी केलं की २०२३च्या ऑस्कर समारंभाची सुरुवातच जिमी किमेलनं ओझेम्पिकवर विनोद करून केली. श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्ती अशा प्रकारे वजन कमी करतात, त्यामुळे आपल्याला काय फरक पडणार आहे? असा विचार मनात येणं साहजिक आहे. पण तरुण पिढी (विशेषतः किशोरवयीन मुली आणि तरुण स्त्रिया) जी समाजमाध्यमं वापरतात (टिकटॉक, इन्स्टाग्राम) त्या माध्यमांवर ओझेम्पिकनं, आणि ओझेम्पिक घेऊन झटपट बारीक झालेल्या लोकांच्या चकचकीत चित्रांनी शिरकाव केला आहे.

आपण कसे दिसतो यावरून आपली पारख होते हे आदिम सत्य आहे. ज्याला इंग्रजीत हार्ड-वायर्ड असणे म्हणतात, तसं 'दिसणं' हा माणूस जोखण्याचा पहिला निकष आहे. ही प्रक्रिया ज्या वयात पहिल्यांदा घडू लागते, आणि ती जशी उलगडते त्यात आजूबाजूच्या मोठ्या माणसांचा फार हस्तक्षेप नसतो. आपल्या मुलाला/मुलीला दिसण्याबद्दल विशेष गंड असेल तरच हे विषय घरात बोलले जातात. हल्ली लहान मुलींना त्या सुंदर आहेत असं सांगायचंच नाही अशी एक प्रथा सजग पालकांनी पाडली आहे. त्यामुळे मुलींना सुंदर दिसणं महत्त्वाचं आहे असं वाटणार नाही हा त्याच्या मागचा उद्देश. याचा फायदा नक्कीच होत असावा. पण हायस्कूल - कॉलेजमध्ये अशा प्रकारचं भावनिक संरक्षण मिळणं कठीणच. त्यामुळे त्या वयातले नियम, निकष ग्राह्य धरून आपल्या रूपाची परीक्षा होतेच.

या परीक्षेतून कुणीही सुटत नाही. अगदी सार्त्रसुद्धा! मध्यंतरी सार्त्रबद्दल लिहिलेली काही पुस्तकं मी वाचली. सार्त्रबद्दल लिहिणारे लोक तो किती कुरूप होता (आणि तरी त्याला किती गर्लफ्रेंड्स होत्या) याचा उल्लेख केल्याशिवाय राहत नाहीत. सार्त्र तिरळा होता, बुटका होता, त्याची दृष्टी कमकुवत असल्याने तो सोडा-वॉटर चश्मा लावायचा आणि तरी तो बायकांना आकर्षक वाटायचा असं मी किमान दोन पुस्तकांमध्ये वाचलं आहे. त्याच्या कुरूप असण्याचं इतकं भरभरून वर्णन वाचलं नसतं, तर मी हौसेनं जाऊन सार्त्रचा फोटोही बघितला नसता. निदान सार्त्रसारख्या विचारवंतावर तरी ही वेळ येऊ नये! यातून नक्की काय निष्कर्ष काढावा याचाही मी विचार केला इतपत मला ते मजेदार वाटलं. म्हणजे, कुरूप पुरुष सार्त्रसारखे विचारवंत झाले, तर ते आपोआप आकर्षक होतील का? किंवा मी असं कुणाबद्दलच वाचलं नाहीये की अमुक अमुक पुरुष एकदम मदनाचा पुतळा होता पण तो मठ्ठ असल्यानं स्त्रियांना आकर्षक वाटत नसे. एकूण काय, दिसायला चांगली नसूनही किंवा सर्वसाधारण सौंदर्याच्या व्याख्येत न बसतादेखील एखादी व्यक्ती धडाधड जोडीदार मिळवत असेल, तर ती उल्लेखनीय बाब होते एवढं नक्की!

लठ्ठपणा सौंदर्यासाठी पूरक नाही हे सर्वमान्य आहे. पण बारीक व्यक्तींमध्येही बारीक असण्याच्या विविध पातळ्या आहेत ज्या गाठण्यासाठी अनेक तरुण व्यक्ती अघोरी उपाय करताना दिसतात. लठ्ठपणा आणि चंगळवादी/बेबन्द जीवनशैलीमुळे येणारे आजार यांचा थेट संबंध नाकारता येणार नाही. आधीच लठ्ठ असलेले लोक चुकीच्या जीवनशैलीमुळे उद्भवणार्‍या आजारांना बळी पडणं अधिक संभवतं, पण ह्याचा व्यत्यास नेहमीच खरा असतो असं नाही. तरीही लठ्ठ लोकांबाबतचे असे पूर्वग्रह अगदी वैद्यकीय तज्ज्ञही बाळगताना दिसतात. काही लोक भविष्यात आजार होऊ नयेत म्हणून वजन कमी करायचा किंवा ठेवायचा प्रयत्न करतात. किंवा, असा काही आजार झाल्यावर तो बळावू नये म्हणून वजन कमी करायचा प्रयत्न करतात. आणि काही सुंदर दिसण्यासाठी, सुडौल बांध्यासाठी, किंवा समाजातल्या तत्कालीन सौंदर्याच्या निकषांमध्ये बसण्यासाठी वजन कमी करायचा प्रयत्न करतात. अर्थात, वजन कमी करणारी प्रत्येक व्यक्ती यातील एकाच ध्येयानं पछाडली असेल असं नाही. पण कोणत्याही हेतूनं वजन घटवल्यानंतर आपण आधीपेक्षा सुंदर दिसतो आहोत अशा प्रतिक्रिया हटकून मिळतात. कमरेला, बाह्यांना ढगळ होणारे आधीचे कपडे सुखावतात. फोटो काढून घेण्याचा उत्साह वाढतो. एवढंच काय, पण आपल्या नवीन शरीरामुळे आपल्या मित्र-मैत्रीणीना आपल्याबद्दल मत्सर वाटतो अशी एक सुप्त जाणीवही होते.

ज्याचा लेखात आधी उल्लेख झाला आहे तो पॉल फोर्ड अतिस्थूल होता आणि डायबेटिकही आहे. मुंजारोनं या दोन्ही आजारांशी होणारा त्याचा संघर्ष कमी केला म्हणून त्याच्याबद्दल सहानुभूती वाटली. पण मर्लिन मनरोच्या कपड्यांत शिरता यावं म्हणून कुणी ओझेम्पिक घेत असेल तर त्या व्यक्तीला अशीच सहानुभूती मिळेल का?

कोणतीही वैद्यकीय समस्या नसताना केवळ बारीक दिसण्यासाठी औषध घेणं योग्य आहे का?

ज्या प्रसिद्ध व्यक्ती आज ओझेम्पिक घेताहेत, त्या याआधीही बारीक होण्यासाठी शरीरावर वेगवेगळे प्रयोग करत असत. लायपोसक्शनसारखे काही पर्याय लोकांना आधीही उपलब्ध होते. पण त्यात जोखीम होती, मोठे खर्च होते. आता ज्यांची महिन्याला हजार डॉलर खर्च करायची तयारी आहे, त्यांना ओझेम्पिकमुळे अल्पशी शारीरिक जोखीम पत्करून स्वप्नवत शरीर मिळवता येणार आहे.

अमेरिकेत लठ्ठपणा आणि गरिबी यांचा थेट संबंध बघायला मिळतो. ज्यांच्याकडे पैसे नाहीत अशा लोकांच्या खिशाला जे अन्न परवडतं, त्याचे उष्मांक श्रीमंतांच्या आवाक्यात असलेल्या अन्नापेक्षा जास्त असतात. त्यामुळे अमेरिकेत तरी, गरीब लोकांमध्ये टाईप २ डायबेटीस असण्याचे प्रमाण जास्त आहे. असं असताना, ज्यांना वैद्यकीय कारणांनी ओझेम्पिक घ्यायची गरज नाही त्यांनी औषधाचा तुटवडा तयार करून किमती वाढवणं योग्य आहे का? या प्रश्नाचं हो किंवा नाही असं उत्तरच देता येऊ नये अशा जगात आपण राहतो. पैसे असलेल्यांसाठी जर औषध उपलब्ध आहे, तर ते पैसे देऊन विकत घेण्यात काय चूक आहे?

गेलं दशकभर तरी, फॅशन उद्योगात एक प्रकारची क्रांती घडवण्याचं काम स्त्रियांनी केलं आहे. रनवेवर चालणाऱ्या हडकुळ्या मॉडेल बघून किशोरवयीन व्यक्तींच्या मनात सौंदर्याबद्दल अवास्तव कल्पना तयार होतात. त्यातूनच मग तरुण व्यक्ती ॲनोरेक्सियासारख्या मनोविकारांना बळी पडतात. यावर झालेल्या संशोधनामुळे आणि 'बॉडी पॉझिटिव्ह' चळवळींमुळे अलीकडे फॅशन उद्योगानं सगळ्या प्रकारची (उंच, बुटकी, जाड, बारीक, गौर, कृष्णवर्णीय, तरुण, मध्यमवयीन, म्हातारी) शरीरं रनवे आणि जाहिरातींमध्ये सामावून घेतली आहेत. हे केवळ एखाद्या आदर्शवादी चळवळीमुळे झालं आहे असं नक्कीच नाही. स्त्रियांची क्रयशक्ती वाढली; अनेक स्त्रिया कुटुंबव्यवस्थेला नाकारून एकट्या राहू लागल्या; लोकांचं सरासरी आयुर्मान वाढलं आणि लिंगभेद आणि वर्णभेद कमी झाले. या सगळ्याचा परिणाम असा की आपलं उत्पादन या सगळ्या वर्गांना आवडलं तरच खप वाढेल हे फॅशन उद्योग आणि त्याला पूरक असलेल्या व्यवस्थांच्या लक्षात आलं. अशी समता भांडवलशाहीच्या पथ्थ्यावर पडत असल्यानं का असेना, पण सत्याहत्तर वर्षांची हेलन मिरेन पीपलच्या मुखपृष्ठावर दिसली आणि अलीकडेच, ८१ वर्षांची मार्था स्ट्यूअर्ट स्पोर्ट्स इलस्ट्रेटेडच्या मुखपृष्ठावर स्वीमसूटमध्ये झळकली! ॲशली ग्रॅहम, रॉबिन लॉली यांच्यासारख्या रनवेच्या साच्यात न बसणाऱ्या स्त्रिया रनवेवर दिसू लागल्या. भारतातही, एकेकाळी साईझ झिरो झालेली करीना कपूर आता बारीक दिसण्यापेक्षा निरोगी असण्याचं महत्त्व पटवून देताना दिसते.

योग्य तो व्यायाम आणि आहार घेऊन आपण जसे आहोत तसेच सुंदर आहोत - हा बॉडी पॉझिटिव्हिटीचा नारा होता. पण ओझेम्पिकनं या चळवळीलाही सुरुंग लावला. पूर्वी जाड असलेल्या काही इन्फ्लुएन्सर ओझेम्पिकमुळे बारीक झाल्या असे आरोप त्यांच्यावर केले जातात. आणि नुसत्याच बारीक झाल्या नाहीत, तर त्यांना लाभलेलं नवं शरीर त्या अभिमानानं मिरवू लागल्या. त्यामुळे त्यांच्या लाखो चाहत्यांना विश्वासघात झाल्यासारखं वाटलं. असं वाटणं साहजिक असलं तरी स्वतःच्या शरीराबद्दल घ्यायचा निर्णय ही वैयक्तिक बाब आहे. हे पटकन लक्षात येऊ नये इतकी समाजमाध्यमांवर वैयक्तिक आणि सार्वजनिक यांतली सीमारेषा धूसर झाली आहे.

एखाद्याच्या शरीराचं त्यानं स्वतःहून असं वस्तूकरण करावं आणि त्यामुळे समाजातल्या ठरावीक लोकांवर (विपरीत) परिणाम व्हावा हे आधुनिक काळातलं नवीन दुःख आहे का? अर्थातच नाही. आजची समाजमाध्यमं आणि शरीरप्रतिमा (body image) याचा विचार करत असताना, एकदम १९३९ सालच्या ‘गॉन विथ द विंड’ सिनेमातल्या एका दृश्याची आठवण झाली. सिनेमाच्या सुरुवातीलाच येणार्‍या या दृश्यात मॅमी नावाची लठ्ठ, कृष्णवर्णीय दासी तिच्या शेलाट्या, गोऱ्या आणि नाजूक मालकिणीच्या, म्हणजेच स्कार्लेट ओ हाराच्या कॉर्सेटच्या नाड्या, जिवाच्या आकांतानं आवळते आहे असं दिसतं. ते दृश्य अनेक अर्थांनी बोलकं आहे. आणि ते माझ्या इतक्या लख्खपणे लक्षात राहण्याचं कारणही कदाचित मी तो सिनेमा पंधरा सोळाव्या वर्षी बघितला होता हे असावं. सिनेमा, फॅशन मासिकं, किंवा टीव्हीसारख्या प्रत्येक नवीन माध्यमानं सुंदर शरीर कसं असावं हे आपल्याला सातत्यानं सांगितलं आहे. पण आजच्या माध्यमांनी आपल्या आयुष्यातली जास्त जागा व्यापली आहे हेही तितकंच खरं आहे. तसंच, माध्यमांचं लोकशाहीकरण झाल्यानं, स्मार्टफोन आणि डेटा असलेल्या कुणाही व्यक्तीला इन्फ्लुएन्सर होण्याची स्वप्नं बघता येतात आणि ती कुणाच्याही मदतीशिवाय पूर्णही करता येतात. हे जरी एका बाजूनं मुक्त करणारं असलं, तरी अशा प्रकारच्या स्वातंत्र्याचाही पिंजरा होऊ शकतो याची जाणीव असायला हवी. माध्यमांच्या अशा पिंजऱ्यात बघणारे आणि दाखवणारे असे सगळेच अडकलेले असतात.

कुठल्यातरी सिनेमात एक अतिशय चिकट संवाद ऐकला होता. एखादी गोष्ट, नाण्याचा छापा-काटा करून का ठरवायची? कारण जेव्हा नाणं हवेत असतं तेव्हा आपल्याला नक्की काय हवं आहे ते लक्षात येतं. गेली काही वर्षं डाएटच्या जागी 'वेलनेस', 'प्लस साईझ'च्या जागी 'बॉडी पॉझिटिव्ह', असा शब्दसौम्यीकरणाचा (euphemism) खेळ खेळल्यानंतर लोकांच्या हाती ओझेम्पिक नावाचं नाणं आलं. जे हवेत उडवल्यावर, आपल्याला क्रॉप टॉप घालण्यासाठी, बिकिनीतले फोटो काढण्यासाठी आणि ते सगळे चकचकीत करून इन्स्टावर टाकण्यासाठी वजन कमी करायचं आहे - हे त्या सगळ्यांच्या एकदम लक्षात आलं. त्या चकचकीत फोटोंच्या भडीमारात मागच्या काही वर्षांच्या बॉडी पॉझिटिव्हिटीचा विसर पडायला वेळ लागणार नाही!

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सुरुवातच अशी दणकेबाज विज्ञानातून केल्यावर लेख आवडणारच! Wink

अतिस्थूल लोकांसाठी ओझेम्पिक, मुंजारो अशी औषधं उपलब्ध होणं चांगलंच आहे. अनारोग्य कमी करण्यासाठी औषधं घेऊन अतिस्थूल लोकांनी जरा सरासरी आकाराकडे झुकणं आणि दोन-चार किलो वजन कमी करून अत्याकर्षक दिसण्यासाठी अशी औषधं घेणं, शिवाय त्यातून वैद्यकीय गरज असणाऱ्या लोकांना औषधांपासून वंचित ठेवणं, हा प्रकार सरकारनं चालू देणं माझ्या आकलनापलीकडचा आहे. पण अमेरिका ही नवभांडलवलशाही आहे! पैसा, प्रसिद्धी आणि पर्यायानं सत्ता असली की आपण जे काही करू ते थोरच.

न्यू यॉर्करनं याच विषयावर काही महिन्यांपूर्वी लेख छापला होता - Will the Ozempic Era Change How We Think About Being Fat and Being Thin?
त्यात हा एक मुद्दा होता की बॉडी पॉझिटिव्हिटी या नावाखाली अनारोग्यही छानच असं म्हणावं का? त्या लेखात गायिका लिझो हिचा उल्लेख आहे -

I recently went to a doctor’s appointment in uptown Manhattan, during which it came up in conversation that I was writing about Ozempic. The doctor put down her stethoscope and turned to me. “You know, I love Lizzo,” she said immediately. “But it’s a shame that this whole body-positivity movement has made so many people think that it’s O.K. to be obese.”

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>“You know, I love Lizzo,” she said immediately. “But it’s a shame that this whole body-positivity movement has made so many people think that it’s O.K. to be obese.”

This is exactly what people and (even) doctors get wrong about being body positive.

रनवेवर दिसणाऱ्या बहुतांश बायका अजूनही साईझ ०-२ मध्ये बसणाऱ्या असतात. त्यांची उंची ५ फूट ९ इंच ते ६ फूट अशी असावी लागते. हे मॉडेलिंग क्षेत्रात ब्रेक मिळायला लागणारे बेसिक निकष आहेत. आपल्या आजूबाजूच्या किती प्रौढ बायका (पन्नशितल्या, चाळीशीतल्या, तिशीतल्या, विशीतल्याही) ०-२ साइझ कपड्यात मावतील? (Last time I checked, अमेरिकन प्रौढ स्त्रियांच्या शरीराचा सरासरी आकार १४ होता). पण यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान १३-२० वयोगटातल्या मुलींचं होतं. एखादी १३ वर्षांची ६ किंवा ८ साइझची मुलगी जेव्हा उपाशी राहून २ साइझच्या जीन्समध्ये बसण्याचा ध्यास घेते - तेव्हा body positivity गरजेची असते.

शिवाय, आज एखाद्या १६ वर्षांच्या मुलीची कंबर २३ इंच असेल, तर दहा वर्षांनी ती तेवढीच राहील ही अपेक्षा योग्य आहे का? मग २६ वर्षांच्या बाईला एखादा ड्रेस घ्यायचा असेल तर तो तिच्यासारख्या दिसणाऱ्या शरीरावर कसा दिसतो हे तिला बघायला आवडेल. त्यामुळे तिची खरेदी सोपी होईल. हा या चळवळीमागचा उद्देश आहे.
यामध्ये असलेल्या अनेक मुद्यांपैकी वजन हा एकच मुद्दा आहे. यामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या, वयाच्या, उंचीच्या मॉडेल्स असाव्यात असाही आग्रह आहे.
दुसरी गोष्ट अशी की morbidly obese असणारे लोक लहान वयापासूनच obese होत जातात. वजन कमी होण्याचं गणित त्रेराशिक मांडता येत नाही. म्हणजे समजा एका महिन्यात ३ किलो झालं तर तीन महिन्यांत ९ किलो होईलच असं नाही. याचं कारण तिसऱ्या महिन्यात प्रयत्न कमी पडतात असं नसतं. शरीर नेहमीच वजन कमी होण्याच्या प्रक्रियेला प्रतिकार करतं. बिगेस्ट लूझरमध्ये जाऊन वजन कमी केलेले लोकही जास्त काळ त्या मापाचे राहू शकत नाहीत. जरा अभ्यास करून बघितलं तर लक्षात येतं की, "होय! आहे मी १५० किलो! अभिमान आहे मला!" असं म्हणणारे फार कमी लोक सापडतील. पण ते १५० किलो आहेत म्हणून त्यांनी सतत तोंड लपवून राहावं का? त्यांनी चांगले कपडे घालून आपले फोटो काढून घेऊ नयेत का?

it’s a shame that this whole body-positivity movement has made so many people think that it’s O.K. to be obese.”

इथे obese या शब्दाच्या जागी old/wrinkly/short/black/brown असे शब्द घातले तर ते वाक्य असंवेदनशील वाटतं का? जर ते तसं वाटत असेल तर मग fat/overweight/obese हे शब्दही तसेच वाटायला हवेत. कारण body positivity is about all of those words. Not just size.

इथे obese या शब्दाच्या जागी old/wrinkly/short/black/brown असे शब्द घातले तर ते वाक्य असंवेदनशील वाटतं का? जर ते तसं वाटत असेल तर मग fat/overweight/obese हे शब्दही तसेच वाटायला हवेत. कारण body positivity is about all of those words. Not just size.

Being old/wrinkly/short/black/brown isn't (by itself) a health hazard, obesity is.
मला तुमचा मुद्दा कळतोय, पण body shaming न करतानाही obesity हा actionable health concern आहे, ही जागृती होणे गरजेचे आहे. We just need to find a sensitive/empathetic way of doing it.

BTW, तुम्ही आणि ऐसी अक्षरे वरील काही सदस्य लो कार्ब/IF बऱ्याच वर्षांपासून आचरणात आणता आहात, असं गेल्या काही लेखांमधून जाणवत आहे. Low carb वापरणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढते आहे. या लोकांमध्ये Ozempic वापरताना काही विशेष ( पण दुर्मिळ) धोके
उद्‌भवतात/ काळजी घ्यावी लागते. Euglycemic Diabetic Ketoacidosis

The Journey Is the Reward...

obesity हा actionable health concern आहे, ही जागृती होणे गरजेचे आहे.

हे औषधच क्लिनिकली ओबीज लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. त्यामुळे तो हेल्थ concern आहे याबद्दल कधीच दुमत नव्हतं. आणि जनजगृती झाली नाही असंही म्हणता येणार नाही. लठ्ठ लोकांना बारीक करून देण्यासाठी गेली अनेक दशकं भांडवलशाही झिजली आहे!
पण बॉडी positive असणं म्हणजे लठ्ठपणा धोकादायक आहे हे अमान्य करणं नव्हे. आपल्या आजूबाजूला जसे लोक प्रत्यक्ष दिसतात तसे टिव्हीवर, जाहिरातीत, समजमध्यामांत दिसावे असा तो आग्रह आहे. जेणेकरून कोणती तरी एकच "आदर्श सौंदर्याची" प्रतिमा लोकांच्या मनात रुजणार नाही. आणि जे लोक त्या प्रतिमेत बसत नाहीत त्यांचं शेमिंग किंवा बुलिंग होणार नाही, विशेषत: किशोरवयीन व्यक्तींमध्ये - ज्यांची या विषयीची वैचारिक बैठक अजून तयार झालेली नसते अशा लोकांचं. हा उद्देश खरंतर ओबीसिटीबद्दल जनजागृती करण्यासाठी पूरक आहे. अशा पद्धतीनं शेमींग किंवा बुलिंग झालं नाही, तर फक्त आरोग्यासाठी म्हणून वजन कमी करण्याचा प्रयत्न करणं सोपं होईल.

Ketoacidosis शरीरात इन्सुलिन कमी पडल्याने होतो. याचा धोका टाईप १ डायबेटिक लोकांना असतो. ज्यांना डायबेटिस नाही त्यांना ketoacidosis होत नाही. टाईप २ असेल तरी होत नाही पण डायबेटिस असेल तर डॉक्टरना विश्वासात घेऊनच IF/लो कार्ब करायला हवं. कारण टाईप २ ची औषधं कमी करावी लागतात IF करण्यासाठी.
माझ्या आईनं डॉक्टरला विश्वासात घेऊन, रोज ३ वेळा साखर मोजून, तिचा अभ्यास करून लो कार्ब केलं आहे. तिचा A1C ९ वरून ६.५ वर आला. असे डॉक्टर असतात आणि आहार बदलूनही T2D व्यवस्थित नियंत्रणात ठेवता येतो.

यासंदर्भात Ozempic वापरताना काळजी घ्यावी, मुक्तहस्ते सर्वांनी वापरावे, इतपत विदा आतापर्यंत नाही, असे मला म्हणायचे होते. लो कार्ब/IF वापरण्यात मला कमी धोके वाटत आहेत, कारण त्यामागील biochemistry बऱ्याच काळापासून ज्ञात आहे, आणि उत्क्रांती प्रक्रियेत time-tested आहे. आपल्या लेखाचे विषयांतर होण्याचा धोका पत्करून ozempic चे बरेचसे फायदे( कदाचित जास्त प्रमाणात) low-carb/IF Lifestyle अनुसरल्यास होऊ शकतातच!
I also wanted to point out that because an intervention works well for extreme 10% of cases, it need not be our mainstream intervention (that is to be used for masses). त्याचप्रमाणे, धोकादायक lifestyle factors बरे न करता, तीच lifestyle चालू ठेवण्यासाठी औषधे घेणे, हे fire alarm चा आवाज कमी कर्कश करण्यासाठी उपाय शोधण्यासारखे आहे.( हे ह्या लेखाच्या वाचकांसाठी आहे, तुम्ही सहमत आहातच, असे वाटते).
Ketoacidosis type 2 diabetes मध्ये होणे दुर्मिळ, पण ozempic+low carb+Type 2 DM ह्या संदर्भात(relatively) कमी दुर्मिळ. म्हणूनच ह्या संदर्भात euglycemic( ब्लड शुगर 'नॉर्मल' असताना) ketoacidosis असा शब्द वापरला जातो. The purpose of pointing this out is not to fear-monger against use of ozempic, but to point out that we need a more cautious approach with its usage for indications for which it wasn't adequately evaluated. After all, it may not be the first instance in which an overhyped 'wonder drug' for obesity had to be banned after few years, after the adverse effects were unveiled.Fen-Phen story

The Journey Is the Reward...

Yes. I agree with this.
वयोमानाप्रमाणे आणि आपल्या कुटुंबाची आनुवंशिकता जाणून घेऊन आहारात बदल करायला हवे. तसंच, वायोमनाप्रमाणे शरीराच्या बाह्य रुपात होणाऱ्या बदलांचाही स्वीकार करता यायला हवा.

याबद्दल एक निरीक्षण असं की काय आणि किती खाल्ल्यावर शुगर वाढते याचं प्रमाण अत्यंत व्यक्तीसापेक्ष आहे. माझ्या आजूबाजूच्या सजग लोकांकडे बघूनच हे लक्षात येतं. त्यामुळे काही काही लोकांसाठी शुगर वाढणार नाही असा आहार सतत घेत राहणं म्हणजे मेंदूला सतत हे खाऊ नको, ते खाऊ नको असे आदेश देत राहणं होतं. हा मानसिक ताणही शिणवून टाकणारा असतो. आणि गंमत म्हणजे जे प्रचंड व्यायाम करत असतात किंवा सतत डाएट करत असतात (आणि जे बाहेरून जाड म्हणावे इतके जाडही दिसत नाहीत) अशा लोकांनाही हा ताण जाणवतो.
आपल्या शरीराबद्दल आपला नेमका विचार काय असावा हा एक philosophical प्रश्न आहे असं मला वाटतं. या प्रश्नाशी आपल्या जगण्याच्या अनेक बाजू जोडल्या गेल्या आहेत. आपल्याला आपल्या शरीराबद्दल काय वाटतं: लहान वयात काय वाटतं, तरुणपणी जेव्हा आपण sexually active होतो तेव्हा काय वाटतं आणि उतार वयात काय वाटतं हे सगळं, सूक्ष्मपणे का असेना आपला जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन ठरवत असतं आणि आपला स्वभावही घडवत असतं.
त्यामुळे लहान मुलांशी त्यांना या सगळ्याचा किमान आवाका येईल अशा पद्धतीनं आधीच बोलायला हवं.
असो. हे जरा अवांतर झालं.

लठ्ठ लोकांना बारीक करून देण्यासाठी गेली अनेक दशकं भांडवलशाही झिजली आहे!

not being a cynic, पण हे वाक्य "लठ्ठ लोकांना बारीक करून देण्याचा देखावा करण्यात गेली अनेक दशकं भांडवलशाही झिजली आहे!" असे वाचावे.
(To be fair, जाणता/अजाणता.)

The Journey Is the Reward...

लेख विचार करायला लावणारा आहे. मी स्वत: लहानपणापासूनच जाडेपणाकडेच झुकलो असलो तरी जिभेवर नियंत्रण ठेवणे हे अतिशय कठीण वाटते. तरीही बारीक दिसावं म्हणून अशी औषधं घेणं वा १६:८ आचरणात आणणं हे मला कधी पटलं नाही. जोपर्यंत बेसिक पॅरामीटर्स लिमिटमध्ये आहेत तोपर्यंत जमेल तसं जगणं आणि त्याबद्दल मनांत गिल्ट वाटु न देणं हे चालूच ठेवणार आहे.

Metabolically healthy obese
I reiterate, obesity may not be a disease- it might be a sign of metabolic poor health.
कोणत्याही प्रकारचा आरोप/victim blaming/guilt trip induction न करता, भारतीयांमध्ये स्थूलत्वाविषयी पुरेशी जागरुकता नाही, गांभिर्य नाही, हे परत एकदा म्हणावेसे वाटते.

The Journey Is the Reward...

भारतीय लोकांमध्ये आणि विशेषतः स्त्रियांमध्ये आरोग्य चाचण्या करून घेण्याबद्दल उदासीनता आहे असं जाणवतं. मला वाटतं नियमित आरोग्य चाचण्या करून घेण्याची जागरूकता आली की आपोआप वजनवाढीबाबत जागरूकता येईल.

हे अर्थातच अगदी खरंय, पण त्याचबरोबर(in a broader sense) insulin resistance might simply be the "pathology of the century( in terms of sheer public health impact)" आणि routine blood tests वर त्याचे निदान सुरवातीची बरीच वर्षे होत नाही, हे माझ्या पेशंट्स आणि डॉक्टर मित्रांनाही पटवणे हे फार जिकिरीचे काम आहे, आणि हे सगळं "कळतंय, पण वळत नाही" ह्या पातळीवर आहे, हेही स्वानुभवाने(was on the other side of the fence just a few years back!) नमूद करतो.

असो, enough of Sunday morning rant! यापुढे (अजून) बोअर करत नाही.

The Journey Is the Reward...

अतिशय तज्ञ डॉक्टर न च सल्ला घेवून च औषध घेतली पाहिजेत.
मासिकातून प्रसिद्ध होणाऱ्या लेखांवर जास्त विश्वास ठेवणे खूप धोकादायक.
आहे.
फक्त वजन कमी असणे म्हणजे निरोगी आहे ह्याची पावती नाही.
आणि लठ्ठ आहे म्हणजे सर्व रोगांनी ग्रस्त आहे.
असे पण नाही.
उत्तम आरोग्य हेच ध्येय असावे.वजन कमी करणे इतकेच ध्येय असेल तर चुकीच्या निर्णय मुळे आरोग्याची हानी होण्याची खूप जास्त शक्यता आहे

मानवी शरीर हे अतिशय जटिल रचना असलेले आहे
.
त्या मुळे सांभाळून

मूळात भूक लागते म्हणजे काय होते? तर, रक्तातील ग्लुकोज कमी होऊन उर्जेचा एक स्त्रोत कमी होतो.

आता एक स्त्रोत (रक्तातील ग्लुकोज) कमी झाली तरी दुसरा एक स्त्रोत उपलब्ध असतो तो म्हणजे शरीरातील फॅट्स. परंतु, कायमच ग्लुकोजचा पुरवठा करीत राहून आपण आपल्या शरीराला फॅट्स जाळून उर्जा बनवण्याची सवयच लावलेली नसते.

१६/८ मध्ये नेमके हेच होते. ग्लुकोज संपल्यावर शरीर आपसूक फॅट्स जाळायला सुरुवात करते. मी सलग ३० तास काहीही न खाता आणि अजिबात भूक न लागता राहिलेलो आहे (अर्थात हे असे नेहमी करणे योग्य नव्हेच).

तेव्हा मला तरी भूक मंदावण्यासाठी काहीतरी औषधे घेण्यापेक्षा शरीराला फॅट्स जाळण्याची सवय लावणे अधिक श्रेयस्कर वाटते.

हे असेच घडते प्रत्येक व्यक्ती मध्ये .

फॅमिली डॉक्टर ना खासगी मध्ये विचारले तरी ते सांगतील असे काही नाही.
प्रतेक व्यक्ती चे शरीर वेगळे आहे .
कोणाचे शरीर काय रिस्पॉन्स देईल सांगणे कठीण आहे.
Covid लस विषयी केलेले दावे खरेच सरकारी यंत्रणेने तपासले तर मोठा झोल बाहेर येईल.
तरुण लोकांना heart aatack आता जे येत आहेत त्याला ही लस च जबाबदार आहे
अशी शंका अगदी संशोधक लोकांना पण आहे.
आर्थिक स्वार्थ हा वेगळा फॅक्टर पण जागतिक राजकारणात खूप प्रभाव टाकतो.

आपला पारंपरिक आहार घ्या तो चोरस आहार च आहे. तो
पिझ्झा, बर्गर, बटर,चीझ इत्यादी इत्यादी
ह्या पासून मुलांना लांब ठेवा.
मैदानी खेळ ,व्यायाम ह्यांची त्यांना सवय लावा.
काही जाड वैगेरे होत नाही माणूस.
पुण्याला जाताना फूड हॉल गाडी थांबते तेव्हा एक च दृश्य बघायला मिळते.
फास्ट फूड वर लहान थोरपसून सर्व तुटुन पडलेली असतात..
अगदी आठ दहा वर्षांच्या मुलाना पण तीच सवय त्यांच्या पालकांनी लावलेली असते.
आता असे झालेय
पहिले खडय्यात स्वतःच जावून पडायचे हात पाय fracture करून घ्यायचे आणि नंतर फ्रॅक्चर वर औषध शोधत फिरायचे.

नक्की किती वर्षे झाली की एखादी गोष्ट पारंपरिक म्हणून गणली जाते?

I’m stressing about ultra-processed foods, when the real worry is that many people can’t afford a healthy diet

"People rely on UPFs for convenience, cost and little or large hits of comfort, and avoiding them takes time and cash."

They're called 'fast' foods for a reason- they're convenience foods. (And they break fast very easily!)
As per Prof Robert Lustig, it takes twice as long, and costs twice as much to use real food in kids' breakfast, in place of ultraprocessed food(although it pays off on the long run). आज किती पालक एवढा वेळी/ पैसा ह्यासाठी खर्च करू शकतात( विशेषतः जाहिराती इ. Mental conditioning करत असताना)?

The Journey Is the Reward...

ज्वारी ची भाकरी ज्वारी पासून जशी बनवली जाते तशीच भाकरी माणूस आज पण खातो.
बनवण्यात थोडा पण फरक नाही.

ज्वारी ची भाकरी खाण्यास माणसाने सुरुवात केली त्याला आज पर्यंत किती वर्ष झाली.
तितके वर्ष जुन्या आहार पद्धतीला पारंपरिक आहार म्हणतात.
हजारो वर्ष वापरल्या मुळे त्याचे फायदे सिद्ध झालेले असतात.
जेव्हा पासून फूड इंडस्ट्रीज चालू झाल्या तेव्हा पासून जी काही नवीन आहार पद्धती मॉडर्न आहार म्हणून दावे करून आली .
ती आरोग्यास हानिकारक आहे.
फूड इंडस्ट्रीज संशोधक ठेवतात त्यांच्या हिताचे सायन्स लोकात पसरविण्यासाठी.
खोटे दावे सर्रास केले जातात वर सायन्स चे गोल्डन कव्हर लावून .

जनजागृतीचा (आवेर्यवर्धनाचा) उपक्रम स्तुत्य.

या कामी श्री. जयदीप चिपलकट्टी यांस लावून देता येईल, किंवा कसे, यावर विचार करीत आहे. (ऑन अ सीरियस नोट, इट मे नॉट बी सच अ बॅड आयडिया.)

स्तुत्य वगैरे सरळ आहे की वक्र याचा खूप विचार केल्यानंतर ते सरळच असावं असं वाटलं.
म्हणून सरळ आभार.

लेख आवडला

आभार!

लेख आवडला याला अनुमोदन.

Dr नीतू मांडके ह्यांच्या मुलाखती मधील एक वाक्य अगदी योग्य आहे.
M म्हणजे maths, आणि medicine.
Mathas मध्ये २+२=4 हे फिक्स असते .
पण medicine मध्ये.
2+2=4 कधीच नसतात

प्रतेक व्यक्ती चे शरीर वेगळे असते
तज्ञ अनुभवी डॉक्टर च इतिहास समजून घेवून योग्य सल्ला देवू शकतात.

'बॉडी पॉझिटिव्ह' ही भूमिका मानसिक आरोग्यासाठी मला योग्यच वाटते; आणि राजकीय भूमिका म्हणूनही. पण शारीरिक आरोग्याचा विचार करता ती टोकाला नेणं ठीक वाटत नाही.

टोकाला नेऊ नये म्हणजे काय - डॉक्टरनं आपल्या पेशंटशी व्यवहार करताना आणि आपण आपल्या जवळच्या नात्यातल्या वा मैत्रीतल्या लोकांशी व्यवहार करताना फक्त मानसिक आरोग्याचाच विचार न करणं.

किती वजन म्हणजे अतिस्थूल असणं, हा माझा प्रांत नाही.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>>टोकाला नेऊ नये म्हणजे काय - डॉक्टरनं आपल्या पेशंटशी व्यवहार करताना आणि आपण आपल्या जवळच्या नात्यातल्या वा मैत्रीतल्या लोकांशी व्यवहार करताना फक्त मानसिक आरोग्याचाच विचार न करणं.

फक्त मानसिक आरोग्याचा विचार न करणं असं काही असतं का? समजा एखाद्याला कॅन्सर झाला आहे. ती व्यक्ती जेव्हा डॉक्टरकडे जाते तेव्हा तिचं शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य (भीती, चिंता) असे दोन भाग करता येतात का?

दुसरी गोष्ट अशी की अतिस्थूल असणे (म्हणजे उंचीसाठी जे आदर्श वजन असेल त्यापेक्षा १०० पाउंड जास्त) हे फार क्वचितवेळा फक्त चुकीच्या जीवनशैलीमुळे होतं. त्यामागे डिप्रेशनसारख्या मानसिक समस्या आणि मुळात जनुकीय कारणं असतात.
मध्यंतरी न्यूयॉर्कमध्ये स्थूलपणावर एक कॉन्फरन्स झाली. तिथे जगभरातील संशोधकांनी स्थूलता कशामुळे येते यावर पेपर सादर केले. But there was no consensus on why some people gain weight, some people become morbidly obese and others don't. (https://www.nytimes.com/2022/11/21/opinion/obesity-cause.html)
स्थूलता हा विषय "खूप खाणारे आळशी लोक जाड होतात. आणि त्यांनी कमी/हेल्दी खाल्लं तर ते बारीक होतील" इतका सोपा नक्कीच नाही.
डॉक्टरांनी पेशंटशी वागताना कसं वागावं हे काही आपण सांगू शकत नाही. बऱ्याच डॉक्टरांना याचं भान असतं असं मला वाटतं..पण मित्र मैत्रीणीना किंवा नातेवाईकांना त्यांनी वजन कमी करावं/कसं करावं/का करत नाहीत असं विचारू नये एवढं नक्की. असं केल्याने कुणाचाही फायदा होत नाही आणि मैत्रीही तुटते.

स्थूलता हा विषय "खूप खाणारे आळशी लोक जाड होतात. आणि त्यांनी कमी/हेल्दी खाल्लं तर ते बारीक होतील" इतका सोपा नक्कीच नाही.

हे सध्या अस्तित्वात असणारं आणि टाकाऊ टोक आहे; त्याला विरोध म्हणून 'बॉडी पॉझिटीव्ह' ही राजकीय भूमिका येते. ती (किंवा कुठलीही) राजकीय भूमिका आरोग्याच्या आड येऊ देऊ नये.

ज्यांचं वजन उंची, वय, लिंग वगैरे सांपलमधल्या सरासरीपेक्षा ~५० किलो (१०० पाऊंड) जास्त असेल त्यांना जवळच्या, प्रेमाच्या लोकांनी फुक्कटचे सल्ले देण्यापेक्षा, आपल्या जवळच्या व्यक्तीला मदतीची गरज फक्त राजकीय भूमिकेला पाठिंबा म्हणून नाही तर काही विकार असल्यामुळेही आहे; याची जाणीव ठेवावी. व्यक्तींनुसार ही संभाषणं कशी असतील हे ठरेल. दुनिया स्थूल व्यक्तींना 'स्वतःवर ताबा नाही' अशा छापाची नावं ठेवत असताना, जवळच्या लोकांमध्ये कुणाला हा त्रास असल्यास 'हा विकार आहे आणि यावर कदाचित वैद्यकीय इलाजही असू शकेल'; हा आपल्या आरोग्यावर ताबा मिळवण्याचा मार्ग दाखवता येऊ शकतो.

कदाचित काही लोकांना ह्या लेखासारख्या लेखांमुळेही आपल्या विकारांवर ताबा ठेवणं शक्य आहे याची जाणीव होईल; काहींना आणखी काही निराळ्या पद्धतीनं हे सांगता येईल. सगळ्यांना हे जमेलच असं नाही. सगळ्यांसाठी ओझेम्पिक किंवा मुन्जारो उपयुक्त असतील असंही नाही.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>बॉडी पॉझिटीव्ह' ही राजकीय भूमिका येते. ती (किंवा कुठलीही) राजकीय भूमिका आरोग्याच्या आड येऊ देऊ नये.

या मुद्द्याशी सहमत आहे. पण मला मुळातच असं म्हणायचं आहे की इथे लठ्ठ किंवा स्थूल लोक body positive चळवळीच्या मागे लपतात असा एक समज झालेला दिसतो. बहुतांश स्थूल व्यक्तींना त्यांच्या वजनामुळे आरोग्याला धोका आहे याची जाणीव असते असं माझं म्हणणं आहे. अतिस्थूल नसलेले नुसते काही किलो ओव्हरवेट असणारे, बहुतांश लोकही वजन कमी करण्यासाठी झटत असतात. लेखातल्या फोर्डच्या उदाहरणावरून लक्षात येईल की वजन कमी करण्यापेक्षा कमी झालेलं वजन टिकवणं जास्त अवघड आहे. असं का आहे हे सांगायला पुन्हा एक लेख लिहावा लागेल. पण असं होण्यामागे शरीराचे mechanisms आहेत. त्यामुळे आपल्याला आपल्या वजनामुळे आजार होऊ शकतो हे बहुतांश लठ्ठ लोकांना माहिती असतं आणि आपण ते पुन्हा सांगून फारसा फायदा होत नाही असं माझं म्हणणं आहे.

लोकांशी वजनाबद्दल बोलायचा माझा एकच नियम आहे:
कुणी आपणहून माझ्याकडे बोलायला आलं तरच बोलायचं. हे असं अनेक वेळा होतं. आणि लोक आपणहून बोलायला लागतात त्याआधी नेहमी मीच माझ्या व्यायमाबद्दल किंवा डाएटबद्दल ते सतत करणं किती अवघड आहे अशा आशयाचं काही सांगितलेलं असतं. People look for signs of vulnerability in others before they start talking to them. So if at all such a conversation is to happen, it shouldn't start like a lecture. And it is most effective when it isn't pre-meditated.

जवळची व्यक्ती म्हणजे कोण? मला वाटतं वजनाबद्दल आपणहून बोलायला किंवा सल्ले द्यायला योग्य अशा जवळच्या व्यक्ती म्हणजे फक्त त्यांच्याबरोबर त्यांच्या घरात राहणाऱ्या व्यक्ती असू शकतात (आणि त्याही नेहमी empathy नं बोलतीलच असं नाही).

इथे सगळ्यात महत्त्वाचा संवाद हा त्या व्यक्तीचा स्वतःशी असलेला संवाद आहे. त्यासाठी लहानपणापासूनच शरिराबद्दल आणि अन्नाबद्दल सकारात्मक पद्धतीनं माहिती मिळायला हवी असं मला वाटतं. हल्ली शाळेत good food/bad food इत्यादी गोष्टी शिकवतात. पण घरीही हा संवाद चालू ठेवायला हवा.

लोकांशी वजनाबद्दल बोलायचा माझा एकच नियम आहे:
कुणी आपणहून माझ्याकडे बोलायला आलं तरच बोलायचं.

उत्कृष्ट धोरण. काश जगात असे लोक वाढतील.

- मी एक लठ्ठ

हे मात्र मान्य आहे.

लोक राजकीय भूमिकेच्या आड लपतात, असं मला अजिबातच म्हणायचं नाही. अतिलठ्ठपणा हा विकार आहे, आणि यात त्या व्यक्तींच्या वर्तनाचा फारसा हात नसेलच; ही माहिती त्यांना असेलच असं नाही. ओझेम्पिक, मुन्जारोसारखी औषधं आणि त्यांचा अतिलठ्ठपणावर उपयोग होणं बऱ्यापैकी नवीन आहे. दोन्ही बाजूंनी, राजकीय भूमिका आणि वैद्यकीय आकलन दोन्ही बाजूंनी मराठीत फार चर्चा होत नाही.

लोकांना आकारावरून काँप्लेक्स देणं मात्र स्थलकालातीत आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फास्ट वजन कमी केले काही तरी विचित्र उपचार करून तर ते कमी होते पण टिकून राहत नाही.
ह्याचे एक उदाहरणे मी बघितले आहे.
एक ओळखीचा व्यक्ती खूप जाड होता अर्थात वजन पण जास्त असणार च.
नंतर काही महिन्यांनी तो भेटला तर खूप सडपातळ झाला होता.
चेहरा बदलला नव्हता म्हणून ओळखत आले .
इतका फरक.
कसे वजन कमी केले,पोट कमी केले असे विचारले असता.
काही तरी गोळ्या,पावडरी घेवून त्याचा कोर्स त्यांनी केला होता..व्यायाम करण्याची त्या साठी गरज नव्हती.
आता दोन वर्ष नंतर कालच तो परत भेटला.
पहिल्या पेक्षा पण जास्त च जाड झाला होता.
आता हे असले गोळ्या,पावडरी चे उपचार किती खरे समजायचे

तुमचे मित्रवर्य अनंत अंबानी तर नव्हेत? Birds of the same feather flock to gether अशी काहीशी म्हण आहे.

LVMH आणि NOVA खूप आवडत्या कंपन्या

NOVA :किती सुंदर आहे हा फोटो :

X