सिंधू सरस्वती संस्कृती (भाग ३)

सिंधू सरस्वती संस्कृती (भाग ३)

जास्त मोठा आवाका?

सुधीर भिडे

(मागील भाग)

आपण पाहिले त्याप्रमाणे या संस्कृतीचा शोध सिंधू नदीच्या काठावरच्या वस्तीमध्ये लागला, याकरता ही संस्कृती सिंधू संस्कृती म्हणून ओळखली जाते. नंतर हे लक्षात आले की ही संस्कृती मोठ्या प्रमाणावर सरस्वती नदीकाठी पसरलेली होती. परंतु आपल्याला आपल्या सांस्कृतिक वारश्याची फारशी किंमत नसल्याने आपण अजूनही सिंधू संस्कृती असेच म्हणतो.

आता पश्चिम महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये उत्खननात हे माहीत झाले आहे की ही संस्कृती या भागात पण अस्तित्वात होती. तमिळ लोक या संस्कृतीला इंडस-पोरुनाई संस्कृती म्हणतात. त्यांना हे म्हणायचे आहे की त्यांचा आर्य संस्कृतीशी संबंध नाही. सिंधू सरस्वती भागात जीवन अवघड झाल्यावर हे लोक दक्षिणेकडे पसरले का आधीपासूनच तिथे होते याचा शोध घेतला पाहिजे. या भागात आपण महाराष्ट्रात आणि तमिळनाडूत झालेल्या उत्खननाची माहिती घेणार आहोत.

महाराष्ट्रातील उत्खनन

भुसावळपासून ७० कि मी अंतरावर निंबाळकर गढी येथे झालेल्या उत्खननात सिंधू सरस्वती संस्कृतीसारखे अवशेष मिळाले आहेत. जी खापरे मिळाली आहेत त्यावर सिंधू सरस्वती संस्कृतीच्या लिपीसारखे लिखाण आहे. आर्यांना लिखाण माहीत होते याचे काही पुरावे नाहीत. ही वस्ती ३५०० वर्षापूर्वीची आहे.
पुण्यापासून ९० किमी अंतरावर इनामगाव खेड्याच्या जवळ उत्खननात एका पूर्ण गावाचे अवशेष मिळाले आहेत. ही वस्ती १५०० बीसी या काळातील आहे. मातीची खापरे, दगडी वस्तू, तांब्याच्या वस्तू, मणी अशा वस्तू मिळाल्या आहेत. हे लोक शेती करत असत असा पुरावा आहे. एक भट्टी मिळाली आहे ज्याचा उपयोग निश्चित झालेला नाही. २६६ दफनस्थाने मिळाली आहेत. निश्चितच ही आर्यांची वस्ती नव्हती.

दैमाबाद (अहमदनगर)

प्रवरा नदीकाठी श्रीरामपूर तालुक्यात दैमापुर या गावात १९५८ पासून उत्खनन चालू आहे. २० हेक्टर जागेवर उत्खनन झाले आहे. जवळच एक दफनस्थान मिळाले आहे. भाजलेल्या मातीची भांडी मिळाली.


Sindhu Saraswati

सिंधू सरस्वती संस्कृतीचे शिक्के मिळाले आहेत. परंतु सर्वात महत्त्वाची वस्तू ब्राँझमधील बैलगाडीची प्रतिकृती. गाडीच्या जोखडावर कुत्रा उभा आहे. रथातील मूर्ती देवाची असावी. या रथाबरोबर तीन वन्य प्राण्यांच्या मूर्ती मिळाल्या आहेत. या तीनही मूर्तींना चाके लावली आहेत.

तमिळनाडूतील उत्खनन

गेल्या वीस वर्षांपासून दक्षिणेत, तामिळनाडू प्रांतात उत्खनन चालू आहे. येथे मिळालेल्या अवशेषांवरून परस्परविरोधी माहिती मिळते.

कीझाडी

तीन वेगवेगळ्या साईटसवर तीन ते साडेतीन हजार वर्षांपूर्वीचे अवशेष मिळाले आहेत. या सर्व वस्त्या तामिळनाडूतील पोरुणाई नदीकाठी मिळाल्या आहेत. येथील अवशेषात सिंधू सरस्वतीच्या वस्त्यांतील अवशेषांशी साम्य आहे. एक सिद्धांत असा आहे की ही जुनी संस्कृती सिंधूपासून दक्षिणेत पोरुणाई नदीपर्यंत पसरली होती.

सिंधू सरस्वती संस्कृतीत जी लिपी वापरली गेलेली दिसते त्या लिपीचा अजून अर्थ लागलेला नाही. किझाडी येथील उत्खननात सिंधू सरस्वती लिपीसारखी अक्षरे दिसून आली. या लिपीला तमिळ ब्राह्मी भाषा आणि लिपी असे संबोधले गेले. ही भाषा इंडो-आर्यन भाषा गटातील नसून द्रविडीयन गटातील असावी.


Sindhu Saraswati

असे समजले जाते की जेव्हा भौगोलिक किंवा अन्य कारणांनी सिंधू सरस्वती संस्कृतीच्या रहिवाश्यांना आपल्या जागांवर राहणे अवघड झाले तेव्हा ते लोक पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे पसरले. कीझाडी येथे जे अवशेष मिळाले ते या लोकांच्या संस्कृतीचे असावेत.

तमिळनाडूच्या आर्किओलोजी विभागाच्या एका अहवालाप्रमाणे किझाडी (किंवा कीलाडी) येथे वैगाई नदीकाठी ५८० बीसी ते १०० बीसी या काळात ही वस्ती होती. तमिळनाडूत या काळाला संगम युग असे म्हणतात. त्या वेळी या भागात पंड्या राजघराणे राज्य करीत होते.

अवशेषात विटांच्या भिंती आढळल्या. काही लोखंडी सामानाचे तुकडे मिळाले. पाण्याचा पुरवठा आणि सांडपाण्याची निचरा याची व्यवस्था होती. या साठी सिरामिकच्या नळ्या वापरल्या होत्या. यावरून ही संस्कृती चांगलीच प्रगत होती असे दिसते असे दिसते.


Sindhu Saraswati

तमिळनाडूचे असे मत आहे की उत्तरेची आर्यांची बीजेपी तमिळ संस्कृतीचा सन्मान करत नाही आणि उत्खननाला पैसे देत नाही. यासाठी तमिळनाडू सरकारने विशेष फंड देऊन येथे उत्खनन करवले.

आदिचनालूर

तमिळनाडूच्या आदिचनालूर गावाजवळ इतिहासपूर्व काळातील अवशेष मिळाले आहेत. हे गाव दक्षिण तमिळनाडूत कोर्काई गावाजवळ आहे. संगम साहित्यात कोर्काई गाव एक बंदर होते. आज ते गाव समुद्रापासून चाळीस किलोमीटर आत आहे. अर्थातच त्या काळी समुद्राची उंची जास्त होती. गुजरातमधील लोथल बंदराची हीच स्थिती आहे.

कार्बन डेटिंगप्रमाणे हे अवशेष ९०० बीसी ते ७०० बीसी या कालखंडातील आहेत. एका जर्मन पुरातत्त्ववेत्त्याला हे अवशेष प्रथम १८७६ साली ध्यानात आले. मिळालेले अवशेष तो जर्मनीला घेऊन गेला. या नंतर आर्किओलोजीकल सर्वे ऑफ इंडियातर्फे काम चालू झाले. हे काम शंभर वर्षे रेंगाळत पण चालू आहे. त्यामुळे अवशेषांचे नुकसान होत आहे. आर्किओलोजीकल सर्वे ऑफ इंडियाने या कामाकडे का दुर्लक्ष करावे ते कळत नाही. दिल्लीजवळच्या कामांनाच महत्त्व दिले जाते? १५० वर्षानंतरही अजून फक्त ४० % जागेवर उत्खनन झाले आहे.

उत्खननात आत्तापर्यंत १६९ दफनाची मातीची भांडी मिळाली आहेत. याशिवाय लोखंडाची अवजारे आणि हत्यारे मिळाली. ब्राँझ आणि सोन्याच्या वस्तूही मिळाल्या.

Negroid (African), Australoid, Caucasoid and Mongoloid या वर्णाच्या व्यक्तींचे अवशेष मिळाले. यावरून असे दिसते की या शहरात विविध वर्णांचे लोक रहात असत. कोर्काई बंदरात जगातील निरनिराळ्या भागातून तिथे लोक येत असावेत. हे लोक मसाले आणि सिल्क व्यापारासाठी आदिचनालूरला येत असावे.


Sindhu Saraswati

डॉक्टर राघवन यांच्या मते निरनिराळ्या वंशाचे लोक या प्रमाणात होते – 14% Negroids, 5% Australoids, 30% Mongoloids, 35% Caucasoid, 8% ethnic Dravidian and the remaining of mixed trait population.

डॉक्टर राघवन ऑस्ट्रेलियाचे रहिवासी असून त्यांनी स्वत:हून हा अभ्यास केला. त्या अभ्यासाचे त्यांनी चार ग्रंथ प्रसिद्ध केले.

या जागेचे सर्वात विशेष म्हणजे दफनाची पद्धत. मोठमोठाल्या मातीच्या भांड्यात मानवी अवशेष भरून ते जमिनीत पुरले जायचे त्याच बरोबर लहान भांड्यातून धान्य पुरले जायचे. काही भांड्यांवर लिखाण केलेले आढळले. त्या लिखाणाचा अजून अर्थ समजलेला नाही. अशाच प्रकारचे दफन सिंधू सरस्वती संस्कृतीत मिळाले आहे.


Sindhu Saraswati

Sindhu Saraswati

बऱ्याच मानवी अवशेषात असे दिसते की व्यक्तींना हिंसात्मक मरण आले होते.

पट्टनम

केरळ राज्याच्या किनाऱ्यावर पट्टनम एक खेडे आहे. तिथे वीस वर्षांपासून उत्खनन चालू आहे. कार्बन डेटिंगवरून या ठिकाणी १००० बीसी पासून वस्ती असावी. या खेड्याजवळ प्राचीन काळातील मुझीरीस बंदर असावे असा अंदाज आहे. या उत्खननात चिनी मातीच्या वस्तू, धातूची अवजारे, नाणी आणि भाजलेल्या मातीची भांडी मिळाली आहेत. या सर्व गोष्टी १०० बीसी काळातील असाव्यात. जी भाजलेल्या मातीची भांडी मिळाली आहेत त्यातील बरीच भारताबाहेरची आहेत.

सर्वात महत्त्वाची जागा बोटीचा धक्का आहे. बोटींचे जे अवशेष मिळाले आहेत त्यांचा काळ कार्बन डेटिंगवरून १००० बीसीच्या आसपास आहे असे सिद्ध झाले आहे. या सर्व अवशेषांवरून एक गोष्ट निश्चित होते की या बंदरातून पुरातन काळी मध्यपूर्वेशी आणि रोमबरोबर व्यापार होता. (Pattanam archaeological site : The wharf context and the maritime exchanges P. J Cherian)

समालोचन

सिंधू सरस्वती संस्कृतीचे लोक भारताच्या पश्चिम किनार्‍याने जाऊन तामिळनाडूपर्यंत पोचले होते का याविषयी संशोधन होण्याची आवश्यकता आहे. हे स्थलांतर झाले असले तर त्याचा सरस्वती नदी लुप्त होण्याशी संबंध होता का? सरस्वती नदी ३००० वर्षापूर्वी लुप्त झाली असा अंदाज आहे.

तमिळनाडूमधील दोन स्थळांच्या उत्खननात जी माहिती मिळते त्यात विरोधाभास दिसतो. या दोन ठिकाणी दोन निराळ्या प्रकारच्या संस्कृती अस्तित्वात होत्या असे दिसते. जर किझाडी येथील वस्ती सिंधू सरस्वती संस्कृतीशी निगडित होती असे मानले तर आदिचनालूर येथील संस्कृती निराळी होती आदिचनालूर येथे शस्त्रे सापडतात आणि हिंसेचा पुरावा दिसतो. याउलट सिंधू सरस्वती संस्कृतीत शस्त्रे आणि हिंसा यांना स्थान नव्हते. अशी पण शक्यता आहे की हे लोक सिंधू सरस्वतीचा भौगोलिक भाग सोडून ५०० वर्षे उलटून गेली होती आणि त्यांच्यात बदल झाले. जेव्हा या भागातील मानवी अवशेषांच्या डीएनएचा अभ्यास होईल तेव्हा जास्त खात्रीलायकरीत्या काही सांगणे शक्य होईल.

तमिळनाडूचा स्वत:चा ३००० वर्षांचा इतिहास आहे. चंद्रगुप्त / अशोकाचा काही थोडा काळ वगळता त्यांचा उत्तरेतील राजकीय घडामोडींशी संबंध राहिला नाही. त्यांना स्वत:च्या संस्कृतीचा अभिमान वाटणे साहजिकच आहे.

(पुढील भाग)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet