सिंधू सरस्वती संस्कृती (भाग ४)

सिंधू सरस्वती संस्कृती (भाग ४)

सिंधू सरस्वती संस्कृतीचा धर्म

सुधीर भिडे

(मागील भाग)

सिंधू सरस्वती संस्कृतीच्या रहिवाश्यांच्या धर्माचा विचार करताना एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की एक सर्वत्र पाळला जाणारा धर्म असावा असे वाटत नाही. चार हजार वर्षांच्या कालखंडात आणि इतक्या मोठ्या प्रदेशावर एकच धार्मिक समजुती होत्या असे शक्यही नाही. मिळालेल्या पुराव्यानुसार काही निष्कर्ष निघू शकतात.

अग्नीपूजा

काही दशकांपूर्वी असे मानले जायचे की अग्नीपूजा ही आर्यांची विशेषता होती आणि सिंधू सरस्वती संस्कृतीतील रहिवाश्यांच्या धर्मात अग्नीपूजेचा भाग नव्हता. परंतु गेल्या काही दशकांत झालेल्या उत्खननात सिंधू सरस्वती संस्कृतीमध्ये अग्निपूजेचे अवशेष मिळाले आहेत. त्यामुळे आर्य – दस्यू / दास / अनार्य हा भेद क्लिष्ट झाला आहे. पुढच्या भागात आपण हे पाहू की ऋग्वेदात अशी वचने आहेत जी यज्ञ न करणाऱ्या दस्यूंना कनिष्ठ समजतात. आता अग्नीपूजेचे पुरावे सिंधू सरस्वती संस्कृतीत मिळाल्यावर या वचनांचा अर्थ कसा लावायचा?

आर्य आणि यज्ञ या समीकरणाची सुरुवात पाश्चिमात्य संशोधकांपासून होते. या विचारसरणीत हे गृहीतक धरले जाते की आर्य कोकेशस पर्वताच्या भागातून निघून युरोपात आणि इराणमधून भारतात पोचले. असे समजले जाते की हे स्थलांतर ३७०० तो ४००० वर्षांपूर्वी झाले आणि त्याच काळात ऋग्वेदाची रचना झाली. हे जे लोक ३७०० वर्षापूर्वी भारतात आले ते आपले रीतीरिवाज घेऊन आले.

Sindhu Saraswati

कोकेशस पर्वताच्या दक्षिणेला काही ठिकाणी घोड्यांना पुरले असण्याचे पुरावे मिळाले. ही सर्व दफने ४००० वर्षांपूर्वीची होती. ऋग्वेदात वर्णन केल्याप्रमाणे घोड्यांचे पाय कापले होते. अश्वमेध यज्ञात घोडा पुरला जात नसून घोडा अग्नीला अन्न म्हणून देण्यात येतो. त्यानंतर घोड्याचे मास प्रसाद म्हणून भक्षण केले जाई. याशिवाय कोकेशस पर्वताच्या भागात ज्या घोडे पुरल्याच्या जागा मिळाल्या त्या ठिकाणी बऱ्याच घोड्यांचे सांगाडे मिळाले. अश्वमेध यज्ञात एकच घोडा बळी दिला जातो.

या भागात वैदिक संस्कृतीचा अजून एक पुरावा मिळाला आहे. कोकेशसपासून इराणपर्यंत झालेल्या उत्खननात घरात गोल आणि चौरस कुंडे मिळाली आहेत. अशी घरातील कुंडे वैदिक प्रथा अग्निहोत्र यात असतात.

तिसरा पुरावा मृत्यूनंतर प्रेतांच्या दहनाचा होता. कोकेशस ते इराण भागात त्या काळात मृत शरीरे जाळण्याची प्रथा दिसते.

संदर्भ दिलेल्या लेखाचा (Roots Of Vedic Rituals: On Harappan Fire Worship And Its Vedic Parallels, Indica today, Akshay Shankar, 16/9/20) निष्कर्ष हा होता की आर्यांच्या अग्नीपूजेच्या कर्मकांडांचा कोकेशस ते इराण या भागात मिळालेल्या माहितीशी काही संबंध नाही. असा निष्कर्ष का काढावा हे समजत नाही. वैदिक कर्मकांडांशी याचा सारखेपणा दिसतो. आर्यांच्या स्थलांतर सिद्धांताला पाठिंबा मिळतो.

सिंधू सरस्वती संस्कृतीत आता अग्नीपूजेचे पुरावे मिळाले आहेत. सर्वात महत्त्वाचे उत्खनन कालीबंगण येथील आहे. या स्थळी एके ठिकाणी एका ओळीत सात अग्नीकुंडे मिळाली. सात या आकड्यास काही महत्त्व असावे . सप्तमातृका असा उल्लेख वेगळ्या संदर्भात येतो. मोहेंजोदारो येथे एक शिक्का मिळाला आहे ज्यावर सात व्यक्ती पिंपळाच्या झाडाखाली चालताना दिसतात.

या सात कुंडांच्या बाजूला एक खड्डा आहे ज्यात राख आणि कोळसे मिळाले. असे दिसते की या कुंडात अग्नी अखंड राखला जाई आणि जरूर तेव्हा या सात कुंडात अग्नी प्रज्वलित करण्यासाठी हा बाहेरचा अग्नी वापरला जाई. अग्निहोत्र परंपरेत अग्नी कायम राखला जातो. त्या काळात अग्नी कायम ठेवणे महत्त्वाचे होते. कारण अग्नी उत्पन्न करणे सोपे नव्हते.

या सात कुंडांच्या बाजूला उत्तर-दक्षिण दिशेत एक भिंत आहे. जेव्हा या कुंडात व्यक्ती कर्मकांड करीत असेल त्यावेळी तिचे तोंड पूर्वेकडे असेल. ऋग्वेदातील ३.१.२ , ५.२८.१. अशा ऋचातून हेच लिहिलेले आहे. वेदातील सोमयज्ञात अशा तह्रेची कुंडे सांगितली आहेत.

दुसऱ्या एका कुंडात घोडे आणि इतर प्राण्यांचे अवशेष मिळाले. खाली पहा. यज्ञात दिलेल्या बळींचे हे अवशेष होते.

Sindhu Saraswati

या यज्ञकुंडांच्या बाजूला अंघोळीची जागा आहे. अशा जागेची व्यवस्था शतपथ ब्राम्हणात सांगितली आहे.

पशूला मारण्याची पद्धत

कालीबंगणमध्ये एक मातीचा साचा मिळाला आहे. त्यावर एक माणूस पशूचे तोंड दाबून पशूला गुदमरून मारत आहे असे चित्र आहे. या व्यक्तीने शिंगे असलेले शिरस्राण घातले आहे. शतपथ ब्राम्हणात पशूला असेच मारण्यास सांगितले आहे.

बनवली येथे गजपृष्ठाकृती (आयताची एक बाजू गोलाकार) कुंडे मिळाली आहेत. अग्निहोत्रात दक्षिणाग्नीचा असा आकार असतो.


Sindhu Saraswati

Sindhu Saraswati

अशा प्रकारची यज्ञ कुंडे मथुरेत मिळाली आहेत

Sindhu Saraswati

मातृदेवता

डोक्याच्या दोन बाजूला दिवे असलेल्या स्त्रियांच्या पुष्कळ मूर्ती मिळाल्या आहेत. असे वाटते की मातृदेवता मोठ्या प्रमाणावर पुजली जात असे.

Sindhu Saraswati

पुरुष लिंग प्रतिमेची पूजा ही पण सर्वत्र होती. एकंदर प्रजनन हे महत्त्वाचे होते.

सप्तमातृका

खालील प्रतिमेत डावीकडे वर एका झाडात एक पुरुष उभा आहे. त्याच्या पायाशी एक पुरुष वाकून बसलेला आहे. खालच्या बाजूला सात स्त्रिया उभ्या दिसतात. ऋग्वेदात सोम तयार करण्याच्या प्रसंगाचे वर्णन आहे. या कार्यक्रमावर सप्तमातृका देखरेख करत असे वर्णन आहे. वाकलेला पुरुष अग्निदेव असावा. हे पाहण्यासारखे आहे की सर्व व्यक्तींना शिंगे दाखविली आहेत.

Sindhu Saraswati

एकशिंग्या

जवळजवळ एक हजार शिक्के सापडले आहेत की ज्यावर एकशिंग्याचे चित्र आहे. असा कोणताही प्राणी त्या काळी अस्तित्वात नव्हता. याचा संबंध मातृदेवता आणि प्रजननाशी असावा.

Sindhu Saraswati

पशुपतीसारख्या देवाचे चित्रण अनेक ठिकाणी आढळते. या चित्रात हत्ती, गेंडा, म्हैस आणि डुक्कर हे प्राणी दिसतात पण घोडा दिसत नाही. या संस्कृतीतील सर्व देव शिंगे धारण केलेले दिसतात.

Sindhu Saraswati

एक मूर्ती सापडली ती धर्मगुरूची असावी असे वाटते, या व्यक्तीच्या अंगावर एक वस्त्र आहे. या व्यक्तीला दाढी आहे पण मिशा नाहीत. मिशा कशा साफ केल्या असतील? या व्यक्तीच्या दंडावर आणि कपाळावर एक दागिना आहे.

Sindhu Saraswati

लिंगपूजा

कालीबांगन येथे शिवलिंग सापडले आहे. ऋग्वेदात अनार्यांच्या शिश्न देवाचा उल्लेख येतो

Sindhu Saraswati

स्तंभपूजा

ढोलावीरा येथे बालेकिल्ल्यात दीड मीटर उंचीचे स्तंभ मिळाले आहेत. अशा प्रकारचे स्तंभ आजही कित्येक मंदिरात दिसतात.

देऊळ कल्पना

सिंधू सरस्वती संस्कृतीत मूर्तीपूजा असली तरी देऊळ ही कल्पना विकसित झाली नव्हती असे दिसते. सापडलेल्या मूर्ती छोट्या आकाराच्या आहेत आणि त्यांची पूजा घरात होत असावी असे दिसते.

मृतांचे दफन / दहन


Sindhu Saraswati

सिंधू सरस्वती संस्कृतीचे लोक मृतांचे दफन करीत. मृताबरोबर दफन करताना त्याच्या पुढच्या प्रवासासाठी धान्य मातीच्या भांड्यात ठेवले जाई. अशीच कल्पना इजिप्तमध्ये पण दिसते. दोन संस्कृती ज्यांच्यात काहीही संबंध नव्हता, त्यांचा मृताबद्दल एक विचार असावा हे विशेष नाही का? या लोकांनी मृतांचे दफन केल्यामुळे एक फायदा असा की अवशेषांचा डीएनए तपासून ह्या लोकांचे मूळ शोधता आले. दफन करताना मृताचे डोके उत्तरेकडे आणि पाय दक्षिणेकडे करून ठेवत.

परंतु दहन केल्याचे प्रमाण पण मिळाले आहे. अस्थीकुंभात ठेवलेल्या अस्थीही मिळाल्या. आर्य मृतांचे दहन करीत. ईशावास्योपनिषद, जे ऋग्वेदानंतर बनले त्यात एक मंत्र असा आहे – वायु: अनिलं अमृतम, अथ ईदम भस्मातम शरीरम – माझे प्राण पंचतत्वात विलीन होवोत. माझ्या शरीराचे भस्म होवो.

समालोचन

मिळालेल्या माहितीवरून असे म्हणता येईल की सिंधू सरस्वती संस्कृतीमधील रहिवाश्यांचा धर्म आर्यांच्या धर्मापेक्षा निराळा होता. जोपर्यंत अग्नीपूजेचे पुरावे या संस्कृतीत मिळाले नव्हते तो पर्यंत कथा सरळ होती – आर्यांनी ही संस्कृती नष्ट केली. सिंधू सरस्वती संस्कृतीत अग्नीपूजेचे पुरावे मिळाल्यावर कथा अवघड झाली आहे. पुढच्या प्रकरणात आपण ऋग्वेदातील संदर्भ घेऊन अधिक माहिती घेऊ.

संदर्भ
Roots Of Vedic Rituals: On Harappan Fire Worship And Its Vedic Parallels, Indica today, Akshay Shankar, 16/9/20
कोणे एके काळी, सिंधू संस्कृती, म के ढवळीकर , राजहंस प्रकाशन , २००६

(क्रमशः)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मधुकर ढवळीकर यांची दोन पुस्तकं आज ऑर्डर केली आहेत. राजहंस प्रकाशनची आहेत. "कोणे एके काळी सिंधु संस्कृती" आणि "आर्यांच्या शोधात".

या विषयावर विद्वानांमध्येच इतके मतभेद आहेत की, नेमके सत्य काय असावे यावर संभ्रम होणे सहाजिक आहे. आधुनिक संशोधन, विद्वानांचे बहुमत, ढवळीकरांचे स्वतःचे मत यासाठी ही दोन पुस्तके घेतली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0