मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (10)

हुबेहूब माझ्यासारखा अजून कुणीतरी कुठेतरी असेल का?

प्रचंड अंतरावरील एखाद्या दुसऱ्या दीर्घिकेत आपल्यासारखीच एक आकाशगंगा आहे. त्या आकाशगंगेतसुद्धा आपल्या येथील सूर्यासारखा तारा आहे. या तारेपासून पृथ्वीसारखाच दिसणाऱ्या एका तिसऱ्या ग्रहावर तुमच्यासारखाच दिसणारा अस्तित्वात आहे. तुमच्यासारखाच तो जीवन जगत आहे. एवढे कशाला, तुम्ही आता जे वाचत आहात तेच तो तिथे वाचत आहे. अगदी तीच ओळसुद्धा….

आश्चर्याचा धक्का बसला ना? ही तर फक्त सुरुवात आहे. आपल्यासारख्या दिसणाऱ्या लाखो दीर्घिका या ब्रह्मांडात आहेत व यापैकी एखाद्या दीर्घिकेतील ग्रहावर तुमचीच छाया प्रती असलेली माणसे राहतात. अगदी या क्षणापर्यंत ते सर्व हुबेहूब तुमच्यासारखे वाटतात.

अशा प्रकारचे समांतर जगाच्या कल्पनेत नवीन काही नाही. विज्ञान कादंबऱ्यांमध्येही ते सातत्याने आढळते. क्वांटम मेकॅनिक्सच्या सिद्धांतामुळे बहु विश्वाच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झालेले आहे. या सिद्धांतानुसार या विश्वाची विभागणी सातत्याने होत असते. विश्वनिर्मितीच्या सिद्धांताचा हा एक न टाळता येणारा परिणाम आहे. याविषयी विचार करताना काही गोष्टी आपल्या लक्षात येऊ लागतील. आपल्या विश्वाचा जन्म 1370 कोटी वर्षांपूर्वी झाला आहे. हे खरे असल्यास 1370 कोटी प्रकाशवर्षां- पलीकडील ताऱ्यांचा प्रकाश अजून आपल्यापर्यंत पोचला नाही. इतक्या लांब अंतरावरील ताऱ्यांचे प्रकाशकिरण विश्वाच्या क्षितिजाच्या पलीकडे आहेत असे म्हणता येईल. तरीसुद्धा या विश्वात अजून काही तरी असावे असे आपल्याला जाणवते. विश्वनिर्मितीस कारणीभूत ठरलेल्या महास्फोटातून बाहेर पडलेल्या प्रारणामुळे प्रचंड वेगाने या विश्वाचे प्रसरण होत आहे. त्यालाच तज्ज्ञ ‘फुगवटा’ असे म्हणतात. या फुगवट्याच्या सिद्धांतावरूनच या ब्रह्मांडात अनेक विश्वे असू शकतील ही कल्पना मूळ धरू लागली. आपण प्रत्यक्षात निरीक्षण करत असलेले विश्व एखाद्या बुडबुड्यासारखे असल्यास त्याच्या भोवती असंख्य बुडबुडे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा बुडबुडा ज्याप्रमाणे भौतिकीच्या नियमांचे व तत्त्वांचे पालन करतो त्याचप्रमाणे इतर बुडबुड्यांनासुद्धा काही नियम व तत्त्वे असणार. प्रत्येकाची सुरुवातीची स्थिती वेगवेगळी असल्यामुळे अती उष्ण स्थितीतून हळूहळू बाहेर पडून थंड झाल्यानंतर विविध प्रकारचे तारे व दीर्घिका या ब्रह्मांडात आल्या असाव्यात. त्यामुळे शेजारच्या बुडबुड्यातील वस्तूंची रचना थोडीशी वेगळी असू शकेल. त्याच्या शेजारच्याची आणखी वेगळी…..आणखी वेगळी….असे होत गेले असेल. शेवटी शेवटी वस्तूंच्या रचनेतील विविधता संपून जाण्याची शक्यता आहे. याचाच परिणाम म्हणजे काही निर्दिष्ट मर्यादेपर्यंतच वस्तूंच्या रचनेत विविधता येऊ शकते. या ब्रह्मांडाला अंत नसल्यास आपल्यासारखी व त्याचवेळी आपल्यापेक्षा वेगवेगळी असलेली अनंत विश्वे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ब्रह्मांडात कुठल्याही दिशेने आपण प्रवास करत असल्यास कुठेतरी आपल्या विश्वासारखेच एखादे विश्व नक्कीच सापडेल. त्याच विश्वात आपल्यासारखी पृथ्वी असेल. व त्या पृथ्वीवर हुबेहूब आपल्यासारखी दिसणारी एखादी व्यक्तीसुद्धा असू शकेल. …. फक्त हे जग दिसण्यासाठी आपल्याला 101028 मीटर्स एवढा प्रवास करावा लागेल. म्हणजे 1 वर 10 दशलक्ष दशलक्ष दशलक्ष इतकी शून्य. दुर्दैवाने आपल्याला आपल्यासारखा माणूस कधीच सापडणार नाही. प्रसरणामुळे प्रत्येक क्षणाला विश्वाचे क्षितिज रुंदावत आहे. आपल्या या विश्वाचे क्षितिज आपल्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीच्या विश्वापर्यंत पोचेपर्यंत वाटेतील अनेक तारका जळून खाक होतील. त्यामुळे हाती काही लागणार नाही. याप्रकारच्या (वेडगळ) निष्कर्षातून बाहेर पडण्यासाठी ब्रह्मांडाबद्दलचे आपले चित्र व क्वांटम सिद्धांत या दोन्हीना बाद करावे लागेल. दोन्ही खोटे आहेत हे सिद्ध करावे लागेल. कदाचित तुम्हा-आम्हाला हे शक्यही नसेल. परंतु काही तज्ज्ञ याचा मागोवा घेत आहेत. गेली 25-30 वर्षे यासंबंधी संशोधन करत आहेत. त्यानाही अशा प्रकारच्या बहुविश्वाची कल्पना थरकाप उडविणारी वाटते. तरीसुद्धा तोपर्यंत बहुविश्व असण्याच्या शक्यतेला धक्का पोचत नाही.

बहुविश्वासंबंधीचे वर उल्लेख केलेले स्पष्टीकरण त्या तुलनेने सुलभ व मूलभूत आहे. बहुविश्वासंबंधीचे अनेक सिद्धांत आहेत. उदाहरणार्थ, तंतुसिद्धान्तसुद्धा (string theory) याच निष्कर्षापर्यंत पोचला आहे. या सिद्धांतानुसार वस्तूंच्या रचनेसाठीचे मूळ घटक वस्तुमान असलेल्या तंतूंच्या आंदोलनातून (vibrations) तयार होत असावेत. त्यामुळे आपल्या विश्वाप्रमाणे इतर अनेक विश्वे या ब्रह्मांडात असू शकतील असे म्हणता येते. ज्याप्रकारे आपल्या अस्तित्वाला पूरक अशीच या विश्वातील भौतिकी तत्त्वे व नियम असतात त्याचप्रकारे इतर विश्वामध्ये वेगळ्या प्रकारची भौतिकी तत्त्वे व नियम असू शकतील. त्या विश्वांतील सजीवसृष्टी कार्बनऐवजी सिलिकॉन वा इतर कुठल्यातरी कणातून तयार झाली असेल. याचप्रमाणे क्वांटम मेकॅनिक्ससुद्धा बहुविश्व संकल्पनेला पुष्टी देत आहे. बहुविश्व या संकल्पनेभोवतीची धूळ अजूनही पूर्णपणे खाली बसलेली नाही. त्यामुळे यासंबंधीचे स्पष्ट चित्र अजूनही आपल्यासमोर नाही! या बहुविश्व संकल्पनेवर फारच कमी तज्ज्ञांचा विश्वास असला तरी कदाचित तुमच्यासारखी व्यक्ती कुठेतरी तुमच्यासारखे वागतही असेल!

क्रमशः
या पूर्वीचे
मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (1) , प्रश्न (2), प्रश्न (3), प्रश्न (4), प्रश्न (5) प्रश्न(6) , प्रश्न (7), प्रश्न (8) , प्रश्न (9)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet