पाक-साहित्य संपदा

रविवारी आशुतोष जावडेकर यांचा लोकरंग पुरवणीतील 'वा! म्हणताना… 'हा लेख वाचला आणि माझ्या कडील पाक-साहित्य संग्रह खूप दिवसांनी हाताळला. तेव्हा लक्षात आले की हल्ली बाजारात पाककृतीच्या पुस्तकांचे पेव आले आहे. काय बरे घेऊ मी? ह्या विचाराने नवीन पीढी बावरून जात असेल. तर माझ्या कडील पाक-साहित्य संपदेतील काही आवर्जून उल्लेख कराव्या अशा पुस्तकांचा मागोवा घेणारा लेख मी लगेचच लिहिला. तो इथे देत आहे. कोणाला उपयोग झाला तर आनंदच वाटेल मला.

पाक-‘कला’आहे, पाक-‘शास्त्र’ आहे. अशा या कलेविषयी आणि शास्त्राविषयी मुबलक साहित्य मराठीत उपलब्ध आहे. पाक-‘साहित्य’!

मी वाचलेले पाककृतीचे सर्वात जुने पुस्तक म्हणजे ‘रसचंद्रिका’. सारस्वत महिला समाजाने ३० ऑक्टोबर,१९४३ रोजी प्रथम आवृत्ती प्रकाशित केली. माझ्या संग्रही १९८३ सालची नववी आवृत्ती आहे. हे पुस्तक म्हणजे दूरदेशी आपल्या सोबत वडिलधारे कोणीतरी असल्यासारखे आहे. कारण फक्त पाककृती न लिहिता यात महिलांनी घरगुती औषधे, सणवार यांचाही समावेश केला आहे.

पण माझ्या संग्रहातील पहिले पुस्तक म्हणजे शालिनी नाडकर्णी यांचे ‘सारस्वत स्वयंपाक’. खरे तर ते आईने घेतले नंतर मग वारसा हक्काने माझे झाले. त्याच प्रमाणे मंगला बर्वे यांचे ‘फ्रीज, ओवन, मिक्सर’. मग माझी आवड बघून माझ्या मैत्रिणीने ‘अन्नपूर्णा’ भेट दिले.

मला पुस्तक भेट द्यायला किंवा घ्यायला अगदी मनापासून आवडते. मी बरीच पुस्तके भेट द्यायला विकत घ्यायचे तर तो दुकानदार मला ओळखायलाच लागला होता. आणि मी ते सुंदर वेष्टनात बांधून घ्यायचे त्यामुळे त्याला माहित झाले होते की मी हे भेट द्यायला घेते आहे. एकदा तो मला म्हणालाही की तुम्ही नेहमी पुस्तके भेट देता. त्या लोकांना ही भेट आवडते का? मला त्याचा राग नाही आला कारण प्रश्न अगदी रास्तच होता. मी त्याला सांगितले की मी मला जे आवडते आणि अमुल्य वाटते ते इतरांना भेट देते. त्यांना इतर नक्की काय आवडते हे तरी मला कुठे माहित आहे? असो!

माझ्या जावेला मी जयश्री देशपांडे यांचे ‘हमखास पाकसिद्धी’ हे पुस्तक भेट दिले तेव्हा माझ्या सासूबाई भलत्याच खुश झाल्या. जाऊ झाली की नाही हे मात्र मला माहित नाही. ह्या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पाककृतीनंतर सविस्तर टीप दिलेली आहे. माझ्या सासूबाई अतिशय सुगरण. त्या सतत प्रयोग करत नवनवीन पाककृती शिकत असतात. अगदी आत्ता वयाच्या ८०व्या वर्षी सुद्धा. त्यांना हे पुस्तक खूपच आवडले. परंतु त्यांचे अतिशय लाडके पुस्तक म्हणजे कमलाबाई ओगले यांचे ‘रुचिरा’. त्यांच्याकडील आवृत्ती अगदी जुनी आहे. पण त्या आपल्या सुगरणतेचे बरेचसे श्रेय रुचिराला देतात.

अशी अनेक पुस्तके मी घेत गेले. डॉ. मालती कारवारकर यांची ‘स्वयंपाक शोध आणि बोध’, ‘वंशवेल’ आणि‘अन्नपूर्णेशी हितगुज’ यांचा उल्लेख आवर्जून केलाच पाहिजे. आपण रोज इतके खातो पण विचारपूर्वक खातो का? तेव्हा रुचकर पण आरोग्यदायी काय आणि कसे खावे याचे मार्गदर्शन या पुस्तकातून होते. असेच एक सुंदर पुस्तक आहे डॉ. वर्षा जोशी यांचे ‘स्वयंपाकघरातील विज्ञान’. जर स्वयंपाकघर एक प्रयोगशाळा मानली तर तिथे केल्या जाणाऱ्या प्रयोगांचे शास्त्रीय विश्लेषण या पुस्तकातून केले आहे. हे काही पाककृतींचे पुस्तक नाही म्हणता येत पण प्रत्येक पाककृती परिपूर्ण बनवायला नक्कीच उपयोगी आहे.

मी १९९३ मध्ये एक पुस्तक विकत घेतले होते. दिसायला मासिकच जणू. नाव होते ‘द्रौपदीची थाळी’. यातील सर्व पाककृती ह्या पुरुष लेखकांनी लिहिल्या आहेत हे विशेष आहे. तसेच माधव कानिटकर संपादित ‘रसनारंजन’. हे पुस्तक म्हणजे पण एक छोटासा ग्रंथच वाटावा. पहिली साठ पाने ही आरोग्याविषयी माहिती, काही कानगोष्टी अशा प्रकारे रंजकतेने भरली आहेत. मराठी, गुजराती, कारवारी, गोमंतकीय पाककृती इथे देण्यात आल्या आहेत.

मला अतिशय प्रिय असलेले पुस्तक म्हणजे दुर्गा भागवत यांचे ‘खमंग’. हे पुस्तक म्हणजे आजीचे प्रेम आहे. तिचा बटवा आहे. आजी कसे आपल्याला समजावून सांगेल न तीच ओघवती शैली या पुस्तकात आहे. हे पुस्तक त्यांच्या वयाच्या ८५ व्या वर्षी छापले गेले. त्यांनी सांगितले आणि मृण्मयी रानडे यांनी लिहून घेतले. त्यामुळे तर ह्या पुस्तकाला गप्पांच स्वरूप आलंय. पारंपारिक पाककृतीच्या पुस्तकाला छेद देणारे हे पुस्तक आहे यात शंकाच नाही.

हल्ली विष्णू मनोहर यांचे ‘खवय्यांचे अड्डे…प्रांतोप्रांतीचे’ पुस्तक घेतले. ठीक आहे. पण आता मात्र मी सहसा पाककृतींची पुस्तके विकत घेणे टाळते. कारण सर्व पुस्तकांमध्ये तोच तोचपणा जाणवतो आहे. वैविध्य जाणवत नाही. एकसुरीपणा जाणवतो. आपल्या देशात पावलागणिक आणि माणसागणिक खाण्याची आणि शिजवण्याची पद्धत बदलत असते.

उदाहरणच देते. आमच्या कोकणामध्ये माशाची रसगोळीची आमटी बनवतात. त्यात धणे अजिबात वापरत नाहीत. थोडे पुढे गोवा, कारवार इथे मात्र बाकी पद्धत तीच असते पण धणे हा एक घटक पदार्थ वाढतो. तसेच आम्ही लसूण माशाच्या आमटीत नाही वापरत पण इतर जातीत मात्र ती हवीच हवी. तर अशा ह्या विविध पद्धती.

खरे तर असे एखादे पुस्तक यावे ज्यात प्रत्येक धर्म, जात, पोटजात यांच्या वैशिष्ट्यपूर्ण पाककृतींचा संग्रह असेल. काही विस्मृतीत गेलेल्या पाककृती असतील तर त्यांचाही उल्लेख असावा. अगदी छोट्या छोट्या क्लृप्त्या असाव्यात ज्या पणजीने, आजीने किंवा आईने शिकवलेल्या असतील. अगदी ग्रंथाच जणू! छपाई सामान्य असावी जेणेकरून किंमत कमी असेल व सर्व सामान्यांच्या खिशाला भुर्दंड पडणार नाही. सहज आवाक्यात असेल तर जास्तीत जास्त लोक खरेदी करून वाचू शकतात. कारण जेव्हा छपाईचा दर्जा चांगला असतो तेव्हा त्याप्रमाणे किंमतही अवाजवी वाटू लागते. मी अशा ग्रंथाच्या प्रतीक्षेत आहे ज्याचा लेखक वर्ग तुम्ही, आम्ही म्हणजे मी पण असेन. Smile

- उल्का कडले

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

लक्ष्मीबाई धुरंधर यांचे १००१ पाकक्रिया हे पुस्तक खूप जुने आहे. निदान ९०-१०० वर्षे इतके. किंबहुना अधिकच.
आता पाठारे प्रभु, सोमवंशी क्षत्रिय पाठारे, चांद्रसेनीय कायस्थ प्रभु, दैवज्ञ ब्राह्मण, सारस्वत, चित्रापुर सारस्वत, गोवन, कारवारी, मालवणी, वैदर्भी, खानदेशी, कोल्हापुरी अशा अनेक पाककृती जालावर तर आहेतच पण पुस्तकेही आहेत. शिवाय १०१ पराठे- हे एक से एक पराठे असेही वाचता येईल..हे निव्वळ पराठ्यांचे पुस्तक, डावीकडचे म्हणजे निव्वळ पानाच्या डाव्या बाजूसाठी (चटण्या-कोशिंबिरी-लोणची यांना) वाहिलेले पुस्तक, निव्वळ न्याहारीच्या पदार्थांचे पुस्तक, रक्तदाबवाल्यांसाठीचे खास पदार्थ, उपासाचे पदार्थ, सोया वापरून केलेले पदार्थ, नाचणी वापरून करावयाचे पदार्थ, सामिष पदार्थ, जैन पदार्थ, पंजाबी, दक्षिण भारतीय पदार्थ, शिशूंसाठी आहार, वाढत्या वयासाठी आहार, वयात येताना, वयातून जाताना, नोकरी करणार्‍यांसाठी, गृहिणींसाठी, निवृत्तांसाठी, निवृत्तांना खाण्याजोगे आणि निवृत्तांनी करण्याजोगे अश्या अनेक कॅटेगरीज़ आहेत. अन्नाचा इतिहास हवा असेल तर अन्नं वै प्राणा: ही ऑल टाइम बेस्ट मालिका मायबोलीवर आहे. भरपूर काही आहे. एका जन्मात वाचून होणार नाही एव्हढे. इथे ऐसीवरच अरविंद कोल्हटकरांचे आणि मेघना भुस्कुटे यांचे लेख आहेत. शिवाय दुर्गाबाईंसारख्यांनी अपूप वगैरेंवर इकडेतिकडे लिहिलेले असे अनेक पदार्थांचे उल्लेख आहेत. अगदीच झाले तर संस्कृत साहित्यात अनेक उल्लेख पानोपानी विखरून पडलेले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्वा! सदर लेख अगदी वाचन्खूण साठवण्यासाठी आदर्श लेख आहे.
पुन्हापुन्हा संदर्भासाठी नक्की यावे लागेल असे लेखन

आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला विचाराल तर "पाक-साहित्य" म्हणजे मेघना जे 'ललित' प्रकारे एखाद्या पाककॄतीबद्दल लिखाण करते ते. Smile त्यात नुसतेच पदार्थ करायचे तपशील नसतात. त्यात नक्की काय असतं ते सांगण्यात मी शब्द खर्च करण्यापेक्षा (आणि मला ते जमत नाहीये हे जाहिर करण्यापेक्षा Wink ) ईथे बघा. आधीच वाचलेलं असलं तर परत एकदा छानसं लेखन वाचायचा आनंद घ्या!

(नाही हो, मला याबद्दल मेघनाकडून काहीही मिळणार नाहिये. पण हे वाचून तरी ती पुढची पाक-साहित्य-कॄती लिहिल ही आशा आहे - 'फेण्या' वाचून आता सहा महिने लोटले !)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

खजील होऊन, साभार नोंद घेत आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

+१ लिहिले नाहि ते नाहीच.. काही करून खायलाही घातलेले नाही (याचीही खजील वगैरे होऊन घे की नोंद!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मेघनाने लिहिलेले पाककृती वरील साहित्य मी वाचले आहे. मनापासून आवडलेही! Smile वाचताना मधून मधून माझा स्वयंपाकघरातील उमेदीचा काळ आठवत होता. मला ऐसी वर येउन जेमतेम पाच आठवडे झाले आहेत तेव्हा मी पण जर का मागणी करू शकत असेन तर जरूर म्हणेन की मेघना होऊन जाऊ दे एक खुशखुशीत लेख. Smile ऐसी वर मेघना आणि मायबोली वर चिनुक्स यांचे लेखन वेगळे, वाचनीय आणि खूप प्रशंसनीय आहे यात कोणतीच शंका नाही. मी फक्त माझ्याकडील असलेल्या पुस्तकरुपी साहित्याचा आढावा घेतला आहे इतकेच. जे यातील दर्दी आहेत त्यांच्यासाठी हे नक्कीच जुने साहित्य आहे पण ज्यांना माहित नसेल त्यांना कदाचित मदत होइल. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उल्का

यावरून आठवण झाली ती आमच्या मातोश्रींकडेही कमलाबाई ओगल्यांचे 'रुचिरा' पुस्तक आहे. साधारण १९७०-७५ सालच्या दरम्यानची आवृत्ती असेल. लहानपणी का कोण जाणे मला ते पुस्तक भारी आवडत असे आणि मी ते काढून वाचत बसत असे. त्यातल्या प्रस्तावनेत असं म्हटलं आहे की त्या पुस्तकात 'कुठल्याही पदार्थाचं साहित्य ग्र्याम, औन्स वगैरे मापात न देता नेहेमीच्या घरातल्या वाटी, पळी, फुलपात्र वगैरेंच्या प्रमाणात दिलं आहे, जेणेकरून नव्या गृहिणीला गोंधळायला/घाबरायला होणार नाही'. शिवाय चक्क वाटी, फुलपात्र, चमचा, पळी यांची चित्रेही दिली आहेत. मापे वजनात न देता व्हॉल्यूममधे दिल्याने प्रमाणातला टॉलरन्स वाढून प्रत्येक गृहिणीच्या हातच्या एकाच पदार्थाला वेगळी वैयक्तिक चव प्राप्त होईल असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१
गृहिणींचे माहित नाही Wink पण अनेक पाककृतींसाठी मी अजूनही हे पुस्तक गायडन्ससाठी वापरतो. वजन/मापं फार काटेकोर नसल्याने खरोखरच धास्ती कमी होतेच, प्रयोगालाही वाव रहातो, शिवाय भाषा अगदी घरगुती असल्याने दडपणही येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझ्या आईकडेही रुचिरा आहे. लहानपणी (ज्या वयापर्यंत स्वयंपाक शिकण्याचा आग्रह मला कोणी करत नसे त्या वयापर्यंत) ते पुस्तक मला आवडे. त्या आवृत्तीत इ,उ ऐवजी 'अ'ला इकार, उकार दिलेले होते. ती अक्षरं वाचायला मला आवडायचं. शिवाय त्यात काही पदार्थांचे फोटो होते - उदा. घीवर, ते अजून तसेच्या तसे आठवतात. पुस्तकाच्या शेवटी पदार्थांची अकारविल्हे यादी हा प्रकारही मला फार मौजेचा वाटायचा. त्या पुस्तकाची पानं हाताळून हाताळून सुटी झाली आहेत. काही काही पदार्थांचं प्रमाण बदलून, ते कस्टमाइज करून, बदललेलं प्रमाण आईने लिहून ठेवलं आहे. ते कागदही त्या पुस्तकात घुसवून ठेवले आहेत (प्रक्षिप्त) Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्याही मातोश्री वापरायच्या

त्या आवृत्तीत इ,उ ऐवजी 'अ'ला इकार, उकार दिलेले होते.

हेच लक्षात आहे त्या जीर्ण पुस्तकाबाबतीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हे सुद्धा एक त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेगळ्या विषयावरचा छान लेख.

माझ्या लहानपणी आमच्या घरी रुचिरा होतं. ते मला नुसतंच वाचायलाही आवडायचं. विशेषतः त्यातल्या टॉफी, गोळ्यांच्या भागातल्या पाककृती. मी आईकडे त्यातलं काहीतरी करण्याचा अधूनमधून हट्ट करत असे.

मोठा झालो तसं लक्षात आलं की ते पुस्तक नवख्यांपेक्षा ज्या मुलींना लहानपणी आईकडून स्वयंपाकाचं बाळकडू मिळालेलं आहे अशा अर्धशिक्षितांसाठी होतं. तो काळ स्त्रियांनी नोकरी करायला सुरूवातीचा होता. त्यामुळे अनेकींना स्वयंपाकाची कला जोपासण्यासाठी वेळ नव्हता. मात्र ज्यांना स्वयंपाकाचा काहीही गंध नाही अशांना त्यातली गृहितकं झेपली नसती. मला एक उदाहरण आठवतं ते म्हणजे पोळ्यांचं - ती पाककृती 'पोळ्या करायला खरं तर काय शिकवायचं, त्या येतातच तशा सगळ्यांना' असं मनात धरून 'कणीक भिजवा, लाटा आणि भाजा' या पद्धतीने अगदी एका ओळीत नाही, पण उरकली होती.

त्या काळात लाखाहून अधिक प्रती खपलेलं एकमेव पुस्तक होतं बहुधा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अन्नपूर्णादेखील होतं की मंगलाबाई गोडबोल्यांचं. तेही लाखांनी खपलं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असेच एक सुंदर पुस्तक आहे डॉ. वर्षा जोशी यांचे ‘स्वयंपाकघरातील विज्ञान’. जर स्वयंपाकघर एक प्रयोगशाळा मानली तर तिथे केल्या जाणाऱ्या प्रयोगांचे शास्त्रीय विश्लेषण या पुस्तकातून केले आहे. हे काही पाककृतींचे पुस्तक नाही म्हणता येत पण प्रत्येक पाककृती परिपूर्ण बनवायला नक्कीच उपयोगी आहे.

+१

गेल्या काही वर्षांत वाचलेले सर्वोत्कृष्ट मराठी पुस्तक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद .. आर्डवलेले आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0