किरण नगरकर मुलाखत : भाग ३ । "Storytellers are liars."

संकल्पना

किरण नगरकर मुलाखत : भाग ३ । "Storytellers are liars."

- ऐसीअक्षरे

भाग १ । जडणघडणीविषयी
भाग २ । मिथकं आणि समकालीन वास्तव

ऐसी अक्षरे : मागच्या वेळी आपण मिथकांबद्दल बोलत होतो तोच धागा पकडून आताही बोलू, तुम्ही 'सात सक्कं…'मध्ये जेव्हा वास्तवाकडे बघता आणि नंतर 'रावण आणि एडी' असेल किंवा 'बेडटाईम स्टोरी' असेल त्यातून वास्तवाकडे बघता, ह्यांत फरक आहे. उदा. 'सात सक्कं…' मधला हा तुकडा पाहा : “समुद्र, फुलं, चंद्र, बेडूक, गोगलगाय, रेव्हेन्यू स्टँप, गोल्ड स्पॉट, कपाट, मांजर, झेंडू…”. अशा गमतीशीर गोष्टी मध्ये मध्ये येतात त्या surreal वाटतात, त्यात मिथक नाही. त्याचप्रमाणे, 'सात सक्कं…'मध्ये येणारी जी भाषा आहे ती मराठी-हिंदी आहे, त्याला एकप्रकारे बम्बैय्या हिंदी म्हणता येईल. म्हणजेच तुमच्या आजूबाजूच्या भाषेचा त्यात समावेश आहे, आजूबाजूचं वास्तव तुम्ही 'सात सक्कं…'मध्ये बघता. आणि नंतर तुम्हाला मिथकांमध्ये वास्तवाकडे पाहण्याचा एक गमतीशीर दृष्टिकोन मिळतो आणि त्यातून तुम्ही वास्तवाकडे बघता. 'सात सक्कं…'मध्ये वास्तव मांडताना वेगळा सूर आहे आणि 'बेडटाईम स्टोरी', 'रावण अँड एडी' किंवा 'ककल्ड'मध्ये वास्तव मांडताना मिथकांचा वापर केलात; तो वेगळा सूर आहे. तर हे जे आहे, वास्तवाकडे बघण्याचं जे वेगवेगळं logic आहे ते आम्हाला तुमच्याकडून समजलं तर फार मजा येईल.

किरण नगरकर : 'बेडटाईम स्टोरी' अर्थातच मिथकांबद्दल आहे, अतिशय फेरफार केला आहे त्यात पण तरीही. तुम्ही 'ककल्ड' वाचलं असेल तर त्यामध्ये एक पात्र आहे 'भूतनीमाता' नावाचं. हे पात्र surreal आहे. कारण ती त्याच्या मनातली समंध बनते; त्यातून महाराजकुमारला बायकोचा विनाश करायचा असतो; पण शेवटी महाराजकुमार म्हणतो की काहीही झालं तरी 'I am madly in love with her, she is the only one who matters to me.' हे काही पूर्णपणे वास्तववादी नाही ना! शिवाय, काही लेखक त्यांच्या कादंबरीमधल्या सर्व घटकांवर खूप काळजीपूर्वक काम करतात. अगदी प्रमाणिकपणे सांगायचं तर मी 'ककल्ड' लिहायला सुरुवात केली तेव्हा अगदी reluctantly लिहीत होतो, कारण मला या बाईशी काहीही संबंध ठेवायचा नव्हता. (बोलताना आपण किती विचित्र बोलतो; पाहा ना, म्हणजे या मीरानं माझ्याकडे अर्धा सेकंदपण पाहिलं नसतं, पण तरीही मी म्हणतो की ‘मला संबंध ठेवायचा नव्हता’!)

तर 'ककल्ड'मध्ये मला या बाईबद्दल काहीच, काहीही लिहायचं नाही इतकंच माझ्या मनात होतं. पण कर्मधर्मसंयोगानं काही गोष्टी अगदी अचानक घडत गेल्या. अरुणनं (कोलटकर) मला एक छोटंसंच हिंदी पुस्तक दिलं होतं वाचायला. आता मला त्याचं नावही आठवत नाही. त्यावेळी मी कर्नल टाॅडकडे वळलो होतो. त्यात त्याने काहीही लिहिलंय 'अमरचित्रकथा'टाईप. पण अरुणनं दिलेलं पुस्तक वाचल्यावर मला पहिल्यांदा लक्षात आलं की महाराजकुमारचं म्हणजे भोजराजचं नाव कुणीच कधीच घेत नाही. त्यावेळी मला लक्षात आलं की आपल्याला या बाईच्या नवऱ्याचं साधं नुसतं नावसुद्धा माहीत नाही. मग मी फार फार तर १०४ पानांचं बोल्ड टाईपमध्ये एखादं पुस्तक लिहिलं असतं. परंतु कर्मधर्मसंयोगानं हे पुस्तक लिहायला मी इथं सुरू केलं नाही; मी तेव्हा परदेशात होतो. तेव्हा भाड्याच्या छोट्या अपार्टमेंटमधून मला काढण्यासंदर्भात केस चालली होती. तर तेव्हा मला सुरुवातसुद्धा काय असेल हे माहीत नव्हतं. तर सांगायची गोष्ट अशी की त्यामुळे कादंबरीत सुरुवातीला स्मॉल कॉजेस कोर्ट आलं. महाराजकुमार स्वतःला निळं बनवतो या एका प्रसंगाव्यतिरिक्त माझ्या नजरेसमोर काहीच नव्हतं. मी कुठे जाणार, या कशाचीही कल्पना मला तेव्हा नव्हती. मी अंधारातून पुढे चाललो होतो.

आता पुस्तक प्रकाशनालाही वीस वर्षं झाली. तर मला इतकंच सांगायचं आहे की या पुस्तकाच्या बाबतीत मी स्वतःला कारकून समजतो. हे पुस्तक कोणी मला डिक्टेट केलं ते मला माहीत नाही. परंतु सगळे प्रसंग अगदी ऐनवेळी शेवटच्या घटकेला सुचलेले आहेत. त्यामुळं त्या एका पुस्तकाबद्दल मला इतकंसंही श्रेय घेता येत नाही. तुम्ही याला देवाची देणगी म्हणा किंवा आणखी काही ते मला माहीत नाही. परंतु एके दिवशी मी सकाळी झोपेतून जागा झालो, तसं पुस्तक लिहून बरेच दिवस झाले होते. मी कसं पुस्तक लिहिलं, एक-एक गोष्ट कशी घडत गेली हे मी माझ्या जोडीदाराला सांगितलं. हे सगळं तसं तर मजेत सुरू होतं, पण तरीही त्याला गांभीर्य होतं. माणसानं किती खोटं बोलावं, तर माझ्याकडं पहावं! शेवटी कादंबरी जो लिहितो तो खोटंच बोलतो नाही का? मी पुस्तकाच्या अंतभाषणामध्ये लिहिलंही आहे : “Storytellers are liars. We all know that.” मी 'सात सक्कं...' लिहिली, ती वाचून त्याबाबत माझ्या भावाचं म्हणणं आहे, की त्यातले काही प्रसंग आमच्या दोघांच्या आयुष्यातले आहेत; तर काही गोष्टी पूर्णपणे काल्पनिक आहेत. तर देवाचं किंवा कुणाचं माझ्यावर प्रचंड प्रमाणात ऋण आहे, असं मी मानतो, कारण त्यांनी मला पहिल्या पुस्तकातच खोटं बोलायला शिकवलं.

आता या बोलण्याची व्याप्ती जराशी वाढवून बोलायचं झालं तर मी एक वेगळं उदाहरण देईन : मराठीमध्ये (इतर भारतीय भाषांबद्दल मी बोलत नाही) दलित लेखकांनी आत्मकथन लिहायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला खरोखर खूप आनंद वाटला की ते लिहिते झाले, परंतु ते पुढे गेलेच नाहीत. ते खोटं बोलायला शिकलेच नाहीत. (तुम्ही आता हे कुठं प्रकाशित कराल, त्यानंतर फेसबुकवर वगैरे मला प्रचंड जोडे मिळणार आहेत बघा यामुळं!) पण खोटं बोलणं याचा गैरअर्थ घेण्याची सवय आपल्या मराठी लोकांच्या अंगवळणी पडलीये की काय कुणास ठाऊक! Metaphysically लिहिलंय की simile वापरून लिहिलंय हे फरक समजत नाहीत का, हे मला कळत नाही. हे असं का व्हावं याबाबत एक फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. कारण मराठीतलं पूर्वीचं म्हणजे ज्ञानेश्वर, तुकाराम वगैरे लिखाण बघा, उदाहरणार्थ : 'बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल', वगैरे जे आहे तर ते आपण शब्दशः घेत नाही ना, आपण त्यातले भाव समजून घेतो की संपूर्ण जीवन विठ्ठल आहे. तर, सांगायचा मुद्दा काय की हे लेखक गोष्ट सांगण्यामध्ये पुढे गेले नाहीत. माझ्यासाठी ही फार खेदाची गोष्ट आहे.

आता मिथकांकडे पुन्हा वळू. तीन गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात. एक म्हणजे mythology. दुसरं म्हणजे epics. तिसरी गोष्ट म्हणजे संतकवी. आता असे कवी आहेत की नाहीत, मला माहीत नाही. ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, तुकाराम, बहिणाबाई वगैरे होते. 'तुका म्हणे', 'कहत कबीर' वगैरे ते स्वतःच म्हणायचे. तेव्हा कॉपीराइट नव्हता; मी तेव्हा असतो तर मीही काही तरी लिहून तिथे 'ज्ञानेश्वर म्हणे' वगैरे काही तरी लिहिलं असतं! मग त्यातलं अस्सल कोणतं आणि नकली कोणतं ते कसं ओळखता यावं? त्यासाठी खरी स्कॉलरशिप हवी आणि ती आपल्याकडे फार कमी आहे. उदा. तुकारामाकडे पाहण्याची खरी वृत्ती आपल्याकडे फादर दलरींनी आणली बघा. तर जे ह्या संतकवींची नक्कल करायचे त्यांच्यात काही अगदीच वाईट होते; काही सक्षम होते; पण त्यात काही अतिशय हुशार लोकही होते. तर त्यांच्यात आणि अस्सल लोकांत फरक कसा करायचा? आपल्याकडे जे संत झाले ते सगळे कवी कसे झाले? त्या काळात पद्यातच अनेक प्रकारचं लिखाण लिहिलं जायचं हे खरं आहे. मी काही पाणिनी वगैरे वाचलेलं नाही; पण असेल तर तेही पद्याच्या घाटातच असेल बहुतेक. किंवा ती लाल देड म्हणून काश्मिरी कवयित्री पाहा; बसवण्णा पाहा. सगळे कवी! तर, सांगायचा मुद्दा असा, की त्यांतला अस्सल कबीर किंवा तुकाराम कोणता आणि त्यांची नक्कल कोणती हे आपल्याला सांगता येत नसल्यामुळे झालं काय, तर त्यांनाही एक मिथकाचा दर्जा प्राप्त झाला! किमान माझ्यासाठी तरी.

माझ्या लहानपणी मला पुंडलिक म्हणता येत नसे, मी पंडुलिक म्हणत असे आणि माझे काका खवचटपणे त्यावरून माझी चेष्टा करत असत. त्यामुळे माझ्या मनात पुंडलिकाबद्दल काहीसा रोष होता. बहुतेक म्हणूनच पुंडलिकानं नंतर मला फार चांगली शिकवण दिली. मूळ कथा काय आहे आणि तिचं मर्म काय आहे ह्याची मला कल्पना नव्हती. पण मी माझ्यापरीनं या कथेचं interpretation करायला सुरुवात केली ती अशी : पावसाळ्याचे दिवस आहेत, पुंडलिक आपल्या आईवडीलांचे पाय, पाठ दाबून देत आहे. पूर्वी आपल्याकडे काही दुखत असेल तर वीट गरम करून त्यानं शेक देत, ऊब देत तसंच तो करत आहे. पाऊस जरा कमी झाला आहे तेवढ्यात दारात विठ्ठल उभा ठाकतो आणि म्हणतो की 'हवा छान पडली आहे पुंडलिक, let’s go for a walk!' यावर पुंडलिक म्हणतो की 'थांब थोडा, माझ्या आईबाबांचे पाय मी दाबून देत आहे, त्यांना वेदना होत आहेत; म्हणून तू थोडा थांब मी येतोच.' असं म्हणून पुंडलिक विठ्ठलाकडे ती वीट फेकतो आणि मग तेव्हापासून विठ्ठल पुंडलिकाची वाट बघत त्या विटेवर उभा आहे. आता दुसऱ्या कुठल्या धर्मांमध्ये देव आपल्या भक्ताची वाट पाहात थांबलाय? मी ही कथा सांगण्याचं कारण म्हणजे आपल्यावर जे भयाण लोक आता सत्ता करत आहेत त्यांना हिंदू तत्त्वज्ञानाचा, मिथकांचा साधा गंधही नाही. त्यांना फक्त गैरअर्थ लावता येतो, त्यातलं मर्म समजतच नाही त्यांना. महाराष्ट्रात लोकांना हे लक्षात आलंय की नाही कुणास ठाऊक, पण देव भक्तासाठी थांबलाय, ही घटना किती विलक्षण आहे! नाही तर एरवी आपल्याला सांगितलं जातं की भक्तानं देवासाठी वाट पाहायची असते. म्हणून मला ही गोष्ट फार महत्त्वाची वाटते.

मला आवडणारी अजून एक गोष्ट ग्रीक एपिक्समधली आहे. होमरच्या 'ओडिसी'मधली ही कथा आहे. युलिसिस किंवा ओडिसिअस अनेक लढाया जिंकून बऱ्याच काळानं आपल्या राज्यात परतत असतो. तो आणि त्याचे सहकारी इतक्या वर्षांनंतर आपल्या प्रतीक्षेत असणाऱ्या आपल्या बायकांकडे जायला अधीर आहेत. जहाजातून तो लांबचा प्रवास करत असताना एके ठिकाणी ते जहाज बंदराला लावून त्या रात्री त्या राज्यात मुक्काम करायचा असं तो आणि त्याच्याबरोबर असणारे त्याचे साथीदार ठरवतात. त्यावेळच्या प्रथेनुसार, राज्यात कुणीही नवा राजा आला तर त्याला मेजवानी देऊन, भेटवस्तू देऊन त्याचा आदरसत्कार केला जात असे. याच प्रथेनुसार त्या राज्यात उतरल्यावर तिथला राजा ओडिसिअसला सन्मानाने मेजवानीकरीता आमंत्रित करतो. मेजवानी होते, मद्यपान होतं, राजा ओडिसिअसला काही भेटवस्तू देतो. त्या पोत्यांमध्ये बांधलेल्या आहेत. ओडिसिअस त्या स्वीकारून आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी, जहाजावर परत येतो. खूप थकल्यामुळे त्या भेटवस्तू तिथेच ठेवून तो आपल्या कक्षात झोपयला जातो. ओडिसिअसच्या साथीदारांमध्ये त्याचा एक अतिशय जुना आणि प्रचंड प्रामाणिक असा साथीदार असतो. त्या रात्री ओडिसिअस झोपी गेल्यावर इतर साथीदारांशी बोलताना हा त्याचा सर्वात जवळचा प्रामाणिक साथीदार म्हणतो, “मी इतकी वर्षं याच्यासोबत काम करतो आहे. तो हीरो आहे; इतका फिरतो; त्यामुळे सर्वांना याच्याशी मैत्री करावीशी वाटते आणि ती होतेही. त्यामुळे याला इतक्या भेटवस्तू आजपर्यंत मिळाल्या आहेत. परंतु, इतक्या वर्षात त्यानं एकदाही एकही भेटवस्तू आपल्या कुणाला देणं सोडाच, दाखवलीही नाही. ते काही नाही, आज निदान आपण या भेटवस्तूंची पोती उघडून पाहू आणि जे असेल ते वाटून घेऊ.” असं म्हणून तो साथीदार ती पोती उघडतो. तर त्या पोत्यांमध्ये काय निघतं? तर, तिथल्या राजानं यांच्या प्रवासाआड येणारे सर्व वादळीवारे बांधून दिलेले असतात, जेणेकरून हे सर्वलोक आपल्या राज्यात सुखरूप पोहोचतील. मात्र, जो माणूस नेहमीच ओडिसिअसच्या बाजूला होता, तो त्याच्या विरोधात जातो; आणि पोती उघडल्यावर ती अक्राळविक्राळ वादळं बाहेर पडतात आणि वादळ येऊन यांचं जहाज काही दशकं भरकटतं. तर अशी ही कथा. तसं पाहिलं तर ही कथा अगदी साधीशीच आहे. या कथेमध्ये जे घडतं त्याचा दोष कुणाला जातो तर जसा त्या पोतं उघडणाऱ्या अतिशय प्रामाणिक साथीदाराचा दोष आहे, तसाच कुणाशीच भेटवस्तू शेअर न करणाऱ्या ओडिसिअसचाही आहे. असं माझं interpretation आहे. म्हणजे मला हेच सांगायचंय की वाचकाला विचार करून जसं अर्थनिर्णयन करायचं असेल तशी ती कथा त्याच्या समोर उलगडावी, अशी व्यवस्था मिथकांमध्ये आहे. ती वाचकाला समृद्ध करते. ही मिथकांची ताकद आहे. (मूळ कथा)

आता 'बेडटाईम स्टोरी'बद्दल एक सांगतो : तर मी ते लिहिलं त्यावेळी मला ही कल्पना नव्हती की एका प्राचीन आवृत्तीमध्ये गांधारी कृष्णाला म्हणते, “तू माझ्या शंभर मुलांच्या मृत्यूला जबाबदार आहेस. तू त्यांचा मृत्यू थांबवू शकला असतास पण तू तसं केलं नाहीस. तेव्हा मी आता माझ्या डोळ्यांवरची ही पट्टी काढून तुझा नाश करणार आहे.” मी खरंच सांगतो की मला हे एक-दोन वर्षांपूर्वीपर्यंत माहिती नव्हतं. पण मी हे माझ्या लिखाणात आधीच घेतलं होतं, प्रयोग म्हणून. मला अज्जिबातच असं म्हणायचं नाही की मी फार काही वेगळा प्रयोग केला आहे. पण आपल्या लोकांना हे कळतच नाही की प्रत्येक प्रांतात ही गोष्ट बदलत राहते! आणि मग हे समजलं नाही तर मनाचा कोतेपणा इतका भयानक वाढतो की हेच अर्थनिर्णयन बरोबर आहे, आणि ते अर्थनिर्णयन नाहीच, वगैरे. नगरकरांनी 'बेडटाइम स्टोरी' लिहिण्याच्या अगोदर कित्येक लोकांनी महाभारतावर लिहिलं असणार. असंच ग्रीक एपिक्सचं आहे.

'रावण अँड एडी'बद्दल : मी जेव्हा ही कादंबरी लिहायला घेतली तेव्हा काय चाललंय त्याची मला अजिबात कल्पना नव्हती. रावण हे जे पात्र आहे त्याचं नाव मी हनुमान की मारुती असं ठेवणार होतो पण मग नंतर अचानक असं वाटलं की याचं नाव राम ठेवूया. आणि मग हा राम त्याच्या आईच्या कडे‌वर असताना उसळी मारून खाली झेप घेतो. तेव्हा खरं तर तो मेला असता, पण तो जगतो. त्याच्या कनवाळू आईला तेव्हा वाटतं की मुलाला कुणाची तरी दृष्ट लागल्यामुळं हे सगळं झालं, म्हणून मग ती त्याचं नाव रावण ठेवते. म्हणजे त्याचं बारशाचं नाव राम आणि नंतर आईनं ठेवलेलं नाव रावण असं होतं. जेव्हा असं काही तरी घडतं तेव्हा तुमचं पात्र खूप गुंतागुंतीचं होतं. आपण राम आहोत, की रावण, ही त्याची द्विधा स्थिती आयुष्यभर राहणार आहे. हे मी ठरवून केलेलं नाही, पण एकदा ते झाल्यावर माझ्या लक्षात आलं ही ह्यात पुष्कळ शक्यता आहेत.

आता एक मिथकांबाहेरचं उदाहरण देतो : ग्रॅहॅम ग्रीन माझा अतिशय आवडता लेखक आहे. त्याचं एक पुस्तक आहे - 'The End of the Affair'. त्याचा शेवट मला विशेष वाटत नाही, पण त्याच्या सुरुवातीला काही तरी विलक्षण घडतं : निवेदकाचे एका विवाहित स्त्रीसोबत संबंध आहेत. तिच्या पतीला निवेदक परिचित आहे. पती निवेदकाला भेटतो आणि म्हणतो, की माझ्या पत्नीचे दुसऱ्या कुणाबरोबर संबंध आहेत असा मला संशय आहे. तुला काय वाटतं? म्हणजे ज्याच्याशी त्याच्या पत्नीचे संबंध असतात त्याच्याचकडे येऊन तो पती हे विचारतो. मला हे विलक्षण वाटतं! खरं तर हा त्रिकोण असायला हवा; पण पतीचा हा जो निरागसपणा आहे, तो किती पारदर्शक आहे! ह्यातून ती गोष्ट समृद्ध होण्याची शक्यता निर्माण होते.

‘रावण अँड एडी’मध्ये काही गोष्टीत अतिशयोक्ती, काही गोष्टीत sarcasm आहे, irony आहे. एका पातळीवर ती एक fable (बोधकथा) म्हणूनही घेता येईल. कॅथलिक लोक त्या काळात त्यांचं पोर्तुगीज कनेक्शन आणि वारसा सोडून द्यायला तयार नव्हते. तर मला जेव्हा एका गोष्टीकडून दुसऱ्या गोष्टीकडे स्मूथ ट्रांझिशन (segue) करायची होती तेव्हा मी 'रावण अँड एडी'मध्ये काही asides लिहायला सुरुवात केली. माझ्या हातून नकळतच घडलं ते. 'The Water Wars', 'Portuguese Occupation of India', शम्मीकपूर, असे अनेक भाग त्यात आहेत. तुमचं हिमोग्लोबिन अगदी २.३ झालं तरी, तुम्ही मरायला टेकलात तरी, तुम्ही गोरे दिसता म्हणून मिरवणं किंवा अभिमानानं सांगणं हे भारतात होतं. या सगळ्याबाबत एका वेगळ्या अँगलने लिहिलं. म्हणजे मी एका बाजूला दोन लहान मुलांची गोष्ट सांगतो आहे; त्याचवेळी मी दुसरीकडे वास्तव मांडतो आहे धूसरपणे.

याउलट, आपल्याकडे एक attitude आहे की कुठच्याही गोष्टीकडे फारच सेंटिमेंटल होऊन पाहायचं. उदाहरणार्थ : चाळ. चाळीबाबत माझे विचार हे इतरांइतके सेंटिमेंटल नाहीत. त्याबाबत माझे विचार परखड आणि निराळे आहेत. तुम्ही संडासाला उभे आहात, सात माणसं पुढे आहेत आणि तुम्हाला डायरिया झालेला आहे, तर सेंटिमेंटल कसं होणार? असा मी एक घाणेरडा माणूस आहे! माझ्या ह्या असल्या विनोदांवरून पाटणकरांनी मला एका विनोदी लेखकाबद्दल सांगितलं होतं - George Mikes. तो बाहेरून (हंगेरी) आला आणि लंडनमध्ये स्थायिक झाला. त्यानं ब्रिटिश संस्कृती समजून घेऊन त्यावर विनोद केला. (संपादकीय टीप : How to be an Alien) पण आपल्याकडे सेंटिमेंटल होण्यामुळे हे होत नाही. मला असं वाटतं की माझ्या लिखाणाआधी जे होत होतं आणि मी जे केलं त्यात हा फरक आहे.

आता मार्केझचं उदाहरण घ्या. त्याचं नाव घेताच लोक म्हणतात 'मॅजिकल रिअलिझम'. त्याच्या लिखाणात 'मॅजिकल रिअलिझम' आहे, हे खरंच आहे. पण हे म्हणताना आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, त्या माणसाची रेंज इतकी तुफान होती! त्यामुळे त्याला अगदी documentary realismसुद्धा तितक्याच अफाट पद्धतीनं लिहिता यायचा. म्हणजे अगदी गँग्ज वगैरेसुद्धा. आणि प्रत्येक पुस्तकासाठी आशयानुसार त्याची शैली ठरत असे. मला हे योग्य वाटतं. म्हणजे एखाद्या शैलीला यश मिळालं की परत परत तेच करत राहायचं हे मला कधीच पटलं नाही.

म्हणून 'रावण अँड एडी' आणि 'ककल्ड' या दोन्हींच्या भाषेत अजिबात साम्य नाही आहे. 'ककल्ड'ची भाषा खूप गंभीर, introspective भाषा आहे. कारण महाराजकुमार हा thinker होता. प्रत्येक वेळेला तुमचा जो आशय आहे त्यानुसार तुमची भाषा आणि विचारशैली बदलायला हवी. मला एक प्रसिद्ध आणि यशस्वी मराठी लेखिका भेटल्या होत्या, बोलताना त्या म्हणाल्या “दररोज मी अशी लिहायला बसले की माझ्या बोटातून लिखाण झरझर वाहातं”. तुम्हाला सांगतो, मला त्यावेळी त्यांच्याबद्दल इतकी असूया वाटली! मला बापजन्मात हे साध्य होणार नाही. मी जे लिहितो त्यानंतर मला त्यावर फार काम करावं लागतं. म्हणजे लिखाणावर काम करावं लागतंच, पण त्या कादंबरीचा गाभा काय असेल, ह्यावरसुद्धा काम करावं लागतं. कोणता सूर घ्यायला हवा; तुमच्या पात्राला एक आयुष्य द्यायला हवं ना!

असो. तर हे असं आहे, मी तुमच्या कोणत्याही प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिल्येत की नाहीत कुणास ठाऊक!

ऐसी अक्षरे : नक्कीच दिली आहेत! पण यालाच जोडून एक क्लिशेड् प्रश्न विचारतो. तुम्हाला पुन्हा मराठीत काही लिहावंसं वाटतं का? किंवा तुम्ही मराठीत काही लिहिणार आहात का?

किरण नगरकर : हा फार अवघड आणि योग्य प्रश्न आहे. पहिली गोष्ट म्हणजे मी पंधरा वर्षं वाया घालवली, काहीच लिहिलं नाही. त्यात मी अत्यंत आळशी माणूस आहे, तुमचं वय झाल्यावर तुम्हाला थोबाडात मारून याबाबत जागं करायला कोणी नसतं. (अर्थात, आता आपण ज्या जगात राहतो त्यात तुमचा खून मात्र पाडता येतो.) मी सुमारे ८-९ वर्षं घेतली God's Little Soldier लिहायला. याला काहीच अर्थ नाही ना! ती संपवता आली हाच एक चमत्कार म्हणायला हवा. God's little Soldier ही पाच-सहाशे पानांची मोठी कादंबरी आहे पण ती भारतात वाचलीच गेली नाही आहे. त्यात साधारणपणे १६ पानं मी कबीराच्या आयुष्याविषयीची माझी पुनर्कल्पना म्हणून लिहिली आहेत. मिथकांबद्दलचे माझे विचार समजून घ्यायचे तर हे वाचणं गरजेचं आहे.

मी खूप कमी काम केलंय आणि आता मला माझं वय झाल्याची जाणीव आहे. हल्ली काही लोक मला सतत सांगतात की तू मराठीमध्ये परत लिही आता. आणि खरंच सांगतो मला हे पटतंय, मला आवडेलसुद्धा लिहायला. पण माझ्याकडे तेवढा वेळ आहे की नाही याची मला खरोखरच कल्पना नाही. हां, आता लवकरच माझी एक नवी इंग्रजी कादंबरी येईल 'जसोदा'. ती पूर्णपणे dark story आहे. 'ककल्ड'सहित माझ्या सर्व लिखाणात नागर जीवन आहे, पण ह्यात ते पूर्णपणे वगळलं आहे. ती माझ्या आतापर्यंतच्या सर्व कादंबऱ्यांपेक्षा पूर्णपणे निराळी आहे. गेली २० वर्षं मी 'जसोदा'सोबत राहिलो आहे. एखाद्या मेल शॉव्हिनिस्टप्रमाणे मी तिला अधूनमधून टाकूनही दिली आहे, आणि तिच्याकडे परत गेलो आहे.

माझ्या लिखाणाबाबत अजून एक गोष्ट अशी की मला मुळातच वाचक कमी आहेत. इंग्रजीतही वाचक कमीच आहेत, पण थोडे आहेत. मराठीमध्ये अजूनच कमी आहेत. आजही 'बेडटाईम स्टोरी' कुणीच वाचलेलं नाही. ते मूळ मराठीतच आहे. पण ते उपलब्धच नाही. 'सात सक्कं…'चं काय झालं, हे तुम्हाला माहीत आहेच. आजही माझ्याकडे त्याच्यावरच्या टीकेचे गठ्ठेच्या गठ्ठे आहेत. आणि टीका म्हणजे खूपच वाईट टीका.

तर, सांगायचा मुद्दा असा की मी काही कुणी मोठा लेखक नाही, वाचलं जाण्यासाठी मी लिहितो. संवाद हा माझा प्रमुख हेतू आहे. मला काही भाव खायचा नाही. माझ्या गोष्टी वाचा!

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

नक्की वाचू.
मुलाखत फार छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

> माझ्या लिखाणाबाबत अजून एक गोष्ट अशी की मला मुळातच वाचक कमी आहेत. .. मराठीमध्ये अजूनच कमी आहेत. आजही 'बेडटाईम स्टोरी' कुणीच वाचलेलं नाही. ते मूळ मराठीतच आहे. पण ते उपलब्धच नाही. 'सात सक्कं…'चं काय झालं, हे तुम्हाला माहीत आहेच.

‘सात सक्कं..’ ही मराठीतली एक अतिशय प्रसिद्ध कादंबरी आहे असं मी समजत होतो. तिचा खप फारसा झाला नाही हे ऐकून सखेद आश्चर्य वाटलं. (पण माझ्याकडे प्रत आहे.) ते एक असो. ‘बेडटाईम स्टोरी’ वरचा कॉपीराईट सोडून देऊन ते सरळ वेबवर का नाही टाकत? निदान त्याला वाचक तरी मिळतील. पारंपारिक मार्गाने प्रकाशित होण्याची किती वर्षं वाट बघत बसणार?

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

‘बेडटाईम स्टोरी’ वरचा कॉपीराईट सोडून देऊन ते सरळ वेबवर का नाही टाकत?

खुद्द नगरकरांकडे आता त्याची मूळ मराठी संहिता नाही. इंग्रजी भाषांतर प्रकाशित झालेलं आहे आणि उपलब्धही आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

>>पारंपारिक मार्गाने प्रकाशित~~~>>
प्रकाशकांना वाचकांची नाडी माहिती असते. असे विषय खपत नाहीत हे ते जाणतात.
भक्तिमार्ग, अध्यात्म कितीही पिळले तरी चोथा खपतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0