Skip to main content

फुकटात विनासायास वेटलॉस

वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल सापडल्यामुळे नशिबी आलेल्या गोळ्या आणि आता या आयुष्यभर घ्यावयाच्या आहेत अस डॉ. नि सांगितल्यावर मनाला बसलेला हबका. काही जणांचा वाढलेला रक्तदाब व त्यावरच्या गोळ्या , मधुमेह पूर्व स्थिती लक्षात आल्यावर उडालेली घाबरगुंडी तर मधुमेह झाल्याचे निदान झाल्यावर घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर अवतरलेली काळजी. आणि या सगळ्यातून हे खा व हे खाऊ नका ची भली मोठी यादी. शिवाय गुडगेदुखी, ऍसिडिटी , .. , .., .. असच बरच काही यांच्यासाठी हे लिहितोय.

ह्या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच?, एक पैसा जास्त खर्च न करता हे कस साधायच? श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे .......
थोडक्यात आखूड शिंगी, बहुदुधी, गरीब, दूध काढताना लाथा न मारणाऱ्या बहुगुणी गायीबद्दल हे लिहितोय.

कै. डॉ.श्रीकांत जिचकार एक अवलिया माणूस. एमबीबीएस, एमडी झाल्यावर आयपीएस त्यानंतर चक्क आयएएस. पण चारच महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन आमदार, मग मंत्री, राज्यसभेचे खासदार. या माणसाने प्रगती तरी किती वेगाने करावी? पण हे सगळं ४९ वर्षांच्या आयुष्यात साधायच म्हणजे एवढा वेग हवाच की हो!

घरातल्या ग्रंथालयात बावन्न हजार पुस्तक. विद्वत्ता दाखविण्यासाठी जाहिरात म्हणून नक्कीच जमवलेली नसणार. उलट सगळी वाचलेली असण्याची शक्यता जास्त. कारण ४२ विद्यापीठातून मिळवलेल्या २० पदव्या. बहुतेक सगळ्या प्रथम श्रेणीतून मिळालेल्या. २८ सुवर्णपदक मिळवलेला माणूस हा. नक्कीच पुस्तके वाचलेली असणार.

तर असा हा माणूस. भरपूर परदेश वाऱ्या केलेला असूनही त्याची भारताशी जुळलेली नाळ तुटली नव्हती. साधारण अशी माणसे थोडीशी भारतीय संस्कृतीशी फटकून वागतात. पण इथेही आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. भारतीय संस्कृती व प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान व संस्कृत यात एमए केलेय. हे मी आपल वानगीदाखल सांगतोय कारण तस पाहिल तर त्यांनी १० विषयात एमए केलेय. इतकच काय मानाची डी. लिट. पदवी मिळालीय त्यांना संस्कृतामध्ये.

तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेत मा. शशिकांत सुतार नावाच एक मोठ्ठ प्रस्थ होत. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. त्यासाठी सगळी व्यवस्था जातीने केली. आपोआपच बरेच मान्यवरांनी रंगमंदिर भरून गेल.

त्यांनी सांगितल की, "शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्शूलीन बऱ्याच रोगांचे कारण आहे." स्थूलता, त्यातून मधुमेह, वाढलेला रक्तदाब, त्यातून मग अंजोग्राफीची तपासणी, त्यात नक्की काहीतरी सापडतच. मग अंजोप्लास्टी. सगळाच प्रकार खर्चिक. पण मरणाची भीती वाटायला लागली की माणूस करतो खर्च. त्याला वाटतं की झाल सगळ करून. आता काही आपल्याला होणार नाही. पण कसच काय. पाच सहा वर्षात आणखी खर्चिक बायपाससाठी हॉस्पिटलची वारी ठरलेली.

मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. महागड्या जिम नको की, आहारतज्ञांना पैसे द्यायला नको. दवाखान्याची पायरी चढायची कधी वेळही येणार नाही. किती सोपे आहे ना? पण अवघड बाब पुढे आहे. ते पुढे सांगतात की, "दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका." याकाळात तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. बस्स. औषधांच्या याद्या विसरून जा. हे खा व हे खाऊ नका याची प्रत्येक डॉक्टर व आहारतज्ञांप्रमाणे बदलणारी यादी व त्यातून उडणारे गोंधळ संपवून टाका.

सगळ वैज्ञानिक नियमावर आधारलेले भाषण. समोर अनेक मान्यवर बसलेले. त्यामुळे बऱ्याच वेळेस अशी भाषणे इंग्रजीत चालतात आणि जिचकार तर इंग्लिश लिटरेचर मध्येपण एमए केलेले. पण तरीही हा विचार सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे यासाठी हे भाषण त्यांनी मराठीतून दिले आहे. समोर नुसते मान्यवर नाही तर पुण्याचे मान्यवर बसणार आहेत म्हणून त्यांनी अनेक इंग्रजी संज्ञांना पूरक मराठी संज्ञा शोधून काढल्या होत्या व त्या संज्ञा पाठ करून मगच ते व्याख्यान द्यायला आले होते. (या मराठीतील संज्ञा शोधणे व पाठ करणे हे कामही त्यांना सोपेच गेलेले असणार. कारण ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते!!!) एखाद्या माणसाला बेंबीच्या देठापासून कळकळ असते म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठीही हे व्याख्यान ऐकायला हरकत नाही.

आपल्या या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी "नागपूर फिटनेस मुव्हमेंट" आणि "पुणे फिटनेस मुव्हमेंट" अशा दोन संस्था सुरू केल्या. पण त्या काळात फेसबुक किंवा व्हॉटऍपस वगैरे काहीच नव्हत. नाहीतर याचा प्रसार फार वेगाने झाला असता. मनोगत, मायबोली किंवा मिसळपाव सारखा एखादा संकेतस्थळ तयार करता आलही असत कदाचित. पण वाचणार कोण? इंटरनेट फार महाग होत त्यावेळेस. टाटा कंपनीच्या व्हीसएनएल ला वर्षाकाठी पाच सहा हजार भरल्यावर कनेक्शन मिळायच. शिवाय घरात फोन असला पाहिजे ही पूर्वअट. आणि नेट वापराला सुरवात झाली की दर मिनिटाला एक टेलीफोनचा कॉल एवढे पैसे टेलिफोनच्या बिलात यायचे तो खर्च वेगळाच. नेट वापरणे हे सामान्यांच्या कुवती बाहेरची गोष्ट होती. अपवाद फक्त आयटी मधल्या लोकांचा!

तरीपण राज्यसभेच्या सदस्याला बऱ्याच सोयी सुविधा असतात. ओळख पाळख असते. त्यामुळे प्रसाराचे काम चालू होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दोनच वर्षांनी म्हणजे १९९९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून त्यांना तिकिट मिळाल पण फक्त ३०००+ मतांनी पडले. इतकेच नव्हे तर राज्यातले आणि त्याचबरोबर केंद्रातले काँग्रेसचे सरकार पडले. प्रसारावर फारच मर्यादा आल्या.सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे २००४ साली जेव्हा कॉग्रेसचे सरकार राज्यात व केंद्रात आले त्यानंतर दोनच आठवड्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मला वाटते या नवीन विचारांचे फक्त बी लावायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवले होते.

त्यांचा या भाषणाचा एक ऑडिओ यूट्यूबवर होता. पण दोन तास तीन मिनिटांचा ऑडिओ म्हटल्यावर बरेच जण तो उघडून सुद्धा बघत नसत. आणि यदाकदाचित कोणी उघडलाच तर बरेच जण पहिले प्रास्ताविक संपेपर्यंतही कळ काढू शकत नसत. त्यामुळे मूळ भाषण सुरू होण्याआधीच तो बंद केला जायचा. एवढा वेळ असल काही ऐकायला तो थोडाच वपू किंवा पुल चा व्हिडिओ होता की व्यायाम/प्रवास करताना ऐकायचा गाण्याचा अल्बम होता? ही राजकारणी लोक ही अशीच. समोर माइक आला की यांना वेळेच भानच राहत नाही. अशी कॉमेंटपण कोणीतरी केली असेल असा मला दाट संशय आहे.

बरीच वर्षे निघून गेली. जिचकारांनी लावलेले बी रूजण्यासाठी अनुकूलतेची वाट पाहत युट्युबवर पडून होत. ही अनुकुलता लाभणे फार अवघड होत. त्याला वेळ लागणार हे त्या बियाणाला माहीत होत. आणि सहा वर्षापूर्वी ते एकाच्या हृदयात रूजल. हा माणूस एमबीबीएस, एमडी होता. पण रोग पाहून औषध देणारा नव्हता. तर रोग होऊच नये यासाठी काय करता येईल यातला तज्ञ होता. प्रामाणिक होता. पैशासाठी काम करणारा नव्हता. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा असणारा असा होता. मुख्य म्हणजे माहिती वाचून चर्चा करणारा नव्हता तर त्यासाठी स्वतःवर प्रयोग करायला तयार असणारा व त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायला तयार असणारा होता. नियतीने अगदी अचूकरीत्या लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची निवड केली होती.

डॉ. दीक्षित सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख आहेत व गेली सत्तावीस वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. "स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध" या विषयावर त्यांनी संशोधन केले.यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाइकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत.

पण प्रसारासाठी नुसते प्रबंध लिहून भागत नाही यासाठी त्यांनी व्याख्याने द्यायला सुरवात केली. पुण्याच्याच बालगंधर्व रंगमंदिरात कै. डॉ. श्रीकांत जिचकारांच्या स्मृतीला अभिवादन करून सुरवात झालेले त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे. हेही व्याख्यान खूप मोठे आहे. पहिले प्रास्ताविक ३० मिनिटे चालते. त्यामुळे व्याख्यानासाठी आतुर झालेले बरेच जण कंटाळून पहिल्या काही मिनिटांनंतर व्याख्यान बंद करून टाकतात. हे प्रास्ताविक पाहू नये म्हणून मी हे सांगत नाहीये. तर थोडा धीर धरावा असे सुचवत आहे. या प्रास्ताविकातूनही तुम्हाला काही मुद्दे मिळू शकतात.

२०० च्या वर व्हॉटऍपस ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. अनेक देशातील माणसे यात आहेत. पण हे सगळे सांभाळणे आता अवघड होत चाललेय. कार्यकर्त्या डॉक्टरांना यासाठी वेळ देणे अवघड होत चाललेय. यासाठी आता एक वेबसाईटच उघडायचे प्रयत्न चालू आहेत. तस झाल की एकाच ठिकाणी सगळी माहिती एकत्रित होईल. वेळ वाचेल. एक कोटी लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचे उद्दिष्ट समोर ठेवून आता काम सुरू होणार आहे.

खर म्हणजे ह्या व्याख्यानाचा सारांश देण्याचा माझा विचार होता. पण मी मुद्दामहून तस करत नाहीये. कारण तस केले तर लोक मूळ व्याख्यान न ऐकताच चर्चा करायला सुरवात करतात. हे व्याख्यान ऐकल्यावर फारशा शंका उरत नाहीत. शिवाय त्यांनी काही फोन नंबरही दिलेले आहेत. त्यावर तुम्ही व्हॉटऍपवर प्रश्न किंवा शंका विचारू शकता.

डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची लिंक खाली देत आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ

ही डॉ. दीक्षित यांची फेसबुक पेजची लिंक आहे. त्यात लाभार्थींची नावे, अनुभव व मोबाईल नंबर दिले आहेत.हे तुम्ही केव्हाही पाहू शकता! https://www.facebook.com/weightlosseffortlessly/

डॉ. जिचकार यांनी याच व्याख्यानात बी पेरण्याचे काम केले. हा ऑडिओ आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGUwW4

मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे.

एक महत्त्वाची सूचना :
ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 03/07/2018 - 20:20

आखूडशिंगी, बहुदुधी उपायांवर माझा फारसा विश्वास नाही. हवामान, माणसांची मूळ प्रकृती, वेगवेगळी वयं यांनुसार सगळ्यांना एकसारखे उपाय लागू पडत नाहीत. हे माझ्या एकटीच्या शरीराचं निरीक्षण करून मला समजलं आहे. इतर लोकांची शरीरं आणखी निरनिराळी असतील. सवयी निराळ्या असतील. सवय म्हणजे फक्त खाण्यापिण्याचीही नाही; मी ज्या दिवशी दोन तास अभ्यास करते त्या दिवशी चिक्कार भूक लागते. व्यायाम निराळा.

मी गेल्या अडीच वर्षांत १० किलो+ वजन घटवलं आहे. दिवसातून निदान चार वेळा खाते. रक्तचाचण्यांमध्ये आरोग्य सुधारलेलं दिसतं. मात्र हे असंच आणखी १० ‌वर्षांनंतर म्हणता येईल का, हे सांगता येत नाही.

बाकी लेखातला फापटपसारा फार गमतीशीर आहे. ४९ वर्षांत ५२००० पुस्तकं वाचायची म्हणजे वर्षाला साधारण १०००+ पुस्तकं. आठवड्याला २० पुस्तकं. ही पुस्तकं प्रत्येकी १००० शब्दांची असल्याशिवाय एवढी पुस्तकं वाचणं आणि आत्मसात करणं शक्य नाही. तुमच्या या लेखातच ७००-८०० शब्द असतील.

श्रीकांत जिचकारांना चार गोष्टी समजल्या होत्या, हे म्हणायला काहीच हरकत नाही. पण ते म्हणताना त्यांच्याबद्दल (फेकूस्टाईल) हास्यास्पद वर्णनं करण्याची गरज नाही.

पुंबा Wed, 04/07/2018 - 11:37

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हे तर कैच नै..
ओशोने सव्वा लाख पुस्तके वाचली होती...(असं तो स्वत:च म्हणतो)
अर्थात तरीही आमचा ओशोवर फार जीव....

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 05/07/2018 - 06:39

In reply to by पुंबा

असले हास्यास्पद दावे स्वतःचे स्वतः करायला काहीच ना नाही. आपण मापं काढायला मोकळे राहतो. पण जो मनुष्य आता स्वतःचा बचाव करण्यासाठी जिवंतच नाही, त्याच्याबद्दल असं काही म्हणणं अनुचित वाटतं.

आमच्या संघिष्ट बापूंना श्रीकांत जिचकारांबद्दल प्रेम होतं. कामाच्या निमित्तानं त्यांची जिचकारांच्या वहिनीशी ओळख झाली; त्यातून जिचकारांशी काही वेळा भेटही झाली होती. त्याचे तपशील विचारणं, समजण्याचं वय नव्हतं. ध्रुवीकरण झालेल्या जगात राहताना मला याचं आश्चर्य वाटतं.

तिरशिंगराव Wed, 04/07/2018 - 10:27

मी अदितीशी सहमत आहे. वरील प्रकार, एकदा करुन पाहिला होता. पण त्यातून, दीर्घवेळ काही न खाल्ल्यामुळे मला ॲसिडीटीचा त्रास झाला. त्यानंतर, पुन्हा चार वेळा खायला सुरवात केल्यावर, पुन्हा तंदुरुस्त झालो. खवैय्या असल्यामुळे माझे वजन कमी होत नाही. पण रोजच्या व्यायामामुळे , स्थिर तरी रहाते, आणि मी त्यावरच खूष आहे.
कुठल्याही उपायाचे सरसकटीकरण करता येणार नाही.

चिमणराव Wed, 04/07/2018 - 13:14

कितीही खाल्ल तरी वजन वाढवता येत नाहीये. सत्तरवरून पंच्याऐंशी करायचं आहे मला.
जर हे करणे शक्य आहे तर वजन कमी करणेही शक्य असावे.
बाकी जिचकर प्रकरण उगाच घुसडले आहे.
"झिरो बजेट शेती - पाळेकर" यासारखीच ही एक प्रचारकी मोहिम वाटते आहे.

गवि Wed, 04/07/2018 - 13:32

मिपावर आणि इथे हा लेख वाचला. प्रतिक्रियाही पाहिल्या. अनेकदा उद्देश चांगला असूनही कोणत्याही लहान सहान शंकेवरसुद्धा एकवाक्यी खुलासाही न देता किंवा स्पष्टीकरण न देता त्याऐवजी सतत रोख केवळ "ते भाषण एकदा ऐका, ते भाषण पूर्ण ऐका", "अमुक इतकेच तास /मिनीटं तर द्यायची आहेत चांगल्या आरोग्यासाठी"..... असा सर्वांना एका टारगेटकडे रिडायरेकट् करण्याचा दिसला की वर अचरटबाबा म्हणतात तसे प्रचारकी भास व्हायला लागतात.

"एकदा आमचे शिबिर अटेंड करा"
"एकदा आमच्या सेमिनारला या"
"एकदा त्यांची सीडी / डीव्हीडी पहा"
"सत्संगाला उपस्थित राहा"

त्याशिवाय फार काही प्रश्न चर्चा नको. उत्तर एकच, "एकदा ते पूर्णपणे करा / अटेंड करा/ ऐका / उपस्थित राहा"

हा अप्रोच टाळला तर परिणाम आणखी जास्त चांगला होऊ शकतो.

चिमणराव Wed, 04/07/2018 - 18:48

आता विषय निघालाच आहे आणि स्वत: आदेश बांदेकर ( होम मिनिस्टरवाले) सांगत आहेत की मी कडू दुधीचा रस घेतला आणि मग मला कसा त्रास झाला इत्यादी. आदेशभाउजीना कुणी वैद्याने सांगितलं का किंवा ते स्वत:च प्रमाण न ठरवता रस पिऊ लागले? वजन कमी होणे राहील बाजूला आणि नसता त्रास ओढवला जाईल.

चिंतातुर जंतू Thu, 05/07/2018 - 14:31

In reply to by नितिन थत्ते

आर आय पी - डेटा & ष्टॅटिष्टिक्स (ॲलाँग विथ डेटा सायंटिष्ट्स)

सरसकट दावा एखाद्या विधानातून केला असला, तर त्याचा प्रतिवाद एक अपवाद दाखवून करता येतो. "श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे" यात सरसकट दावा आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 06/07/2018 - 23:45

In reply to by नितिन थत्ते

गुंतागुंतीच्या वाक्यांमधून, मांडणीतून फक्त एकच, सोयीस्कर वाक्य उचलणं; आणि मुद्द्याबद्दल न बोलता व्यक्तींवर टीका करणं ही भक्तपरंपरा आहे. तुम्ही त्याच वळचणीला गेलेले बघून खेद वाटला.

ओंकार Fri, 06/07/2018 - 10:35

आज पुण्याच्या मटा मध्ये कार्यक्रमाची जाहीरात आहे.चला यानिमित्ताने ऐसी वर प्रमोशन सुरू झाले.

-ओंकार.

गवि Fri, 06/07/2018 - 10:41

In reply to by ओंकार

ओह. उगीच शंकेखोरपणा दाखवला असा पश्चात्ताप झाला होता. शंका खोटी ठरल्याचा आनंदही झाला होता. पण हे अपकमिंग प्रकरण आहे असं दिसून निराशा झाली.

शाम भागवत Tue, 10/07/2018 - 20:48

In reply to by गवि

हा प्रतिसाद वाचायला उशीर झाला या बद्दल क्षमस्व.

मी जाहिरातीची लांबी रूंदी पट्टी वापरून मोजली नाही. पण बहुतेक ३ बाय ३ सेंटिमीटरची असावी. एवढी मोठी जाहिरात व ती सुध्दा साधीसुधी नाही तर रंगीत जाहिरात. आता ही जाहिरात मूळ पेपरात देता आली नसती का? पण मुद्दामहून पुरवणी जोडून दिली आहे. बर जर पहिल्याच पानावर दिली असती तर हा नक्कीच प्रमोशनचा भाग आहे हे लोकांच्या लक्षात आले असते, तसे होऊ नये म्हणून आतल्या पानावर दिली आहे.

इतकेच काय पुस्तके खपविण्यासाठी हे सगळ चालल आहे हे लक्षात येऊ नये म्हणून त्यासंबंधात काहीच उल्लेख केलेला नाहीये. उलट फुकट व्याख्यान, फुकट व्याख्यान अशी जाहिरात करून लोक आकर्षीत व्हावेत असा प्रयत्न स्पष्टपणे लक्षात येतोय असे वाटतेय. लोक येतील मग त्यांच्या गळ्यात पुस्तक मारता येतील हाच सुप्त हेतु असावा.

खर म्हणजे त्यांच्या पुस्तकाची ही तेरावी आवृत्तीचे प्रकाशन आहे. आत्तापर्यंतची प्रत्येक आवृत्ती नेहमीच झटकन संपून ती आऊट ऑफ प्रिंट होत आलेली आहे. आत्ताही तीच परिस्थिती आहे. हा इतिहास असताना सुध्दा तेरावी आवृत्ती कशी संपेल या विवंचनेत हा माणूस पडला असेल तर त्याची किव करावीशी वाटते. किती ते प्रमोशन? तेरावी आवृत्ती ही झटकन संपेल एवढी साधी गोष्ट ज्याला समजत नाही त्याच्या कडून दोन तासाचे भाषण ऐकणे म्हणजे खरोखरच मूर्खपणाचा कळसच म्हणला पाहिजे. भाषण ऐकण्यासाठी दोन तास देणे राहोच, उल्ट दिलेल्या लिकवर टिचकी मारण्याईतकाही वेळ घालवणे हा एक वेडेपणाच होईल.

या संकेत स्थळावरील सदस्यांना आवडेल अशा पध्दतीचा प्रतिसाद दिला आहे.
या घाग्यावर आता भाग घेण्याचे थाबवतो.
सर्वांना नमस्कार.

गवि Tue, 10/07/2018 - 22:19

In reply to by शाम भागवत

तुम्ही प्लीज खूप दुखावले जाऊ नका. तुम्ही तुम्हाला योग्य वाटलेली माहिती आणि व्यक्ती अगदी खरोखर उघड प्रमोटही करण्यात कसलीही हरकत घेण्याचा संबंध किंवा हक्क कोणाचाच नाही.

अगदी लोकसत्ता किंवा अन्य ऑनलाइन वृत्तपत्रांतल्या अत्यंत अनरिलेटेड बातमीवरही "दिवसातून फक्त दोनदा जेवणे हा साधा उपाय" वगैरे लाईन्स ओढून ताणून टाकणारे लोक पाहिले. अगदी सगळीकडे तो विषय पेरायचा म्हणून मोदी, रागा यांचे बॉट्स असतात तसा प्रकार वाटला तिथे.

त्याचा एकत्रित परिणाम म्हणून ती प्रतिक्रिया झाली. व्यक्तिगत घेऊ नये. माफी असावी. मीही थांबतो.

गवि Wed, 11/07/2018 - 09:47

In reply to by 'न'वी बाजू

तुमच्या प्रतिसादाला भडकाऊ अशी श्रेणी दिली आहे.

ओंकार Fri, 06/07/2018 - 12:47

In reply to by adam

इथे जाउन मटा आणि पुणे सिलेक्ट करा. एक धमकीवजा पॉप-अप येतो. तो ओके करून खाली पेजेस मघ्ये हवे ते पान सिलेक्ट करून बघता येईल.

- ओंकार.

चिमणराव Fri, 06/07/2018 - 13:41

इंटरनेट माध्यमामुळे माहितीचा प्रसार करणे सोपे झाले आहे याचा उपयोग करणे योग्यच. पुर्वी ( आता आम्ही/मी पुर्वीचंच बोलणार) हे सर्व पुस्तकांतून फार थोड्या लोकांनाचा साध्य साधन होतं.

हे पुस्तक १९६०अगोदरचे १६०पानांचे आहे. त्यात भाषणातले सगळे मुद्दे आहेत.

अनुक्रमणिका

राजेश घासकडवी Mon, 16/07/2018 - 03:46

-दररोज काही ना काही व्यायाम करा, चालणं, वजनं उचलणं, लवचिकतसाठी काही आसनं करणं इत्यादी
-योग्य त्या मर्यादेत आणि चौरस आहार घ्या. फळं, भाज्या, दूध व दुधाचे पदार्थ, वेगवेगळ्या प्रकारचे दाणे, डाळी, उसळी, मांस, पोळ्या, तेल इत्यादी पदार्थ योग्य प्रमाणात घ्या.
-अबरचबर पदार्थ, दारू, धूम्रपान टाळा किंवा अगदी कमी प्रमाणात घ्या.
-वेळच्या वेळी झोपा, आणि ठरलेल्या वेळी उठा.
-रोज भरपूर पाणी प्या. चहा, कॊफी, कोल्ड्रिंकं मर्यादित प्रमाणात सेवन करा.
-लहानसहान गोष्टींचा मनाला त्रास करून घेऊ नका.

या सर्व गोष्टी सातत्याने वर्षानुवर्षं केल्या तर आयुर्मान वाढतं आणि तब्येत सर्वसाधारणपणे चांगली राहाते. मग भलतीसलती डायेटं करण्याची गरज पडत नाही. तसंच आत्यंतिक गरीब सोडले तर इतर खूप लोकांना या प्रकारचं राहाणीमान अंगिकारता येऊ शकतं.

पण हे सगळं करणं सोपं बिलकुल नाही.

तेव्हा कृपया याला विनासायास म्हणू नका. हे साध्य करण्यासाठी प्रचंड शिस्त, मनोनिग्रह आणि स्वतःच्या शरीराला महत्त्व देऊन सातत्याने मन मारता येण्याची क्षमता लागते.

१४टॅन Wed, 05/09/2018 - 18:55

नटसम्राट
दिक्षित Vs दिवेकर

To eat or not to eat between meals that is the question...

दोन वेळाच जेवाव की दर दोन तासाने जेवाव हा एकच सवाल आहे

करीनाची मधाळ झिरो फिगर आठवत चराव
दर दोन तासांंनी लाचार डूकरा सारखे, का
नागपुरच्या जिचकरांच्या पदव्या स्मरुन मारावा
अडवा हात, दिवसांतून दोनदाच
आणि एकदमच पाडावा फडशा सगळ्याचा
बिस्कीटांंचा, प्याटिसचा आणि पोळीभाजीचा
५५ मिनिटे संपण्याआधी भात असा चापावा
की नंतर येणा-या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही..
पण मग..

पण मग त्या
निद्रेतही ईंन्शूलीन पाझरु लागले तर?
ग्लूक्यागाँन बाहेर पडलाच नाही तर?
तर…तर…इथेच मेख आहे, इथेच
ईंन्शूलीनसारखी ग्लूक्यागाँनची ईंजेंक्शन मिळत नाहीत
म्हणुन आम्ही सहन करतो ही ऊपासमार
सहन करतो गाळलेले ताक, काळ्या चहाच्याच कपात
बेशरमपणे सारतो प्रसादाचे पेढे पँन्टच्या खिशात
आणि तरीही हा गोपाळकाला जेवताना, गळून पडतो घास
कुणीतरी जेव्हा बाचकवते "अब तक छप्पन्न" म्हणत

आणि अखेर सहापुडी डब्यांंचा कटोरा घेऊन
उभे राहतो खालच्या मानेन पुन्हा
करीनाच्याच दारात
तोडतो लचके दर दोन तासांनी, कोवळ्या सफरचंदाचे
मध्यरात्री दचकून जाग आली की स्वःताच्याच घरात
चोरुन खातो चार बदाम आणि तिन मनूका, अंधारात

अहो डायटिशीयन्स, तुम्ही ईतके कठोर का झालात?
एका बाजुला दिवेकर तूम्ही मेट्याबाँलीझम स्लो
होण्याची रिस्क सांगता आणि दुस-या बाजुला
दिक्षीत तुम्ही ग्लूक्यागाँनची भीती घालता

हे आमच्या पोटाच्या विधात्यांनो
तुम्ही तुमच्यात काही सु्वर्णमध्य सांधू शकाल का?
दर दोन तासांनी ५५ मिनिटे जेवलेले चालेल का?
किंवा दर ५५ मिनिटांंनतर दोन वेळा जेवावे का?
का?..का?...
फेकून देऊ सर्व ताट वाट्या आणि सहा पुडाचे डबे
ऊकिरड्यावर, आणि टोचून घेऊ कायमचे
एक सलाईन
पण नको.. नकोच ते
सलाईन दर दोन तासाने लावावे का दिवसातून दोनदा
हा नवाच सवाल ऊभा राहील

त्या पेक्षा...
हे दिवाकरा, तू दिक्षीतांना दिक्षा दे
हे जग्ग़ननाथा, तू थोडी ऋजुता दाखव
नाही तर...
पोटावरील विस्कटलेल्या वळ्या घेउन
आम्ही ढेरपोट्यांनी कोणाच्या पायावर डोक आदळायच?
कोणाच्या पायावर ? कोणाच्या ?
कोणाच्या???