जग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं! …..5

ए विंडिकेशन ऑफ दि राइट्स ऑफ वुमन (1792)
-मेरी वोलस्टोनक्रॅफ्ट (1759-1797)

photo 4

स्त्रीमुक्ती चळवळीची आद्य प्रणेती म्हणून ‘ए विंडिकेशन ऑफ दि राइट्स ऑफ वुमन’ या पुस्तकाची लेखिका मेरी वोलस्टोनक्रॅफ्टविषयी म्हणता येईल. हे पुस्तक स्त्रीमुक्तीविषयीचा शोधनिबंधच ठरेल. तिच्या या पुस्तकात स्त्रीने बुध्दीचा वापर केल्यास तिच्या सर्व समस्यांना उत्तर मिळेल, असे प्रतिपादन केले आहे. स्त्रीने स्वत:ची अबला, फुलासारखी कोमल, भित्री, भावनावश, आधार शोधणारी, या प्रतिमा कोशातून बाहेर पडून शरीराने व मनाने कणखर व्हायला हवे. स्त्री मुक्त व्हायला हवी. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी स्त्रियांची कुचंबणा होत असते. पुरुष तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेण्यासाठी टपलेला असतो. बालपणापासूनच सौंदर्य, नट्टापट्टा, इत्यादीवरच भर देत आल्यामुळे स्वत:च्या शरीराकडे पुरुषी नजरेनेच ती पाहत असते. ही सवय मोडली पाहिजे. स्त्री एका सोन्याच्या पिंजऱ्यात अडकून पडलेली आहे. तिने या तुरुंगातून बाहेर पडायला हवे. सूडाने पेटल्यासारखे पुरुषी व्यवस्था स्त्रिंयावर अन्याय, अत्याचार करत आली आहे. तिचा प्रतिकार करायला हवा.

लेखिकेच्या या पुस्तकात स्त्रियांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानलेल्या प्रेम, वासना, विवाह, लैंगिक संबंध, मालमत्ता इत्यादी गोष्टींचा ऊहापोह केला आहे. स्त्रीने धरसोडवृत्ती सोडून स्वतंत्र होण्यासाठी प्रयत्न करावे असा तिचा आग्रह होता. अजूनही तिने केलेल्या विधानांबद्दल चर्चा चालू आहे. मुस्लिम देशातील स्त्रियांच्या स्थितीवर लेखिकेची त्या काळी केलेली सर्व विधानं आजही तंतोतंत लागू होतात. गेल्या पन्नास वर्षातील स्त्रीमुक्तीबद्दलचा आढावा घेतल्यास मेरी वोलस्टोनक्रॅफ्टचे लेखन, तिचे आयुष्य, तिचे अनुभव तिने उभा केलेला लढा स्त्रीमुक्ती चळवळीला आदर्शवत वाटू लागतील.

1759साली जन्मलेल्या मेरीचे बालपण फार कठिण परिस्थितीतून गेले होते. बापाचा रागीट स्वभाव व त्याचे तिच्या आईशी होत असलेले रोजचे भांडण व मारझोड यामुळे अनेक वेळा मेरीला घराबाहेर थंडीत कुडकुडत झोपावे लागत असे. गंमत म्हणजे तिच्या आईला त्या मारझोडीचे काहीही वाटत नसे. बळीच्या पशूसारखे ती सर्व सहन करी. त्याकाळातील जनरीतीप्रमाणे मेरीचे शिक्षणसुध्दा अर्धवटच झाले होते. भरतकाम, शिवणकाम शिकण्यातच तिचे बालपण संपले. मुळातच ती एक मध्यमवर्गातली स्त्री होती. म्हणूनच तिच्या पुस्तकाचा सर्व रोख पूर्णपणे मध्यमवर्गाकडेच होता. वाचनातील गोडी व भाषणं ऐकण्याच्या छंदामुळे तिच्या ज्ञानात भर पडत होती.

आपण आर्थिकरित्या स्वावलंबी व्हावे हे तिचे स्वप्न होते. परंतु स्त्रियांना नोकरीचे दरवाजे बंद होते. फार फार तर एखाद्या श्रीमंत बाईची पगारी सहचरी म्हणून काम मिळण्याची शक्यता होती. मेरी एके ठिकाणी सहचरीची नोकरी पत्करून फावल्या वेळात ती लिहू लागली. 1787 मध्ये थॉट्स ऑन दि एज्युकेशन ऑफ डॉटर्स हे तिचे पुस्तक प्रसिध्द झाले. पुस्तकाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. याच काळात एड्मंड बर्क व रिचर्ड प्राइस या उदारमतवाद्यांच्या संपर्कात आल्यामुळे ती स्वत:च्या व स्त्रियांच्या संबधी विचार करू लागली. फ्रेंच व्रंतीमुळे स्वातंत्र्य व समता परवलीचे शब्द झाले होते. उदारमतवाद्यांना जग बदलण्याची आकांक्षा होती. थॉमस पेन व रूसो या तत्त्वज्ञांचे लेखन वाचताना ती भारावून जात होती.

वैयक्तिक आयुष्यात तिला फार कष्ट भोगावे लागले. गिल्बर्ट इमले या भामटयाचा तिच्या तारुण्यात प्रवेश झाला. त्याच्यामुळे तिला भरपूर मनस्ताप सोसावा लागला. विवाहबाहृ संबंधातून तिला एक मुलगी झाली. घरातील बिघडलेल्या वातावरणाला कंटाळून तिने दोनदा आत्महत्येचा प्रयत्नही केला. नंतरच्या काळात थॉमस पेनच्या उदारमतवादी संघटनेतील विलियम गोल्डविन या तरुणाबरोबर तिने लग्न केले. परंतु 1797 साली बाळंतपणातील काही गुंतागुंतीमुळे वयाच्या 38व्या वर्षी तिचा मृत्यु झाला. तिच्या मते पती म्हणजे स्त्रियांच्या आयुष्यातील घरातल्या इतर वस्तूंप्रमाणे गरजेची वस्तू असून मनापासून तो आवडत असला तरी कायम हातापायाखाली लुडबुड करत राहणाऱ्या त्याच्या अस्तित्त्वाची गरज नाही.

तिने लिहिलेल्या पुस्तकातील एकूण आशय वाचताना वोलस्टोनक्रॅफ्ट ही स्त्रीमुक्ती चळवळीची जननी असे वाटू लागते. त्यात स्त्री एक स्वतंत्र विचाराची व्यक्ती म्हणून बघितलेले लक्षात येते. स्त्रियांच्या हक्कांची जाणीव तिने करून दिली आहे. पुरुषाने आखून ठेवलेल्या निकषानुसार स्त्रीकडे न बघता स्त्रीच्या स्वभावप्रकृतीनुसार तिच्याकडे बघावे असा तिचा आग्रह होता. तिने लिंगभेद, लैंगिकता इत्यादी विषयांना स्पर्ष केले असले तरी तुलनेने तिचे विचार अपरिपक्व वाटतात. स्त्रियांना मालमत्तेचा अधिकार व संपत्तीत वाटा असावा यावर तिने भर दिले होते. स्त्री केवळ सौंदर्याची बाहुली वा श!यासोबतीण होण्याचे प्रयत्न न करता स्वत:च्या व्यक्तिमत्त्व विकासाकडे जास्त लक्ष द्यावे असे तिला वाटत होते. परंतु अजूनही स्त्रियांच्या मानसिकतेत मेरीला अपेक्षित असा बदल झालेला नाही. अलिकडेच घेतलेल्या एका सर्वेक्षणानुसार 35 टक्के ब्रिटिश मुलींना आपण मॉडेल किंवा नर्तिका व्हावेसे वाटते!

प्रत्येक मनुष्यप्राण्याचे काही नैसर्गिक हक्क आहेत व या हक्कांना नकार देणे विवेकाशी प्रतारणा ठरेल. वासनेच्या आहारी गेलेली माणसं विवेकशील राहू शकणार नाही. शिक्षणातूनच स्त्रियांना राजकीय भान येईल. स्त्रियांसकट सर्व मानवजात समंजस व नीतिमान होऊ शकेल. पती-पत्नींच्यातील प्रेमाचे अधिष्ठान तिला मान्य असले तरी प्रेमाचा जीवनातील सहभाग अत्यंत अल्प प्रमाणात असावा असे तिला वाटत होते. प्रेमापेक्षा पती-पत्नीमध्ये मित्रत्वाचे संबंध असावे यावर तिचा भर होता. पती जेव्हा प्रियकराच्या भूमिकेतून बाहेर पडतो तेव्हाच पत्नीला प्रेयसीच्या भूमिकेतून बाहेर पडता येते. त्यानंतर पतीला रिझवण्यासाठी विशेष काही करण्याची गरज पत्नीला भासणार नाही. पतीने मित्रत्वाचा हात पुढे केल्यास तिलासुध्दा पती म्हणून त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहण्याची आवश्यकता वाटणार नाही. प्रेम, कोमलता, सौंदर्य, या गोष्टी स्त्रीला कठपुतळी बनवण्यासाठी योजिलेल्या संज्ञा आहेत. विवेक लैंगिकतेवर मात करू शकते.

औद्योगिक प्रगतीमुळे स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य मिळणार, कंटाळवाण्या घरकामातून वेळ मिळणार याबद्दल तिची खात्री होती. स्त्रियांना पुरुषांच्या जगात मुक्त वावर मिळेल याची ती कल्पना करू शकत होती. फक्त नंतरच्या काळातील कुटुंब, समाज व इतर संघ-संस्था कशा असतील याचा ती अंदाज करू शकली नाही. स्त्रिया कदाचित प्रथम प्रयत्नात यशस्वी झाल्या नाही तरी पुन्हा त्यांना संधी द्यायला हवी असे तिला वाटत होते. स्त्रियांचा विकास झाल्यास समंजसपणे घरात वावरणाऱ्या मुली, प्रेम करणाऱ्या बहिणी, विश्वासार्ह पत्नी, सुसंस्कृत आई व चांगले नागरिक अशा रीतीने स्त्री ओळखली जाईल, यावर तिचा विश्वास होता.

तिच्या या पुस्तकाच्या प्रसिध्दीनंतरच्या शंभर वर्षाच्या कालखंडात स्त्रीमुक्तीच्या संदर्भात काही अपवाद वगळता विशेष काही घडले नाही. परंतु 19व्या शतकाच्या शेवटी शेवटी स्त्रीमुक्तीचे वारे वाहू लागले. चळवळ जोर धरू लागली. मतदानाच्या हक्कासाठी 1890 ते 1918 पर्यंत अमेरिका व युरोपमध्ये स्त्रियांनी चळवळ उभी केली. चळवळीतल्या कार्यकर्तींना मेरी वोलस्टोनक्रॅफ्ट एक आदर्शवत स्त्री वाटू लागली. 1923मध्ये अमेरिकेत व 1928 मध्ये ब्रिटन येथे मतदानाचा समान हक्काचा कायदा पास झाला. ऑक्सफर्ड-केंब्रिज विद्यापीठातून स्त्रिया पदवीधर होऊ लागल्या. 1929मध्ये ब्रिटिश पार्लिमेंटने स्त्रियांसाठी दरवाजे उघडले. 1960मध्ये स्त्रीमुक्तीची दुसरी लाट आली. स्त्रियांनी आर्थिक स्वातंत्र्यासाठी जगभर आंदोलनं केली. त्यानंतर अनेक स्त्रियांना राजकीय, सामाजिक व प्रशासकीय पदं मिळू लागल्या. मार्गारेट थॅचर, इंदिरा गांधी, सिरिमाओ बंदारनायके इत्यादी स्त्रियांनी आपापल्या देशांची धुरा यशस्वीपणे संभाळली. मेरी क्युरी, इरिना क्युरी, रोसालिंड फ्रँकलिन सारख्या स्त्रिया वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात चमकल्या. व हा स्त्रीमुक्तीचा लढा अजूनही कुठे ना कुठे तरी चालू आहे. स्त्रियांना समान वागणूक ही मागणी अजूनही जोर धरत आहे.

क्रमशः
यापूर्वीचे

1..... प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका
2..... ऑन दि ओरिजिन ऑफ स्पीसीज
3..... एक्स्पिरिमेंटल रिसर्च इन इलेक्ट्रिसिटी
4..... ऑन दि अबॉलिशन ऑफ स्लेव्ह ट्रेड

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आभार.

गोल्डा मायर, मार्गारेट थॅचर, इंदिरा गांधी, अशा स्त्रियांबद्दल सिमोन दी बोव्हारच्या मुलाखतींमधलं एक विधान मला फारच आवडलं - ह्या स्त्रिया देशाच्या सर्वोच्च पदावर निवडून आल्यावर समानतेची साथ बोकाळली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.