सजीवता आणि सक्रिय अनुमानाचा सिद्धांत

सजीव असणे म्हणजे नेमके काय? ह्या प्रश्नाचे उत्तर तत्त्ववेत्ते फार पूर्वीपासून शोधत आलेले आहेत. पण भौतिक-रसायन-जीव शास्त्र ह्या प्रश्नाकडे वळून चार-पाच दशकेच झाली आहेत. सजीव प्राणी म्हणजे एक प्रकारची स्वयंनियोजीत संस्था (self-organizing system) असते असा विचारप्रवाह त्यातून निर्माण झाला. तरीही जाणीव (consciousness) आणि विशेषतः स्व-ची जाणीव (self-consciousness) म्हणजे नेमके काय ह्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे अजून मिळत नव्हती. गेल्या दोन दशकांत मज्जातंतू संशोधकांनी इतर सर्व शास्त्रांची मदत घेऊन ह्या प्रश्नांवर संशोधन सुरू केले आहे. अशा प्रयत्नांतून पुढे आलेल्या सिद्धांतांपैकी सक्रिय अनुमानाचा (active inference) सिद्धांत हा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. दर्शन (perception), कृती (action), अवधान (attention), बोध (cognition), शिक्षण (learning), कुतूहल (curiosity), अंतर्दृष्टी (insight), जाणीव (consciousness) आणि ‘स्व’ ची जाणीव (self-consciouness) ह्या सर्व मानसिक संकल्पना एका छत्राखाली आणून त्यांचे स्पष्टीकरण करण्याचे धाडस हा सिद्धांत करू पाहतोय. त्याचप्रमाणे स्वप्नावस्था (dreaming), भ्रम (illusion), मी हरवलेली अवस्था (selfless state), स्किझोफ्रेनिया (schizophrenia), स्वमग्नता (autism) ह्यासारख्या मानसिक अवस्थांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्नही हे शास्त्रज्ञ करत आहेत.

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथील कार्ल फ्रीस्टन (जन्म: १९५९) हे ह्या सिद्धांताचे प्रवर्तक तर जर्मन शास्त्रज्ञ हर्मन हेल्महोल्ट्झ (१८२१-१८९४) हे ह्या सिद्धांताचे आद्य जनक मानले जातात. सक्रिय अनुमानाव्यतिरिक्त मुक्त ऊर्जेचे तत्त्व (free energy principle), भाकीत प्रक्रिया (preditive processing), बेझतत्त्वीय मेंदूचा सिद्धांत (Bayesian brain hypothesis) अशा वेगवेगळ्या नावांनी ही विचारधारा ओळखली जाते. ह्यावर काम करणारे शास्त्रज्ञ भौतिकशास्त्र विशेषतः सांख्यिकीय उष्णगतीशास्त्र (statistical thermodynamics), गणित विशेषतः सांख्यिकी विज्ञान (statistics) आणि गतिशील संस्थांचे गणित (dynamical systems theory), संगणकी विज्ञान विशेषतः यंत्र-शिक्षण (machine learning), जीवशास्त्र, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र अशा वेगवेगळ्या विज्ञानशाखांमधून आलेले आहेत. हा सिद्धांत नेमकं काय मांडण्याचा प्रयत्न करतोय? त्यातील शोधाची दिशा कशी आहे? त्यामागे कुठल्या गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत? हे शोधण्याचा प्रयत्न ह्या लेखात केलेला आहे.

आपण जर शाईचा एक थेंब पाण्याच्या ग्लासात टाकला तर थोड्यावेळाने तो थेंब दिसेनासा होऊन पाण्याचा रंग थोड्याफार प्रमाणात बदललेला दिसतो. पण तोच थेंब जर विकिरण (dispersion) होता होता पुन्हा आकुंचित व्हायला लागला आणि पूर्ववत झाला तर त्याचे आपल्याला आश्चर्य वाटेल. आणि हेच थेंबाचे विकिरण-आकुंचन जर पुढे चालू राहिले तर ते एखाद्या जिवंत प्राण्याचे स्पंदन वाटू लागेल. उष्णगतिशास्त्राचा दुसरा नियम (second law of thermodynamics) असे सांगतो की सृष्टीचा कल हा सुव्यवस्थेकडून (order) अव्यवस्थेकडे (disorder) असतो. तेव्हा शाईचे पाण्यात विरघळून जाणे हे नैसर्गिक असते. ह्याउलट विकिरण होता होता त्याचे आकुंचन पावणे हे जिवंतपणाचे लक्षण वाटते.

तेव्हा सजीवतेचे एक मुख्य लक्षण म्हणजे ठराविक स्थितींमध्ये राहण्याचा सजीव प्राण्यांचा कल. आणि हा कल उष्णगतिशास्त्राच्या दुसऱ्या नियमाला प्रतिकार करत असतो. मला वाटते मी काहीही करु शकतो आणि जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ शकतो. हे जरी खरे असले तरीही सकाळचा चहा, नाश्ता, आंघोळ, जेवण, बाजारहाट अशा कितीतरी गोष्टी रोज मी साधारणपणे त्याच वेळी करत असतो. म्हणजे मी ठराविक स्थितिसमूहात सतत वावरत असतो. जीवशास्त्रीय दृष्टीने आपल्या सगळ्यांचा रक्तदाब, शारिरीक तापमान, नाडीचा वेग, श्वासोश्वास थोडक्यात म्हणजे होमिओस्टॅसिस (homeostasis) एका ठराविक मर्यादेत चालू असतात. सूर्यप्रकाश, पाणी, हवा, आणि खाद्य ह्यातून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर करून आपण प्राणीमात्र आपल्याला अनुकूल अशा एका ठराविक स्थितीसमूहात स्थित्यंतर करत असतो. आणि अतिउष्ण, अतिथंड, अतिविरळ यासारख्या जगण्याला प्रतिकूल अशा स्थितीसमूहांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतो. हे ह्या सिद्धांताचे एका मुख्य गृहीतक.

हे अनुकूल अवस्थांमध्ये राहणे आणि प्रतिकूल अवस्थांपासून दूर राहणे हे प्राणीमात्रांना कसे काय साध्य होते? ह्या सिद्धांतानुसार सजीव प्राण्याची शरीररचना आणि बाह्यजगात स्वतःला अनुकूल असे बदल घडवणारी त्याची कृती हे जणूकाही एका अमूर्त सांख्यिकीय प्रतिकृतीतून कार्यरत होत असते. ह्या प्रतिकृतीत बाह्यजगाची कार्यकारण रचना सांख्यिकीय स्वरूपात गर्भित असते. ती प्रतिकृती वापरून तो प्राणी बाह्यस्थितीचे अनुमान करत असतो. बाह्यस्थिती त्याला कशी काय कळते? त्याला ती कधीच ठामपणे कळत नाही. तो होणाऱ्या संवेदनांतून बाह्यस्थिती काय आहे आणि त्यामुळे आपल्याला कशा प्रकारची संवेदना होणार आहे ह्याची भाकिते रचतो. आणि होणाऱ्या संवेदनांशी त्याचा पडताळा पाहतो. संवेदनेचे भाकीत आणि होणारी संवेदना ह्यातील त्रुटी क्षुल्लक असेल तर ती त्रुटी सोडून दिली जाते व बाह्यस्थितीचे अनुमान कायम राखले जाते. आपल्याला रोज दिसणाऱ्या गोष्टी - घरातले टेबल, खुर्च्या, दरवाजे, भिंती, आणि घरातली माणसं ह्यात रोज थोडाथोडा फरक पडत असतो. पण तो क्षुल्लक असतो. आणि तो ह्या अनुमानाच्या प्रकियेतून वगळला जातो आणि आपल्या लक्षात येत नाही.

काहीवेळा संवेदनेचे भाकीत आणि होणारी संवेदना ह्यातील त्रुटी क्षुल्लक नसते. कधी कधी खूप उकाडा असतो आणि अचानक गारवा जाणवतो. कशामुळे बरे हे झाले असेल? नवीन भाकिते केली जातात. सूर्य ढगाआड गेला असेल का? किंवा कुणीतरी पंखा लावला असेल का? ह्या भाकीत बाह्यस्थितींवरून नवीन संवेदनांचे भाकीत केले जाते आणि होणाऱ्या संवेदनांबरोबर त्याचा पडताळा पाहिला जातो. ही प्रक्रिया अखंड चालू असते. ह्या प्रक्रियेत जी भाकीत-स्थिती कमीतकमी त्रुटी निर्माण करते ती सध्याची बाह्यस्थिती अशी समजूत केली जाते. ह्या प्रक्रियेला बेझियन बिलीफ अपडेशन (Bayesian belief updation) असे म्हणतात.

अशाप्रकारे दर्शन (perception) ही एक अनुमानीय प्रक्रिया आहे असे हा सिद्धांत सांगतो. ह्या सिद्धांतानुसार दर्शन हे सद्याच्या बाह्यस्थितीबद्दलच्या भाकितस्थितीचे प्रक्षेपण असते. आपली सर्वसाधारण समजूत अशी असते की बाहेरून आत येणाऱ्या संवेदनांचा बोध झाल्यावर आपल्याला बाह्यस्थितीची कल्पना येते. हा सिद्धांत ही प्रक्रिया उलटी असल्याचे मांडतो. बोधप्रक्रियेचा प्रवाह हा प्रामुख्याने आतून बाहेर असतो, बाहेरून आत नसतो. दर्शनासाठी लागणारी ऐशी टक्के माहिती आतील प्रतिकृतीतून आलेली असते व फक्त वीस टक्के माहिती त्रुटीस्वरूपात बाहेरून आत आलेली असते असे ढोबळपणे म्हणता येईल.

कमीत कमी त्रुटीचे भाकीत शोधणे हा ह्या सिद्धांताचा एक भाग झाला. तर दुसरा भाग कृतीशी निगडीत आहे. मला जर गरम होत असेल आणि थंडावा हा जर माझ्यासाठी जास्त अनुकूल असेल तर थंड संवेदनांचे भाकीत पूर्ण करण्यासाठी मी पंखा लावतो किंवा मी जर उन्हात चालत असेन तर सावलीत जाऊन थोडी विश्रांती घेतो. अशा तऱ्हेने कृती करून मी मला अनुकूल अशा स्थितीसमूहात राहण्याचा प्रयत्न करतो. ह्यालाच सक्रिय अनुमान (active inference) असे म्हणतात. सजीव प्राणी केवळ बाह्यस्थितीचे अनुमान करून थांबत नाही तर आपल्याला अनुकूल अशी स्थिती निर्माण करण्यात कार्यशील असतो. अशा रीतीने दर्शन आणि कृती ह्या दोन्ही गोष्टी संवेदनांच्या भाकीत त्रुटी कमी करण्यास मदत करतात. थोडक्यात दर्शन-कृती ही एक एकसंध प्रक्रिया असून ती प्राणिमात्राला त्याच्या जीवनाला अनुकूल अशा स्थितींमध्ये राहण्यास मदत करते.

ही सक्रिय अनुमानाची प्रक्रिया अमिबासारख्या एकपेशीय प्राण्यातसुद्धा कार्यरत असते. अमिबाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे अनुमान त्याच्या खाद्याबद्दल असते. समोरची गोष्ट खाद्य असेल का? याबद्दलची भाकिते अमिबा त्या पदार्थाने परावर्तित केलेल्या सूर्यप्रकाशाने केलेल्या संवेदना हालचाल करून वेगवेगळ्या दिशेने पडताळून पाहतो आणि खायचे की नाही ते ठरवतो. खाद्य खाणे ही कृतीसुद्धा अमिबाला अनुकूल असणाऱ्या स्थितींमध्ये राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निरीक्षणांची भाकिते आणि बाह्यजगातून येणाऱ्या संवेदना यातील त्रुटी कमी करण्याचाच एक भाग आहे. ह्या सिद्धांतानुसार प्रत्येक प्राणी हा आपले अस्तित्व सिद्ध करणारी एक प्रतिकृती (self-evidencing model) असते.

मग अमिबा आणि मानव यात फरक तो काय? दोघेही आपल्याला कुठल्या स्थिती अनुकूल आहेत याबद्दलच्या ज्या समजुती आहेत त्या दर्शनीय अनुमान (perceptual inference) आणि सक्रिय अनुमान (active inference) ह्या प्रक्रियांतून आपापल्या बाह्यस्थिती बद्दलच्या भाकीत-त्रुटी कमी करत आपले जीवन जगात असतात. हे जरी खरे असले तरीही मानव आणि अमिबा ह्या दोहोत ह्या दोन्ही प्रक्रिया कशा कार्यरत होतात त्यात फरक आहे.

मानवी मेंदूची रचना श्रेणीबद्ध असते. सर्वात तळातल्या श्रेणीवरील मज्जातंतू अगदी अल्प काळात बदलणाऱ्या संवेदनांबाबतची भाकिते पडताळत असतात. तर जससशे वरच्या श्रेणीत जावे तसतशा अधिक अमूर्त (abstract) आणि कमी वेगाने बदलणाऱ्या गोष्टींच्या बाबतच्या समजुती संचयित होतात. उदाहरणार्थ गरम कमी की अधिक ह्याचा पडताळा खालच्या श्रेणीतील मज्जातंतू तर सध्या उन्हाळा आहे की हिवाळा ह्याबद्दलचा पडताळा वरच्या श्रेणीत होतो. वरच्या श्रेणीतून खालच्या श्रेणीत भाकिते तर खालच्या श्रेणीतून वरच्या श्रेणीत भाकीत त्रुटी पाठवल्या जातात. प्रत्येक श्रेणीमध्ये त्रुटी आजमावून भाकितांचा दर्जा वरखाली सरकवला जातो. अमीबामध्ये अशी श्रेणीबद्ध रचना नसते. हा झाला अमिबा आणि मानव यांत दर्शनीय अनुमान कसे कार्यशील असते ह्यातील फरक.

सक्रिय अनुमानाच्या प्रक्रियेतही दोहोत फरक आहे. अमिबा आत्ता समोर खाद्य आहे का एवढेच बघतो. फार पलीकडचा विचार करत नाही. माणूस दूर भविष्याच्या योजना आखतो. आणि प्रत्येक योजनेतून आपण कुठल्या स्थितीतून स्थलांतरीत होऊ आणि त्या आपल्याला किती अनुकूल असतील याचे आराखडे बांधतो. आणि ह्या सगळ्या योजनांतील जी योजना सगळ्यात अनुकूल त्यानुसार कृती करतो. सध्या गरम होत असेल तर पंखा लावणे ही एक योजना झाली. वातानुकूलक घेणे ही झाली दुसरी योजना. मग आपण असाही विचार करू शकतो. कशाला हवेत शरीराचे चोचले? उद्या विजेच भाड परवडलं नाही तर? तेव्हा पंखा आहे तो बरा आहे. मानव आणि मानवसदृश प्राण्यांच्या सक्रिय अनुमानाच्या प्रक्रियेत भाकीत त्रुटींचे मूल्यमापन दूरवरच्या योजनांतून होते. काळाची खोली (temporal depth) हा अमिबा आणि मानव ह्यांच्या सक्रिय अनुमानाच्या प्रक्रियेमधील महत्त्वाचा फरक.

ह्या प्रक्रियेत ‘मी आहे’ ह्याची जाणीव सजीव प्राण्याला केव्हा होते? भविष्यातील योजनांचे मूल्यमापन करताना विविध प्रतिवादी बाह्यजगांची काल्पनिक निर्मिती होते. त्यात आपल्यासारखे इतरही प्राणी असतात जे कृती करत असतात. मग एखादे स्थित्यंतर माझ्या कृतीमुळे झाले की आणखी कशामुळे झाले हे दर्शवण्याची गरज भासते. आणि म्हणून ‘मी’ ही काल्पनिक संकल्पना प्रतिकृतीमध्ये तयार होते. मागील उदाहरणात पंखा चालू झाल्यास, तो कुणामुळे झाला? माझ्या कृतीमुळे आणि आणखी कुणामुळे? हे दर्शवण्यासाठी ‘मी’ ची निर्मिती होते. अशा रीतीने जाणीव (consciousness) ही एक अनुमानीय प्रक्रिया असून ‘स्व’ ची जाणीव (self-consciousness) ही काळाच्या खोलीमुळे निर्माण होते असे हा सिद्धांत मांडतो.

प्रा. फ्रीस्टन यांनी सक्रिय अनुमानाचे मर्म एका उदाहरणात सुंदरपणे मांडलेले आहे. ते म्हणतात, “एका अर्थी, ह्या कल्पना कितीही गर्भित असल्या तरीही त्या तुमच्या कल्पनासुद्धा आहेत, कारण हे शब्द वाचून तुमच्या कल्पनेचा पडताळा करण्याआधी तुम्ही काय वाचणार आहात ते तुम्हाला माहीत असले पाहिजे - हे सक्रिय अनुमानाचे आणि जगातील आश्चर्य कमी करण्यासाठी आपण माहितीचे (विदा ) नमुने कसे गोळा करतो ह्याचे मर्म आहे.”

संदर्भ:
https://en.wikipedia.org/wiki/Free_energy_principle
Karl Friston, “The mathematics of mind-time”, Aeon, May 18, 2017.
J. Allan Hobson and Karl Friston, “Consciousness, dreams and inference: The Cartesian theatre revisited”, Journal of Consciousness Studies, 21, No. 1-2, 2014, pp. 6-32.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

He may have found the key to the origins of life. So why have so few heard of him?
Hungarian biologist Tibor Gánti is an obscure figure. Now, more than a decade after his death, his ideas about how life began are finally coming to fruition.
सजीवाचे बेसिक केमोटॉन मॉडेल रोचक वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

केमोटॉन च्या संदर्भाबद्दल धन्यवाद. टिबोर आणि फ्रिस्टन ह्यांनी दोन भिन्न वाटा चोख्याळलेल्या दिसतात. केमोटॉन हा सर्व सजीवांची आई किंवा बाप असलेला स्वयंप्रवर्तक घटक आहे असे मांडलेले आहे. फ्रिस्टननी असा प्रश्न विचारला: मी जर समतोल नसलेल्या स्थिर स्थितीत (non-equilibrium steady-state) राहणारा जिवंत प्राणी असेन तर त्यावरून कुठले निष्कर्श काढता येतील?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. एक प्रश्न.

'अपेक्षित परिस्थितीपेक्षा वेगळेपणा किंवा त्रुटी शोधणं आणि त्या त्रुटी कमीतकमी करण्यासाठी कृती करणं' हे सजीवतेचं मुख्य लक्षण लेखात मांडलं आहे. माझा प्रश्न असा आहे, की नवजात अर्भकासाठी अपेक्षित जगाचं प्रारूप नसतं. मग सजीवता ही वयानुसार, अनुभवानुसार वाढते का? किंबहुना या मांडणीत सजीवता आहे/नाही स्वरूपाची डिजिटल असते की कमी/अधिक स्वरूपाची ऍनालॉग असते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अपेक्षित परिस्थितीपेक्षा

इथेच मुळात गूढ आहे ना.. "कोणा"ची अपेक्षा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गवि-जी, प्रश्न चांगला आहे. प्रत्येक सजीव प्राणी एक स्वयंनियोजीत संस्था असते जी सक्रिय अनुमानाच्या प्रक्रियेतून आपले सापेक्ष स्वातंत्र्य (conditional independence) राखत असते. परंतु ह्या संस्थेची नाळ बाहेरच्या जगापासून तुटलेली नसते. तेव्हा ही अपेक्षा सजीव प्राण्यात अंगीभूत असलेल्या सांख्यिकीय प्रतिकृतीतून निर्माण होते ज्यात बाह्यजगाचे अनुमान गर्भित असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घास्की, लेका प्रश्न काय विचारतोस? Statistical mechanics तू शिकलास की मी? पण प्रश्न चांगला आहे. आणि माझं ज्ञान तोकडं आहे. पण मला समजललेले ते असे: अर्भकाची पाटी कोरी नसते. पण त्यावर खूपकाही लिहिलेलेही नसते. सक्रिय अनुमानाची प्रक्रिया मात्र कार्यशील असते. गोष्टींना हात लावून, त्या तोंडात घालून, रडून अर्भक जगाची सांख्यिकीय प्रतिकृती अपडेट करत असतो. तेव्हा वयानुसार सजीवता वाढत जाते असे मला वाटत नाही. पण आपल्याला अनुरूप स्थितीत राहण्यासाठी काय योजना करता येतील याचे भाकीत करण्याची आणि त्या पार पाडण्याची क्षमता वाढत जाते असे वाटते. Check out:
Making Sense of the World: Infant Learning From a Predictive Processing Perspective by Koster et. al., 2020

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा प्रश्न तांत्रिक कमी आणि भाषिक जास्त आहे. सजीव आणि कॉन्शस या दोन संज्ञा तितक्या स्पष्टपणे वेगळ्या झालेल्या नाहीत. 'अन्न आहे की नाही' हे अमीबा काहीतरी विचार करून ठरवतो, आणि तसं कॉन्शसली ठरवण्याची क्षमता म्हणजे सजीवता अशी समजूत होण्याची शक्यता आहे.

तान्ह्या बाळाच्या शरीरातही अशा अनेक अनकॉन्शस यंत्रणा वेगवेगळ्या पातळीवर काम करत असतात. बाळाचा कॉन्शसनेस जवळपास शून्यापासून वयानुसार वाढत जात असला तरीही सजीवता व्याख्येत ते तान्हं शरीरही अनेक मानकांनर बसू शकेल असा अंदाज आहे.

'त्रुटी-निराकरण' हे ऍक्टिव्ह एंट्रॉपी मॅनेजमेंट या अर्थाने घेतो आहे. तसा घेतला तर फ्रिज आणि एअर कंडिशनर यांना काही प्रमाणात सजीवता आहे असं म्हणता येईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घासकी, फ्रिस्टन आणि मंडळी तुझ्याशी सहमत आहेत. सजीवता किंवा कॉन्शसनेस ह्या अस्पष्ट कल्पना असून सजीवता ही हळूहळू वाढत जाणारी गोष्ट आहे असे निदान ह्या सिध्दांतानुसार दिसते. त्यांच्याच २०२० मधल्या एका पेपरमधील वाक्य: there is only a gradual difference between some non-conscious and conscious
systems, and that consciousness is a vague concept. स्पष्टीकरणासाठी ते रेतीच्या ढिगाचे रूपक वापरतात. रेती कण पडत असताना त्याचा ढिग केव्हा होतो? (paper: Sentience and the origins of consciousness: From Cartesian duality to Markovian Monism by Friston, Wiese and Hobson, 2020).

"अमीबा काहीतरी विचार करून ठरवतो" हा भाषेतला ढोबळपणा झाला. फ्रिस्टन "जणुकाही" ची भाषा वापरतात. जसे - अमीबा ही स्वयंनियोजित संस्था अशी कृतीशील असते जणुकाही तो त्याच्या भाकितानुसार कृती करतो असे दिसते.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण नवीन फ्रिज, मोबाईल घेण्याचा विचार करू लागलो की अगोदरचे मत्सराने कुरकुर करू लागतात. कुठल्या एका कारच्या सिनेमात मालकाचे त्याच्या छोट्या मोटारीवर प्रेम असते. मग हा मोठी नवी मोटार घेण्याचा विचार करतो तेव्हा कुरकुर करते. मत्सर ,दुसरं काय. एकदा तर त्याच्या पायावर तेलाची शू करते.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यंत्रांना विनोदबुद्धीसुद्धा असते.

आपण मोटारीने रस्त्यातून सरळ चाललेले असतो. वाटेत दृष्टिपथात अथवा जवळपासच्या अंतरात कोठेही चौक नसतो, आडवा जाणारा रस्ता नसतो, डावीकडे किंवा उजवीकडे फुटणारी गल्ली नसते, अथवा वळणही नसते.

अचानक जीपीएसमधल्या बाईला हुक्की येते, नि ती (अस्तित्वात नसलेल्या) अमूकतमूक रस्त्यावर उजवीकडे वळावयास सांगते. केवळ आपली फिरकी घेण्यासाठी!

अशा वेळेस, 'वळत नाही, जा!' असे जीपीएसमधल्या बाईला ठणकावून सांगून सरळ जात राहाणे, हेच श्रेयस्कर असते. बाई आपोआप वळणावर (नि वठणीवर) येते, असा अनुभव आहे.

----------

(अवांतर: मी तितकासा टेक-सॅव्ही नाही, त्यामुळे, त्या ॲलेक्सा, सिरी वगैरेंच्या मागे मी लागत नाही. त्यांच्या मागे लागून फुकाचे पैसे खर्च करणे मला इष्ट वाटत नाही. परंतु तरीही, आयुष्यात एकदा कधीतरी केवळ खाज म्हणून, 'हे ॲलेक्सा, फ* यू!' (किंवा 'हे सिरी, गो फ* युअरसेल्फ!') म्हटल्यावर नेमके काय होते, ते पाहाण्यासाठी त्या ॲलेक्साला (किंवा सिरीला) घरात आणण्याची प्रबळ इच्छा होते अधूनमधून.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सजीवता किंवा कॉन्शसनेस ह्या अस्पष्ट कल्पना असून सजीवता ही हळूहळू वाढत जाणारी गोष्ट आहे असे निदान ह्या सिध्दांतानुसार दिसते.

आता किती आणि किती अंतरावर प्रभावी आहे हे मोजत असणार. सध्या दोन नानोमिटर अंतरावर अमुक तमुक '***' युनिट्स आहे हे नोंदवतील. काही शेकडो वर्षांनी पुढचे शोधक त्यावेळचे आताच्या नोंदींशी पडताळून "अरेच्चा कॉन्शन्नेस बराच वाढला की!!" सायंटिफिक आल वल्ड पेप्रात प्रसिद्ध करतील. नवाकाळ पेपरही हेडिंगमध्ये देतील. अर्थात तोपर्यंत प्रेम मोजण्याचे आइयू निघाले असतील.
आशावादी आहोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फ्रिस्टन यांचं उत्तर पटलं आणि आवडलं. सजीवता ही काळी-पांढरी संकल्पना नाही हे मला पूर्वी पासूनच जाणवलेलं आहेत. म्हणून तर उत्क्रांती यशस्वी होण्यासाठी कुठचीही उंच उडी मारावी लागत नाही. 'निर्जीवतेतून सजीवता कशी निर्माण झाली?' याचं उत्तर 'सजीवता वाढत गेली' असं देता येतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला काही हे तुम्हा लोकांचं कळत नाही.
पहिला सजीव म्हणजे बहुधा बॅक्टरीयमचा पूर्वज हा कुठल्या रासायनिक प्रक्रिया व वातावरण यातून निर्माण झाला असावा याचे ठोकताळे (कारण त्याचे प्रूफ नाही)ज्ञात आणि वेल डॉक्युमेंटेड आहेत.
पण ते असोत.
सजीव विषयक जैवशास्त्रिय माहित्या फारशा महत्वाच्या नसाव्यात म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे इष्टच नव्हे काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चक्क आक्रमक झाली हो. गेला बाजार कृष्णविवरं ग्यालक्सीना गिळत. आता ताजी बातमी ( आपल्याला दिसल्याने, अन्यथा कोट्यावधी प्रवर्षांपूर्वीची) की ग्यालक्सीने कृष्णविवर गिळले.

(असो, चालायचेच - पैचान कौन)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जन्माला आल्या-आल्या मूल रडतं ते आधीचं प्रारूप - आईच्या पोटातला काळोख, ऊब, अन्न-पाणी-हवा यांची सोय, वगैरे - मोडल्यामुळे असंही म्हणता येईल. लहानपणी गरीब असलेले लोक जरा सुखवस्तू झाल्यावर साध्या अडचणी आल्या तरी कटकट करतात. ज्यांची संभावना बरेचदा first world problems अशी होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रेडिओअक्टीवटी हाफलाइफ. आपण एवढे सगळे एका ठिकाणी आहोत तर एवढ्याच अणूंनी इतक्या वेळात फुटायचं/नासायचं . मग ते सजीव का? - एक डॉ. देशपांडे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चुकीचं उदाहरण.

(डॉ. साहित्य विषयातले डॉ असू शकतात.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ति. रा.
आपण बरोबर प्रश्न विचारला आहे. त्या बद्दल एक लेखच लिहिता येईल. तत्पूर्वी 'सजीव' हा शब्द कुठल्या इंग्लिश शब्दाचे भाषांतर आहे हे समजले पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ति. रा. कोण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिरसट राव!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माफ करा
मला चि. रा. म्हणायचे होते . टायपिंग चूक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सायंटीफिक अमेरिकन ह्या नियतकालिकात आलेल्या लेखाचा दुवा
https://www.scientificamerican.com/article/does-consciousness-pervade-th...
वाचनीय आहे. आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओके जाणिव आहे हे मानलं पाहिजे. आता ती कशी अणि किती हे मोजायचं आणि मग का? याचाही शोध घ्यायचा.
एक ना एक दिवस जाणिवा मोजता येतात हे विज्ञान मान्य करेल आणि त्यांच्या ढाबळीत जागा करून ठेवेल.

# ढाबळी हा शब्द ऐसीच्या कोशात आहे. तळघरात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डुप्लिकेट प्रश्न! काढून टाकला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डुुप्लीकेट प्रतिसाद ! काढून टाकला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भविष्यातील योजनांचे मूल्यमापन करताना विविध प्रतिवादी बाह्यजगांची काल्पनिक निर्मिती होते. त्यात आपल्यासारखे इतरही प्राणी असतात जे कृती करत असतात. मग एखादे स्थित्यंतर माझ्या कृतीमुळे झाले की आणखी कशामुळे झाले हे दर्शवण्याची गरज भासते. आणि म्हणून ‘मी’ ही काल्पनिक संकल्पना प्रतिकृतीमध्ये तयार होते. मागील उदाहरणात पंखा चालू झाल्यास, तो कुणामुळे झाला? माझ्या कृतीमुळे आणि आणखी कुणामुळे? हे दर्शवण्यासाठी ‘मी’ ची निर्मिती होते.

खूपच सुंदर!! गृहीतकापासून ते सिद्धांत मांडण्यापर्यंतच्या तार्किक पायऱ्या कळल्या.

‘स्व’ ची जाणीव (self-consciousness) ही काळाच्या खोलीमुळे निर्माण होते असे हा सिद्धांत मांडतो.

ज्या अर्थी, काळाची खोली (temporal depth) हा अमिबा आणि मानव ह्यांच्या सक्रिय अनुमानाच्या प्रक्रियेमधील महत्त्वाचा फरक आहे.
कारण- अमीबाला काळाची खोली नाही. त्यामुळे स्व ची जाणिव नाही.

अजुन एक, ज्या अर्थी फिटस म्हणजे, आईच्या गर्भातील भ्रूण हा एकटा असतो. मग तिथे अन्य सजीवाने केलेली कृती नसते, कारण सारे एकसंधच असते, झालेले स्थित्यंतर त्या भ्रुणाच्या कृतीमधुन झाले की आईच्या वा अन्य सजीवाच्या असा फरकच निर्माण झालेला नसतो, त्या अर्थी, भ्रूणामध्ये अजुन स्व ची जाणिव निर्माण झालेली नसते, असे म्हणता येइल का? इट इज जस्ट अ रोबोट. इट इज नॉट कॉन्शस येट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सामो-जी, "भ्रूणामध्ये अजुन स्व ची जाणिव निर्माण झालेली नसते" हे तुमचे बरोबर असावे असे वाटते. मात्र "इट इज जस्ट अ रोबोट. इट इज नॉट कॉन्शस येट." हे तितकेसे बरोबर वाटत नाही. भ्रूणामध्ये सक्रिय अनुमानाची प्रक्रिया कार्यशील असते. व फ्रिस्टन-मंडळी ह्या अनुमानीय प्रक्रियेलाच कॉन्शसनेस (जाणीव) म्हणतात.

तत्त्वज्ञानाच्या धृष्टीने हा सिध्दांत "द्विपैलू अद्वैत" (dual-aspect monism) ह्या गटात मोडतो. जड व चेतन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे ते सांगतात. मात्र सक्रिय अनुमानाची प्रक्रिया कार्यरत असलेला रोबो असू शकेल का? तर त्या दिशेने पावले उचलली जात आहेत. आरशात बघून "समोर दिसतो तो मी आहे का?" असे ओळखणारा सक्रिय अनुमाच्या तत्त्वावर आधारीत असणारा प्राथमिक रोबो तुम्ही ह्या युट्युब व्हिडियोवर बघू शकता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१)भ्रूण लाथा घालतो का?
२) आवडीचे खायला लावतो का?
३) का सर्व निष्काम कर्मयोगच असतो.
---------------
समजा सजीवाचे पाच निकष ( परामिटर्स?) ठरवले तर
अ) पाचही असले पाहिजेत?/
ब) त्यातला एक जरी असला तरी सजीव?/
क) त्यातला एक जरी नसला तर सजीव नाही?/
असं काही प्रमाणिकरण करावे लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पृथ्वी आणि चंद्र ह्यांच्यामधील गुरुत्वाकर्षणचा हिशोब आपण न्यूटनच्या नियमाप्रमाणे करू शकतो. कारण आपण मानव सर्वांत हुशार आहोत.
त्यासाठी आपल्याला पृथ्वी आणि चंद्र ह्यांचे वस्तुमान व त्यांच्यामधील अंतर माहित असावे लागते. पण पृथ्वी आणि चंद्र
हा हिशोब कसा करत असावेत? चला मानून चालूया कि त्यांना किमान स्वतःचे वस्तुमान माहित असायला पाहिजे. त्यांत विशेष असे काही नाही.
पण त्यांच्यामधील अंतर कोण मोजतो? कॅल्क्युलेशन कोण करते, ते सुध्दा एकदाही चूक न करता! विज्ञानाच्या सगळ्या नियमाचे हे असे गूढ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पृथ्वी आणि चंद्र हे सजीव आहेत.

QED.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न्यूटन करतो आणि त्यांना कानात 'कूऽक' करून सांगतो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रभुदेसाई-जी, न्युटनच्या नियमांना एक पर्यायी सूत्रीकरण सर हॅमिल्टन यांनी १८३३ ला प्रसिध्द केले. त्यानुसार पृथ्वी आणि चंद्र बहुआयामी घसरगुंडीवरून नुसते घसरत असतात. तिला हॅमिल्टोनियन असे म्हणतात. केवळ पृथ्वी आणि चंद्रच नव्हे तर इलेक्ट्रॉन, प्रोटॉनसारखे सूक्ष्म कण देखील अशाच स्वरूपाच्या पण वेगळ्या घसरगुंडीवरून घसरत असतात असे क्वांटम मेकॅनिक्स सांगते. ह्या तत्त्वाला कमीत कमी कृतीचे तत्त्व (principle of least action) असे म्हणतात. आणि फ्रिस्टन यांचे मुक्त उर्जेचे तत्त्व अशाच बहुआयामी घसरगुंडीवरच्या कमीत कमी कृतीचे एक वेगळे स्वरूप आहे. इथे ही घसरगुंडी माहिती भूमिती (information geometry) चे स्वरूप घेते. किंबहूना आळशीपणा हा सर्व जगाचा मूलधर्म आहे असे हे सांगते. (check: The lazy universe: An introduction to the principle of least action, by Jennifer Coopersmith, 2017)

फ्रिस्टन वापरतात त्या "जणुकाही"च्या भाषेचा उगम कमीत कमी कृतीच्या तत्त्वात आहे. असे वाटते की जणुकाही (It looks as if) चंद्र आपल्याला कुठे जायचे आहे ह्याचा विचार करून सर्वात तोकडी वाट शोधतो. दूरदर्शीपणा (teleology) हा कमीत कमी कृतीच्या तत्त्वाचा एक गुणधर्म आणि आभास आहे. सजीवासाठी "तोकडी वाट" कुठली? तर जी कमीत कमी आश्चर्यकारक असेल.

प्रश्नाबद्दल धन्यवाद! घासकी आणि भौतिकशास्त्रज्ञ मंडळी, चुका कृपया दुरूस्त करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या बालिश प्रश्नाला आपण सविस्तर उत्तर दिल्याबद्दल आभार.
स्पेस-टाईम वक्रता आणि वस्तूंचे त्यातून भ्रमण ह्याची थोडी कल्पना होती/आहे. पण माझा रोख थोडा निराळा होता'
१)टू स्लीट प्रयोगात प्रकाशकण किंवा इलेक्ट्रोन एकेक करून सोडले तरी पडद्यावर कुठे जायचे हे त्यांना बरोबर समजते.
अर्थात एक कण दोनी फटीतून प्रवास करतो असे उत्तर दिले जाते. किंवा वेव्ह पार्टिकल द्विभावाचा( कभी हा कभी ना) आधार घेऊन शंका निरसन केले जाते. पण जर का आपण कण कुठल्या फटीतून गेला हे पाहण्याचा उद्योग केला तर कणाला राग येऊन तो आपले स्वरूप झाकून टाकतो. हे काय कणाला जाणीव असण्याचे लक्षण आहे?
२) कणांची गुतागुंत(Entanglement) हा तर अजून भेदी प्रकार आहे. दस्तूर खुद्द आईनस्टाइन ह्याना हे मान्य नव्हते.(spooky action at the distance). गुंतागुंत झालेले दोन कण -( दोन ध्रुवावर दोघे आपण तू तिकडे अन मी इकडे ) एकमेकाशी क्षणार्धात संवाद साधतात हे कशाचे लक्षण? हा प्रकार भौतिकीच्या सगळ्या गृहितकांना चाट मारतो.
३) नाणे फेकीचे उदाहरण घ्या. खरं पाहता ही क्वांटम कथा नाहीये पण उदाहरणार्थ चालेल. छाप काटा ह्यांची शक्यता फिफ्टी फिफ्टी असते. पण प्रत्येक फेकीत छाप येणार कि काटा येणार हे कसे ठरते? नाणे जेव्हा हवेत भिरभिरत असते तेव्हा त्यात दोन्ही शक्यता अध्याहृत असतात. जेव्हा ते हिरवळीवर पडते आणि आपण त्याला बघतो (Observation) तेव्हा नाणे छाप/काटा दाखवते. हा निर्णय कसा घेतला जातो?
सरते शेवटी टेबल, खुर्ची, मी, चंद्र. सूर्य हे सगळे मूलतः ह्या कणांचे बनले असल्याने त्यांनाही जाणीवा असाव्यात काय?
माझा रोख हा होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. वर फेकलेला चेंडू थोडे अंतर वर जाऊन खाली येतो हे जसे न्युटनच्या नियमानुसार स्पष्ट करता येते तसेच ते हॅमिल्टोनिअनचे सुत्रिकरण वापरूनही स्पष्ट करता येते. तेव्हा हॅमिल्टोनिअनची बहुआयामी घसरगुंडी आणि स्पेस-टाईम वक्रता ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत.

२. मूलकणांना जाणीव असते का? हा प्रश्न सक्रिय अनुमानाचा सिध्दांत विचारात घेत नाही कारण हा सिध्दांत स्वयंनियोजित संस्था (technically: non-equilibrium steady-state systems with Markov blankets) एवढ्यापुरताच मर्यादित आहे असे मला वाटते. स्वयंनियोजित संस्था बहुसंख्य कणांनी बनलेल्या असतात आणि त्यांना सांख्यिकीय यांत्रिकी शास्त्र (statistical mechanics) लागू होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१) नाही पटलंं. माझे अज्ञान! The analogy compares the fabric of the universe to a stretched rubber sheet. Gravity is illustrated by placing a bowling ball and marbles on the rubber sheet. The bowling ball produces a
warp of the rubber, which results in an inward tug
that influences the movement of the marbles. It is
the warp of the rubber sheet that creates the gravitational tug.matter tells spacetime how to curve, and curved spacetime tells matter how to move
Anyway my query was about something else which I have already explained."बहुआयामी घसरगुंडी " ह्या शब्दप्रयोगामुळे मी बहकलो.
२) आणि हे नाही उमजलंं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिल्या बाबतीत तुमचा कार्यकारणभाव बरोबर आहे. मात्र हॅमिल्टोनियन तत्त्व केवळ स्पेस टाइम कर्व्हेचरमुळे होणाऱ्या गुरुत्वाकर्षणीय शक्तीसाठीच नाही, तर कुठल्याही बलांसाठी लागू पडतो.

दुसऱ्या प्रश्नाबाबत - या लेखात सजीवतेचं प्रमाण ही पहिली पायरी आहे, जाणीव, स्व-जाणीव या पुढच्या पायऱ्या आहेत. भौतिकीचे नियम पाळत काही संरचना अशा तयार होतात, ज्या 'जणुकाही' स्वयंनियंत्रण करतात. या सजीव म्हणण्याजोग्या प्राथमिक व्यवस्था. त्यातल्या काही अजून 'प्रगल्भ' होऊन स्व-जाणीव दर्शवतात. त्यामुळे सगळ्यांनाच स्व-जाणीव आहे का, हा प्रश्न विचारणं योग्य नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभारी आहे.
मला जे समजले ते असे, हॅॅमिल्टोनिअन विचारतो, "जोश कितना है?
"How much energy do you have?" त्यामुळे ते कुठल्याही गतिमान प्रणालीला लागू पडते. But I love concepts rather than mathematical contructs.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<<......आपण प्राणीमात्र आपल्याला अनुकूल अशा एका ठराविक स्थितीसमूहात स्थित्यंतर करत असतो. आणि अतिउष्ण, अतिथंड, अतिविरळ यासारख्या जगण्याला प्रतिकूल अशा स्थितीसमूहांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतो.
.......... अशा तऱ्हेने कृती करून मी मला अनुकूल अशा स्थितीसमूहात राहण्याचा प्रयत्न करतो. ह्यालाच सक्रिय अनुमान (active inference) असे म्हणतात. सजीव प्राणी केवळ बाह्यस्थितीचे अनुमान करून थांबत नाही तर आपल्याला अनुकूल अशी स्थिती निर्माण करण्यात कार्यशील असतो.>>
मी जेव्हढे लोक पाहिले ते परिस्थितीशी जमवून घेण्याचा प्रयत्न करतात. तस नसतं तर दिल्ली, अकोला, नागपूर. चुरू, जाकोबाबाद सारख्या ठिकाणी लोकवस्ती झालीच नसती.
काही उदाहरणे.
१)मी जेव्हा पीओके मधून निवृत्त होऊन पुण्याला स्थायिक झालो तेव्हा मला जमवून घेताना खूप त्रास झाला. इथे जगण्यासाठी तुम्हाला ३६० अंश बघता येईल अशी दृष्टी पाहिजे. रस्ता ओलांडताना कुठल्या बाजूने कुठले वाहन येऊन तुम्हाला धडक देईल ह्याचा नेम नाही. पीओकेमध्ये असं नव्हतं. माझ्यात उत्क्रांती होऊन अशी दृष्टी प्राप्त झाली आहे. सुरवातीला मला वाटे कि आपण "जगण्याला प्रतिकूल अशा स्थितीसमूहांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा" पण काही अनुभवांनंतर स्वतः परिस्थितीशी जमवून घेणे हा पर्याय चांगला वाटला.
२)माझा एक मित्र दिल्लीकर हा पुण्याला माझ्या घरी रहायला आला होतां. काही तासात त्याला अस्वस्थ वाटयला लागले. शेवटी मी त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी त्याला तपासले. मला एका बाजूला घेऊन त्यांनी मला सांगितले कि ह्या गड्याला पुण्याची हवा मानवत नाहीये. पुण्याच्या PM2.5 आणि PM10 level कमी असल्यामुळे तुमच्या मित्राला त्रास होतो आहे. तुम्ही ह्याच्या खोलीत कडबा जाळून धूर करा म्हणजे त्याला बर वाटेल, तो उपाय केल्यावर माझ्या मित्राला बरे वाटले.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी3
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी जेव्हा पीओके मधून निवृत्त होऊन पुण्याला स्थायिक झालो...

कोठे मुज़फ़्फ़राबादेच्या भारतीय वकिलातीत नोकरीला होतात काय?

तेथले सध्याचे हायकमिशनर जर पुढेमागे कधी भेटले, तर त्यांना माझा नमस्कार सांगा. (माझा बालमित्र. लंगोटीयार. भारी चंट सजीव!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कमाल आहे. एवढे माहित नाही.
बॉम्बे >.> मुंबई >>> पीओके
रानौत बाईंची कृपा !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे ठाऊक नव्हते. आत्ताच गूगलले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फिनिश आणि हंगेरियन भाषांचं मूळ एकच आहे, आणि एकेकाळी हे लोक एकाच समुदायातले होते, असं मानलं जातं. त्यावर फिनलंडच्या लोकांचं म्हणणं असं आहे की, हे बरोबरच आहे. आमच्यांतले यडे होते ते फिनलंडला गेले आणि त्यातल्यात्यात शहाणे लोक हंगेरीत राहिले.

मी फिनलंडला गेले होते फेब्रुवारीत (माझ्यातही वेडसरपणाची बरीच लक्षणं आहेत). त्यामुळे मला त्यांचं म्हणणं लगेच पटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख आवडला.
शाळेत झाडं सजीव असतात हे ऐकून चांगलाच धक्का बसलेला. तेव्हापासून सजीव म्हणलं कि पहिल्यांदा झाडाशी तुलना होते.

मागील उदाहरणात पंखा चालू झाल्यास, तो कुणामुळे झाला? माझ्या कृतीमुळे आणि आणखी कुणामुळे? हे दर्शवण्यासाठी ‘मी’ ची निर्मिती होते. अशा रीतीने जाणीव (consciousness) ही एक अनुमानीय प्रक्रिया असून ‘स्व’ ची जाणीव (self-consciousness) ही काळाच्या खोलीमुळे निर्माण होते असे हा सिद्धांत मांडतो.

झाडांना स्वतःला फार काही कृती करता येत नाहीत ना, आजूबाजूच्या गोष्टींना ? म्हणजे त्यांनाजनिव आणि स्व-ची जाणीव नसते का, सजीव असूनही ?

(त्या दोन गोष्टींमधला फरक नीट समजला नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या लेखात सजीवता आणि स्वजाणीव या दोन्ही संकल्पना एकत्र आल्यामुळे हा गोंधळ झाला आहे असं वाटतं. 'अपेक्षित परिस्थितीपेक्षा वेगळी परिस्थिती असेल तर त्रुटी मोजून ती कमी करण्याचा प्रयत्न करणारी यंत्रणा' यासाठी स्व-जाणीव असलेल्या मेंदूची गरज नसते.

उदाहरणार्थ, वाफेच्या इंजिनांमध्ये अशी व्यवस्था असते की विशिष्ट वेगापेक्षा कमी वेगाने इंजिन जात असेल (उदाहरणार्थ चढावर जाणारी ट्रेन) तर वाफ येणाऱ्या नळीची व्हॉल्व्ह जास्त उघडली जाऊन जास्त वाफ येते. अशा प्रकारच्या अनेक यंत्रणा झाडांमध्ये कार्यरत असतात.

झाडांना अर्थातच स्व जाणीव नसते. पण त्यांमध्ये असणाऱ्या अशा फीडबॅक यंत्रणांच्या समुच्चयामुळे ते सजीव असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झाडांना अर्थातच स्व जाणीव नसते. पण त्यांमध्ये असणाऱ्या अशा फीडबॅक यंत्रणांच्या समुच्चयामुळे ते सजीव असतं.

ही रचना जरा ढिसाळ वाटते. झाडांना स्व जाणीव नसते याची खात्री यात "जाणवते". का, तर बहुधा चिरफाड केल्यास "सेंट्रल नर्व्हस सिस्टीम" त्यात सापडत नाही..

आणि दोन्हीत स्व जाणीव नसूनही इंजिनात एखाद दोनच मोजक्या फीडबॅक यंत्रणा असल्याने ते निर्जीव आणि झाडात समुच्चय असल्याने ते मात्र सजीव..?

साड्डा कुत्ता 'कुत्ता', त्वाड्डा कुत्ता 'टॉमी' ?? अं?

... नेमक्या किती संख्येने "अशा फीडबॅक यंत्रणा" असल्या की स्व जाणीव नसूनही वस्तू सजीव म्हणण्यास क्वालिफाइड होते?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या मते तुम्ही सजीव की निर्जीव या प्रश्नाचं काळंपांढरं उत्तर मिळेल अशी अपेक्षा करत आहात. लेखकाने ही संकल्पना ऍनालॉग आहे असं स्पष्ट केलेलं आहे. ज्या सिस्टिम्समध्ये अशा सेल्फ करेक्टिंग सबसिस्टिम्स असतात त्यांना विशिष्ट प्रमाणात सजीव म्हणता येईल. कुत्ता ते टॉमी ही रेंज आहे.

मूळ लेखात पुनरुत्पादनाबद्दल काही भाष्य नाही. तेही सजीवपणाचं एक मुख्य अंग आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ लेखात पुनरुत्पादनाबद्दल काही भाष्य नाही. तेही सजीवपणाचं एक मुख्य अंग आहे.

खेचरे निर्जीव म्हणता येतील काय?

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्जुनाला पोपटाचा डोळा दिसत असे, तुम्हाला बैलाचा दिसतो!

मी या मुद्द्यावर पास घेऊन मूळ लेखकालाच 'तुम्ही पुनरुत्पादनाबद्दल का नाही बोललात?' 'आणि बोलणार असाल तर नबांच्या प्रश्नाचं द्या की उत्तर.' असं म्हणून डबल जेपर्डीत टाकणार आहे. त्यांनाच सिद्ध करू देत त्यांचं आयायटीयन मेट्टल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रजनन हे सजीव पणाचे महत्वाचे लक्षण आहे ह्यात वाद नाही. नाहीतर गाडं आपल्यापर्यंत आलेच नसते.
पण माझ्या मते उच्चतम सजीवतेचे लक्षण म्हणजे आपले स्वातंत्र्य. म्हणजे असे पहा कि कोंबडीला अंड न देण्याचे स्वातंत्र्य नसते.
किंवा पक्ष्याला घरटे न बांधण्याचे स्वातंत्र्य नाही. पण मानव स्वतःच्या स्थिती विषयी विचार करू शकतो, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो आणि त्याच्या परिणामांची जबाबदारी घेतो. मला वाटते हे सजीवतेचे व्यवच्छेदक लक्षण आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमीबाला विभाजन करून दोन होण्याचं स्वातंत्र्य नाही. म्हणून तो सजीव नाही का?

सजीवता ही खालची पायरी आहे, स्व-जाणीव व त्यातून येणारी स्वातंत्र्याची कल्पना ही वरची पायरी आहे. प्रत्येक चौरस हा आयत असतो, पण प्रत्येक आयत हा चौरस नसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटते श्री. प्रभुदेसाई यांचा हा प्रतिसाद हा बहुधा 'मैं भी मुँह में ज़बान रखता हूँ' अर्थात टंगिन्चीक स्वरूपाचा असावा. बहुधा प्रस्तुत लेखकाची फिरकी घेण्यासाठी दिला असावा. (चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे महाभारतातली यशोदासुद्धा निर्जीव?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शेक्सपिअर घ्या. (किंवा, हवे तर शिवाजीमहाराज घ्या.) आजमितीस त्याला/त्यांना कसलेही स्वातंत्र्य नाही, संवेदना नाहीत, काही नाही. एर्गो, आजमितीस ते सजीव नाहीत.

आता, 'मानव' या कॅटेगरीत आजतागायत पैदा झालेल्या एकंदर नगांची निव्वळ संख्या लक्षात घेता, शेक्सपिअर-टैप्स नगांच्या संख्येच्या तुलनेत, उदाहरणादाखल, राजेश घासकडवी-टैप्स नगांची (पक्षी, आजमितीस - किंवा, फॉर्दॅट्मॅटर, कोठल्याही दिलेल्या क्षणी - कमीअधिक प्रमाणात स्वातंत्र्य असणाऱ्या नगांची) संख्या नगण्य आहे. (उदाहरणाच्या सोयीकरिता, राजेश घासकडवी हे 'मानव' या कॅटेगरीत मोडतात, असे गृहीत धरलेले आहे. चूभूद्याघ्या.) याचा अर्थ, 'मानव' ही कॅटेगरी बाय-अँड-लार्ज निर्जीव आहे (सजीव नव्हे), असे मानता यावे काय?

==========

काहीसे आनुषंगिक:

१. 'सजीव' आणि 'जिवंत' यांत काही फरक आहे, किंवा कसे?
२. 'सजीवता' ही इंडिव्हिज्युअल ट्रेट आहे, की ग्रूप? (म्हणजे, इंडिव्हिज्युअल मानव हा सजीव किंवा निर्जीव असू शकतो, की मानव ही आख्खी कॅटेगरी सजीव किंवा निर्जीव असू शकते? (कोणत्याही एका दिलेल्या क्षणी त्या कॅटेगरीतले बहुतांश नग हे (सजीवतेच्या कोणत्याही व्याख्येनुसार) सजीवतेची कोणतीही लक्षणे दर्शवीत नसले, तरीही?))
३. सजीवता ही तात्कालिक स्थिती आहे, की (सजीवतेच्या दिलेल्या व्याख्येनुसार) तशी तात्कालिक स्थिती कधी ना कधी पावण्याची केवळ शक्यता? (म्हणजे, एखादा नमुना हा (इंडिव्हिज्युअल पातळीवर) स्टिलबॉर्न असू शकेलही, किंवा - वादाच्या सोयीकरिता - कन्सीव होतानाच गचकू शकेलही. (स्पर्म हा सजीव कॅटेगरीत मोडतो किंवा कसे, या वादात तूर्तास पडत नाही.) इन विच केस, त्या नमुन्याने सजीवतेची तात्कालिक स्थिती कधीच पावली नाही. परंतु, अशा कोणत्याही इंडिव्हिज्युअल नमुन्याने सजीवतेची तात्कालिक स्थिती पावण्याची निव्वळ शक्यता होती, म्हणून तो नमुना ज्या ग्रूपचा आहे, त्या आख्ख्या ग्रूपला सजीव कॅटेगरीत ढकलायचे काय?)
४. सजीवतेची नकारात्मक व्याख्या केली तर? म्हणजे, ज्याच्या (भूतकालीन, वर्तमानकालीन, अथवा भविष्यकालीन) मृत्यूची कल्पना करता येऊ शकते, तो सजीव (जो मरू शकतो, तो सजीव), असे काहीतरी? (पैकी एखादा नग - किंवा, फॉर्दॅट्मॅटर, तमाम नग - हा/हे - फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट - अमर असू शकेल/शकतील, ही शक्यता येथे प्रिक्लूड केलेली नाही. कोणीही मरणे यात आवश्यक नाही, केवळ मरणाची तात्त्विक शक्यता कल्पिता आली पाहिजे.) म्हणजे, मानव (सॉक्रेटिस इन्क्लूडेड) मर्त्य आहे, सबब तो सजीव. खुर्ची 'मरू' (किंवा 'मारली जाऊ') शकत नाही ('मारली जाणे' हे मृत्यूच्या अर्थी), म्हणून ती निर्जीव. (मात्र, खुर्ची ज्या लाकडातून बनली, ते लाकूड ज्या झाडातून (वा झाडसमुच्चयातून) आले, ते झाड वा तो झाडसमुच्चय हे 'मरू' वा 'मारले जाऊ' शकतात, सबब ते सजीव. असे काहीसे?
५. इन विच केस, मरण म्हणजे नक्की काय? (मरणाची व्याख्या कशी होऊ शकेल?)
६. काय, आम्हीसुद्धा हवेतून शब्द/संकल्पनांचे जाळे विणू शकतो की नाही? दिडकीची भांग अथवा गांजा न घेतासुदधा? आयआयटियन नसूनही?
७. 'सजीव' आणि 'निर्जीव' असे कॅटेगरायझेशन नक्की का करायचे? त्यामागचे नेमके उद्दिष्ट काय? असे कॅटेगरायझेशन करून केलेला काही अनालिसिस कशाकरिता तरी उपयुक्त आहे म्हणून? की उगीच आपला वेळ जात नाही, नि आजूबाजूससुद्धा (आमच्यासारखी) निरुद्योगी, वेला-टैप्स जन्ता आहे, म्हणून? ठोस असे काही उद्दिष्ट असेल, तर त्याकरिता उपयुक्त ठरेल अशी काय वाटेल ती व्याख्या करावी. अन्यथा, शब्दांचे बुडबुडे काय, आम्हीही काढू शकतो.

बाकी चालू द्या.

-----------

तळटीपा:

हा प्रतिसाद टंकून झाल्यानंतर मी एक दणकट ब्रँडी चढविली. तोवर नाही.१अ

१अ या तळटीपा लिहिण्याकरिता ब्रँडी चढविल्यानंतर परत आलो. नसत्या शंका तुम्हाला! म्हणून हे (देणे लागत नसूनसुद्धा) स्पष्टीकरण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेही नंतर निर्जिव?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्या पोलर वोर्टेक्सचे (भोवरा?) विभाजन होते आहे अशी बातमी आहे. नदीतल्या भोवर्याचे जेव्हा विभाजन होते आणि दोन भोवरे होतात तेव्हा ते एका स्वयंनियोजित संस्थेच्या विभाजनाचे उदाहरण नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सक्रिय अनुमानाच्या सिध्दांतानुसार स्व ची जाणीव ही अनुमानीय प्रक्रिया किती पलिकडचा विचार करते ह्यावर अवलंबून असते. त्याला 'जर-तर' चा विचार असेही म्हणता येईल. स. अ. मंडळी ह्याला counterfactual richness असेही म्हणतात. झाडांकडे अशा प्रकारचा जर-तरचा विचार नसावा असे वाटते. पण कुणास ठाउक काय खरे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मानवातील प्रत्येक पेशी सजीव असते पण तिला मी पणा नसतो, अगदी मेंदुतलीही. मग या संपूर्ण पेशीसमुहालाच मी पणा कसा येतो?
हवेतील प्राणवायुमुळे लोखंड गंजते. त्या गंजाचाच एक संरक्षक थर त्यावर बसतो आणि आतील भागाचे गंजणे थांबते. हा लोखंडातील अणुंनी भोवतालच्या परिस्थितीचे भाकित करुन केलेली आत्मसंरक्षक कृती ठरेल का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Very interesting question! Let us wait for THE answer.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संरक्षक थरामुळे थांबते?
आपणास अगंज पोलाद- stainless steel (18:8 :: क्रोम: Moly) अभिप्रेत आहे का ज्यात cromium आॅक्साईडच्या थरामुळे गंजक्रिया मंदावते पण crevice corrosion होऊ शकणार्‍या जागी ती चालूच राहते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साधेच लोखंड. उघड्यावर पडलेली एखादी शीग पहा. पूर्ण गंजलेली असते. पण घासून आंत पाहिले तर तो भाग गंजलेला नसतो. वरच्या थरामुळे आंत ऑक्सिजन पोचू शकत नाही. हां, आता वरच्या गंजाचे पोपडे पडले तर पुन्हा ऑक्सिडेशन चालू होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उस्फुर्त्पणे नवीन रचना आणि कार्यपध्दती याची उत्पत्ती होणे हा स्वयंनियोजित संस्थांचा मूलधर्म आहे. फ्रिस्टन असं म्हणतात की मीपण हा उस्फुर्तपणे तयार झालेला एक सांख्यिकीय गुणधर्म आहे,जसे तापमान आणि दाब. (Original sentence from the paper: self-consciousness is an emergent statistical property just like temperature and pressure. source: Hobson and Friston, "Consciousness, dreams and inference: The Cartesian theatre revisited," Journal of consciousness studies, 2014.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहीत नाही, पण तसे असेल असे वाटत नाही. इथे नियमनाची प्रक्रिया (regulation) कार्यरत आहे का? आपल्याला थंडी वाजते तेव्हा आपण स्वेटर घालतो आणि गरम झाले की काढून टाकतो. इथे बाह्यजगातील कार्यकारण भाव गर्भित करणारी सांख्यिकीय प्रतिकृती तयार होते असे वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला फारसं समजलं नाही.
पण ह्या बौद्धिक कोलांट्या आवडल्या (तिरकसपणे नाही, खरंच म्हणतो आहे).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0