आई-बाबांच्या आठवणी (भाग ३)

आई-बाबांच्या आठवणी

बालमोहन लिमये

(भाग एकदोन)

भाग ३

रॉचेस्टरमधील माझे दुसरे वर्ष संपत आल्यावर, पीएच्. डी.च्या पात्रतेची परीक्षा देण्यापूर्वी सुट्टीत थोडे दिवस भारतात येऊन जायचे माझ्या मनात आले. हा बेत बाबांना खूप आवडला. मी तिकडे आल्याने ‘आर्द्रपृष्ठ’ म्हणजे ताजातवाना होईन असे ते म्हणाले. त्यासाठी विमानाने प्रवास करू देण्यास प्रथम ते तयार झाले, पण नंतर ‘गेल्या काही महिन्यातील विमानांचे अपघात लक्षात घेता येता-जाता बोटीनेच प्रवास करणे इष्ट, अन्यथा तू सुटीत तेथेच राहून अभ्यास करावास’ असे त्यांनी निक्षून सांगितले. आईचेसुद्धा असेच मत पडले, ‘तू इकडे येवून जावेस असेच आम्हाला वाटते, पण धोका पत्करणे का मायेच्या जाळ्यात न सापडणे यापैकी दुसराच मार्ग ग्राह्य आहे’. शेवटी मी एक प्रयोग करून बघायचे ठरवले. त्या काळी भारतातल्याच एका गावाहून दुसऱ्या गावाला टेलिफोन करणे (ज्याला ‘ट्रंक कॉल’ असे म्हणत) दुरापास्त होते. मग परदेशातून, तोही अमेरिकेहून, फोन येण्याचे किती अप्रूप असेल याची कल्पनाच केलेली बरी. मी सरळ आमच्या घरी फोन लावला आणि म्हटले ‘वेळेच्या आणि दगदगीच्या दृष्टीने मला बोटीने येऊन जाणे जमणार नाही. तुम्ही सर्व गोष्टींचा विचार केला असल्याने मला कोणताच युक्तिवाद करायचा नाहीये. मला वाटते थोडासा धीर करायला हवा, नाहीतर कुठलेच पाऊल पुढे पडणार नाही. अगदीच काही कावळा बसून फांदी तुटणार नाही. माझ्या मनात कुठलीही शंका नाहीये. तरी भारतात कसे येऊन जायचे हा निर्णय माझ्यावर सोपवाल का?’ आंतरराष्ट्रीय फोनचे पैसे मिनिटागणिक सरासर वाढत असल्याने आई-बाबांना फार संभाषण करायची संधिच मिळाली नाही. त्यांनी माझ्या म्हणण्याला होकार दर्शविला, आणि पुढील आठवड्याच्या पत्रात विमानप्रवासाला ‘हार्दिक संमति’ दिली.

पुण्याला आई-बाबांच्या बरोबर महिनाभर राहून, शाळा-कॉलेजातल्या मित्रांचा पाहुणचार घेऊन मी रॉचेस्टरला परतलो. नंतरच्या पत्रात आईने लिहिले होते, ‘मुंबई विमानतळाहून विमान सुटताना आपल्या अंतःकरणाचा एक लचका तुटून आकाशात जात आहे असे वाटले व त्याच क्षणी ‘परमेश्वरा, या विमानातील सर्व प्रवाशांना निर्विघ्नपणे आपल्या जागोजागी पोचते कर’ अशी प्रार्थना होऊन गेली.’ दोन वर्षांनी मी गणितातल्या पीएच्. डी.चा प्रबंध पुरा केला. तो नक्की कधी पुरा होईल हे आधीच ठरवणे शक्य नसल्याने आणि तो पुरा झाल्यावर काही अध्यापन-संशोधनाचा अनुभव मिळावा म्हणून मी अर्व्हाइन येथील कॅलिफोर्निया विश्वविद्यालयाकडे अर्ज केला होता. तेथे मी एक वर्ष शिकवले. माझा हा निर्णय आई-बाबांनी मानला, जरी त्यांची मी लगोलग भारतात परतावे अशी प्रबळ इच्छा होती तरीही. मीसुद्धा आई-बाबांना सोडून अमेरिकेत स्थायिक व्हायचा विचारही केला नाही. अमेरिका सोडल्याची आज मला मुळीच खंत वाटत नाही. मात्र जर कुणी होतकरू तरुणाने सल्ला विचारला, तर अमेरिकेतली नोकरी सोडून फक्त आई-वडिलांकरता परतू नको, परतण्यात मनापासून समाधान असेल तरच परत ये असे मी सांगेन.

भारतात परतल्यावर मुंबईतील 'टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च'च्या गणित विभागात मी काम करू लागलो. तिथेच गणितात पीएच्. डी. करणाऱ्या निर्मला आगाशेचा आणि माझा परिचय झाला. तो वृद्धिंगत होऊन आम्ही विवाह करायचे ठरवले. पुण्याला जाऊन मी हे जेव्हा आई-बाबांना सांगितले, तेव्हा ते या बाबतीत उदासीन दिसले. कदाचित् मी त्यांची अनुमति न घेता हा निर्णय घेतला हे त्यांना रुचले नसेल. पण आई-बाबांनी ज्या प्रकारे स्वतःला पटणारे निर्णय स्वतः घेतले, तसेच करायचे मी ठरवले. बाबांनीच मला शिकवले होते ना, ‘मनःपूतं समाचरेत्’ म्हणजे अंतर्मनाने पवित्र झालेलेच आचरण करावे. आमचा विवाह डिसेंबर १९७० मध्ये निर्मलाच्या दादर येथील हिंदु कॉलनीतील घरात रजिस्टर्ड पद्धतीने झाला. आई, बाबा, माझी बहीण मीरा आणि आमच्या आधीच्या पिढीतल्या मोजक्या व्यक्तीच उपस्थित होत्या. बाहेरून आलेल्या मंडळींना निर्मलाच्या आईनेच जेवायला वाढले. अशा रीतीने नोंदणीसाठी लागणाऱ्या खर्चातच आमचे लग्न पार पडले. त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही दोघे आई-बाबांबरोबर पुण्याला काही दिवस राहण्यासाठी रवाना झालो. नंतर पुण्यातल्या काही आप्तपरिचित मंडळींना जेवायला बोलावले होते. त्यावेळी माझ्या आग्रहावरून सगळ्यांना गोदावरी परुळेकर यांनी लिहिलेल्या 'जेव्हा माणूस जागा होतो' या पुस्तकाची एकेक प्रत दिली होती. मौज प्रकाशनाने हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध केले होते. मौजेचे संपादक श्री. पु. भागवत हे निर्मलाचे मामा. त्यांना ही गोष्ट खूप आवडली. पुढे मी व निर्मला प्रथम दर पंधरा दिवसांनी आणि नंतर महिन्यातून एकदा आई-बाबांना भेटायला, त्यांच्याजवळ राहायला रेल्वेने पुण्याला जात असू.

Mother 1970

आई, १९७०

मी पाच वर्षे अमेरिकेत असताना मीराने बी. ए. एम्. एस्. हा आयुर्वेदिक वैद्यशास्त्राचा कोर्स पुरा करत आणला होता आणि ती डॉक्टर होऊ घातली होती. त्याआधी एकदोन वर्षे आईची प्रकृति इतकी बिघडली होती की दवाखाना बंद करावा की काय असे तिला वाटून गेले. पण तिने जिद्दीने आपला दवाखाना चालू ठेवला. हेतु हा की आपण चालता दवाखाना मीराच्या स्वाधीन करावा. माझ्या लग्नानंतर एक-दोन महिन्यात मीराचे माझ्या एका वर्गमित्राबरोबर लग्न ठरले. हा विवाह खूप थाटामाटाने करायचे आई-बाबांनी योजले. कदाचित् माझ्या साधेपणाने झालेल्या लग्नाची ही भरपाई असावी. त्याच्या आठवडाभर आधी आईचे डोके अतिशय दुखू लागले. दोन्ही कानशिलाजवळ जोरजोराने कुणीतरी सतत ठोके मारत आहे असे तिला वाटत होते. कानाच्या वरच्या शिरेत इंजेक्शनही देऊन झाले. पण काही उपयोग होईना. आई मीराच्या लग्नप्रसंगी उभी तरी राहील की नाही अशी परिस्थिति निर्माण झाली. शेवटी आईला परिचित असणाऱ्या नाना मराठे या होमिओपाथिक डॉक्टरांना पाचारण केले. त्यांनी आईला फक्त एका पांढऱ्या गोळ्यांच्या छोट्या बाटलीतले औषध हुंगायला सांगितले. काही मिनिटात आईच्या कानावरचे ठोके कमी जोराचे झाले आणि दोन ठोक्यांमधील अंतर वाढले. आणखी एकदा ते औषध हुंगल्यावर थोड्याच वेळात डोके दुखायचे पूर्णपणे थांबले. हा चमत्कार आम्ही सगळे आईच्या भोवती कडे करून बघत होतो. योजल्याप्रमाणे विवाहसमारंभ पार पडला. मी आणि निर्मला दोघांनी त्यात उत्साहाने भाग घेतला. आईच्या दवाखान्यात बाळंत झालेल्या सर्व स्त्रियांना बोलावले होते. प्रत्येकीला ओळीने एकेक नारळ द्यायचे काम निर्मलाकडे आले होते. विवाह झाल्यावर प्रथम मीरा आणि काही कालांतराने तिचा नवराही आईच्या घरी राहू लागले.

यानंतरच्या काळात आईच्या स्वभावाची मला आधी न जाणवलेली एक बाजू दर्शनाला आली. जरी मी आणि माझी पत्नी निर्मला दर महिन्यात एका शनिवार-रविवारी पुण्याच्या घरी जात असू तरी आम्ही तिथे राहणारे, तिथल्या घरचे नव्हतो. आईला तिची प्रॅक्टिस मीराच्या हाती सुपूर्द करायची तळमळ होतीच, पण त्याहून अधिक आपल्याला मिळणारा सामाजिक व कौटुंबिक मान, आपली डॉक्टर म्हणून असलेली ख्याती आणि प्रतिष्ठा मीराला मिळावी यासाठी ती झटत होती. उलटपक्षी आईने निर्मलाच्या अंगभूत गुणांकडे पुरी डोळेझाक केली. एकीकडे दोन मुली होत असताना निर्मलाने पीएच्. डी.चा अभ्यासक्रम संपवला, तिचा प्रबंध मान्य झाला आणि नंतर ती मुंबई विद्यापीठाच्या गणित विभागात प्राध्यापक झाली. तिच्या ह्या प्रवासांत आईने तिला प्रोत्साहन देणे, कौतुक करणे तर दूरच राहिले पण त्या ऐवजी अनेक वेळा ‘तुला गणितात संशोधन करायची आणि नोकरीची काय जरूर आहे? त्यापेक्षा कुटुंबाकडे जास्त लक्ष दिलेस तर बरे. तुम्हाला दोन मुलीच आहेत. तिसऱ्यांदा मुलगा होईल का ते बघा’ असे आईचे उद्गार निर्मलाला ऐकावे लागले. पुण्याहून मुंबईला परतताना निर्मलाच्या डोळ्यातले अश्रू फार बोलके असत. माणसाचा दृष्टिकोन काळ, वेळ आणि समोरची व्यक्ति यानुसार कसा बदलू शकतो याचे हे ठळक उदाहरण होते. मी लहानपणापासून आई-वेडा होतो. एकदा मला उद्देशून आई म्हणाली होती ‘येडे पोर आहे हे’. या पार्श्वभूमीवर निर्मलाला पुण्याच्या घरी जी वागणूक मिळत होती तिचे गांभीर्य उमजायला मला खूपच वेळ लागला, आणि ते समजल्यावर त्याचा अतोनात त्रास होत राहिला. या गोष्टी निर्मलाने तिच्या आईलाही बरेच वर्षे सांगितल्या नाहीत. निर्मलाकडून जेव्हा ही परिस्थिति श्री. पु. भागवतांना, म्हणजे निर्मलाच्या मामांना, कळली तेव्हा ते इतकेच म्हणाले ‘तुझ्या सासूबाई सामाजिक जीवनात असामान्य असल्या तरी तुझ्याबरोबर त्या सामान्य सासूसारख्याच वागत आहेत असा विचार केलास तर तुझ्या यातना कमी होऊ शकतील’. निर्मलाला पुण्याच्या घरी मोकळेपणा वाटत नाही ही गोष्ट बाबांच्या लक्षात आली असणार, कारण त्यांनी तसे एकदा बोलून दाखवले होते. पण ते जास्त खोलात शिरले नाहीत. निर्मलाला वाचनाची खूप आवड आहे याचे बाबांना कौतुक होते. त्यांनी आपली ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी तिला बक्षीसही दिली होती. निर्मलाने ती जपून ठेवली आहे.

१९७५ मध्ये माझी पवई येथील आय्. आय्. टी.च्या गणित विभागात नियुक्ति झाली. त्या काळात मला कुणी तरी वेदिक मॅथेमॅटिक्स् हे जगद्गुरुस्वामी भारती कृष्णतीर्थ (जगन्नाथपुरीच्या गोवर्धन मठाचे शंकराचार्य) यांचे पुस्तक दाखवले आणि माझा अभिप्राय मागितला. या पुस्तकाच्या सुरुवातीला सोळा वैदिक सूत्रे दिली आहेत आणि या सूत्रांपासून सगळ्या आधुनिक गणिताचा पाठपुरावा करता येतो असे म्हटले आहे. सर्व आधुनिक शास्त्रांचा उगम वेदांमध्ये आहे असे विचार तेव्हा बळावत होते आणि आजही तेच चालू आहे. याचा उपयोग काही राजकीय पक्ष आपल्या फायद्यासाठी करत आले आहेत. बाबा वैदिक वाङ्मयाचे अभ्यासक असल्याने मी त्यांना ही सोळा सूत्रे नेमकी कुठे आढळतात असे विचारले. त्यांना ती सगळीच सूत्रे अनोळखी वाटली. पण ते म्हणाले की या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गणित समजायला नको, किंवा वैदिक वाङ्मयापैकी एकही मूळ ग्रंथ जवळ असण्याची जरूरी नाही. मी आश्चर्याने त्यांच्याकडे बघत राहिलो. त्यांनी त्यांच्या फिरत्या लाकडी शेल्फमधील वैदिकपदानुक्रमकोष ह्या पुस्तकाकडे बोट दाखवले. या कोशामध्ये वैदिक साहित्यातला प्रत्येक शब्द जिथे आला आहे ती सर्व स्थळे नमूद केली आहेत. वेदिक मॅथेमॅटिक्स् या पुस्तकातले पहिले सूत्र होते ‘एकाधिकेन पूर्णेन’. बाबांनी मला त्या कोशात बघून ‘एकाधिकेन’ हा शब्द वैदिक वाङ्मयात जिथे जिथे आला आहे ती स्थळे टिपून ठेवायला सांगितले. नंतर तसेच ‘पूर्णेन’ या शब्दाबद्दल करायला लावले, आणि म्हणाले ‘एकाधिकेन पूर्णेन’ हे सूत्र जर वैदिक वाङ्मयात कुठे ना कुठे आढळत असेल तर तू केलेल्या दोन याद्यांमध्ये एकतरी स्थळ सामायिक असले पाहिजे. तूच बघ तसे आहे का.’ त्या दोन याद्यांतील स्थळे पूर्णत: वेगवेगळी होती. बाबा म्हणाले ‘याचा अर्थ हे पहिले सूत्र वैदिक वाङ्मयात असूच शकत नाही.’ या पद्धतीने ज्या ज्या सूत्रांत किमान दोन तरी शब्द होते ती सर्व सूत्रे आम्ही तपासली. एकही सूत्र वैदिक वाङ्मयातले निघाले नाही. माझ्या प्रश्नाचे उत्तर तर मला मिळालेच, पण बाबांची तर्कशुद्ध विचारसरणी पुन्हा एकदा तीव्रतेने लक्षात आली. शेवटी बाबा म्हणाले ‘कुठल्याही गोष्टीवर ‘वैदिक’ असा शिक्का मारून तिची किंमत वाढवण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही.’

तर्कशुद्धतेप्रमाणेच बाबांचा आणखी दोन प्रकारच्या शुद्धतेवर कटाक्ष होता. आपण जे लिहितो ते व्याकरणदृष्ट्या शुद्ध आणि अर्थदृष्ट्या योग्यच असले पाहिजे असा. स्वतः एकटाकी कागदांचे तावचे ताव बिनचूक लिहिण्यात त्यांचा हातखंडा होताच, पण काही वाचताना एखादा शब्द व्याकरणांत न बसणारा किंवा चुकीच्या अर्थाचा वाटला तर त्यांना फार खटकत असे. तो तिथल्या तिथे दुरुस्त केल्याशिवाय ते पुढे जाऊच शकत नसत. बाबांच्या या ‘शुद्धीकरणा’चे अगदी टोकाचे उदाहरण एकदा माझ्या लक्षात आले. आमच्या घरी दररोज पुण्याचा 'दैनिक सकाळ' आणि मुंबईचा 'टाइम्स ऑफ इंडिया' येत असे. आई 'सकाळ' वाचायची आणि बाबा 'टाइम्स’. बाकी कोणी तिकडे बघतही नसे. टाइम्स वाचताना बाबांना जर एखादा शब्द किंवा वाक्यप्रचार अयोग्य वाटला तर ते तात्काळ तांबड्या पेन्सिलीने सुधारणा करत. मगच उरलेला पेपर वाचत. वाचून झाला की तो रद्दीच्या चळतीवर ठेवून देत. हे बघून मी बाबांना म्हटले ‘तुमच्यानंतर तो पेपर तर कोणीच वाचणार नाही. मग एखादी चूक त्यात राहून गेली तर काय बिघडले?’ बाबा शांतपणे उद्गारले, ‘मला कुठेही चूक दिसली की दुरुस्त केल्याशिवाय राहवत नाही.’

बाबांची स्वत:ची अशी मोठी ग्रंथसंपदा होती. खरे म्हणजे तीच त्यांची खरी संपत्ती होती. त्यापैकी खूपशा पुस्तकांच्या पानांवर बाबांचे काहीना काही लिखाण असे. त्यात काही सुधारणा असत, काही भाष्य असे, काही इतर ग्रंथात तशाच अर्थाचे आढळणारे उल्लेख असत. कधी कधी मूळच्या मजकूरापेक्षा बाबांनी घातलेली भरच जास्त नजरेस येई. बाबांकडच्या संस्कृतमधील समानार्थी शब्द देणाऱ्या अमरकोशातील दोन पाने अशी दिसायची :

Vi Pra Limaye Amarkosh

अशा टिप्पण्यांची किंमत जाणकारालाच समजू शकते. कृ. पां. कुलकर्णी यांनी ‘मराठी व्युत्पत्तिकोश’ हा ग्रंथ लिहिला आहे. त्यात मराठी भाषेतील प्रत्येक शब्द कसा बनला, त्याचे मूळ रूप संस्कृत, उर्दू किंवा इतर कुठल्या भाषेत सापडू शकते याचे संदर्भ दिले आहेत. बऱ्याच काळानंतर त्यांना ह्या ग्रंथाची दुसरी आवृत्ति काढायची होती. तेव्हा ते बाबांच्याकडे आले व आपल्याच ग्रंथाची बाबांच्याकडे असलेली प्रत घेऊन गेले, कारण सुधारून वाढवलेली आवृत्ति काढण्यासाठी बाबांनी चितारलेली पाने कुलकर्ण्यांना अमूल्य वाटली. पुण्यातील बऱ्याच संस्थांच्या ग्रंथालयातील पुस्तकांवरही अशुद्धाचे शुद्ध करून दाखवताना बाबा कचरत नसत.

बेकायदेशीर ठरवल्यामुळे टिळक महाविद्यालय बंद पडले असले तरी १९२१ सालीच स्थापलेली ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठ’ ही संस्था अखंडितपणे कार्यरत होती. बाबा तिच्या नियामक आणि कार्यकारी मंडळाचे सभासद होते. संस्कृतप्रेमी लोकांनी १९२८ मध्ये ‘वैदिक संशोधन मंडळ’ स्थापले होते. त्यात बाबांचा पुढाकार होता. या मंडळाचे ते काही वर्षे उपाध्यक्षही होते. १९७०च्या सुमारास एक छोटी पण अनपेक्षित घटना घडली. या संस्थेच्या संग्रहातील एक व्याकरणाचे हस्तलिखित एका अमेरिकन अभ्यासकाला पहावयास हवे होते. त्यावेळचे संस्थाचालक सनातनी वृत्तीचे होते. हस्तलिखित वापरण्याकरता आणि त्याची नक्कल करून घेण्याकरता त्यांनी संस्थेसाठी मोठी देणगी मागितली. बाबांच्या दृष्टीने ज्ञानाच्या क्षेत्रांत भारतीय-अभारतीय असा भेदभाव करणे अथवा किंमत वसूल करणे योग्य नव्हते. अमेरिकन संशोधकाची बाजू बाबांनी जोरदारपणे मांडली. पण प्रश्न डॉलर्सचा होता. बाबांना तत्त्वाशी समझोता माहीत नव्हता आणि ते खूप नाराज झाले. याच सुमारास टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कारभारात क्षुल्लक कारणांवरून तंटे होऊ लागले, दोन गटात वादंग माजले, वर्तमानपत्रांतून आरोप-प्रत्यारोप झाले. या सगळ्याचा वीट येऊन आणि ज्ञानप्रसाराचे मूळ कार्य बाजूलाच पडले आहे हे बघून बाबांनी दोन्ही संस्थांच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला, आणि आपणच उभारलेल्या संस्थांतून ते कायमचे बाहेर पडले, पुन्हा कधीही पाऊल ठेवणार नाही असे बजावून. १९८२ मध्ये झालेल्या टि. म. वि.च्या हीरक महोत्सवातही तत्कालीन कुलपति नामदार यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते सत्कार स्वीकारायला बाबांनी नकार दिला. परंतु टि. म. वि.च्या माजी विद्यार्थी मंडळाने भरवलेल्या सभेस ते अगत्याने उपस्थित राहिले.

पुढे १९७५ साली इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी जाहीर केल्यावर कित्येक काँग्रेसजनांची द्विधा मनस्थिती झाली. परंतु बाबांनी योग्य वेळी निवडणूका झाल्याच पाहिजेत आणि व्यक्तिस्वातंत्र्य परत मिळाले पाहिजे याचा पाठपुरावा केला. परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी विनोबांनी १९७६ साली ‘आचार्य संमेलन’ बोलावले. देशाच्या प्रत्येक राज्यातून दोन प्रतिनिधींना पाचारण करण्यांत आले. त्यात बाबांचा आणि पुणे विद्यापीठाचे तत्कालीन उपकुलगुरू देवदत्त दाभोळकर यांचा महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून समावेश होता. संमेलनाहून परत आल्यावर महाराष्ट्रांत गावोगावी जाऊन सभा घेऊन लोकांपर्यंत पोचण्याचा बाबांचा विचार होता. त्यांची पंचाहत्तरी उलटून गेली असताना असा उपक्रम मनात आणणेच धाडसाचे होते.

Vi Pra Limaye with President of India

बाबा आणि हंगामी राष्ट्रपति जत्ती (एप्रिल १९७७)

याच कालावधीत बाबांना ‘संस्कृतात पांडित्य तथा शास्त्रनिष्ठा’ याबद्दल ‘राष्ट्रीय पंडित’ असा सन्मान जाहीर झाला. आणीबाणी पुकारलेल्या सरकारने देऊ केलेली ही उपाधि नाकारायची असे बाबांनी ठरवले. पण मार्च १९७७मध्ये आणीबाणी मागे घेण्यात आली आणि मग एप्रिल १९७७मध्ये दिल्लीला राष्ट्रपति भवनामधील समारंभात भारताचे हंगामी राष्ट्रपति बी. डी. जत्ती यांच्याकडून बाबांनी हा गौरव स्वीकारला. तो सोहळा बघायला आम्ही कुटुंबीय हजर होतो. बाबांनी आणि आईने प्रथमच विमानाने प्रवास केला, तोही सरकारने भाडेखर्च देऊ केला म्हणून. त्या दोघांखेरीज एका मदतनीसाचेही विमानभाडे सरकार देणार होते. तो मदतनीस मीच झालो!

Vi Pra and Balmohan Limaye in Delhi

राष्ट्रपति भवनात मी व बाबा (१९७७)

बाबांच्या उत्तरायुष्यांत राजकारणाची, समाजकारणाची जागा संस्कृतचे अध्ययन, ग्रंथलेखन यांनी घेतली. बाबा शाळेत आणि कॉलेजात असताना त्याचे संस्कृतमधील प्रावीण्य त्यांचे सांगलीचे शिक्षक देवधरशास्त्री आणि पुण्याचे प्राध्यापक गुणे यांनी हेरले होते आणि त्याला खतपाणी देऊन ते जोपासले होते. पुढे टिळक महाविद्यालयात शिकवत असताना बाबांचा संस्कृत भाषेविषयीचा नैसर्गिक कल सखोल झाला. नंतर तीन-चार वेळा राजकीय कैदी म्हणून तुरुंगात असताना आणि बाहेर आल्यावरही बाबा इतर सहकाऱ्यांसमोर गीता, उपनिषदे अशा ग्रंथातील श्लोकांचे, मंत्रांचे त्या वेळच्या परिस्थितीला साजेसे निरूपण करीत. सर्वोदय आंदोलनात भाग घेताना ही प्रक्रिया चालूच होती. अशी त्यांच्या संस्कृताध्ययनाची साखळी टिकून राहिली आणि व्यासंग वाढीला लागला. ज्या गुरुद्वयांच्या शिकवणुकीमुळे बाबांच्या उंच भराऱ्या शक्य झाल्या, त्यांच्या स्मरणार्थ पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेला आई-बाबांनी १९८०च्या सुमारास एक देणगी दिली. तिच्या आधारे आंतरराष्टीय कीर्तीच्या विद्वानांनी द्यायच्या दोन व्याख्यानमाला सुरू झाल्या, एका वर्षी देवधरशास्त्री यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि पुढल्या वर्षी प्राध्यापक गुणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ. मधूनमधून खंड पडत असला तरी ह्या व्याख्यानमाला अजूनही चालू आहेत. २०१५ साली ‘प्रोफेसर पांडुरंग दामोदर गुणे स्मृति व्याख्यानमाला’ अमेरिकेतील पेन्सिल्व्हानिया विद्यापीठाचे जॉर्ज कार्डोना यांनी आणि २०१८ साली ‘पंडित श्रीपादशास्त्री देवधर स्मृति व्याख्यानमाला’ अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाचे माधव देशपांडे यांनी गुंफली होती.

विशेषतः वेदांच्या आणि पाणिनीने उभारलेल्या व्याकरणाच्या अभ्यासाला बाबांनी वाहून घेतले. महामहोपाध्याय काशिनाथ वासुदेव अभ्यंकर आणि बाबा यांनी तयार केलेली भर्तृहरिविरचित वाक्यपदीय या पुस्तकाची आवृत्ति पुणे विद्यापीठाने १९६५ साली प्रकाशित केली. तसेच त्या दोघांनी लिहिलेली पातंजल महाभाष्यावरील भर्तृहरिकृत महाभाष्यदीपिकेची संशोधित आवृत्ति १९७० साली भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने प्रसिद्ध केली. काशिनाथशास्त्री बाबांपेक्षा दहा वर्षांनी मोठे होते तरी ते बाबांकडे अनेक वेळा येत असत. आजही मला त्यांची कृश पण तेजःपुंज मूर्ति आठवते. दुर्दैवाने काशिनाथशास्त्री आणि त्यांचे कुटुंबीय यांचा १ डिसेंबर १९७६ रोजी राजेंद्र जक्कल या बदमाषाच्या टोळीने रहात्या बंगल्यात खून केला, फक्त पैसा-अडका आणि दाग-दागिन्यांकरता. पुरे पुणे शहर या घटनेने हादरून गेले होते. प्रभात रोडवरील जक्कलच्या टपरीकडे लोक लांबूनच बोट दाखवत असत. जवळजवळ सात वर्षांनी जोशी-अभ्यंकर खून खटल्यातील जक्कलसह चार आरोपींना फाशी देण्यात आले. आपल्या ज्येष्ठ वयोवृद्ध सहकाऱ्याची निर्घृण हत्या झालेली बघून बाबा खूप हळहळले, पण याचा त्यांनी आपल्या कामावर परिणाम होऊ दिला नाही.

पुण्याच्या परिसरातील कोणाला वेदातील किंवा व्याकरणातील कूट प्रश्नाबद्दल काही समजून घ्यायचे असेल तर आचार्य लिमयांकडे जायचे असा एक पायंडा पडला होता. बाबांच्या खोलीत होणाऱ्या अशा आणि इतरही अवांतर चर्चा एका कोपऱ्यात बसून ऐकायला मला फार मजा यायची. बाबा संवादप्रिय होते. डॉ. मा. पु. जोशी, शंकरराव आगाशे, बुवा गोसावी, वि. मो. केळकर (ज्यांना आम्ही ‘वेदान्ती’ म्हणत असू), इतिहासतज्ञ ग. ह. खरे, सखारामपंत आपटे, बेळगावचे पुंडलीकजी कातगडे असे कितीतरी मित्र बाबांना भेटायला यायचे. असे कुणी आले की बाबा म्हणत `शिष्टागमने अनध्यायः', म्हणजे कोणी विशेष व्यक्ती आल्यावर अध्ययन थांबवले तरी चालते. मग हातातले पुस्तक बाजूला ठेवून ते गप्पा मारण्यात रंगून जात. त्यांच्यात जुगलबंदी चालायची. ‘ता’वरून ताकभात ओळखावा, तशी या मंडळींना एक-दोन शब्दांवरून सगळी परिस्थिति कळायची. एके दिवशी सकाळी वाडेकर आजोबा ‘ग्रामं गच्छन्’ असे म्हणत बाबांच्या खोलीत शिरले. दोघांनाही कळले की आजोबा कुठल्या तरी कामासाठी बाहेर पडले होते आणि जाता जाता बाबांना भेटायला आले होते. हे कसे कळले? संस्कृतमधील ‘ग्रामं गच्छन् तृणं स्पृशति’ या वाक्प्रचाराचा शब्दशः अर्थ ‘गावाकडे जाताना गवताला हात लावतो’ असा असला, तरी त्याचा भावार्थ आहे ‘गावाला जाणे हे मुख्य काम आणि वाटेत बाजूला उभ्या असलेल्या गवताच्या ताटांना हात लावत जाणे ही दुय्यम बाब’. बाबांच्या मित्रांपैकी कुणाला काही आजाराचा फार त्रास होत असला, तर त्याला दिलासा देण्यासाठी बाबा एक प्राचीन वाक्य सांगायचे. ‘एतत् वै तपः यत् व्याधितः तप्यति अनिन्दन् अविषीदन्।’ म्हणजे व्याधिग्रस्त माणूस (एक प्रकारचे तपच) करत असतो, जर त्याने (आपली शुश्रूषा करणाऱ्याची) निंदा केली नाही आणि तो (स्वतः) दुःखी-कष्टी झाला नाही तर.

बाबांना स्वतःला बऱ्याच व्याधि होत्या. बाबांच्या कानात सतत घू ऽऽ घू ऽऽ असा आवाज यायचा. सुरुवातीला त्यामुळे बाबा खूप अस्वस्थ झाले. पण नंतर या आवाजाची सवय होऊन गेली. बाबांचा रक्तदाब बरेच वेळा वाढत असल्याने एकदा डॉक्टरांनी त्यांना मीठ कमी खायला सांगितले. त्या दिवसापासून बाबांनी मीठ घातलेले सर्व पदार्थ वर्ज्य केले, आणि निग्रहाने हा नियम नेहमी पाळला. तरुणपणापासून त्यांना इसबाचा त्रास होत असे, कधी कमी तर कधी जास्त. मुंबईचे प्रख्यात त्वचारोगतज्ञ डॉ. शरद देसाई आणि त्यांचे पुण्यातील शिष्य डॉ. अरविंद लोणकर बाबांवर उपचार करीत. काही वेळा गुण येई, तर काही वेळा बिलकुल उपयोग होत नसे, कातडीच्या थोड्या भागावर सुरू झालेले इसब बऱ्याच ठिकाणी पसरे, खूप खाज सुटे, रात्री झोप येत नसे. अशा वेळी बाबा हताश होऊन जायचे.

हवाबदल केल्याने आराम पडेल, म्हणून डॉ. लोणकरांच्या सांगण्यावरून १९७४ साली बाबा लोणावळ्याच्या ‘कैवल्यधाम’मध्ये जाऊन राहिले, सोबतीला वासुदेव कोपर्डेकर हा त्यांचा विश्वासू माणूस होता. तो बाबांचा भक्तच होता. बाबांची अनेक बारीकसारीक वैयक्तिक कामे तो मनःपूर्वक करत असे. तो घरी आला की बाबा ‘या, वासुदेवराव’ असे संबोधत. बाबांचे मित्रवर्य वाडेकर पुण्याहून दररोज एक खेप टाकायचे. परंतु तिथल्या हवामानाचा अपेक्षेप्रमाणे बाबांना फायदा झाला नाही. उलट इसबाचा त्रास वाढलाच. १५ दिवसातच बाबा पुण्याला परतले. काही काळ तसाच गेला. तेव्हा मी गोव्यामधील मुंबई विद्यापीठाच्या शिक्षण-संशोधन केंद्रात एक वर्षासाठी गेलो होतो, 'टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च'कडून रजा घेऊन. समुद्रकाठच्या हवेने फरक पडेल असे कुणीतरी सुचवल्याने बाबांनी गोव्याला माझ्याकडे येऊन राहायचे ठरवले. बाबांनी पुन्हा आपल्यापासून दूर राहायला जाऊ नये असे आईला वाटत होते. पण नाइलाजास्तव तिने होकार दिला. गोव्यातील आमचे घर समुद्राच्या किनाऱ्यावरच होते. दिवसा नवीन जागेच्या जवळपास हिंडण्यात बाबांचा वेळ चांगला जायचा. शिवाय करमणुकीला आमची दोन वर्षाची मुलगी कल्याणी होतीच. पण रात्रीच्या वेळी बाबांच्या सर्वांगाला कंड सुटायची. ती असह्य झाली की बाबा खाजवत सुटायचे. मग त्या जखमा चिघळायच्या.

आग कमी व्हावी म्हणून मी व निर्मला त्यांच्या पायांना, पाठीला बर्फ लावायचो. झोपेत नखाने खाजवले जाऊ नये म्हणून बाबांच्या हातांना बँडेज बांधायचो. एके दिवशी सकाळी उठल्यावर बाबा म्हणाले की त्यांच्या स्वप्नात दोन यमदूत आले होते. ते बाबांना म्हणाले ‘चला आता’, परंतु बाबांनी स्पष्ट नकार दिला आणि यमदूतांना परत पाठवले. हे ऐकून मला धास्तीच वाटली. आणखी काही दिवस बाबा आमच्याकडे थांबले, आईसुद्धा गोव्याला येऊन राहिली. पण शेवटी बाबांच्या प्रकृतिबाबत निराश होऊन ते दोघे पुण्याला रवाना झाले. सर्व उपाय करून थकल्यावर आईने नाना मराठ्यांना होमिओपाथिक औषध देण्यास बोलावले. त्यांनीच आईची भयंकर डोकेदुखी नुसते एक औषध हुंगायला सांगून बरी केली होती. नानांची लहान बांध्याची पण सतेज मूर्ति आमच्या घरात अवतरली. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी बाबांना आपल्या तब्येतीच्या इतिहासाचा पूर्ण पाढा वाचायला सांगितला. त्यातून नानांना (आणि आम्हालाही) समजले की १९३२ मध्ये बाबांना क्षयरोग झाला होता; तेव्हा ते सिंहगडावर राहायला गेले होते. जरी बरे होऊन गडावरून खाली आले असले तरी इतके कृश झाले होते की कुणीतरी त्यांना ‘पेन्शन केव्हा घेतली?’ असे विचारले. सर्व हकीकती ऐकून घेतल्यावर नानांनी बराच वेळ विचार केला आणि बरोबर आणलेल्या Materia Medica या होमिओपॅथीच्या पुस्तकाची मदत घेतली. त्यांनी असे निदान केले की फार पूर्वी बाबांच्या शरीरात क्षयरोगाच्या जंतूंमुळे जी विषे (toxins) निर्माण झाली होती ती इसबाच्या रूपाने बाहेर पडत आहेत. नानांनी Tuberculimum व Bacillinum ही औषधे घ्यायला सांगितले. हे सगळे अजबच होते. पण ‘बुडत्याला काडीचा आधार’ या म्हणीनुसार बाबा ती औषधे घ्यायला लागले. आश्चर्य असे की बाबांची त्वचा हळूहळू नितळ होऊ लागली आणि महिन्याभरात पूर्णतः मूळपदावर आली, कंड नाहीशी झाली. कित्येक महिने गेल्यावर पुन्हा इसब डोके वर काढू लागताच नानांनी तीच औषधे पुन्हा एकदा दिली, आणि बाबांचे इसब कायमचे बरे झाले. स्वतः व्याधिग्रस्त असताना बाबांचा व्यासंग चालूच असायचा, जितका जमेल तितका. खरे तर तोच त्यांचा विरंगुळा होता.

आईचीही प्रकृतिही यथातथाच होती. तिचे पोट फार नाजूक होते, चटकन् बिघडायचे. पहिल्यापासूनच तिचे जठर जास्त खाली उतरले होते. तिची पाठही खूप दुखायची. दमा तिला पुरेसे काम करू देत नसे. आई-बाबा मुंबईला आमच्या आय्. आय्. टी.तल्या घरी एकदाच आले, १९८३ साली. त्यांचा बरेच दिवस राहायचा इरादा होता, पण ५-६ दिवसांत आईला दम्याची ढास लागू लागली. तिने पुण्याहून येताना नेहमीची सगळी औषधे आणली होतीच. त्यांचा काही प्रभाव पडेना. जेव्हा आईला श्वास घ्यायलाच त्रास होऊ लागला तेव्हा परत आपल्या तंबूत (back to the pavilion), म्हणजे पुण्याला जाणे भाग होते. खास मोटारगाडी करून आई-बाबांनी प्रस्थान ठेवले. सगळ्यांनाच खूप वाईट वाटले. खंडाळ्याचा घाट ओलांडून जसे मोटारने लोणावळ्याकडे कूच केले, तसा आईला नियमितपणे श्वास घेता येऊ लागला, आणि पुण्याला पोचेपर्यंत तो नेहमीसारखा झाला. आता याला काय म्हणायचे?

Vi Pra and Tarabai Limaye 1979

बाबा आणि आई (१९७९)

बाबांनी मोठमोठी पुस्तके, शब्दकोश, ज्ञानकोश विकत घेण्याबाबत कधीच मागेपुढे पाहिले नाही. त्याबद्दल आईही त्यांना चकार शब्दाने काही म्हणत नसे. पुण्यांतील डेक्कन बुक स्टॉलचे मालक श्री. मनोलीकर, तसेच इंटरनॅशनल बुक सर्विसचे मालक श्री. दीक्षित बाबांचे मित्रच झाले होते. याखेरीच वैदिक संशोधन मंडळ, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, फर्ग्युसन कॉलेज, डेक्कन कॉलेज, पुणे विद्यापीठ अशा अनेक संस्थांच्या ग्रंथालयांतून दीर्घ मुदतीसाठी त्यांनी आपल्या घरी पुस्तके आणून ठेवली होती. त्यांची खोली म्हणजे पुस्तकांचा खजिनाच होती. दोन मोठी काचेची कपाटे, तीन उघडी शेल्फस् आणि एक लाकडी पट्ट्यांचे फिरते शेल्फ, सगळी पुस्तकांनी भरून गेलेली. कॉटवरच बसून पुढ्यात एका बसक्या लाकडी टेबलावर पुस्तके ठेवून त्यांचे वाचन-लिखाण दिवसभर चालू असे. त्यातून त्यांना खूप आनंद मिळत असे. बाबा असे ‘फ्रीलान्स’ संशोधन, बाकी कशाचीही चिंता न बाळगता, वर्षानुवर्षे करू शकले यात आईचे योगदान फार मोठे आहे.

बाबांची ज्ञानसाधना निर्हेतुक होती. लेख किंवा ग्रंथ लिहिण्याचा कुठलाही विचार मनांत नसतांना ते महिनोंमहिने आपल्या आवडत्या विषयाचे अध्ययन चिकित्सक दृष्टीने करत असत. बाबा सत्तरीत असताना ते पाणिनीच्या ‘अष्टाध्यायी’वर पतंजलीने केलेल्या महाभाष्याचे बारकाईने वाचन करत होते. बरोबरच कोऱ्या कागदांवर आपल्या टिपा लिहित होते. मी त्यांना म्हटले ‘बाबा, इतके परिश्रम घेऊन तुम्ही जे लिहीत आहात त्याचे पुढे काय होणार?’ बाबा उत्तरले ‘ते सगळे गंगार्पण करायचे.’ परंतु माझ्याच्याने राहवेना.

Vi Pra Limaye 1980

बाबा (१९८०)

बाबांच्या बोलण्यात होशियारपूरची विश्वेश्वरानंद वैदिक शोधन संस्था बरेच वेळा येत असे. बाबांना न विचारता मी विश्वबंधु या संस्थेच्या प्रमुख संपादकांना पत्र लिहून बाबांच्या व्यासंगाबद्दल कल्पना दिली. शिवाय बाबांनी केलेली निरीक्षणे कालाच्या ओघात नष्ट न होण्यासाठी काय करता येईल असे विचारले. माझे असे अनाहूत पत्र पाहून त्यांना आश्चर्यच वाटले असणार. परंतु त्यांनी बाबांना अदबीने एक सुरेख पत्र लिहिले. त्यात बाबांनी जर त्यांची टिपणे सलग आणि सुसंबद्धरीत्या लिहून दिली तर ती ग्रंथरूपाने प्रसिद्ध करता येतील असे म्हटले. हे वाचून बाबा मला कठोर शब्दात म्हणाले ‘तुला हा उद्योग करायला कोणी सांगितला होता?’ मी जास्त काही बोललो नाही. परंतु बाबांनी विश्वबंधूंना पत्र लिहून पतंजलीच्या महाभाष्यावर लिखाण करायचे मान्य केले, व ते १९७३ च्या १५ ऑगस्टला पूर्ण केले. या कामी बाबांना पुणे विद्यापीठाच्या प्रगत अध्ययन केंद्रातील सुरेश्वर ज्ञानेश्वर लद्दु यांनी सर्वतोपरी मदत केली, विशेषतः या पुस्तकातील अनेक सूची करण्यात. १९७४ साली ‘क्रिटिकल स्टडीज् ऑन् द महाभाष्य’ हा सुमारे एक हजार पानांचा बाबांनी लिहिलेला ग्रंथ विश्वेश्वरानंद वैदिक शोधन संस्थेने प्रसिद्ध केला.

मी बाबांच्या मृत्यूनंतर कॅनबेरा येथील ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये काही महिन्यांकरता गेलो होतो. मी लिहिलेले एक गणित विषयावरील पुस्तक तेथील लायब्ररीमध्ये आहे का हे बघण्याकरता कॉम्प्यूटरवर ‘लिमये’ असे लिहून टिचकी मारली. स्क्रीनवर माझ्या पुस्तकाच्या आधीच बाबांनी लिहिलेली दोन पुस्तके आली, एक अष्टादश-उपनिषद: आणि दुसरे पातंजल महाभाष्यावरचे. मला बाबांचा खूप अभिमान तर वाटलाच, पण त्यांचे ज्ञानानुभव गंगार्पण न होता जगाच्या कानाकोपऱ्यात शिल्लक राहावेत याबद्दल धन्यताही वाटली. अजूनही विश्वेश्वरानंद वैदिक शोधन संस्था बाबांच्या पुस्तकाचे मानधन, ते जसे विकले जाईल तसे, माझ्याकडे पाठवत असते.

माझ्या वाढदिवशी बाबा मला कोणता ना कोणता साजेसा वैदिक मंत्र लिहून पाठवत. एका वर्षी त्यांनी स्वतःच अनुष्टुभ छंदात बनवलेला एक श्लोक पाठवला. तो असा होता :

Balmohan Limaye Birthday Shloka

बाबा दररोज सकाळी फिरायला जायचे, हातात एक जाडजूड काठी घेऊन. ती काठी अजूनही माझ्याकडे आहे. मी जेव्हा मुंबईहून फोन करुन बाबांच्या प्रकृतीची चौकशी करायचो, तेव्हा ‘आज फिरायला गेला होता का?’ या माझ्या प्रश्नाच्या उत्तरावरुन मला खऱ्या परिस्थितीचा अंदाज यायचा. १९८३च्या अखेरीला एकदा फिरायला गेले असता बाबा अचानक खाली पडले. असे का झाले याचा शोध घेण्यासाठी आईने त्यांच्या काही तपासण्या करुन घेतल्या. त्यावेळी डॉक्टर एकमेकांशी बोलत असताना बाबांच्या कानावर ‘थ्रॉम्बस्’ असा शब्द पडला. आपल्या सवयीनुसार त्यांनी त्याचा अर्थ शब्दकोशांत पाहिला असणारच. रक्ताची गुठळी काय करु शकते याची त्यांना कल्पना आली. त्यांनी बाहेरून काही दाखवले नाही, परंतु वासुदेव कोपर्डेकरला बोलावून घेतले. आता वासूकरवी बाबांनी निरनिराळ्या ग्रंथालयांतून आणलेली पुस्तके परत करायला सुरुवात केली. त्या शनिवार-रविवारी पुण्याला गेलो असता ही आवराआवर बघून मी साशंक झालो. मी विचारले तसे बाबांनी मला ऋग्वेदातील सूर्यसूक्तामधली (1.115) एक ऋचा सांगितली.

‘तत्सूर्यस्य देवत्वं तन्महित्वं मध्या कतोर्विततं सं जभार।’

याचा अर्थ असा : (दिवसभर) पसरलेले आपले तेज आणि माहात्म्य (अस्ताला जाताना) सूर्याने मध्येच आवरते घेतले. मी मनोमन समजून चुकलो की बाबांना आपले या जगातील अस्तित्व संपत आल्याची सूचना मिळाली आहे; म्हणून ते ज्याची त्याची पुस्तके परत करत आहेत. मी आईशी याबाबत बोललो. तीही जाणून होती, पण डगमगली नव्हती. उरकते घेण्याच्या मनःस्थितीत असतांनाही बाबांनी त्यांचा अभ्यास पूर्ववत् चालू ठेवला. त्यावेळी भर्तृहरीने लिहिलेल्या महाभाष्यदीपिकेची चिकित्सित आवृत्ति काढण्याचे काम ते करत होते. २१ मार्च १९८४ रोजी नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून पाणिनीच्या ‘तरप् तमपौ घ:’ या सूत्रावर बाबांनी ८-९ पाने टिपण्या लिहिल्या. नंतर त्यांना बरे नाहीसे वाटू लागले. दुसऱ्या दिवशी हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यामुळे ते रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल झाले. या शुश्रूषागृहाच्या अतिदक्षता विभागात असताना बाबांनी आपल्या आयुष्याचा आढावा चार छोट्या वाक्यात घेतला :

देशासाठी कार्य केले, अध्यात्माचा विचार केला,

संस्कृतविद्येची जोपासना केली, परंतु आत्मज्ञान झाले नाही.

२८ मार्च १९८४च्या सकाळी हृदयविकाराचा दुसरा जबरदस्त झटका येऊन बाबा निधन पावले. कोणतेही धार्मिक अंत्यसंस्कार करू नयेत असे त्यांनी निक्षून सांगितले होते. आईदेखील त्याच मताची होती. त्यामुळे रुबी हॉलमधून रुग्णवाहिकेने बाबांचा देह सरळ ‘वैकुंठ’ या नदीतीरावरील दहनभूमीकडे नेला. इलेक्ट्रीकचा खटका दाबण्याआधी बाबांचे जवळचे मित्र शंकरराव आगाशे दोन शब्द बोलले. काही दिवसांनी भारतीय इतिहास संशोधन मंडळांत शोकसभा झाली. बाबांबद्दल आदर आणि जिव्हाळा वाटणारे बरेच लोक आले होते. सभा चालू असताना मी सुन्नपणे प्रेक्षकांत बसलो होतो. कालिदासाने म्हटले आहे,

‘स्निग्धजनसंविभक्तं हि दु:खं सह्यवेदनं भवति।’

दु:ख जर आपण स्नेह्यांबरोबर वाटून घेतले तर त्याच्या वेदना सुसह्य होतात. हे अगदी खरे आहे. पण एक पर्व संपले होते, पुण्याच्या सांस्कृतिक जीवनातले व माझ्या वैयक्तिक आयुष्यातले.

बाबांच्या मृत्युनंतर त्यांची काही थोडी पुस्तके मी मुंबईला घेऊन आलो, आईला विचारून. माझ्या दृष्टीने तोच माझा ठेवा होता. त्यांची बाकीची पुस्तके, त्यांच्या वह्या, त्यांनी टिपण्या लिहिलेले पाठकोरे कागद या सगळ्या गोष्टी आम्ही भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेकडे सोपवल्या. एका स्वतंत्र दालनात त्या ठेवल्या होत्या, आणि तिथल्या भिंतीवर बाबांचे एक रेखाचित्रही लावले होते. पुढे जानेवारी २००४ मध्ये ‘संभाजी ब्रिगेड’ने संस्थेवर केलेल्या ह्ल्ल्यात ही स्मृतिचिह्ने विखरून गेली.

विष्णू लिमये यांचे तैलचित्र, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे
(बाबांच्या या पुनःस्थापित तैलचित्राचे अनावरण भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये २८ एप्रिल २०२२ रोजी झाले.)

श्रीकांत बहुलीकर प्रभृति बाबांच्या चाहत्यांनी एक छोटासा निधि गोळा केला होता. त्या निधीतून दरवर्षी २८ मार्चला लागून येणाऱ्या रविवारी टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये ‘आचार्य वि. प्र. लिमये चर्चासत्र’ आयोजित केले जाते. अनेक जण निबंध वाचन करतात. तीस वर्षांपेक्षा कमी वयोगटातील संशोधकाच्या उत्कृष्ट निबंधास पारितोषिक देण्यात येते. हा परिपाठ अव्याहतपणे आजतागायत सुरू आहे. आताच्या जनमानसात एवढीच एक अस्पष्ट खूण राहिली आहे बाबांसंबंधीच्या भूतकाळाची. हे चर्चासत्रही थांबेल केव्हातरी!

बाबा घरात नसलेल्या परिस्थितीतून मनाने बाहेर यायला आईला बराच काळ लागला. तिचे खूपसे दैनंदिन व्यवहार बाबांच्या भोवती गुंफलेले होते. बाबा असताना ती सावलीसारखी त्यांच्याबरोबर असे. आता ती जणू स्वत:चीच सावली असल्यासारखी वावरू लागली होती. दररोज सकाळ-संध्याकाळ दवाखान्याचा बाह्यरुग्ण भाग सांभाळायचे तिने हळूहळू आपल्या मुलीवर सोपवले होतेच. तरीही दवाखान्याच्या जमाखर्चावर, तिथे राहाणाऱ्या बाळंतिणींना पुरवल्या जाणाऱ्या अन्नाच्या चवीवर तिचे बारीक लक्ष असे. माझ्या आईच्या हॉस्पिटलमध्ये आजी, आई आणि मुलगी अशा तिघीही बाळंत झाल्याची कितीतरी उदाहरणे होती. पण आता इच्छा असूनही कुणाचे बाळंतपण करायला तिला उभे राहवत नसे. लग्नाआधीपासूनच्या पोटाच्या व्याधीखेरीज तिला दम्याचा विकार खूप वर्षे होता. दिवसेन् दिवस ती इतकी क्षीण होत गेली की मी तिला एका हातावरही उचलू शकत असे. तिला थंडीचा जास्त त्रास होत असे म्हणून तिच्या एका वाढदिवशी तिच्यासाठी एक छान उबदार ब्लँकेट आम्ही मुंबईहून घेऊन गेलो. पण आमच्या लक्षात आले की ते ब्लँकेट ओढून वरपर्यंत घ्यायचे त्राणही तिच्यात उरले नव्हते. तशात तिने नेहमीची औषधे घेणेच बंद केले. परोपरीने सांगूनही ती ऐकेना. काही कारणाने याला मीच जबाबदार आहे असे मला वाटत राहिले. मी अगदी हतबल झालो. काय करावे समजेना. कालांतराने कशी कुणास ठाऊक आई जरूर ती औषधे घेऊ लागली.

१९९०नंतर आई बरीचशी बिछान्यावरच पडून होती. तिला वेदना होत, पण ती कमालीची सहनशील होती. त्या काळात तिने आपल्याच लेटरहेडवर लिहिलेली छोटी प्रार्थना अशी होती :

त्रस्त जीव हा, मुक्ति दे माधवा, शांति दे माधवा ।

आली जवळ ही शेवटची घटिका, आनंदे मी स्वीकारिते तिला।

मुक्ति दे माधवा, शांति दे माधवा ।।

Balmohan Limaye Mother (1991)

आई (डिसेंबर १९९१)

१९९४ साली आईची प्रकृति खूपच बिघडली म्हणून मी व माझी पत्नी निर्मला घाईघाईने मुंबईहून पुण्याला निघालो. रस्त्यामध्ये पुण्याला घरी पोहोचल्यावर काय दृश्य बघायला मिळणार आहे याची चिंता करत होतो. आम्ही पोचलो तर आई सावरत होती. आईच्या लहानपणी ती खूप अशक्त असल्याने तिची आई तिला म्हणत असे ‘ताराबाई, जरा जगा आता.’ नंतर मोठेपणी आई आम्हाला सांगायची ‘दाखवलेच की नाही जगून’. तिने नुसतेच जगून दाखवले असे नाही तर कसे जगायचे असते हे दाखवले. ती खूप काटक आणि चिवट होती. म्हणूनच तर ती बाबांच्या संसाराला पुरी पडली. काही दिवस पुण्याला राहिल्यावर आम्ही मुंबईला परतण्याच्या विचारात होतो. अचानक आई म्हणाली ‘बालमोहन, आजची रात्र माझी या जगातली शेवटची.’ आम्ही एकदम् चरकलो. निर्मलाने रेल्वेची तिकिटे परत करवली. १४ मार्चच्या रात्री आईने अट्टाहासाने बाहेरच्या व्हरांड्यात झोपायला मागितले. त्या संध्याकाळी माझी मामेबहीण सुमनताई आईला भेटायला आली होती. ती उत्तम नर्स असल्यामुळे तिने आईजवळ थांबायचे ठरले. सकाळी जाग येताच मी भीत भीत व्हरांड्यांत गेलो. आई तक्क्याला टेकून बसली होती. चहाचे दोन घोट घेताना मला म्हणाली ‘रात्री एक वाहन आकाशांतून जाताना दिसले होते. ते मला खुणावत होते.’ नंतर त्या दिवशी आई बोलायची बंद झाली. तिने काही शब्द पाटीवर लिहून दाखवले. दुपारी बसल्याबसल्या तिचे डोळे स्थिरावले आणि श्वास थांबला. सुमनताईसारख्या खडतर परिस्थितीला तोंड देणाऱ्या अनेक बायकांना आईने मार्ग दाखवला, प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या कष्टांचे कौतुकही केले. त्याचा गाजावाजा तिने कधी केला नाही. आई गेल्यावर तिचे शेवटचे दर्शन घ्यायला आलेल्या कित्येक जणींनी अशा कथा सांगितल्या. दुर्दैवाने आईची अशी वागणूक माझ्या पत्नीच्या निर्मलाच्या वाट्याला कधी आली नाही. कदाचित सासू-सून हे विचित्र नातेच त्याच्या आड आले असावे. आई सत्शील होती, परोपकारी होती, पण तिची शेवटची वर्षे मात्र फारच कष्टप्रद ठरली. जो माणूस आयुष्यभर पुण्यकर्मे करतो त्याचा अंत विनासायास होतो असे म्हणतात. पण तसे काही नसते, कुणाचा अंत कसा होईल याचा काही नेम नसतो. बाबांनंतर दहा वर्षांनी त्यांची सावलीही दिसेनाशी झाली. आज पुण्यातील लक्ष्मी रोडने जाताना गोखले हॉलसमोरील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ‘डॉ. ताराबाई लिमये हॉस्पिटल, स्थापना १९३८’ अशी पाटी दिसते. तेवढीच शिल्लक आहे खूण आईच्या तिथल्या वास्तव्याची. तीही कालाच्या ओघात दिसेनाशी होणारच आहे!

मला हल्ली कुणी विचारले की आई-बाबांची कोणती शिकवण माझ्यावर कायमचा ठसा उमटवून गेली आहे? बाबांच्याबाबत मला तैत्तिरीय उपनिषदातील ‘स्वाध्यायप्रवचनाभ्यां मा प्रमदितव्यम्’ म्हणजे ‘अध्ययन व अध्यापन करण्यात, अर्थात् शिकत राहण्यात व शिकवत जाण्यात बिलकुल चुकारपणा करू नकोस’ हे वाक्य सुचते, आणि आईच्याबाबत ‘दुसऱ्याला उपयोगी पडण्याचा सतत प्रयत्न करत रहा’ हे सांगणे. आज मागे वळून बघताना माझ्या मनःचक्षूंसमोर आई-बाबांच्या कोणत्या प्रतिमा प्रामुख्याने उभ्या राहतात? आई आणि बाबा दोघेही आपापल्या कार्यक्षेत्रात असामान्य होते, दोघांनाही देशकार्याची, समाजकारणाची बांधिलकी होती. अंगीकारलेले व्रतस्थ जीवन दोघेही जगले. आपला मुलगाही असामान्य व्हावा अशी त्यांची इच्छा असणे साहजिक होते. प्रत्यक्षात तसे काहीही झाले नसले तरी तशी त्यांची मनोमन इच्छा होती हे माझ्या बारशातल्या `बालमोहन' आणि मुंजीतल्या `ज्ञानदेव' या
नामकरणांवरूनच दिसून येते. वयाची पहिली वीस वर्षे मी आई-बाबांच्या सान्निध्यात घालवली. पितळ्याचे किंवा तांब्याचे भांडे ठोके मारून सुबक बनवावे तसे ते माझ्यावर संस्कार करत राहिले. त्या काळात मी एका सुरक्षित आवरणाने वेढलेला होतो. परंतु शिक्षणासाठी परदेशाला प्रस्थान केल्यावर मी बरोबर नेलेली शिदोरी पुरेशी नव्हती. माझे जग मलाच उभारावे लागले. पाच वर्षे अमेरिकेत आणि नंतर नोकरीमुळे मुंबईला राहिल्याने माझ्यात आणि आई-बाबांच्यात भौतिक अंतर निर्माण झालेच, पण विचारांची बैठकही बदलली. तरीही त्यांचे माझ्यावरील आणि माझे त्यांच्यावरील अपार प्रेम कमी झाले नाही. त्या दोघांच्या आपसातील स्नेहभावाबद्दल एवढेच म्हणता येईल की त्यांच्या एकत्रित आयुष्यात ते एकमेकांना पूर्णपणे शरण गेले होते. सगळ्या वैचारिक बाबतीत बाबा म्हणतील तीच आईची पूर्व दिशा होती आणि भावनिक बाबतीत आईच बाबांना वाट दाखवणारी होती. एकमेकांचा परिचय झाल्यापासून सुरुवातीच्या वीस-पंचवीस वर्षात दोघांनी राजकीय व सामाजिक जीवनात हिरिरीने भाग घेतला. त्यानंतर ज्ञानोपासना हाच बाबांचा धर्म बनला, तर संसार व वैद्यकीय पेशा सांभाळताना वेगवेगळ्या प्रकारे अडचणीत आलेल्या स्त्रियांना परोपरीने उभे करण्यात आईने समाधान मानले. सामाजिक जीवनात थोर असणाऱ्या एका दांपत्याचे अपत्य असणे हा माझा विशेषाधिकार होता, आणि तोच माझ्या आयुष्याचा पाया बनला.

(समाप्त)

---

बालमोहन लिमये

लेखकाचा अल्प-परिचय : मुंबईच्या आय्. आय्. टी.मधील गणित विभागात ४२ वर्षे काम केल्यानंतर निवृत्त. पवईलाच रहिवास. मराठीत ललित लेखन करण्याचे धाडस प्रथमच करत आहे.

(मौज, दिवाळी २०२०, या अंकात ‘आई-बाबांची स्मृतिचित्रे’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. त्या लेखाची ही सुधारून वाढवलेली आवृत्ति आहे. शुद्धलेखन मुळाबरहुकूम आहे.)

Balmohan Limaye (2020)

(बालमोहन लिमये, जानेवारी २०२०)
ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

होमिओपथी याबाबतची निरीक्षणे / अनुभव रोचक.
लेखमाला आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संपूर्ण लेखमालाच सुरेख आहे, पण शेवटचं वाक्य विशेष आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रेरणादायी लेखमाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला हल्ली कुणी विचारले की आई-बाबांची कोणती शिकवण माझ्यावर कायमचा ठसा उमटवून गेली आहे? बाबांच्याबाबत मला तैत्तिरीय उपनिषदातील ‘स्वाध्यायप्रवचनाभ्यां मा प्रमदितव्यम्’ म्हणजे ‘अध्ययन व अध्यापन करण्यात, अर्थात् शिकत राहण्यात व शिकवत जाण्यात बिलकुल चुकारपणा करू नकोस’ हे वाक्य सुचेल

किती सुंदर विचार आहे.
ही लेखमाला अतोनात आवडली. अतोनात!!! आपल्या आई-वडीलांना अभिवादन. अतिशय उत्तम संस्कार, शिकवण त्यांनी दिली आहे आणि ती इथे वाचकांबरोबर वाटून घेतल्याबद्दल धन्यवाद.
__/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ईतके विलक्षण आज मला वाचायला मिळाले, मला आज आदिती, मेघना, गवी, ह्यांचे हे संकेतस्थळ चालू ठेवल्याबद्दल आभार मानावेसे वाटत आहेत.
खरेच अप्रतीम विचार मांडले आहेत तुम्ही. लाईप्झीश ला जाउन पांडुरंग गुणे ह्यांची पुस्तके शोधाविशी वाटत आहे. अनेक धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लाईप्झीश ला जाउन पांडुरंग गुणे ह्यांची पुस्तके शोधाविशी वाटत आहे.

श्री. पांडुरंग दामोदर गुणे यांचे (कैसरकालीन/प्रथम महायुद्धपूर्वकालीन) जर्मनीचे/युरोपाचे प्रवासवर्णन येथे उपलब्ध आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरदस्त आहे! अनेक आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

तीनही लेख आवडले. बोटीने यूएसला जाण्यावर एक अनुभव कथन होऊ शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१९६४ साली बोटीवरून व नंतर उतरल्यावर मी आई-बाबांना लिहिलेली पत्रे माझ्याकडे आहेत. त्यांच्या साह्याने अनुभव लिहिता येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्या बात! हे काम लौकरात लौकर करावं ही वि०

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

जरूर लिहाच. वाचायला आवडेलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माझी पत्नी आय.आय.टी. त प्राध्यापिका असताना प्रा. लिमये विभागप्रमुख होते व मला त्यांच्या परिचयाचे भाग्य लाभले. त्यानंतर आज सुमारे पंचवीस-सव्वीस वर्षांनंतर ही लेखमाला वाचल्यावर हा माणूस एवढा थोर आहे व त्याचे आईवडील इतके लोकोत्तर, महान व कर्तबगार होते याची जाणीव झाली. आपल्या आईवडिलांचे व त्यांच्या जीवनकार्याचे इतके वस्तुनिष्ठ परीक्षण माझ्या वाचनात आलेले नाही. प्रा. लिमयांची ही लेखमाला वाचल्यावर एक मात्र नक्की: 'वटवृक्षाच्या सावलीत इतर झाडे वाढू शकत नाहीत' ही म्हण प्रा. लिमयांनी खोटी करून दाखवली आहे. त्यांच्याकडून अजून बरेच वाचायला मिळेल ही आशा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आश्विन होंकण

आपल्या आईवडिलांचे व त्यांच्या जीवनकार्याचे इतके वस्तुनिष्ठ परीक्षण माझ्या वाचनात आलेले नाही.

एक्झाक्टली असेच वाटले. फारच सुंदर झाली लेखमाला. ब्राव्हो...! अजून लिहा. लिहीत रहा. आम्ही वाचत राहू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणखी काही लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तीनही लेख अतिशय माहितीपुर्ण झालेत. वाचून खुप विशेष वाटलं. तुमचे आईवडील किती जगावेगळेच होते. असे लोकही असत पुर्वीच्या काळी हे वाचून थक्क झाले. प्रतिक्रिया देण्यासाठी मुद्दाम लाॅगिन बनवलेय. अजून लिहा. वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख वाचायच्या आधी लेखकाचा अल्प परिचय ओझरता वाचला. त्यावेळी मनात आलेले विचार: "IIT मध्ये बेचाळीस वर्षे काम केल्याचे लिहिले आहे. काय काम केले ते लिहिण्याचे शिताफीने टाळले आहे. इसम ज्युनिअर लिपिक किंवा हेडक्लार्क, रजिस्ट्रार (डोक्यावरून पाणी) वगैरे असावा. अर्थात ज्युनिअर लिपिक किंवा हेडक्लार्क असण्यात काही वाईट नाही. पण मग IIT वगैरेचा मोठेपणा उगीच का मिरवावा?" लेख वाचायला सुरुवात केल्यावर तिन्ही भाग वाचून झाल्यावरच थांबलो. लेखकाचे आई वडिल आणि खुद्द लेखक सुद्धा - ह्यांच्यासारखी माणसे असू शकतात ह्यावर आजकाल कुणाचा विश्वास कसा बसावा? अर्ध हळकुंड तर सोडाच, हळकुंड हा शब्द ऐकून माहित असेल तरी पिवळी होणारी माणसे सभोवती सर्वत्र दिसत असतात. If you are not flaunting it, then you haven't got it. असंच गृहीत धरायची सवय झाली आहे. इतक्या विनयशीलतेची सवय तर नाहीच, अपेक्षा सुद्धा करवत नाही. सर्वच खूप थोर व्यक्ती! लेखनाबद्दल काय बोलावं? लक्ष्मीबाईंच्या स्मृतिचित्रांची आठवण झाली इतकंच सांगतो. आम्हा सामान्यांच्या आयुष्यात एक असामान्यत्वाचा कवडसा पाडल्याबद्दल लेखकाला अनेकानेक धन्यवाद!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

‘कुठल्याही गोष्टीवर ‘वैदिक’ असा शिक्का मारून तिची किंमत वाढवण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही.’ किती योग्य विचार. म्हणूनच कुठल्याही भक्तगणांना (सगळ्याच धर्माचे अतिरेकी भक्त) अभ्यासक आवडत नाहीत. एवढ्या मोठ्या धर्माच्या पंडितांनी अंत्य संस्काराला नकार दिला हे पण विशेष लक्षात घेण्याजोगे आहे. डोळसपणे धर्म, इतिहास, आणि संस्कृतीकडे कसे पाहावे हे शिकवणाऱ्या माणसांची ओळख झाली. अतिशय अप्रतिम लेख माला. 

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रा. पांडुरंग दामोदर गुणे यांच्या `माझा यूरोपातील प्रवास' या पुस्तकातील कैसरकालीन/प्रथम महायुद्धपूर्वकालीन जर्मनीचे/युरोपाचे प्रवासवर्णन आताच पाहिले.
अप्रतिम आहे. तो कित्ता गिरवायला हवा. १९ मार्चलाच हा संदर्भ दिल्याबद्दल `न'वी बाजू यांचे खूप आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कृपा करून लिहा. तुमचे अनुभव उद्बोधक असतीलच आणि तुमची लिहायची शैलीसुद्धा खूप छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयायटीत शिकताना मी सरांचा विद्यार्थी नव्हतो, पण त्यांच्याबद्दल आदर बाळगून होतो. ही लेखमाला उत्कृष्ट आहे आणि त्याबद्दल इतर ऐसीकरांनी प्रशस्तीपर लिहिलेच आहे त्यामुळे पुनरुक्ती न करता, लेख वाचताना मला जाणवलेल्या इतर काही गोष्टींबद्दल लिहितो:

१. टिळकांचे मूळ वाक्य इंग्रजीत होते : Swaraj is my birthright and I shall have it. त्याचे मराठी भाषांतर “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवीनच” असे व्हावयास हवे. ‘It’ चा विषय swaraj हा आहे, birthright नव्हे. त्यामुळे ‘तो’ मी मिळवीनच, हे भाषांतर चुकीचे आहे, पण आता ते सर्वश्रुत झाले आहे.

२. विद्यार्थ्यांनी राजकारणात उतरावे की नाही आणि उतरावयाचे असल्यास कशा तऱ्हेने, याबद्दल गांधीजीप्रणित नेतृत्वाचे मत योग्य होते का, हा प्रश्नच आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षण अर्धवट सोडू नये, त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित ठेवून पदवी मिळवावी आणि मग चळवळीत उतरण्याबद्दल निर्णय घ्यावा, या मताचेही काही देशभक्त होते आणि त्यांपैकी एक गुरुदेव रवींद्रनाथ टागोर होते. शांतिनिकेतनात याबद्दल मतदान घेण्यात आले, आणि बहुमताचा निर्णय टागोरांच्या विरोधात गेला तेंव्हा त्यांनी त्याचा नम्रपणे स्वीकार केला असे मी वाचले आहे. माझ्या आजोबांच्या पिढीतील एक नातेवाईक मेडिकल कॅालेज सोडून चळवळीत उतरले, मग पुढे त्यांनी आयुर्वेदाचे शिक्षण घेतले, पण त्यात आपले चुकले, डॅाक्टर होऊन आपण समाजाच्या ज्यास्त उपयोगी पडू शकलो असतो, असे ते बोलून दाखवीत असत. त्यांचे एक सहाध्यायी, शिक्षण पूर्ण करून, मग गांधीजींच्या आवाहनास प्रतिसाद देऊन कायमस्वरूपी एका खेड्यात गेले आणि तिथे जवळपास नि:शुल्क प्रॅक्टिस करून खूप मोठ्या प्रमाणात रुग्णसेवा करते झाले. सरांच्या आईवडिलांनी या बाबतीत दोन वेगळे मार्ग निवडले आणि ते निभावले, हे विशेष.

३ . होमिओपथीच्या औषधांचा रामबाण उपयोग झाल्याची उदाहरणे आपण ऐकतो. विशेषत: असाध्य रोगांवर तो झाल्याची. यात रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना मिळालेला दिलासा अगदी समजण्यासारखा आहे. मात्र प्लसीबो इफेक्ट (किंवा तत्सम) anecdotal केसेसमधेसुद्धा, इतका प्रभावी कसा होऊ शकतो, हे एक कोडेच आहे.

————————————-

सरांनी “ऐसी”वर लिहीत रहावे, असा इतर ऐसीकरांबरोबर मीही त्यांना आग्रह करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

These are simply wonderful articles by Balmohan Limaye. Although these are about his parents, in the course of writing, these words also describe his own life - in other words, his own जीवन प्रवास. I fully agree with the comments by other readers about the honest and संवेदनाशील मनोद्गत of the writer.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0