पूर्वार्ध -
अमेरिकेत आल्यावर मुद्दामहून भारतीय लोकांशी ओळख काढण्याची मला गरज नव्हती. मुलं नसली आणि देवाधर्मावर विश्वास नसला की गरजा आपसूक खूपच कमी होतात. पण साला कोव्हिडचा फेरा आला. तोवर मी फक्त बाहेर बागकाम करायचे, पण आता घरातली झाडंही गोळा केली. त्या पाठोपाठ स्थानिक फेसबुक ग्रूप आले. मग तिथे भारतीयही आले.
एकीला माझ्याकडून कृष्णकमळाचा वेल हवा होता, म्हणून आम्ही चॅट करत होतो. माझ्या शेजारच्या डेबीकडे ती वेल आहे. तिच्याकडे जे नकोसे वेल उगवून येतात, ते काढून मी लोकांना वाटणार, असं मी जाहीर केलं होतं. तिनं मला खबर दिली, म्हणून मला सीव्हीएस नावाच्या मेडिकलमध्ये लशीची अपॉइंटमेंट मिळाली.
नोंद. हे भांडवलशाहीतलं मेडिकल आहे.
पाऊणच्या अपॉइंटमेंटसाठी मी घरातून सव्वाबाराला बाहेर पडले. नेहमीच्या रस्त्याला आले, आणि सिग्नलमुळे थांबावं लागलं. "मी नक्की कुठे चालल्ये? आता इथून सरळ जायचं का कसं?" आता गाडी चालवायची, कुठे जायची सवयच राहिलेली नाही. मी अर्ध्या रस्त्यात पोहोचले होते.
दुकानात शिरल्यावर एक आजोबा सगळ्यांची विचारपूस करत होता. मास्कमुळे बऱ्याच भावना लपवणं सोपं होतं. आश्चर्यसुद्धा.
आजोबांनी एका काउंटरवर पाठवलं. तिथे पूर्ण बाह्यांच्या टीशर्टवर युनिफॉर्म घातलेली, आणि डोकं चादरीनं झाकलेली एक मुलगी होती. तिनं माझं नाव, जन्मतारीख तपासली. मी स्वतःच्या कपड्यांकडे बघितलं. कोव्हिडच्या आधी हा टॉप मी फक्त घरीच वापरायचे. तिचा हेल ऐकून ती अमेरिकी असेल असं वाटलं. पण काही सांगता येत नाही. असं मला इनाबद्दलही वाटलेलं. ती अजूनही H1-Bसाठी रांगेत उभी आहे.
मग मी एका रांगेत गेले. समोर एक बारकी, बुटकी, गोरी आजी होती. तिच्या हातात चिकार कागद दिले होते; माझ्या हातात एक कार्ड होतं. मी पुन्हा खिसा चाचपला, कार्ड होतं. तिला एवढे कागद का दिले असावेत? मीच भलतीकडे उभी राहिलेली असणार. "ही रांग लशीसाठीच आहे ना?" मी आजीला विचारलं. "हो, हो. … माझ्या मुलाला अपॉईंटमेंट घेऊनही तासभर लागला होता. इथे चटकन काम उरकेल असं वाटतं." मग आजीच्या पुढचा काळा, मध्यमवयीन सूट म्हणाला, "काही भरवसा नाही. ही रांग पार त्या टोकाला सुरू होत्ये …" त्यानं दुकानाच्या दुसऱ्या टोकाला बोट दाखवलं.
रांग पुढे सरकली आणि मी मेकपच्या शेजारी जाऊन उभी राहिले. पुन्हा मी माझ्याकडे बघितलं. खुर्चीत मांडी घालून कामाला बसल्यामुळे विजारीवर चुण्या पडल्या होत्या. का त्या धुतल्यामुळे पडल्या होत्या?
मेकपसोबत एवढा वेळ मी आयुष्यात पहिल्यांदाच घालवला असेल. वेगवेगळ्या रंगांची लिपस्टिकं होती. ॲलर्जीमुळे माझे लालेलाल झालेले ओठ मास्कमुळे आपसूकच झाकलेले होते. शेजारची डेबी नेलपेंट लावत नाही, ती नखांवर स्टिकर लावते. चार नखांसाठी एकसारखा, प्लेन रंग आणि अनामिकेवर वेगळंच काही डिझाईन असतं. लिपस्टिकमध्ये असं काही करतात का? माझ्या ओठांची उजवी कड फाटलेली होती; डावी नुसतीच चुरचुरत होती.
हे मी मित्रांना सांगितलं. एक म्हणे, "हे फारच आधुनिकोत्तर आहे." म्हणजे काय ते सांगेना. आजूबाजूला काहीही दिसलं की कधी त्याचं वर्णन, कधी स्क्रीनशॉट काढून मी त्यांना पाठवते. "हे आधुनिकोत्तर आहे का?" त्यांनी उत्तरं दिली तर कदाचित माझ्या डोक्यात त्याचा पॅटर्न तयार होईल. मग कामासंबधी एखाद्या ठिकाणी बोलताना मला त्याबद्दल कॅज्युअली जोक करता येतील.
अजूनही मी मेकपमध्येच होते. मागे एक गोरा, मध्यमवयीन इसम आला होता. मी आजीकडे बघितलं. तिनंही मेकप वापरल्यासारखं वाटत नव्हता. आजीच्या पुढचा काळा आणि माझ्यामागचा गोरा कुठे बघत असतील हे बघायचा प्रयत्न केला तर त्यांना समजेल का? ते उंच असल्यामुळे त्यांना पलीकडच्या रांगांमध्ये काय विकायला ठेवलं होतं हे दिसत असेल का?
मग आम्ही मेकपमधून पुढे आलो. रांग डावीकडे वळली, आणि आता मेकप दिसेनासा झाला. डाव्या बाजूला रांगेला लंबरेषेत स्टँडवर वस्तू होत्या, त्या नीट दिसत नव्हत्या. उजव्या बाजूच्या भिंतीवर बरंच काही विकायला ठेवलेलं होतं. आधी ब्राच्या ॲक्सेसरीज आल्या. आहे त्या ब्राचं कन्फिगरेशन बदलण्यासाठी; स्तनाग्रं उचललेली दिसू नयेत म्हणून लावण्याचे पॅचेस. समजा या वस्तू काय आहेत याचा धांडोळा घेण्यासाठी मी तिकडे बघत राहिल्याचं मागच्या गोऱ्याला दिसलं तर त्याला कसंनुसं वाटेल का? तेवढ्यात दोन तरुण मुली आल्या. लिंबांवर टिंबं. त्यांना तिथलं काही तरी घ्यायचं होतं. "हां, तुम्हाला इथलं काही बघायचं आहे का?" मी विचारलं. त्या डोळ्यांनीच हो म्हणाल्या, मी हसून रांग जरा वाकडी केली. आता तो गोरा कुठे बघत असेल?
आता माझ्या शेजारी बेडपॅन आली होती. तीन ब्रँड होते. आकारसुद्धा होते निरनिराळे. त्यांच्या शेजारी आधारासाठी टेकवण्याच्या काठ्या होत्या. त्यांच्या मुठी बऱ्याचदा मोठ्या असतात असं मला वाटतं. बुटक्या लोकांसाठी उंची कमी करता येते, पण मूठ फार मोठी असेल तर बुटक्या लोकांच्या उंचीच्या प्रमाणात असलेल्या हातांत-बोटांत ती कशी मावणार? विचार करताना मी टाचा उंचावल्या, मग चवडे उंचावले. बराच वेळ उभं राहून पाय दुखतात. मग पाय असे हलवले की जरा तेवढाच बदल. 'हं, चुकीचे सँडल घातलेत मी', चपला घालायला हव्या होत्या.
रांग सरकली आणि बेडपॅनच्या मागच्याच बाजूची डंबेलं दिसली. पाच पौंडांच्या वर काही नव्हतं. समजा मी ती उचलली तर माझ्या दंडाचे स्नायू पीळदार दिसतील का? पाचाच्या जागी दहा पौंडांची उचलली तर जास्त पीळदार दिसतील का? त्याच्या शेजारी प्रोटीनच्या पावडरी होत्या. जॉड्रेलमध्ये मी पीएचडी करत होते, तिथे ॲडम मॉसही पीएचडी करत होता. तो सांड असलं जिन्नस पोटात घालायचा. खायचा का प्यायचा कोण जाणे, पण विश्वातला missing mass problem सोडवण्याचा हाच मार्ग आहे, हा जोक तिथे प्रसिद्ध होता. ॲडम त्याच विषयात पीएचडी करत होता. त्याची तेव्हाची मैत्रीण ज्यूली मला पाच-सहा वेळेलाच भेटली असेल, पण मी तिच्याशी जास्त गप्पा मारल्या होत्या.
त्या डंबेलांपलीकडे वॉकर होते. अलीकडच्या बेडपॅनवाल्या लोकांसाठी पलीकडे वॉकर. याचं यमक जुळत नाहीये. जिममध्ये मेसन नावाचा ट्रेनर कधीकधी एक गुंडाळी वापरतो, स्नायू आखडले असतील तर … ती तिथे होती. तिचं वजन किती असेल. इथे हातात घेतली तर लोक बिथरतील का, कोव्हिड काळात विकत न घ्यायच्या गोष्टी हातात घेऊन बघितल्या तर? मेसनला त्या स्तनाग्रं झाकणाऱ्या गोल पॅचेसची गरज आहे. कधीमधी टीशर्टातून त्याची स्तनाग्रं दिसतात. इंग्लंड जास्त थंड असतं तरी ॲडमची कधी दिसली नाहीत. तो तसले पॅचेस वापरत असेल का?
मग माझा नंबर आला. एक व्हिएतनामी किंवा थाई पुरुष मला आत घेऊन गेला. जरा उंच वाटला तो. त्याला ते कार्डं दिलं. लस घेण्यासाठी म्हणून मी बाही वर करायला गेले, पण तो टॉप मीच शिवलेला निघाला. मला बाह्या शिवायचा कंटाळा येतो. मग मी असाच हात पुढे केला. तो म्हणाला, "हात सैल सोड…. लशीनंतर कदाचित हात थोडा दुखेल." मी विचारलं, "सुजेल का? सुजला तर मला मेसनला जिममध्ये दाखवता येईल, 'बघ मी तुझ्यापेक्षा जास्त बलदंड आहे किमान आज तरी'."
तो म्हणाला, "तुला सगळं स्वस्तात हवंय तर." मी दात काढले. मग त्यानं हाताशी काही तरी केलं. "फार काही दुखलंखुपलं नाही रे एवढं टोचूनही." "तुला दुखायला हवंय का, करतो सोय!" तो तेवढ्याच शांतपणे म्हणाला. "नको, नको. लशीमुळे दुखेल असं म्हणाला आहेसच ना, तेवढ्यात चालवून घेईन." मग त्यानं माझ्या कार्डावर काही तरी लिहून ते मला परत दिलं. "पंधरा मिनीटं दुकानातच राहा. काही त्रास नाही झाला तर जा, झाला तर आम्हांला सांग."
मी दुकानात फिरायला लागले. सॅनिटरी नॅपकिन आणि काँडोम न चुकता एकमेकांच्या शेजारी असतात. यामागचं कारण मला अजूनही समजलेलं नाही. पण प्लॅन बी तिथे नसतात. तेवढ्यात आजीसमोरचा काळा माणूस फिरतफिरत तिथे आला. मी फेसबुक उघडलं. आशा भोसलेंवर कुणी तरी शे-पाचशे शब्द लिहिले होते. आणि त्याबद्दल कुणी आणखी एकांनी त्यांना 'सिनेसंगीत पत्रकारितेसाठी पीएचडी बहाल!' केली होती. सिनेसंगीत पत्रकारितेसाठी पीएचडी करताना बरोबर कुणी सर्वस्नायूसम्राट ॲडम मॉस असतील का? त्यांच्याबद्दल काय नर्डी जोक करता येतील?
दुकानात पुढे कॅन आणि वाईनच्या बाटल्या उघडण्याची यंत्रं होती. पण लिंबू पिळायचं नव्हतं. मला ते हवं होतं. पंधरा मिनीटं दुकानात वेळ काढायला सांगत आहेत, आणि मला हवंय ते काहीच विकत नाहीयेत. तिर्री मांजरीसाठी खायला काही निराळं मिळतंय का; तेही नव्हतं.
मग पाच इंची कुंड्यामंध्ये सक्युलंटं दिसली. इथे आत ठेवली तर महिन्याभरात ती उन्हासाठी हपापून लांबडी आणि विद्रूप होतील; मग ती स्वस्तात विकतील, तेव्हा मी विकत घेईन. लशीच्या दुसऱ्या डोसच्या वेळेस? तेरा डॉलर म्हणजे हे फारच महाग आहे. मग त्यांच्या आजूबाजूला बघितलं. एका सक्युलंटाचा तुकडा पडलेला दिसला. घड्याळात बघितलं. चौदा मिनीटं झाली होती.
ढगळ ट्राउजरच्या खिशात तो तुकडा टाकला आणि मी गाडीत बसले.
'मोगँबो का भतीजा हूं, आया हूं तो कुछ तो लेके जाऊंगा'
उत्तरार्ध -
आज, २१ दिवसांनी दुसरा डोस घेतला. रांग कमी होती. मेकपमधून सरळ चालत जाता आलं. आता मी कवळी धुण्याचं रसायन आणि स्तनांचा आकार वाढीव दाखवणाऱ्या उपकरणांच्या मध्ये उभी होते.
आज लशी घ्यायला जास्त वेळ लागत होता. त्या लस टोचणाऱ्या बाईनं इरीन असं नावाचा टॅग लावला होता. दिसायला तर ती स्नेहा किंवा माधवी असल्यासारखी दिसत होती. माझा नंबर आला तेव्हा साईड इफेक्ट्सची चर्चा झाली. मी म्हणाले, "मला गेल्या वेळेला फार त्रास झाला नाही. हात किंचित दुखत होता, लस दिली तिथे. दुसऱ्या दिवशी मी जिमला गेले तर काहीच वाढीव त्रास नाही. सगळंच अंग दुखायला लागल्यावर हाताकडे निराळं लक्ष जाईना!"
मग ती म्हणाली, "आज सकाळपासून मी ज्यांना लशी दिल्या त्यांत तुझाच दंड सगळ्यांत मोठा आहे." माझ्या समोर सगळ्या स्त्रियाच होत्या, हे खरं आहे.
दुकानात एकही सक्युलंट नव्हतं. मरो! कृष्णकमळाच्या वेली देऊन मला बुद्धाची एक प्रतिमा मिळाल्ये. ती छानशी गिफ्टरॅपमध्ये गुंडाळून आल्ये. ते उघडून बघायची इच्छा अजून झालेली नाही. ते जॉन अब्राहमचं पोस्टरही असू शकतं. पण देणाऱ्या बाईनं मला सांगितलंय, "माझा ना, बुद्धावर खूप विश्वास आहे. बुद्ध आपल्याला सगळ्यांना तारून नेईल या प्रकारांतून." ती पंजाबी आहे. तिला काँग्रेस आवडत नाही. आणि करोनाचा घोळ वगळता मोदीजींना पर्याय नाही, असंही ती म्हणाली. बुद्ध आणि मोदी दोघे विष्णूचा अवतार मानायचे का, असा प्रश्न मी तिला विचारला नाही.
आता लस टोचल्याला सात तास उलटून गेलेत. हात किंचितच दुखतोय. मी कॅथलिक नसल्यामुळे, लशीचा आनंद कमी होत नाहीये.