'मोगँबो का भतीजा हूं, आया हूं तो कुछ तो लेके जाऊंगा'

पूर्वार्ध -

अमेरिकेत आल्यावर मुद्दामहून भारतीय लोकांशी ओळख काढण्याची मला गरज नव्हती. मुलं नसली आणि देवाधर्मावर विश्वास नसला की गरजा आपसूक खूपच कमी होतात. पण साला कोव्हिडचा फेरा आला. तोवर मी फक्त बाहेर बागकाम करायचे, पण आता घरातली झाडंही गोळा केली. त्या पाठोपाठ स्थानिक फेसबुक ग्रूप आले. मग तिथे भारतीयही आले.

एकीला माझ्याकडून कृष्णकमळाचा वेल हवा होता, म्हणून आम्ही चॅट करत होतो. माझ्या शेजारच्या डेबीकडे ती वेल आहे. तिच्याकडे जे नकोसे वेल उगवून येतात, ते काढून मी लोकांना वाटणार, असं मी जाहीर केलं होतं. तिनं मला खबर दिली, म्हणून मला सीव्हीएस नावाच्या मेडिकलमध्ये लशीची अपॉइंटमेंट मिळाली.

नोंद. हे भांडवलशाहीतलं मेडिकल आहे.

पाऊणच्या अपॉइंटमेंटसाठी मी घरातून सव्वाबाराला बाहेर पडले. नेहमीच्या रस्त्याला आले, आणि सिग्नलमुळे थांबावं लागलं. "मी नक्की कुठे चालल्ये? आता इथून सरळ जायचं का कसं?" आता गाडी चालवायची, कुठे जायची सवयच राहिलेली नाही. मी अर्ध्या रस्त्यात पोहोचले होते.

दुकानात शिरल्यावर एक आजोबा सगळ्यांची विचारपूस करत होता. मास्कमुळे बऱ्याच भावना लपवणं सोपं होतं. आश्चर्यसुद्धा.

आजोबांनी एका काउंटरवर पाठवलं. तिथे पूर्ण बाह्यांच्या टीशर्टवर युनिफॉर्म घातलेली, आणि डोकं चादरीनं झाकलेली एक मुलगी होती. तिनं माझं नाव, जन्मतारीख तपासली. मी स्वतःच्या कपड्यांकडे बघितलं. कोव्हिडच्या आधी हा टॉप मी फक्त घरीच वापरायचे. तिचा हेल ऐकून ती अमेरिकी असेल असं वाटलं. पण काही सांगता येत नाही. असं मला इनाबद्दलही वाटलेलं. ती अजूनही H1-Bसाठी रांगेत उभी आहे.

मग मी एका रांगेत गेले. समोर एक बारकी, बुटकी, गोरी आजी होती. तिच्या हातात चिकार कागद दिले होते; माझ्या हातात एक कार्ड होतं. मी पुन्हा खिसा चाचपला, कार्ड होतं. तिला एवढे कागद का दिले असावेत? मीच भलतीकडे उभी राहिलेली असणार. "ही रांग लशीसाठीच आहे ना?" मी आजीला विचारलं. "हो, हो. … माझ्या मुलाला अपॉईंटमेंट घेऊनही तासभर लागला होता. इथे चटकन काम उरकेल असं वाटतं." मग आजीच्या पुढचा काळा, मध्यमवयीन सूट म्हणाला, "काही भरवसा नाही. ही रांग पार त्या टोकाला सुरू होत्ये …" त्यानं दुकानाच्या दुसऱ्या टोकाला बोट दाखवलं.

रांग पुढे सरकली आणि मी मेकपच्या शेजारी जाऊन उभी राहिले. पुन्हा मी माझ्याकडे बघितलं. खुर्चीत मांडी घालून कामाला बसल्यामुळे विजारीवर चुण्या पडल्या होत्या. का त्या धुतल्यामुळे पडल्या होत्या?

मेकपसोबत एवढा वेळ मी आयुष्यात पहिल्यांदाच घालवला असेल. वेगवेगळ्या रंगांची लिपस्टिकं होती. ॲलर्जीमुळे माझे लालेलाल झालेले ओठ मास्कमुळे आपसूकच झाकलेले होते. शेजारची डेबी नेलपेंट लावत नाही, ती नखांवर स्टिकर लावते. चार नखांसाठी एकसारखा, प्लेन रंग आणि अनामिकेवर वेगळंच काही डिझाईन असतं. लिपस्टिकमध्ये असं काही करतात का? माझ्या ओठांची उजवी कड फाटलेली होती; डावी नुसतीच चुरचुरत होती.

हे मी मित्रांना सांगितलं. एक म्हणे, "हे फारच आधुनिकोत्तर आहे." म्हणजे काय ते सांगेना. आजूबाजूला काहीही दिसलं की कधी त्याचं वर्णन, कधी स्क्रीनशॉट काढून मी त्यांना पाठवते. "हे आधुनिकोत्तर आहे का?" त्यांनी उत्तरं दिली तर कदाचित माझ्या डोक्यात त्याचा पॅटर्न तयार होईल. मग कामासंबधी एखाद्या ठिकाणी बोलताना मला त्याबद्दल कॅज्युअली जोक करता येतील.

अजूनही मी मेकपमध्येच होते. मागे एक गोरा, मध्यमवयीन इसम आला होता. मी आजीकडे बघितलं. तिनंही मेकप वापरल्यासारखं वाटत नव्हता. आजीच्या पुढचा काळा आणि माझ्यामागचा गोरा कुठे बघत असतील हे बघायचा प्रयत्न केला तर त्यांना समजेल का? ते उंच असल्यामुळे त्यांना पलीकडच्या रांगांमध्ये काय विकायला ठेवलं होतं हे दिसत असेल का?

मग आम्ही मेकपमधून पुढे आलो. रांग डावीकडे वळली, आणि आता मेकप दिसेनासा झाला. डाव्या बाजूला रांगेला लंबरेषेत स्टँडवर वस्तू होत्या, त्या नीट दिसत नव्हत्या. उजव्या बाजूच्या भिंतीवर बरंच काही विकायला ठेवलेलं होतं. आधी ब्राच्या ॲक्सेसरीज आल्या. आहे त्या ब्राचं कन्फिगरेशन बदलण्यासाठी; स्तनाग्रं उचललेली दिसू नयेत म्हणून लावण्याचे पॅचेस. समजा या वस्तू काय आहेत याचा धांडोळा घेण्यासाठी मी तिकडे बघत राहिल्याचं मागच्या गोऱ्याला दिसलं तर त्याला कसंनुसं वाटेल का? तेवढ्यात दोन तरुण मुली आल्या. लिंबांवर टिंबं. त्यांना तिथलं काही तरी घ्यायचं होतं. "हां, तुम्हाला इथलं काही बघायचं आहे का?" मी विचारलं. त्या डोळ्यांनीच हो म्हणाल्या, मी हसून रांग जरा वाकडी केली. आता तो गोरा कुठे बघत असेल?

आता माझ्या शेजारी बेडपॅन आली होती. तीन ब्रँड होते. आकारसुद्धा होते निरनिराळे. त्यांच्या शेजारी आधारासाठी टेकवण्याच्या काठ्या होत्या. त्यांच्या मुठी बऱ्याचदा मोठ्या असतात असं मला वाटतं. बुटक्या लोकांसाठी उंची कमी करता येते, पण मूठ फार मोठी असेल तर बुटक्या लोकांच्या उंचीच्या प्रमाणात असलेल्या हातांत-बोटांत ती कशी मावणार? विचार करताना मी टाचा उंचावल्या, मग चवडे उंचावले. बराच वेळ उभं राहून पाय दुखतात. मग पाय असे हलवले की जरा तेवढाच बदल. 'हं, चुकीचे सँडल घातलेत मी', चपला घालायला हव्या होत्या.

रांग सरकली आणि बेडपॅनच्या मागच्याच बाजूची डंबेलं दिसली. पाच पौंडांच्या वर काही नव्हतं. समजा मी ती उचलली तर माझ्या दंडाचे स्नायू पीळदार दिसतील का? पाचाच्या जागी दहा पौंडांची उचलली तर जास्त पीळदार दिसतील का? त्याच्या शेजारी प्रोटीनच्या पावडरी होत्या. जॉड्रेलमध्ये मी पीएचडी करत होते, तिथे ॲडम मॉसही पीएचडी करत होता. तो सांड असलं जिन्नस पोटात घालायचा. खायचा का प्यायचा कोण जाणे, पण विश्वातला missing mass problem सोडवण्याचा हाच मार्ग आहे, हा जोक तिथे प्रसिद्ध होता. ॲडम त्याच विषयात पीएचडी करत होता. त्याची तेव्हाची मैत्रीण ज्यूली मला पाच-सहा वेळेलाच भेटली असेल, पण मी तिच्याशी जास्त गप्पा मारल्या होत्या.

त्या डंबेलांपलीकडे वॉकर होते. अलीकडच्या बेडपॅनवाल्या लोकांसाठी पलीकडे वॉकर. याचं यमक जुळत नाहीये. जिममध्ये मेसन नावाचा ट्रेनर कधीकधी एक गुंडाळी वापरतो, स्नायू आखडले असतील तर … ती तिथे होती. तिचं वजन किती असेल. इथे हातात घेतली तर लोक बिथरतील का, कोव्हिड काळात विकत न घ्यायच्या गोष्टी हातात घेऊन बघितल्या तर? मेसनला त्या स्तनाग्रं झाकणाऱ्या गोल पॅचेसची गरज आहे. कधीमधी टीशर्टातून त्याची स्तनाग्रं दिसतात. इंग्लंड जास्त थंड असतं तरी ॲडमची कधी दिसली नाहीत. तो तसले पॅचेस वापरत असेल का?

मग माझा नंबर आला. एक व्हिएतनामी किंवा थाई पुरुष मला आत घेऊन गेला. जरा उंच वाटला तो. त्याला ते कार्डं दिलं. लस घेण्यासाठी म्हणून मी बाही वर करायला गेले, पण तो टॉप मीच शिवलेला निघाला. मला बाह्या शिवायचा कंटाळा येतो. मग मी असाच हात पुढे केला. तो म्हणाला, "हात सैल सोड…. लशीनंतर कदाचित हात थोडा दुखेल." मी विचारलं, "सुजेल का? सुजला तर मला मेसनला जिममध्ये दाखवता येईल, 'बघ मी तुझ्यापेक्षा जास्त बलदंड आहे किमान आज तरी'."

तो म्हणाला, "तुला सगळं स्वस्तात हवंय तर." मी दात काढले. मग त्यानं हाताशी काही तरी केलं. "फार काही दुखलंखुपलं नाही रे एवढं टोचूनही." "तुला दुखायला हवंय का, करतो सोय!" तो तेवढ्याच शांतपणे म्हणाला. "नको, नको. लशीमुळे दुखेल असं म्हणाला आहेसच ना, तेवढ्यात चालवून घेईन." मग त्यानं माझ्या कार्डावर काही तरी लिहून ते मला परत दिलं. "पंधरा मिनीटं दुकानातच राहा. काही त्रास नाही झाला तर जा, झाला तर आम्हांला सांग."

मी दुकानात फिरायला लागले. सॅनिटरी नॅपकिन आणि काँडोम न चुकता एकमेकांच्या शेजारी असतात. यामागचं कारण मला अजूनही समजलेलं नाही. पण प्लॅन बी तिथे नसतात. तेवढ्यात आजीसमोरचा काळा माणूस फिरतफिरत तिथे आला. मी फेसबुक उघडलं. आशा भोसलेंवर कुणी तरी शे-पाचशे शब्द लिहिले होते. आणि त्याबद्दल कुणी आणखी एकांनी त्यांना 'सिनेसंगीत पत्रकारितेसाठी पीएचडी बहाल!' केली होती. सिनेसंगीत पत्रकारितेसाठी पीएचडी करताना बरोबर कुणी सर्वस्नायूसम्राट ॲडम मॉस असतील का? त्यांच्याबद्दल काय नर्डी जोक करता येतील?

दुकानात पुढे कॅन आणि वाईनच्या बाटल्या उघडण्याची यंत्रं होती. पण लिंबू पिळायचं नव्हतं. मला ते हवं होतं. पंधरा मिनीटं दुकानात वेळ काढायला सांगत आहेत, आणि मला हवंय ते काहीच विकत नाहीयेत. तिर्री मांजरीसाठी खायला काही निराळं मिळतंय का; तेही नव्हतं.

मग पाच इंची कुंड्यामंध्ये सक्युलंटं दिसली. इथे आत ठेवली तर महिन्याभरात ती उन्हासाठी हपापून लांबडी आणि विद्रूप होतील; मग ती स्वस्तात विकतील, तेव्हा मी विकत घेईन. लशीच्या दुसऱ्या डोसच्या वेळेस? तेरा डॉलर म्हणजे हे फारच महाग आहे. मग त्यांच्या आजूबाजूला बघितलं. एका सक्युलंटाचा तुकडा पडलेला दिसला. घड्याळात बघितलं. चौदा मिनीटं झाली होती.

ढगळ ट्राउजरच्या खिशात तो तुकडा टाकला आणि मी गाडीत बसले.

लशीचं कार्ड

'मोगँबो का भतीजा हूं, आया हूं तो कुछ तो लेके जाऊंगा'

उत्तरार्ध -

आज, २१ दिवसांनी दुसरा डोस घेतला. रांग कमी होती. मेकपमधून सरळ चालत जाता आलं. आता मी कवळी धुण्याचं रसायन आणि स्तनांचा आकार वाढीव दाखवणाऱ्या उपकरणांच्या मध्ये उभी होते.

आज लशी घ्यायला जास्त वेळ लागत होता. त्या लस टोचणाऱ्या बाईनं इरीन असं नावाचा टॅग लावला होता. दिसायला तर ती स्नेहा किंवा माधवी असल्यासारखी दिसत होती. माझा नंबर आला तेव्हा साईड इफेक्ट्सची चर्चा झाली. मी म्हणाले, "मला गेल्या वेळेला फार त्रास झाला नाही. हात किंचित दुखत होता, लस दिली तिथे. दुसऱ्या दिवशी मी जिमला गेले तर काहीच वाढीव त्रास नाही. सगळंच अंग दुखायला लागल्यावर हाताकडे निराळं लक्ष जाईना!"

मग ती म्हणाली, "आज सकाळपासून मी ज्यांना लशी दिल्या त्यांत तुझाच दंड सगळ्यांत मोठा आहे." माझ्या समोर सगळ्या स्त्रियाच होत्या, हे खरं आहे.

दुकानात एकही सक्युलंट नव्हतं. मरो! कृष्णकमळाच्या वेली देऊन मला बुद्धाची एक प्रतिमा मिळाल्ये. ती छानशी गिफ्टरॅपमध्ये गुंडाळून आल्ये. ते उघडून बघायची इच्छा अजून झालेली नाही. ते जॉन अब्राहमचं पोस्टरही असू शकतं. पण देणाऱ्या बाईनं मला सांगितलंय, "माझा ना, बुद्धावर खूप विश्वास आहे. बुद्ध आपल्याला सगळ्यांना तारून नेईल या प्रकारांतून." ती पंजाबी आहे. तिला काँग्रेस आवडत नाही. आणि करोनाचा घोळ वगळता मोदीजींना पर्याय नाही, असंही ती म्हणाली. बुद्ध आणि मोदी दोघे विष्णूचा अवतार मानायचे का, असा प्रश्न मी तिला विचारला नाही.

आता लस टोचल्याला सात तास उलटून गेलेत. हात किंचितच दुखतोय. मी कॅथलिक नसल्यामुळे, लशीचा आनंद कमी होत नाहीये.

लस टोचल्यानंतर

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

दोन्ही फोटोंच्या ऐवजी फक्त काहीतरी झाकायची पॅडस दिसताहेत.

ल्यापट्वापावरून फोटो दिसले. फोनवरून दिसत नाहीयेत. बघते.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला फोनवरून दिसले. लॅपटॉपावरून पाहण्याचा प्रयत्न केला नाही, त्यामुळे त्याबद्दल कल्पना नाही.

असो चालायचेच.

----------

ता.क.: आज सकाळी मात्र फोनवरून दिसत नाहीयेत. काल छान दिसत होते.

आता पाहा, दिसतात का?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'स्ले 'स्ले!!

दिसताहेत आता.

लिंबांवर टिंबं.

ईईईईईईईईईई!!!!!!!!!!

मेसनला त्या स्तनाग्रं झाकणाऱ्या गोल पॅचेसची गरज आहे. कधीमधी टीशर्टातून त्याची स्तनाग्रं दिसतात. इंग्लंड जास्त थंड असतं तरी ॲडमची कधी दिसली नाहीत. तो तसले पॅचेस वापरत असेल का?

निरीक्षण बरीक बारीक आहे हो तुमचे!

सॅनिटरी नॅपकिन आणि काँडोम न चुकता एकमेकांच्या शेजारी असतात. यामागचं कारण मला अजूनही समजलेलं नाही.

हम्म्म्म्म्... असतात खरे!

आता, याचे कारण विचाराल, तर माझा अंदाज असा आहे, की एकविसाव्या शतकातल्या एकविसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्यातल्या पाचव्या तारखेला तुमच्यासारख्या कोणाची तरी असा प्रश्न विचारण्याची सोय व्हावी, म्हणून. (इट्स अ कॉन्स्पिरसी!)

एक तर हे तरी कारण असावे, नाहीतर मग 'का नाही?' हे तरी.

तसे, 'का नाही?' हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. म्हणजे, या दोन वस्तू दुकानात कोठेतरी ठेवणे तर प्राप्त आहे. मग त्या एकमेकांशेजारी जर ठेवायच्या नाहीत, तर मग त्या नक्की कोठे ठेवाव्यात, असे आपले म्हणणे आहे? कदाचित, केचपच्या शेजारी काँडोम आणि सोड्याच्या सेक्शनशेजारी सॅनिटरी पॅड ठेवल्यास ते अधिक सयुक्तिक तथा ग्राहकोपयोगी ठरेल, असे आपणांस वाटते काय? तसे असल्यास तशी सूचना अवश्य करून पाहावी. (ती बहुधा इग्नोरली जाईल, ही बाब अलाहिदा.)

इन एनी केस, तुम्हाला हा प्रश्न इतकाच भेडसावत असल्यास, खुद्द तेथल्या एखाद्या सेल्सपर्सनास वा मॅनेजरास का विचारून पाहात नाही? कदाचित तुमच्या शंकेचे निरसन होईलही. अन्यथा, जास्तीत जास्त काय होईल? कदाचित त्यांनाही या प्रश्नाचे उत्तर ठाऊक नसेल, इतकेच. (त्यांना माहीत असूनही ते सांगणार नाहीत ही शक्यता टाळण्यासाठी प्रेतातल्या वेताळासारखी एखादी कंडिशन त्यांच्यावर घालून बघता येईल.) इन द वर्स्ट केस, केवळ 'राष्ट्रीय परंपरा' याव्यतिरिक्त दुसरे कोणते उत्तर या प्रश्नास नसेलही. वेल, सो बी इट. एकदा का 'राष्ट्रीय परंपरा' म्हटले, की मग त्याला काही कारणमीमांसा नसते. मग अधिक प्रश्न विचारायचे नसतात. (अवांतर: दॅट वॉज़ अ हिंट.)

(तसेही, या दोन चिजा एकमेकांशेजारी नक्की का ठेवू नयेत?)

असो चालायचेच.

----------

'सोडा' बोले तो, अमेरिकन अर्थाने सोडा. बोले तो, कोणतेही फसफसणारे मद्यार्कविरहित पेय.

हा प्रश्न इतकाच भेडसावत असल्यास, खुद्द तेथल्या एखाद्या सेल्सपर्सनास वा मॅनेजरास का विचारून पाहात नाही?

घरातली ती फ्रेमसुद्धा उघडायची माझी तयारी नाहीये. तो बुद्ध असेल का जॉन अब्राहम का मिलिंद सोमण अशी शक्यता राहते.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला अमेरिकेतल्या मेकप सेक्शनची फार्फार आठवण आली.
हल्ली इथेही असतात मोठ्या मॉलमध्ये. पण अमेरिकेत इतर वेळी अंघोळही न करता ऑफिसला जाणाऱ्या आम्ही शनिवारी मेकअप सेक्शनमध्ये तासभर घालवायचो. तिथल्या बायका खूप खोटं बोलतात. त्यामानाने भारतीय मेकअपवाल्या उलट दिशेने प्रवास करतात, "ये देखिये, ये जो आपकी स्किन लूज हो रही हैं ना, ये क्रीम उसको टाईट करेगा!"

अमेरिकेत केवळ सरकारी दवाखान्यात किंवा इस्पितळातच लस मिळेल असे नसते का? सी व्हि एस ला काय इन्सेन्टिव्ह असतात लस वाटपात?

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

(सीव्हीएस ही मुख्यतः एक फार्मसी आहे. मुख्यतः ॲज़ इन, फार्मसी हा त्यांचा मुख्य धंदा आहे. परंतु साइडला केचप, बिस्किटे, मेकपचे सामान, टॉयलेट पेपर, वाईन (मर्यादित व्हरायटी), चॉकलेटे, स्क्रूड्रायव्हर तथा संकीर्ण घरगुती हार्डवेअर, प्रिंटरची कार्ट्रिजे (मर्यादित व्हरायटी), दूध, कोकाकोला, बॅटऱ्या, काँडोम, कॅमेऱ्याची मेमरीकार्डे (पूर्वी फिल्म विकत असत; नि पूर्वीच्या समृद्धीच्या काळात माफक प्रमाणात कॅमेरे सुद्धा.), हँड मिक्सर, सॅनिटरी पॅड्स, परफ्यूम्स, स्टेशनरी वगैरे सटरफटर मालसुद्धा विकतात. (थोडक्यात, गाढवाच्या गांडीत ज्याप्रमाणे काय वाटेल ते आढळते (कारण कोणी ना कोणी कधी ना कधी ते तेथे धाडून दिलेले असते), तद्वत, कदाचित तितक्या व्हरायटीत नव्हे, परंतु प्रातिनिधिक स्वरूपात तरी सीव्हीएसमध्ये बहुधा बरेच काही वाटेल ते आढळते.))

वॉलमार्टचे याच्या बरोबर उलट आहे. बोले तो, वॉलमार्टचा मुख्य धंदा हा जनरल स्टोअर अर्थात गा.ची गां. हा आहे. तेथे वरील संकीर्ण मालाव्यतिरिक्त टीव्ही, (कॅमेऱ्यापासून लॅपटॉपपर्यंत) संकीर्ण इलेक्ट्रॉनिक्स, किचन अप्लायन्सेस, स्प्रे पेंट्स, कपडे, तिजोऱ्या, भांडीकुंडी, बारके रेफ्रिजरेटर, भिंतीतले एअरकंडिशनर, मोटर ऑइल, माफक फर्निचर, टेबललँप, भिंतीवरील घड्याळे, माफक प्रमाणात मनगटी घड्याळे, काही शाखांमध्ये (झाडे, माती वगैरे) बागकामाचे सामान, तसेच काही शाखांमध्ये (यांना 'सुपर वालमार्ट' म्हणतात) सर्व प्रकारच्या ग्रोसऱ्या, असा मालमसाला मिळतो. त्याचबरोबर तेथे एक छोटासा फार्मसी सेक्शनसुद्धा असतो. तेथे लस (उपलब्ध असल्यास) मिळते.

तिसरा प्रकार म्हणजे आमच्या आग्नेय संयुक्त संस्थानांतील पब्लिक्स, प्रामुख्याने दक्षिण सं.सं.मधील क्रोगर, किंवा अन्यत्र अन्य नावांनी बोकाळलेल्या संकीर्ण प्रचंड ग्रोसरी चेन्स. यांचा मुख्य धंदा म्हणजे भाज्या, फळे तथा फळांचे रस, मांस, दूध, सर्व प्रकारचे संकीर्ण खाद्यपदार्थ (कच्चा माल तथा तयार पदार्थ), (काही राज्यांत त्या-त्या राज्याच्या कायद्यास अनुसरून) बियर, वाइन, तथा (काही तुरळक राज्यांत) हार्ड लिकरसुद्धा, हे विकणे हा आहे. त्याचबरोबर इतर सटरफटर मालमसालासुद्धा विकतात, त्याचप्रमाणे त्यांच्यात सहसा एखादा बारका फार्मसी सेक्शनसुद्धा असतो. काहीजण त्यात लशीसुद्धा ठेवतात.

(आणि, हो; अदितीचे निरीक्षण बरोबर आहे. फार्मश्या, वालमार्टे, ग्रोसऱ्या, जेथे जेथे म्हणून काँडोम आणि सॅनिटरी पॅड या दोन्ही चिजा विकतात, तेथे तेथे त्या एकमेकांशेजारी मांडलेल्या असतात. राष्ट्रीय परंपरा, दुसरे काय?)

----------

बाकी, फार्मसीत लस का मिळू नये, समजत नाही. आणि, इन्सेन्टिवचे म्हणाल, तर राज्य सरकारचे स्वास्थ्य विभाग त्यांना लशी वितरित करतात; बहुतकरून खाजगी इन्शुरन्स त्याचे पैसे भरतो; तर मग त्यांच्या बापाचे काय जाते लशी ठेवायला?

----------

अर्थात, हे सर्व झाले मोठ्या शहरांमध्ये. ग्रामीण भागांत ही असली वॉलमार्टे, फार्मश्या, मोठमोठी चेन ग्रोसरी दुकाने वगैरे नसतात. किंबहुना, दूरदूरवर दुकाने नसतात, नि सर्वसाधारण आरोग्यव्यवस्था (असलीच तर) तितपतच असते. क्वचित्प्रसंगी डॉलर जनरलसारखी चेन परंतु बारकीसारकी कन्व्हीनियन्स स्टोअरे, झालेच तर एखादे स्थानिक मॉम-अँड-पॉप शॉप वगैरे बहुतांश दैनंदिन गरजा पुरवितात. असल्या ठिकाणी अर्थात फार्मसी सेक्शन असण्याचा प्रश्न नसतो. तेथे लशींचे काय करतात, परमेश्वर जाणे.

(सर्वसाधारणपणे इंडिया आणि भारत यांच्यात जी तफावत आहे, तशाच प्रकारची तफावत शहरी आणि ग्रामीण अमेरिकेत आहे, असे म्हणता येईल. परंतु, त्या लोकांना त्याचे काही पडलेले नसते. देशाच्या किंवा आपल्या स्वतःच्या प्रगतीशी त्यांना काही घेणेदेणे नसते. परमेश्वर, बंदुकी, इतरवर्णीयांचा द्वेष यात ते खूष असतात. किंबहुना, प्रगतीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन काहीसा संशयाचाच असतो. रिपब्लिकनांचा हा मोठा बेस - वेळप्रसंगी अर्धा पाव खातील, परंतु रिपब्लिकनांना(च) जिंकवून आणतील! (मग बाकीचा देश - आणि ते स्वतःसुद्धा - गा.च्या गां.त का जाईना!))

असो चालायचेच.

फार्मसीत लस का मिळू नये, समजत नाही.

इथे तरी लसीमध्ये खासगी वितरण अलाऊड नाही. सो मेडिकलच्या दुकानात किंवा तुमच्या फ्यांमिळी डॉक्टरकडे ही लस मिळत नाही. सरकार सरकारी दवाखाने किंवा काही खासगी इस्पितळे इथूनच वितरण करण्याची परवानगी देते आहे.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

CVS किंवा क्रोगरसारख्या ठिकाणी लस मिळते ती टेक्निकली फार्मसीत मिळत नाही. या फार्मसींचे स्वतःचे दवाखाने आहेत (मिनिट क्लिनिक किंवा लिटिल क्लिनिक) तिथे लस टोचून मिळते. एक लशीची बाटली द्या ब्वॉ स्वरुपात फार्मसीच्या कौंटरवर देत नाहीत.

सरकारी दवाखाने नाहीत. किमान मी तरी पाहिले नाहीत.
CVS किंवा Kroger यांना इन्सेंटिव्ह आहेच.
1. लस दिल्यानंतर CVS आणि Kroger ह्या कामाचा क्लेम insurance company कडे देणार. त्यात नर्सचे काम, कापसाचा बोळा, spirit वगैरे पैसे लावणार.
2. या निमित्ताने CVS आणि Kroger सारख्या ठिकाणी छोटा दवाखाना आहे हे (पुन्हा एकदा) ग्राहकाच्या लक्षात येणार. उद्या माफक ताप वगैरे आला तर डॉक्टरकडे अपॉइंटमेंट घेऊन कडमडत जाण्यापेक्षा जवळच्या CVS किंवा Kroger मध्ये जाणे सोयीचे आहे.
3. आता CVS मध्ये आलोच आहे तर ग्राहकाला कंडोम वगैरे (किंवा sanitary pad) इथेच तातडीने घेऊन टाकता येते. सोबत दुधाची बाटली घेऊ शकतो. Possibilities are endless.

सरकारी दवाखाने नाहीत. किमान मी तरी पाहिले नाहीत.

हे तितकेही खरे नाही. बोले तो, माझ्या घरापासून दोन मैलांच्या अंतरावर आमच्या कौंटीच्या आरोग्यविभागाचे कार्यालय आहे. तेथे कधीकधी लशी मिळतात. (कोव्हिडबद्दल कल्पना नाही, परंतु, पूर्वी डुक्करतापाची लस तेथून टोचून घेतलेली आहे.)

मात्र, अशा सरकारी सुविधा त्या मानाने खूपच तुरळक आहेत, नि इतर पर्याय त्या मानाने पुष्कळच अधिक आहेत, हेही तितकेच खरे.

"आलोच आहोत तर" कसं? लशीनंतर १५ मिंटं दुकानात वेळ काढायला सांगतात की.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सो ही लस सरकार विकत घेऊन CVS किंवा तत्सम खासगी दुकानामधून लोकांना फुकट वाटते आहे का लोकांच्या मेडिकल इन्शुरन्सला याचे पैसे भरावे लागतात?

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सरकार फार्मश्यांना वितरण करीत आहे: हो.

फुकट आहे: हो. (मेडिकल इन्शुरन्स असला तरी किंवा नसला तरी. निदान जॉर्जिया सरकारची वेबसाईट तसे म्हणत आहे. सीव्हीएसचीसुद्धा. इतर फार्मश्यांच्या वेबसाइटी तपासल्या नाहीत.)

का लोकांच्या मेडिकल इन्शुरन्सला याचे पैसे भरावे लागतात?: लस देतेवेळी (किंवा खरे तर लशीकरिता अपॉइंटमेंट घेतेवेळी) मेडिकल इन्शुरन्सची माहिती घेतली जाते. मेडिकल इन्शुरन्स असल्यास इन्शुरन्सला त्याचे पैसे चार्ज होतात. इन्शुरन्स नसल्यास बहुधा सरकार खर्च उचलीत असावे. (त्याच्या मोडस ऑपरंडीबद्दल निश्चित खात्री नाही.) परंतु अंतिमतः ग्राहकाला फुकट मिळते.

सरकार वितरण करत आहे. ग्राहकांना फुकट असला तरी लस देणारे (प्रोवायडर्स) लोक इन्शुरन्स कंपन्या किंवा सरकारला त्याचे बिल पाठवत आहेत.
या दुव्यानुसार इन्शुरन्समध्ये कवर होत नसेल तर सरकार ही कॉस्ट भरपाई करणार आहे - https://www.hhs.gov/about/news/2021/05/03/hhs-launches-new-reimbursement...

लोकांना फुकट मिळते. आता मेडिकल इन्शुरन्सला पैसे भरावे लागतात का नाही हे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. बहुतांशी इन्शुरन्स प्लॅन्समध्ये प्रिवेंटिव केअर - लशीकरण हे अंतर्भूत असते. कोविड-19 लशीकरण प्रिवेंटिव केअर असल्याने त्याचे प्रीमियम लोकांनी आधीच भरुन ठेवलेले आहेत.
हेल्थप्लॅन इन्शुरन्स कंपन्यांनाही ही लस (फुकटात) देणे फायद्याचे आहे. उद्या एखाद्याला कोविड झाल्याने हॉस्पिटलायजेशन करावे लागले तर त्याचा बांबू बराच मोठा बसेल. त्यामानाने लस फुकटात वाटलेली बरी.

Aetna ची मालकी CVS कडे आहे. उद्या सगळे क्लेम्स भरपाईची वेळ येईल तेव्हा Aetna (किंवा सरकारी मेडिकेर) ने दिलेले पैसे CVS कडेच राहावे हा इन्सेंटिव्ह आहेच.

कृष्णकमळाच्या वेली वरती प्लॅस्टिकचा बुद्ध? महाग आहे सौदा. त्या बाईने घरातली अडगळ खपवली. Stay away. तुला भला नव्हता सौदा करायचा पण तिचा आखडता हात कळला. असो. फारच बायकी झालं असेल तर क्षमस्व. पण मला चिक्कू लोकांचा राग येतो.

क़पड्यातुन दिसणारि स्तनाग्रे का ते माहीत नाही पण याइक्सच वाटतात. यामागे काही उत्क्रांती संबंधित कारण आहे का राघा जाणोत.

ती उन्हासाठी हपापून लांबडी आणि विद्रूप होतील; मग ती स्वस्तात विकतील, तेव्हा मी विकत घेईन.

हाहाहा. त्रिवार सत्य.

उत्क्रांतीची कारणं का असावीत? माझ्या मते कपड्यांतून दिसणारी स्तनाग्रं छान असतात. तुम्ही योग्य ती पाहिली नसावीत.

घासकडवी, तुम्हाला ही आठवली का?
मला तिचं आडनाव देवनागरीमध्ये लिहून कोटी करायची फार इच्छा झाली होती. पण भिडस्त स्वभावामुळे नाही केली.

तुमच्या मर्यादाशीलतेचं मला कायमच कौतुक वाटत आलेलं आहे.

आम्हाला कोणकोण आठवल्या ते सांगता येत नाही. आमचं लक्ष्मणासारखं आहे. लक्ष्मणाने फक्त पायच पाहिले होते, तसं... आम्हीही तसे मर्यादा पाळणारे.

इतकी चर्चा झाल्यावर, ' कराग्रे वसते लक्ष्मी ... हे ही नवीन दृष्टीने पहावे.

यात काय नवीन सांगितलेत?

कोणालाही सुचू शकेल असा विनोद आहे हा.

मी फुकटात झाडं देत होते. ती अडगळ देऊन गेली. पण ते मिलिंद सोमणचं पोर्ट्रेट निघालं तर!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण ते मिलिंद सोमणचं पोर्ट्रेट निघालं तर!

तू ४ शॉटस प्लीज मालिका पाहीली की नाही. सोमण गायनॅक कम बॉयफ्रेन्ड आहे एका पात्राचा, पहील्यांदा गायनॅक असतो नंतर बॉयफ्रेन्ड होतो. त्या घटनांच्या दरम्यान त्या मुलीचे वाईल्ड इमॅजिनेशन. हॉट दिसतो तो अर्थातच. शर्टशिवाय वगैरे हॉट लव्हमेकिंग सिन्स आहेत.

पण तो बुद्ध निघाला आणि मग मालिका बघताना मला भलती चित्रं दिसायला लागली तर?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खी: खी:

क़पड्यातुन दिसणारि स्तनाग्रे का ते माहीत नाही पण याइक्सच वाटतात. यामागे काही उत्क्रांती संबंधित कारण आहे का राघा जाणोत.

राघांना काय माहीत आहे ते राघा जाणोत. पण सदर विषयाबद्दल Why Women Have Sex नावाचं पुस्तक वाच.

Why women have sex

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आमचे येथे ड्राईव्ह-इन लशीकरण झाल्याने ही करमणूक हुकली. असो, असो!

रांग डावीकडे वळली, आणि आता मेकप दिसेनासा झाला...
उजव्या बाजूच्या भिंतीवर बरंच काही विकायला ठेवलेलं होतं.

हे फारच प्रतीकात्मक झालं. विशेषत: CVS म्हणजे Consumer Value Store चे लघुरुप असल्याने!

मुलं नसली आणि देवाधर्मावर विश्वास नसला की गरजा आपसूक खूपच कमी होतात.
-हे एकदम पटलं आहे.
मोगॅम्बोच्या भतीजीने आणलेलं रोप वा रोपाचा तुकडा रुजला की नाही?

हो, हो, रुजलंय. हे बहुतेक tradescantia जातीचं आहे. जमिनीत टाकलं तरी लागतं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सुंदर!!
You celebrate life. शिकण्यासारखे आहे Smile
'आझाद मुझे बहना है - बेखौफ मुझे जीना है' हे सत्यमेव जयते चे गाणे ऐकत होते. वेगळ्याच प्रतलावर घेउन जाते ते गाणे. मस्त वाटते. फार फार सुंदर.
https://www.youtube.com/watch?v=SA4m_rcSwqs

"आया हूं तो कुछ तो लेके जाऊंगा" उगाच नाही होत!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.