मराठी भाषेची आधुनिकता – काही टिपणं

#संकल्पनाविषयक #मन्वंतर #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२१

मराठी भाषेची आधुनिकता – काही टिपणं

- चिन्मय धारूरकर

१. भाषा आधुनिक होतात म्हणजे काय या प्रश्नाला दोन अंगं आहेत. एक इतिहासाचं आणि दुसरं भाषेचं. इतिहासाच्या अंगाने आधुनिकता या पातळीवर विश्लेषण झालेलं आहे. परंतु भाषेची आधुनिकता याचा विचार (इतिहास केंद्रस्थानी न ठेवता म्हणजे इतिहास हा अभ्यासाचा, विचारणेचा लक्ष्यविषय न ठेवता) भाषेला केंद्रस्थानी ठेवून प्राधान्याने किंवा विस्तारपूर्वक विचार झालेला दिसत नाही. मुळात भाषेतिहास हा भागच स्वतंत्रपणे, उदारहस्ते इतिहासात हाताळलेला नाही. सांस्कृतिक, सामाजिक किंवा राजकीय इतिहासात जाताजाता भाषेबाबत काही नोंदी येतात तितपतच भाषेतिहासाची गौणरीत्या नोंद घेतली जाते.

२. एक तपशिलाचा भाग म्हणून नोंदवतो – भाषाविज्ञानात ऐतिहासिक भाषाविज्ञान (Historical Linguistics) म्हणून ज्ञानशाखा आहे. तिचा वाङ्मयविद्या (Philology) या ज्ञानशाखेशी घनिष्ठ संबंध आहे. भाषिक पुराव्यांच्या, नोंदींच्या आधारे भाषेचे जुने टप्पे नोंदवत जाणं आणि कालक्रमात भाषाबदल कसकसा होत गेला याची इत्थंभूत नोंद ठेवणं, यांवर आधारित ऐतिहासिकदृष्ट्या सजातीय भाषांची वर्गवारी करून त्यांची कुलनिहाय विभागणी करणं ही ऐतिहासिक भाषाविज्ञानाची काही कार्यं. भाषेतिहास मात्र केवळ या भाषेच्या रूपनिष्ठ बदलांमध्ये स्वारस्य घेणारे विचारक्षेत्र नसून व्यापक इतिहासात भाषेची सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी कार्यं काय होती, ती कशी बदलत गेली याचा अभ्यास करणं होय.

३. भाषेतिहासाकडे त्या अर्थाने स्वतंत्र लक्ष पुरवलं गेलेलं नाही. भाषेतिहासलेखन कसं करावं याबाबतही इतिहासलेखनशास्त्र फारसं सजग दिसत नाही. या लेखात आपण भाषेच्या इतिहासातलं एक महत्त्वाचं स्थित्यंतर पाहणार आहोत आणि ते म्हणजे आधुनिकता. अर्थात ही आधुनिकता भाषेला येऊन भिडते तेव्हा भाषेच्या रूपात नेमके कोणते बदल होतात, हे बदल नेमके कसे अभ्यासले गेले आहेत, याचे इतर आयाम काय आहेत हे आपण इथे पाहणार आहोत. भाषेचं रूप असं म्हणत असताना भाषेचं भौतिक रूप अभिप्रेत आहे. त्यात ध्वनी, शब्द, पदबंध, वाक्य, शैली इत्यादी गोष्टी येतात. उदाहरणादाखल यांतले काही पैलू आपण इथे हाताळणार आहोत.

४. या दृष्टीने सगळ्यात कळीचा प्रश्न म्हणजे भाषा आधुनिक होते म्हणजे काय, हा. आधुनिक भारतीय भाषांच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर शोधताना आपण जर भाषेचं रूप कसकसं बदलत गेलं हे पाहिलं तर भाषेच्या आधुनिकतेची ती रूपनिष्ठ उकल ठरेल. तसे प्रयत्न झालेले आहेत – पाहा, पोतदार (१९२२, १९७६), Nemade (1990). या अभ्यासांचं सार असं – आधुनिक मराठी ही इंग्रजीच्या गद्याने इतकी प्रभावित झालेली आहे की ती जणू इंग्रजी गद्याचंच एक रूप आहे.

४.१. आधुनिक मराठी गद्याच्या विकासाचा एक उपयुक्त, धावता परामर्श वाचण्यासाठी पाहा भोळे (२००६)मधील भा. ल. भोळेलिखित प्रस्तावना. पोतदारांच्या लिखाणात (पोतदारलिखित प्रस्तावनेची ही पाने पाहा – २ ते ५) इंग्रजीच्या प्रभावाबाबत एक शल्य दिसतं आणि मराठीची आधीची गद्यपद्यपरंपरा आधुनिक गद्याशी काही नातं सांगत नाही याबाबत खेदही व्यक्त होतो. नेमाडे (१९९०) [Nemdade (1990)] आणि देशपांडे व राजाध्यक्ष (१९८८) [Deshpande and Rajadhyaksha (1988)] यांच्या मतांचा सारांश भोळे [२००६ (२०१२): XIII, XIV] अशा शब्दांत मांडतात –

[…] हे तर खरेच आहे की अव्वल इंगजी आमदनीत लिहिल्या गेलेल्या मराठी गद्याची शैली आणि भाषा ही पेशवेकालीन किंवा तत्पूर्वीच्या गद्याच्या परंपरेशी जुळणारी नव्हती. किंबहुना परंपरेशी असलेले तिचे सर्वच दुवे निसटलेले होते. जणू काही नवी शब्दरचना व वाक्यरचना यासह एक नवी भाषाच निर्माण केली जात होती. [ठाशीव टंक माझा] परकीय माणसाच्या मराठी बोलण्याप्रमाणे ती विचित्र आणि अडतअडखळत चालणारी होती. आपण एका संपूर्णतया अविकसित भाषेला नवा घाट आणि नेमकेपणा प्रदान करीत आहोत असा पाश्चिमात्यांचा आविर्भाव होता आणि त्यांचे नेतृत्व मराठी शास्त्रीपंडितांनीही निमूटपणे पत्करून तेही नव्या विषयावर पण विचित्र व ओबडधोबड मराठी गद्य लिहीत होते किंवा इंग्रजी ग्रंथांचे बाळबोध मराठी भाषांतर करत होते.

पुढे यावर आपले भाष्य नोंदवताना भोळे [२००६ (२०१२): XIV] म्हणतात –

थोड्या विचारांती मात्र वरील आक्षेपातला फोलपणा ध्यानात येऊ शकतो. हे सर्वश्रुतच आहे की मराठी गद्याचा पाया तेराव्या शतकात हेमाद्रीपंतांच्या लेखनकल्पतरूने व महानुभाव पंथाच्या साहित्याने घातला. पण थेट शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत गद्यलेखनाचा फारसा विकास झाला नव्हता. स्वराज्याचे साम्राज्य झाले तसतशी राजकारणाची व व्यवहाराची व्याप्ती वाढली आणि भाषेलाही नवा तजेला लाभला. […] पण स्वराज्य गेले आणि मराठीचे वैभवही लोपले हे पोतदारांचे विवेचन मान्य केले तरीही एकोणिसाव्या शतकारंभी मराठी समाजाच्या बौद्धिक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने मराठी गद्याचा हा वारसा कितीसा उपयुक्त ठरला असता हा प्रश्न शिल्लक उरतोच.

४.२. वरील उद्धरणाच्या अनुषंगाने मी काही निरीक्षणं अगदी थोडक्यात नोंदवतो –

४.२.१. आधुनिकतेच्या आगमनासह काही नवीन भूमिका भाषेला बजावायच्या होत्या – तिला ज्ञानभाषा व्हायचं होतं, तिला शिक्षणाची माध्यमभाषा व्हायचं होतं. तिला कायदे आणि प्रशासनासाठी सज्ज व्हायचं होतं, तिला सार्वजनिक संवादाचं माध्यम व्हायचं होतं इत्यादी – या साऱ्यासाठी तिला तिचं शब्दभांडार उभारायचं होतं आणि मुख्य म्हणजे तिला अशी एक इहवादी शैली तयार करायची होती. ही शैलीनिर्मिती म्हणजे केवळ वाक्याचे आणि पदबंधाचे बाज नव्हते तर एका व्यापक पातळीवर अभिव्यक्तीचे नाना प्रकार तिला साकारायचे होते. वर्तमानपत्री मराठी, कायद्याची मराठी, शालेय आणि उच्चशिक्षणाची मराठी, सरकार दफ्तरी वापरली जाण्याची मराठी, नवे साहित्यप्रकार व्यक्त करू शकणारी मराठी अशा एक ना अनेक नवीन संहिताप्रकारांना मराठीच नव्हे तर सगळ्याच आधुनिक भारतीय भाषांना सज्ज व्हायचं होतं. त्यामुळे आपल्या मध्ययुगीन अभिव्यक्तीशी जैविक नातं राखणारी भाषा अशा प्रसंगी बदलणार होतीच आणि त्यासाठी दुसऱ्या कोणत्या तरी ज्ञानभाषेचं प्रारूप त्यांच्यासमोर असणार होतंच.

४.२.२. त्यामुळे इथे भाषांतर ही केवळ भाषिक पातळीवरची घटना उरत नाही, तर एका व्यापक आधुनिकतेची वाहक होऊ शकणारी भाषा निर्मिती होत होती. या आधुनिकतेचं भाषांतर होत असताना समोर इंग्रजी होती आणि अनेक आधुनिक भारतीय भाषांसमोर एक आधुनिक भाषा तर मध्ययुगातल्या आणि प्राचीनातल्या अभिजात भाषा असे पर्याय होते. असं असलं तरीही इंग्रजीला टाळून सर्वस्वी संस्कृत, प्राकृत, फारशी, द्रविडमूळ या पर्यायांना घट्ट चिकटून राहणं अवघड होतं कारण या भाषांचं एक निश्चित प्रयोजन आधुनिक होऊ पाहणाऱ्या भाषांच्या अभिरुचिव्यवस्थेत पक्कं झालेलं होतं. या स्रोतांकडून येणाऱ्या शब्दभांडाराचं एक क्षेत्र होतं आणि ते विस्तारण्याचं काम कालक्रमात घडणार होतं. त्यामुळे नवी शैली विकसित करत असताना या स्रोतांपेक्षा इंग्रजीचा आधार सुटसुटीत वाटला असावा. किंबहुना हा इंग्रजीचा आधार आहे आणि आपण एक भाषांतरित आधुनिकता उभी करत आहोत म्हणजे काहीतरी चूक करत आहोत अशी जाणीव त्या काळात नसणंही साहजिकच होतं. त्यामुळे मागे वळून पाहताना इंग्रजीचा प्रभाव गडद वाटत असला तरी आधुनिकतेचा प्रवास जसा घडला आहे त्यात प्रत्येक भाषेला आपला एक आधुनिक चेहरा गवसला आहे हे निश्चित.

४.२.३. अनेक आधुनिक भारतीय भाषांच्या परिभाषानिर्मितीत संस्कृतने शिरकाव केला. अर्थात हा विकास औपचारिकरीत्या किंवा कार्यालयीन पातळीवर खूप अलीकडचा, पण संस्कृताकडून पारिभाषिक शब्दांची उसनवारी करणं हा उपाय ढळढळीत दिसून येतो. इथे हे लक्षात घ्यायला हवं की हा संस्कृतचाही आधुनिक असाच अवतार आहे. कारण आधुनिक ज्ञानव्यवस्थांसाठी परिभाषा तयार करताना त्या त्या भारतीय भाषेत संस्कृत शब्दांचं स्थान कसकसं आहे त्यानुसारच ही उसनवारी शक्य होते. कारण अनेकदा भारतीय भाषांत संस्कृत शब्द हे निराळ्याच अर्थाने येतात किंवा त्यांच्या अर्थांत थोडा फरक असतो. उदाहरणार्थ, मलयाळममध्ये या संस्कृत शब्दांचा अर्थ असा होतो – मत्सर – स्पर्धा, विकार – भावना, भावना – कल्पना इत्यादी. त्यामुळे संस्कृत शब्दांचा वापर सरसकट सर्व भारतीय भाषांत समानरीत्या करता येत नाही. अरबी-फारसी मुळाच्या शब्दांची उसनवारी करताना अनेक आशियाई भाषांना या भाषांतून आपल्या भाषेत आधीच आलेल्या शब्दांच्या अर्थाच्या सापेक्षच ही उसनवारी शक्य होती. त्यामुळे केवळ शब्दरूप संस्कृत किंवा अरबी-फारसी आहे म्हणजे हे प्राचीनतेशी, अभिजात ज्ञानपरंपरांशी नातं सांगणं नव्हे, तर केवळ त्या भाषांची शब्दघटना आपल्या भाषेत जितपत रुजवून घेता येईल तितपत घेणं असा तो भाग आहे.

४.२.४. १८०० ते १८७४ या काळाला भाषांतरयुग म्हणणं ठीक आहे पण म्हणून अनेकदा त्याची हेटाळणी तमोयुग अशी केली जाते. यातून आपल्याला त्या काळाबद्दल कमी माहिती मिळते परंतु अशी हेटाळणी करणाऱ्यांच्या भाषांतराबद्दलच्या दृष्टिकोनाबद्दल पुष्कळ माहिती मिळते. अशी संभावना ते [ते कोण यासाठी पाहा भोळे (२००६: XXV, XXVI)] का करतात किंवा त्यांचा दृष्टिकोन तसा का आहे तर – त्यात भाषांतर ही दुय्यम प्रक्रिया असते आणि त्यातून नेहमी कमअस्सल असंच काही तरी निपजत असतं हे गृहीतक असतं. हे गृहीतक कुठून येतं, तर मुद्रणसंस्कृतीच्या आगमनानंतर छापील कृतीचा लेखक हा प्रधान, त्या कृतीचा कायदेशीर मालक, स्वामित्वहक्कधारक बनतो व त्यामुळे भाषांतरप्रक्रिया ही त्या प्रताधिकाराच्या नजरेतून एक दुय्यम प्रक्रिया ठरते. वास्तवात मुद्रणाच्या आगमनाआधी आपल्या किंवा जगाच्या भाषांतर-इतिहासात असं श्रेणीकरण दिसून येत नाही. थोडक्यात मराठीच्या आधुनिक असण्यात ती भाषांतरित वाटते म्हणून तिच्यात खोट काढणं हे आधुनिकतेला नीट समजून न घेतल्यामुळेच होत असावं किंवा अशी उतरंड मानणं हेही आधुनिकतेच्या आरंभकाळापासून चालत आलेलं आहे.

५. आधुनिकतेकडे मी वळण्याचं कारण असं – गेल्या दोन दशकांत अनेक भारतीय भाषांना अभिजात दर्जा देण्याचा सपाटा भारत सरकारने लावला. हे ज्या गतीने झालं ते पाहता सर्वच परिशिष्टगत भाषा आता लवकरच अभिजात ठरतील असं दिसतं. अर्थात यात आधुनिक भाषांच्या मध्ययुगीन आणि प्राचीन अवस्थांवर – प्राकृत आणि मध्य व प्राचीन द्रविड भाषांवर भाषावैज्ञानिक प्रकाश टाकणं हा उदात्त हेतू नसून त्यामागे एक संस्कृतिलक्ष्यी राष्ट्रवाद आहे असं दिसतं. नाही तर प्रत्येक भाषेला असा दर्जा देत बसण्यापेक्षा प्राकृतभाषांचं एक गंभीर अध्ययन केंद्र सुरू केलं तरी पुरेसं आहे. या दिशेने मराठी ही अभिजात भाषा नाही अशी भूमिका मी घेतलेली आहे. त्यामुळे आपल्या भाषांचं आधुनिकपण तपासणं मला महत्त्वाचं वाटतं म्हणून भाषांच्या आधुनिकतेत मला रस आहे.

६. या दिशेने मी मराठीतल्या आणि एकूण भारतीय भाषांतल्या इंग्रजी शब्दांच्या उसनवारीवर विचार करत आहे. आणि इंग्रजी शब्दांची उसनवारी ही केवळ आपण कसे इंग्रजी जाणणारे आहोत अशी प्रौढी मिरवणं या सीमित हेतूने स्पष्ट होणारी बाब राहिलेली नसून एक अनौपचारिकता किंवा औपचारिकता व्यक्त करण्याचा भाग त्या वापरात आहे अशी मांडणी मी केलेली आहे. यातला काही अंश या व्हिडिओतही पाहता-ऐकता येईल. त्याचा सारांश असा – मराठीत आपण हार्ट अटॅक, ॲडमिट, हॉस्पिटल इत्यादी शब्द सर्रास वापरतो. यांना हृदयविकाराचा झटका, दाखल, रुग्णालय असे पर्यायी शब्द असूनसुद्धा. कारण – ते पर्यायी शब्द एक वेगळा भाषाव्यवहार दर्शवतात. तो व्यवहार हा औपचारिक, वर्तमानपत्री इत्यादी काहीही असू शकतो. पण आपला कोणी आप्त अशा बिकटप्रसंगात असताना आपण मराठी शब्द बहुतकरून न वापरता इंग्रजी शब्दच वापरू. दुसरं उदाहरण – मिस्टर. याला यजमान, पती, नवरा, धनी इत्यादी पर्याय असले तरी प्रत्येक पर्याय हा कोणतं तरी वेगळंच वापराचं क्षेत्र दर्शवतो. यजमान – पूजा, यज्ञविधी, पती – कायदेशीर, नवरा – अनौपचारिक, धनी – ग्रामीण. त्यामुळे यांपैकी काहीच नको आणि इंग्रजीतून उसनवारी होते. अर्थात इंग्रजीतून होणाऱ्या उसनवारीची कारणमीमांसा मोठी आहे, ती इथे टाळत आहे.

आधुनिक भारतीय भाषा या इंग्रजीला वेगवेगळ्या प्रकारे सामावून घेतात. एक छोटासा प्रयोग म्हणून आपल्या घरातल्या खोल्यांना आपण आजच्या मराठीत काय म्हणतो हे पाहिलं तरी आपल्या घराचा ले-आऊट हाच मुळी किती आधुनिकताजन्य आहे हे त्यातल्या इंग्रजी शब्दांच्या उपस्थितीवरून कळून येईल – हॉल, बेडरूम, बाथरूम, किचन इत्यादी. फर्निचरमधल्या वस्तूंनाही इंग्रजी शब्द चटकन उपस्थित होत आहेत. पण देवघर हे एक असं ठिकाण आहे जिथल्या वस्तूंसाठी मात्र आपल्याला मराठीशिवाय इतर शब्द सुचत नाहीत, तिथे इंग्रजी शब्दांचा शिरकाव झालेला नाही. परंतु, माजघर, मोरी, बळद इत्यादी शब्द आता जुनाट (archaic) किंवा अप्रचलित (obsolete) होत आहेत. तर दिवाणखाना, बैठकीची खोली हे अद्याप तग धरून आहेत. स्वयंपाकघर मात्र असं ठिकाण आहे जिथे आधुनिकतेसह आलेले इंग्रजी शब्द आणि परंपरेने चालत आलेले मराठी शब्द, दोन्ही एकत्र नांदत आहेत. थोडक्यात, आधुनिकता ही अशा प्रकारे इंग्रजीमार्फत आपल्या काही भाषिक वापराची क्षेत्रं आणि भौतिक जागा व्यापत आहे.

७. अनेक भारतीय वांशिक (एथ्निक) अस्मितांमध्ये, तमीळ आणि बंगाली या वांशिक अस्मितांइतकी भाषिक अस्मिता तितक्या प्रखरपणे दिसून येत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मराठी. मराठी अस्मितेचे बंध किंवा व्यवच्छेदक अंश हे भाषेशी बांधलेले नसून भूप्रदेश (मराठा तितुका मेळवावा), भक्तिभाव (विठ्ठल, गणपती), इतिहास (शिवाजी महाराज, मराठ्यांचा इतिहास) या गोष्टींशी नातं सांगणारे आहेत. बंगाली किंवा तमीळ यांच्या भाषिक अस्मितेसमोर मराठीची भाषिक अस्मिता ही क्षीण आहे, मराठी वांशिक अस्मितेमध्ये भाषिक कथन हे तितकं तीव्र निश्चितच नाही. तसंच ते गुजराती, मल्याळम, ओडिया, पंजाबी या भाषांच्या बाबतीतही तितकं प्रखर नाही. का? याचं एक कारण असं असू शकतं - प्राची देशपांडे इतिहास आणि स्मृती यांच्या संदर्भात त्यांच्या पुस्तकात चर्चा करतात. त्यातल्या प्रस्तावनेत त्या इतिहास आणि कल्पित, इतिहास आणि अनैतिहासिकता (विनय लाल प्रणीत ahistoricity ही संकल्पना) यांची चर्चा करतात आणि अखेरीस त्या त्यांच्या स्मृती या संकल्पनेच्या हाताळणीबाबत असं म्हणतात – […]

त्यामुळे मी इथे स्मृती असा प्रयोग करत असताना मला त्यात एखाद्या आघाताचं तंतोतंत स्मरण अपेक्षित नाही किंवा आधुनिक इतिहासलेखनाच्या आधीचं आधुनिकपूर्व रूप असंही काही अभिप्रेत नाही. मी जेव्हा ऐतिहासिक स्मृती असा प्रयोग करते तेव्हा मला एका आधुनिक घटिताबद्दल बोलायचं असतं. आणि ते वेगवेगळ्या सांस्कृतिक व्यवहारांमधून आकाराला येत असतं. [भाषांतर माझं.] [देशपांडे (२००७: ६)].

देशपांडे जे इथे ऐतिहासिक स्मृतीबाबत म्हणत आहेत, ते खरं तर अनेक आधुनिक भारतीय भाषांच्या घडणीलाही लागू होतं. वर उल्लेखलेल्या भाषांची (तमीळ व बांगला सोडून) नाळ आपण कितीही प्रयासाने मध्ययुगीन भाषासंस्कृतीशी जोडण्याचा प्रयत्न केला किंवा प्राचीन प्राकृतापर्यंत त्यांचं सातत्य कल्पिलं तरीदेखील या भाषिक अस्मिता किंवा भाषाच मुळी एका विशिष्ट आधुनिकतेचं फलित आहेत. त्या आधुनिक नसून जुन्या आहेत असं म्हणून ते सिद्ध करण्याचा प्रयत्न हादेखील त्यांच्या आधुनिकस्मृती-निर्मितीचा किंवा ती स्मृती दृढ करण्याचा प्रयत्न आहे असं म्हणावं लागेल.

तळटिपा :
लिहिल्या गेलेल्या भाषेतिहासाची काही मोजकी उदाहरणं अशी – Ostler (2006, 2007 व 2016), Schulman (2016) व Mohan (2021).
या दृष्टीने मराठीतील काही उदाहरणं – कुलकर्णी (१९५९), कुलकर्णी (१९६३), पोतदार (१९७६).
भाषा या घटिताच्या इतिहासातलं एक महत्त्वाचं स्थित्यंतर म्हणजे माणसाला बोलता येणं हे होय. मुळात माणसाच्या कंठाची, स्वरयंत्राची रचना बोलण्यासाठी झालेलीच नव्हती. माणसाचा कणा जसजसा ताठ होत गेला तसतसे कंठाच्या रचनेत बदल होत गेले आणि स्वरयंत्र आणि एकूणच मुखविवर बोलण्यासाठी विविध भाषिक ध्वनी उच्चारता येण्यासाठी अधिक उपलब्ध झाले. या अर्थी भाषा हा एक अपघात आहे. यावर मराठीतून अधिक वाचण्यासाठी पाहा गोखले (२०१७).
यावर सविस्तर वाचण्यासाठी पाहा Venuti (1995:9). भाषांतर-अध्ययन (Translation Studies) या ज्ञानशाखेत मूळ आणि भाषांतरित संहिता यांतील ही उतरंड आणि दुजाभाव व त्याच्या मर्यादा हा कॉमन-सेन्सचा भाग झाला आहे.

संदर्भ -
इंग्रजी
* David Schulman (2016) Tamil: A Biography. Cambridge, MA and London: The Belknap Press of Harvard University Press.
* Deshpande Kusumavati and M. V. Rajadhyaksha (1988) A history of Marathi Literature. New Delhi: Sahitya Akademi.
* Deshpande Prachi (2007) Creative Pasts. Ranikhet: Permanent Black.
* Mohan Peggy (2021) WANDERERS, KINGS, MERCHANTS: The Story of India Through its Languages. Gurgaon: Penguin Random House.
* Nemade, Bhalchandra [2014 (1990)] The influence of English on Marathi A Sociolinguistic and Stylistic Study. Mumbai: Popular Prakashan.
* Nicholas Ostler (2006) Empires of the Word: A Language History of the World. London and New York: Harper Perennial.
* Nicholas Ostler (2007) Ad Infinitvm. New York: Walker and Co.
* Nicholas Ostler (2016) Passwords to Paradise. London and New York: Bloomsbury Press.
* Venuti Lawrence (1995) The Translator’s Invisibility. London and NY: Routledge.

मराठी –
* कुलकर्णी, कृ० भि० (१९५९) आधुनिक मराठी गद्याची उत्क्रांती. मुंबई: मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय.
* कुलकर्णी, कृ० पां० (१९६३) मराठी भाषा उद्गम आणि विकास. पुणे: मॉडर्न बुक डेपो.
* गोखले करुणा (२०१७) चालता बोलता माणूस. पुणे: राजहंस.
* पोतदार, द० वा० (१९७६) मराठी गद्याचा इंग्रजी अवतार अथवा इंग्रजी अमलातील मराठी गद्यवाङ्मयाचा
* निबंधमालेपूर्वीचा इतिहास (१८१०-१८७४). पुणे: व्हीनस प्रकाशन.
* भोळे, भा. ल. (२००६) (सम्पा०) एकोणिसाव्या शतकातील मराठी गद्य खंड -१. नवी दिल्ली: साहित्य अकादमी.
* मालशे, स. गं. (१९८९) गतशतक शोधितांना. पुणे: प्रतिमा प्रकाशन.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

या दिवाळी अंकात आतापावेतो आलेल्या लेखांपैकी जे फार थोडे लेख मुद्दाम वेळ काढून वाचण्यालायक वाटले / ज्यांच्या प्रस्तुत अंकातील अंतर्भावामुळे अंकाचे सार्थक झाल्यासारखे वाटले, त्यांपैकी अग्रणी लेख.

अन्यथा, रद्दीचा भरणा आहेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Conscious तळटीपा Bias

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

“लेखक केरळ केंद्रीय विद्यापीठ, कासरगोड येथे भाषाविज्ञान विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत.” माशाल्ला! तुह्मी ऐसीवर आणखी लिहायला हवे.

मराठीचे “अभिमानी” (ज्यांचे मठाधिपती बहुधा राजीव साने!) मराठीत तांत्रिक लिखाण करताना इंग्रजीतील पारिभाषिक शब्दांच्या जागी संस्कृत शब्द ओढूनताणून आणण्याचा प्रयत्न करतात त्याची मला दया येते. ते मराठी शब्द नव्हेत, हे ते विसरतात.

मराठीतील लेखांत पारिभाषिक शब्द वापरायचे झाल्यास त्या अर्थाच्या जवळचे प्राकृत, तद्भव, किंवा बहुतांश मराठीभाषकांस माहिती असलेले तत्सम (चू.भू.द्या.घ्या) चालतील, पण मराठीत अस्तित्वातच नसलेले, संस्कृतातून “बनवून” आणलेले, किंवा फक्त esoteric मराठी कोषांतच असलेले तत्सम शब्द मराठी लेखांत वापरावेत की नाही याबद्दल मला संशय वाटतो. त्याऐवजी प्रचलित, अचूक इंग्रजी शब्द वापरणे ज्यास्त योग्य होय असे मला वाटते.

संस्कृतमधे लिहिता-बोलताना हवे तितके संस्कृत शब्द किंवा शाब्दिक क्लृप्त्या वापराव्या. पण “मराठीत” लिहिताना तसे करू नये असे मला तीव्रतेने वाटते.

राजगुरूनगरवरून भीमाशंकरकडे जाताना लागणाऱ्या एका नदीकाठी (ती बहुधा भीमाच असावी!) एका टपरीवजा सरकारी इमारतीशेजारी “सरिता मापन केंद्र” अशी पाटी पाहिली आणि फुटलो! “नदी मोजणीघर” ह्मणले असते, तर काय मेले असते काय?

Disclaimers:

१ माझे संस्कृतवर प्रेम आहे आणि संस्कृत साहित्यातील (त्यात वेदादि ग्रंथही आले) काही सौंदर्यस्थळांनी मी भारावून गेलो आहे. त्यासंबंधी मी “ऐसी” वरही लिहिले आहे.

२ माझे मराठीवरही प्रेम आहे, आणि तिच्या संस्कृतेतर भाषिक माता, आणि आज्यांबद्दल (तमिळादि) मला आस्था आहे. मराठी एक “अभिजात भाषा” आहे हे माझ्या मते, त्या भूमिकेचे समर्थक मानतात तितके निर्विवाद नसले, तरी तिचे संस्कृतबाह्य भाषिक DNA हे तिच्या संस्कृत DNA इतकेच, किंबहुना माझ्या मते त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. संस्कृत प्रभावाबाहेरच्या भाषा आणि संस्कृतींचे (!) फार मोठे संचित मराठीस लाभलेले आहे, आणि मराठी बहुजनांच्या भाषेत आणि बोलींमध्ये ते भरपूर आढळते. मी त्यात बोलत/लिहीत नाही, पण ती माझी मर्यादा आहे.

३. मला इथल्या कुणावरही हेत्वारोप बिल्कुल करायचे नाहीत. पण….. थोडी ऐतिहासिक, भाषाशास्त्रीय - आणि राजकीयसुद्धा - जाणीव दाखवणे योग्य होईल असे मला वाटते.

“पश्चमस्तिष्कपुच्छ” आणि त्यासारखे इतर शब्द शालेय पुस्तकांत वापरणे हे भाषिक आणि सामाजिक विकृतीचे लक्षण आहे. संस्कृत ही “अभिजनांची” आणि एकेकाळी “इतरेजनांस” वापरण्यास सक्त मनाई असलेली (शंबुक”वधाची” कथा आठवा!) भाषा होती, आणि किंबहुना त्यामुळेच ती आज मृतप्राय आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

... मला संस्कृत येत नाही; कंटाळा येतो संस्कृत वगैरेंचा. तरीही तुम्ही जितक्या पोटतिडकीनं हे असे "दया येते"छाप प्रतिसाद देता, तसे मलाही लिहिता येतील. तुम्हाला खूप काही म्हणायचं असावं अशी शंका येते; पण अशा प्रतिसादांत काहीच म्हणलेलं नसतं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ1

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुमच्या मताचा आदर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

हा प्रतिसाद. लेखाबद्दल, त्याचा विषय, मांडणी, विचार यांबद्दल अवाक्षर नाही. मात्र भाषेबद्दल फक्त ताशेरे. कृती नाहीच. मग त्याबद्दल आदरतरी कसा वाटणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ1

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

... मला संस्कृत येत नाही; कंटाळा येतो संस्कृत वगैरेंचा. तरीही तुम्ही जितक्या पोटतिडकीनं हे असे "दया येते"छाप प्रतिसाद देता, तसे मलाही लिहिता येतील.

खरे आहे. दया वगैरे वाया घालवण्यासारखे लोक नाहीयेत ते. आपल्या दयेचे इतकेही अवमूल्यन करू नये. (किंवा, मराठीत: आपली दया इतकीही स्वस्त करू नये.)

तुम्हाला खूप काही म्हणायचं असावं अशी शंका येते; पण अशा प्रतिसादांत काहीच म्हणलेलं नसतं!

जागा चुकली काय? हे खरे तर शेक्सपियरचे व्यवच्छेदक लक्षण आहे. किंवा, आमचे. उगाच त्यांना चिकटवून/चिटकवून का देता?

(फॉरदॅट्मॅटर, तुमच्यादेखील प्रतिसादांत कधी कोठे काय म्हटलेले असते? सेम पिंच!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मराठीतील लेखांत पारिभाषिक शब्द वापरायचे झाल्यास त्या अर्थाच्या जवळचे प्राकृत, तद्भव, किंवा बहुतांश मराठीभाषकांस माहिती असलेले तत्सम (चू.भू.द्या.घ्या) चालतील, पण मराठीत अस्तित्वातच नसलेले, संस्कृतातून “बनवून” आणलेले, किंवा फक्त esoteric मराठी कोषांतच असलेले तत्सम शब्द मराठी लेखांत वापरावेत की नाही याबद्दल मला संशय वाटतो. त्याऐवजी प्रचलित, अचूक इंग्रजी शब्द वापरणे ज्यास्त योग्य होय असे मला वाटते.

अगदी.

राजगुरूनगरवरून भीमाशंकरकडे जाताना लागणाऱ्या एका नदीकाठी (ती बहुधा भीमाच असावी!) एका टपरीवजा सरकारी इमारतीशेजारी “सरिता मापन केंद्र” अशी पाटी पाहिली आणि फुटलो! “नदी मोजणीघर” ह्मणले असते, तर काय मेले असते काय?

हिंदी पट्ट्यातील रेल्वे स्थानकांवरील थंड पाण्याच्या नळांवर ‘शीतल जल’ अशी (सरकारी) हिंदी पाटी पाहिलेली आहे. सरकारी असल्याकारणाने, तेथे ‘ठंडा पानी’ असे लिहिलेले अजिबात चालले नसते. तेच दिल्लीच्या रस्त्यांवर थंड पाणी विकणाऱ्या हातगाड्यांवर मात्र ‘मशीन का ठंडा पानी १० पैसे गिलास’ असा साधा स्वच्छ मामला असे.

(असो. या धाग्यावर हे बहुधा अवांतर आहे.)

माझे मराठीवरही प्रेम आहे, आणि तिच्या संस्कृतेतर भाषिक माता, आणि आज्यांबद्दल (तमिळादि) मला आस्था आहे.

कन्नड भाषेचा प्रभाव मराठीवर निदान एके काळी तरी पुष्कळ होता, इथवर ऐकून आहे, परंतु… तमिळ ही मराठीची आजी कशी काय बुवा? (केवळ ‘अडगुलं मडगुलं’ म्हणून?)

(प्रभाव तसा फार्सी भाषेचाही पुष्कळ होता एके काळी, नि इंग्रजीचा आजही आहे. ते ठीकच आहे. परंतु, म्हणून त्या आज्या? की आणखी काही निकष आहे?)

मला इथल्या कुणावरही हेत्वारोप बिल्कुल करायचे नाहीत. पण….. थोडी ऐतिहासिक, भाषाशास्त्रीय - आणि राजकीयसुद्धा - जाणीव दाखवणे योग्य होईल असे मला वाटते.

हे समजले नाही. असो.

“पश्चमस्तिष्कपुच्छ” आणि त्यासारखे इतर शब्द शालेय पुस्तकांत वापरणे हे भाषिक आणि सामाजिक विकृतीचे लक्षण आहे.

हे पटण्यासारखे आहे, परंतु… मग इंग्रजी पाठ्यपुस्तकांत त्याकरिता medulla oblongata असा जो शब्द योजतात (चूभूद्याघ्या.), नि प्रचलित आहे, त्याची काय वासलात लावायची?

(अर्थात, इंग्रजीने केले, म्हणून मराठीने केलेच पाहिजे, असे अर्थातच नाही. शिवाय, त्यांच्यात तो शब्द आता निदान काही शतके तरी वापरात असावा. आता बॅक टू (जर्मॅनिक) रूट्स जाणे हे बहुधा अवघडही जाईल, नि कौंटरप्रॉडक्टिवही ठरेल. किंबहुना, अट्टाहासाने असा (उलट) बदल करणे हेदेखील सामाजिक विकृतीचेच लक्षण होईल बहुधा.)

असो. अदितीबैंचे घर आपण उन्हात बांधू, हं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

युक्तिवादाचे फलित हे आहे :
>>आपण कितीही प्रयासाने मध्ययुगीन भाषासंस्कृतीशी जोडण्याचा प्रयत्न केला किंवा प्राचीन प्राकृतापर्यंत त्यांचे सातत्य कल्पिले तरीदेखील या भाषिक अस्मिता किंवा भाषाच मुळी एका विशिष्ट आधुनिकतेचे फलित आहेत. <<
हे बरोबर समजलो, अशी आशा आहे.
अवांतर : एक प्राचीन परंपरेशी नाळ जोडली तर मला सोयीचे होईल. प्राचीन न्यायसूत्रांतल्या वर्णनानुसार जो निष्कर्ष (निगमन) असणार, तो सुरुवातीला (प्रतिज्ञा) म्हणून सांगायला पाहिजे. असे केल्यास मला तरी युक्तिवादाच्या प्रवाहाकडे सहज लक्ष देता येते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0