रणांगण/Battlefield

Battlefield - Jerry Pinto

'.. हिंदूंची संघटणे हिंद्वेतर जातीचा मागमूस उरू नये याच ध्येयाने उद्या रक्ताचे पूर वाहवणार आहेत का? राष्ट्रीय मुक्तीच्या आड येणाऱ्या आजच्या छोट्या मोठ्या जमाती; त्यांच्यावरचे परकीय सत्तेचे स्वार्थी रक्षण उद्या नाहीसे झाले तर त्यांचे आजचे अपराध उद्या विसरले जातील का? तर काय सुधारणेबरोबर हे द्वेषाचे डोंब भडकत जाणार? गेल्या युद्धाचा सूड हे यहुद्यांचे शिरकाण. मी गोंधळून गेलो. जर्मनीची बाजू खरी असेल; पण माझ्यासमोरचा हा साधा यहुदी. याचा काय अपराध असेल? मग याचा बळी का जातो आहे? व्यक्तीचे संकट मोठे की राष्ट्राची गरज मोठी? आजच नव्हे; शतकानुशतके ज्यू जात छळांची बळी झाली आहे. पण आजच्या या छळाला विशिष्ट, नवा अर्थ आहे. याची पुनरावृत्ती निरनिराळ्या देशांच्या इतिहासात होणार आहे का?मुसलमानांनी जिंकून हिंदुस्थान आपला देश केला, पारशांनी भीक मागून, आश्रय मिळवून हिंदुस्थान आपला देश केला - असल्या राष्ट्रीय सूडाचे नाझी तत्वज्ञान इतिहासात मूळ धरून बसले तर मानवी सुधारणेची ..'

१९३९ साली प्रकाशित झालेल्या, विश्राम बेडेकर लिखित 'रणांगण' या कादंबरीतील आजही विचार करायला लावणारा असा हा उतारा. चक्रधर विध्वंस
नावाचा उच्चभ्रू मराठी तरुण, दुसऱ्या महायुद्धाची चाहूल लागताच इंग्लंड सोडून मायदेशी परतायला निघतो. इटलीमधून बोटीने प्रवास सुरू होताच, त्याच्या बोटीवर हिटलरच्या तावडीतून निसटून पळून जाणारे अनेक ज्यू निर्वासित आहेत हे त्याच्या लक्षात येतं. त्यातच त्याला हॅर्टा नावाची जर्मन ज्यू तरुणी भेटते. मग चक्रधर - हॅर्टाची वादळी प्रेमकथा मध्यवर्ती ठेवून बोटीवर तयार झालेल्या त्या काळच्या 'प्रति-जगाचं' चित्रण ही कादंबरी करते. वर दिलेल्या परिच्छेदासारखे अनेक परिच्छेद या कादंबरीत आहेत, त्यातले प्रश्न दुर्दैवानं आजही विचारले जातायत. कदाचित ही कादंबरी बाहत्तर वर्षांपूर्वी लिहिलेली असूनही आजची वाटते, म्हणून २०२१ साली जेरी पिंटोंनी तिचा इंग्रजी अनुवाद (Battlefield, Publisher: Speaking Tiger, 2021) केला. मूळ कादंबरी आणि अनुवाद दोन्ही मी एकत्र वाचले.

या कादंबरीचा निवेदक - चक्रधर - ‘शहाणा’ माणूस आहे. समोर दिसणाऱ्या परिस्थितीकडे थंड डोक्यानं बघायचं; आणि तिचं विश्लेषण करायचं कसब त्याच्यात आहे. त्यामुळेच, समोर आलेल्या अनेक बिकट - कधी काळजाचा ठाव घेऊ पाहणाऱ्या तर कधी क्षुब्ध करू पाहणाऱ्या - प्रसंगांतही तो त्या परिस्थितीमागची कारणं वाचकांसमोर ठेवू शकतो. प्रेमाच्या आणि प्रणयाच्या बाबतीतही तो अनुभवसंपन्न असल्याने असेल, किंवा भावनांच्या आहारी न जाण्याचा एक हिशोबी कोरडेपणा अंगी असल्यामुळे असेल, समोर आलेल्या हॅर्टा नामक वादळालाही तो अत्यंत व्यावहारिकपणे, सारासार विचार करून, पेलत असतो . प्रेमात हातचं राखून वागणाऱ्या माणसांबद्दल जी एक प्रकारची तिडीक डोक्यात जाते तसं त्याच्याबद्दल वाटत राहतं. पण तो त्याच्या विचारांवर ठाम आहे.

तो म्हणतो, '.. हॅर्टावर माझे प्रेम आहे. पण हॅर्टाशी लग्न करणे शहाणपणाचे होईल का? प्रेम निराळे आणि लग्न निराळे. विवाह ही प्रेमाची परिणीती नव्हे. तो प्रेमाचा शिळा पोळा आहे! महाराष्ट्रातल्या अनेक प्रीती विवाहांचे इतिहास मला ठाऊक होते. त्या माणसांच्या मनांचे निखारे विझून आता कोळसे आणि राख उरली आहे! प्रीतिविवाहाच्या कादंबऱ्या मी वाचतो. त्या सगळ्या विवाहापूर्वीच्या प्रीतीचा सुंदर, धीराचा प्रवास रंगवतात. लग्नानंतरच्या प्रीतीचा शिळेपणा ओळखण्याचे धारिष्ट्य कुणाला होत नाही. जिथे सुरुवात व्हावी तिथे शेवट करून मोकळे होतात..'

चक्रधरचा हा थंडपणा या कादंबरीचा कणा आहे. तो कदाचित असा रंगवला नसता, तर त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारी हॅर्टा वाचकांना इतकी आवडली नसती. बोटीवरचं जग क्षणभंगुर आहे. प्रवास संपला की हे सगळंच संपणार आहे. आणि आपण आपलं नेहमीचं एकसुरी आयुष्य जगणार आहोत हे मुळातच मान्य करणारा चक्रधर; आणि त्याच्या प्रेमात वेडी होऊन कुठल्याही परिस्थितीत त्याची होऊ पाहणारी हॅर्टा, हे दोन ध्रुव असल्यामुळेच ही कादंबरी खिळवून ठेवते. इथे चक्रधर (थंड डोक्याचा, काहीसा हिशेबी) पुरुष आहे आणि हॅर्टा (हळवी, प्रेमात स्वतःला विसरू पाहणारी) स्त्री आहे. हे स्वभावधर्म काहीसे पारंपरिक समजुतींना धरून आहेत. पण चक्रधराचा स्वभाव असलेली हॅर्टा आणि तिच्यासारख्या स्वभावाचा चक्रधर असता तर ही कादंबरी आहे त्याहीपेक्षा रोचक झाली असती हे माझं वैयक्तिक निरीक्षण नोंदवल्याशिवाय राहवत नाही. 'प्रेम निराळे आणि लग्न निराळे' म्हणणारी मराठी हॅर्टा चितारली जावी अशा काळात आपण नक्कीच आहोत असं ही प्रेमकथा वाचताना वाटून गेलं.

बोटीवर अनेक धर्मांचे, जातींचे प्रवासी आहेत. मिळून प्रवास करत असताना, अनेक चर्चा आणि मतभेदही होतात. अगदी आजही अनुभवायला मिळणारी पासपोर्टांची उतरंडही या कादंबरीत अचूक पकडली आहे. एका थांब्यावर काळ्या कातडीच्या पण ब्रिटिश पासपोर्ट असलेल्या चक्रधराला बोट सोडून बाहेर फिरण्याची मुभा असते. गोऱ्या कातडीच्या ज्यू हॅर्टाला मात्र तिच्या जर्मन पासपोर्टमुळे बोटीबाहेर पाऊल ठेवता येत नाही. बोटीवर एकत्र आलेले लोक पुढे येणाऱ्या युद्धाच्या आणि त्यामुळे होऊ घातलेल्या वाताहतीच्या दबावाखाली असतात. ज्यांना जायला घरं आहेत अशा लोकांची पाठही ही भीती सोडत नाही. पण या सगळ्या तणावात, बोटीवरच्या सगळ्यांना लळा लावणारा एक लहान मुलगा - लुई - बेडेकरांनी फार खुबीनं लिहिला आहे. चक्रधरचा डॉक्टर मित्र शिंदे आणि लुईची दोस्ती, हॅर्टा आणि चक्रधरच्या प्रेमकथेइतकीच उत्कट आहे.

बेडेकरांनी बोटीवर असं जग वसवलं असलं तरी ते कुठेही मुद्दाम केल्यासारखं किंवा खोटं वाटत नाही. बोटीवरील लोकांचे आपापसात झालेले वाद, चर्चादेखील कधीही तिथे मुद्दाम एखादा राजकीय मुद्दा मांडण्यासाठी पेरल्या आहेत असं वाटत नाही. इतकं असूनही, ही कादंबरी ११४ पानांत आटपली आहे. पण ती वाचताना एखादा जाडजूड खंड वाचल्यासारखं वाटतं.

जेरी पिंटोंचं भाषांतर चोख आणि गणिती चपखलतेनं केलं आहे. मी प्रत्येक प्रकरण मूळ मराठीपाठोपाठ इंग्रजीमध्ये वाचलं. भाषांतर शब्दाशब्दाचे हिशोब ठेवून केलं असलं तरीही दिलेल्या शब्दमर्यादेत भाषांतर बसवताना कुठेही एखाददुसरा शब्द अधिकउणा झाल्यासारखा वाटत नाही हे त्याचं वैशिष्ट्य आहे . किंबहुना, अनेक ठिकाणी पिंटोंच्या शब्दसंपदेतून एक-एक समानार्थी शब्द निरखून-पारखून मग त्यांनी योग्य शब्दाची निवड केली आहे असंच वाटावं अशा वाक्यरचना आहेत. ही कादंबरी बऱ्यापैकी कॉस्मोपॉलिटन वातावरणातली आहे, जे पिंटोंच्या पथ्थ्यावर पडलं आहे असं म्हणता येईल. गोष्ट चक्रधरची असली, तरी तिचा बाज पूर्णपणे इंग्रजी आहे. मूळ कादंबरी न वाचता ती वाचली तर ते भाषांतर वाटणार नाही इतपत सहज आहे.

उदाहरणार्थ:
'.. ऑगस्ट महिना उजाडला. सगळीकडे उन्हे पिऊन शेते, कुरणे तरारली होती. त्यावर कापणीच्या विळ्या-कोयत्यांच्या उड्या पडू लागल्या. हंगाम संपला की, महायुद्ध सुरु होणार अशा वार्ता सुरु होत्या. जर्मनीचे सर्वाधिकारी शस्त्रे परजून ठेवीत होते. मृत्यू आपल्या कापणीची वाट बघत होता!..'

'..August now. Everywhere the fields and meadows have absorbed the heat and the scythes begin to fall on the standing grain. Once the season ends, the war will begin, or so everyone says. Germany is rearming. Death bides its time, eager for a bloody harvest..'

एके ठिकाणी मात्र पिंटोंनी एकच पदरचा संदर्भ वापरला आहे, जो मूळ कादंबरीत नाही. पण तो भाषांतराची मजा वाढवणारा आहे. आगगाडीतून हिरवीगार कुरणं मागे टाकत जाताना अचानक चक्रधरला थडगी दिसायला लागतात. ती सगळी पहिल्या महायुद्धात गेलेल्या सैनिकांची आहेत असं त्याला सांगितलं जातं. इंग्रजी भाषांतरात पिंटोंनी या परिच्छेदात निकोला पूसांच्या (Nicholas Poussin) et in Arcadia Ego या बरोक चित्राचा संदर्भ दिला आहे. गूगलच्या कृपेने ते चित्र आणि त्याचा संदर्भ लागल्यावर ही या पुस्तकात पिंटोंनी ठेवलेली त्यांची एक खास खूण आहे असं वाटून गेलं.

बेडेकरांची भाषा १९३९ सालची आहे हे वाचताना सतत जाणवत राहतं. पण जेरी पिंटोंच्या भाषांतरातल्या इंग्रजीमध्ये मात्र तो काळ येत नाही. ही गोष्ट मूळ कादंबरी वाचून मग भाषांतर वाचणाऱ्या काही लोकांना खटकणारी वाटू शकेल. पण १९३९ साली ज्या प्रकारचं इंग्रजी वापरलं जायचं तसं भाषांतर आजच्या काळात केलं असतं तर ते ओढूनताणून लिहिल्यासारखं वाटण्याचा किंवा कृत्रिम वाटण्याचा धोका होता. पण ते इंग्रजी जसं १९३९मधलं वाटत नाही, तसंच त्यातल्या इंग्रजी भाषेमुळे त्यात उगाच आधुनिकपणा आला आहे असंही वाटत नाही ही त्यातली जमेची बाजू. पुस्तक वाचताना मला या दोन्हींचा समतोल राखण्यात पिंटोंना यश आलंय असंच वाटलं. हा समतोल राखल्यानेही कदाचित ते भाषांतर आजचं वाटण्यात भर पडली आहे. ते 'आजचं' वाटावं याला अर्थातच जगभरातली आजची राजकीय परिस्थिती जास्त जबाबदार आहे.

राष्ट्र म्हणजे नक्की काय? ती एकजिनसी संकल्पना असू शकते का? एका धर्माच्या, रंगाच्या, भाषेच्याच लोकांचं एक राष्ट्र असावं हा अट्टाहास राजकीय फायद्यासाठीच होत असतो. या अशा संकल्पनांची बिजं रुजवून मग त्या द्वेषाची धग विझू न देण्यात सत्तासक्त राज्यकर्त्यांचा फायदा असतो. सामान्य माणसांना अशा ध्रुवीकरणाचा थेट फायदा होत नाहीच, उलट या संकल्पनेत बसणाऱ्या आणि न बसणाऱ्या सगळ्यांना त्याचा तोटाच होतो. ही कादंबरी वाचताना पुन्हा पुन्हा हे अधोरेखित होतं आणि आजही आपण याच संकल्पनेशी लढतो आहोत याची खंत वाटते.

'रथचक्र' कादंबरीच्या प्रस्तावनेत, मराठी कादंबरीच्या प्रवासाबद्दल लिहिताना पेंडशांनी रणांगण या कादंबरीचा उल्लेख 'हस्तिदंती मनोऱ्यातले कोरीवकाम' असा केला आहे. अर्थात हा उल्लेख 'रणांगण' हे मराठी कादंबरीच्या प्रवासातलं एक महत्त्वाचं स्थान अशा अर्थानेच झाला आहे. चक्रधराचं उच्चशिक्षित, उच्चभ्रू आयुष्य, आणि त्याला येणारे त्या काळच्या कुठल्याही मध्यमवर्गीय तरुणाच्या आवाक्यात नसलेले अनुभव पेंडशांचं वर्णन सार्थ ठरवतात. पण चक्रधराचं देशाटन करून एक 'ग्लोबल सिटीझन' असणं हेदेखील माझ्यासारख्या वाचकांना 'रणांगण' आजही अर्थपूर्ण वाटण्याचं एक कारण आहे.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

मूळ मराठीतून वाचायला पाहिजे. अर्थात, श्री. जेरी पिंटो यांचा अनुवादसुद्धा सरस असायला हरकत नाही, म्हणा, परंतु शेवटी वरिजनल ते वरिजनल, नाही काय? (विशेषेकरून, वरिजनलची लिपी वाचता येत असताना नि भाषा समजत असताना?)

मिळवून वाचले पाहिजे.

(वरिजनलची पीडीएफप्रत इथे उपलब्ध आहे. फुकट!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“रणांगण” विद्यार्थीदशेत वाचली होती आणि थरारून गेलो होतो. आता पुन्हा वाचली पाहिजे. या कादंबरीसंबंधी विश्राम बेडेकरांनी आपल्या आत्मचरित्रात (एक झाड, दोन पक्षी) लिहिलेली एक गोष्ट आठवली. एका धंदेवाईक प्रकाशकाला या कादंबरीचा आशय, शैली वगैरेंचे काही देणेघेणे नव्हते, पण “नायिका नायकासमोर नागव्याने उभी राहते” एवढाच भाग त्याला नेमका कळला, आणि त्यावर आधारित चित्र त्याने मुखपृष्ठावर घातले. ते पाहून बेडेकर हताश झाले होते. याची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

पण निदान त्याकाळी लोकांनी त्यातल्या प्रणयदृश्यांमुळे बाकीची कादंबरी विसरून जाणं साहजिक वाटतं.
मी त्याबद्दल ३-४ वाक्यं लिहायचा प्रयत्न केला पण Parisian Orgy ला मराठी प्रतिशब्द न सुचल्याने मी आजूबाजूची सगळीच वाक्यं खोडून टाकली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठीत Parisian Orgy असे (रोमन लिपीत) लिहायला काय हरकत आहे? हल्लीच्या वाचकांना कळावे बहुधा. (आणि, ज्यांना कळणार नाही, त्यांना कवित्वनिवेदनं शिरसि मा लिख मा लिख मा लिख, वगैरे.)

आपण हल्लीच्या वाचकांसाठी लिहीत आहोत; (बेडेकरांसारखे) १९३९ सालच्या वाचकवर्गासाठी नव्हे, नाही काय? तेव्हा, आजमितीस रोमनांशी संवाद साधायचा, तर इटालियनमध्येच बोलणे श्रेयस्कर; नपक्षी, एक वेळ इंग्रजी तेथे कदाचित खपून जाईलही, परंतु, तेथे उगाच लॅटिनचा अट्टाहास कशापायी?

(श्री. जेरी पिंटो यांनी इंग्रजी अनुवादात नेमके हेच पथ्य पाळले आहे, असे मला वाटते तुम्हीच वर सुचविले आहेत. आणि, ते योग्यच आहे. मग तोच कित्ता तुम्हीसुद्धा का गिरवीत नाही?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Parisian Orgy म्हणजे काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राष्ट्र म्हणजे नक्की काय? ती एकजिनसी संकल्पना असू शकते का? एका धर्माच्या, रंगाच्या, भाषेच्याच लोकांचं एक राष्ट्र असावं हा अट्टाहास राजकीय फायद्यासाठीच होत असतो. या अशा संकल्पनांची बिजं रुजवून मग त्या द्वेषाची धग विझू न देण्यात सत्तासक्त राज्यकर्त्यांचा फायदा असतो.

... किमान 'रणांगण'च्या काळात लोक यावरून स त त भांडताना दिसत नव्हते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लाहोर ठराव बोले तो १९४०चा, नाही का? म्हणजे, हे पुस्तक लिहिल्याच्या तब्बल एक वर्षानंतरचा. म्हणजे भविष्यातला.

हो, त्या काळातले लोक यावरून सतत भांडत नव्हते, हे (तत्त्वत:) खरे आहे. भविष्यात भांडायला सुरुवात करणार होते कदाचित, परंतु त्या काळापर्यंत यावरून भांडत नव्हते, हे खरेच. आणि त्यानंतरसुद्धा, भांडण्यात वगैरे त्यांना तसाही विश्वास नव्हताच. डायरेक्ट ॲक्शन वगैरे करून मोकळे व्हायचे. म्हणणे अगदी बरोबर आहे.

हे झाले हिंदुस्थानातले. तिकडे युरोपात, तो हिटलर - हे पुस्तक लिहिण्याच्या थोडासा आधीचा. (अन्यथा, या पुस्तकाचे प्रयोजनच राहते ना.) म्हणजे त्या काळातला. त्याचेसुद्धा एका वंशाच्या, धर्माच्या, रंगाच्या, भाषेच्याच लोकांचे राष्ट्र वगैरे असेच काहीसे मुद्दे होते. परंतु तो त्यासाठी भांडलाबिंडला नाही काही. सरळ फायनल सोल्युशन करून मोकळे झाला.

नाही, त्या काळात लोक यावरून मुळीच भांडत नसत. सतत वगैरे तर नाहीच नाही. अगदी नाही.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज एखादा तरी देश दाखवा जिथे लोक हपा अनोळखी लोकांशी भांडत नसतात. नेओमी ओसाका कुठलीशी ग्रँड स्लॅम जिंकली तर त्यावरून अमेरिकेत राहणारे लोक फेसबुकवर यूएस ओपनच्या पानावर भांडत होते. का तर ती काळी आहे, आशियाईही आहे, पण काळ्या लोकांच्या 'ब्लॅक लाईव्ह मॅटर'वरून भूमिका घेते म्हणून.

समाजमाध्यमं येण्याच्या आधी किती लोक असे किती काळ भांडणात घालवायचे, याचं मोजमापतरी उपलब्ध आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी3
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जवळजवळ एका बैठकीत वाचून संपविली. खिळवून ठेवणारी कथा आहे.

शेवट थोडा ॲबरप्ट तथा काहीसा अतार्किक वाटला. (बोले तो, एकीकडे जहाजाने मुंबई बंदर सोडल्यावर त्याच रात्री हॅर्टा जहाजातून समुद्रात उडी मारून जीव देते खरी, परंतु त्यानंतर पुढे मग जहाज कोलंबो-सिंगापूर-अगदी मनिला वगैरे बंदरांवर पोहोचल्यावरसुद्धा तेथून तिची पत्रे नायकाला येतच राहतात, हे गौडबंगाल काही समजले नाही. घोस्ट-रायटिंगचा क्लासिक नमुना?) तसेच, गोष्टीत अधूनमधून जी संवादात्मक फ्रेंच, जर्मन वगैरे बिगर-इंग्रजी युरोपियन भाषांतील वाक्ये पेरलेली आहेत, त्यांत स्पेलिंगांच्या वगैरे ढोबळ आणि धडधडीत चुका आहेत (जसे, Frauleinऐवजी Frauline, Neinऐवजी Nien, Gute nachtऐवजी Good nacht, झालेच तर (वाईटात वाईट, म्हणजे) Pardon monsieur, merci mademoiselleऐवजी Pardieu monseigneur, , merci mademoiselle. फार कशाला, कथेची अर्पणपत्रिकासुद्धा देवनागरीत, मादमॉयसेल रोलां यांच्या नावे केलेली आहे. (मादम्वाझेल-ऐवजी.)), त्या माझ्यासारख्या फ्रेंच किंवा जर्मन न समजणाऱ्या वाचकाच्यासुद्धा दाताखाली येतात. १९३९ सालच्या टिपिकल मराठी वाचकास त्याने अर्थातच काहीही फरक पडला नसेल. किंबहुना, त्याच्या ते लक्षातसुद्धा आले नसेल. (आजमितीससुद्धा या परिस्थितीत फार फरक पडला असेल, असे म्हणण्याचे धाडस करवत नाही.)

लेखकाची इंग्रजी तथा हिंदुस्तानीवरील पकड मात्र उत्तम, उच्च दर्जाची आहे, हे पदोपदी जाणवते. बोले तो, तर्खडकरी किंवा राष्ट्रभाषा प्रथमा-छाप नव्हे, तर colloquial. त्यात एका प्रकारची आत्यंतिक सहजता जाणवते. मराठी लेखकाकरिता ही अर्थातच फार मोठी अचीवमेंट आहे. क्रेडिटेबल आहे.

कथेतल्या आणखीही काही जागा किंचित खटकल्या. वानगीदाखल:

- यहुदी झाला म्हणून काय झाले, परंतु, एका जर्मन मुलाचे नाव लुई कसे असू शकेल? (परंतु, ‘असेल ब्वॉ!’ म्हणून एक वेळ त्याकडे दुर्लक्ष करू.)

- एके ठिकाणी एक यहुदी पात्र (कायटेल), इजिप्तमधल्या, झालेच तर हिंदुस्थानातल्या उच्च तापमानांबद्दलची भीती कथानायकाजवळ व्यक्त करते. त्यावर कथानायक त्याला त्यात घाबरण्यासारखे कसे काही नाही, हिंदुस्थानातल्या आपल्या गावात अनेकदा तापमान ११०च्या घरात (°फॅ, अर्थात!) कसे जाते, नि तरीही तो अद्याप जिवंत आहे, वगैरे समजावतो. त्यावर त्या यहुदी सद्गृहस्थाची प्रतिक्रिया: “Christ! ११०° सावलीमधं?” आता, एक यहुदी सद्गृहस्थ चुकूनसुद्धा कधी “Christ!” असा उद्गार काढेल काय? (हे म्हणजे, सदाशिव पेठेतल्या एखाद्या चित्पावनाने कशाबद्दल तरी प्रचंड अचंबा किंवा तत्सम टोकाची भावना वगैरे वाटून “हाय अल्लाह! तौबा तौबा!” यासारखे काही उद्गार काढण्यारखे आहे. अर्थात, माझ्यासारखा असेल एखादा – मी चित्पावन नाही म्हणा, परंतु तरीही – तर काढेलसुद्धा कदाचित, मुद्दाम खाज म्हणून, परंतु, माझ्यासारखे असे जगात – किंवा गेला बाजार ४११०३०मध्ये – कितीसे असतील?) मुळात (संभाषण इंग्रजीत चालले होते, हे मानले, तरीही) एका जर्मन यहुद्याच्या तोंडात नेमका तेथे इंग्रजी वाक्प्रचार घालण्याची नक्की काय गरज होती? विशेषतः, उर्वरित संवाद मराठीत भाषांतरित असताना? “अरे बापरे! ११०° सावलीमधं?” असे लिहून भागले नसते?

- हॅर्टा जर्मनीत असताना पूर्वी एकदा आपल्या पहिल्या प्रियकरासोबत – कार्ल फ्रांझसोबत – साल्झबुर्गच्या रानात सहलीस गेलेली असते. तेथे केळी खाऊन ती साली जमिनीवरच टाकते, तेव्हा कार्ल फ्रांझ तिला म्हणतो, “फ्राउलाइन, जर्मनी माझा आवडता देश आहे. त्याची भूमि अशी विद्रूप केलेली मला आवडत नाही!” त्यावर ती त्याला आपले वडील जर्मनीकरिता लढताना युद्धात मारले गेले होते, एवढेच सुनावते. त्यावर तो म्हणतो, “माफ करा, तुम्ही यहुदी आहांत, हें ठाऊक होतं, पण जर्मनच आहांत हें आतां कळलं.” नाही, प्रसंग मोठा प्रभावी वगैरे आहे, परंतु… साल्झबुर्ग हे तर ऑस्ट्रियात आहे ना? जर्मन सीमेपासून फार दूर नसले, तरीही? अगदी Anschluss वगैरे तोवर होऊन गेलेले होते, ही बाब जमेस धरली, तरीही, याचा अर्थ कार्ल फ्रांझ हा साल्झबुर्ग ही जर्मनीची, ‘आपल्या देशा’ची भूमी आहे, असे मनापासून मानत होता काय? बोले तो, आतमध्ये कोठेतरी तो छुपा नाझी होता काय?

- कथानायकाचे नाव चक्रधर विध्वंस. 'विद्वांस' असे आडनाव ऐकले होते. परंतु, 'विध्वंस'??? (आणि, हे एका मराठी कथालेखकाने करावे?)

असो. कथेत असे अनेक मायनर इरिटंट्स आहेत खरे, परंतु, त्यांना जर डिस्काउंट करता आले, तर (किंवा, नाही जरी करता आले, तरीही, त्यांच्या बावजूद) कथा अत्यंत वाचनीय आहे. एकदा वाचायला घेतली, की शेवटापर्यंत वाचून झाल्याशिवाय सोडवत नाही. आणि, विशेषेकरून सरासरी मराठी कथाकादंबरीकारांच्या तुलनेत लेखकाची तथा कथाविषयाची झेप, पहुंच, आवाका, फारच मोठा आहे, आणि, मायनर फॉल्ट्स नॉटविथष्ट्याण्डिंग, कथाविषयाची हाताळणीसुद्धा उत्कृष्ट आहे.

आवर्जून वाचावी, अशी शिफारस करू इच्छितो.

——————

तळटीपा:

Pardon बोले तो, इंग्रजीत Pardon अथवा मराठीत मला क्षमा करा; Pardieu बोले तो, By God! (तुमच्यासारख्या झंटलमन लोकान्ला येवढं शिंपल फ्रेंच समजू नाही?)

Monsieur बोले तो, इंग्रजीत Sir; Monseigneur बोले तो, एका विशिष्ट उच्च पदावरला पाद्री. आता, स्टेशनवरचा हमाल/स्टेशनमास्तर/पोलीस हा येणाऱ्याजाणाऱ्या प्रवाशास ‘पाद्र्या, अरे देवा!’ असे कशास म्हणेल? किंवा, फॉर्दॅट्मॅटर, ‘पाद्र्या, मला क्षमा कर!’ असेसुद्धा? (कन्फेशनबिन्फेशन देतोय काय? आणि, येणाराजाणारा प्रत्येक प्रवासी हा पाद्री कशावरून?)

शेवटी, कितीही झाले, तरी लेखक मराठी आहे, हे लक्षात घ्यावयास हवे.३अ

३अ आणि, त्याचा वाचकगणदेखील मराठीच असणार आहे, हेदेखील.

'न'वी बाजूंसारखा खतरूड वाचकसुद्धा जेव्हा असे विधान करू शकतो, तेव्हा त्या कथेत खरोखरच दम असला पाहिजे, हे कृपया लक्षात घ्यावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

‘न’बा, तुमचा प्रतिसाद धन्य - तुमच्यासारखे तुह्मीच, the one and only!

आता तपशिलात शिरला आहातच, तर मला पडलेला एक प्रश्न विचारतो: “त्रिवळीची रक्तवर्ण लव” म्हंजे काय ब्वॅा? आणि यहुदी व्यक्तीच्या बाबतीत ते कितपत संभव वाटते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

- “त्रिवळीची रक्तवर्ण लव” म्हंजे काय ब्वॅा?

याबद्दल इंट्यूटिव कल्पना आहे, असे वाटते. खात्री नाही. समझने वाले को, इ.इ. Smile

(त्रिवळी.)

- यहुदी व्यक्तीच्या बाबतीत ते कितपत संभव वाटते?

अनुभव नाही. आपला पास. Smile

(नक्की कशाच्या संभाव्यतेबद्दल शंका आहे? त्रिवळी, रक्तवर्ण, की लव? त्रिवळी आणि लवबद्दल शंका असायचे काही कारण दृग्गोचर होत नाही. शंका असलीच, तर ती रक्तवर्णबद्दल असू शकते. त्याबद्दल बोलायचे, तर, आधी म्हटल्याप्रमाणे, आपल्याला काही अनुभव नाही ब्वॉ. सबब, आपला पास.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न बा शेठ, भारी...
जास्त काय लिहू ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद आवडला.
कादंबरीच्या सुरुवातीला प्रकाशकाची नोट आहे की युरोपातून जसा जसा मजकूर आला तसा तसा तो छापला. प्रेस कॉपी करताना लेखकाची मदत मिळवणे शक्य झाले नाही. पण स्पेलिंगच्या या चुका माझ्याकडे असलेल्या सोळाव्या अवृत्तीतही आहेत.
चक्रधरचे आडनाव खरंच विध्वंस असेच आहे की विद्वांस लिहायचे होते असाही प्रश्न पडला. पण तेही सगळ्या अवृत्त्यांमध्ये विध्वंसच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान ओळख.
कादंबरी वाचायला हवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0