लेखन कसं करू नये? - अरुण गद्रे आणि शंतनू अभ्यंकर यांचे लेख
हल्लीच राज्य शासनानं अनुवादाचा पुरस्कार कोबाड गांधींच्या पुस्तकाच्या अनुवादासाठी अनघा लेले यांना दिला होता; आठवड्याभरात तो परत घेतला. तेव्हा दुसऱ्या पुस्तकाला दिलेला पुरस्कार अधिक चक्रावून टाकणारा आहे. त्या संदर्भात 'लोकसत्ता'मध्ये दोन लेख आले आहेत -
१. पुरस्कारप्राप्त पुस्तकाचे लेखक डॉ. गद्रे यांनी लिहिलेला लेख - ‘माझे पुस्तक छद्मविज्ञान नाही’
२. या पुस्तकाचा समाचार घेणारा डॉ. शंतनू अभ्यंकर यांचा लेख- ‘डार्विन मेल्याचं दु:ख नाही, पण..’
हा लेख लिहिण्याचं कारण मराठी अललित लेखन वाचताना मला काही गोष्टी वारंवार टोचतात. त्यांची ही नोंद.
माहिती आणि मतांमधला फरक
साधारणतः वैज्ञानिक लेखनाची पद्धत अशी की पुरावे मांडायचे, त्यावरून आपले निष्कर्ष मांडायचे. त्याबद्दल आपलं मत मांडायचं नाही. कधी हे मत मांडणं अगोचरपणाही वाटू शकतो. उदाहरणार्थ, गुरुत्वाकर्षणाचा नियम. समजा त्याबद्दल लिहिताना कुणी म्हणालं, "हातातली वस्तू सुटली की पडते, आणि आतले पदार्थ सांडतात; काचेची, मातीची वस्तू असेल तर सगळीकडे त्याच्या ठिकऱ्या उडतात आणि त्यातून कुणाला दुखापत होऊ शकते; काम वाढतं; म्हणून मला गुरुत्वाकर्षण आवडत नाही." तर ते हास्यास्पद ठरण्याची शक्यता जास्त. (मीमर आणि स्टँडप लोकांनी सदर विनोदाची दखल घ्यावी.) मुद्दा मांडण्याकरता मी मुद्दामच टोकाचं उदाहरण वापरलं आहे.
इतिहासाबद्दल वगैरे लिहिताना आपली मतं मांडण्यातला हास्यास्पदपणा कदाचित कमी ठरेल. उदाहरणार्थ, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची कथा खरी आहे का खोटी; याबद्दल मत व्यक्त करणं कदाचित इतिहासलेखनाच्या पद्धतीला ठरूनही असेल. मात्र विज्ञानाबद्दल लिहिताना निष्कर्षांसोबत आपलं मतही जोडून देणं मला अगत्यपूर्ण वाटत नाही. आपले वाचक सुजाण असल्याचं मनात धरून लिहावं; त्यांना समजेलशा भाषेत आणि पद्धतीनं माहिती आणि तिचं विश्लेषण द्यावं. वाचकांना आपले आपण निष्कर्ष काढू द्यावेत. (अशा लेखनाचं एक उदाहरण आठवलं म्हणजे 'द न्यू यॉर्कर'मध्ये काही काळापूर्वी आलेला युवाल नोआ हरारीबद्दलचा लेख. मला त्यातले तपशील आता आठवले नाहीत तरीही लेखातून हरारीची प्रच्छन्न टिंगल केल्याची जाणीव, आठवण राहिली.)
ललित लेखनाचा सुकाळ
विज्ञानाबद्दल लिहिताना शक्यतोवर विशेषणं टाळावीत. ह्या दोन्ही लेखांमध्ये विशेषणांचा सुकाळ आहे. उदाहरणार्थ, डॉ. अभ्यंकरांच्या लेखातलं हे वाक्य -
अशा जनुकीय रचना इतक्या नेमक्या, सुंदर, सुचारू, सुबक आणि सुभग की आहेत असे वाटावे, की या रचना नक्कीच कोणी तरी जाणीवपूर्वक घडल्या आहेत;
पहिलं वाक्य मुद्दामच डॉ. अभ्यंकरांच्या लेखातलं वाक्य निवडलं; कारण मला त्यांचे मुद्दे बहुतांशी मान्य आहेत पण पद्धत मान्य नाही. सदर उद्धृत जर डॉ. गद्रेंच्या पुस्तकातलं असेल तर तशी नोंद हवी; किमान अवतरणं हवीत. पण ती नाहीत. शिवाय सदर विशेषणं पुन्हा पुढच्या भागातही येतात.
कालांतराने, सोयीचे क्रम आबादीत आबाद ( Become dominant in the population) होतात, गैरसोयीच्या क्रमांचे तण आपोआपच लुप्त होते. येणेप्रमाणे पिढीगणिक अधिकाधिक नेमक्या, सुंदर, सुबोध, सुबक आणि सुभग रचना साकारू लागतात.
एवढी संस्कृतप्रचुर, नाटकी (आणि वाचकांना दूर लोटणारी) भाषा डॉ. गद्रे वापरत नाहीत. पण ललित लेखनात असतात तशी वर्णनं आहेत -
माझ्या या शोधात गेल्या तीस-चाळीस वर्षांत मायक्रोबायॉलॉजी आणि जेनेटिक्समध्ये जे भन्नाट शोध लागले आहेत ते पाहताना मी चक्रावलो. धरण फुटावे तसे सर्व दिशांनी पुरावे अंगावर कोसळायला लागले. हे पुरावे याकडे बोट दाखवत होते की, उत्क्रांती होणे अशक्य आहे आणि इंटेलिजंट डिझाईन – बुद्धिमान अभिकल्प सिद्धांत हा उत्क्रांतीला पर्याय म्हणून पुढे येत आहे.
लेखात अशा पुराव्यांपैकी एकाचाही, ओझरताही उल्लेख नाही. जरा तपशील लिहिले तर वाचकांना मायक्रोबायलॉजी आणि जेनेटिक्स अजिबातच समजणार नाही असं नाही; पण तेवढीही तसदी न घेता, फक्त मनाची अवस्था काय ते लिहिण्यातून वाचक म्हणून वाचकांना काय समजणार? मग लेखकाचं व्यक्तिगत मत आणि लेखकाचं मतस्वातंत्र्य म्हणून ते सोडून द्यावं का? 'ऐसी'वर किंवा फेसबुकवर कुणी हे असं लिहिलं तर मी ते सोडून देईन. ह्या बाबतीत मी ते सोडून देणार नाही; कारण सदर पुस्तकाला शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. लेखकाला वैज्ञानिक लेखन नीट करता येत नसेल तर मला ह्या पुरस्कार देणाऱ्या लोकांबद्दलही शंका येते.
मात्र रंजकपणा निराळा. अगदी परवाचीच गोष्ट. मी आणि जुने दोन सहकर्मचारी जेवायला भेटलो होतो; एकाचे दोन मुलगेही आले होते; त्यांची वयं ११ आणि १३. आम्ही विदाविज्ञानातल्या (डेटा सायन्स) प्रारूपांच्या निकालांबद्दल बोलत होतो. लहान मुलानं प्रश्न विचारला, "म्हणजे ते काम करत नाहीये, असं म्हणायचं आहे का?" तर त्याच्या वडलांनी सुंदर उपमा वापरली. "तू 'मॅकडॉनल्ड्स'मधलं स्वस्तातलं बर्गर खातोस; आणि 'हॉपडॉडी'मधलं महागाचं बर्गरही खातोस. दोन्ही बर्गरच. पण 'हॉपडॉडी'सारखे पैसे घेऊन कुणी 'मॅकडॉनल्ड्स'सारखं बर्गर दिलं तर तू काय म्हणशील? हे बर्गरच नाही असं म्हणशील, का हे बर्गर खास चांगलं नाही असं म्हणशील?" त्या मुलाला मशीन लर्निंग, विदाविज्ञान यांतलं काहीही समजत नाही; पण चर्चेचा मुद्दा काय होता ते बरोब्बर समजलं.
मराठी अललित लेखनात वाचकांना एक टोकाला ११ वर्षांचे समजूनच लिहिलेलं सापडतं; उदाहरणार्थ, डॉ. गद्रेंचं हे वरचं वाक्य. किंवा दुसऱ्या टोकाला संज्ञांचा भडीमार.
गृहितकं आणि संज्ञांचा भडीमार
डॉ. अभ्यंकरांच्या लेखातला हा परिच्छेद पाहा.
दर वेळी सरासरी एक दशकोटी १०^८ (एकावर आठ शून्य) पुंबीजापैकी एकाचा संयोग होऊन मानवाला मूल होते. प्रत्येक पुंबीज अनन्य जनुके बाळगून असते. तेव्हा तुम्हाला तुमचीच जनुके मिळाली याची शक्यता एका दशकोटीत एक एवढी झाली. ही जनुके तुम्हाला तुमच्या वडिलांकडून मिळाली आणि त्यांना तुमच्या आजोबांकडून..! अर्थातच नेमकी तुमचीच जनुके तुम्हाला संक्रमित होण्याची शक्यता, दर पिढीत एका दशकोटीत एक, अशा घटकाने दुर्मीळ होत जाईल. असे मागे मागे गेल्यास दहाव्या पिढीत तर तुमची जनुके तुम्हाला प्राप्त होण्याची संख्याशास्त्रीय शक्यता जवळपास शून्य आहे असे गणिती उत्तर येईल; पण तुम्ही तर आहात!
यात दोन ठिकाणी गंमत आहे.
१. पहिलंच वाक्य आहे, '... पुंबीजापैकी एकाचा संयोग होऊन ...'. यात संयोग कशाशी होऊन मानवाला मूल होतं, याचा उल्लेख नाही. म्हणजे फक्त वैज्ञानिक पातळीवरच नाही तर भाषिक पातळीवरही विधान अर्धवट आहे.
२. परिच्छेदाच्या शेवटी, दहा पिढ्या मागे गेल्यास आपली जनुकं मिळण्याची संख्याशास्त्रीय शक्यता जवळपास शून्य का आहे, याचं काहीही स्पष्टीकरण नाही.
अशाच प्रकारचं विधान मी सात (का आठ) पिढ्यांबद्दल वाचलं ते 'The Genetic Lottery' या पुस्तकात. (पुस्तकाचा परिचय मी मागे करून दिला होता, त्याचा दुवा.) यात काहीही नावीन्य वा चक्रावून टाकण्यासारखं नाही. त्याचं कारण असं की आपल्याला फक्त वडलांकडून, वडलांना आजोबांकडून जनुकं मिळत नाहीत. या सगळ्या प्रक्रियेत बायकांचाही काही वाटा असतो. पुढच्या मुद्द्यात आणखी स्पष्टीकरण आहे.
लेखनातला स्त्रीद्वेष
माणसं म्हणजे फक्त पुरुष हे प्रमाणलेखनातलंही प्रमाण आहे. किमान वैज्ञानिक लेखनाततरी याची दखल घ्यायला हरकत नसावी. वर उदाहरण दिलेला जनुकांच्या मोजमापाचा परिच्छेद पाहा.
आपल्याला जनुकं आपल्या आई-आजीकडूनही मिळतात - अगदी पुरुषांचीही अर्धी जनुकं आईकडून आलेली असतात. वर दिलेल्या परिच्छेदाच्या सुरुवातीला फक्त वडील, आजोबांकडून आलेल्या जनुकांचा उल्लेख आहे; या अर्धवट माहितीतून, दहा पिढ्या मागच्या आजोबांशी आपलं जनुकीय नातं प्रस्थापित करणं खूप कठीण का होईल, याचं स्पष्टीकरण देता येणं शक्य नाही. मात्र दहा पिढ्या आधी आपले किती पूर्वज असतील याचाही विचार मांडलेला नाही. (याचं उत्तर २१० = १०२४ असं आहे. त्यात आधीच्या पिढ्यांत कुणी चुलत-मावस-आते-मामे भावंडांनी लग्नं केलेली नाहीत असं गृहीतक आहे.)
सगळी माणसं फक्त पुरुषच असतात, अशा प्रकारची वाक्यरचनाच मराठी लेखनात दिसते. एकही अपवाद नाही, चुकूनही नाही. बायका लिहितात तेव्हाही नाही. अगदीच मासिक पाळी किंवा गर्भधारणा असे विषय असतील तर गोष्ट निराळी. (इथे मी सवयीनुसार "... तर इलाजच नसतो" असं लिहू शकले असते; पण लिहिणार नाही. कारण विशेषणं आणि ललितलेखन शक्यतोवर टाळावं.)
हे असं का करू नये, याच्या स्त्रीवादी स्पष्टीकरणात मी आत्ता शिरणार नाही. तो सदर लेखाचा विषय नाही.
संदर्भ का नामस्मरण - references or name dropping?
(मराठीत name droppingसाठी चांगला शब्द(समूह) आहे का? सध्या आहे हा खपवून घ्या.)
अललित लेखनात संदर्भ देणं, ही सवय खरं तर चांगली आहे. मीही वर The Genetic Lottery या पुस्तकाचा उल्लेख केला आहेच. मात्र ते संदर्भ देताना कुणाचे आणि काय कारणासाठी देत आहोत, याचा विचार तेवढाच महत्त्वाचा आहे.
डॉ. गद्रे त्यांच्या लेखात मायकल बेहेचा संदर्भ देतात. हे बेहेचं विकिपिडीया पान; बऱ्यापैकी भरलेलं आहे. त्यातलं पहिलं वाक्य -
Michael Joseph Behe[2] (/ˈbiːhiː/ BEE-hee; born January 18, 1952) is an American biochemist and author, widely known as an advocate of the pseudoscientific principle of intelligent design (ID)
(साधारण भाषांतर - मायकल जोसेफ बेहे (जन्म १८ जानेवारी १९५२) हा अमेरिकी बायोकेमिस्ट आणि लेखक आहे; छद्मविज्ञान आणि 'इंटलिजन्ट डिझाईन' यांचा पुरस्कर्ता म्हणून तो लोकप्रिय आहे.)
बरं, हे विधान फक्त नावं ठेवणारं आहे. तर दुसऱ्या परिच्छेदातला मजकूर पाहा. ह्या परिच्छेदात विधानांचे संदर्भही दिलेले आहेत.
Behe's claims about the irreducible complexity of essential cellular structures have been rejected by the vast majority of the scientific community,[6][7] and his own biology department at Lehigh University published a statement repudiating Behe's views and intelligent design.[8][9]
(साधारण अर्थ - बेहेचे पेशीरचनेबद्दलचे दावे मोठ्या संख्येनं वैज्ञानिकांनी फेटाळले आहेत; तो नोकरी करतो त्या लिहाय विद्यापीठानं परिपत्रक काढून बेहेची मतं फेटाळली आहेत.)
डॉ. गद्रे पुढे उल्लेख करतात तो डॉ. पॉल डेव्हिस यांचे ‘द फिफ्थ मिरॅकल’ या पुस्तकाचा. वरवर वाचून मला पुस्तकाबद्दल एवढंच समजलं की डेव्हिस यांनी या पुस्तकात दावा केला आहे तो मंगळावरून जीवसृष्टी पृथ्वीवर आली असा.
पॉल डेव्हिस यांच्या विकिपिडीया पानावरून त्यांच्या संशोधनांबद्दल आणि दाव्यांबद्दल काही मत बनवावं, इतपत माहिती मिळाली नाही.
तुकोबांच्या अभंगांत अनेकदा विठ्ठलाचा उल्लेख येतो. तुकोबा विठ्ठलाचे भक्त होते; त्यांनी नामस्मरण करणं अपेक्षितच आहे. तुकोबा काव्यरूपात तत्त्वज्ञान मांडत होते; म्हणजे ललित लेखन करत होते. त्यात असा देवाचा उल्लेख होण्यात काही नवल नाही. मात्र वैज्ञानिक आणि/किंवा अललित लेखनात फक्त पुस्तकं आणि पुस्तकाच्या लेखिकांचा उल्लेख करायचा आणि त्यांनी काय म्हणलं आहे हे लिहायचंच नाही, ही पद्धत अक्षम्य आहे. गद्रेंनी (किंवा कुणीही) हे आपल्या आत्मचरित्रात वा तत्सम लेखनात जरूर लिहावं.
त्यामुळे गद्रेंच्या लेखावर इथे दोन आक्षेप येतात - नामस्मरण; आणि तेही छद्मदेवतांचं.
तपशिलांतला सैतान
अर्थात, पुढे गद्रे हेही लिहितात -
जर मी खराखुरा विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारा असेन तर कार्ल सेगन या वैज्ञानिक तत्त्ववेत्त्याने दिलेल्या विज्ञानाच्या कसोटय़ांवर चालणे मला भाग आहे.
या कुठल्या वैज्ञानिक कसोट्या? कार्ल सेगननं असं काही सांगितलं आहे का, हे आजच्या वाचकांना का माहीत असेल? सेगन गेल्यालाही आता २७ वर्षं झाली.
त्यातून विज्ञान म्हणून महत्त्वाचा मुद्दा - कोण कार्ल सेगन (जन्म १९३४)? वैज्ञानिक कसोट्या कार्ल सेगननं सांगितलेल्या का? त्याच्या आधी कुणी हे तत्त्वज्ञान मांडलेलं नव्हतंच का? सोबत दिलेल्या डॉ. अभ्यंकरांच्या लेखातही कार्ल पॉपरच्या (जन्म १९०२) falsifiability - खोडून काढता येण्याची सोय - या वैज्ञानिक तत्त्वाचा उल्लेख आहे.
रेटून खोटं बोलणं
डॉ. गद्रेंच्या लेखातून -
डार्विन जरी प्रामाणिकपणे सांगत होता की, माझ्याकडे आज पुरावा नाही आणि जरी त्याच्याच तोलामोलाचा समकालीन शास्त्रज्ञ लुई पाश्चर प्रयोगाने हे सिद्ध करत होता की, मॅटरपासून लाइफ – मातीतून जीवन अशक्य आहे; तरी अनाकलनीय कारणांनी तत्कालीन विज्ञानाने डार्विनचे उबदार तळे स्वीकारले. पहिली पेशी ही टाईम, मॅटर आणि चान्स याद्वारे मॅटरपासून तयार झाली हे स्वीकारले. आज दीडशे वर्षांनीसुद्धा या सिद्धांताला डार्विनला अपेक्षित पुरावा मिळालेला नाही.
१. डार्विन (१८०९-१८८२) विरुद्ध पाश्चर (१८२२-१८९५) हा नक्की काय प्रकार आहे? विज्ञानाचा इतिहास बघितला तर त्यात उत्क्रांती, आणि लशींचा शोध आणि जंतूंमुळे होणारे रोग हे अत्यंत महत्त्वाचे टप्पे आहेत. आजवर कुठेही माझ्या वाचनात डार्विन विरुद्ध पाश्चर असं काही नाही. माझ्या वाचनाबद्दल बोलायचं एकमेव कारण, बहुसंख्य मराठी वाचकांच्या तुलनेत विज्ञानाबद्दल माझं वाचन जरा जास्त असावं. बहुसंख्य वाचकांना या विषयाची प्राथमिक माहितीही नसेल तर त्याबद्दल किमान एखादं वाक्य लिहायला हरकत नाही. एरवी डॉ. गद्रेंना जे समजलं तेच काय ते प्रमाण मानायचं असा आग्रह विज्ञान मानत नाही.
२. त्यातून लुई पाश्चरनं नक्की काय आणि कसं सिद्ध केलं? हा प्रश्न विचारण्याचं कारण एक तर पाश्चर प्रसिद्ध आहे त्याच्या निर्जंतुकीकरणाच्या प्रयोगांसाठी, लशीकरणासाठी आणि जंतूंमुळे रोग होतात या सिद्धांतासाठी. बाकी त्याची मतं त्याच्यापाशी! ते विज्ञान नाही. वैज्ञानिकांची व्यक्तिगत मतं, आणि/किंवा आपसांतले हेवेदावे हे विज्ञान नाही.
३. तिसरा मुद्दा मिलरच्या प्रयोगाचा - विकिपिडियाचा दुवा. हा रसायनशास्त्रातला प्रयोग होता. पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळात वातावरणात मिथेन, पाणी, अमोनिया, हायड्रोजन असे वायू ठरावीक प्रमाणात होते. त्या प्रमाणांत वायू घेऊन मिलरनं त्यात इलेक्टिक आर्क (मराठी?) सोडली. त्यातून प्रयोगशाळेत अमिनो आम्लं तयार झाली. या प्रयोगाला जीवनाची रासायनिक सुरुवात (chemical origin of life) असं म्हणलं जातं.
४. आणि एक बारका मुद्दा - डार्विनला चिकार पुरावे आहेत. डार्विनचं लेखन बघितलं तरी डार्विन होता हे सिद्ध होईल. हा कीस पाडणं अगत्याचं आहे; कारण विज्ञान निराळं आणि वैज्ञानिक निराळी. लुई पाश्चर आणि डार्विनचे जर काही मतभेद असतील तर ते निराळे आणि त्यांनी मांडलेलं, सिद्ध केलेलं विज्ञान निराळं.
५. यात मला न समजलेला आणखी एक, भौतिकशास्त्राशी संबंधित मुद्दा म्हणजे - जीव मॅटरचे बनलेले असतात, हे डॉ. गद्रेंना मान्य नाहीसं दिसतं. हे माझ्या आकलनापलीकडचंच आहे. सोपं उदाहरण पाहा - माझे गळलेले केस आणि कापलेली नखं मी बहुतेकदा कंपोस्टात टाकते. काही दिवसांनी ती नखं, केस असं दिसणं बंद होतं. सजीवांची संपूर्ण शरीरंच मॅटरची बनलेली असतात. डॉ. अतुल गावंडे त्यांच्या Being Mortalमध्ये मृत्युचं वर्णन असं काहीसं करतात (आठवणीतून लिहीत आहे) की, शरीरातल्या महत्त्वाच्या व्यवस्था - हृदय, यकृत, मूत्रपिंडं वगैरे - हळूहळू मंदावत जातात; कमी काम करतात. आणि शेवटी काम एवढं कमी होतं, थांबतं की शरीराची जिवंत असण्याची स्थिती टिकवता येत नाही. तो मृत्यू.
इथे ओकॅमचा वस्तरा आठवतो. निर्मिक, देव, दैवी शक्ती, काहीही म्हणा, यांच्याशिवाय जर जन्म आणि मृत्यू यांचं स्पष्टीकरण देता येत असेल तर ही गुंतागुंत, क्लिष्टता आणखी कशाला हवी? (मी स्वतः या कशावर विश्वास ठेवत नाही, पण ते माझं व्यक्तिगत मत. तसं कुणी काही विश्वास ठेवत असाल तर ते तुमचं व्यक्तिगत मत. व्यक्तिगत मत म्हणजे विज्ञान नाही.)
६. डार्विनचं उबदार तळं म्हणजे नक्की काय?
मी अललित लेख मुद्रितशोधनासाठी म्हणून वाचते तेव्हा संपादन-छापाचे असे प्रश्न विचारते. याचं उत्तर मला, एकटीला द्या असा आग्रह नसतो. पॉप्युलर (मराठी?) लेखनाचे वाचक साधारणतः दहावी-बारावीपर्यंतचं विज्ञान, गणित, भाषा, इतिहास वगैरे विषय शिकलेले आणि वाचनाची आवड असणारे असतील असं गृहीत धरून लिहिण्याचा संकेत आहे. विषय आणि वाचनाची गोडी असणाऱ्या वाचकांना समजेल अशा भाषेत, संज्ञा वापरल्यास त्यांचे अर्थ स्पष्ट करून, नेहमीपेक्षा निराळी वाक्यरचना केली तर त्यांचे अर्थ स्पष्ट करून लिहिल्यास वाचकांचा रसभंग होत नाही. मी स्वतः लिहिताना हे नियम स्वतःला सांगते, पण ते पाळत असेनच असं नाही. नाही प्रत्येक वेळेस लक्षात येत; तर संपादक, मुद्रितशोधक, आणि पुढे सुजाण वाचकांनी हे काम करून देणं अपेक्षित असतं.
सदर लेखनात मला गेल्या ४-५ वर्षांत दिसलेले आणि ह्या दोन लेखांमध्ये दिसणारे मुद्दे मांडले आहेत. ही यादी पूर्ण नाही. मात्र ही यादी लिहून काढायला प्रेरणा देण्यासाठी डॉ. गद्रे आणि डॉ.अभ्यंकर या दोघांचेही आभार.
अर्धवट माहिती
,>>>पहिलंच वाक्य आहे, '... पुंबीजापैकी एकाचा संयोग होऊन ...'. यात संयोग कशाशी होऊन मानवाला मूल होतं, याचा उल्लेख नाही. म्हणजे फक्त वैज्ञानिक पातळीवरच नाही तर भाषिक पातळीवरही विधान अर्धवट आहे.
लेख वाचताना हे वाक्य मलाही खटकलं. आणि तू लिहिलेल्या दोन्हीं कारणांसाठी. विज्ञानाबद्दल लिहिताना अभ्यंकर लोकांना कळावं आणि पटकन वळावं म्हणून अती सुलभीकरण करतात असं माझं निरीक्षण आहे. त्यात अनेकदा "यात शिरायला नको. हे अवघड होईल", असा विचार करून काही संकल्पना ते अर्धवट सोडून देतात असंही वाटतं. अर्थात इथे वृत्तपत्राची शब्दमर्यादा आहेच. त्यामुळे तेही एक कारण असू शकेल.
पण त्यांच्या फेसबुकवरील लेखनातही असं सुलभीकरण दिसतं. मला विशेष खटकणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या लेखनात अनेकदा धार्मिक संदर्भ येतात ज्यांना ते आरोग्याशी/विज्ञानाशी जोडू पाहतात. वाचकांना, विशेषतः धार्मिक कुटुंबांतल्या स्त्रियांना अशा उपमा जवळच्या वाटत असतील हे मी समजू शकते. पण कधीतरी सोप्या भाषेत, धार्मिक उपमा नसलेलं वैद्यकशास्त्र म्हणूनही लिहावं असं नक्कीच वाटतं.
किती मुद्दे...
एका शिक्षक-मित्रानं दिलेला सल्ला मला नेहमी आठवतो. समजा, एका तासाचं लेक्चर द्यायचं आहे तर विषयानुरूप दहा मुद्दे काढायचे. मग त्यांचा विस्तार करायचा, तेव्हा लक्षात येतं, एका तासात सहाच मुद्दे मांडता येतील. मग तीनच मुद्द्यांचं स्पष्टीकरण लिहायचं, कारण आपण सहा मुद्दे समजतो तेव्हा अर्धॆच मांडून होतात.
वर्तमानपत्रासाठी लिहिताना मी ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करते.
धार्मिक संदर्भांचा मुद्दाही मला मान्य आहे. कधी शंका येते, शक्याशक्यता म्हणावं का योगायोग. तेव्हा योगायोग हा शब्द वापरात असला तरी धार्मिक अर्थ चिकटण्याची भीती वाटते. खाजगी संवांदापुरता तो मर्यादित ठेवते.
आणखी एक मुद्दा वर राहिला तो हेतूचा. उदाहरणार्थ, आपल्याला पालकांकडून कुठली जनुकं मिळणार हे कुणीही ठरवत नाही. कुणी देव, निर्मिक वगैरे हे ठरवत असतील तर तसं काही सिद्ध झालेलं नाही. का, ह्या प्रश्नाला विज्ञानात उत्तर नाही. तेव्हा वैज्ञानिक लिखाणात कुठेही हेतू येणार नाही अशी शब्दरचना आवर्जून केली पाहिजे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मुद्देसूद विश्लेषण
मुद्देसूद विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद!
थॉमस कुन्ह...
डॉ. गद्रे लेखाच्या अखेरीस थॉमस कुन्हचा उल्लेख करत पॅराडाईम शिफ्ट बद्दल लिहतात. पॅराडाईम शिफ्टचा संदर्भही अगतीच ओढून-ताढून दिलेला आहे.
गंमत म्हणजे कुन्ह स्वतःच सायंटिफिक रिव्होल्यूशन्स समाजवताना डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांतांचा दाखला देतो (Thomas S. Kuhn: The Structure of Scientific Revolutions – 50th Anninversary Edition; page no १७०-१७१).
आभार.
मी कुह्नचं काही वाचलेलं नाही. त्यामुळे त्याबद्दल काही लिहिलं नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अतिशय उत्तम लेख
अतिशय उत्तम लेख
गद्रेंच्या पुस्तकाला
गद्रेंच्या पुस्तकाला विज्ञानविषयक लेखनाचा पुरस्कार मिळूच कसा शकतो.
अभ्यंकरांच्या लेखनाविषयी तुम्ही लिहिलेत ते त्यांना जरूर कळवा. उत्तर नक्की देतील ते.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
सुबोध जावडेकरांचा प्रतिसाद
अगदी मान्य आहे. अशा गोष्टी मुद्रणचुका म्हणून सोडून द्यायची मला सवय लागली आहे. मराठी प्रकाशकांत स्टँडर्ड युनिकोड वापरण्याची सोय नाही; इथपासून माझी सुरुवात होते. त्यातून मराठी पेपर इंटरनेटवर वाचताना रोमन लिपीतला मजकूर अगदीच काहीही दिसतो; चुकूनही अर्थ लागणार नाही असा.
(मग मी हाही विचार केला, E = mc2 असं लिहिता येत नाही त्यांनी m आणि c कॅपिटल लिहिले म्हणून काय तक्रार करायची!)
त्यातून तपशिलात चुका-भरताडाचं एवढं घबाड सापडलेलं असताना कुठे रस्त्यात पडलेल्या चाराण्याच्या नाण्यासाठी जीव जळवायचा!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
टार्गेट कोण?
मी गद्रे यांचा लेख वाचला नाही. म्हणजे त्याची गरजच नाही वाटली. परंतु अभ्यंकरांचा लेख वाचला.
मला वाटतं, लेख केवळ शास्त्रीय कोरडा नसावा असं अभ्यंकरांना अभिप्रेत आहे. शेवटी हे लेख कोणासाठी लिहिले आहेत हेही महत्त्वाचं आहे.
माझ्या मते 'अनुभव' हे नियतकालिक जे लोक विकत घेतात ते लोक या लेखाचा टार्गेटेड वाचक आहे. आता अनुभव कोण कोण आवर्जून विकत घेतात आणि वाचतात?
० मेडिकल कॉलेजेस मध्ये आवर्जून एकांकिता वगैरे करणारे, कॉलेज मॅगेझिनमध्ये लेखबिख लिहिणारे आणि आता प्रॅक्टीस करणारे मराठी माध्यमात शिकलेले डॉक्टर आणि त्यांच्या दवाखान्यात येणारे मध्यमवयीन ते म्हातारे पेशंट
० पत्रकार
० स्पर्धा परीक्षार्थी
० विद्यापीठातले आधी मराठी माध्यमात शिकलेले विद्यार्थी, काही प्राध्यापक
० ऐसीअक्षरे, मौज, मुक्त शब्द असे दिवाळी अंक वाचणारे इतर सर्व क्षेत्रातले ऑड मेन/विमेन आऊट
० व्यापक जनसागरातले लोकसत्तेची 'लोकरंग' ही पुरवणी पुरवून पुरवून वाचणारे काही लोक.
० अभ्यंकरांच्या वॉटसॅप ग्रुपांमधली संपूर्ण लेख वाचून चर्चा करायला उत्सुक असणारी त्यांच्या स्नेहातली साधी भोळी माणसं.
यांची टक्केवारी एकून मराठी जनतेपैकी १ टक्केही नसावी. ०.१ टक्के तरी आहे का कुणास ठाऊक!
आता या सगळ्या लोकांना शास्त्रीय काटेकोरपणाची किती पडली आहे. यातल्याच किमान ३० टक्के लोकांना पुंबीज म्हणजे काय, किंवा ती दशकोटीतली शक्यता यांची काहीच टोटल लागलेली नसते. त्यांना ते मग कशाशी संयोग पावतात यांची किती पडली आहे?
लालित्य आणि माहितीचा रूक्षपणा सांभाळत अभ्यंकर चांगले लेख लिहितात त्यातलाच हा एक लेख! आजकाल तेही इतकं रेअर आहे की त्यालाही ओकॅमचा वस्तरा लावायचा म्हंटल्यावर मग काय आनंदच!
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
मोजक्या प्रतिसादांचं निरीक्षण
अगदी मोजकेच प्रतिसाद आहेत, त्यांत दिसलेला एक पॅटर्न.
१. एकाही स्त्रीनं अभ्यंकरांच्या लेखनासंदर्भात मांडलेल्या मुद्द्यांबद्दल आक्षेप घेतलेला नाही.
२. सदर मुद्द्यांबद्दल आक्षेप असणारे सगळे पुरुष आहेत.
बायकांना चर्चेतून वगळलं आणि/किंवा मुद्दा बहुतांशी योग्य आहे तर मांडणी कृत्रिम, वाचकांना गृहीत धरणारी आणि माहिती अर्धवट असली तरी बरी चर्चा होऊ शकते, असं वाटणारे फक्त पुरुष आहेत का?
पुंबा, सदर लेखाचा रोख फक्त डॉ. गद्रे आणि डॉ. अभ्यंकर यांच्याकडे नाही. मराठीत विज्ञानविषयक आणि/किंवा अललित लेखन करणारे, आणि हे लेखन वाचणाऱ्या लोकांकडे आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
गद्रेंनी जे लिहिलंय ते
गद्रेंनी जे लिहिलंय ते विज्ञानविषयक लिखाण नसून विज्ञानाला घोडा लावणं(असंसदीय भाषेसाठी क्षमा.) झालं. डॉ शंतनूंच्या उमद्या, विवेकी स्वभावाची थोडीफार कल्पना असल्याने त्यांच्या त्रुटी सांगितल्या तर ते ऐकतील हे माहित आहे. गद्रे कसा कांगावा करतात ते लोकसत्तेतल्या लेखाने कळतेच..
रच्याकने, उद्या आसारामच्या वीर्यनाश ही मृत्यू किंवा नित्यानंदाच्या आत्मा ट्रान्स्फर च्या थियरीवर कुणी लिहिलंच तर ते पण असंच पुरस्कारप्राप्त ठरणार नाही कशावरून.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
मी गद्रे ह्यांचं उपरोलेखित
मी गद्रे ह्यांचं उपरोलेखित पुस्तक वाचल नाही पण त्याचं "कैद केलेले कळप" हे पुस्तक चाळले आहे.
त्यातही त्यांनी विज्ञानाला ठाऊक असलेले प्रस्थापित निष्कर्ष ह्यांविरोधी मांडणी केली आहे.
उदा - या
रेफरन्स इथे -
गद्रे ह्यांची ही पुस्तकं आणि त्यातले निष्कर्ष मंडण्यामागे काय प्रेरणा आहे ते मला ठाऊक नाही - पण त्यांची काही एक प्रामाणिक विचारसरणी आहे आणि ते ती मांडत आहेत असं एक चित्र उभं राहतं.
त्यांच्या निष्कर्षाविरोधी बोलायला हवं ह्यात शंकाच नाही. पण ते सकृतदर्शनी वाटतात तसे फ्रॉड वगैरे नाहीत.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
ख्रिस्ती मूलतत्ववाद. पण
ख्रिस्ती मूलतत्ववाद. पण भारतात हे म्हणायला भले भले कचरतात. पुरोगामी मंडळी तर हे गद्रे, तो दिब्रिटो किंवा मदर तेरेसा यांचे समर्थन करायला हिरीरीने सरसावतात. का कुणास ठाऊक!
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
ख्रिस्ती मूलतत्ववाद
ह्या ह्या ह्या
म्हणजे नेहेमीचेच यशस्वी लोक आहेत तर.
चालायचंच
==================
भूतकाळातील आस्वल्य.
प्रमाण?
अमेरिकेत हे ख्रिस्ती मूलतत्त्ववादी माजलेत, बायकांच्या शरीरांवर हक्क गाजवायला निघालेत, तेव्हा त्यांची चीड येणं मला समजतं. माझा व्यक्तिगत रोष बाजूला ठेवला तरी या लोकांकडे किती सत्ता आहे, हे दिसतं. भारतात या लोकांना कोण भाव देतं, किती सत्ता आहे यांच्याकडे? हा एक पुरस्कार वगळला तर कितपत दखल घेतली जाते? हे जे कोण पुरोगामी आहेत त्यांनाही कोण विचारतं? फेसबुक एवीतेवी बूजी आणि वयस्करांसाठी. तिथेही ह्या छापाच्या लोकांना फार भाव मिळताना दिसत नाही. हजाराचा पल्ला गाठला तरी चिकार. तुलनेत शेफालीताईंचा पल्ला पाहा!
(अंमळ अवांतर आहे, पण मला खरंच प्रश्न पडला आहे.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
भारतात शेफाली सारख्या लोकांचा
भारतात शेफाली सारख्या लोकांचा धोका अधिक आहे आणि त्यांचा अधिक जोरकस प्रतिवाद व्हायला हवा हे मला मान्य आहे. पण ख्रिस्ती, मुसलमानांमधल्या मूलतत्ववादाची निदान पाठराखण करू नये हे पहायला हवे. साधी गोष्ट: केरळमधल्या चर्चमधील नन्सच्या लैंगिक शोषणाबद्दल चकार शब्द काढायला कुणी तयार नसते. एरव्ही बाबा-बुवांवर खरमरीत टिका करणारेसुद्धा या प्रकरणात चकार शब्द काढत नाहीत.
असो, मला एवढेच वाटते की वर वर विज्ञानावर आहे असे दाखवून प्रत्यक्षात धार्मिक अजेंडे रेटणारे असे बाष्कळ लिखाण निदान सरकारी पुरस्कारप्राप्त ठरू नये.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
…
बाकी सर्व ठीक, परंतु, ‘ब्रह्मचर्य हेच जीवन, वीर्यनाश हाच मृत्यू’ हे पुस्तक श्री. आसाराम यांचे नसावे बहुधा. (चूभूद्याघ्या.)
अर्थात, प्रस्तुत पुस्तक श्री. आसाराम यांचे आहे, अशा गृहीतकाखाली आणि/किंवा दाव्यासहित त्याबद्दल जरी कोणी लिहिले, तरी आजच्या जमान्यात ते पुरस्कारपात्र ठरणारच नाही, याची शाश्वती देता येत नाहीच, म्हणा.
असो चालायचेच.
सातवीत स्कॉलरशीप मिळाली
सातवीत स्कॉलरशीप मिळाली म्हणून त्या नीच थेरड्याची पुस्तके मला आठवीत बक्षीस मिळाली होती. त्यात हे होते, त्या इंप्रेशनेबल वयात हस्तमैथूनाबद्दल घाणेरडी गिल्ट आणि भिती देणारे पुस्तक. मूळ थियरी आणखी कुणाची असेल.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
!
! हे दोन गोष्टींबद्दल.
१. बोले तो, या क्षेत्रातसुद्धा आता प्लेजियॅरिझम सुरू झाले तर. (बकवासाचीसुद्धा नक्कल! मूळ ‘ब्रह्मचर्य हेच जीवन, वीर्यनाश हाच मृत्यू’ हे शिवानंद म्हणून कोणाचे तरी आहे, असे गूगलशोधाअंती आढळले.)
२.
त्या नीच थेरड्याने ती तसली पुस्तके लिहिली, यात फारसे धक्कादायक असे काही वाटत नाही; त्याचा रागही येत नाही. (आफ्टर ऑल, त्याचा धंदा आहे तो.) मात्र, तुम्हाला (पक्षी: इयत्ता सातवी उत्तीर्ण होण्याच्या इंप्रेशनेबल वयातील एका मुलाला) ते तसले पुस्तक, तेही सातवीत स्कॉलरशिप मिळाल्याप्रीत्यर्थ, बक्षीस म्हणून देणाऱ्या प्रौढ (कायद्याने सज्ञान) विद्वान सज्जन सद्गृहस्थाबद्दल काय म्हणावे!
तेच तर. २००५ साली जेव्हा मला
तेच तर. २००५ साली जेव्हा मला हे प्रथम वाचनात आले तेव्हा भय आणि चिंता दाटून आल्याचे स्मरते. त्या पुस्तकाच्या संचातली यच्चयावत पुस्तके जुनाट चालीरितींचे समर्थन करणारी, पुरूषसत्तेचे समर्थन करणारी, विज्ञानविरोधी, जातीभेदास उत्तेजन देणारी असली होती. हा कचरा शाळेतल्या सत्कार समारंभात मला देण्यात आला होता. ज्याने ती दिली होती त्याचे तर आख्खे घरच त्या आसारामच्या कच्छपी लागले होते, आपल्या ६ वर्षाच्या नातवास त्या नराधमाच्या आश्रमात ठेवले होते त्या बिनडोकाने. त्याचे बलात्काराची प्रकरणे बाहेर आल्यावरसुद्धा तो नातवास तेथून आणायला तयार नव्हता, शेवटी सुनेच्या माहेरच्या लोकांचा रेटा वाढल्याने हे करावे लागले. जोवर त्या थेरड्याची चलती होती तोवर मला त्या पुस्तकाचा गहिरा प्रभाव मजवर झालेला जाणवला होता. सुदैवाने माझे वाचन तेवढ्यापुरते मर्यादीत न राहिल्याने ही घाण व्यवस्थीत उमगण्याइतके मन प्रगल्भ झाले आणि ते सगळे फेकून दिले. म्हणून मला अवैज्ञानिक, खुळचट विचार समाजात पोचवणाऱ्या लोकांबद्दल तीव्र संताप वाटतो. पण काय करणार!
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
मराठी प्रतिशब्द
दोन्ही लेख किंवा अशा प्रकारचं इतर लिखाण वाचताना अजून एक अडथळा म्हणजे scientific terms ना मराठी प्रतिशब्द वापरणे. ते कधी आणि कुठे वापरावे याला काहीही नियम नाही. Microbiology & genetics असं देवनागरी मधे लिहिलेलं चालतं तर मग genes, evolution, sperm वगैरे पण लिहायला काय हरकत आहे? बारावीनंतर कुठली विज्ञान शाखा मराठीतून शिक्षण देते? नवीन टेक्नोलॉजी क्षेत्रात ओढून ताणून असे प्रतिशब्द वापरले की दुर्बोधता वाढते असं मला वाटतं. (माझ्यासारख्या) मराठी वाचकांना "विदाविज्ञानातल्या (डेटा सायन्स) प्रारूपांच्या निकालांबद्दल" अशा धरतीची वाक्य वाचून ती समजून घ्यायला वेळ लागतो. कदाचित डेटा सायन्स कंसाबाहेर आणि विदाविज्ञान कंसात हे लवकर समजेल
…
‘डेटा सायन्स’ कळत असताना पुन्हा कंसात (न कळणारे) ‘विदाविज्ञान’ ते काय म्हणून लिहायचे? गरज काय? सकाळीसकाळी पिसाळलेले सावरकर चावले काय?
(सामान्यतः, न समजणारी संज्ञा (मराठीत: टर्म) कंसाबाहेर लिहून, समजणाऱ्या संज्ञेने तिचे स्पष्टीकरण कंसात देण्याचा प्रघात आहे. (उदा.: ‘संज्ञा (मराठीत: टर्म)’.))
——————————
परंतु, मुद्दा रास्त आहे. शास्त्रीय संज्ञावली (मराठीत: सायंटिफिक टर्मिनॉलॉजी) जी असते, तिच्यामागे वैज्ञानिक समुदायास (मराठीत: सायंटिफिक कम्यूनिटीस) तिच्यातून काटेकोर (मराठीत: प्रिसाइझ) अर्थ एकसारखा समजणे हा उद्देश असतो; सामान्य मनुष्यास (मराठीत: लेमॅनला) ती समजणे हा नसतो. किंबहुना, सामान्य मनुष्याशी तिचे काही घेणेदेणेही नसते. इंग्रजीभाषक सामान्य मनुष्यास medulla oblongataमधून तरी काय शष्प अर्थनिष्पत्ती होते? मग उगाच त्याला वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या हौशीखातर मराठीत एके वर्षी लंबमज्जा नि दुसऱ्या वर्षी पश्चमस्तिष्कपुच्छ ते नक्की काय म्हणून म्हणायचे? निरनिराळ्या तज्ज्ञांची सरकारकडून पैसे उकळण्याची सोय व्हावी, म्हणून? ज्याला कळण्याची गरज आहे, त्याला medulla oblongata व्यवस्थित कळते!
सावरकरांपासून ते वि. न. नरवण्यांपर्यंत (आणि त्यानंतरही) अनेकांनी या निमित्ताने आपापल्या हौशी भागवून घेतल्या. (नाही म्हणायला, नरवण्यांनी थोडीफार सुटसुटीत आणि एकसारखी परिभाषा बनविण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न केला, नाही असे नाही. परंतु पुढे तो फारसा टिकला नसावा.) त्यात पुन्हा वेगवेगळ्या तज्ज्ञांत एकवाक्यता नाही. एकजण ॲटमला परमाणू नि मॉलेक्यूलला अणू म्हणणार, तर दुसरा ॲटमला अणू नि मॉलेक्यूलला रेणू. म्हणजे, शास्त्रीय परिभाषा सगळ्यांना सारखी समजली पाहिजे, या मूळ तत्त्वालाच हरताळ! एखाद्याने अणू म्हटले, तर त्यातून ॲटम समजायचा, की मॉलेक्यूल?
बरे, यातून नेमके साध्य काय होते? चेककरिता सावरकरांनी धनादेश हा ‘मराठी’ प्रतिशब्द काढला, याबद्दल त्यांचे कौतुक नक्की काय म्हणून? त्यामुळे चेक लिहिता येण्याएवढी रक्कम बँकेत शिल्लक ठेवण्याइतकी सामान्य मराठी माणसाची ऐपत वाढली काय? सावरकरांच्या काळात कितीशी सामान्य मराठी मनुष्ये चेकने व्यवहार करीत होती, की त्यांना या ‘योगदाना’मुळे फरक पडावा? आणि, जे काही थोडेफार गुजराती व्यापारी चेकने व्यवहार करीत होते, त्यांना चेक म्हणायला लाज वाटत नव्हती. मग नक्की गरज काय होती? एक सावरकरांची खाज सोडून? (फॉर्दॅट्मॅटर, आज तरी व्यवहारात चेकला धनादेश कोण म्हणतो? आणि, धनादेश असे लिहिल्यावर कंसात चेक असे आजसुद्धा जर लिहावे लागत असेल, तर मग मुळात धनादेश असे तरी का लिहायचे? त्याने नेमके काय साधले? सरळ मराठीत चेक असे लिहा ना!)
असो चालायचेच.
बाकीच्या संज्ञांबद्दल माहीत नाही, परंतु, जीन्स असे देवनागरीत लिहिल्यास लीव्हायज़ची एखादी जोडी दृग्गोचर होईल, अशी (सार्थ) भीती वाटत असावी.
(अतिअवांतर: Diarrh(o)ea is hereditary; it runs in the jeans.)
कष्टेविण फळ
२०१४ साली बहुतेक, एका मराठी गणितज्ञाला मानाचा रोल्फ-नेव्हेनलिना पुरस्कार मिळाला. 'लोकसत्ता'साठी मी त्यांची (नाव विसरले) मुलाखत घेतली. मी त्यांना विचारलं, "लोक तक्रार करतात गणित कठीण असतं. तुम्ही त्यांना काय सांगाल?"
त्यांचं उत्तर होतं, "गाणं शिकायला लागल्यावर पहिल्या दिवशीच आपल्याला गाणं येईल अशी अपेक्षा धरतं का कुणी?"
ज्यांना डेटा सायन्स समजतं (असं वाटतं*) त्यांच्यासाठी मराठी गद्याची आवश्यकता कितीशी आहे? ज्यांना इंग्लिश समजत नाही, वाचायचे कष्ट खूप वाटतात, किंवा मराठीची खाजच आहे, त्यांच्यासाठी मराठी गद्य आहे.
संज्ञा एका भाषेतल्या चालतात, पण दुसऱ्या भाषेतल्या चालत नाहीत, दोन्ही भाषांतल्या तिथेच समोर असूनही त्यांच्यासाठी इंग्लिशमध्ये चिकार आणि चांगलं गद्य आहे; आणि/किंवा टाळीखाऊ आणि/किंवा वरवरचं गद्य आहेच. ते वर्तमानपत्रांतही दिसतं, समाजमाध्यमांतही.
* कालच मला माझा नवा मॅनेजर हा व्यक्तिविशेष मोडका कोड मिळाला म्हणून तक्रार सांगत होता. मी मनात हसत होते. माझ्या मते, मोडका कोड मिळाल्यामुळे आहे तो संपूर्ण पसारा कसा चालतो, हे समजून घ्यायची संधी चालून आली. एक फक्त प्रारूप म्हणजे विदाविज्ञान नाही. कारण garbage in garbage out. माझ्यासारखे विद्रट लोक काय काम करतात याबद्दल अनेकांच्या अनेक कल्पना असतात. त्यांतल्या काही मला पटतात, काही पटत नाहीत.
अर्थात माझा शब्द शेवटचा असा माझा आग्रह नाही. विज्ञानाबद्दल कुणी रसाळपणे, 'इतर भाषेत' लिहीत असतील तर मी ते टाकाऊ समजणार नाही. मजकूर महत्त्वाचा, शैली वा धाटणी दुय्यम.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
क्लिष्टता
ज्यांना इंग्लिश समजत नाही, वाचायचे कष्ट खूप वाटतात अशा लोकांना नवीन तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या क्लिष्ट संज्ञा केवळ मराठीत लिहिल्या आहेत म्हणून समजतील अशी अपेक्षा करण्यात कितपत अर्थ आहे? गणित आणि गाण्याचं उदाहरण कशाकरता दिलं आहे ते नीट कळलं नाही. या दोन्ही गोष्टी सरावाने काही प्रमाणात जमू लागतात, तसं मराठीत लिहिलेल्या वैज्ञानिक संज्ञांच्या बाबतीत म्हणणं शक्य आहे? डेटा सायन्स हे शब्द समजणं आणि तो विषय समजणं यात खूप मोठा फरक आहेच.
कष्टेविण फळ नाही.
असहमतीवर सहमत होऊ. हा शब्द माहीत असलेले, आणि विषय न समजलेले लोक मला "फोन आपलं बोलणं ऐकतो", असं छातीठोकपणे सांगतात.
गणित-संगीताचा मुद्दा अशासाठी की कुठलीही नवी संकल्पना, विषय समजून घेण्यासाठी कष्ट करावे लागतात. कष्टाशिवाय जे आकळतं, समजतं ते फोलपटं निघण्याची शक्यता फार जास्त आहे. उदाहरणार्थ, phase space (मराठी?) ही संकल्पना मी काॅलेजात शिकले. त्यानंतर जवळजवळ वीसएक वर्षांनी विदाविज्ञान शिकताना मला ती संज्ञा आकळली. तोवर माझं आकलन फोलपटं होतं. इतर भौतिकशास्त्री-विद्रटांशी बोलताना मी त्यांना याबद्दल विचारते. बहुतेकदा त्यांचा अनुभवही असाच असतो. आता एका संकल्पनेसाठी वीस वर्षं वाट बघा, असा अजिबात आग्रह नाही. म्हणूनच हा-नाही-तर-तो-शब्द-पाहा, असं लिहिण्याचा माझा प्रयत्न असतो. शब्दासाठी इंग्लिश प्रतिशब्द तिथेच दिलेला आहे, पण आमच्या भावना आड येतात किंवा आम्हांला कष्ट घ्यायचे नाहीत, अशांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हीच मराठीत गंभीर गद्य लिहा; ही मागणी मला आकळत नाही. ज्यांना अशा प्रकारचं लिहायचं आहे, त्यांना कुणीही आडकाठी करत नाहीत. मराठीत विज्ञानविषयक चांगलं गद्य नंदा खरे लिहायचे, ते बऱ्यापैकी प्रसिद्धही होते; प्रसिद्ध असणाऱ्यांतले किती चांगलं गद्य लिहितात? चांगलं गद्य नाही तर चांगले वाचक कसे तयार होणार?
संज्ञा किचकटच असतात. त्या पहिल्यांदा शिकताना कष्ट घ्यावेच लागतात. दोन-चार वाढीव शब्दांमुळे आम्ही सगळंच सोडून देणार, असं म्हणायचं असेल तर कदाचित गणित, विज्ञान, तर्कशास्त्र असे काटेकोर विषय आपल्यासाठी नाहीत म्हणून सोडून दिलेलं बरं. इतर विषय काटेकोर नसतात, असा दावा नाही; मला माहीत नाही एवढंच.
मी विदाविज्ञानातल्या नव्या प्रकल्पावर काम सुरू करते तेव्हा सुरुवातीचे किमान चार आठवडे मला का-ही-ही समजणार नाहीये, अशी मनाची तयारी ठेवते. त्यामुळे शिकताना जागोजागी अडखळले तरीही मला फार मानसिक त्रास होत नाही. प्रा. लिमयेंचे लेख वाचताना पहिल्या वाचनात काही समजणार नाही, अशा तयारीनंच वेळ काढून वाचते. दुसऱ्या-तिसऱ्या वाचनात समजतं. कधी लवकरही समजतं. मला त्या संकल्पनाच नीट माहीत नसतात, तर पुढे समजायला वेळ लागणारच. भाषा कुठली का असेना! त्या संज्ञा आत्मसात करण्याचं आकलन आणखी पुढे. कुणी तरी कष्ट घेऊन समजावत आहेत, तर मीही त्यांच्याप्रती आणि स्वतःचाही आदर राखून कष्ट घेते.
इंग्लिशमधल्या संज्ञा लवकर समजतात, (व्यक्ती तितक्या प्रकृती, मला भाषेचा अडसर वाटत नाही) तर त्या लिहिलेल्या आहेतच. विदाविज्ञानाबद्दल मराठीत लिहिणारी माणसं ती किती! पण ती माणसं वाढतील तसा वापर वाढेल. आज क्वांटम कंप्युटिंगमध्ये म्हणे मोजणी करायला खूप कष्ट पडतात. म्हणून ते उद्या असेलच असं नाही. म्हणून ते प्रयोग बंद करा, अशा मागण्या होत नाहीत. मग मराठी भाषेबद्दल का?
मराठी भाषा माझी एकटीची मक्तेदारी नाही, हे खरंच. पण मग सोपा उपाय आहे. आपण आपल्याला आवडेल, पटेल त्या भाषेत आपल्या आवडत्या विषयांवर लिहावं. लिहिल्याशिवाय समृद्धता कशी येणार?
लेखनाचे आणि मुख्यतः वाचनाचे कष्ट घेताना मला दिसलेले मुद्दे, हेच या लेखनामागचं उद्दिष्ट आहे. व्हायरल फेसबुक/ट्विटर पोस्ट कशी लिहावी, हा नाही. कुणाला हिणवावं हाही नाही. ठरावीक शास्त्रीय वा तंत्रज्ञानविषक संज्ञांचं स्पष्टीकरण हाही नाही. त्यातून हा लेख छापील माध्यमात नाही, तर जिथे देवाणघेवाण शक्य आहे अशा व्यासपीठावर मांडला आहे. नसेल एखादा मुद्दा सुस्पष्ट, काही चुका असतील तर सुजाण वाचकांनी त्या दाखवून द्या असंही लिहिलेलं आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
इमोजी स्पष्टीकरण
नबांसाठी दरवेळी स्पष्टीकरण लिहायला पाहिजे. जसे-
= मजेदार टिप्पणी (humorous comment)
म्हणजे सावरकरांचे प्रातःस्मरण वगैरे लिहिण्याची तसदी घ्यावी लागणार नाही.
जनुकांबद्दल प्रश्न
खाजगीत एकांनी एक प्रश्न विचारला, हा त्या प्रश्नाचा सारांश -
पुनरुत्पादनात काय होतं, तर माणसांकडे गुणसूत्रांच्या २३ जोड्या असतात. स्त्रीबीज (ovum) आणि शुक्राणू (sperm) यांत प्रत्येकी या जोड्यांच्या जागी फक्त २३ गुणसूत्रं येतात - जोड्या फुटतात. ह्या जोड्या फुटताना गुणसूत्रावर असलेल्या जनुकांची सरमिसळ होते. समजा पहिल्या जोडीतल्या पहिल्या गुणसूत्रात जनुकांचा १-२-३-४ असा क्रम आहे; जोडीतल्या दुसऱ्या जनुकावर २-३-१-४ असा क्रम आहे. तर स्त्रीबीज किंवा शुक्राणू तयार होताना त्यात ह्या दोन्ही क्रमांची सरमिसळ झालेली दिसू शकते. उदाहरणार्थ, १-२-१-४. चौथ्या ठिकाणी ४ हेच यायला पाहिजे, कारण जोडींत दोन्हींमध्ये त्या ठिकाणी ४ हेच जनुक आहे.
एका वेळच्या वीर्य उत्सर्जनात काही कोटी शुक्राणू (sperm) असतात; डॉ. अभ्यंकर लिहितात १०८ एवढे, एकावर आठ शून्य. (या माहितीवर काही आक्षेप नाही.) म्हणजे अशा २३ जोड्यांमधून तयार होणारी एकेकटी २३ गुणसूत्रं, आणि त्यांत जनुकांच्या कित्येक (हा आकडा खूप मोठा असतो) जोड्या तयार होऊ शकतात. एका माणसाच्या डीएनएमध्ये १ गीगाबाईट एवढी साठवणक्षमता असते, असं कालच वाचनात आलं. असं धरू की खूप मोठा जनुकाशय असतो.
आईच्या बाबतीत स्त्रीबीज तयार कसं होतं? तर मुलगी जन्माला येते तेव्हा तिच्या गर्भाशयात खूप जास्त अंडकं असतात. अपरिपक्व स्त्रीबीजं. मग वयात येईस्तोवर त्यांतली बरीच मरतात. साधारण ४००० स्त्रीबीजं तयार होण्याची शक्यता असते. दर महिन्याला पाळीनंतर साधारण दोन आठवड्यांनी गर्भाशयात एक स्त्रीबीज तयार, पक्व व्हायला लागतं आणि बाहेर येतं. त्याला शुक्राणू भेटला तर गर्भधारणा होते; नाही तर पाळी येते.
डॉ. अभ्यंकरांच्या लेखनावरून असा समज होतो की पुरुष खूप शुक्राणू तयार करतात, त्यामुळे पुरुषाला खूप शक्यता तयार करणं शक्य असतं. स्त्रीच्या शरीरात जन्मजातच (बहुतेक) १ कोटी स्त्रीबीजं नसतात. ह्या उलट पुरुषाचं असं पकडा की दिवसाला १ कोटी शुक्राणू. म्हणजे गुणसूत्रांमध्ये जनुकांची खूप सरमिसळ होते, खूप वैविध्य येतं. आणि त्यामुळे काही पिढ्यांमागे गेल्यावर आपले त्या पिढीतले आजोबा कोण हे सांगता येत नाही.
समजा आपला गर्भ जेव्हा तयार झाला तेव्हा १ कोटी शुक्राणूंमधून एक निवडला गेला, आणि स्त्रीबीज मात्र एकच उपलब्ध होतं. किंवा ४००० धरू. दोन्हींची तुलना करता स्त्रीबीजात असणाऱ्या शक्यता खूप कमी आहेत. आईकडून खूपच कमी वैविध्य आपल्याकडे येतं, असा हा दावा आहे.
गफलत -
यात असं गृहीत धरलेलं आहे की आईच्या गर्भाशयात ज्या काही स्त्रीबीजांच्या जोडण्या उपलब्ध आहेत, तेवढ्याच जनुकीय शक्यता मोजायच्या. जोडण्या निराळ्या, शक्यता निराळ्या.
वरचंच उदाहरण घ्या, ते १-२-३-४ असा क्रम आणि २-३-१-४ असा क्रम असणारी दोन जनुकं एकाच गुणसूत्रावर आहेत. याची किती मिश्रणं तयार होतील? चौथ्या जागी फक्त चारच असेल; एक ते तीन या जागी प्रत्येकी दोन शक्यता आहेत. या जनुकांना जागा बदलता येणार नाही (असं सोप्या गणितासाठी गृहीत धरू). फक्त पहिल्यातलं जनुक निवडायचं का दुसऱ्यातलं असाच पर्याय आहे. तर मला ७ शक्यता सापडल्या. (ह्या गणितांत मी कच्ची आहे, तेव्हा खात्री करून पाहा. पण ह्या शक्यता एकापेक्षा जास्त झाल्या असं म्हणायचं आहे.) आणि एका गुणसूत्रावर चारच्या ऐवजी खूप जास्त जनुकं असतात, त्यामुळे त्या शक्यतांची संख्या खूपच वाढत जाईल. लॉग स्केल वगैरे वापरावी लागेल बहुतेक.
पुरुषाचे शुक्राणू जवळजवळ रोज तयार होतात; म्हणजे रोज ह्या शक्यतांच्या जोडण्या तयार होतात. आईच्या शरीरात जोडण्या तयारच असतात. पण त्या जोडण्या काय आहेत हे आपल्याला माहीत नसतं; त्या शक्यता म्हणूनच राहतात. म्हणजे गुणसूत्रांची एक जोडी, आणि प्रत्येक गुणसूत्रावर ४ जनुकं असं मानलं, तर साधारण ७-१० पद्धतींनी स्त्रीबीज किंवा शुक्राणू तयार होऊ शकतात. आईच्या शरीरात ह्या जोडण्या जन्मजातच मर्यादित असतात; पण म्हणून त्या शक्य नसतात असं नाही. ते निराळं सिद्ध करावं लागेल - हे असं काही कुणी सिद्ध केलं आहे का?
गर्भधारणा होण्याच्या काही तास/मिनिटं आधीच, पुरुषाच्या शरीरात ह्या शक्यतांच्या जोडण्या बनून त्यांना मूर्त रूप (physical manifestation) मिळतं म्हणूनच त्या शक्यता वैध ठरतात असं नाही; आणि आईच्या शरीरात ह्या शक्यतांमधल्या जोडण्यांची संख्या काही वर्षं आधी मर्यादित झालेली असे म्हणून ह्या शक्यता अवैध ठरत नाहीत.
सध्या मुद्दा असा आहे की किती पिढ्या मागे गेल्यावर आपल्याला आपले पूर्वज गुणसूत्रानुसार नातेवाईक असलेले दिसणार नाहीत; किंवा सध्याच्या तंत्रज्ञानानं शोधता येणार नाहीत. आपल्या आईवडलांशी आपलं जनुकीय साम्यं असतं प्रत्येकी ५०%. आपल्या गर्भधारणेच्या वेळेस आईच्या अंडाशयात कमी स्त्रीबीजं होती आणि वडलांनी खूप जास्त शुक्राणू तयार केले म्हणून हा आकडा आईसाठी वेगळा आणि वडलांसाठी वेगळा असा होत नाही. एक पिढी मागे गेल्यावर आई आणि वडलांशी साम्य ५०%; दोन पिढ्या मागे गेल्यावर चारही आजीआजोबांशी साम्य २५%. दहा पिढ्या मागे गेल्यावर ०.०९%.
ह्या गणिताशी स्त्रीवादाचा काहीही संबंध नाही. ही निव्वळ आकडेमोड झाली.
इथपर्यंत वाचलं असेल आणि आणखी हौस असेल तर आणखी किचकटपणा -
स्त्री-पुरुषांमध्ये गुणसूत्रांच्या २२ जोड्या एकसमान लांबीच्या असतात. उदाहरणार्थ, माझ्या सख्ख्या भावाची आणि माझी गुणसूत्रांची तेरावी जोडी अगदी एकसारखी असू शकते. पण तेवीसावी जोडी, जिथे स्त्री का पुरुष हे ठरतं तिथे स्त्रियांकडे दोन्ही क्ष गुणसूत्रं असतात. पुरुषांकडे एक क्ष आणि एक य असतं. यांतलं य गुणसूत्र लांबीला लहान असतं. जर गुणसूत्राची लांबी कमी तर किती शक्यता मिळणार याची संख्या कमी होते. आपण ज्या आकड्यांचा विचार करत आहोत, त्या हिशोबात हा फरक छाटछूटच आहे, पण त्यातही स्त्रियांच्या दोन लांबड्या क्ष गुणसूत्रांमूळे शक्यतांची संख्या वाढते. हा फरक छाटछूट आहे हे कशावरून? तर आपलं आपल्या आईवडलांशी जनुकीय साधर्म्य ५०-५०% असतं.
अवांतर - सई केसकर यांनी एक महत्त्वाचा मुद्दा खाजगी संवादांत मांडला. तो मूळ लेखातल्या भाषेशी संबंधित आहे. आपले वडील कोण हे गर्भधारणेच्या वेळी ठरतं. आपले बाबा कोण, हे आपल्या जन्मानंतर आपली आई आपल्याला सांगते. आता जनुकीय चाचण्यांची सोय झालेली असली तरीही बाबा कोण हे आई ठरवते. हा भाषिक काटेकोरपणा महत्त्वाचा आहे.
(नोंद - कुणी या शक्यतांचे योग्य आकडे शोधल्यास मी ते इथे लिहेन. मी ह्या विषयात अंमळ कच्ची आहे.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
धन्यवाद.
गद्रे, अभ्यंकर, रावत तिघांचे लेख वाचून मग इथला लेख वाचला. Great fun. लेख आवडला (तुमचा).
गुमसुम गुमसुम हैं क्यूँ आज तू, बोलना बोलना
वेद म्हणतात शून्यापासून विश्व
वेद म्हणतात शून्यापासून विश्व निर्मिती झाली आहे. मोहरीचे एक बी मातीत पेरले की काही महिन्यातच मोहरीच्या रोपावरअसंख्य बिया उत्पन्न होतात. पण मातीतून मोहरीचे तेल काढू शकत नाही. विघटित झाल्यावर सर्व फळे भाज्या तेल बिया आणि मनुष्यही मातीत विघटीत होऊन जातो. एकाच मातीच्या गमल्यात मी दरवर्षी किंवा तर सहा महिन्यांनी कधी फुल टमाटो वांगे पुदिना वेगवेगळे पदार्थ घेतो. माती एकच असते +दिल्लीची प्रदूषित हवा आणि यमुनेचे पाणी. बदलत्या वातावरणात मातीतून उत्पन्न पदार्थ ही बदलतात. दशावतार हा उत्क्रांतीचा सिद्धांत आहे. डार्विनचा वैदिक हिंदू सिद्धांतच सिद्ध केला आहे.
तुमच्याकडे जादूची कुंडी आहे,
तुमच्याकडे जादूची कुंडी आहे, का तुम्ही काही महिन्यांनी कुंडीत दुसरे झाड लावता, याबद्दल स्पष्टता नाहीये.
बाकी दशावतार उत्क्रांतीचा सिद्धांत हा काय म्याटर आहे ? त्यात मासा, कासव, डुक्कर, माणूस, सिंह हे सगळे अतिशय कॉम्प्लेक्स प्राणीच दिसतात. बरे, पाण्यातून जीव जन्मला आणि पहिला अवतार मत्स्य - हे पण चालत नाही, कारण मत्स्य अवतार आला तेव्हा मनू वैगरे माणसे होतीच.
गुमसुम गुमसुम हैं क्यूँ आज तू, बोलना बोलना
जौद्याहो!
कुठे त्यांच्या तोंडी लागता?
ओके. विश्व ही निर्मिकाची
ओके. विश्व ही निर्मिकाची निर्मिती किंवा डिझाईन आहे.
आता पुढचं बघूया. निर्मिक ही ग्रँड निर्मिकाची निर्मिती की स्वयंभू? तो स्वयंभू असेल तर मग मुळात विश्व स्वयंभू आहे हा सिद्धांत का बुआ कमअस्सल?
.
पदार्थ हे अणू आणि रेणूंचे (किंवा, काही लोकांच्या भाषेत, परमाणूंचे आणि अणूंचे – संदिग्धता टाळण्याकरिता ‘अॅटम्सचे नि मॉलेक्यूल्सचे’ असे मराठीत म्हणू या.) बनलेले असतात, म्हणतात. फर्दर, मॉलेक्यूल्स हे अॅटम्सपासून, अॅटम्स हे प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स, झालेच तर आणखीही जी जी काही सबअॅटॉमिक पार्टिकले असतील, त्यांच्यापासून, वगैरे वगैरे.
मग आता मला सांगा, ही जी सगळी सबअॅटॉमिक पार्टिकले असतात, ती शिंची नक्की कोणत्या मटीरियलची बनतात? (कोण नि कोठे बनवतो, हा फार पुढचा प्रश्न. तो तूर्तास सोडून देऊ. किंवा, तुमच्या त्या लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास वगैरेंस अनुसरून, ही पार्टिकले – किंवा, अगदी अॅटम्ससुद्धा – (आत्म्याप्रमाणेच) बनविता किंवा मोडता येत नाहीत – नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः, वगैरे वगैरे – असे जरी मानले, तरीसुद्धा, या सबअॅटॉमिक पार्टिकलांमधील मटीरियल काय, हा प्रश्न उरतोच.)
——————————
थोडक्यात, तुम्ही जर ‘निर्मिक नाही’ असा दावा करणार असाल (आणि, माइंड यू, त्या दाव्याशी माझा काहीच पंगा नाही), तर मी, समांतर लॉजिकने, ‘काहीच नाही’ असा दावा करण्यास सिद्ध आहे.
चूक! निर्मिक ही मनुष्याची – तुमचीआमची! – निर्मिती आहे. सोयीकरिता, सोयीप्रमाणे बनविलेली.
हेही चूक. एका थियरीनुसार, मी कल्पना करतो, म्हणून हे जग आहे. तुम्ही, विवेक पटाईत, राजेश१८८, ऐसीअक्षरे, झालेच तर ३_१४ विक्षिप्त अदिती, फार कशाला, अगदी चिंतातुर जंतूसुद्धा – हे सगळे माझ्या कल्पनेचे खेळ आहेत. मी जर कल्पना करायचीच नाही म्हणून ठरविले, तर तुम्हाला कोणालाच अस्तित्व नाही. I think, therefore you are! (संकल्पनाश्रेय: ग्रॅहम ग्रीन. हादेखील मीच कल्पिलेला, बरे का!)
हं, आता, माझी कल्पनाशक्ती दरिद्री आहे, त्याला कोण काय करणार? म्हणून तर असल्या भिकार कल्पना करीत बसतो!
उलटपक्षी, मी जर तशी कल्पना करायचे ठरविले असते, तर तुम्हाला दहा मुंडकी नि एक शेपूट, नि ३_१४ विक्षिप्त अदितीला भरघोस मिश्या असत्या. विवेक पटाईत हे जीनांचे चमचे असते. राजेश१८८ हे सुसंबद्ध लिहिते. फार कशाला, चिंतातुर जंतू हे शाकाहारी आणि ब्राह्मणवर्चस्ववादी असते. हे सर्व असे नाही, हे केवळ मी तशी कल्पना केली नाही, म्हणून. (का, तर निव्वळ माझी मर्जी, या कारणास्तव.) You can thank me for that!
——————————
असो चालायचेच.
रोचक दिली.
रोचक दिली.
न्यॅ!
असं समजू की अणू बनलेले असतात प्रोटॉन, इलेक्टॉन, न्यूट्रॉनचे. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे कण बनलेले असतात क्वार्कचे. इलेक्ट्रॉन आणि क्वार्कचे तुकडे होऊ शकत नाहीत, असं सध्या गृहीत धरू. तो सध्याचा सिद्धांत आहे.
हे असं का - याला विज्ञानात काहीही उत्तर नाही. हे असं आहे म्हणून आहे.
कुणी निर्मिकानं जर जग/विश्व निर्माण केलं तर का केलं असा प्रश्न येतो. हेतूचा प्रश्न येतो; कारण ही जी कुणी निर्मिक आहे, तिला बुद्धी आहे, तिला काही समजतं असं गृहीतक आहे. त्यामुळे हेतूचा प्रश्न येतो.
क्वार्क, इलेक्ट्रॉन, लेप्टॉन वगैरे कणांना काहीही हेतू नाही. फक्त भौतिकशास्त्राचे नियम आहेत. ते कुणीही बनवलेले नाहीत - ते कसे आहेत याचं वर्णन तेवढं सांगता येतं.
त्यामुळे गविंचा प्रश्न थोडा वेगळ्या पद्धतीनं विचारला तर पुन्हा अनुत्तरित राहतो. निर्मिकानं जग का बनवलं? मग निर्मिकाला कुणी बनवलं?
---
अवांतर - ३_१४ विक्षिप्त अदितीला भरघोस मिश्या आहेत. त्याचा 'न'बांच्या कल्पनाशी काहीही संबंध नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
नेमके टिपले.
नेमके टिपले.
गुमसुम गुमसुम हैं क्यूँ आज तू, बोलना बोलना