हल्लीच राज्य शासनानं अनुवादाचा पुरस्कार कोबाड गांधींच्या पुस्तकाच्या अनुवादासाठी अनघा लेले यांना दिला होता; आठवड्याभरात तो परत घेतला. तेव्हा दुसऱ्या पुस्तकाला दिलेला पुरस्कार अधिक चक्रावून टाकणारा आहे. त्या संदर्भात 'लोकसत्ता'मध्ये दोन लेख आले आहेत -
१. पुरस्कारप्राप्त पुस्तकाचे लेखक डॉ. गद्रे यांनी लिहिलेला लेख - ‘माझे पुस्तक छद्मविज्ञान नाही’
२. या पुस्तकाचा समाचार घेणारा डॉ. शंतनू अभ्यंकर यांचा लेख- ‘डार्विन मेल्याचं दु:ख नाही, पण..’
हा लेख लिहिण्याचं कारण मराठी अललित लेखन वाचताना मला काही गोष्टी वारंवार टोचतात. त्यांची ही नोंद.
माहिती आणि मतांमधला फरक
साधारणतः वैज्ञानिक लेखनाची पद्धत अशी की पुरावे मांडायचे, त्यावरून आपले निष्कर्ष मांडायचे. त्याबद्दल आपलं मत मांडायचं नाही. कधी हे मत मांडणं अगोचरपणाही वाटू शकतो. उदाहरणार्थ, गुरुत्वाकर्षणाचा नियम. समजा त्याबद्दल लिहिताना कुणी म्हणालं, "हातातली वस्तू सुटली की पडते, आणि आतले पदार्थ सांडतात; काचेची, मातीची वस्तू असेल तर सगळीकडे त्याच्या ठिकऱ्या उडतात आणि त्यातून कुणाला दुखापत होऊ शकते; काम वाढतं; म्हणून मला गुरुत्वाकर्षण आवडत नाही." तर ते हास्यास्पद ठरण्याची शक्यता जास्त. (मीमर आणि स्टँडप लोकांनी सदर विनोदाची दखल घ्यावी.) मुद्दा मांडण्याकरता मी मुद्दामच टोकाचं उदाहरण वापरलं आहे.
इतिहासाबद्दल वगैरे लिहिताना आपली मतं मांडण्यातला हास्यास्पदपणा कदाचित कमी ठरेल. उदाहरणार्थ, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची कथा खरी आहे का खोटी; याबद्दल मत व्यक्त करणं कदाचित इतिहासलेखनाच्या पद्धतीला ठरूनही असेल. मात्र विज्ञानाबद्दल लिहिताना निष्कर्षांसोबत आपलं मतही जोडून देणं मला अगत्यपूर्ण वाटत नाही. आपले वाचक सुजाण असल्याचं मनात धरून लिहावं; त्यांना समजेलशा भाषेत आणि पद्धतीनं माहिती आणि तिचं विश्लेषण द्यावं. वाचकांना आपले आपण निष्कर्ष काढू द्यावेत. (अशा लेखनाचं एक उदाहरण आठवलं म्हणजे 'द न्यू यॉर्कर'मध्ये काही काळापूर्वी आलेला युवाल नोआ हरारीबद्दलचा लेख. मला त्यातले तपशील आता आठवले नाहीत तरीही लेखातून हरारीची प्रच्छन्न टिंगल केल्याची जाणीव, आठवण राहिली.)
ललित लेखनाचा सुकाळ
विज्ञानाबद्दल लिहिताना शक्यतोवर विशेषणं टाळावीत. ह्या दोन्ही लेखांमध्ये विशेषणांचा सुकाळ आहे. उदाहरणार्थ, डॉ. अभ्यंकरांच्या लेखातलं हे वाक्य -
अशा जनुकीय रचना इतक्या नेमक्या, सुंदर, सुचारू, सुबक आणि सुभग की आहेत असे वाटावे, की या रचना नक्कीच कोणी तरी जाणीवपूर्वक घडल्या आहेत;
पहिलं वाक्य मुद्दामच डॉ. अभ्यंकरांच्या लेखातलं वाक्य निवडलं; कारण मला त्यांचे मुद्दे बहुतांशी मान्य आहेत पण पद्धत मान्य नाही. सदर उद्धृत जर डॉ. गद्रेंच्या पुस्तकातलं असेल तर तशी नोंद हवी; किमान अवतरणं हवीत. पण ती नाहीत. शिवाय सदर विशेषणं पुन्हा पुढच्या भागातही येतात.
कालांतराने, सोयीचे क्रम आबादीत आबाद ( Become dominant in the population) होतात, गैरसोयीच्या क्रमांचे तण आपोआपच लुप्त होते. येणेप्रमाणे पिढीगणिक अधिकाधिक नेमक्या, सुंदर, सुबोध, सुबक आणि सुभग रचना साकारू लागतात.
एवढी संस्कृतप्रचुर, नाटकी (आणि वाचकांना दूर लोटणारी) भाषा डॉ. गद्रे वापरत नाहीत. पण ललित लेखनात असतात तशी वर्णनं आहेत -
माझ्या या शोधात गेल्या तीस-चाळीस वर्षांत मायक्रोबायॉलॉजी आणि जेनेटिक्समध्ये जे भन्नाट शोध लागले आहेत ते पाहताना मी चक्रावलो. धरण फुटावे तसे सर्व दिशांनी पुरावे अंगावर कोसळायला लागले. हे पुरावे याकडे बोट दाखवत होते की, उत्क्रांती होणे अशक्य आहे आणि इंटेलिजंट डिझाईन – बुद्धिमान अभिकल्प सिद्धांत हा उत्क्रांतीला पर्याय म्हणून पुढे येत आहे.
लेखात अशा पुराव्यांपैकी एकाचाही, ओझरताही उल्लेख नाही. जरा तपशील लिहिले तर वाचकांना मायक्रोबायलॉजी आणि जेनेटिक्स अजिबातच समजणार नाही असं नाही; पण तेवढीही तसदी न घेता, फक्त मनाची अवस्था काय ते लिहिण्यातून वाचक म्हणून वाचकांना काय समजणार? मग लेखकाचं व्यक्तिगत मत आणि लेखकाचं मतस्वातंत्र्य म्हणून ते सोडून द्यावं का? 'ऐसी'वर किंवा फेसबुकवर कुणी हे असं लिहिलं तर मी ते सोडून देईन. ह्या बाबतीत मी ते सोडून देणार नाही; कारण सदर पुस्तकाला शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. लेखकाला वैज्ञानिक लेखन नीट करता येत नसेल तर मला ह्या पुरस्कार देणाऱ्या लोकांबद्दलही शंका येते.
मात्र रंजकपणा निराळा. अगदी परवाचीच गोष्ट. मी आणि जुने दोन सहकर्मचारी जेवायला भेटलो होतो; एकाचे दोन मुलगेही आले होते; त्यांची वयं ११ आणि १३. आम्ही विदाविज्ञानातल्या (डेटा सायन्स) प्रारूपांच्या निकालांबद्दल बोलत होतो. लहान मुलानं प्रश्न विचारला, "म्हणजे ते काम करत नाहीये, असं म्हणायचं आहे का?" तर त्याच्या वडलांनी सुंदर उपमा वापरली. "तू 'मॅकडॉनल्ड्स'मधलं स्वस्तातलं बर्गर खातोस; आणि 'हॉपडॉडी'मधलं महागाचं बर्गरही खातोस. दोन्ही बर्गरच. पण 'हॉपडॉडी'सारखे पैसे घेऊन कुणी 'मॅकडॉनल्ड्स'सारखं बर्गर दिलं तर तू काय म्हणशील? हे बर्गरच नाही असं म्हणशील, का हे बर्गर खास चांगलं नाही असं म्हणशील?" त्या मुलाला मशीन लर्निंग, विदाविज्ञान यांतलं काहीही समजत नाही; पण चर्चेचा मुद्दा काय होता ते बरोब्बर समजलं.
मराठी अललित लेखनात वाचकांना एक टोकाला ११ वर्षांचे समजूनच लिहिलेलं सापडतं; उदाहरणार्थ, डॉ. गद्रेंचं हे वरचं वाक्य. किंवा दुसऱ्या टोकाला संज्ञांचा भडीमार.
गृहितकं आणि संज्ञांचा भडीमार
डॉ. अभ्यंकरांच्या लेखातला हा परिच्छेद पाहा.
दर वेळी सरासरी एक दशकोटी १०^८ (एकावर आठ शून्य) पुंबीजापैकी एकाचा संयोग होऊन मानवाला मूल होते. प्रत्येक पुंबीज अनन्य जनुके बाळगून असते. तेव्हा तुम्हाला तुमचीच जनुके मिळाली याची शक्यता एका दशकोटीत एक एवढी झाली. ही जनुके तुम्हाला तुमच्या वडिलांकडून मिळाली आणि त्यांना तुमच्या आजोबांकडून..! अर्थातच नेमकी तुमचीच जनुके तुम्हाला संक्रमित होण्याची शक्यता, दर पिढीत एका दशकोटीत एक, अशा घटकाने दुर्मीळ होत जाईल. असे मागे मागे गेल्यास दहाव्या पिढीत तर तुमची जनुके तुम्हाला प्राप्त होण्याची संख्याशास्त्रीय शक्यता जवळपास शून्य आहे असे गणिती उत्तर येईल; पण तुम्ही तर आहात!
यात दोन ठिकाणी गंमत आहे.
१. पहिलंच वाक्य आहे, '... पुंबीजापैकी एकाचा संयोग होऊन ...'. यात संयोग कशाशी होऊन मानवाला मूल होतं, याचा उल्लेख नाही. म्हणजे फक्त वैज्ञानिक पातळीवरच नाही तर भाषिक पातळीवरही विधान अर्धवट आहे.
२. परिच्छेदाच्या शेवटी, दहा पिढ्या मागे गेल्यास आपली जनुकं मिळण्याची संख्याशास्त्रीय शक्यता जवळपास शून्य का आहे, याचं काहीही स्पष्टीकरण नाही.
अशाच प्रकारचं विधान मी सात (का आठ) पिढ्यांबद्दल वाचलं ते 'The Genetic Lottery' या पुस्तकात. (पुस्तकाचा परिचय मी मागे करून दिला होता, त्याचा दुवा.) यात काहीही नावीन्य वा चक्रावून टाकण्यासारखं नाही. त्याचं कारण असं की आपल्याला फक्त वडलांकडून, वडलांना आजोबांकडून जनुकं मिळत नाहीत. या सगळ्या प्रक्रियेत बायकांचाही काही वाटा असतो. पुढच्या मुद्द्यात आणखी स्पष्टीकरण आहे.
लेखनातला स्त्रीद्वेष
माणसं म्हणजे फक्त पुरुष हे प्रमाणलेखनातलंही प्रमाण आहे. किमान वैज्ञानिक लेखनाततरी याची दखल घ्यायला हरकत नसावी. वर उदाहरण दिलेला जनुकांच्या मोजमापाचा परिच्छेद पाहा.
आपल्याला जनुकं आपल्या आई-आजीकडूनही मिळतात - अगदी पुरुषांचीही अर्धी जनुकं आईकडून आलेली असतात. वर दिलेल्या परिच्छेदाच्या सुरुवातीला फक्त वडील, आजोबांकडून आलेल्या जनुकांचा उल्लेख आहे; या अर्धवट माहितीतून, दहा पिढ्या मागच्या आजोबांशी आपलं जनुकीय नातं प्रस्थापित करणं खूप कठीण का होईल, याचं स्पष्टीकरण देता येणं शक्य नाही. मात्र दहा पिढ्या आधी आपले किती पूर्वज असतील याचाही विचार मांडलेला नाही. (याचं उत्तर २१० = १०२४ असं आहे. त्यात आधीच्या पिढ्यांत कुणी चुलत-मावस-आते-मामे भावंडांनी लग्नं केलेली नाहीत असं गृहीतक आहे.)
सगळी माणसं फक्त पुरुषच असतात, अशा प्रकारची वाक्यरचनाच मराठी लेखनात दिसते. एकही अपवाद नाही, चुकूनही नाही. बायका लिहितात तेव्हाही नाही. अगदीच मासिक पाळी किंवा गर्भधारणा असे विषय असतील तर गोष्ट निराळी. (इथे मी सवयीनुसार "... तर इलाजच नसतो" असं लिहू शकले असते; पण लिहिणार नाही. कारण विशेषणं आणि ललितलेखन शक्यतोवर टाळावं.)
हे असं का करू नये, याच्या स्त्रीवादी स्पष्टीकरणात मी आत्ता शिरणार नाही. तो सदर लेखाचा विषय नाही.
संदर्भ का नामस्मरण - references or name dropping?
(मराठीत name droppingसाठी चांगला शब्द(समूह) आहे का? सध्या आहे हा खपवून घ्या.)
अललित लेखनात संदर्भ देणं, ही सवय खरं तर चांगली आहे. मीही वर The Genetic Lottery या पुस्तकाचा उल्लेख केला आहेच. मात्र ते संदर्भ देताना कुणाचे आणि काय कारणासाठी देत आहोत, याचा विचार तेवढाच महत्त्वाचा आहे.
डॉ. गद्रे त्यांच्या लेखात मायकल बेहेचा संदर्भ देतात. हे बेहेचं विकिपिडीया पान; बऱ्यापैकी भरलेलं आहे. त्यातलं पहिलं वाक्य -
Michael Joseph Behe[2] (/ˈbiːhiː/ BEE-hee; born January 18, 1952) is an American biochemist and author, widely known as an advocate of the pseudoscientific principle of intelligent design (ID)
(साधारण भाषांतर - मायकल जोसेफ बेहे (जन्म १८ जानेवारी १९५२) हा अमेरिकी बायोकेमिस्ट आणि लेखक आहे; छद्मविज्ञान आणि 'इंटलिजन्ट डिझाईन' यांचा पुरस्कर्ता म्हणून तो लोकप्रिय आहे.)
बरं, हे विधान फक्त नावं ठेवणारं आहे. तर दुसऱ्या परिच्छेदातला मजकूर पाहा. ह्या परिच्छेदात विधानांचे संदर्भही दिलेले आहेत.
Behe's claims about the irreducible complexity of essential cellular structures have been rejected by the vast majority of the scientific community,[6][7] and his own biology department at Lehigh University published a statement repudiating Behe's views and intelligent design.[8][9]
(साधारण अर्थ - बेहेचे पेशीरचनेबद्दलचे दावे मोठ्या संख्येनं वैज्ञानिकांनी फेटाळले आहेत; तो नोकरी करतो त्या लिहाय विद्यापीठानं परिपत्रक काढून बेहेची मतं फेटाळली आहेत.)
डॉ. गद्रे पुढे उल्लेख करतात तो डॉ. पॉल डेव्हिस यांचे ‘द फिफ्थ मिरॅकल’ या पुस्तकाचा. वरवर वाचून मला पुस्तकाबद्दल एवढंच समजलं की डेव्हिस यांनी या पुस्तकात दावा केला आहे तो मंगळावरून जीवसृष्टी पृथ्वीवर आली असा.
पॉल डेव्हिस यांच्या विकिपिडीया पानावरून त्यांच्या संशोधनांबद्दल आणि दाव्यांबद्दल काही मत बनवावं, इतपत माहिती मिळाली नाही.
तुकोबांच्या अभंगांत अनेकदा विठ्ठलाचा उल्लेख येतो. तुकोबा विठ्ठलाचे भक्त होते; त्यांनी नामस्मरण करणं अपेक्षितच आहे. तुकोबा काव्यरूपात तत्त्वज्ञान मांडत होते; म्हणजे ललित लेखन करत होते. त्यात असा देवाचा उल्लेख होण्यात काही नवल नाही. मात्र वैज्ञानिक आणि/किंवा अललित लेखनात फक्त पुस्तकं आणि पुस्तकाच्या लेखिकांचा उल्लेख करायचा आणि त्यांनी काय म्हणलं आहे हे लिहायचंच नाही, ही पद्धत अक्षम्य आहे. गद्रेंनी (किंवा कुणीही) हे आपल्या आत्मचरित्रात वा तत्सम लेखनात जरूर लिहावं.
त्यामुळे गद्रेंच्या लेखावर इथे दोन आक्षेप येतात - नामस्मरण; आणि तेही छद्मदेवतांचं.
तपशिलांतला सैतान
अर्थात, पुढे गद्रे हेही लिहितात -
जर मी खराखुरा विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारा असेन तर कार्ल सेगन या वैज्ञानिक तत्त्ववेत्त्याने दिलेल्या विज्ञानाच्या कसोटय़ांवर चालणे मला भाग आहे.
या कुठल्या वैज्ञानिक कसोट्या? कार्ल सेगननं असं काही सांगितलं आहे का, हे आजच्या वाचकांना का माहीत असेल? सेगन गेल्यालाही आता २७ वर्षं झाली.
त्यातून विज्ञान म्हणून महत्त्वाचा मुद्दा - कोण कार्ल सेगन (जन्म १९३४)? वैज्ञानिक कसोट्या कार्ल सेगननं सांगितलेल्या का? त्याच्या आधी कुणी हे तत्त्वज्ञान मांडलेलं नव्हतंच का? सोबत दिलेल्या डॉ. अभ्यंकरांच्या लेखातही कार्ल पॉपरच्या (जन्म १९०२) falsifiability - खोडून काढता येण्याची सोय - या वैज्ञानिक तत्त्वाचा उल्लेख आहे.
रेटून खोटं बोलणं
डॉ. गद्रेंच्या लेखातून -
डार्विन जरी प्रामाणिकपणे सांगत होता की, माझ्याकडे आज पुरावा नाही आणि जरी त्याच्याच तोलामोलाचा समकालीन शास्त्रज्ञ लुई पाश्चर प्रयोगाने हे सिद्ध करत होता की, मॅटरपासून लाइफ – मातीतून जीवन अशक्य आहे; तरी अनाकलनीय कारणांनी तत्कालीन विज्ञानाने डार्विनचे उबदार तळे स्वीकारले. पहिली पेशी ही टाईम, मॅटर आणि चान्स याद्वारे मॅटरपासून तयार झाली हे स्वीकारले. आज दीडशे वर्षांनीसुद्धा या सिद्धांताला डार्विनला अपेक्षित पुरावा मिळालेला नाही.
१. डार्विन (१८०९-१८८२) विरुद्ध पाश्चर (१८२२-१८९५) हा नक्की काय प्रकार आहे? विज्ञानाचा इतिहास बघितला तर त्यात उत्क्रांती, आणि लशींचा शोध आणि जंतूंमुळे होणारे रोग हे अत्यंत महत्त्वाचे टप्पे आहेत. आजवर कुठेही माझ्या वाचनात डार्विन विरुद्ध पाश्चर असं काही नाही. माझ्या वाचनाबद्दल बोलायचं एकमेव कारण, बहुसंख्य मराठी वाचकांच्या तुलनेत विज्ञानाबद्दल माझं वाचन जरा जास्त असावं. बहुसंख्य वाचकांना या विषयाची प्राथमिक माहितीही नसेल तर त्याबद्दल किमान एखादं वाक्य लिहायला हरकत नाही. एरवी डॉ. गद्रेंना जे समजलं तेच काय ते प्रमाण मानायचं असा आग्रह विज्ञान मानत नाही.
२. त्यातून लुई पाश्चरनं नक्की काय आणि कसं सिद्ध केलं? हा प्रश्न विचारण्याचं कारण एक तर पाश्चर प्रसिद्ध आहे त्याच्या निर्जंतुकीकरणाच्या प्रयोगांसाठी, लशीकरणासाठी आणि जंतूंमुळे रोग होतात या सिद्धांतासाठी. बाकी त्याची मतं त्याच्यापाशी! ते विज्ञान नाही. वैज्ञानिकांची व्यक्तिगत मतं, आणि/किंवा आपसांतले हेवेदावे हे विज्ञान नाही.
३. तिसरा मुद्दा मिलरच्या प्रयोगाचा - विकिपिडियाचा दुवा. हा रसायनशास्त्रातला प्रयोग होता. पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळात वातावरणात मिथेन, पाणी, अमोनिया, हायड्रोजन असे वायू ठरावीक प्रमाणात होते. त्या प्रमाणांत वायू घेऊन मिलरनं त्यात इलेक्टिक आर्क (मराठी?) सोडली. त्यातून प्रयोगशाळेत अमिनो आम्लं तयार झाली. या प्रयोगाला जीवनाची रासायनिक सुरुवात (chemical origin of life) असं म्हणलं जातं.
४. आणि एक बारका मुद्दा - डार्विनला चिकार पुरावे आहेत. डार्विनचं लेखन बघितलं तरी डार्विन होता हे सिद्ध होईल. हा कीस पाडणं अगत्याचं आहे; कारण विज्ञान निराळं आणि वैज्ञानिक निराळी. लुई पाश्चर आणि डार्विनचे जर काही मतभेद असतील तर ते निराळे आणि त्यांनी मांडलेलं, सिद्ध केलेलं विज्ञान निराळं.
५. यात मला न समजलेला आणखी एक, भौतिकशास्त्राशी संबंधित मुद्दा म्हणजे - जीव मॅटरचे बनलेले असतात, हे डॉ. गद्रेंना मान्य नाहीसं दिसतं. हे माझ्या आकलनापलीकडचंच आहे. सोपं उदाहरण पाहा - माझे गळलेले केस आणि कापलेली नखं मी बहुतेकदा कंपोस्टात टाकते. काही दिवसांनी ती नखं, केस असं दिसणं बंद होतं. सजीवांची संपूर्ण शरीरंच मॅटरची बनलेली असतात. डॉ. अतुल गावंडे त्यांच्या Being Mortalमध्ये मृत्युचं वर्णन असं काहीसं करतात (आठवणीतून लिहीत आहे) की, शरीरातल्या महत्त्वाच्या व्यवस्था - हृदय, यकृत, मूत्रपिंडं वगैरे - हळूहळू मंदावत जातात; कमी काम करतात. आणि शेवटी काम एवढं कमी होतं, थांबतं की शरीराची जिवंत असण्याची स्थिती टिकवता येत नाही. तो मृत्यू.
इथे ओकॅमचा वस्तरा आठवतो. निर्मिक, देव, दैवी शक्ती, काहीही म्हणा, यांच्याशिवाय जर जन्म आणि मृत्यू यांचं स्पष्टीकरण देता येत असेल तर ही गुंतागुंत, क्लिष्टता आणखी कशाला हवी? (मी स्वतः या कशावर विश्वास ठेवत नाही, पण ते माझं व्यक्तिगत मत. तसं कुणी काही विश्वास ठेवत असाल तर ते तुमचं व्यक्तिगत मत. व्यक्तिगत मत म्हणजे विज्ञान नाही.)
६. डार्विनचं उबदार तळं म्हणजे नक्की काय?
मी अललित लेख मुद्रितशोधनासाठी म्हणून वाचते तेव्हा संपादन-छापाचे असे प्रश्न विचारते. याचं उत्तर मला, एकटीला द्या असा आग्रह नसतो. पॉप्युलर (मराठी?) लेखनाचे वाचक साधारणतः दहावी-बारावीपर्यंतचं विज्ञान, गणित, भाषा, इतिहास वगैरे विषय शिकलेले आणि वाचनाची आवड असणारे असतील असं गृहीत धरून लिहिण्याचा संकेत आहे. विषय आणि वाचनाची गोडी असणाऱ्या वाचकांना समजेल अशा भाषेत, संज्ञा वापरल्यास त्यांचे अर्थ स्पष्ट करून, नेहमीपेक्षा निराळी वाक्यरचना केली तर त्यांचे अर्थ स्पष्ट करून लिहिल्यास वाचकांचा रसभंग होत नाही. मी स्वतः लिहिताना हे नियम स्वतःला सांगते, पण ते पाळत असेनच असं नाही. नाही प्रत्येक वेळेस लक्षात येत; तर संपादक, मुद्रितशोधक, आणि पुढे सुजाण वाचकांनी हे काम करून देणं अपेक्षित असतं.
सदर लेखनात मला गेल्या ४-५ वर्षांत दिसलेले आणि ह्या दोन लेखांमध्ये दिसणारे मुद्दे मांडले आहेत. ही यादी पूर्ण नाही. मात्र ही यादी लिहून काढायला प्रेरणा देण्यासाठी डॉ. गद्रे आणि डॉ.अभ्यंकर या दोघांचेही आभार.