आयुर्वेदाची शास्त्रीयता – भाग ६ – प्रश्नोत्तरे

आयुर्वेदाची शास्त्रीयता – भाग ६ – प्रश्नोत्तरे

डॉ. विष्णू जोगळेकर

अबापट : जीवाणूजन्य (Bacteial) आजार (व त्याचे निदान, निदानपद्धती, या आजारांवर होऊ शकणारे संभाव्य उपचार) यावर आधुनिक विज्ञानाला जाण गेल्या दोन दशकांमध्ये आली. विषाणूजन्य (Viral) आजारांबद्दल हीच जाण येणे गेल्या शंभर वर्षातीलच (आणि अजून हे काम सुरूच आहे). याबाबतीत आयुर्वेद काय सांगतो? आयुर्वेदात जिवाणू किंवा विषाणू यांचे अस्तित्व व त्यावरील उपाय याबद्दल काय माहिती सांगितली गेली आहे? (म्हणजे हे असं काही असतं हे या शास्त्राला मान्य आहे का?)

अत्यंत योग्य प्रश्न आहे. प्रथम जीवाणू-विषाणू यांबद्दल आयुर्वेद काय म्हणतो ते सांगतो आणि नंतर महासाथीबाबत पाहू.

कृमी हा आयुर्वेदानुसार निज या प्रकारचा विकार आहे. आयुर्वेदानुसार विकारांची वेगवेगळी वर्गीकरणे वर्णन केली आहेत.

  • शारीरिक, मानसिक
  • आशुकारी (नव), चिरकारी (जीर्ण)
  • औषधसाध्य, शस्त्रसाध्य

इंद्रियांच्या गैरवापराने होणारे, कळतंय पण वळत नाही म्हणून चुकीच्या वागण्याने होणारे, आणि वयानुसार होणारे (तांत्रिक संज्ञा असात्म्य इंद्रियार्थ संयोगज, प्रज्ञापराधज आणि कालज / परिणामज) अशा अनेक वर्गीकरणांतील एक म्हणजे निज आणि आगन्तु.
आगन्तु हे बाहेरून आलेले, शस्त्रांचा आघात, वीज पडणे वगैरे कारणांमुळे होणारे.

तर निज म्हणजे शरीरांतर्गत परिस्थिती बिघडली म्हणून होणारे. मधुमेहासारखे, दमा, अर्धांगवायू, संधीवात यांच्यासारखे. आधुनिक वैद्यक जीवाणू-विषाणू यांना बाहेरून येणारे आगन्तु, आक्रमक असे मानते. लुई पाश्चरने केलेल्या प्रयोगांतून, जर्म थियरी सिद्ध झाल्यापासून जंतूंचा नायनाट असा करायचा याचा विचार आधुनिक वैद्यक करू लागले आणि काही जीवघेण्या जंतूंबाबत दैदीप्यमान यशही मिळवले. देवी-निर्मूलन जाहीर झाले आणि लसीकरण थांबवले गेले त्याला आता ४४ वर्षे झाली. पोलिओ नष्टप्राय आहे. अनेक लशी निघाल्या आणि पूर्वी खतरनाक असलेले अनेक आजार आज दृष्टीस पडत नाहीत.

अलेक्झांडर फ्लेमिंग आणि पेनिसिलीन ही गोष्ट सर्वांनाच माहीत आहे.

पण थोडे आऊट ऑफ बॉक्स सिंहावलोकन करुयात का?

प्रतिजैविकांमुळे (ॲण्टिबायोटिक्स) संसर्गांवर (इन्फेक्शन) सुरुवातीला प्रचंड प्रमाणात मात केली गेली. पण एका नव्या स्वरूपात उत्क्रांती होत गेली; आधी औषधांचा परिणाम न होणारे जीवाणू (ड्रग रेझिस्टंट बॅक्टेरिया) आले. त्यावर नवी प्रतिजैविके आली. मग बहुऔषधांना न जुमानणारे जीवाणू (मल्टिड्रग रेझिस्टंट बॅक्टेरिया) आले. सध्या पाचव्या आणि सहाव्या पिढीची प्रतिजैविके चालू आहेत आणि सुपरबग्ज, कशालाही दाद न देणाऱ्या हॉस्पिटल संसर्गापुढे नामांकित हॉस्पिटले जगभरात गुडघे टेकत आहेत. त्यामुळे जीवाणू-विषाणू हे बाहेरून हल्ला करतात आणि त्यांना संपवले तर आजार संपतील हे गृहीतक दिवसेंदिवस उघडे पडू लागले आहे.

याउलट लसीकरण जास्त यशस्वी होताना दिसत आहे. म्हणजेच आतूनच चिलखत घालणे विजय मिळवून देत आहे. लसीकरण काय करते तर शरीरात जीवाणू-विषाणू यांना प्रतिकार करणारी जी नैसर्गिक यंत्रणा असते ती जास्त कार्यक्षम होईल असे पाहते. त्यातून आता तंत्रज्ञान इतके विकसित झाले आहे की पूर्वी लस उपलब्ध व्हायला जो वीस-पंचवीस वर्षांचा कालावधी लागत असे तो काही महिन्यांवर आला आहे. २०१३ साली प्रसिद्ध झालेल्या जे. क्रेग व्हेण्टर यांच्या Life at speed of light या पुस्तकात याबाबत जे भाकीत वर्तवले होते ते करोनाच्या काळात प्रत्यक्षात उतरलेले दिसते. करोना पसरू लागल्यानंतर एका वर्षात जवळपास १०० लसी तयार झाल्या. त्यात भारतीय म्हणता येतील अशा दोन लशींच्या मास प्रॉडक्शन आणि वितरण यांनी महासाथ रोखलीदेखील.

हे देदीप्यमान यश जीवाणू-विषाणू हे अंतर्गत परिस्थिती बिघडली तर आजार उत्पन्न करतात हीच गोष्ट अधोरेखित करते. आयुर्वेदानुसार नेमके असेच आहे. कृमी हा निज म्हणजे शरीरांतर्गत परिस्थिती बिघडली म्हणून होणारा आजार आहे. आयुर्वेदाची भूमिका एका शेरातून चांगली व्यक्त होते.

खुदही को कर बुलंद इतना
के हर तकदीर हे पहले
खुदा बंदेसे खुद पूछे
बता तेरी रजा क्या है॥

आपली तब्येत इतकी भक्कम करा की आजार आसपास कोठेही फिरकणार नाही.

दैनंदिन जीवनात काय करावे? काय करू नये? बदलत्या हवामानात ऋतूनुसार काय खावे? काय करू नये? याचा सखोल विचार आयुर्वेद सांगतो. हे नियम स्वस्थवृत्त या नावाने ओळखले जातात. या जीवनशैलीत सहजपणे अत्यंत गरिबीची स्थिती असतानाही पाळता येतात असे नियम आहेत.

पण होते काय? आपल्याला नियम या बेड्या वाटतात. त्यामुळे नियम न पाळता आपण ते का पाळता येत नाहीत यासाठी सबबी शोधत बसतो. आणि बिनखर्चाच्या स्वस्थवृत्ताच्या ऐवजी न्यूट्रिशन सप्लिमेंटस्, लाखालाखांच्या गाद्या वगैरे उपाय करत राहतो. पायाला तेल लावण्याऐवजी झोपेच्या गोळ्या किंवा दारू असे इलाज करतो आणि आजार ओढवून घेतले जातात. हे खरे आहे की भारतात पूर्वी खूप बालमृत्यू व्हायचे, बाळंतपणात अनेक स्त्रिया दगावत, सरासरी आयुष्यमान कमी होते. पण याची जी आकडेवारी उपलब्ध आहे ती ब्रिटिश सरकारने नोंदवलेली आहे. आणि भारतातली परिस्थिती कशी वाईट होती आणि आयुर्वेद कसा अयशस्वी ठरला होता असे प्रतिपादन किंवा आजच्या भाषेत नॅरेटिव्ह सातत्याने मांडले जाते.

याबाबत तुलना तत्कालीन युरोपीय देशांशी करायला हवी. बाळंतपणात जितके मृत्यू भारतात होत होते तितकेच पाश्चिमात्य देशात होत होते. बाहेरचे जंतू मारणाऱ्या रासायनिक उपायांनी, ॲण्टिसेप्टिक-एसेप्टिक आचारसंहिता अंमलात आणली गेली त्यानंतर पाश्चिमात्य देशांमधील परिस्थिती सुधारली.

साथीचे आजार चरक सुश्रुत काळातही होते. जनपदोद्ध्वंस अध्यायात यांचे वर्णन आहे. आज ज्याला आपण सोशल डिस्टन्सिंग म्हणतो ती दो हाथकी दूरी पाळण्यासाठी चरकाचार्य छत्रीचा वापर सांगतात.

ईतेः१ प्रशमनं बल्यं गुप्त्यावरणशङ्करम् ।
घर्मानिलरजोम्बुघ्नं छत्रधारणमुच्यते ॥१०१॥

– चरक सूत्रस्थान ५

ईति म्हणजे रोगादि दुर्दैव. त्याच्या निवारणासाठी छत्री वापरावी.

सुश्रुत संहितेत संक्रमक आजार सांगितले आहेत; आणि ते टाळण्यासाठी रोगग्रस्त व्यक्तीचा स्पर्श टाळावा, एकत्र झोपणे, उठणे-बसणे टाळावे, त्यांच्या ताटात एकत्र जेवू नये; इतकेच काय तर श्वासांचा देखील स्पर्श टाळावा असे प्रतिबंधक उपाय सांगितले आहेत. कुष्ठरोग, क्षयरोग, डोळे येणे वगैरे विकार एका व्यक्तीला झाले की त्या व्यक्तीच्या सान्निध्यात येणाऱ्या इतरांना होतात हेही नोंदवले आहे.

अर्थात हेही खरे आहे की आयुर्वेद समष्टीपेक्षा व्यक्तीवर लक्ष केंद्रित करतो. पण प्रत्येक व्यक्ती नियम पाळत असेल तर समाज निरोगी आणि सुदृढ राहील असे म्हणता येईल.

अबापट : विचारण्याचे एक कारण म्हणजे अजूनही पूर्णपणे न संपलेल्या विषाणूमुळे पसरलेल्या महासाथीच्या काळात एक प्रख्यात उच्चशिक्षित वैद्यराज "हे असे काही नाहीये. हे फक्त श्वसनक सन्निपात आहे. यावरील प्रतिबंधक लस देणे हे चूक आहे. त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत" वगैरे प्रचार अजूनही करत आहेत.

(आत्ता हे लिहीत असताना या साथीत सहासष्ठ लाख ९२ हजार एकशे अठ्ठावन्न लोक दगावल्याची नोंद करण्यात आली आहे. न नोंदलेले अजून किती असतील हे अज्ञात आहे)

या साथीच्या काळात आधुनिक उपचार विज्ञानाच्या मर्यादा समोर आल्या (परंतु त्याबरोबर त्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न करण्याची क्षमताही पुढे आली)

एका वैद्यराजांच्या मत व प्रचारामुळे आयुर्वेदाला दोष देणे चुकीचे.
म्हणूनच आपणास वरील प्रश्न.

वैयक्तिक मते बाजूला ठेवून आपण हे नक्कीच मान्य केले पाहिजे की करोना साथीत भारताने बाकीच्या जगाच्या तुलनेत खूपच चांगली कामगिरी केली आहे.

सहासष्ट लाख हा दगावलेल्या रुग्णांचा आकडा नसून बाधा झालेल्या लोकांचा आकडा आहे.

कोव्हिड डेटा

दगावलेल्या रुग्णांचा भारतातील आकडा ५,३०,७३९ (पाच लाख, तीस हजार+) आहे. युरोपीय देशांमध्ये तो वीस लाखांपेक्षा जास्त आहे. त्या तुलनेत लोकसंख्येच्या घनतेनुसार आपल्याकडे एक कोटीहून जास्त मृत्यू होतील हे भाकीत खोटे ठरले आहे.

आधुनिक वैद्यक बेधडकपणे कोणताही पुरावा नसताना रेमडेसिव्हिर, आयव्हरमेक्टिन, क्लोरोक्विन टोसिलिझुमाब वगैरे मुक्तहस्ताने वापरीत होते आणि आयुर्वेदाच्या शासकीय संस्थांना मात्र आयुर्वेद उपचार करायला बंदी घातली होती. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली तेव्हा लोक आपणहून आयुर्वेद उपचार करू लागले आणि वैद्य मंडळींनी खूप उत्तम चिकित्सा दिली. वैद्य समीर जमदग्नी यांच्या रसमाधव आणि माधव रसायन या गोळ्या क्लिनिकल ट्रायल्स होऊन बाजारात आल्या; प्रकाशनाच्या मार्गावर आहेत; वैद्य दिलखूष तांबोळी यांचा ऑक्सिजन (SpO2) वाढवणारा ओ२के काढा, केरळमधील वैट्टुमारन् गुटिका, सुधारित दूषीविषारि गुटिका यांसारख्या अनेक औषधांनी अनेकांना साथीतून बाहेर पडायला मदत केली. माझा स्वतःचा प्रोटोकॉल माझ्या अनेक विद्यार्थ्यांना व्यवसायात करोना रुग्णांकरिता उपयोगी पडला. वेट्टुमारन आयुष विभागाने दिलेल्या प्रोटोकॉलमध्ये आहेत. दूषीविषारि मधील बदल कोट्टाक्कल आयुर्वेद महाविद्यालयात केले गेले. मल्याळम्‌मध्ये प्रसिद्ध झाले आहेत. ओ२के याचे केस रिपोर्ट लिखाण चालू आहे. आधुनिक वैद्यक व्यावसायिक संघटना रामदेवबाबा आणि पतंजली फार्मसीला कितीही धारेवर धरू देत, पण लक्षावधी लोक ती औषधे वापरत होते हे नाकारता येणार नाही. रामदेवबाबा यांच्या औषधांच्या बाबतीत परिणामकारकता नक्की सांगता येणार नाही.

या सर्वच औषधांचा रिट्रोस्पेक्टिव्ह डेटा गोळा केल्यानंतर सांगता येईल. कोव्हिडनंतर होणारी गुंतागुंत कॉम्लिकेशन्स आणि लाँग कोव्हिड यांत खऱ्या अर्थाने यांचा उपयोग दिसून येईल. आयुर्वेद संशोधन हे असंघटित क्षेत्र असल्याने या बाबतीत सांगोवांगी (anecdotal evidence) या पातळीवर खूपशी माहिती आहे. केस रिपोर्ट आणि सेरीज बरेच प्रसिद्ध झाले आहेत पण रीतसर क्लिनिकल ट्रायल प्रसिद्ध व्हायला वेळ लागेल. मेटा अनालिसिस ही आणखी पुढची गोष्ट. जे पुरावे आहेत ते क्लोरोक्विन आयव्हरमेक्टिन रेमडेसिव्हिर यांच्या तुलनेत समकक्ष आहेत.

पुढची दहा-बारा वर्षे साथीचे आफ्टर-शॉक जाणवत राहतील. त्यावेळी आयुर्वेद उपचार अधिकाधिक स्वीकारले जातील यात शंका नाही.

लेखकाचा अल्पपरिचय :
डॉ. विष्णू जोगळेकर आयुर्वेदाचे प्राध्यापक आहेत (आता निवृत्त). पुणे येथील टिळक आयुर्वेद विद्यालयाशी ते संलग्न होते. J-AIMच्या (Journal of Ayurveda and Integrative Medicine) संपादकीय समितीवर ते होते.

field_vote: 
0
No votes yet

डॉ जोगळेकर काका ,
आभार

परंतु

१. आपण म्हणता आयुर्वेदाची भूमिका
" आपली तब्येत इतकी भक्कम करा की आजार आसपास कोठेही फिरकणार नाही."

इंफेक्शस डिसीजेस विशेषतः हवा पाणी अन्न यामार्गे होणारे जिवाणूजन्य आणि विषाणूजन्य रोगांच्या बाबतीत नुसती भक्कम तब्बेत असणे पुरेसे आहे वाटते का ?

कॉलरासारखा जिवाणूजन्य रोग , जो पाणी आणि अन्नमार्गे आपल्या शरीरात येतो तो कितीही भक्कम तब्बेत असेल तरीही होतोच
किंवा अगदी आताच येऊन गेलेला कोविड घ्या, सह्व्याधी असलेल्यांना जास्त होत होता तरीही भक्कम तब्बेत असलेल्यानाही भरपूर झाला.
टाळता येणे फार अवघड झाले होते.

फक्त भक्कम शरीर असणे आणि सगळ्यांनी नियम पाळणे हे पुरेसे कसे ?
शिवाय समाजातील सर्व व्यक्ती नियम पाळू शकतीलच असे गृहीत धरणे पब्लिक हेल्थ मध्ये कितपत पुरेसे आणि योग्य ?
साथ आलेली असताना समष्टीकडे न बघता व्यक्तिकेंद्री उपचार किती योग्य ?

२. "प्रतिजैविकांमुळे (ॲण्टिबायोटिक्स) संसर्गांवर (इन्फेक्शन) सुरुवातीला प्रचंड प्रमाणात मात केली गेली. पण एका नव्या स्वरूपात उत्क्रांती होत गेली; आधी औषधांचा परिणाम न होणारे जीवाणू (ड्रग रेझिस्टंट बॅक्टेरिया) आले. त्यावर नवी प्रतिजैविके आली. मग बहुऔषधांना न जुमानणारे जीवाणू (मल्टिड्रग रेझिस्टंट बॅक्टेरिया) आले. सध्या पाचव्या आणि सहाव्या पिढीची प्रतिजैविके चालू आहेत आणि सुपरबग्ज, कशालाही दाद न देणाऱ्या हॉस्पिटल संसर्गापुढे नामांकित हॉस्पिटले जगभरात गुडघे टेकत आहेत. त्यामुळे जीवाणू-विषाणू हे बाहेरून हल्ला करतात आणि त्यांना संपवले तर आजार संपतील हे गृहीतक दिवसेंदिवस उघडे पडू लागले आहे"

या विधानात तथ्य असले तरीही हे जरा अतिरंजित आहे. सुपरबग्स हा प्रॉब्लेम आहेच आणि तो पुढे वाढतही जाणार आहे हेही खरे.तरीही अँटिबायोटिक्स घेऊन बरे झालेले आणि आणि सुपरबग्समुळे अँटिबायोटिक्स निरुपयोगी होऊन आजार बरे न होते याचे प्रमाण आजतरी भयंकर व्यस्त आहे.

३. " पुढची दहा-बारा वर्षे साथीचे आफ्टर-शॉक जाणवत राहतील" याबद्दल दुमत नाहीच

परंतु " त्यावेळी आयुर्वेद उपचार अधिकाधिक स्वीकारले जातील यात शंका नाही." हा आशावाद का वाटला ?

अजूनही मुद्दे आहेत परंतु ते तुलनेने छोटे म्हणून लिहीत नाही .

४. श्री रामकृष्ण यादव यांनी कॉरोनील नावाचे औषध महासाथीच्या काळात बाजारात आणले. या विशिष्ट औषधाच्या बाबतीत आपले काय मत आहे ?
राम्डेसेवीर ढकलले गेले असे आपले मत आहे . कोरोनील ढकलले गेले की ते रास्त होते असं आपल्याला वाटते ?
भारताच्या आरोग्यमंत्र्यांच्या शेजारी बसून प्रेस कॉन्फरन्स मध्ये हे औषध लाँच करण्यात आले.

५. कोविड साथीत सहासष्ट लाख मृत्य पावले तो जागतिक पातळीवरचा होता , आपण त्याची तुलना भारतातील आकड्याशी केलीत हे नजरचुकीने झाले असावे . आजचा आकडा ६७,६८,०१८ आहे . मृत , जगात.

६. १९१९,२०,२१ मध्ये स्पॅनिश फ्लूची महासाथ आली. तेव्हा भारतात मॉडर्न मेडिसिनचा प्रसार आजच्या तुलनेने अगदी तुरळक होता.
आयुर्वेद वैद्यक उपलब्ध होते का नाही हे माहित नाही, बहुधा असावे.
फाळणीपूर्व भारताची लोकसंख्या २५-३० कोटीच्या मध्ये होती.
त्यावेळी या विषाणूजन्य आजाराने सुमारे दोन कोटी लोकांचा मृत्यू झाला.
हे माहितीसाठी .

पुनश्च एकदा आपण वेळ काढून लिहिलेत याबद्दल आभार
माझ्या पाहण्यात /वाचण्यात इतक्या मोकळेपणाने या विषयी सकारात्मक पद्धतीने लिहिणारे /बोलणारे आपण केवळ दुसरे आयुर्वेदतज्ञ् ( पहिले डॉ हृषीकेश रांगणेकर )

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

strong>रामदेवबाबा यांच्या औषधांच्या बाबतीत परिणामकारकता नक्की सांगता येणार नाही.

औषध जुळी 2021 मध्ये लॉंच झाले होते. 155 देशांत हे औषध निर्यातीची परवानगी नोवेंबर 2021 मध्ये सरकारने दिली होती. फेब्रुवरी 22 मध्ये त्या औषधावर झालेल्या रिसर्च पुस्तिकाचे प्रकाशन दिल्लीच्या constitution क्लब मध्ये झाले होते. आमचे मंत्री तिथे होते म्हणून मी ही तिथे गेलो होतो. आज ही त्या पुस्तिकाची एक प्रती माझ्या कडे आहे. र्मनीच्या मेडिकल जर्नल ने या औषधला मुख्य पानावर स्थान दिले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ1

पटाईत काका, त्यांना औषधाची परिणामकारकता किती याची चौकशी आहे; औषधाच्या जाहिरातीत काय माल खपवता येईल, याची चौकशी नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपली तब्येत इतकी भक्कम करा की आजार आसपास कोठेही फिरकणार नाही.

याबद्दल वर बापटांनी लिहिलेलं आहेच.

कोव्हिडच्या साथीत खूप तरुण, धडधाकट लोक मृत्युमुखी पडले. यांत सुरुवातीला अनेक डॉक्टर, नर्सेसही होते. सुरुवातीच्या काळात अशा अनेक लोकांच्या गोष्टी छापूनही येत होत्या. या लोकांच्या मृत्युचा दोष त्यांच्यावरच ढकलण्याची असंवेदनशीलता का?

प्रतिजैविकांमुळे (ॲण्टिबायोटिक्स) संसर्गांवर (इन्फेक्शन) सुरुवातीला प्रचंड प्रमाणात मात केली गेली. पण एका नव्या स्वरूपात उत्क्रांती होत गेली; आधी औषधांचा परिणाम न होणारे जीवाणू (ड्रग रेझिस्टंट बॅक्टेरिया) आले. त्यावर नवी प्रतिजैविके आली. मग बहुऔषधांना न जुमानणारे जीवाणू (मल्टिड्रग रेझिस्टंट बॅक्टेरिया) आले. सध्या पाचव्या आणि सहाव्या पिढीची प्रतिजैविके चालू आहेत आणि सुपरबग्ज, कशालाही दाद न देणाऱ्या हॉस्पिटल संसर्गापुढे नामांकित हॉस्पिटले जगभरात गुडघे टेकत आहेत. त्यामुळे जीवाणू-विषाणू हे बाहेरून हल्ला करतात आणि त्यांना संपवले तर आजार संपतील हे गृहीतक दिवसेंदिवस उघडे पडू लागले आहे.

हे संपूर्ण स्पष्टीकरण प्रतिजैविकांबद्दल (अँटीबायोटिक्स) आहे. ती जीवाणूंविरोधात वापरतात. विषाणूंसाठी अँटीव्हायरल वापरतात. इतपत माझं भाषिक आकलन. मग संपूर्ण परिच्छेद जीवाणूविरोधी औषधांबद्दल लिहून मग शेवटी विषाणूही त्यातच कसे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आयुर्वेद हे शरीर कसे सशक्त होईल ह्या वर विचार व्यक्त करते.
आहार,विहार, कसा असावा ह्याचे मार्गदर्शन करते.

सशक्त शरीर असेल तर रोग होण्याची शक्यता कमी होते .
किंवा रोग झालाच तर तो जास्त नुकसान करू शकत नाही.
किंवा सशक्त शरीर असेल तर उपचार ना ते जलद प्रतिसाद देते.
ह्या मध्ये जास्त टक्के खरेपणा आहे.
प्रतेक चे शरीर वेगळे असते त्या मुळे अपवाद हे असतात च.
सशक्त शरीर आणि शरीराची रोग प्रतिकार शक्ती .
ह्याचा काही तरी परस्पर संबंध नक्कीच आहे.
त्या मुळे लेखकाचा मुद्धा योग्य च आहे.

जीवाणू मुळे होणारे आजार आपण आटोक्यात आणले ते antibiotics च्या जोरावर.
त्या मुळे tb सारख्या महाभयंकर रोगतून पण रोग मुकत होण्याची किमया आपण केली .
हे आधनिक शास्त्राचे यश आहे.
जीवाणू हे अती सूक्ष्म जीव आहेत उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत.
त्या मुळे प्राचीन काळी ते माहीत असण्याचा प्रश्न च नाही.)
पण ह्या antibiotics चे काही दुष्परिणाम पण असतील हे समजून यायला वेळ गेला .
जेव्हा समजले तेव्हा पण ती माहिती पसरू दिली नाही.
आणि आता स्थिती हाताबाहेर जाईल अशी स्थिती येईल असे वाटत आहे तेव्हा त्या वर चर्चा होत आहे.
Antibiotics च tya मध्ये दोष नाही.
अंधाधुंद पने ती वापरली गेल्या मुळे ही स्थिती लवकर आली असे म्हणू शकतो.
विचार पूर्वक वापरली असती तरी एक दिवस जीवाणू नी त्या वर मात केली असती पण त्याला अजून काही वर्ष गेली असतो..निसर्ग नियम च आहे तो.
आता पर्याय म्हणून दुसरे उपचार आपल्याला शोधावे लागतील.
आणि आधुनिक मेडिकल शास्त्र ते शोधणार च.
पण आयुर्वेद स्वतःला upgrade करत नाही आधुनिक मेडिकल शास्त्र स्वतःला upgrade करते.
हाच दोघात फरक आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वैद्य समीर जमदग्नी यांच्या रसमाधव आणि माधव रसायन या गोळ्या क्लिनिकल ट्रायल्स होऊन बाजारात आल्या; प्रकाशनाच्या मार्गावर आहेत; वैद्य दिलखूष तांबोळी यांचा ऑक्सिजन (SpO2) वाढवणारा ओ२के काढा, केरळमधील वैट्टुमारन् गुटिका, सुधारित दूषीविषारि गुटिका यांसारख्या अनेक औषधांनी अनेकांना साथीतून बाहेर पडायला मदत केली.

इतकी महत्त्वाची विधाने करताना सोबत पुरावे (हा शब्द तीव्र वाटत असल्यास) माहिती-विदा इ. गरजेचा आहे! किती लोकांनी घेतला, त्याबरोबर प्लसिबो ट्रायल झाल्या का, रोगबाधित किती लोकांनी काढा घेऊन त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली? त्यांचे प्रमाण किती? इ.इ.

माझा स्वतःचा प्रोटोकॉल माझ्या अनेक विद्यार्थ्यांना व्यवसायात करोना रुग्णांकरिता उपयोगी पडला.

व्यवसायात उपयोगी पडायला काहीच हरकत नाही. सब धंधा सी. रोगनिवारणात उपयोगी पडला का?

आधुनिक वैद्यक व्यावसायिक संघटना रामदेवबाबा आणि पतंजली फार्मसीला कितीही धारेवर धरू देत, पण लक्षावधी लोक ती औषधे वापरत होते हे नाकारता येणार नाही. रामदेवबाबा यांच्या औषधांच्या बाबतीत परिणामकारकता नक्की सांगता येणार नाही.

इथे मला फक्त थँक्यू म्हणावंसं वाटतं. विशेषत: माझ्या प्रतिसादातील वरच्या परिच्छेदासंदर्भात.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

मुंबई मधील लोकल ट्रेन मध्ये खूप गर्दी असते ही आता बातमी होवू शकत नाही.
पण एक दिवस जरी लोकल ट्रेन खाली धावली तर ती मोठी बातमी होईल.
तसेच ही बातमी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुंबई मधील लोकल ट्रेन मध्ये खूप गर्दी असते ही आता बातमी होवू शकत नाही.
पण एक दिवस जरी लोकल ट्रेन खाली धावली तर ती मोठी बातमी होईल.
तसेच ही बातमी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रामदेवबाबा यांच्या औषधांच्या बाबतीत परिणामकारकता नक्की सांगता येणार नाही.

पतंजलि रिसर्च इंस्टीट्यूट. ही देशातील सर्वोत्तम अनुसंधान केंद्र आहेत. कोणत्याही आयुर्वेदिक फार्मसी जवळ सोडा मॉडर्न औषधी बनविणार्‍या अधिकान्श फरमेसी जवळ एवधी उन्नत प्रयोगशाळा नाही. इथे 500 हून जास्त शास्त्रज्ञ कार्य करतात. त्यांचे अनुसंधान पेपर्स जागतिक दर्जाच्या मेडिकल जर्नल मध्ये प्रकाशित होतात. करोंनील जर्मन मेडिकल जर्नलच्या प्रथम पानावर होते. हेच एकमेव औषध ज्याचे सेल ते अॅनिमल ट्रायल इत्यादि झाले होते. देशात अधिकान्श रोगी हेच औषध घेऊन बरे झाले, हे आजचे सत्य आहे. पंतजलीचे हरिद्वारचे सर्व संस्थान या काळात उघडे होते. कुणाचाही तिथे मृत्यू झाला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ1

देशात अधिकान्श रोगी हेच औषध घेऊन बरे झाले, हे आजचे सत्य आहे.

पटाईत मल्टिव्हर्समध्ये(च) हे शक्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आयुर्वेद व आधुनिक वैद्यक दोन्ही विषयांवरील लेख वाचले. माझी आयुर्वेदासंबंधी काही निरीक्षणे:
1) संदिग्धता (आधुनिक वैद्यकाच्या तुलनेत). "एखादे औषध हृदयविकार/ त्वचारोग/ नेत्रविकार/ गर्भदोष इ.वर उपयुक्त आहे." या फारच generalized terms आहेत. यातील प्रत्येक अवयवाचे अनेक आजार असतात. एखादे औषध नेमक्या कोणत्या आजारासाठी, त्याच्या कोणत्या स्टेजला, कोणत्या प्रकारच्या रुग्णासाठी, आणि किती प्रमाणात उपयुक्त आहे- ही सर्व माहिती आधुनिक औषधे व शल्यक्रिया यांबाबत नोंदलेली आहे. अशी नोंद आयुर्वेदात असल्यास अवश्य सांगावे.
2) आयुर्वेदाच्या काही टेक्स्टमध्ये आजार आणि आजारांची लक्षणे यांची सरमिसळ झालेली दिसते. उदा. काविळ, सांधेदुखी, ताप, दमा, जुनाट खोकला, सूज, वजन कमी होणे वा वाढणे- ही आजारांची लक्षणे आहेत. प्रत्यक्ष आजार नव्हेत. अशा लक्षणांचे मूळ कारण म्हणजेच, आजार शोधून त्यावर उपचार करणे आवश्यक असते.
3) फक्त लक्षणांवरुन अनुमान करुन उपचार करणे- आधुनिक वैद्यकही 1-2 शतकांपूर्वी हेच करीत होते. मात्र आता रोगनिदानामध्ये क्रांती झालेली असल्यामुळे अचूक निदान- अगदी genetic/ molecular level पर्यंत करणे शक्य आहे.
4) औषधाचे नेमके constitution, त्यातील प्रत्येक घटक/ molecule किती वजनाचा आहे, कोणता घटक औषध म्हणून उपयुक्त आहे, त्याचा शरीरावर नेमका काय परिणाम होतो, एखाद्या आजारावर त्याचा काय परिणाम होतो, त्याचे दुष्परिणाम कोणते आणि ते किती टक्के रुग्णांमध्ये दिसतात? यांची नोंद नाही.
5) वरील मुद्दा इतर अद्रव्य क्रियांबद्दलही म्हणता येईल.
6) विविध वनस्पतींपासून बनवलेल्या औषधांची गुणवत्ता आजच्या काळातही पूर्वीसारखीच आहे याची खात्री देता येते का? प्रदूषणामुळे माती/जमिनीवर परिणाम झाल्याने औषधांच्या गुणवत्तेत काही फरक पडतो का? असा काही अभ्यास झाला आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक2
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिल्या मुद्द्याबाबत सहमत आहे. म्हणजे आपण बोलताना "रेचक"(डाळिंबाच्या बिया) असलेले पदार्थ आणि "बंधक" असलेले पदार्थ (मेथी) "पोटाला चांगले" या एकाच लेबलखाली टाकत असतो तसं संभवतं.

आयुर्वेदाच्या औषधांच्या परिणामकारकतेविषयी डेटा उपलब्ध नाही ही गोष्ट फारशी चुकीची नाही. जुन्या काळात डेटा गोळा करणे ठाउक नसेल किंवा (बेनिफिट ऑफ डाउट म्हणून) डेटा गोळा केला असुनही आता तो उपलब्ध नसेल असे म्हणू. त्यापेक्षा वाईट गोष्ट डेटा असण्याची गरजच मान्य नसणे ही आहे आणि ती एकूण आयुर्वेदाची प्रगती* आणि मानवजातीचे हित यांना हानीकारक आहे.

*आयुर्वेदाची प्रगती पूर्ण झाली आहे आणि आता पुढे काही करण्यासारखे उरलेले नाही असे म्हणणे असेल तर चर्चा करण्यात काही अर्थ नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.