वृद्धत्वाकडे वाटचाल - भाग १
भाग १ – एजिंग म्हणजे काय
सुधीर भिडे
विषयाची मांडणी
प्रास्ताविक
कालक्रमाचे वय आणि जैविक वय
DALY
एजिंगवर प्रभाव टाकणारे कारक
एजिंग मोजता येते का?
लेखमालेविषयी
---
प्रास्ताविक
लेखमालेचे शीर्षक वृद्धत्वाकडे वाटचाल असे आहे. इथे इंग्रजी शब्द एजिंग हा अभिप्रेत होता. एजिंग म्हणजे वृद्धत्व नव्हे. इंग्रजी एजिंग हा शब्द एक प्रक्रिया सूचित करतो, जी मनुष्य प्राण्यात साधारणपणे चाळिसाव्या वर्षी चालू होते आणि मरणापर्यंत चालू राहते. वृद्धत्व ही एक स्थिती असते. याचा अर्थ एजिंग म्हणजे वृद्धत्व नव्हे. एजिंग या शब्दाचा मला अभिप्रेत असलेला अर्थ सांगून झाल्यावर आपल्या परवानगीने पुढील लिखाणात मी एजिंग या शब्दाचा वापर करणार आहे. चाळीस वर्षाच्या पुढच्या सर्व व्यक्तींना या विषयात रस वाटेल कारण वैद्यकशास्त्राप्रमाणे चाळीस वर्षानंतर एजिंग चालू होते.
एजिंग हा मानवप्राण्याच्या दृष्टीने नवीन अनुभव आहे. कारण शंभर वर्षापूर्वी एजिंग चालू होण्याआधीच माणसे मरत असत. आता आपण अशा युगात प्रवेश करत आहोत ज्यात लोकसंख्येच्या मोठ्या प्रमाणात लोक ७५ वर्षापर्यंत जिवंत राहतात आणि एजिंगचा अनुभव घेतात. वैद्यकशास्त्राच्या दृष्टीने एजिंग ही एक नवीन दिशा आहे. या विषयात वैद्यकशास्त्राला इतकी उत्सुकता आहे की एजिंग या विषयावर शोधनिबंध प्रकाशित करणारी १५० शास्त्रीय मासिके आहेत. हे पाहण्यासारखे आहे की ही सर्व मासिके १९७० नंतर प्रकाशित होऊ लागली.
भारत सरकारने एजिंगचा अभ्यास करण्यासाठी दोन केंद्रे चालू केली आहेत - (AIIMS), New Delhi, and Madras Medical College, Chennai.

एजिंग हा मानवाकरिता नवीन अनुभव तर आहेच पण हा अनुभव मानवजातीपुरता मर्यादित आहे. प्राण्यांच्या जगात मृत्यू हा शिकार झाल्याने होतो. ज्या प्राण्याची शारीरिक क्षमता कमी होते त्याची लगेच शिकार होते. समजा एखाद्या चित्त्याचा पाय मुरगळला तर तो आठ दिवस शिकार करू शकणार नाही आणि त्याचीच शिकार होईल. जे प्राणी मानव पाळतो त्यांच्यात एजिंग दिसते.
एजिंगकडे वैद्यक दोन दृष्टींनी पाहते –
एजिंग हा काही आजार नव्हे. वृद्धत्वामुळे इतर आजार वाढतात पण वृद्धत्व येणे हा काही आजार नाही. असे समजा की सध्या माहीत असलेल्या सर्व आजारांवर आपण नियंत्रण मिळविले तर आपले आयुष्य फार वाढेल पण त्या बरोबर वृद्धत्वाचे परिणामही वाढतील.
दुसरा दृष्टीकोन असा की एजिंग हा एक आजार समजून त्यावर उपाय शोधायला हवेत. जोपर्यंत एजिंग हा आजार समजला जात नाही तोपर्यंत औषध कंपन्या त्यावर इलाज शोधणार नाहीत.
आता आपण एजिंगची व्याख्या पाहू – एजिंग ही एक अशी नैसर्गिक प्रक्रिया आहे की जी माणसाच्या आयुष्यभर चालू राहते. ही प्रक्रिया तरुण वयात चालू होते ज्यामुळे व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक क्षमता सारखी कमी होत जाते. याचा परिणाम निरनिराळे आजार सुरू होण्यात होतो.
कालक्रमाचे वय आणि जैविक वय (chronological age and biological age)
कालक्रमाचे वय (chronological age) व्यक्ती किती वर्षे जिवंत आहे ते दर्शविते - सामान्य भाषेत ‘आपले वय’. जैविक वय हे दर्शविते की व्यक्तीचे शरीर आणि मन किती कार्यक्षम आहे. आपल्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा ऱ्हास झाला असेल तर आपले जैविक वय वाढले आहे. समजा एखाद्या व्यक्तीचे वय पासष्ट वर्षे आहे. त्या व्यक्तीकडे पाहून आणि त्यांच्याशी बोलून जर असे वाटले की , ‘तुम्ही पासष्ट वर्षाच्या आहात असे वाटत नाही हो’ याचा अर्थ आपण हे म्हणत आहोत की त्या व्यक्तीचे जैविक वय कालक्रमाच्या वयापेक्षा कमी आहे.
एजिंगची प्रक्रिया प्रत्येक व्यक्तीत निराळ्या वेगाने चालू असते. याचा अर्थ कालक्रमाच्या वयापेक्षा काही व्यक्तींचे जैविक वय कमी असते तर काहींचे जास्त. ज्यांचे जैविक वय जास्त असते त्यांना निरनिराळे आजार उद्भवण्याची शक्यता जास्त असते. आपले जैविक वय कालक्रमाच्या वयापेक्षा कमी असणे चांगले.
जैविक वय (biological age) – अनुमान
आंतरजालावर जैविक वयाचे अनुमान करण्याचे कितीतरी प्रोग्राम्स आहेत. त्यात खालील कारक घटकांची माहिती विचारलेली असते :
रोजच्या आहारात भाज्या आणि फळे | २५०gपेक्षा जास्त - A | कमी - B |
---|---|---|
साखर किंवा गूळ | दिवसाला दोन चमचे पेक्षा कमी - A | दोन चमच्यांपेक्षा अधिक - B |
धूम्रपान | नाही - A | हो - B |
मद्यपान | नाही - A | हो - B |
रक्तदाब | उच्च रक्तदाब नाही किंवा नियंत्रणात - A | नियंत्रणात नाही - B |
मधुमेह | नाही किंवा नियंत्रणात - A | नियंत्रणात नाही - B |
रोजची झोप | सात ते आठ तास - A | सहा तास किंवा त्यापेक्षा कमी - B |
प्रवृत्ती | तणावरहित - A | तणावपूर्ण - B |
रोज किमान ३० मिनिटे एरोबिक व्यायाम | हो - A | नाही - B |
वीस शब्दांची चाचणी # | दहा किंवा जास्त आठवले - A | दहापेक्षा कमी आठवले - B |
पोटाचा घेर आणि कंबरेचा घेर याचा रेशो | एकपेक्षा कमी - A | एकपेक्षा जास्त - B |
# वीस शब्द कागदावर लिहा, दोन मिनिटे त्याकडे पाहा, कागदाची घडी घाला. दोन मिनिटे थांबा. मग शब्द आठवून लिहा.
वरील बारा कारक घटकांपैकी आपल्याला दहा किंवा दहापेक्षा अधिक A असेल तर आपले जैविक वय (biological age) आपल्या कालक्रमाच्या वयापेक्षा (chronological age) कमी आहे.
वरील तक्त्यातील चाचणी शास्त्रीय शोधनिबंधावर आधारित नाही. आंतरजालावरील चाचण्यांतील कारक घटक लक्षात घेऊन अंदाज येण्यासाठी एक चाचणी तयार केली आहे.
DALY : Disability-Adjusted Life Year
हा मानदंड एखाद्या समाजाच्या एजिंगची कल्पना देतो.
एक व्यक्ती किती जगली आणि ती किती वर्षे काम करू शकली यातील फरक म्हणजे DALY. समजा एक व्यक्ती ५९ वर्षानंतर काम करू शकत नव्हती आणि ती व्यक्ती ७४ वर्षे जगली तर त्या व्यक्ती करता DALY १५ वर्षे झाली.
एका समाजातील एका गटातील १००० व्यक्तींचा DALY पाहिला जातो. निरनिराळ्या देशात DALY या प्रमाणे आढळले -
Switzerland | 100 |
Algeria | 161 |
US | 161.5 |
Iran | 164.8 |
India | 414 |
Papua New Guinea | 504 |
याचा अर्थ भारतात स्वित्झरलंड पेक्षा एजिंगचा दर चौपट आहे. अर्थात सामाजिक आणि आर्थिक कारणांचा येथे विचार झालेला नाही.
एजिंग वर प्रभाव टाकणारे कारक
आहार, जीवनशैली, जैविक कारणे आणि पर्यावरण हे घटक एजिंगवर प्रभाव टाकतात.
आहार
आपल्या आहाराचा एजिंग वर मोठा परिणाम असतो. (माहिती The Effect of Nutrition on Aging—A Systematic Review Focusing on Aging-Related Biomarkers, Catarina Leitão, आणि इतर, NLM , 2022 Jan 27, या लेखातून)
- आहारात फळे आणि भाज्या जास्त प्रमाणात ठेवा
- सुकामेवा, डाळी आणि कडधान्ये खा
- मासे खाणे चांगले. पण प्राण्यांचे मांस कमी खा. (आपल्याकडे मटण)
- आहारात सर्व जीवनसत्त्वे योग्य प्रमाणात मिळतात हे पाहा.
जीवनशैली
शारीरिक चलनवलन फार महत्त्वाचे आहे. जसे वय वाढेल तसे शारीरिकदृष्ट्या क्रियाशील राहण्याचा प्रयत्न करायला हवा. अनेक शास्त्रीय संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की क्रियाशील व्यक्ती आनंदी एजिंगचा अनुभव घेतात. एरोबिक व्यायामाचा जास्त फायदा होतो. सायकल चालविणे हा सर्वात सोपा व्यायाम आहे. आपल्याला आनंदी एजिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर बैठी जीवनशैली सोडून द्या.
एका अभ्यासात सत्तर वर्षाच्या ४५० वृद्धांची पाहणी करण्यात आली. पाच वर्षानंतर या वृद्धांची परत पाहणी केली. असे आढळून आले की - धूम्रपान करणाऱ्या वृद्धांचे वजन फार कमी झाले होते, त्यांचे लिव्हर चांगले काम करत नव्हते, त्यांची हाडे ठिसूळ झाली होती आणि फुप्फुसांची क्षमता कमी झाली होती – हे सर्व धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत.
एक अजून अभ्यास असे दाखवितो की धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत धूम्रपान करणाऱ्यांचे जैविक वय २० वर्षे अधिक असते.
(Northwestern Medicine study published in the journal Aging.)
जास्त काळ दारू प्यायल्याने एजिंगची प्रक्रिया जास्त जोरात होते आणि व्यक्तीचे जैविक वय वाढते.
जैविक कारणे
तीन जैविक कारणे महत्त्वाची ठरतात – लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्चरक्तदाब. या तिन्हींवर नियंत्रण ठेवणे आनंदी एजिंगच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.
एजिंगच्या संदर्भात लठ्ठपणा धूम्रपानापेक्षाही जास्त वाईट असतो. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की क्रोमोसोमच्या टेलोमीअरची लांबी याचा एजिंगशी संबंध असतो. लठ्ठ व्यक्तीत टेलोमीअरची लांबी जास्त भराभर कमी होते आणि एजिंगच्या वेगात वाढ होते.
मधुमेह आणि उच्च रक्तदाब या दोन अवस्था / आजार यांचा एजिंगशी मोठा संबंध असतो. जास्त वयात मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजार होण्याची शक्यता वाढते. परंतु या दोन्ही आजारांच्या बाबतीत एक महत्त्वाची बाब ही की जर हे आजार नियंत्रणात ठेवले नाहीत तर त्यापासून शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना अपाय होतो आणि वाढत्या वयात हा धोका वाढतो.
वाढत्या वयात रक्त वाहिन्यांचा लवचिकपणा जातो, ज्यामुळे रक्तदाब वाढतो. रक्तदाब वाढला की त्याचा सर्व सिस्टिम्सवर परिणाम होतो.
पर्यावरण
आपल्या भोवतालची परिस्थिती आपल्या एजिंग प्रक्रियेवर प्रभाव करत असते.
आपले राहण्याचे ठिकाण कसे आहे, शुद्ध स्वच्छ हवा मिळते का, आवाजाचा किती त्रास होतो, आपल्याबरोबर राहणाऱ्या व्यक्तींची मनस्थिती कशी आहे, ते आपल्या बरोबर कसे वागतात या सर्वांचा परिणाम होतो.
याची दोन टोकाची उदाहरणे पाहू. एक व्यक्ती स्वत:च्या घरात आपल्या कुटुंबाबरोबर राहत आहे. पैशाची अडचण नाही. या व्यक्तीला स्वत:करिता निराळी खोली आहे. अधूनमधून मित्र नातेवाईक भेटून जातात.
दुसरी व्यक्ती अनाथाश्रमात राहत आहे. खोलीत चार व्यक्ती चार खाटांवर आहेत. जवळचे नातेवाईक दोन चार महिन्यांनी केव्हा तरी विचारपूस करतात.
हे सांगायला नको की कोणाचे एजिंग जास्त वेगाने होईल.
लेखमालेविषयी
मी याआधी एक लेखमाला मृत्यू या विषयावर लिहिली होती. खरे म्हणजे एजिंगची लेखमाला त्याआधी प्रसिद्ध करायला हवी होती. एजिंगच्या लेखमालेचा उपयोग ३५ ते ६० वयोगटातील व्यक्तीस आहे. ते आपल्या जीवनशैलीत अजूनही सुधारणा करू शकतात. अतिज्येष्ठांच्या बाबतीत जे नुकसान व्हायचे ते घडून गेले आहे.
या लेखानंतर अजून तीन लेख या लेखमालेत आहेत.
- एजिंग का होते?
- एजिंगचे परिणाम
- एजिंगचा वेग कमी करता येतो का?
.
> समजा एक व्यक्ती ५९ वर्षानंतर काम करू शकत नव्हती आणि ती व्यक्ती ७४ वर्षे जगली तर त्या व्यक्ती करता DALY १५ वर्षे झाली.
इंटरनेटवर अनेक ठिकाणी दिलेली व्याख्या वेगळी आहे. एखाद्या माणसाच्या आयुष्यातला किती काळ अनारोग्यामुळे (म्हणजे उदाहरणार्थ, अंथरुणाला खिळून असल्यामुळे, दृष्टी गेल्यामुळे वगैरे) ‘वाया’ जातो तो त्याचा DALY अशी व्याख्या अनेक ठिकाणी आढळते. अनारोग्य आणि ‘काम’ करता न येणं ह्या वेगळ्या गोष्टी आहेत.
ते असो, आणि तूर्तास लेखातली व्याख्या घेऊन पुढे जाऊ. एक हजार स्विस लोकांचा (एकत्रित?) डेली जर १०० वर्षं असेल, तर सरासरी स्विस माणसाचा एक दशांश वर्ष (म्हणजे साडेछत्तीस दिवस) असेल. याचा अर्थ सरासरी स्विस माणूस मरण्याच्या फक्त महिनाभर आधी काम बंद करतो. हे खरं वाटत नाही. कोष्टकातल्या बाकीच्या आकड्यांबद्दलही हीच शंका येते.
-----
देशात अधिक समृद्धी आली म्हणजे
देशात अधिक समृद्धी आली म्हणजे अतिप्रोसेस केलेले फूड. अति साखर, फॅट्स, मीठयुक्त स्नॅकिंग, लठ्ठपणाचे वाढते प्रमाण इत्यादि नेहमी म्हटले जाते. मग स्वित्झर्लंड किंवा तत्सम आर्थिक आणि निसर्ग समृद्ध देशांत मात्र लोक असे अगदी हेल्थ कॉन्सिअस का असावेत? तिथे लोक अगदी खूप जास्त वर्षे काम करतात आणि आणि भारतात मात्र लवकर रिटायर, लवकर म्हातारे, लवकर मरणे .. इकडे मात्र सगळे असे वाईट वाईट चित्र का ?
की इथे साठाव्या वर्षी निवृत्त होणे शक्य आहे आणि अनेक देशांत होईल तोवर काम करत राहणे ही मजबुरी आहे?
अर्थात जितका वेळ हातपाय चालत आहेत तोवर काम करावे, निष्क्रिय होऊन बसले की शरीर संपते हे वैयक्तिक मत आहेच.
भारतात काम आणि मनोरंजन यांचे
भारतात काम आणि मनोरंजन यांचे महिन्याचे (आठवडा नको) गणित काहीतरी विचित्र असावे. शिवाय याबाबत मानसिक तयारी वेगळीच असावी. नोकरी आणि व्यवसाय करणारे दोन्ही प्रकारचे लोक धरून. वयाचा विचार केला तर मी रिटायर झाल्यावर अमुक तमूक करीन मी वृत्ती असेल.
व्यायामासाठी व्यायाम करणे चूक आहे. काही छंद जोपासताना व्यायाम होतो तोच खरा व्यायाम. दुसरे कुणी जिममध्ये जातात , म्हणून जायचे, आजारी पडल्यावर योगा करणे हे बाद आहे. योगा शिकवणारेच हार्ट संबंधित आजाराने बेजार झाले याची तीन उदाहरणे माहिती आहेत.
.
मला वाटतं मुळात मधुमेह आणि हृदयविकार होण्याचे प्रमाण वेगवेगळ्या वंशातील लोकांत वेगवेगळे आहे. उदाहरणार्थ, साऊथ एशियन लोकांमध्ये वयोमान, लोकसंख्या वगैरे कारणं कंट्रोल केली तरीही हे आजार व्हायचं प्रमाण साधारण २० - २५ टक्के अधिक आहे. Some races are predisposed to some diseases. So cross-racial comparison does not make sense unless it is controlled for race.
सरसकट नियम लावणे हे अज्ञान च आहे
माणसाच्या उत्पत्ती पासुन आज पर्यंत भले आयुष्य घडतर असेल पण ते दीर्घ आयुष्य जगत नव्हते जा निष्कर्ष अडाणी पणाचे लक्षण आहे.
तरुण पिढी नी वयस्कर पिढीची रक्षण करणे,त्यांना आसरा देणे,अन्न देणे ही सर्व प्राण्यात नैसर्गिक उर्मी आहे.
त्या मुळे लेख लिहायला घेताना गूगल वरचे फसवे दावे ओळखून स्वतःची बुध्दी पण वापरत जा
म्हातारपण हे ६०,७०,८०,९० असं
म्हातारपण हे ६०,७०,८०,९० असं अधिकाधिक शरिरावर दिसू लागतंच. त्या लोकांपैकी काहींना आपण अजुनही तेवढे पुढारलेले वाटत नसले तरी इतर लोक टाळत असतातच. सामाजिक संपर्क कसा ठेवावा किंवा कसा कमी ठेवायचा याचं नियमन करत जाणे आवश्यक. हे प्रसाधनही हवे.
तब्येतीचे खाटखुट राहाणे शेवटपर्यंत हे त्यांना आणि घरातल्या सर्वांच्याच हिताचे ठरते.
वा पुन्हा एकदा अभ्यासपूर्ण
वा पुन्हा एकदा अभ्यासपूर्ण लेख माला. धन्यवाद सुधीर भिडे सर.