त्यातल्या त्यात `बघणेबल' मालिका....
रात्री ८ नंतरची वेळ, ऑफिसातून परतण्याची वेळ! त्याचप्रमाणे घरात दूरदर्शन (मॅचेस नसतील तेव्हा झी-मराठी) चालू असण्याची वेळ. लेकीचे आजोबा-आजी असल्यापासूनची ही सवय तिच्या बाबानेही पुढे सुरूच ठेवलेली! त्यामुळे मनात असो वा नसो, पडद्यावर जे काही घडत असतं तिथे लक्ष जातंच. इतक्या वर्षांच्या सवयीने आपोआप एकीकडे कामंही होत रहातात, जेवण-आवराआवरी-उद्याची तयारी-इ.
तसंही ही वेळ निवांतपणाची अन वाचनाची नाही, कारण दिवसभर शिणलेला मेंदू नवं काही समजून घेण्याच्या ‘मोड’मध्ये नसतोच!
मग जे त्या पडद्यावर दिसतंय ते तरी निदान बरं असावं असं वाटतं.
‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘उंच माझा झोका’ ह्यानंतर आता सुरू असलेल्या --- ‘होणार सून मी..’, ‘रेशीमगाठी’, ‘लग्नाची तिसरी गोष्ट’. ह्या तीन मालिका त्यातल्या त्यात ‘बघणेबल’ असतात.
अति गोऽड-गोऽड, निव्वळ लग्न ह्या विषयाभोवती गुंफलेल्या, इ. आक्षेप त्यावर घेतले जातात.
तरीही मला वाटतं, ज्या वेगाने नाती विखुरताहेत, उत्सवी उत्साहाने झालेल्या विवाहितांचे घटस्फोट होताहेत त्यावर इलाज म्हणून नाही पण निदान त्यातल्या त्यात वास्तवतेशी इमान राखणार्या त्या आहेत. आजच्या, व्यक्तीस्वातंत्र्य सर्वाधिकतेने जोपासलं जाण्याच्या, काळात समंजसपणा-समजूतदारपणा-मनमिळावूपणा असे गुण म्हणजे नक्की काय हे अशा करमणूकप्रधान माध्यमातून दाखवलं गेलं तर त्यात गैर काय आहे?
नाती टिकवण्यासाठी अत्यावश्यक असणारा समजूतदारपणा त्या नक्कीच अधोरेखित करतात. अन हे जर ह्या मालिका दाखवत असतील तर त्यांच्यावर निव्वळ टिका करण्यात काय अर्थ आहे?
त्याने फार मोठं समाजपरिवर्तन घडणार नाही हे तर खरंच आहे. पण निदान भडक-उथळ-बटबतीत मालिकांच्या तुलनेत ह्या तशा सौम्यच म्हणायच्या!
फार काही भारी नाहीत - ठिकठाक,
फार काही भारी नाहीत - ठिकठाक, पण इफेक्ट्स नवीन टेक्नॉलॉजीमुळे बघायला चांगले वाटतात.
या मालिकेचे दिग्दर्शक बदलत असावेत (ठराविक भागांसाठी एक मग दुसरा वगैरे) असा अंदाज आहे.
लाक्षागॄह, रुक्मिणी हरण वगैरे भाग अत्यंत हास्यास्पद होते, त्यात अतिशय फालतू विनोद, आता हसा-आता रडा-आता आश्चर्यचकित व्हा वगैरे संदेश देणारे हीन पार्श्वसंगीत बघून पुरातन काळचे कपडे पण इतरत्र सापडणारा आचरट्पणा असलेली कुठलीतरी मालिका बघतोय की काय असे वाटायला लागले होते.(बहुदा या भागांचा दिग्दर्शक एरवी सध्या पापिल्वार असलेल्या फॅमिली ड्रामा मालिका दिग्दर्शित करत असावा). ही मालिका बघणे बंद करावे अशा निर्णयावर मी पोचतच होते आणि द्रौपदी जन्म आनि तिचे स्वयंवर हे भाग सुरू झाले, दर्जा परत जागेवर आला.
शिखंडी चे "शिखंडीनी" असे नामांतर करून चक्क बाई दाखवली आहे. आता ही त्यांनी घेतलेली सिनेमॅटिक लिबर्टी आहे की आपल्याला माहित असलेले महाभारत चुकीचे आहे, ठाऊक नाही
शकुनी असे का वागला, सत्यवतीला झालेली उपरती, भीष्माच्या चुका, धॄतराष्ट्राला होणारी स्वतःच्या चुकांची पुसटशी जाणीव वगैरेचे स्पष्टीकरण देणारे प्रसंग अत्यंत आवडण्यात आले असे जाताजाता नमूद करते.
शिखण्डी-शिखण्डिनी
शिखण्डी-शिखण्डिनी ह्या मागची कथा अशी आहे.
भीष्माने जेव्हा काशिराजाच्या दोन कन्या अम्बा आणि अम्बिका ह्यांचा विचित्रवीर्याशी विवाह करून देण्याच्या उद्दिष्टाने त्यांना हरण करून आणले तेव्हा अम्बेचे शाल्व देशाच्या राजाशी विवाह व्हायचे ठरले होते. भीष्माने तिला शाल्वाकडे पाठविले पण अन्य पुरुषाच्या घरात आधीच ती राहिली आहे ह्या कारणावरून शाल्वाने तिचा स्वीकार केला नाही. तेव्हा परत येऊन भीष्माने आपल्याशी विवाह करावा अशी तिने विनंति केली. आपल्या प्रतिज्ञेने बद्ध अशा भीष्माने ते नाकारले तेव्हा क्रोधित होऊन भीष्मावर सूड घेण्याच्या हेतूने तिने अरण्यात जाऊन घोर तपश्चरण केले. शंकर तिच्यावर प्रसन्न झाला आणि त्याने तिला असा वर दिला की पुढच्या जन्मी ती भीष्माच्या मृत्यूचे कारण होईल.
पुढच्या जन्मात ती शिखंडिनी ह्या नावाने द्रुपदाची कन्या झाली. जन्मापासून तिला मुलासारखे वाढवले होते आणि मोठी झाल्यावर तिचा/त्याचा विवाह हिरण्यवर्मन् राजाच्या कन्येशी करून देण्यात आला. मुलीला मुलगा म्हणून दाखवून आपल्या कन्येशी तिचा/त्याचा विवाह लावून देण्याच्या ह्या फसवणुकीमुळे हिरण्यवर्मन् ह्याने द्रुपदाशी युद्ध करण्याचे ठरविले. हे सर्व अरिष्ट टाळण्यासाठी शिखंडिनीने पुनः तपश्चरण करून एका यक्षाला प्रसन्न केले आणि आपले स्त्रीत्व त्याच्याशी बदलून घेतले. शिखण्डिनीचा असा शिखण्डिन् (प्रथमेचे एकवचन शिखण्डी) झाला आणि भारतीय युद्धात अर्जुनाने त्याला भीष्मापुढे उभे केले. त्याला स्त्री मानून भीष्माने त्याच्याशी युद्ध करण्याचे नाकारले आणि शस्त्र टाकून तो उभा राहिला. शिखण्डीने त्याच्या रथावर चढून तलवारीने त्याची मान कापली आणि अम्बेचा सूड असा पूर्ण झाला.
(शिखंडीचा खाण्याच्या श्रीखंडाशी काही संबंध नाही. 'शिखण्ड' म्हणजे तुरा अथवा मुलाचे केस कापल्यावर डोक्याच्या पुढच्या बाजूस एक छोटीशी फणी शिल्लक ठेवतात ते केस. (४०-५० वर्षांपूर्वीपर्यंत लहान गावांमधून अशी 'फणी' असलेले लहान मुलगे बरेचदा दिसत. आता मात्र तसे कोठे दिसत नाही.) डोक्यावर शिखंड असलेला/ली तो/ती शिखण्डिन्/शिखण्डिनी.
हाहि बलिष्ठ योद्धा म्हणून विख्यात होता. गीतेच्या पहिल्या अध्यायात पांडवांच्या बाजूने शंख फुंकणार्या वीरांचा नावांमध्ये काश्यश्च परमेष्वास: शिखण्डी च महारथ:। धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजित:|| असा त्याचा गौरवपूर्वक उल्लेख आहे.
मला वाटतं बहुतेक द्रोणाच्या
मला वाटतं बहुतेक द्रोणाच्या मृत्यूची कथा भीष्माच्या कथेत चुकून कोल्हटकर सरांनी घातली आहे. नरोवा कुंजरोवा प्रसंगात अश्वत्थामा मेला या विचाराने द्रोण रथात दु:खित होऊन पद्मासन घालून बसतो आणि द्रुपदपुत्र धृष्टद्युम्न (द्रुपदाने द्रोणाशी बदला घेण्याच्या हेतूने केलेल्या यज्ञातून झालेला मुलगा) हीच संधी साधून तलवारीने द्रोणाचे मुंडके उडवितो.
कोल्हटकर सर म्हणतात त्याप्रमाणेच पण शिखंडीला मध्ये घालून अर्जुन भीष्मावर बाण चालवितो पण पुढे शिखंडी असल्यामुळे स्त्रीवर हत्यार उचलणार नाही असे म्हणून भीष्म तटस्थ राहतो आणि अर्जुनाच्या बाणामुळे शरपंजरीवर पडतो. भीष्म त्याच्या वडिलांनी दिलेल्या इच्छामरणाच्या वरामुळे उत्तरायण सुरु झाल्यावर स्वत:च्या इच्छेने प्राणोत्क्रमण करतो.
आठवणीच्या आधारावर लिहिले आहे त्यामुळे कदाचित किरकोळ तपशीलात थोडे बदल असू शकतात.
शंका रास्त आहे.
बहुतेकांनी उपस्थित केलेली शंका रास्त आहे. माझीच द्रोण आणि भीष्मामध्ये गल्लत झाली.
पुत्राच्या मृत्यूच्या (खोटया) वार्तेने व्यथित झालेला द्रोण शस्त्र टाकून रथात उभा राहतो आणि ही संधि साधून धृष्टद्युम्न त्याच्या रथावर चढून त्याचे केस धरून त्याचे शिर कापतो अशी कथा आहे. ह्यालाच उद्देशून भट्टनारायणाच्या 'वेणीसंहार' नाटकातील तिसर्या अंकातील हा श्लोक आठवला:
तातं शस्त्रग्रहणविमुखं निश्चयेनोपलभ्य
त्यक्त्वा शङ्कां खलु विदधत: पाणिमस्योत्तमाङ्गे।
अश्वत्थामा करधृतधनु: पाण्डुपाञ्चालसेना-
तूलोत्क्षेपप्रलयपवन: किं न यात: स्मृतिं ते॥
(अरे पांचालपुत्रा,) माझ्या पित्याने शस्त्र टाकले आहे हे निश्चित झाल्यावर भीति टाकून त्यांच्या मस्तकावर हात टाकणार्या तुला त्याचवेळी हातात धनुष्य घेतलेला आणि पांडवपांचालांच्या सेनेला कापसासारखे उडवून लावणार्या प्रलयंकारी वादळासारखा अश्वत्थामा डोळ्यासमोर दिसला नाही काय?
बाकी कशाबद्दल काही मत नाही
बाकी कशाबद्दल काही मत नाही फारसं. पण 'होणार सून मी..’ ही 'त्यातल्या त्यातही बघणेबल' मालिका असू शकेल, या वाक्याला प्राणपणानं विरोध आहे. संवाद (प्र-चं-ड पुनरावृत्ती आणि निरर्थकता), कथानक (सरळसरळ 'हलचल / डोली सजाके रखना'चा ढापलेला प्लॉट), व्यक्तिरेखांचा विकास (लिहावं तेवढं कमी) या सगळ्या आघाड्यांवर कल्पनादारिद्र्य सिद्ध करणारी तद्दन पारंपरिक मानसिकता सिद्ध करणारी विकृत मालिका आहे.
ठाण्यातली वेगळी, नवीन लोकेशन्स उत्तम वापरली आहेत, एवढा एकच बारकुसा मुद्दा त्या मालिकेच्या बाजूनी. बास.
बकवास
तुला बकवास म्हणायचय की विकृत ?
विक्रुत म्हणण्यासारखं काय आहे म्हणे त्या सिरियलीत.
तो समीर गोखले कित्त्ती क्यूट दिस्तो नै.
आणि ती तेजश्री प्रधान पण कित्ती कित्ती छान दिस्ते.
आणि त्या चार चार काकवा, आत्या, मावश्या....
सारीच कशी अलगद मनतरंग उमलवणारी कमळे.
व्वा व्वा.
मोल्सवर्थमधून विकृत या शब्दाचा अर्थ
विकृत (p. 751) [ vikṛta ] p S That has undergone a modification or change; altered, transformed, transfigured. 3 Affected with the feeling of disgust or aversion: also estranged, alienated or turned from. 4 Used popularly as s n in the sense of Nausea or loathing.
अवघड प्रश्न आहे. खरं तर या
अवघड प्रश्न आहे. खरं तर या प्रश्नाचं उत्तर इथे आलेलं आहे.
पण पुन्हा एकदा डोकं ढुंडाळून सांगायचं, तर आवर्जून पाहिलेली शेवटची बरी मराठी मालिका 'गुंतता हृदय हे', वृत्तवाहिन्यांवरच्या काही मुलाखती पाहिल्या जातात (त्यातही सातत्य नाही), येताजाता काही सिनेमे पाहिले जातात (एका ब्रेकपासून दुसर्यापर्यंत). बाकी बघण्यासारखं जे काही असेल, ते सगळं जालावर मिळतंच, परत जाहिरातींचा तगादा नाही.
दिली असती. पण अडचण अशी आहे की
दिली असती. पण अडचण अशी आहे की आपली चर्चा थांबायचीच नाही. मी पारंपरिक मानसिकतेची उदाहरणं दिली की तुम्ही ती विकृत कशावरून हे विचारणार. ते सांगितलं की मग तुम्ही त्याच मानसिकतेमुळे गेल्या शतकातल्या स्त्रिया सुखी कशा होत्या ते सांगणार. त्याबद्दल असहमती. मग अजून वाद. हे अंतहीन आहे. त्यामुळे उदाहरणं मरोत.
विनोद
एका जुन्याच विनोदाचे इम्प्रोव्हायजेशन-
नवरा - मी पण आज तुम्ही बघता त्या सगळ्या मालिका बघणार.
बायको - अॅज यु विश.
[२ मालिकांचे एपिसोड बघितल्यावर प्रचंड वैतागलेला नवरा]
नवरा - हे असलं भयंकर बघता तुम्ही?
बायको - मग तुला काय वाटलं आम्ही रोज मज्जा करतो म्हणून?
मालिका
मराठी मालिका बघत नाही. त्या कंटाळवाण्या आहेत. त्यामुळे तिकडे फिरकत नाही.
....पण त्यांना प्राणपणाने विरोध नाही किंवा त्या विकृत वाटत नाहीत. हे असलं काही बोलणं म्हणजे जरा अतिच वाटतं. शो बिझनेसमधे बरंच काहीकाही मजेशीर असतं की. त्या सगळ्याला प्राणपणाने विरोध करायचा तर शतजन्मच घ्यावे लागतील :-)
टीढीश ... टीढीश ... टीढीश ...
एखाद्या सुमार किंवा भिकार गोष्टीबद्दल मत व्यक्त करतानाही "बघणेबल म्हणण्याला प्राणपणाने विरोध करेन" म्हणणं खरंतर प्रशंसा म्हटलं पाहिजे, अपमानकारक का समजावं? It's so bad that it's good
इकडचं वि. तिकडचं
पुनः 'इकडचं वि. तिकडचं' करतोय असं म्हणू नका पण 'तिकडच्या, एचबीओ ची 'रोम' (म्हटलं तर पौराणिक कारण कथा २००० वर्षांपूर्वीची), ऐतिहासिक 'बोर्जिया', राजकीय 'येस मिनिस्टर','येस प्राइम मिनिस्टर' आणि 'हाउस ऑफ कार्ड्ज', कौटुंबिक 'अपस्टेअर्स डाउनस्टेअर्स' आणि तिचीच जास्ती अलीकडील वर्जन 'डाउनटन अॅबी'अशा मालिका आपल्याकडे का होऊ शकत नाहीत? हे सगळे कॉस्च्यूम ड्रामाज आहेत हे खरे पण तितकेच रंजकहि आहेत.
ह्यांच्याशी तुलनीय जुन्या काळातील 'भारत एक खोज', अलीकडील 'प्रधानमंत्री' अशी मोजकीच नावे सुचतात.
एकच अडचण. 'रोम' आणि 'बोर्जिया' कौटुंबिक वातावरणात बघणेबल नाहीत कारण त्यांच्यात नग्न शरीरे आणि संभोगदृश्ये भरपूर आहेत.
इकडचे नि तिकडचे
इकडचे नि तिकडचे - थोडक्यात पाश्चात्य देशातल्या मालिका विरुद्ध भारतीय संदर्भांतल्या मालिका यांबद्दल माझ्या मनात बसलेली खूणगाठ अशी आहे की :
पाश्चात्य देशांत आठवड्याला पाच दिवस दाखवल्या जाणार्या, वर्षानुवर्षे चालणार्या मालिका "डे टाईम सोप" या विभागात येतात. त्या दुपारी असतात. (वानगीदाखल पहा : "द डेज ऑफ आवर लाईव्ज" आणि "ऑल माय चिल्ड्रन" आणि वगैरे इत्यादि) एकंदर वर्षानुवर्ष दळलेलं दळण. मग त्यात कोण कुणाशी विवाहबाह्य संबंध ठेवतं आणि कोण कुणाचा खून करतं वगैरे पुनरावृत्त होणार्या गोष्टी. प्रस्तुत विभागातील मालिकांचं एक वैशिष्ट्य म्हणजे "सीझन" या संकल्पनेचा अभाव. युरोप अमेरिकेतल्या मला माहिती असलेल्या प्राईम टाईम मालिका - म्हणजे संध्याकाळी आठ किंवा नऊच्या सुमारास दाखवल्या जाणार्या मालिका - यांचे सीझन दिसतात. "फॉल" सीझन मधे सुमारे १३ ते १६ आठवड्यांचा काळ. सीझन संपल्यानंतर मग पुन्हा पुढील सीझनमधे पुनरागमन. डेटाईम सोपमधे असली संकल्पना असलेली मला ठाऊक नाही. सदासर्वकाळ यांची गिरण चालू असताना दिसते. चूक भूल द्यावी घ्यावी.
तर या अशा "डेटाईम सोप" सारख्या गोष्टी भारतात प्राईम टाईमला - म्हणजे संध्याकाळी आठ किंवा नऊच्या सुमारास - दाखवल्या जातात (वानगीदाखल पहा : आठवड्याला पाच दिवस(?) चालणार्या "क्यूंकी सांस भी कभी..." किंवा "घर घर की कहानी" किंवा "होणार सून मी..") वगैरे. इथेही सीझनची संकल्पना असलेली मला ज्ञात नाही. "कौन बनेगा करोडपती" किंवा "सत्यमेव जयते" किंवा "डान्स इंड्या डान्स" यांसारख्या रियालिटी टिव्ही कार्यक्रमांना ठरविक एपिसोड्स पुरता कालावधी असताना दिसतो. परंतु एकता कपूरच्या गिरणीला थांबणं ठाऊक असताना दिसत नाही. इथेही चूभूद्याघ्या.
थोडक्यात, भारतातल्या प्राईम टाईम मालिका = पाश्चात्य देशांतला डे टाईम सोप.
माझ्या वरच्या आकलनामधे काही त्रुटी असतील तर त्या मला जाणून घ्यायला आवडेल. पण एकंदर हे असं आहे असं मला वाटतं खरं.
α मराठी
झी मराठी जेव्हा α मराठी असण्याच्या काळात ४०५ आनंदवन,श्रीयुत गंगाधर टिपरे,रेशीमगाठी,पिंपळपान,प्रतिमा कुलकर्णी यांची झोका अशा काही उत्तम मालिका होत्या.सहित्यचा कस त्या कथेंमध्ये उतरलेला वाटायचा. आजच्या करोडोंच्या मालिकांच्या तुलनेने त्या मालिकांचे बजेट सुद्धा जास्त नसेल,तरी सुद्धा काहीतरी सकस कलाकृती बघितल्याचा आनंद सध्याची कोणतीही मालिका देत नाही. मराठी साहित्यात उत्कृष्ट मालिकांच्या दृष्टीने लागणारे सर्व कच्चे साहित्य (raw material) असताना किमान सुजाण वैचारिक पातळी राखणाऱ्या मालिका मराठी वाहिन्यांवर येत नाहीत हे मराठी भाषिक समाज म्हणून आपले दुर्दैव आहे.
उलरोल्लेखित मालिकांपैकीसुद्धा
उलरोल्लेखित मालिकांपैकीसुद्धा एकही आधुनिक विचारांना प्रतिबिंबीत करत नाही हे नोंदवावेसे वाटते. म्हणजे प्रत्येक मालिका तशी असावी असे नाही पण रुचीपालट म्हणून तरी किमान एखादी? ८०-९० नंतर झालेले सामाजिक बदल लेखकांपर्यंतच पोचलेले नाहीत का प्रेक्षकांना ते बघायला आवडत नाहीत (स्वतः त्याच बदलांत रोज राहत असूनही) हे समजत नाही.
उदा: अजूनही एकत्र कुटुंब कित्ती छान छान हेच दाखवले जाते? विभक्त कुटुंबांची सर्रास निर्मिती होऊन त्याचे फायदे ओरपून होऊन दोन पिढ्या होऊन गेल्या - नी आता न्युक्लीअस/बेडरूम कुटुंबे असली तरी मालिकांत आपले तेच दळण!?
मुख्य मुद्दा हा आहे
नाती टिकवण्यासाठी अत्यावश्यक असणारा समजूतदारपणा त्या नक्कीच अधोरेखित करतात. अन हे जर ह्या मालिका दाखवत असतील तर त्यांच्यावर निव्वळ टिका करण्यात काय अर्थ आहे? त्याने फार मोठं समाजपरिवर्तन घडणार नाही हे तर खरंच आहे. पण निदान भडक-उथळ-बटबतीत मालिकांच्या तुलनेत ह्या तशा सौम्यच म्हणायच्या!
ह्या त्यांच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष होतयं. 'मंजिरि' वाली मालिका किंवा 'सासू हवी' ईत्यादी मालिकांच्या तुलनेत या नविन मालिका सहनिय असाव्यात. माझी आई मालिका बघत नसे. पण या काही अलीकडे बघते, मला उत्साहाने त्यातल्या पात्रांबद्द्ल सांगते. "बरं वाटतं गं . असा समजूतदारपणा पाहिजे कुटुंबात " असं म्हणते तेव्हा तिला न मिळालेलं जग ती मालिकेत बघतेय असं जाणवतं आणि त्यांना फालतू वगैरे म्हणवत नाही. त्यातून काहिश्या प्रतिकूल परिस्थितीतही ती आयुष्य समरसून जगतेय आणि सतत 'क्लास' बघणारे बाबा सतत कुरकुर करत स्वत:वरच वैतागत असतात.
डेली सोप बघणं हे फरसाण,चाट वैगेरे खाण्यासारखं हे असावं. ते चांगलं नाही माहितिय तरी तोंडात टाकल्यावर खात रहावसं वाटतं. मी या मालिका कधीतरीच बघते तरी पुर्वीच्या अगदीच कपट-कारस्थानी मालिकांपेक्षा या ठिक असाव्यात. ( संदीप ,मृणाल कुलकर्णी, पल्लवी सुभाष यांची मालिका ही मी न चुकवता पाहिलेली शेवटची मालिका.)
समजूतदारपणा
या मालिकांमध्ये साधारणपणे पुढील गोष्टी दिसून येतात-
१. मुख्य पात्राने, विशेषतः स्त्री पात्राने आपल्या इच्छा बाजूला ठेवून मोठ्यांना, लहानांना, नवर्याला, त्याचबरोबर यांच्याखेरीज इतर प्रत्येक व्यक्तीला, परंपरांना प्राधान्य देणे.
२. एकदा लग्न केले, की नवरा/सासू-सासरे कितीही वाईट असले, तरी त्रास सहन करत लग्न टिकवून ठेवणे (हे खरे म्हणजे परंपरांना प्राधान्य देणे यात जाते).
३. घरातल्या कोणत्यातरी एकाच ज्येष्ठ व्यक्तीने घरातली सर्व सूत्रे आपल्या हातात ठेवणे आणि घरातल्या सर्व माणसांना आपल्या मर्जीनुसार वागायला भाग पाडणे.
यातली कोणतीही गोष्ट मला समजूतदारपणाची वाटत नाही.
एक रोचक प्रश्नः
शहरी मध्यमवर्गियांच्या घरी जेवढ्या पातळीचं पितृसत्ताक वातावरण आढळतं त्याहून अधिक पातळीचं वातावरण या मालिकांतून दिसून येतं असं वाटतं. शिवाय, हे वातावरण पहायला याच लोकांना आवडतं. जाहिराती इ.तील स्त्रियांच्या शरीराची कमनियता वगैरे पाहून सर्वसामान्य स्त्रियांच्या बॉडी इमेजवर परिणाम होतो असं म्हटलं जातं. तसं या मालिका पाहून स्त्रियांच्या वागण्यात, विचारांत काही बदल होत असावेत का?
राधिकाच्या प्रश्नांची उत्तरं
राधिकाच्या प्रश्नांची उत्तरं म्हणून नाहीत, पण आणखी एक 'सिद्धांत' आहे.
जे आपल्याला प्रत्यक्षात मिळत नाही, ते पहायला लोकांना आवडतं का? उदा: करण जोहर - शाहरूख खान सिनेमे. चित्रपट, मालिकांमधे दाखवला जाणारा प्रकार एवढा बाहेरचा (alien) वाटतो की तो बघायला काही "त्रास" होत नाही, उलट करमणूक होते.
बदल
' तसं या मालिका पाहून स्त्रियांच्या वागण्यात, विचारांत काही बदल होत असावेत का? '
हो होतात असा अनुभव आहे. घरात राहून मालिका पहाणार्या-आणि बाहेरचे फार विश्व नसणार्या व्यक्तिच्या मनावर मालिकांचा प्रभाव पडतो.
'होणार सून मी ह्या घरची' ह्या मालिकेत एका घरात 'कुजवून' ठेवलेल्या बायकांचा जत्थाच आहे- अत्यंत बेकार मालिका आहे. विधवेचं जगणं-संसाराचं सूखच नाही छाप डायलॉग-सारखं घरातल्या व्यक्तिंनी मोठ्यांची अत्यंत फालतू गोष्टीत परवानगी मागत फिरणं-तेच कसं 'आयडियल' वागणं आहे वगैरे डायलॉग- मानापमानाचे अवडंबर माजवलेले-...लोकांना सुखासुखी असताना दु:ख शोधून दाखवते असे वाटते ही मालिका.
'होणार सून मी ह्या घरची' ह्या
'होणार सून मी ह्या घरची' ह्या मालिकेत एका घरात 'कुजवून' ठेवलेल्या बायकांचा जत्थाच आहे- अत्यंत बेकार मालिका आहे. विधवेचं जगणं-संसाराचं सूखच नाही छाप डायलॉग-सारखं घरातल्या व्यक्तिंनी मोठ्यांची अत्यंत फालतू गोष्टीत परवानगी मागत फिरणं-तेच कसं 'आयडियल' वागणं आहे वगैरे डायलॉग- मानापमानाचे अवडंबर माजवलेले-...लोकांना सुखासुखी असताना दु:ख शोधून दाखवते असे वाटते ही मालिका.
ठ्ठो!
=)) =))
__/\__ दंडवत स्वीकारा!
अपेक्षांची गडबड
मला या तीनच असे नव्हेत (कारण त्या मी फारशा बघितल्या नसाव्यात) एकूणच मराठी सिरीयल्स इतक्या खोट्या आणि फॉरेन वाटतात - त्यामुळे मी त्या बघु इच्छित नाही. तरी एक जाणवतं की त्यांचा टार्गेट ऑडीयन्सच वेगळा आहे. आपल्या आवडत्या काळातून, त्या काळच्या विचारांतून, मुल्यांतून, तत्कालीन सामाजिक नियम/प्रथांतून बाहेर पडु न शकणार्यांना - न इच्छिणार्या अश्या मोठ्या वर्गाला सिरीयल्स भावतात. त्यात चांगले वा वाईट असे काही नसावे.(असा विचार केल्यावर माझा त्रागा-राग कमी झाला आहे)
समकालीन जाणीवा, मुल्ये यावर आधारीत सिरीयल्स बघणारे / बघु इच्छिणारे अगदी अल्पसंख्य असावेत. खरंतर तश्या विषयांची माहिती असणारे आणि त्यावर सकस काही लिहु शकणारे किती आहेत हा ही प्रश्न आहेच, पण अगदी कोणी लिहिलं तरी त्यांच्यासाठी कोणतेही प्रायोजक पैसे घालणार नाहीत असे वाटते. शेवटी मालिका या "प्रायोजित" असतात.
मराठी सिरीयल्समध्ये समलैंगिकता, वेश्यांचे प्रश्न, झोपडपट्टीतील विश्व, दलितांचे त्यांच्या दृष्टीकोनातून आलेले प्रश्न वगैरे सोडाच, सध्याच्या नीट मराठी लिहिता-वाचता येणार्या अपत्यांचे पात्र, घरातल्या वडिलधार्यांना मार्मिक पण त्यांच्या दृष्टीने उलट उत्तरे देणारी मुले, मुलांना घरात कोंडून बाहेर पार्ट्यांना जाणारे पालक, इतरांना तुसड्यासारखी उत्तरे देत बहुतांश वेळ मोबाईलशी चाळा करणारा नायक -वगैरे पात्रे समाजात अतिशय कॉमन असली तरी- असे काही मराठी सिरीयल्सपुरते चाकोरी मोडणारे दिसेल असे वाटत नाही. :(
होणार सून --
ऐसीमुशाफिरी करताना हा धागा दिसला, रहावलं नाही म्हणून...
ह्यातली ती जी जान्हवी आहे ती मेगाशॉट आहे. एक तर ती अख्ख्या जगाला उपदेश करत असते, आणि गोग्गोड सुभाषितवजा गुट्या देते. त्यात तो ०.५X स्पीडचा तिचा आवाज.
ती खर्या आयुष्यात अशी ०.५X स्पीडने बोलत असेल तर आजूबाजूचे लोक कसं सहन करत असतील?
केवळ माझा वैयक्तिक त्रागा असेलही, पण ती बोलायला लागली की मेंदूत आत कुठेतरी एक घंटा वाजते. आणि तिला सांगावसं वाटतं की जरा नॉर्मल मुलीसारखी बोल ग!
उदा.
नॉर्मल लोक ------------------> जान्हवी
==============================
मला जरा ------------------> "माssला ना जरा"
ए श्री नको रे! ------------------> "ए श्री नssssको रेsss"
इतकं सरबत नको! ------------------> "हे इssssतssकं सरबत खरच नकोयsss माssला"
इ.इ.
आईशप्पत फटके द्यायला हवे. राज ठाकरे इथे लक्ष घालतील काय? (नाहीतरी सध्या त्यांना दुसरा उद्योग काय आहे?)
आणि तो "श्री"... त्याच्या
आणि तो "श्री"... त्याच्या चेहर्यावरचे भाव म्हणजे मला माझ्या मुलाच्या शी होण्याच्या 'त्या' कठीण काळातली आठवण होते. माझ्या मुलाला (वय वर्ष २.२) जेव्हा शी ला त्रास होतो (कधी कधी पाणी कमी प्यायल्यामूळे कडक शी होते जनरलीच लहान मुलांना, अगदी खडा) तेव्हा त्याच्या चेहर्यावर जे सौम्य कळवळण्याचे भाव असतात तसेच भाव "श्री" च्या चेहर्यावर सतत असतात. बिचारा, एवढे एपीसोड अगदी तस्से केले त्याने, कोणी तरी पोट दाबा रे त्याचं :( (दाबा म्हणजे.. आंबा पिळतांना अंब्याला सैल करतो तसं हळूहळू पोट दाबलं तर मोकळा होईल (हसेल) तो बिचारा).
"अस्मिता" नामक डिटेक्टिव
"अस्मिता" नामक डिटेक्टिव सिरियल बघतं का कुणी? महालोल आहे.
मागे ऐसीवरच कुणीतरी "शेरलॉक होम्स साध्यासाध्या गोष्टींवरून कैच्याकै निष्कर्ष काढतो हे पटत नाही" असं म्हणालं होतं. ती जी कोण व्यक्ती असेल तिने अस्मिता बघताना ब्लेड वगैरे तीक्ष्ण हत्यार आसपास ठेवू नये. मनगटाची काळजी घ्यावी.
------
"जय मल्हार" या मालिकेचं शीर्षकगीत आणि एकूणच पार्श्वसंगीत झकास आहे.
होणार सुन मी त्या घरची बद्दल एक सूचना
ही मालिका जर कायमची चालवायची असेल तर :
१. जान्हवी ला डोक्यावर पडल्याने स्मृतीभ्रंश झाली आहे. जर डोक्यावर एक फटका मारला तर ती बरी होईल.
२. एक फटका मारला की ती 'श्री'ची बायको होईल. एक भाग गोखल्यांच्या घरात दाखवावा.
३. दुसरा फटका मारला की ती श्री. आपटे यांची बायको होईल. पुढचा भाग आपट्यांछ्या घरात दाखवावा.
४. असे आलटुन पालटुन एक गंभीर भाग तर दुसरा विनोदी भाग दाखवता येईल.
५. कधी रुचीपालट म्हणुन दोघेही तिचा नवरा असा दावा करताहेत आणि जान्हवी अत्यंत गोंधळुन गेली दाखवता येईल.आणि प्रेक्षक आपल्या डोक्यावर हात मारुन घेतील.
तिसरा फटका मारला की तिला आपण लग्न न झालेली तरुणी आहोत असे वाटु लागेल. माहेरीच आपल्या निर्मळ मनाच्या सावत्र आई बरोबर मस्त संवाद टाकता येतील.
पाचेकशे भाग सहज दाखवता येतील पाचशेव्या भागात ' तरुण दिसण्याच्या क्रीम्स च्या जाहिराती दाखवता येतील.
त्यात भर म्हणुन ' आज पासून अमुक अमुक पात्राचा अभिनय तमुक तमुक माणुस करेल अशी पाटी दाखवावी आणि आपल्या मनाप्रमाणे पात्रे बदलत रहावी.
आम्ही एक्जात सगळ्या पौराणिक
आम्ही एक्जात सगळ्या पौराणिक मालिका बघतो. दिवसातून दोन ते तीन तास फक्त.
- महाभारत (चोप्रांच्या मालिकेपेक्षा दस्पट चांगले आहे - गोष्ट सांगितली नाहीये - तर एखादी गोष्ट करताना त्या पात्राने काय विचार केला असेल, शिवाय चुकीचे वागल्यावर त्याचे परिणाम भोगताना झालेली उपरती - शिवाय कृष्णाचे मधून मधून विवेचन - बघण्यासारखे आहे)
- महादेव (आप्ल्याला आवडतो बुवा तो महादेव झालेला! आणि तुलनेने खूप च चांगले आहे)
बाकी मग
- जोधा अकबर
- बुद्ध
- अॅड्व्हेन्चर्स ऑफ हातिम
हेही अधूनमधून बघतो. डोक्याला शॉट नाही.
चांगल्या मालिका बघितल्या अहेत झी आणि इतर चॅनेलवर त्यामुळे आत्ता जे काय दाखवतात ते बघवत नाही.
आम्ही जे काय बघतोय त्यातून पोरगी काही शिकलीच तर ते बरे असेल (भंपक फॅमिली ड्रामा पेक्षा) अशी आशा आहे.