काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९ उत्तरार्ध

आत बऱ्यापैकी अंधार होता.
क्षण दोन क्षण मला काही दिसेना...
मग मी डोळे मिचकावत आजूबाजूला पाहिलं.

जणू एका जगड्व्याळ सरकारी एमोरल प्राण्याच्या पोटात शिरलो होतो मी.

खिडक्यांच्या तोंडातून माणसांची धडपड, आकांक्षा, इच्छे-अनिच्छेनी दिलेले पैसे, फॉर्म्स, फोटो, अर्ज विनंत्या...
सगळं बकाबका खाऊन आपल्या पोटात साठवणारा निर्विकार अज्रस्त्र प्राणी.
आज पहिल्यांदा त्याला मी आतून बघत होतो.
आजूबाजूला सगळं सेपिया-टोनमध्येच होतं.
टेबलं, खुर्च्या, पेपरांचे गठ्ठे, चहाचे पेले, आणि आतली माणसं सगळंच!

हे तसं होतंच की अंधुक प्रकाशामुळे तसं वाटत होतं कोण जाणे.

लांबवर प्रत्येक खिडकीच्या मागे ऐलतीरावरची माणसं बसली होती.
आणि बाहेर खिडकीतून आत हात, बोटं, डोळे, कागद नाचवणारी पैलतीरावरची माणसं.
आर. टी. ओ. चा ऐलतीरावरचा माणूस मुलाच्या ऍडमिशनचा फॉर्म भरायला जातो तेव्हा तो पैलतीरावरचा होत असणार बहुतेक.
असे आपले ऐल आणि पैल तीर रोज... किंवा रादर क्षणोक्षणी बदलत असणार असं काय काय मॅड माझ्या डोक्यात यायला लागलं...

काही टेबलं खिडकीपासून थोडी लांब होती.
ऐलतीराच्या थोडी अजुन अलीकडे.
अशाच एका टेबलामागे एक माणूस बसलेला.
पांढरा शर्ट, चष्मा, हँडसम म्हणता यावा असा.
गोरटेला थोडा कॉकेशियन वळणाचा चेहरा आणि मिशांमुळे मी त्याला मनातल्या मनातच चेक्सचा शर्ट जीन्स आणि बूट्स चढवून घोड्यावर बसवून काऊबॉय करून टाकला.
बेस्ट म्हणजे त्यानं शर्टाची दोन बटणं उघडी टाकलेली...
मी स्वतः:पण असंच ही-वेज कायम दाखवत असल्यामुळे मला थोडी आपुलकी वाटली.
हा बाबा आपल्याला मदत करेल अशी थोडी आशा वाटली आणि मी त्याच्या समोर गेलो.
एकदा वाटलं आपण त्या फॉरबिडन दारातून आत आल्याबद्दल वसवसतो की काय...
पण हे साहेब चांगले होते.
त्यांना बहुधा अशा हळूचकन् आत घुसणाऱ्या मानवी-मूषकांची सवय असावी.

त्यांना मी माझी टॅक्सी बॅज काढायची इच्छा सांगितली.
ते गोवेकरी मृदू टोनमध्ये म्हणाले, "काहीच प्रॉब्लेम नाही. एक एजंट पकड. होऊन जाईल काम आरामात."
...
...
...

मी एक मोठ्ठा श्वास घेतला आणि माझा सगळा टॅक्सी-बॅजचा फंडा त्यांना सांगितला...
हे नवसासाठी करतोय... शॉर्टकट्स मारायचे नाहीयेत वगैरे.

थोडे अम्युझ्ड झाल्यासारखे वाटले.
चष्म्याआडून त्यांचे डोळे मिस्कील हसल्यासारखे वाटले...
मी अजून रेटून दिलं पुढे,
"सर कितीपण वेळ लागला तरी चालेल, आपल्याला घाई नाहीये पण बॅज स्वतः:च्या जीवावर काढायचाय. तुम्ही फक्त गाईड करा."

ते बोलले,
"दोन गोष्टी मेन:
एक १५ वर्षांचं डोमिसाईल..."

"येतंय ते १५ दिवसांत", मी.

"आणि SB-२ (स्पेशल ब्रॅन्च कमिशनर ऑफीस) चं पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट."

"ठीकाय उद्याच जातो", मी बोल्लो.

मी आभारून निघालो...
त्यांनी थांबवलं, बोलले,
"माझा नंबर घे, काही लागलं विचारायचं असलं तर फोन कर... मी हेडक्लार्क बो##र"
...
...
...
मला उगीचच बाकीबाब बोरकरांची आठवण झाली आणि गोव्याच्या समस्त लोकांबद्दल प्रेम दाटून आलं.

उद्या चलो SB-२

आजचा खर्च:
कोर्ट फी स्टॅम्प पाच रुपये.

(क्रमशः)

आधीचे दुवे:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपोद्घात
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २८ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३१ जानेवारी २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ मार्च २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २०१८
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)