जग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं!……10

वाट इज लाइफ? (1943)
एर्विन स्क्रोडिंजर (1887-1961)

x

विसाव्या शतकाचा पूर्वार्ध पूर्णपणे भौतिकशास्त्राला वाहिलेले होते. सापेक्षता सिध्दांत, अणु विभाजन, क्वांटम मेकॅनिक्स या संकल्पनांनी वैज्ञानिक-जगाला मुग्ध करून टाकले होते. मूलभूत विज्ञानसंशोधकांना अणूंच्या रहस्यभेदात स्वारस्य होते. नियंत्रित अणु विभाजनातून ऊर्जेचा अव्याहत श्रोत मिळण्याची शक्यता होती. त्यामुळे जगभरातील वैज्ञानिकांमध्ये अणूंचे रहस्यभेद करण्यात पहिल्यांदा कोण यशस्वी होतो याची जणू काही स्पर्धा लागली होती. मॅनहटन या अणु बाँब प्रकल्पाने अणू-परमाणूंच्या शोधात असलेल्या वैज्ञानिकांना आपापले सिध्दांत, गृहितकं, व प्रमेयांचे अंतिम परिणाम काय होणार हे प्रत्यक्ष सिध्द करण्याची संधी दिली. परंतु अणुबाँबच्या स्फोटाने, त्यात झालेल्या मानवी संहाराने वैज्ञानिकांचे जग हादरले. भौतिकशास्त्र व रसायनशास्त्रांने अनेक तंत्रज्ञानांना जन्म दिला. विमान, अत्याधुनिक अजश्रकाय जहाजं, रेडिओ, टीव्ही, स्वंयचलित वाहनं, फोटोग्राफी, सिनेमा, अवकाश तंत्रज्ञान, रडार यंत्रणा, क्ष किरणांपासून वैद्यकीय निदान, लेसर, संगणक, इ.इ. सोई-सुविधा विसाव्या शतकानेच दिलेल्या आहेत व या यादीत आणखी भर पडतच आहे. परंतु काही महत्वाकांक्षी वैज्ञानिक व राजकीय नेते आधुनिक तंत्रज्ञानाला सैनिकांच्या छावणीत बांधून ठेवण्यात यशस्वी होऊ लागले. दोन्ही जागतिक महायुध्दात उपलब्ध तंत्रज्ञानांचा वापर करून लाखो लोक मारले गेले. विज्ञानाची ही काळी बाजू लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेली होती. विज्ञान हे फक्त मानवी मृत्युसाठीच आहे का? असा प्रश्न पडला. अशा विचार मंथनातून बाहेर पडलेल्या मोजक्या वैज्ञानिकामध्ये एर्विन स्क्रोडिंजर हे नाव लक्षात राहते. या वैज्ञानिकाने जीवशास्त्रावर लक्ष केंद्रित केले व यानंतरचा काळ जीवशास्त्राचा आहे हे वैज्ञानिकांच्या मनावर ठासवले.

‘वाट इज लाइफ?’ हे पुस्तक नोबेल पारितोषक विजेता स्क्रोडिंजर यानी 1943 साली डब्लिन येथे निवडक 400 प्रेक्षकासमोर दिलेल्या भाषणांची मुद्रित आवृत्ती आहे. याच पुस्तकाने पुढील काळातील वैज्ञानिकांच्या संशोधनाची दिशा बदलली. जगापुढे 'आ' वासून उभ्या असलेल्या आहार, आरोग्य, इत्यादी समस्यांना उत्तर शोधणे शक्य झाले व जगाचा ढाचा बदलू लागला व अजूनही बदलत आहे. खरे पाहता जीवन हे अध्यात्म, धर्म वा तत्त्वज्ञान यांच्या अखत्यारीतला चर्चा विषय. हजारो वर्षे धर्माने या संबंधीचे अत्यंत चुकीच्या कल्पना मांडून लोकांची फसवणूक केली आहे. आत्मा, परमात्मा, चेतना, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, पुनर्जन्म, कर्म सिध्दांत इत्यादी शब्दांची पेरणी करून धर्मनिष्ठांना संमोहित केले. परंतु जीवन म्हणजे नेमके काय? या प्रश्नाचे ऐहिक अंगाने विचार करू लागल्यास मानवी जीवन समृध्द होऊ शकते असा विचारच यापूर्वी कधी कुणी केला नव्हता.

स्क्रोडिंजरने आपल्या भाषणात जीवन म्हणजे काय यासंबंधीचे विचार मांडले. जीव शास्त्र हे भौतिकशास्त्र व रसायनशास्त्रापेक्षा वेगळे का समजले जाते? हा त्याच्या समोरचा प्रश्न होता. एकीकडे किडा-मुंगी, प्राणी-पक्षी व इतर सजीव प्राणी व दुसरीकडे अणु-रेणु, चुंबक, वीज, तापमान, अशी विभागणी का? सजीवांचा विचारसुध्दा भौतिकीचे नियम व रासायनिक क्रिया - प्रक्रिया या संकल्पनेतून का करू नये? निर्जीव वस्तूंसाठी अवकाश व काळ या संकल्पना लागू करून त्यांचे रहस्य उलगडता येते. तशाच प्रकारे सजीवांनासुध्दा अवकाश व काळ या संकल्पना लागू करून त्याचा रहस्यभेद करता येईल का? स्क्रोडिंजरने आपल्या भाषणात सजीव प्राण्यांचा विचारसुध्दा अणु-रेणु, अवकाश-काळ, भौतिकी नियम, रासायनिक प्रक्रिया या संकल्पनेतून करायला हवे असे सुचविले. त्याच्या मते या जगातील सर्व निर्जीव व सजीव भौतिकीच्या नियमाने बांधलेले आहेत. जिवंत असणे म्हणजे शरीरातील रेणूंच्यावर काही रासायनिक-भौतिक क्रिया - प्रक्रिया घडत राहणे. यालाच चयापचय असे म्हटले जाते - खाणे, पिणे, श्वास घेणे, पुनरुत्पादन करणे इ.इ. जिवंत राहण्याच्या या क्रियेला भौतिकीतील एंट्रॉपीचे नियम पण लागू करता येतील. फक्त ती नकारात्मक एंट्रॉपी असेल. कारण एंट्रॉपीच्या नियमाप्रमाणे निर्जीव वस्तूंची वाटचाल नेहमीच सुव्यवस्थेतून अव्यवस्थेकडे जात असते. परंतु अशा एंट्रॉपीला टाळण्याकडे सजीवांचा कल असतो. सजीवामध्ये एक सुसंबध्दता असते. व ही सुसंबध्दता कायम राखण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले जात असतात. परंतु मृत्युसमयी ही सुसंबध्दता पूर्णपणे ढासळते. मृत्युच शरीराला एंट्रॉपीकडे खेचते. आयुष्यभर जनुक, गुणसूत्र, प्रथिने इ.इ. सुसंबध्दता कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असतात. व त्यांची आनुवंशिकता प्राणीवंशातील सातत्य टिकवतात.

या पुस्तकामुळे संशोधकांना रेण्वीय जीवशास्त्र हा एक नवा विषय संशोधनासाठी मिळाला. यापूर्वीही या विषयावर त्रोटकपणे काही संशोधन झाले होते. परंतु विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या विषयावर फार मोठया प्रमाणात संशोधन होऊ लागले. सजीवामध्ये जनुकांचा सहभाग कसा असतो? आनुवंशिकता म्हणजे नेमके काय? जनुकांना आपण नेमके काय करावे हा संदेश कसा व कुठून मिळतो? अशा व इतर अनेक प्रश्नांना संशोधक उत्तरं शोधू लागले. या संशोधनामुळे जीव तंत्रज्ञानात भर पडू लागली. जिवाणू, विषाणू, किडा - मुंगी, क्रिमी कीटकं, वनस्पती इत्यादी सजीवांचा अभ्यास होऊ लागला. वनस्पतींचा अभ्यास करताना संकरित बियांचा शोध लागला. या संशोधनामुळे जास्तीतजास्त आहारोत्पादन करणे शक्य झाले. शेती व्यवसायात हरित क्रांती झाली. सुधारित बी-बियाणे, खतं, कीटकनाशक फवारे, जमिनीची कस सुधारणे इत्यादीमुळे अन्नपदार्थांचे मुबलक उत्पन्न मिळू लागले.

केवळ अनुभवावर आधारित असलेल्या व अंधारात चाचपडत असलेल्या वैद्यकशास्त्राला रेण्वीय संशोधनामुळे एक नवी दिशा मिळाली. माणसांना भेडसावत असलेल्या अनेक असाध्य रोगांचे मूळ शोधण्यात संशोधक यशस्वी झाले. रोगोपचारपध्दतीत प्रगती झाली. वैद्यकीय तंत्रज्ञानातील अत्याधुनिक संशोधनामुळे नवीन वैद्यकीय यंत्रसामग्री बाजारात येऊ लागली. यामुळे डॉक्टर्सना अचूक रोगनिदान करणे शक्य होऊ लागले. नवनवीन औषधामुळे रोगोपचारपध्दतीत फार मोठा बदल झाला. लशीकरणामुळे काही रोगाणूपासून जगाला मुक्ती मिळाली. माणसांच्या सरासरी आयुष्यात लक्षणीय प्रमाणात वाढ होऊ लागली. कुपोषण, बालमृत्यु, मातामृत्यु यात लक्षणीय प्रमाणात घट झाली. जीव भौतिकी व जीव रसायनशास्त्रातील संशोधनातून जैव तंत्रज्ञान विकसित झाले व या क्षेत्रातील संशोधनाचा वेग अजूनही वाढतच आहे.

जनुकीय तंत्रज्ञानातील ही भरभराटी अनेक नवीन प्रश्नांना जन्म घालत आहे. जनुकं खरोखरच स्वार्थी आहेत का? अवयवारोपणासाठी क्लोनिग तंत्रज्ञानाला प्रोत्साहन द्यावे की नको? वैगुण्यरहित माणसांची पिढी तयार करणे शक्य होत असल्यास स्टेम सेल संशोधनावर बंदी का घातली जात आहे? माणसंच्या दीर्घायुष्यासाठी प्रयत्न करणाऱ्या संशोधनामुळे काही नवीन समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे का? माणसामधील पेशी, पेशीमधील जनुकं इत्यादी भौतिक नियमानुसार कार्य करत असल्यास माणसाच्या स्वातंत्र्याला काही अर्थ असेल का? आयुष्यातील सर्व घटना पूर्वनिर्दिष्ट असल्यास माणसांच्या प्रयत्नांना काही अर्थ असेल का? अशा प्रश्नांची उत्तरं शोधली जात आहेत. व जग त्यानुसार बदलत आहे. म्हणूनच अजूनही हे पुस्तक जगाला मार्गदर्शी ठरत आहे.

****
समारोप

पुस्तकामुळे जग बदलू शकते, हे कदाचित अनेकांना खुळचटपणाचे वाटू शकेल. लाखो वर्षापूर्वी लघुग्रहांच्या माऱ्यापुढे डायनासॉरसारखे प्रचंडकाय प्राणी निर्वंश झाले व जगाचा चेहरामोहरा बदलला, हे आपण समजू शकतो. कारण त्यामुळे मनुष्यप्राण्यासकट इतर सस्तनी प्राण्यांना जिवंत राहाण्यासाठी अवकाश मिळाला. प्रचंड प्रमाणात हिमवर्षाव झाल्यामुळे जग बदलले असेल याची आपण कल्पना करू शकतो. जागतिक तापमानवाढीमुळे जगाचे व्यवहार बदलू शकतील याची आपल्याला समज आहे. अमेरिका, फ्रान्स, रशिया, क्यूबा, चीन इत्यादी देशातील रक्तक्रांतीमुळे जगरहाटीत बदल झाला याची आपल्याला जाणीव आहे. पहिल्या व दुसऱ्या जागतिक युध्दानंतर विश्वशांतीसाठी प्रयत्न होत आहेत व युध्द नको ही मानसिकता मूळ धरू पाहत आहे, याची पण आपल्याला जाण आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे माणसांचे आयुष्य वाढले आहे, उपभोगवाद उच्चांक गाठत आहे, खेडी ओस पडत आहेत, शहरं बकाल होत आहेत, इत्यादी अनेक गोष्टींचे आकलन सोपे आहे. परंतु पुस्तकामुळे जगाचा चेहरामोहरा पालटला, किंवा पालटू शकतो, पुस्तकं जग बदलण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात, पुस्तक उत्प्रेरकाची (कॅटलिस्टची) भूमिका बजावू शकतात, लिखित/मुद्रित शब्दांमध्ये एवढी ताकद असू शकते, याबद्दल अनेकांच्या मनात शंका असू शकतील.

जगाविषयीच्या जाणीवा रुंदावण्यासाठी पुस्तकं वाचकासमोर नेमक्या माहितीचा डोंगरच उभे करू शकतात, पुस्तकं आपल्या अभिरुचीची गुणवत्ता वाढवतात, आपल्यात सुधारणा घडवून आणू शकतात, आपल्याला संवेदनशील बनवू शकतात, विवेकी बनवू शकतात, प्रसंगी हसवतात, रडवतात, भावनावश करतात, मनोरंजन करतात, जगण्यासाठी बळ देतात, उत्कंठा वाढवतात, विचार करायला लावतात, वर्तणुकीत बदल घडवतात, एकटेपणात मित्राची भूमिका वठवतात, मार्गदर्शी होतात, अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मदत करू शकतात व (काही वेळा!) नीतीचे, उपदेशाचे डोस पण पाजतात. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर पुस्तकांचे ॠण फेडणे अशक्यातली गोष्ट ठरेल. त्याच वेळी अजून थोडयाशा खोलात जावून विचार करू लागल्यास मानवतेला आकार देणारे, मानवी वंशाची पुनर्रचना करणारे, मानवी प्राण्याचे उन्नयन करणारे व मानवतेच्या श्रध्दा-सिध्दांतांचे कर्ते करवते पण पुस्तकच आहेत.

परंतु जग बदलू शकलेल्या निवडक पुस्तकांची सर्वसंमत यादी करणे फार जिकिरीचे ठरू शकेल. परिस्थितीचा रेटा व कालमान स्थिती-गतीमुळे प्रत्येक समाजगटाचे प्रश्न व अग्रक्रम बदलत जातात. एका समाजगटाला अत्यंत निकडीच्या वाटणाऱ्या समस्या व त्या समस्यांचे साधक बाधक विश्लेषण करणारी पुस्तकं दुसऱ्या गटाला तितके महत्वाचे वाटणार नाहीत. भाषा, भौगोलिक परिस्थिती, जोपासलेली संस्कृती, रूढी-परंपरा इत्यादीमुळे जग वैविध्यपूर्ण आहे व याच विविधतेमुळे अस्मितेचा प्रश्न मूळ धरू पाहत आहे. माणसा-माणसात भेद करणाऱ्या अनेक संकल्पना जगभर पसरलेल्या आहेत व अशा संकल्पनांशी टक्कर देणे तितके सोपे नाही. तरीसुध्दा जगभरातील अनेक दूरदर्शी तत्ववेत्त्यांनी वेळोवेळी समाजाला वेगळे वळण देण्याचे प्रयत्न केले आहेत व त्यासाठी त्यांनी खस्ता खाल्ल्या आहेत.

एकविसाव्या शतकाच्या उंबरठयावरून मागे वळून पाहताना अखंड जगाला समावून घेतलेल्या व जग बदलू पाहणाऱ्या अशा काही तत्त्वज्ञांनी लिहिलेल्या पुस्तकांच्याबद्दल माहिती देण्याचा हा प्रयत्न होता. कदाचित 'ऐसी'वरील चोखंदळ वाचकांना पुस्तकाबद्दलची माहिती आवडली असावी!!

समाप्त…
1.....प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका
2..... ऑन दि ओरिजिन ऑफ स्पीसीज
3..... एक्स्पिरिमेंटल रिसर्च इन इलेक्ट्रिसिटी
4…. ऑन दि अबॉलिशन ऑफ स्लेव्ह ट्रेड
5…..ए विंडिकेशन ऑफ दि राइट्स ऑफ वुमन
6…..मॅग्नाकार्टा
7……वेल्थ ऑफ नेशन्स
8……पेटंट स्पेसिफिकेशन फॉर आर्कराइटस् स्पिन्निंग
9… दास कॅपिटल

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet