मार्क्ड सेफ फ्रॉम कोव्हिड

मार्क्ड सेफ फ्रॉम कोव्हिड
डॉ सुषमा दाते, पुणे

पुणे येथील डॉ. जयदीप व डॉ. सुषमा दाते यांना नुकताच कोव्हिड होऊन गेला. जनमानसातील भीती कमी करण्यासाठी लिहिण्याची अनेक परिचितांनी विनंती केल्याने त्यांच्या या अनुभवाविषयी डॉ सुषमा यांनी लिहिले आहे.

जयदीपला बहुतेक कोणा OPD रुग्णाकडून लागण झाली असावी. त्याची सुरुवातीची लक्षणं होती थकवा, प्रचंड शीण आणि स्नायुदुखी. पहिले १० दिवस ताप वा कफ नव्हता पण कोव्हिड असू शकतो या भीतीने तो पहिल्या दिवसापासूनच घरातल्या एका खोलीत वेगळा राहत होता. तो दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या कोव्हिड टीमच्या सतत संपर्कात होता आणि त्यांनी त्याला हे कोव्हिड असल्याचे गृहीत धरून चालायला सांगितलं होतं. ताप आला किंवा लक्षणं बळावली तरच चाचणी करायला ये, तोवर विलगीकरणात राहा, असं त्यांनी सांगितलं होतं.

जयदीप आजारी पडला त्या दिवसापासूनच आम्ही आमच्या नर्सिंग होममध्ये रुग्ण दाखल करणं थांबवलं होतं. जे दोन रुग्ण दाखल होते त्यांना तातडीने डिसचार्ज दिला. आमचं घर नर्सिंग होमच्या वरच आहे आणि दोन्हीचं प्रवेशद्वार एकच आहे त्यामुळे आम्हाला अगदी मोजक्या कर्मचाऱ्यांसह जागा उघडी ठेवावी लागली. घरातील मदतनिसास येऊ नको असं सांगितलं (दुसरी मदतनीस तिची वस्ती बंद केल्याने येतच नव्हती) मी फक्त आमच्या कुत्र्यांना फिरवण्यापुरती घराबाहेर पडत होते, बाकी घरातच होते.

चौथ्या दिवसापासून आठव्या दिवसापर्यंत हळूहळू जयदीपला बरं वाटू लागलं. इतकं की हा कोव्हिड होता का, याविषयीच आम्हाला शंका वाटू लागली. आपण उगीच घाबरलो असं म्हणत मी तर त्या वीकेंडला कुत्र्यांना घेऊन आमच्या शेतघरावरही जाऊन आले. मात्र त्याच रात्री मला कोरडा खोकला सुरू झाला, पण तो सुरुवातीला इतका कमी होता की मला वाटलं नेहमीप्रमाणे मला ॲसिडिटी झाली असावी. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा ताप आला तेव्हा आम्हाला दोघांनाही कोव्हिड झाल्याचं मला कळून चुकलं. अंगात कणकण असतानाच मी गाडी चालवत घरी आले आणि जयदीप आणि कुत्रे यांच्यासोबत स्वतःला विलग करून घेतलं. माझा ताप त्या रात्री वाढला पण १०१oF च्या वर कधीच गेला नाही. कोरडा खोकलाही वाढला. आम्हा दोघांनाही भूक नव्हती आणि मला वास येणं बंद झालं होतं. (anosmia)

दुसऱ्या दिवशी मात्र – म्हणजे जयदीपसाठी तो आठवा दिवस होता – परिस्थिती एकदम बदलली. सोमवारी सकाळी जयदीप उठला तेव्हा त्याला बरं वाटत होतं नेहमीसारखं, पण सकाळी आठच्या सुमारास त्याला कसं तरी वाटायला लागलं. नक्की काय होतंय ते त्याला सांगता येईना फक्त छातीत जरा दडपल्यासारखं वाटतंय, असं म्हणाला. आम्ही आमच्या oxygen saturation levels सतत portable pulse oximeter ने तपासत होतो, आणि दीनानाथच्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार ३ मिनिटं चालल्यानंतरही त्या ९७%च्या खाली गेल्या नाहीत (९३%च्या खाली जाणं धोकादायक असतं). त्याची अस्वस्थता कायम राहिल्याने त्याचे मित्र घरी आले आणि त्याला दीनानाथच्या emergency roomला (ER) घेऊन गेले. तिथे रक्त, छातीचा xray आणि २D इको या चाचण्या केल्या. सगळं व्यवस्थित होतं फक्त inflammationमुळे रक्तात होणारे बदल दाखवणारे आकडे वाढलेले होते. त्यामुळे नक्की काय ते तपासण्यासाठी छातीचा CT स्कॅन केला आणि त्यात या विषाणूचा गनिमी काव्याने हल्ला करण्याचा स्वभाव दिसून आला. या स्कॅनमध्ये त्याच्या फुफ्फुसांमध्ये थोडी लागण झालेली दिसली. आता कोव्हिडवर शिक्कामोर्तब झाले आणि पुढची प्रक्रिया त्यानुसार सुरू झाली. प्रथम त्यांनी त्याला अतिदक्षता विभागात ठेवायचं ठरवलं (याला डॉक्टर्स सिंड्रोम म्हणतात) पण त्याची गरज नसल्याचं ठरलं. त्याला IVमधून Methylprednisolone (कोव्हिडमुळे येऊ शकणारं cytokine storm टाळण्यासाठी देण्यात येणारं एक स्टेरॉईड) पहिला डोस देण्यात आला आणि एका स्वतंत्र खाजगी खोलीत हलवण्यात आलं.

इथे घरी बसून मी काय ऐकायला मिळतंय याची चिंता करत वाट पाहत होते. आम्ही आमच्या अति-चळवळ्या कुत्रीला बावधनला एका मित्राच्या पाळीव प्राण्यांच्या बोर्डिंगमध्ये सोडायचं ठरवलं होतं, त्यामुळे अंगात ताप असतानाही मी तिला पटकन अंघोळ घातली, तिच्यावर जंतुनाशक फवारलं नि खाली पाठवलं. माझ्या ड्रायव्हरने आधी सांगितल्यानुसार तिच्यासाठी नवा पट्टा आणला होता, तो घालून तो तिला सोडून आला. तो परत येईस्तो जयदीपच्या मित्रांचे मला तो बरा असल्याचे सांगणारे फोन आले. तो स्टेरॉइडला चांगला प्रतिसाद देतोय, असंही ते म्हणाले. मलाही हॉस्पिटलला यायला त्यांनी सांगितलं. खरं तर मला ॲडमिट व्हायची गरज नव्हती पण एका स्वतंत्र खोलीत एकच रुग्ण ठेवण्याऐवजी दोन रुग्ण राहिलेले बरे असा विचार त्यांनी केला होता. आम्ही दोघं कोव्हिड इमारतीत होतो. आता मागे वळून पाहताना मला वाटतंय की मी ॲडमिट झाले ते बरंच झालं, कारण मला पुढचे काही दिवस सक्तीचा आराम मिळाला, जो कुत्रे आणि घरकामामुळे घरात कदापि शक्य नव्हता.

माझी लक्षणं सुरू झाली त्याचा तो चौथा दिवस होता, माझा ताप / खोकला कमी असला तरी मला अतिशय थकवा आणि अशक्तपणा आला होता. मी त्याही अवस्थेत अर्ध्या तासात घर साफ केलं, कुत्र्यांची सोय लावली, मी आणि जयदीप दोघांचं सामान बांधलं आणि गाडी चालवत दीनानाथ emergency roomला पोचले. दोन हॉस्पिटल कर्मचारी, ड्रायव्हर, आणि घरातली मदतनीस यांनी आळीपाळीने कुणी हॉस्पिटलात, तर कुणी घरी कुत्र्यांसाठी राहायची तयारी दाखवली होती. त्यामुळे मनावरचं एक मोठं दडपण सरलं होतं. (पाळीव प्राणी असलेल्यांसाठी सूचना – कुत्रे वा मांजरांना कोव्हिड होत नाही, वा त्यांच्यामुळे लागणही होत नाही. पुरावा हवा असल्यास माझा आहेच.)

Covid ERमध्ये प्रचंड धावपळ होती! प्रत्येक बेडवर / cubicleमध्ये भयंकर खोकणारे रुग्ण होते. डॉक्टर आणि नर्स मात्र शांतपणे आणि नम्रपणे ही परिस्थिती हाताळत होते. डॉक्टरांना छळणाऱ्या व्यक्तींना यापुढे Covid ERच्या आत एक दिवसभर उभं राहायची (तेही PPE सूट न घालता) शिक्षा द्यायला हवी. म्हणजे त्यांना कळेल की हे लोक कोणत्या परिस्थितीत त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात. एक तासभर माझ्या चाचण्या होईस्तो मी तिथे होते, मग जयदीपच्या खोलीत गेले. PCR चाचणीसाठी आमच्या घशाचे swabs त्याच दिवशी पाठवले होते, त्याचे रिपोर्ट दुसऱ्या दिवशी positive आले. आपण कोव्हिड रुग्ण आहोत हे आम्ही तोवर मनातल्या मनात स्वीकारलं होतंच, त्यामुळे काही धक्काबिक्का बसला नाही. (आम्ही दोघं पन्नाशीत आहोत आणि आम्हाला इतर कोणतेही गंभीर आजार नाहीत.)

Doctors and Healthcare workers
छायाचित्र प्रातिनिधिक; आंतरजालावरून साभार.

पुढचे दोन दिवस शांततेत गेले. माझी लक्षणं हळूहळू मावळत गेली, पण थकवा मात्र होता. जयदीपलाही खूपच बरं वाटत होतं. त्याला तीन दिवस IVमधून Methylprednisolone द्यायचं होतं आणि त्यानंतर आम्हाला घरी सोडतील, घरी विलगीकरण करा, असं सांगितलं होतं. रणजितने त्याची fire stick पाठवून दिली होती, त्यामुळे वेळ घालवायला आम्ही नेटफ्लिक्सवर Charité at War ही अप्रतिम जर्मन मालिका पाहत होतो. दीनानाथची कोव्हिड टीम (इन-चार्ज डॉक्टर, intensivist and IDH specialist ) आम्हाला रोज येऊन पाहत होते आणि नर्सेस दर चार तासांनी आमच्या vitals तपासत होत्या. गुरुवारी घरी जाण्याच्या दृष्टीने मी आमचं सामान भरायला घेतलं होतं तेव्हाच जयदीपला एकदम थंडी वाजून ताप भरला. हे इतकं अचानक आणि अनपेक्षित होतं की मला प्रचंड टेन्शन आलं. intensivistच्या म्हणण्यानुसार ही inflammatory reaction होती – म्हणजे विषाणूचा प्रादुर्भाव टिकला नसावा, पण शरीर अँटीबॉडीज तयार करत असल्याचं हे लक्षण होतं आणि काळजीचं काहीच कारण नव्हतं. मात्र ताप पूर्ण उतरेपर्यंत आणखी दोन दिवस हॉस्पिटलातच राहायचा सल्ला त्याने दिला.

शनिवारी सकाळी (जयदीपसाठी तेरावा तर माझ्यासाठी नववा दिवस) आम्हाला डिस्चार्ज मिळाला. हातावर quarantine stamp मारला होताच (जो एकदा पाणी लागल्यावर धुतला गेला!). दीनानाथपासून आमचं घर १० मिनिटांवर आहे, पण तेवढी गाडी चालवूनही मी प्रचंड थकून गेले. आमच्या स्टाफने घर निर्जंतुक करून ठेवलं होतं आणि साफसफाई करून ठेवली होती त्यामुळे नशिबाने मला गेल्या गेल्या ते काम करावं लागलं नाही. कुत्रे आम्हाला बघून अर्थात अत्यंत खुश झाले आणि आम्हालाही घरी आल्याचा आनंद झालाच. त्या दिवशी जेवण आणि झोप याव्यतिरिक्त काहीही करण्याची शक्ती नव्हती पण रविवारी आम्हाला खूपच बरं वाटत होतं.

जयदीपचं quarantine उद्या संपतंय आणि मला आणखी काही दिवस आहेत. थोडा अशक्तपणा सोडला तर आम्ही ठीक आहोत. मला अजूनही भूक नाही आणि वासही येत नाहीये पण ते हळूहळू जाईल. नशिबाने जयदीपला लक्षणं दिसू लागली तेव्हाच मी घरी डबा लावला होता त्यामुळे मला स्वयंपाक करायची गरज नव्हती. माझ्या ड्रायव्हरने माझ्या आईशी बोलताना म्हटलं की सर जरा हडकलेले दिसतात. तेव्हापासून मित्रमंडळी आणि नातलग यांनी भरपूर डबे पाठवायला सुरुवात केली. टाळेबंदी संपेपर्यंत पुरेल इतकं अन्न सध्या माझ्या फ्रिजमध्ये आहे. माझ्यात घरातली लहानसहान कामं करण्याची शक्ती आली आहे. आमची चळवळी कुत्री परत आली आहे, घर घरासारखं वाटू लागलं आहे.

आम्ही निर्जंतुकीकरणाची पुरेपूर काळजी घेत आहोत. वर घरी यायचं झालं तर स्टाफ N ९५ मास्क आणि ग्लव्स वापरत आहेत (अजून आत प्रवेश नाही कोणालाच) आम्ही अर्थात फोन किंवा इंटरकॉमवरून बोलतोय. ते आवश्यक वस्तू दाराबाहेर ठेवलेल्या एका मोठ्या पिशवीत ठेवतात आणि तिला हात न लावता मी त्या वस्तू काढून घेते. घरातून जो काही कचरा वगैरे बाहेर जातो त्यावरही निर्जंतुक औषध फवारलेलं असतं. जी व्यक्ती ते घेऊन जाते तिने ग्लव्स घातलेले असतात. कुत्र्यांचे गळपट्टे हॉस्पिटलमध्ये ठेवले आहेत आणि त्यांची फिरायची वेळ होते तेव्हा मी त्यांना दार उघडून बाहेर जाऊ देते. स्टाफपैकी कोणीतरी त्यांना फिरवून आणतं आणि वर पाठवतं.

काहीतरी गडबड जाणवल्या क्षणी जयदीप विलग झाला होता (त्याला सर्वसाधारण दिसणारी लक्षणं कधीच नव्हती) आणि मला ताप आल्यावर मीही विलग झाले. त्याच्यासाठी हा १६वा दिवस आहे, माझ्यासाठी १२वा. आमच्या स्टाफपैकी एकही व्यक्तीला कोणतेही लक्षण नाही. जयदीपने एका व्यक्तीला infect केलं, मी एकही नाही. राष्ट्रीय आकडेवारीतला R० कमी करण्यात माझा असाही हातभार!

हा सगळा प्रवास फार चिंतेचा होता, पण आता आम्ही त्यातून बाहेर आलो आहोत. ८० %हून अधिक कोव्हिड रुग्णांना सौम्य लक्षणं असतात, आम्ही त्यातच होतो. सगळ्यात कठीण होतं या काळात आनंदी राहणं, खासकरून घरातल्या कोणाचा फोन आल्यावर. मुलं दिवसातून अनेक वेळा फोन करत. अश्विन तर रोज २ विडिओ कॉल लावायचा कारण आम्ही खरं सांगत नाहीयोत, अशी भीती त्याला वाटत होती. या कॉलच्या वेळी आम्ही छान ताजतवानं दिसणं आवश्यक होतं. खोकल्याची उबळ आली तरी ती दडवावी लागत होती आणि कपाळाला हात लावणं दूरच होतं कारण मग प्रश्नांची सरबत्ती सुरू होई. दीनानाथमध्ये आमची उत्तम काळजी घेण्यात आली, आमची खूप डॉक्टर मित्रमंडळी आणि कुटुंबीयही सतत आधार देत होते तरीही हा काळ अतिशय एकटं वाटणारा होता. जी थोडीफार माणसं आम्हाला हॉस्पिटलमध्ये दिसत होती ती सगळी पूर्ण PPE घालून होती म्हणून असेल कदाचित. कोव्हिड हॉस्पिटलमध्ये बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला अजिबात प्रवेश नसतो. नशिबाने आम्ही दोघं सोबत होतो, आणि अर्थातच नेटफ्लिक्स होतं!

तर यातून काय शिकता येईल?

 1. कोव्हिड हे न्यू नॉर्मल आहे, त्यासाठी तयार राहा. हे ताप, कफ, सर्दी या स्वरूपात नसेलही. ज्या क्षणी आजारी वाटेल त्या क्षणी विलग व्हा आणि घरातल्या ज्येष्ठ नागरिकांना जपा.
 2. लक्षणं दिसू लागल्याच हॉस्पिटलमध्ये ३-४ दिवस लागतील अशा वस्तू एका बॅगमध्ये भरून ठेवा. तुमची लक्षणं सौम्य असण्याची शक्यता आहे पण या आजारात काही तासांत प्रकृती बिघडू शकते, त्यामुळे तयारीत राहणे उत्तम. पाचव्या दिवसापासून दहाव्या दिवसापर्यंत जरा काळजीचा काळ असतो.
 3. घरी जेवणाच्या डब्याची सोय करून ठेवा, या आजारपणात स्वयंपाक करणं फार जड जाऊ शकतं.
 4. पाळीव प्राणी असतील तर त्यांची काळजी घेणारी माणसं कोणत्याही क्षणी येऊ शकतील अशी तरतूद करून ठेवा.
 5. शक्य असल्यास, आताच, घरातली कामं करायच्या यंत्रांमध्ये गुंतवणूक करा - डिशवॉशर, व्हॅक्युम क्लीनर, वगैरे. अशा कठीण दिवसात ही यंत्रं फार कामास येतात.
 6. तुम्ही हॉस्पिटलात गेलात किंवा विलगीकरण करावं लागलं तर वाणसामान, जेवणाचे डबे वगैरे आणून देतील, छोटीमोठी कामं करतील अशी माणसं शोधून ठेवा.
 7. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घाबरून जाऊ नका किंवा इतरांनाही भयग्रस्त करू नका. हा आजार असा आहे की त्यासोबतच आपल्याला जगावं लागणार आहे. आज ना उद्या तो नियंत्रणात येईलही. तोवर सर्व प्रकारची काळजी घ्या, आवश्यक नसेल तर खूप जण एकत्र येऊ नका, घरातल्या अधिक धोक्याच्या माणसांना सांभाळा, आणि शक्य तितक्या सामान्यपणे दैनंदिन आयुष्य सुरू ठेवा. लस किंवा herd immunity कधी ना कधी मिळणारच आहे.

---
1. [Doctor's Syndrome - स्वतः आजारी पडलेल्या डॉक्टरला वाटू लागतं की पुस्तकात दिलेली सगळी लक्षणं त्याच्यात दिसतायत. आणि त्या डॉक्टरवर उपचार करणाऱ्या डॉक्टरला वाटतं की एक काळजी म्हणून याच्यावर उपलब्ध असलेले सगळे उपचार करायला हवेत.
]

मूळ फेसबुक पोस्ट इथे
भाषांतर - म्रिन
भाषांतर 'ऐसी अक्षरे'वर प्रकाशित करण्याची परवानगी दिल्याबद्दल डॉ. सुषमा व डॉ. जयदीप दाते यांचे आभार.

field_vote: 
0
No votes yet

हे चांगलं केलंत.
---------------------------
इथला प्रतिसाद 'बखर कोरोनाची भाग ६' धाग्यात फिरवला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनुभव खूपच उपयोगी आहेत. पण मनांत एक प्रश्न येतो. ज्यांची कुठल्याही हॉस्पिटलमधे ओळख नाही, जे स्वत: डॉक्टर नाहीत, अशांना सद्य परिस्थितीत दीनानाथ सारख्या हॉस्पिटलमधे सहज प्रवेश मिळतो का ?
तसं नसेल तर भीति वाटणं स्वाभाविक आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ज्यांची कुठल्याही हॉस्पिटलमधे ओळख नाही, जे स्वत: डॉक्टर नाहीत, अशांना सद्य परिस्थितीत दीनानाथ सारख्या हॉस्पिटलमधे सहज प्रवेश मिळतो का ?
तसं नसेल तर भीति वाटणं स्वाभाविक आहे.

एक लक्षात घ्यायला हवं. त्यांना आयसीयू किंवा व्हेंटिलेटर वगैरे काहीच लागलं नाही (बऱ्याच लोकांना नाहीच लागत). केवळ योग्य चाचण्या आणि निदानानुसार औषधं एवढंच लागलं. तत्त्वतः ते पुष्कळ ठिकाणी (किंवा घरच्या घरीही) मिळू शकेल. वेळेत वैद्यकीय सल्ला आणि निदान मात्र मिळायला हवं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

इतर लोकांचे अनुभव आणि या डॉ. दंपतीचे अनुभव यांत बराच फरक आहे. स्वत: डॉ. असणे आणि त्यामुळे हॉस्पिटल मध्ये ओळख असणे याचा नक्कीच फरक पडतो. सामान्य माणसाला इतक्या त्वरेने उपचार मिळत नाहीत. बेड मिळण्यासाठीही वाट बघावी लागते. पेशंटला बघायला, दिवसभरांत जितका स्टाफ येईल तितक्या पीपीई किटसचे प्रत्येक दिवसाचे पैसे त्याच्या बिलात लागतात. अशा सर्व चार्जेसची टोटल मग अनेक लाखांत जाते. त्याचं टेन्शन प्रत्येक मध्यमवर्गीयाला आहे. त्याऐवजी सरकारी इस्पितळात गेले तर जी हेळसांड होते ती तर अंगावर काटा आणणारी आहे. पेशंट वाचवायचा असेल तर त्याला लागणारी रेमडेसीवीर सारखी इंजेक्शन आणण्याची जबाबदारी पेशंटच्या नातेवाईकांवरच टाकली जाते. आणि मग त्या धावपळीत नातेवाईकांना ते काळ्याबाजारातून आणावे लागते.
रोजच्या रोज अशा भयकथा मिडियातून आणि प्रत्यक्ष अनुभवातून कानावर येत आहेत. त्यामुळे त्या रोगापेक्षा वा मरणापेक्षा, या सगळ्या प्रकारांचीच जनमानसांत भीति बसली आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पेशंटला बघायला, दिवसभरांत जितका स्टाफ येईल तितक्या पीपीई किटसचे प्रत्येक दिवसाचे पैसे त्याच्या बिलात लागतात.

अमेरिकेतल्या बातम्या वाचून माझा असा समज की प्रत्येक शिफ्ट सुरू होताना वैद्यकीय कर्मचारी जे पीपीई अंगावर चढवतात, ते शिफ्ट संपल्यानंतरच उतरवतात. असंच वर्णन दिल्लीच्या एका डॉक्टरच्या लेखातही वाचलं होतं. (तिनं ते किट अंगावर चढवल्यानंतर पाळी सुरू झाली; आणि 'बरं मग' असं म्हणत, स्वतःच्या शारीरिक गैरसोयींकडे दुर्लक्ष करून, पीपीईची "सोय" वापरत दिवसभर काम केलं, असा लेख होता.) प्रत्येक शिफ्टमध्ये हे लोक एकापेक्षा जास्त रुग्णांची काळजी घेत असणार.

तरीही तुम्ही लिहिलंय तशा प्रकारानं चढं बिल लावतात का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तांत्रिकदृष्ट्या, ग्लोव्ह्ससुद्धा PPE मध्ये मोडतात, आणि हेल्थ केअर वर्करने सर्जरी/ ट्रीटमेंट प्रोसिजर केल्यास दोन पेशंट्सच्यामध्ये बदलावे लागतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The Journey Is the Reward...

तरीही तुम्ही लिहिलंय तशा प्रकारानं चढं बिल लावतात का?

होय, तशी बिलाची फोटोकॉपीच बघण्यांत आलीये. हे सर्वच हॉस्पिटल्स मध्ये चालत असेल असा माझा दावा नाही.
कोरोना पूर्वीचा हॉस्पिटलांचा अनुभवही कधीच चांगला नव्हता. माझे आप्तस्वकीय शेवटच्या आजारात ट्रीटमेंट घेत असताना, ज्या डॉक्टरांच्या देखरेखेखाली ते होते, त्याव्यतिरिक्त इतर अनेक फॅकल्टीच्या डॉक्टरांनी व्हिजिट फी लावली होती(आमच्या डॉक्टरांनी रिफर केलेले नसतानाही) आणि त्याचे पैसे त्यासंबंधित डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाऊन, मला कॅशने द्यावे लागले होते. भारतातील नावाजलेल्या हॉस्पिटल्स मध्ये काय चालते, यावर बरेच काही लिहिता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धंधासुद्धा आहे हो. इन्वेस्टरने आपल्या जागेत चालवलेले दुकान म्हणावे. दोन ठिकाणी पाहिले की डॉक्टराचे सर्टिफिकेट नाही, पाटी नाही, आतल्या रिसेप्शनच्या ठिकाणी नावगाव नाही. सर्व क्याशच घेऊन एका चिटोऱ्यावर लिहून ठेवलेले. आता काही पेशंट्सना असेच हवे असणार.
आपण त्यात पार्टी नसताना कशाला बोंबला हे आहेच. सेवा घेणाराच तयार तर संपलंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

https://scroll.in/article/966644/in-india-black-markets-for-tocilizumab-...
अर्थात वरील प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे, हे खरंच लागण्याची शक्यता फारच कमी लोकांमध्ये आहे. त्यामुळे आठ लाख वगेरे (ऐकीव) आकडे चुकीचे नाहीत, पण अपवादात्मक आहेत.
PPE kit ची किंमत त्यामानाने आता नगण्य आहे. तरीही एकेकाळी ५० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळणारा N95 मास्क २५० रुपयांपेक्षाही जास्त किमतीला हॉस्पिटलला ( बल्क पर्चेस असूनही) विकण्याची किमया डिलर्सनी मार्च-एप्रिल मध्ये केली होती. तसंच, वारंवार आवाहन करूनही ह्यासाठी मूल्य नियंत्रणाचा कोणताही प्रयत्न सरकारने केला नाही. https://www.google.com/amp/s/m.timesofindia.com/india/govt-warns-against...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The Journey Is the Reward...

हे वाचून उलट भीती वाढते.
1. दोघेही डॉक्टर आहेत. उच्चमध्यमवर्गीय. (घर सांभाळायला दोन मदतनीस, कुत्री, फार्महाउस, ड्रायव्हर इत्यादी उत्यादी. ह्या तपशिलांची काय गरज होती कुणास ठाऊक)
2. मंगेशकरच्या 8 लाखांच्या सांगोवांगी ऐकलेल्या आकड्याने आधीच हाय खाल्ली आहे. तिथेही प्रवेशाची बोंबाबोंब असणार. त्यांना तर अगदी सहज प्रवेश मिळाला आहे.
3. मानवांच्या सतत संपर्कात राहून सुद्धा यांना एकटेपणा वाटत होता. कुत्र्यांचीही उत्तम सोय लावून त्यांचेही सलग स्टेटस येत असणार. बालेवाडी कोविड सेंटरच्या विलगीकरणात असलेल्या लोकांनी तिथल्या प्रचंड धोकादायक आणि भोंगळ कारभाराला वैतागून राडा केल्याचा व्हिडीओ नुकताच पाहिला. तो बालेवडीचाच असेल का ते ठाऊक नाही, परंतु तो कुठलाही असला तरी तेवढाच भीतीदायक आहे. त्यामुळे भीती ग्राफ चढताच आहे.
4. मागच्या आठवड्यात एक 45 वर्षाची ओळखीची व्यक्ती अचानक हार्ट अटॅक ने मेली. कोणतीही टेस्ट वगैरे ना होता लोकांनी मूठमाती दिली. नंतर त्या व्यक्तीच्या मुलाला श्वसनाचा त्रास झाल्याने त्याची टेस्ट केल्यावर तो पॉसिटीव्ह आला. ओळखीच्याच, lockdown मध्ये फिरून गुटखा विकणाऱ्याचे अचानक हाल हाल होऊन मृत्यू झाला. त्याचीही कोणतीही टेस्ट झाली नाही. कोणत्याही हॉस्पिटलने त्याला प्रवेश दिला नाही.
5. बऱ्याच जणांकडे oxymeter नाहीत. आता ते लवकर मिळणारही नाहीत.
6. quarantine केलेल्या ओळखीच्या अनेक लोकांना शाळांमध्ये लग्नाच्या हॉल मध्ये वगैरे ठेवलं होतं. गावाकडच्या ओळखीच्या एकाच कुटुंबातल्या 15 जणांचा अहवाल पॉसिटीव्ह आला तरी एकालाही कोणतेही चिंताजनक लक्षण नव्हते. हे आजोळी. चांगलं खाणं, उत्तम हवा आणि शेतकरी कुटुंब असल्याने सगळे धडधाकट. त्यांना अहवालानंतर सांगलीला हलवलं. सगळ्यांची एक साधी विनंती होती. आधीच्या विलगीकरणात अंघोळीला निदान कोमट पाणी तरी द्या म्हणून. corona से नाही, quarantine से डर लगता है असं चाललं होतं.
7. एका मित्राची होणारी बायको बदलापुरात गेली. मित्राची मिरजेला कृपामईत नेऊन टाकावे अशी बेक्कार हालत झाली होती.
8. एकीकडे खूप बेफिकिरी आणि दुसरीकडे हे असं. एकंदरीत ह्या व्हायरसचा घाला कोणाला कधी अचानक गोत्यात आणेल ते सांगता येत नाही.

 • ‌मार्मिक5
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

निल , तू लिहिलेलं खरं आहे , परंतु या अनुभवामुळे भीती का वाढावी हे कळेना .बाकी oxymeter सहज उपलब्ध आहे एवढे सांगून मी खाली बसतो.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकाच अनुभव दुसऱ्याला लागू पडेल असे काही नाही.
आता पर्यंत काही corona positive पाहण्यात आले.
1) corona report negetive pan sarv lakshan corona chi.
उपचार पण तेच सहा दिवस हॉस्पिटल मध्ये 150000 लाख बिल .
फॅमिली मधील कोणालाच कसलेच संक्रमण नाही.
2) थोडे गंभीर लक्षण व्हेंटिलेटर च वापर साडे सहा लाख बिल तरी शेवटची टेस्ट positive.
शेवटी bmc hospital madhye upchar
आणि corona mukti
Family madhye कोणीच संक्रमित नाही.
3) कसलीच गंभीर लक्षण नाहीत तीन दिवसात घरी

असे वेगवेगळे अनुभव येतात.
पण एक अनुभव समान आहे हॉस्पिटल च बिल कमीत कमी दीड लाख ते जास्तीत जास्त 6 लाखाच्या पुढे किती ही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

जे काही ऐकलंय / वाचलंय त्यावरुन :
१. करोना एकतर अत्यंत साध्या उपचाराने बरा होतो. गरम पाणी/ वाफ़ आणि घरगुती औषधे.
२. किंवा अत्यंत महागड्य़ा ( आकडे १५-२० लाखांचेही ऐकले आहेत.) उपचाराने बरा होतो.
३. अन्यथा पेशंट दयनीय स्थितीत दगावतो.
४. वृद्ध/ ईतर गंभीर आजार असणारे तर नक्कीच मृत्युमुखी पडतात असा समज आहे.

दुर्दैवाने अनेक डॉ. चे अनुभव तसेच ईतरांचे काही खुप चांगले/ काही खुप वाईट अनुभव ऐकुन वाचुन सुद्धा अजुनही करोनाची लक्षणे दिसताच नक्की काय करावे हे निश्चीत माहीत नाही. कोणी अनुभवी डॉ. ने एक चेकलिस्ट बनवुन द्यावी.
हे खुप महत्वाचे आहे कारण करोनाचे संक्रमण वाढते आहे. ईस्पीतळांत जागा मिळण्याची तसेच तेथेही योग्य उपचार मिळतील याची खात्री नाही. तसंही या वर कोणताच खात्रीलयक उपचार नसावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भीतीचे एक कारण असेही आहे की, चार पाच दिवस अत्यंत सौम्य लक्षणे दाखवून एकाएकी हा आजार गंभीर रूप धारण करू शकतो. आणि ते ओळखण्यात गफलत झाली तर होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागत नाही. अशा परिस्थितीत सामान्य माणसाला हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाही ह्या बातम्या सतत वृत्तपत्रात येत आहेत. तेव्हा डॉक्टरांचे आणि सामान्य माणसाचे आजारपण हे निश्चित वेगळे असणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुखवस्तु, श्रीमंत, त्यातुन दोघेही डॉक्टर असल्याने सहज मिळणारी सुवेधा आणि उपचार असल्यावर भीती ती कसली वाटणार?

सामान्य माणसाला सोसावे लाग्णारे हाल आणि असणारी भिती घालवण्याचा लवलेशही लेखात नाही!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

Irrational भितीला औषध नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The Journey Is the Reward...