करोनाव्हायरस : इन्फेक्शन नक्की कसे होत असावे?

कोविड १९ महासाथ येऊन सहाएक महिने झालेत. आता लोकांना इन्फेक्शन नक्की कसे होत असावे याबद्दल साधारणपणे एकमत होऊ लागलंय.

या विषयातील तज्ज्ञ लोकांच्या मते केवळ कोरोनाव्हायरस असलेल्या वस्तूला हात लागल्याने किंवा मोकळ्या हवेत जाता जाता कुणाला भेटल्याने विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता फार कमी असते.

यापेक्षा (बंद खोलीत) जवळ जवळ राहून जास्त वेळ कुणाशी बोलत बसणे, किंवा गर्दी असलेल्या ठिकाणी वावर किंवा गर्दी असलेल्या कार्यक्रमांना जाणे (सभा, गाण्याचे कार्यक्रम इत्यादी) यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका खूप वाढतो.

Les deux magots

या नवीन आलेल्या माहितीमुळे सरकार / पॉलिसीमेकर्सना अर्थव्यवस्थेला चालना देणारे निर्णय घेताना (उदा. उद्योगधंदे / आस्थापना वगैरे चालू करणे) आरोग्यविषयक हेळसांड होणार नाही इतपत काळजी घेणे शक्य झाले. उदाहरणार्थ प्लेक्सिगार्ड बॅरियर्स उभारणे, दुकाने व इतर जागांमध्ये मास्कचा वापर अनिवार्य करणे, हवा खेळती राहील असे प्रयत्न करणे, जमेल तेव्हा जास्तीतजास्त खिडक्या-दारे उघडी ठेवण्याचा प्रयत्न करणे.

दोन मोठ्या अभ्यासांमधून एक गोष्ट नक्की पुढे आली आहे की टोटल लॉकडाऊन म्हणजे घरीच बसण्याची सक्ती, मोठे कार्यक्रम / जमावबंदी,आणि सर्व व्यवसाय / दुकाने बंद इत्यादी केल्यामुळे किमान (सुरुवातीला तरी) लाखो लोकांना इन्फेक्शन होणे व लाखोंनी प्राणहानी होणे टळले आहे.

आता कोरोनाव्हायरस कसा पसरतो याबद्दल अधिक माहिती हाती आल्याने, शहर किंवा राज्य पातळीवरीळ सरकारी यंत्रणा पूर्ण लॉकडाऊन करण्याऐवजी फक्त विशिष्ट निर्बंध लागू करून परत साथ पसरणे थांबवू शकतील असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

उदाहरणार्थ वृद्धाश्रमसदृश नर्सिंग होम्स, किंवा ज्येष्ठ नागरिक असलेली मोठी एकत्र कुटुंबे यांना सुरक्षित ठेवणे अशाने शक्य होईल. लोकांना सोशल डिस्टंसिंग पाळणे, मास्कचा अनिवार्य वापर आणि बंद जागांमध्ये मोठे कार्यक्रम इत्यादी करू नयेत याबद्दल जागृत करता येईल.

पब्लिक हेल्थ या विषयात काम करणाऱ्या 'रिझॉल्व्ह टू सेव्ह लाइव्ह्ज' नावाच्या समाजसेवी संस्थेचे चीफ एक्झेक्युटिव्ह टॉम फ्रीडमन म्हणतात की "आपण लॉकडाऊनचा विचार करण्याऐवजी ज्यामुळे फिजिकल डिस्टंसिंग वाढेल अशा गोष्टींचा विचार करावा. उदाहरणार्थ : लोकांनी सायकलवरून ऑफिसला येणे, किंवा सुपरमार्केट्समध्ये कर्बसाईड पिकअपची व्यवस्था ठेवणे आणि इतर अशाच नवीन कल्पना ज्यामुळे (ऑफिसेस / व्यवसाय चालू होऊन) अर्थव्यवस्थेला चालना मिळेल पण विषाणूचा पुन्हा प्रादुर्भाव होणार नाही.

लॉकडाऊन संपून पुन्हा व्यवस्था चालू करण्याकरिता पुढील गोष्टी कराव्यात अशी या गटाची शिफारस आहे : व्यापक चाचण्या, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि इन्फेक्शन झालेल्यांचे विलगीकरण.

काय केलं तर नक्की इन्फेक्शन होतं?
कोरोना इन्फेक्शन 'घेण्याची' खात्रीशीर पद्धत

 1. (इन्फेक्शन झालेल्या माणसाबरोबर असताना) खोकला, श्वासोच्छवास, आणि बडबड करताना विषाणू असलेले वेगवेगळ्या आकाराचे थेंब तयार होतात.
 2. हे करत असताना तुमच्या सभोवताली विषाणू मोठ्या प्रमाणात उद्भवतात.
 3. सभोवताली मोठ्या प्रमाणात असलेले विषाणू तुमच्या नाकातून आत जाऊन पेशींवरचे ACE -२ रिसेप्टर्सद्वारे पेशीमध्ये प्रवेश करून पेशींच्या आत पुनरुत्पादन सुरू करतात.

एक नेहमी विसरली जाणारी महत्त्वाची बाब अशी आहे की वरवर किरकोळ आणि निरुपद्रवी वाटणाऱ्या गोष्टी – म्हणजे बोलणे आणि श्वासोच्छवास – करत असताना वेगवेगळ्या आकाराचे सूक्ष्म थेंब तयार होऊन हवेत मिसळतात. हवेच्या झोताबरोबर ते इकडेतिकडे जाऊन इन्फेक्शन पसरवू शकतात.

श्वासोच्छवासातून पडणाऱ्या सूक्ष्म थेंबांशी संपर्क आल्याने जास्तीत जास्त्त वेळा कोवीड-१९चा प्रादुर्भाव होतो असे आता आरोग्य यंत्रणांच्या निदर्शनास येऊ लागले आहे. हे थेंब नाक, तोंड किंवा क्वचित डोळ्यात गेल्याने एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला इन्फेक्शन होऊ शकते. अर्थात यातील मोठ्या आकाराचे थेंब लवकर / कमी वेळात जमिनीवर पडतात ही त्यातल्या त्यात बरी गोष्ट.

काही अभ्यासकांचे असेही म्हणणे आहे की विषाणू असलेले अतिसूक्ष्म थेंब हवेत जास्त काळ तरंगत राहतात व इतरांच्या श्वासाबरोबर हे सूक्ष्म कण शरीरात प्रवेश करू शकतात.

Guangzhou (चीन) मधील एका रेस्टॉरंटमध्ये बहुधा असेच काही घडले होते. तिथे एक फारशी लक्षणे नसणाऱ्या पण इन्फेक्शन झालेल्या ग्राहकाने त्याच्या आसपास बसलेल्या पाच जणांमधे इन्फेक्शन पसरवले. त्या रेस्टारंटमध्ये खेळती हवा असण्याची कुठलीच व्यवस्था नव्हती आणि एक्झॉस्ट फॅन्स पण बंद करून ठेवण्यात आले होते. इन्फेक्शन झालेल्या ग्राहकाच्या श्वासोच्छवासातून किंवा बोलण्यातून असेच सूक्ष्म थेंब हवेत वाढत गेले असावेत आणि एअर कंडिशनिंग यंत्रणेमुळे आतल्या आतच फिरत राहिले असावेत आणि इतर ग्राहकांच्या श्वासातून इन्फेक्शन पसरले असावे असे एका अभ्यासात आढळले.

या अभ्यासकांपैकी एक, डॉ यूगू ली (हाँगकाँग विद्यापीठातील अभियांत्रिकी प्राध्यापक) यांच्या मते जिथे जास्त लोकांचा वावर आहे अशा ठिकाणी मोकळी खेळती हवा असणे आत्यंतिक महत्त्वाचे आहे. म्हणजे एअर कंडिशनिंग असेल तर हवेचा झोत जमिनीकडून छताकडे ठेवणे आणि छताच्या बाजूने हवा बाहेर ढकलण्याची व्यवस्था ठेवणे, ज्यायोगे सतत ताजी हवा आत येत राहील अशी व्यवस्था महत्त्वाची. यामुळे जरी विषाणूयुक्त सूक्ष्म कण हवेत मिसळत असतील तरी ते साठून राहणार नाहीत, त्याचे प्रमाण कायम कमीकमी होत राहील.

सेन्टर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनचे (अमेरिका) चीफ मेडिकल ऑफिसर जॉन ब्रूक्स यांच्या मते इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढवणारा अजून एक महत्त्वाचा घटक असतो. तो म्हणजे जास्त काळ संपर्क. त्यांच्या म्हणण्यानुसार (ज्याला इन्फेक्शन झाले असू शकेल) अशा माणसासोबत सहा फुटांच्या आतमध्ये मास्क न लावता पंधरा मिनिटे जरी संपर्क आला तरी आपल्याला इन्फेक्शन व्हायची शक्यता खूप वाढते. अर्थात हा एक केवळ ठोकताळा आहे. जर तुमच्या तोंडावरच कुणी शिंकलं किंवा अगदी जवळ येऊन बोललं तर श्वासातून सोडले जाणारे सूक्ष्म थेंब तुमच्या शरीरात लवकर प्रवेश करू शकतात आणि याकरिता पंधरा मिनिटांच्यापेक्षा कमी वेळात होऊ शकते.

सुपरस्प्रेडर्स

एखाद्या कार्यक्रमाच्या जागी एकटाच माणूस किंवा थोडे लोकच साथीचा फैलाव करू शकतात का, म्हणजेच अशा 'सुपरस्प्रेडर्स इव्हेंट्स'मुळे साथ खूप पसरण्याची शक्यता किती याचा अभ्यास करणाऱ्या ग्रुपमधील लिया हॅमर (epidemiologist, skagit county) यांनी उदाहरणादाखल सांगितले की, १० मार्चला, वॉशिंग्टन राज्यात एका चर्चच्या कॉयरची (गानवृंद) प्रॅक्टिस करताना तिथे उपस्थित असणाऱ्यांपैकी ८७ टक्के लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली.

हा कॉयर ग्रुप छोट्याशा जागेत गर्दी करून प्रॅक्टिस करत होता आणि त्यात अनेक ज्येष्ठवयीन सभासद पण होते. अडीच तासांच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांनी चार वेळा बसण्याची जागा बदलली. यातील एकूण एकसष्ठ लोकांपैकी त्रेपन्न लोकांना इन्फेक्शन झाले. (एकाला लक्षणे दिसत होती). यातील दोन लोकांचा मृत्यू झाला.

यात प्रसार होण्याला अनेक गोष्टी कारणीभूत होत्या असे हॅमर सांगतात. छोटी जागा, छोट्या जागेत गर्दी, त्याव्यतिरिक्त गाताना अनेक छोटेमोठे थेंब हवेत सोडले जातात, त्याबरोबरच खोल श्वास घेणेही होते, ज्यामुळे इतरांच्या श्वासामधून बाहेर पडलेले विषाणू असलेले सूक्ष्म थेंब श्वसनसंस्थेत सहज पोचतात आणि साथ अजून पसरते.

ज्या ज्या जागांमध्ये जास्त काळ मोठमोठ्याने बोलणे, गप्पागोष्टी किंवा मोठ्याने श्वासोच्छवास करणे हे होणार असते तिथे अशाच प्रकारचा जलद प्रसार होण्याची शक्यता खूप असते. अशा जागा म्हणजे उदाहरणार्थ जिम, गाण्याचे कार्यक्रम, थिएटरमधील कार्यक्रम, लग्न, वाढदिवस समारंभ, कॉन्फरन्सेस इत्यादी.

Gym

'इमर्जिंग इंफेक्शस डिसीजेस जर्नल'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका पाहणीनुसार पंधरा जानेवारी ते चार एप्रिलच्या दरम्यान जपानमधे एकसष्ट ठिकाणी अशी सामूहिक संसर्गबाधा झाली. ज्या ज्या ठिकाणी हा सामूहिक संसर्ग झालेला आढळला तिथे छोट्या जागेत अनेक लोक जवळजवळ होते आणि त्यांचा जलद श्वासोच्छवास झाला होता. उदाहरणार्थ : कराओके नाईट्स, गर्दीचे नाईट क्लब्ज आणि बार्स आणि जिम.

तथाकथित 'अटॅक रेट', (म्हणजे एका विशिष्ट जागी किती टक्के लोकांना संसर्ग बाधा झाली), हा गर्दीचे कार्यक्रम, गर्दीच्या जागा,घरे इत्यादी ठिकाणे, जिथे अनेक लोकं एकमेकांच्या अतिशय जवळ बराच वेळ असतात, तिथे सर्वात जास्त असतो.

वेलकम ओपन रिसर्चच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार सर्वसाधारणपणे केवळ १० टक्के कोविड-१९ बाधित लोकांमुळे ८० टक्के लोकांना संसर्ग होतो. कॅलिफोर्निया विद्यापीठातील साथीच्या रोगांचे अभ्यासक प्रा जेमी लॉइड स्मिथ सांगतात "काही व्यक्ती, ज्यांच्या शरीरात विषाणूचे प्रमाण खूप जास्त असते,ते खेळती हवा नसलेल्या कोंदट जागांमध्ये जेव्हा इतरांबरोबर असतात आणि संवाद साधतात तेव्हा त्यांच्याकडून सर्वात जास्त रोगप्रसार होतो."

अर्थात बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे कोविड-१९ विषयक उपसंचालक स्कॉट डॉवेल यांच्या मते दरवेळीच अशा सुपरस्प्रेडर इव्हेंटमधून खूप प्रसार होतोच असे नाही.

अनेक पाहणी अभ्यासांनुसार कोविड-१९चा घरातील अटॅक रेट हा ४.६ % ते १९.३ % असतो. चीनमधील एका अभ्यासानुसार यातही थोड़ा फरक असतो. (बाधित माणसाची) पती / पत्नी यांच्यात हा २७.८% इतका जास्त आणि उर्वरित कुटुंबीयांमध्ये १७.३% इतका असतो.

रोझाना डाएझ या ३७ वर्षीय गृहिणी न्यूयॉर्कमध्ये तीन बेडरूम फ्लॅटमध्ये स्वतःच्या पाच कुटुंबसदस्यांबरोबर राहतात. १८ एप्रिलला पक्षाघातामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. डॉक्टरांच्या मते या पक्षाघाताचे कारण कोविड-१९ होते. परंतु त्यांनी घाईघाईत दोन दिवसातच खोकला चालू असतानाच डिस्चार्ज घेतला. त्यांना घरी असलेल्या स्वतःच्या चार वर्षाच्या ऑस्टिस्टीक मुलाचे कसे होईल ही चिंता होती.

घरी गेल्यावर त्यांनी पुरेशी काळजी घेतली. कुणाच्याही जवळ न जाणे, खोकला आल्यास तोंड झाकून घेणे व वारंवार हात साबणाने धुणे ही पथ्ये त्यांनी कटाक्षाने पाळली. त्यांच्या घरातील कुणालाही संसर्गबाधा झाली नाही. त्या म्हणाल्या "मी आजारी असेपर्यंत कुणीही माझ्या जवळ येत नसे".

तज्ज्ञ लोकांच्या मते मोकळ्या हवेत बाहेर असणे / भेटणे सर्वात उत्तम. कारण मोकळ्या हवेत विषाणूची पार्टिकल्स हवेत लवकर निघून जातात. प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी होते. लिनसे मार (हवेतून विषाणूंचा होणारा प्रादुर्भाव अभ्यासणारे व्हर्जिनिया टेक विद्यापीठामधील प्राध्यापक) सांगतात की आपण मोकळ्या हवेत जरी असलो तरी फार जवळ अंतरावर आणि जास्त काळ कुणाबरोबर संपर्क आला तर विषाणू असलेले, श्वासोच्छवासातून बाहेर येणारे सूक्ष्म कण प्रसार करू शकतात.

नक्की किती विषाणू आपल्या शरीरात गेल्यावर इन्फेक्शन होते याबद्दल खात्रीशीर माहिती अजून हातात आलेली नाही. 'नेचर' नावाच्या सुप्रसिद्ध शास्त्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका छोट्या अभ्यासानुसार संशोधकांना असे आढळले की पेशंटच्या घशाच्या स्वाबमध्ये किंवा १ मिली स्पुटममध्ये या विषाणूचे दहा लाखापेक्षा कमी आर एन ए कण असतील तर प्रयोगशाळेत त्यांना वाढवता येणे शक्य होत नव्हते.

या शोधनिबंधाच्या लेखकांपैकी एक, म्युनिचस्थित Clemens Wendtner सांगतात "आमच्या अभ्यासानुसार किमान वर नमूद केलेल्या आकड्यापेक्षा जास्त संख्येने विषाणू असणे हे कुणालाही इन्फेक्शन होण्यास गरजेचे असावे" हे शास्त्रज्ञ München Klinik Schwabing या लुडविग मॅक्सिमिलियन विद्यापीठाशी संलग्न हॉस्पिटलचे संसर्गजन्य रोग विभागप्रमुख आहेत.

बाधित पेशंट्सचे नमुने तपासले असता त्यात त्यांना वरच्या आकड्यापेक्षा हजारपटीने जास्त विषाणू सापडले. सुयोग्य परिस्थितीत विषाणू इतका संसर्गजन्य का आहे याचे स्पष्टीकरण यावरून मिळते : बाधित व्यक्तीच्या शरीरात सापडतो त्याहून अतिशय कमी प्रमाणात विषाणू असला तरी इतरांना संसर्ग करण्यास तो पुरेसा ठरतो.

बदलते धोरण

संसर्ग / प्रसार याबद्दल येत असलेल्या नवीन माहितीमुळे प्रसार रोखण्याची काही धोरणे आता बदलत आहेत. आता कुणी व्यक्ती जर पॉझिटिव्ह टेस्ट झाली तर त्याला होम क्वारंटाईन (विलगीकरण) करणे हे धोरण पुढे आले आहे. (अमेरिकेतील) काही शहरांमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या पेशंट्‌सना मोफत तात्पुरती राहण्याची सेवा पुरविली जात आहे. यामुळे प्रसार कमी होईल / रोखला जाईल अशी अपेक्षा आहे. (आपल्याकडे, भारतात इतके दिवस सरकारने बऱ्याच शाळा / कॉलेजची होस्टेल्स इथे पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात आलेल्या पण नेगेटिव्ह टेस्ट झालेल्या लोकांना मोफत क्वारंटाईन सेवा इतके दिवस पुरविली आहे. आता ज्यांना शक्य आहे अशा पॉझिटिव्ह पण फार शारीरिक त्रास न होणाऱ्या पेशंट्सना घरी क्वारंटाईन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.)

सेन्टर फॉर डिसीज कंट्रोलने (CDC) आता अनलॉक चालू झाल्यावर अमेरिकन नागरिकांना मास्क घालत राहण्याचा सल्ला दिला आहे. CDCचे कोविड-१९चे रिस्पॉन्स इन्सिडन्स मॅनेजर जे बटलर सांगतात की 'तुम्ही जितक्या जास्त लोकांना जितक्या जास्त वेळा जितका जास्त वेळ भेटाल तितका संसर्ग वाढण्याची शक्यता वाढत जाते.' जसजसे विविध राज्ये अनलॉक करत आहेत त्याबरोबर जर पॉझिटिव्ह केसेस वाढत गेल्या तर 'मार्च महिन्यात ज्याप्रमाणे कडक बंधने घातली गेली तशीच बंधने परत आणावी लागतील, अर्थात ही बंधने देशव्यापी न करता, ज्या भागात हे घडत आहे तिथे लोकली घेण्यात येतील', असे ते सांगतात. (आपल्याकडे भारतात विविध शहरांमधे पुन्हा लॉकडाऊन याच कारणाने लागू केला गेला आहे)

जे व्यावसायिक / कारखानदार आपले कारखाने / ऑफिस पुन्हा चालू करत आहेत त्यांच्यासाठी CDCने काही मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत, ती अशी : कामगारांनी / ऑफिस स्टाफने मास्क घालणे बंधनकारक असावे, पब्लिक ट्रान्सपोर्ट / लिफ्ट चा वापर मर्यादित असावा, हॅन्डशेक, मिठी मारणे, फिस्टबम्प हे टाळावे. याबरोबरच सामूहिक खाण्याची सुविधा, वॉटर कूलर, कॉफी इत्यादी टाळून प्रत्येकाला वेगळे स्नॅक्स, कॉफी पाणी पुरविणे इत्यादी करायला सांगितले आहे. याबरोबरच जिथे डेस्क / टेबल यात सहा फुटांपेक्षा कमी अंतर असेल तिथे त्या दोन डेस्क / टेबलच्या मधे प्लास्टिकची पार्टीशन असावी अशी सूचना पण देण्यात आली आहे.

अर्थात सध्याच्या CDCच्या गाईडलाईन्समध्ये हवेतून पसरणाऱ्या संसर्गाबद्दल मौन आहे असे मिनेसोटा विद्यापीठातील संसर्गजन्य रोग व धोरणे विभागाच्या सल्लागार Lisa Brosseau यांचे म्हणणे आहे. त्या सांगतात की हवेतून होणारा प्रसार अत्यंत भीतीदायक असतो त्यावर नियंत्रण मिळविणे अतिशय कठीण त्यामुळे संसर्ग झालेल्या व्यक्तीने घरातच थांबणे अत्यंत महत्त्वाचे, पण अवघड, कारण किती टेस्टिंग केले जाते याला मर्यादा आहे. यामुळे कामाच्या जागी काही अजून काळज्या घेणे जरुरी. सोशल डिस्टंसिंग, N ९५ मास्क आणि इतर काही (विषाणूसंसर्गापासून) सुरक्षासाधनांचा वापर करणे याचा विचार होणे जरुरी आहे.

काही शास्त्रज्ञांच्या मते हवेतून प्रसार होणे नक्कीच शक्य आहे. परंतु आत्तापर्यंतच्या अनुभवावरून हवेतून मोठ्या प्रमाणावर प्रसार होत आहे असे दिसत नाही.

CDCचे डॉ ब्रूक्स सांगतात की गोवर ज्यामुळे होतो ते विषाणू किंवा टीबी होतो ते जिवाणू ज्याप्रमाणे हवेत रेंगाळत राहतात (आणि त्या रोगांचा प्रसार होतो) त्याप्रमाणे कोविड -१९ चा विषाणू जर हवेत रेंगाळत राहून त्याचा प्रसार होत असता तर आत्तापेक्षा खूप जास्त लोकांना संसर्ग झाला असता.
(ही माहिती मूळ लेख जून महिन्यात प्रकाशित झाला त्यावेळची आहे. आजची स्थिती अशी की हवेतून कोविड -१९चा प्रसार होऊ शकतो या थिअरीला जास्त मान्यता मिळू लागली आहे.)

निवेदन : प्रस्तुत लेख वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये १६ जून २०२० रोजी प्रकाशित झालेल्या How Exactly Do You Catch Covid-19? There Is a Growing Consensus (लेखक : Daniela Hernandez, Sarah Toy, Betsy McKay) या लेखाचा स्वैर अनुवाद आहे. सद्यस्थितीविषयी जनप्रबोधन करण्यासाठी हा अनुवाद केला आहे. प्रताधिकार उल्लंघन करण्याचा व्यावसायिक अथवा अन्य हेतू नाही.

© 2020 Dow Jones & Company, Inc. All Rights Reserved.
This translation and the image accompanying it are provided on a not-for-profit basis and only meant for educational purposes. Neither Aisi Akshare nor the translator stand to gain anything on a commercial basis by this.

अनुवाद : अबापट

Crowded Bar
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

हे एका जागी माहिती उपलब्ध करून देणे आवडले आहे.

गेल्या की याच आठवड्यात स्विस इम्युनॉलॉजिस्ट स्टॅड्लर यांचा एक लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार लक्षणे नसणारी व्यक्ती कोविड पोझिटिव्ह असली तरी ती व्यक्ती रोगप्रसार करत नाही (नसेल?) याबद्दल अधिक माहिती मिळू शकेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मलाही हा प्रश्न खूप दिवस पडलेला आहे. असिम्पटोमॅटिक लोक शिंकणे किंवा खोकणे या गोष्टी करत नाहीत, तर मग केवळ बोलताना विषाणू इतरांना देतात का? कारण दुसऱ्याला संसर्ग होण्यासाठी व्हायरल लोड हा एक मोठा घटक कारणीभूत धरला जातो. या विषयावर WHO ने कोलांटी उड्या मारून झाल्या आहेतच. ठोस माहिती देणारा लेख कुणाच्या वाचनात आला असल्यास त्याचा धागा इथे देण्याची विनंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चांगलं काम केलंत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थ्यँक्यू!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.